भारतातील ऐतिहासिक स्मारकांच्या कथा · अजिंठा
लेडी हेरिंगहॅम, नंदलाल बोस आणि असितकुमार हालदार
जणू जादूने
डोरोथी लार्चर लेडी हेरिंगहॅम यांच्याबरोबर इंग्लंडहून चित्रांच्या प्रती करायला आल्या होत्या. “अजिंठ्याच्या दालनांत पहिल्यांदा पाऊल टाकताच भिंतींवरची चित्रे स्पष्ट दिसणे फार कठीण जाते.” ही चित्रे पाहायला दूरदूरहून आलेल्यांना, काळाने त्यांच्यावर पसरवलेला काळोख पाहून धक्काच बसेल. पण असा पाहुणा “निराश व्हायचे ठरवण्यापूर्वी” थोडा वेळ थांबला, तर काय होईल? राजे आणि त्यांच्या डौलदार राण्या, कुमारिका आणि दरबारी, नर्तकी आणि वादक, शिकारी आणि सर्व प्रकारचे प्राणी “जणू जादूने भिंतींतून प्रकट होतील.” “मला वाटते, मध्यरात्री पैंजणांची मंद किणकिण ऐकू येत असेल, आणि त्या शांततेत, त्या लांब डोळ्यांतून चमकणारे कटाक्ष कदाचित कुजबुजूही लागतील.” लेडी हेरिंगहॅम स्वतः चित्रकार होत्या. १९०९-१० आणि १९१०-११ असे दोन हिवाळे त्यांनी अजिंठ्याला चित्रांच्या प्रती करण्यात घालवले. आपण एका महान संस्कृतीच्या आणि एका महान कलेच्या अवशेषांसमोर उभ्या आहोत, असे त्यांना वाटत होते. अशी कला, “जिची परंपरेखेरीज आता फारशी खूण उरलेली नाही.” त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या तरुण चित्रकारांपैकी एक होते असितकुमार हालदार.
लेडी हेरिंगहॅम, नंदलाल बोस आणि असितकुमार हालदार
बुद्धांचे एक रेखाटन
लेडी हेरिंगहॅम यांनी अजिंठा पहिल्यांदा पाहिला, तो १९०६-७ च्या हिवाळ्यात, ब्रिटिश म्युझियमचे लॉरेन्स बिनियन यांच्या सुचवण्यावरून. तिथे त्यांनी भिंतीवरच्या बुद्धांच्या एका मोठ्या प्रतिमेचे ओबडधोबड रेखाटन केले. त्या रेखाटनात, आणि त्यांनी सांगितलेल्या चित्रांच्या वर्णनात बिनियन यांना रस वाटला; त्याने त्यांचा स्वतःचा रसही वाढला. आणि तोच त्यांना पुन्हा तिथे घेऊन आला: १९०९-१० च्या हिवाळ्यात सुमारे सहा आठवडे, आणि पुढच्या हिवाळ्यात तीन महिन्यांहून अधिक. त्यांची छावणी हैदराबादच्या निजामाने सज्ज करून दिली होती; अजिंठा त्याच्याच मुलखात आहे. त्या एकट्या काम करत नव्हत्या. त्यांच्या मदतीला कलकत्त्याहून दोन चित्रकार आले: नंदलाल बोस आणि खुद्द हालदार. त्या दोघांचे पूज्य कलागुरू अवनींद्रनाथ टागोर यांनी त्यांना पाठवले होते. ते ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट’च्या वतीने आले होते. तिसरे, समरेंद्रनाथ गुप्त, नंतर आले. आणखी दोन चित्रकार दोन्ही वर्षी त्यांना येऊन मिळाले: सय्यद अहमद आणि फजलुद्दीन. हे पाचही जण त्यांच्याबरोबर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत. ती छावणी म्हणजे त्यांच्यासाठी मोठा आनंद होता. स्वतःचे चित्रकाम आणि इतरांच्या कामावर देखरेख, यांबरोबरच छावणीची व्यवस्थाही त्याच पाहत. आसपासच्या गावांतून येणाऱ्या अनेक आजाऱ्यांवर त्या उपचार करत; आजारी जनावरांवरसुद्धा. त्या साध्या ग्रामीण जीवनातले मोकळेपण त्यांना फार आवडे; आणि “त्यांचे सहकारी असलेल्या तरुण भारतीय सद्गृहस्थांबरोबरचा मोकळा, मैत्रीचा सहवास”ही.
लेडी हेरिंगहॅम, नंदलाल बोस आणि असितकुमार हालदार
राम! राम!
डिसेंबर १९१० मध्ये हालदार दुसऱ्यांदा अजिंठ्याला निघाले. टांग्याचा घोडा न थांबता चोवीस मैल चालून आला होता. आणि मग एका नदीपाशी तो हटून बसला; काही केल्या नदी ओलांडेना. नदीत एक म्हातारा महाराष्ट्रीय माणूस आंघोळ करत होता. त्यांची अडचण पाहून तो टांगेवाल्याला म्हणाला, “भाऊ, मी माझे दोन मोठे बैल आणतो. घोडा सोड; नदीपलीकडच्या रस्त्यावर तुझी गाडी मी चढवून देतो.” अर्धवट आंघोळ तशीच सोडून तो आपल्या मुलाला आणि दोन्ही बैलांना घेऊन आला. म्हाताऱ्याने चाक ढकलले, मुलाने बैल हाकले, आणि आनंदाने त्यांनी गाडी नदीपार नेऊन वरच्या रस्त्यावर चढवली. हालदार त्यांना मोबदला द्यायला गेले, तेव्हा त्यांनी हालदारांनाच ओशाळे केले. ते म्हणाले, “अरे राम! राम! तुम्हाला ठाऊक नाही का, एका जिवाने दुसऱ्या जिवासाठी असा उपकार केला नाही, तर जगत्पिता त्याला शिक्षा करतो?” ही मंडळी लेण्यांना सर्वांत जवळच्या फर्दापूर गावी राहत, आणि दिवसातून दोनदा बैलगाडीने लेण्यांकडे जात. वाट इतकी खराब होती, की गाडीची चाके मोठमोठ्या दगडांवर चढत, आणि धाडकन खाली उतरत. तरीही बैल ती गाडी सहज ओढून नेत; आणि मंडळींना त्यात गंमतच वाटे.
लेडी हेरिंगहॅम, नंदलाल बोस आणि असितकुमार हालदार
डोंगरातली कबुतरांची खुराडी
लेणी डोंगरांच्या इतक्या एकांत कोपऱ्यात होती, आणि तिथले दृश्य इतके सुंदर होते, की हालदार यांच्या तोंडातून शब्दच फुटेना. दूरवरून विहारांच्या खांबांच्या ओसऱ्यांच्या रांगा आणि मंदिर-लेण्यांच्या मोठमोठ्या गोल कमानी पहिल्यांदा दिसल्या, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. जिथे गाडी सोडली, तिथून डोंगरकपारीतली लेणी कबुतरांच्या छोट्या खुराड्यांच्या रांगांसारखी दिसत. आणि आपले निर्मळ पाणी ओतणारा तो धबधबा त्यांना जणू युगानुयुगे भारतीय कलेचा महिमा गात आला आहे, असे वाटले. सर विल्मॉट हेरिंगहॅम यांच्या हकीकतीनुसार आत अनेक मंदिरांच्या खांबांमध्ये रानमाश्यांची मोठमोठी पोळी लटकत होती; त्यांना फार जपून सांभाळावे लागे. खोल कोनाड्यांत “किचकिचणारी वटवाघळे” खडकाच्या कंगोऱ्यांवरून सरपटत. “आपल्या शतकानुशतकांच्या वस्तीची साठलेली दुर्गंधी हेच माणसाच्या घुसखोरीविरुद्ध आपले सर्वांत भयंकर संरक्षण आहे, हे त्यांना ठाऊक नसते.” हालदार यांना लेडी हेरिंगहॅम यांचे नवल वाटे. स्वखर्चाने, म्हातारपणी, एवढ्या दूर, जवळजवळ नष्ट झालेल्या चित्रांच्या शक्य तितक्या हुबेहूब प्रती घ्यायला त्या आल्या होत्या. आणि वटवाघळांच्या आणि घुबडांच्या दुर्गंधीने भरलेल्या लेण्यांत त्या अपार धीराने काम करत. “त्या दूरच्या दख्खनमध्ये आमचे ना कुणी आप्त होते, ना मित्र. तिथे त्या प्रेमळ इंग्रज बाईंनी आम्हा सगळ्यांची मायेने काळजी घेतली. ते आम्ही या जन्मी कधीच विसरणार नाही.”
लेडी हेरिंगहॅम, नंदलाल बोस आणि असितकुमार हालदार
गावकरी काय सांगतात
फेब्रुवारीत अजिंठ्याला जत्रा भरते. रंगीबेरंगी कपडे घातलेले महाराष्ट्रीय स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने येतात, आणि धबधब्याजवळ दुकाने थाटली जातात. तिथले लोक लेण्यांच्या आतल्या बुद्धमूर्तींना श्रीरामचंद्र, लछमनजी अशी वेगवेगळी नावे देतात. पुजारी त्या मूर्तींना सजवतात, शेंदूर फासतात, आणि यात्रेकरूंकडून चांगली कमाई करतात. ही लेणी माणसांनी घडवली, यावर त्यांचा विश्वास नाही. त्यांची परंपरा अशी: स्मरणापलीकडच्या एका युगात भगवान विष्णूंनी डोंगरांच्या गूढ हृदयातून लेणी कोरायचे ठरवले. सारे जग झोपेत असताना, एकाच रात्रीत ते ती स्वर्गाला घेऊन जाणार होते. त्यांच्या आज्ञेने विश्वकर्मा कामाला लागले. पण लेणी पुरी होण्याआधीच पहाट होऊ लागली; डोंगरांच्या कडेवर फिकट तांबूस छटा उमटली. जीव जागे होण्याची वेळ आली, हे पाहून विष्णूंनी आपले वाहन गरुड यांना ते पाषाणमहाल ताबडतोब स्वर्गाला न्यायची आज्ञा केली. गरुडांनी अपुऱ्या लेण्यांसकट तो डोंगर आपल्या पंखांवर उचलला. पण ते आकाशात झेपावत असतानाच पहाटे कोंबडे आरवले. पक्षिराजांना लेणी होती तिथेच सोडून मानवी दृष्टीआड नाहीसे व्हावे लागले.
लेडी हेरिंगहॅम, नंदलाल बोस आणि असितकुमार हालदार
बाह्यरेषांचा शोध
जवळजवळ सगळ्या चित्रांखाली ठाम बाह्यरेषा होत्या: आधी गिलाव्यावर भडक नारिंगी-तांबड्या रंगात, मग काळ्या किंवा तपकिरी रंगात दुरुस्त केलेल्या. “प्रती करताना आमचे पहिले काम होते, या रेषा शोधून त्यांचे ट्रेसिंग करणे, आणि दुसरे, त्या हरवू न देणे”, रंग भरत जाताना. पृष्ठभाग कितीही काळवंडलेला असला, तरी त्या जवळजवळ नेहमीच ओळखता येत. दिव्यांशिवाय सर्वांत मोठी चित्रे एका नजरेत सामावणे जवळजवळ अशक्य होते. त्यांचे अॅसिटिलीनचे दिवे भिंतीचा दोन-तृतीयांश भाग उजळत. भिंतींच्या वरच्या टोकांजवळ काम करताना ते तिथेच बनवलेल्या ओबडधोबड शिड्यांवर उभे राहत; त्या खूप डुलत, आणि मजुरांना त्या धरून ठेवाव्या लागत. जिथे चित्र फार काळवंडले होते, तिथे लार्चर आपल्या ट्रेसिंग कागदाचे वरचे दोन कोपरे पक्के करत. मग कागद खालून झटकन गुंडाळत, बाह्यरेषा पाहत, कागद परत सोडत, आणि ट्रेसिंग करत. “पुष्कळ लोक मेणबत्ती घेऊन जातात, आणि त्यांना जवळजवळ काहीच दिसत नाही.” ठरावीक वेळी सूर्यप्रकाश लेण्यांत शिरे, आणि त्या प्रकाशात चित्रे अशी जिवंत होत, की त्या सौंदर्याचे वर्णन शब्दांत करता येत नाही. एकदा ते पहिल्या लेण्यात एका भिंतीवरच्या चित्राची प्रत करत असताना त्यांनी मागे वळून पाहिले. ओसऱ्यांनी वेढलेले ते भव्य दालन चित्रातल्या एका ओसरीवाल्या दालनासारखेच होते; जणू चित्रकारांनी हेच दालन पाहून ते चित्र काढले होते.
लेडी हेरिंगहॅम, नंदलाल बोस आणि असितकुमार हालदार
इतके निश्चित, इतके परिपूर्ण
या चित्रकारांनी आपल्या प्रतींमधली लहान छिद्रे भरून काढली होती; रचनेच्या सौंदर्यासाठी, आणि चित्र नीट समजावे म्हणून. काही जण याला दुरुस्ती म्हणतील; पण त्यांनी इतके कमी भरले होते, की प्रती अपुऱ्याच दिसत. “खरे तर मूळ कामाचे तंत्र इतके निश्चित आणि परिपूर्ण आहे, की ते पुन्हा साधण्याइतका कुशल हात आमच्यापैकी कुणाकडेच नव्हता.” त्यांच्या प्रती १९१२ मध्ये इंडिया सोसायटीला देण्यात आल्या, आणि पहिल्यांदा क्रिस्टल पॅलेसमधल्या ‘फेस्टिव्हल ऑफ एम्पायर’ प्रदर्शनात मांडल्या गेल्या. गुलाम यजदानी यांच्या मते, सगळे गुण असूनही मेजर गिल, जॉन ग्रिफिथ्स आणि लेडी हेरिंगहॅम यांच्या प्रतींनी “जाणकारांचे पूर्ण समाधान केले नाही.” नकलकाराच्या स्वतःच्या आवडीनिवडी त्यांत शिरल्या होत्या; आणि मूळ तंत्र इतके जोरकस होते, की हलक्या माध्यमात ते उतरत नव्हते. त्यांच्या मते या मुद्द्यावर लेडी हेरिंगहॅम यांचे स्वतःचे मत “निर्णायक” आहे. हैदराबादला पुरातत्त्व खाते स्थापन केल्यानंतर थोड्याच काळात, १९१५ मध्ये, निजामाच्या सरकारने चित्रांच्या अधिक हुबेहूब प्रती करायला सय्यद अहमद यांची नेमणूक केली. ते “लेडी हेरिंगहॅम यांच्या हाताखाली तयार झाले होते.” त्यांच्या प्रती रंगछटांच्या बाबतीत आधीच्या सगळ्या प्रतींपेक्षा स्पष्टपणे सरस होत्या. तरीही कलाप्रेमींना रंगीत फोटोग्राफीने केलेल्या प्रती हव्या होत्या.
लेडी हेरिंगहॅम, नंदलाल बोस आणि असितकुमार हालदार
एक मळकट डाग
सुरुवातीला ते अशक्य वाटले. ओलाव्याने आणि मळाने चित्रांवर एक पुटच चढले होते. ते काढणे कठीण होते, कारण “काही पुरातत्त्वज्ञांनी आणि चित्रकारांनी” चित्रे उजळावीत आणि हवामानापासून त्यांचे रक्षण व्हावे, म्हणून त्यांच्यावर वार्निश लावले होते. १८७९ मध्ये जेम्स बर्जेस यांनी एका अपुऱ्या चित्रातल्या आकृतींबद्दल लिहिले होते: “वार्निश लावले, तर कदाचित त्या समजण्याजोग्या होतील.” लेडी हेरिंगहॅम यांनी “यात्रेकरूंच्या शेकोट्यांच्या धुराने किंवा नकलकारांच्या वार्निशने” आलेल्या काळेपणाबद्दल लिहिले होते. पाव शतकात त्या वार्निशने कुंचल्याचे बारीक काम धूसर करून टाकले होते. जिथे ते हलक्या प्रतीचे होते, आणि मळ न काढताच लावले गेले होते, तिथे त्याने अख्ख्या चित्राचा “एक मळकट डाग” करून टाकला होता. निजामाच्या पैशाने आणि लॉर्ड कर्झनच्या मदतीने रोममधल्या ब्रिटिश राजदूताने दोन इटालियन तज्ज्ञ मिळवले. १९२०-१ आणि १९२१-२ अशा दोन मोसमांत त्यांनी चित्रे स्वच्छ केली. त्यात त्यांना मोठे यश आले; फक्त सोळाव्या आणि सतराव्या लेण्यांतल्या काही ठिकाणी नाही. तिथे वार्निश रंगांतच मुरले होते, आणि ते काढण्याचा प्रत्येक प्रयत्न “खुद्द रंगच पूर्णपणे पुसले जाण्यात” संपला. मग रंगीत फोटोग्राफीतले एक ब्रिटिश तज्ज्ञ, ई. एल. व्हेसी, यांना पाच महिन्यांसाठी नेमण्यात आले. त्या काळात त्यांनी जवळजवळ सगळ्या चित्रांचे फोटो घेतले, “जी काळाच्या आघातांतून टिकून राहिली आहेत.” ही कथा पुढील ग्रंथांवरून सांगितली आहे: लेडी हेरिंगहॅम आणि त्यांचे सहकारी, ‘अजंता फ्रेस्कोज’ (१९१५), प्रस्तावना, सर विल्मॉट हेरिंगहॅम यांचा ‘द एक्स्पिडिशन’ हा भाग आणि पृष्ठे १७-२१, डोरोथी लार्चर यांच्या टिपणासह; असितकुमार हालदार, ‘अजंता’ (बंगाली; कलकत्ता, बंगाली सन १३२३, सुमारे १९१६), प्रस्तावना आणि पृष्ठे १-२४, आमचे भाषांतर; गुलाम यजदानी, ‘अजंता’, भाग १ (१९३०), प्रस्तावना, पृष्ठे ५-६ (रोमन क्रमांक); आणि जेम्स बर्जेस, ‘नोट्स ऑन द बौद्ध रॉक-टेम्पल्स ऑफ अजंता’ (१८७९), पृष्ठ ३४. ‘अजंता फ्रेस्कोज’नुसार कलकत्त्याचे चित्रकार अवनींद्रनाथ यांच्या खर्चाने पाठवले गेले; हालदार सांगतात, प्रवासखर्च अवनींद्रनाथ आणि त्यांचे थोरले बंधू गगनेंद्रनाथ आणि समरेंद्रनाथ टागोर यांनी मिळून उचलला, आणि के. वेंकटप्पा यांनाही बोलावून घेतले गेले. ‘अजंता फ्रेस्कोज’ सय्यद अहमद आणि फजलुद्दीन यांना हैदराबादचे म्हणतो, हालदार औरंगाबादहून आलेले; आणि पहिला हिवाळा तो ग्रंथ सहा आठवड्यांचा सांगतो, हालदार तीन महिन्यांचा. ‘अजंता फ्रेस्कोज’नुसार डोरोथी लार्चर दुसऱ्या हिवाळ्यात आल्या, हालदारांनुसार डिसेंबर १९०९ मध्ये.