आटपाट नगरच्या कहाण्या
वाळूवरचा महाल
मागून आवाज
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहायचा. त्याच्याकडे एक तरुण शिष्य होता. तो शिष्य रोज गावच्या तळ्यावर आंघोळीला जायचा, आणि शंकराची पूजा करायचा. वाटेत कोरड्या नदीच्या पात्रातलं एक वाळूचं बेट ओलांडावं लागायचं. घरी परत येताना ते बेट ओलांडलं, की त्याला एक आवाज ऐकू यायचा, “येऊ? येऊ? येऊ?” पण त्याने मागे वळून पाहिलं, तर तिथं कोणीच नसायचं. शेवटी शिष्य इतका घाबरला, की झुरून झुरून तो हाडासारखा वाळून गेला.
वाळूवरचा महाल
“ये, ये, ये”
अखेर ब्राह्मणाने त्याला विचारलं, “तुला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. आणि तू इतका रोड झालास. काय झालं रे?” “मला खावंसं वाटत नाही,” मुलगा म्हणाला. “मला भीती वाटते. आंघोळ करून परत येताना दर वेळी मागून आवाज येतो, ‘येऊ?’ पण तिथं कोणीच नसतं.” “घाबरू नकोस,” ब्राह्मण म्हणाला. “पुन्हा तो आवाज आला, की मागे वळून पाहू नकोस. जितक्या धिटाईने ओरडता येईल तितक्या धिटाईने ओरड, ‘ये, ये, ये.’” दुसऱ्या दिवशी तळ्यावरून घरी येताना शिष्याला मागून तीच हाक ऐकू आली. तो खूप घाबरला, पण त्याने मागे वळून पाहिलं नाही. थोड्याच वेळात त्याने भीती आवरली. डुरकणाऱ्या बैलासारख्या आवाजात तो ओरडला, “ये, ये, ये!” घरी पोचेपर्यंत तो तसाच ओरडत राहिला. एकदाही त्याने मागे वळून पाहिलं नाही.
वाळूवरचा महाल
भुकेली बायको
शिष्य घरात आला, तेव्हा ब्राह्मणाने वर पाहिलं. मुलाच्या अगदी मागोमाग एक तरुण मुलगी चालत आली होती. ब्राह्मणाने लगेच तिचं लग्न आपल्या शिष्याशी लावून दिलं. आणि आपल्या घराजवळच त्यांना राहायला एक घर दिलं. पावसाळ्याचा श्रावण महिना आला. पहिल्या सोमवारी नवरा उठला, आणि बायकोला म्हणाला, “मी शंकराची पूजा करायला जातो. माझी वाट पाहू नकोस. भूक लागली, की लगेच न्याहारी करून घे.” तो गेला, आणि थोड्याच वेळात तिला भूक लागली. पण तिला माहीत होतं, नवरा काहीही म्हणो, तो शंकराची पूजा करत असताना आपण खाऊ नये. म्हणून ती थोडा वेळ थांबली. मग तिला राहवेना. तिने न्याहारी तयार केली, आणि ती खायला बसली.
वाळूवरचा महाल
पलंगाखाली लपवलं
तिने पहिला घास तोंडात घातला, तोच नवरा बाहेरच्या दाराशी आला. “अगं, दार उघड!” त्याने हाक मारली. ती खूप घाबरली. तिने न खाल्लेली न्याहारी पलंगाखाली सारली. हात धुतले, आणि दार उघडलं. मग नवऱ्याला सांगितलं, मी आपली वाट पाहत होते. ते खरं नव्हतं. तिने पुन्हा नवी न्याहारी तयार केली, आणि दोघं एकामागून एक जेवले. पुढच्या सोमवारी अगदी तसंच झालं. तिने न्याहारी तयार केली, आणि ती खायला बसते, तोच नवरा घरी आला. तिने अन्न पलंगाखाली लपवलं, आणि वाट पाहत होते असं दाखवलं. त्यानंतरच्या दोन्ही सोमवारी तिने नवऱ्याला असंच फसवलं.
वाळूवरचा महाल
रत्नांनी भरलेली ताटं
श्रावणातल्या शेवटच्या रविवारी नवरा-बायको झोपायला गेले. तेव्हा नवऱ्याला पलंगाखाली काहीतरी चमकताना दिसलं. काय आहे ते त्याने पाहिलं, तर रत्नांनी भरलेली कितीतरी ताटं! “ही कुठून आली?” त्याने विचारलं. ती तिने कधीच न खाल्लेल्या न्याहाऱ्या होत्या. शंकरांनी त्यांचं सोनं आणि रत्नं केली होती. पण ती इतकी घाबरली, की आधीपेक्षाही मोठं खोटं बोलली. “ही माझ्या आईवडिलांनी, माहेरच्या माणसांनी दिलेली भेट आहे,” ती म्हणाली. “पण तुझ्या वडिलांचं घर आहे कुठे?” नवऱ्याने विचारलं. “कोरड्या नदीच्या पात्रातल्या वाळूच्या बेटावर,” ती म्हणाली. “मग मला तिथं घेऊन चल,” नवरा म्हणाला.
वाळूवरचा महाल
वाटेत प्रार्थना
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं निघाले. ती इतकी घाबरली होती, की तिला धड चालवतही नव्हतं. कारण तिला पक्कं ठाऊक होतं, वाळूच्या बेटावर आपल्या वडिलांचं घरबीर काही नाही. वाटेत तिने शंकराची प्रार्थना केली. “शंकर देवा, कोरड्या नदीच्या पात्रातल्या वाळूच्या बेटावर माझ्या वडिलांचं एक घर उभं करा,” ती म्हणाली. “अर्धा तास का होईना, पण ते उभं राहू द्या.” शेवटी नवरा-बायको वाळूच्या बेटावर पोचले. पाहतात तो काय, तिथं एक मोठा महाल उभा!
वाळूवरचा महाल
माहेरच्यांनी केलेलं स्वागत
एक उंची कपडे घातलेला तरुण पुढे आला. त्याने नवऱ्याला मेहुणे म्हणून नमस्कार केला. एका भारदस्त म्हाताऱ्या सरदाराने त्याचं जावई म्हणून स्वागत केलं. एक सुंदर तरुण बाई बायकोला नणंद म्हणून भेटली. आणि एक गोड लहान मुलगी धावत आली, तिला बिलगली, आणि तिला “ताई” म्हणाली. दासी, कुळंबिणी तिच्या सेवेला धावल्या. शिपाई महालावर पहारा देत होते. दारावरच्या पहारेकऱ्यांनी बाजूला होऊन त्यांना आत जाऊ दिलं. आत नवरा-बायकोला बसायला पाट दिले. त्यांच्यासाठी मोठी थाटाची मेजवानी तयार होती. जेवण झाल्यावर त्यांनी तिच्या आईवडिलांचा निरोप घेतला. दोघांच्या गळ्यात फुलांचे हार पडले, आणि ते घरी निघाले.
वाळूवरचा महाल
विसरलेला हार
अर्ध्या वाटेवर बायकोला आठवलं, तिने आपला हार एका खुंटीला टांगला होता, आणि तो तिथंच विसरली होती. म्हणून ती आणि नवरा पुन्हा वाळूच्या बेटावर गेले. पण तिथं पोचले, तर महाल नाहीसा झाला होता. पहारा द्यायला शिपाई नाहीत, दारावर पहारेकरी नाहीत, दासी नाहीत, कुळंबिणी नाहीत. कोरड्या नदीच्या पात्रात फक्त एक वाळूचं बेट होतं. वाळूवर तिचा विसरलेला हार पडला होता. तिने तो उचलला, आणि गळ्यात घातला.
वाळूवरचा महाल
“जसं आलं, तसं गेलं”
“तुझ्या वडिलांच्या घराचं काय झालं?” नवऱ्याने विचारलं. “जसं आलं, तसं गेलं,” ती रडत म्हणाली. “पण आपण मला क्षमा कराल, असं वचन द्याल, तर सगळं सांगते.” नवऱ्याने वचन दिलं, आणि तिने त्याला सगळं खरं खरं सांगितलं. त्या सोमवारी तिला कशी भूक लागायची, न्याहारी पलंगाखाली कशी लपवायची, आणि शंकरांनी त्या न्याहारींची रत्नं कशी केली, ते सांगितलं. भीतीपोटी आपण माहेरच्यांबद्दल खोटं बोललो, हेही सांगितलं. अर्धा तास का होईना, बेटावर घर उभं राहू द्या, अशी शंकराची प्रार्थना केली, तेही सांगितलं. आणि शंकरांनी कृपा करून तिची प्रार्थना पुरी केली होती. नवऱ्याने तिला क्षमा केली. पुन्हा ती त्याच्याशी कधीही खोटं बोलली नाही. दोघं मिळून घरी गेले, आणि सुखाने नांदले. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या आठव्या कहाणीवरून, ‘बेटावरचा महाल’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.