आटपाट नगरच्या कहाण्या
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
भांडखोर राण्या
आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला चार राण्या होत्या. घरकामावरून त्या सारख्या भांडायच्या. घरात थोडी शांतता राहावी, म्हणून राजाने स्वतःच त्यांच्यात कामं वाटून दिली. पहिल्या राणीने दूधदुभतं सांभाळायचं. दुसरीने सगळा स्वयंपाक करायचा. तिसरीने मुलांकडे लक्ष द्यायचं, आणि चौथीने राजाचे कपडे सांभाळायचे. सुरुवातीला सगळं ठीक चाललं. पण लवकरच पहिली राणी तिसरीला म्हणाली, “तू का मुलं सांभाळायची? तू दूधदुभतं का नाही बघत?”
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
राजाला शांतता नाही
दुसरी राणी चौथीला म्हणाली, “मीच का सगळा स्वयंपाक करायचा?” तिसरी म्हणाली, “मीच का नेहमी मुलं सांभाळायची?” आणि चौथीने पाय आपटला. “मी नाही राजाचे कपडे सांभाळणार,” ती म्हणाली. दिवसभर त्या भांडायच्या, एकमेकींवर ओरडायच्या. राजाचा जीव आधीपेक्षाही जास्त हैराण झाला. काळजीने त्याचा चेहरा उदास झाला, ओढलेला दिसू लागला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या डोक्यात एकच विचार असायचा, त्या चार भांडखोर राण्यांचा.
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
ऋषी आले
एके दिवशी थोर वसिष्ठ ऋषी राजाला भेटायला आले. राजाने त्यांना जमिनीवर डोकं टेकून नमस्कार केला, आणि बसायला राजासन दिलं. वसिष्ठांनी राजाचा चेहरा पाहिला. तो किती उदास, किती काळजीत आहे, ते त्यांनी ओळखलं. त्यांनी कारण विचारलं, आणि राजाने सगळं सांगितलं. मग ऋषी उठले. राजा त्यांच्याबरोबर राण्यांच्या महालात गेला. तिथं त्यांनी चारही राण्यांना बाहेर बोलावलं. “तुम्ही का भांडता?” असं ऋषींनी त्यांना विचारलं.
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
कानात बोटं
“मीच का दूधदुभतं बघायचं?” पहिली राणी ओरडली. “मी नुसती स्वयंपाकीण का?” दुसरी ओरडली. “सगळ्या मुलांचं मीच का बघायचं?” तिसरी ओरडली. “राजाचे कपडे निवडायची सगळी कटकट मलाच का?” चौथी ओरडली. “मी हुकूम दिला आहे, म्हणून तुम्ही ही कामं करायची,” राजा म्हणाला. पण राण्यांनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्या सगळ्या एकदम इतक्या जोराने ओरडल्या, की राजाला आणि ऋषींना कानात बोटं घालावी लागली.
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
शंकराच्या पिंडीजवळची गाय
थोडा वेळ ऋषी विचारात गढून गेले. मग ते पहिल्या राणीकडे वळले. “दूधदुभतं तुझ्याकडे सोपवलं आहे, हो ना?” त्यांनी विचारलं. “हो,” ती म्हणाली. “मग माझं ऐक,” वसिष्ठ म्हणाले. “मागच्या जन्मी तू गाय होतीस. रानात तू चरायचीस, तिथं जवळच शंकराची एक पिंडी होती. रोज दुपारी तू त्या पिंडीजवळ येऊन उभी राहायचीस, आणि तिच्यावर आपलं दूध ठिबकू द्यायचीस. अशी तू शंकराची भक्ती केलीस, म्हणून या जन्मी तू आटपाटच्या राजाची राणी झालीस.”
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
पूर्ण पुण्य
“पण त्या जन्मी तुला पूर्ण पुण्य मिळालं नाही. म्हणून शंकरांनी राजाला सांगितलं, हिच्याकडे दूधदुभतं सोपव. आणि राजाने शंकराचा तो हुकूम तुला सांगितला. तो तू पाळ. राजालाच शंकर मानून त्याचा मान राख. असं केलंस, तर तुला पूर्ण पुण्य मिळेल, आणि तू शंकराच्या कैलासाला जाशील.” मग वसिष्ठांनी पहिल्या राणीला आशीर्वाद दिला. तिने त्यांना नमस्कार केला. भांडणाचा विचार तिने सोडून दिला, आणि ती दूधदुभत्याच्या कामाला लागली.
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
भिक्षा मागणारी ब्राह्मणी
मग वसिष्ठांनी दुसऱ्या राणीला विचारलं, “तू कशासाठी भांडतेस?” “मी नुसती स्वयंपाकीण का?” ती म्हणाली. ऋषींनी थोडा वेळ विचार केला. “मागच्या जन्मी,” ते म्हणाले, “तू एका गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. दारोदार भिक्षा मागून पोट भरायचीस. दर सोमवारी तू उपास करायचीस. त्या दिवशी भिक्षेत जे धान्य मिळेल, ते शिजवून शंकराला नैवेद्य दाखवायचीस. शंकर प्रसन्न झाले, आणि त्यांनी तुला राणी केलं. तू त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचीस, म्हणून त्यांनी राजाला सांगितलं, हिच्याकडे स्वयंपाकघर सोपव. तेव्हा शंकराचं ऐक, आणि सगळ्या आटपाट नगराला मोठी मेजवानी दे. मग ते तुला आपल्याबरोबर कैलासाला नेतील.” ऋषींनी तिला आशीर्वाद दिला. तिने नमस्कार केला, आणि ती अगदी आनंदाने राजासाठी स्वयंपाक करायला गेली.
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
रानातली मुलगी
मग ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले. “मी नुसतं मुलांचंच का करत बसायचं?” ती म्हणाली. वसिष्ठांनी थोडा वेळ विचार केला. “मागच्या जन्मी,” ते म्हणाले, “तू रानात राहणाऱ्या एका जमातीतली मुलगी होतीस. दर सोमवारी तू उपास करायचीस. तोडलेल्या फळांतली सगळ्यात चांगली फळं शंकराला वाहायचीस. म्हणून त्यांनी तुला राणी केलं, आणि राजाची मुलं तुझ्या हाती सोपवली. त्यांच्याशी प्रेमाने वाग. शेवटी ते तुला कैलासाला नेतील.” ऋषींनी तिला आशीर्वाद दिला. तिने नमस्कार केला. मग ती हसत हसत मुलांबरोबर खेळायला पळाली.
वसिष्ठ ऋषी आणि चार राण्या
घार आणि छत
सगळ्यात शेवटी त्यांनी चौथ्या राणीला विचारलं. “मी नुसते राजाचे कपडेच का सांभाळायचे?” ती म्हणाली. “मागच्या जन्मी,” ऋषी म्हणाले, “तू घार होतीस. रोज दुपारी तू शंकराच्या एका पिंडीवर पंख पसरायचीस, आणि तिला उन्हापासून सावली द्यायचीस. म्हणून त्यांनी तुला राणी केलं. तुझ्या पंखांनी शंकराची पिंडी झाकली होती, तसं आता तुझ्या पलंगावर छत असतं. तू शंकराची सेवा केलीस, तशी आता राजाची, तुझ्या नवऱ्याची, सेवा कर. मग तुला पूर्ण पुण्य मिळेल, आणि तू कैलासाला जाशील.” ऋषींनी तिला आशीर्वाद दिला. ती आनंदाने राजाचे कपडे बघायला गेली. त्यानंतर चारही राण्या पुन्हा कधी भांडल्या नाहीत. त्या राजाबरोबर सुखाने नांदल्या. वसिष्ठांनी भांडण मिटवलं, आणि त्या चार राण्या गुणी झाल्या. ही कहाणी ऐकणाऱ्या प्रत्येक मुलीने त्यांच्यासारखं गुणी व्हायचा प्रयत्न करावा. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या तेराव्या कहाणीवरून, ‘वसिष्ठ आणि चार राण्या’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.