मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
आत्माराम
( १ ) बेंदो गावात महादेव सोनार हा एक नामांकित माणूस होता. तो आपल्या पडवीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेगडीपुढे बसून खटखट करीत असे. हा अखंड आवाज ऐकण्याची लोकांना इतकी सवय होऊन गेली होती, की काही कारणाने तो थांबला म्हणजे काहीतरी हरवल्यासारखे वाटे. तो दररोज न चुकता एकदा, पहाटेच्या वेळी, आपल्या पोपटाचा पिंजरा घेऊन, एखादे भजन गात तळ्याकडे जात असे. त्या अंधूक उजेडात त्याचे जर्जर शरीर, बोळके तोंड आणि वाकलेली कंबर पाहून एखाद्या अनोळखी माणसाला हे पिशाच्चच आहे असा भ्रम व्हावा. 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता' हा आवाज कानी पडताच लोक समजत, की पहाट झाली. महादेवाचे कौटुंबिक जीवन सुखाचे नव्हते. त्याला तीन मुलगे होते, तीन सुना होत्या, डझनावारी नातवंडे होती; पण त्याचे ओझे हलके करणारा कोणीच नव्हता. मुलगे म्हणत, 'दादा जिवंत आहेत तोवर आयुष्याची मौज लुटून घेऊ या; पुढे हे लोढणे गळ्यात पडायचेच आहे.' बिचाऱ्या महादेवाला कधी कधी उपाशीच राहावे लागे. जेवणाच्या वेळी त्याच्या घरात साम्यवादाचा असा गगनभेदी घोष होई, की तो उपाशीच उठून येई आणि नारळाचा हुक्का ओढीत झोपी जाई. त्याचे धंद्यातले जीवन तर याहूनही अशांत होते. तो आपल्या कामात निपुण होता, त्याच्या आम्लाने सोने इतरांच्यापेक्षा कितीतरी अधिक शुद्ध होई आणि त्याच्या रासायनिक क्रिया कितीतरी अधिक कष्टाच्या होत्या; तरीही त्याला रोज उठून संशयी आणि उतावळ्या लोकांच्या शिव्या ऐकाव्या लागत. पण महादेव अढळ गांभीर्याने मान खाली घालून सारे ऐकून घेई. ही कटकट शांत झाली रे झाली, की तो आपल्या पोपटाकडे पाहून मोठ्याने म्हणे, 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता.' हा मंत्र जपताच त्याच्या चित्ताला पूर्ण शांती लाभे.
आत्माराम
( २ ) एके दिवशी योगायोगाने कोणातरी पोराने पिंजऱ्याचे दार उघडले. पोपट उडून गेला. महादेवाने मान वर करून पिंजऱ्याकडे पाहिले मात्र, त्याच्या काळजात धस्स झाले. पोपट कुठे गेला! त्याने पुन्हा पिंजऱ्याकडे पाहिले; पोपट नाहीसा झाला होता. महादेव घाबरून उठला आणि आजूबाजूच्या कौलारांवर नजर फिरवू लागला. जगात त्याला एखादी वस्तू प्रिय असलीच, तर तो हा पोपट. मुलाबाळांचा, नातवंडांचा त्याला वीट आला होता. पोरांच्या दंगामस्तीने त्याच्या कामात व्यत्यय येई. मुलग्यांवर त्याचे प्रेम नव्हते; ते कुचकामाचे होते म्हणून नव्हे, तर त्यांच्यामुळे त्याला आपल्या आनंददायी मातीच्या प्याल्यांच्या रोजच्या ठरलेल्या संख्येला मुकावे लागे म्हणून. शेजाऱ्यांचा त्याला राग येई, कारण ते त्याच्या शेगडीतून विस्तव काढून नेत. या साऱ्या विघ्नबाधांतून त्याला कुठे आसरा होता, तर तो या पोपटापाशीच. त्याच्यापासून त्याला कसलाही त्रास होत नसे. तो आता अशा वयाला पोचला होता, की ज्या वयात माणसाला शांती भोगण्याखेरीज दुसरी कसलीच इच्छा उरत नाही. पोपट एका कौलारावर बसला होता. महादेवाने पिंजरा खाली काढला आणि तो त्याला दाखवीत म्हणू लागला, 'ये, ये, सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता.' पण गावातली आणि घरातली पोरे गोळा होऊन आरडाओरडा करू लागली, टाळ्या पिटू लागली. त्यात वर कावळ्यांनी कावकावीचा धोशा लावला. पोपट उडाला आणि गावाबाहेर जाऊन एका झाडावर बसला. महादेव रिकामा पिंजरा घेऊन त्याच्यामागे जो धावला, तो धावतच सुटला. त्याची ती चपळाई पाहून लोकांना अचंबा वाटत होता. मोहाचे याहून सुंदर, याहून जिवंत, याहून भावपूर्ण चित्र कल्पिताच येणार नाही.
आत्माराम
दुपार झाली होती. शेतकरी शेतांतून परतत होते. त्यांना थट्टामस्करीची चांगली संधी मिळाली. महादेवाला चिडवण्यात सगळ्यांनाच मजा वाटे. कोणी खडे भिरकावले, कोणी टाळ्या वाजवल्या; पोपट पुन्हा उडाला आणि तिथून दूर, आमराईतल्या एका झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. महादेव पुन्हा रिकामा पिंजरा घेऊन बेडकासारख्या उड्या मारीत निघाला. आमराईत पोचला तेव्हा त्याच्या तळपायांची आग होत होती, डोके गरगरत होते. जरा भानावर आल्यावर तो पुन्हा पिंजरा उचलून म्हणू लागला, 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता.' पोपट शेंड्यावरून उतरून खालच्या एका फांदीवर येऊन बसला; पण महादेवाकडे साशंक नजरेने पाहत होता. महादेवाला वाटले, भितो आहे. तो पिंजरा तिथेच ठेवून स्वतः दुसऱ्या एका झाडाआड लपला. पोपटाने चहूकडे निरखून पाहिले. त्याची शंका फिटली; तो उतरला आणि येऊन पिंजऱ्यावर बसला. महादेवाचे काळीज उड्या मारू लागले. 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता' हा मंत्र जपत तो हळूहळू पोपटाजवळ आला आणि त्याला पकडण्यासाठी झेपावला; पण पोपट हाती लागला नाही, पुन्हा झाडावर जाऊन बसला. संध्याकाळपर्यंत हेच चालले होते. पोपट कधी या फांदीवर जाई, कधी त्या फांदीवर. कधी पिंजऱ्यावर येऊन बसे, कधी पिंजऱ्याच्या दारात बसून आपल्या दाण्यापाण्याच्या वाट्यांकडे पाही आणि पुन्हा उडून जाई. म्हातारा जर मूर्तिमंत मोह होता, तर पोपट मूर्तिमंत माया. असे करता करता संध्याकाळ झाली. माया आणि मोह यांचा हा संग्राम अंधारात विलीन झाला.
आत्माराम
( ३ ) रात्र झाली. चहूकडे निबिड अंधार पसरला. पोपट पानांत कुठे दडून बसला होता, कोण जाणे. रात्रीचा पोपट कुठे उडून जाऊ शकत नाही आणि पिंजऱ्यातही येऊ शकत नाही, हे महादेवाला ठाऊक होते; तरीही तो त्या जागेवरून हलायचे नाव घेत नव्हता. आज दिवसभर त्याने काही खाल्ले नव्हते, रात्रीच्या जेवणाची वेळही टळून गेली होती, पाण्याचा एक थेंबसुद्धा त्याच्या घशाखाली उतरला नव्हता; पण त्याला ना भूक होती, ना तहान. पोपटाशिवाय त्याला आपले जिणे निःसार, रुक्ष आणि सुने वाटत होते. तो रात्रंदिवस काम करी, कारण ती त्याची अंतःप्रेरणा होती; जीवनातली इतर कामे करी, कारण सवय होती. या कामांत आपण जिवंत आहोत याची त्याला लवमात्रही जाणीव होत नसे. पोपट हीच एक अशी वस्तू होती, की जी त्याला आपल्यातल्या चैतन्याची आठवण करून देई. तो हातचा जाणे म्हणजे जिवाने देह सोडून जाणे होते. दिवसभराचा उपाशी-तान्हेला, थकलाभागलेला महादेव राहून राहून डुलक्या घेई; पण क्षणातच पुन्हा दचकून डोळे उघडी, आणि त्या अफाट अंधारात त्याचा आवाज ऐकू येई, 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता.' मध्यरात्र उलटून गेली होती. अचानक कसली तरी चाहूल लागून तो दचकला. पाहतो तो, दुसऱ्या एका झाडाखाली एक मिणमिणता दिवा जळतो आहे आणि काही माणसे बसून आपसात काहीतरी बोलत आहेत. ती सगळी चिलीम ओढत होती. तंबाखूच्या वासाने तो अधीर झाला. मोठ्याने म्हणाला, 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता,' आणि चिलीम ओढायला त्या माणसांकडे निघाला; पण बंदुकीचा बार ऐकताच हरणे जशी पळत सुटतात, तशी त्याला येताना पाहून ती सगळीच्या सगळी उठून पळाली. कोणी इकडे गेला, कोणी तिकडे. महादेव ओरडू लागला, 'थांबा, थांबा!' एकाएकी त्याच्या ध्यानात आले, हे सारे चोर आहेत. तो जोराने ओरडला, 'चोर, चोर! धरा, धरा!' चोरांनी मागे वळूनसुद्धा पाहिले नाही.
आत्माराम
महादेव दिव्यापाशी गेला, तो तिथे त्याला एक कळशी ठेवलेली आढळली. गंजाने काळी पडली होती. महादेवाचे काळीज धडधडू लागले. त्याने कळशीत हात घातला, तर मोहरा होत्या. त्याने एक मोहोर बाहेर काढून दिव्याच्या उजेडात पाहिली; होय, मोहराच होत्या. त्याने ताबडतोब कळशी उचलली, दिवा विझवला आणि झाडाखाली लपून बसला. सावाचा चोर झाला. मग त्याला शंका आली: न जाणो, चोर परत आले आणि मला एकटा पाहून त्यांनी मोहरा हिसकावून घेतल्या तर! त्याने काही मोहरा कमरेला बांधल्या, मग एका वाळक्या लाकडाने जमिनीवरची माती उकरून काही खड्डे केले, ते मोहरांनी भरले आणि वर माती लोटून झाकून टाकले. ( ४ ) महादेवाच्या अंतर्चक्षूंपुढे आता एक निराळेच जग होते, चिंतांनी आणि कल्पनांनी भरलेले. खजिना हातचा जाण्याची भीती अजून होतीच; तरी पण मनोरथांनी आपले काम सुरू केले. एक पक्के घर उभे राहिले, सराफीचे एक मोठे दुकान उघडले, सग्यासोयऱ्यांशी पुन्हा नाते जुळले, ऐषारामाची साधने जमा झाली. मग तीर्थयात्रेला निघाला, आणि तिथून परतल्यावर मोठ्या थाटामाटाने यज्ञ झाला, ब्राह्मणभोजन झाले. त्यानंतर एक शिवालय आणि विहीर बांधून झाली, एक बागही लागली, आणि तिथे तो नित्यनेमाने कथापुराण ऐकू लागला. साधुसंतांचा आदरसत्कार होऊ लागला. अचानक त्याच्या मनात आले, चोर आलेच तर मी पळणार कसा! परीक्षा पाहण्यासाठी त्याने कळशी उचलली आणि दोनशे पावले तो बेफाम धावत गेला. जणू त्याच्या पायांना पंख फुटले होते. चिंता मिटली. याच कल्पनांत रात्र सरली. उषेचे आगमन झाले; वारा जागा झाला, पाखरे गाऊ लागली. एकाएकी महादेवाच्या कानांवर आवाज आला— 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता, राम के चरन में चित्त लागा.'
आत्माराम
हे बोल महादेवाच्या जिभेवर सदा असत. दिवसातून हजारो वेळा हे शब्द त्याच्या तोंडून निघत; पण त्यांतला धार्मिक भाव त्याच्या अंतःकरणाला कधी शिवत नसे. वाद्यातून जसा राग निघतो, तसे ते बोल त्याच्या तोंडून निघत, निरर्थक आणि निष्प्रभ. तेव्हा त्याचा हृदयरूपी वृक्ष पानापालवीवाचून उघडा होता. हा निर्मळ वारा त्याला गुंजवू शकत नव्हता. पण आता त्या वृक्षाला कोंब आणि फांद्या फुटल्या होत्या; या वाऱ्याच्या झोताने तो डोलू लागला, गुंजून उठला. अरुणोदयाची वेळ होती. सृष्टी एका अनुरागमय प्रकाशात बुडून गेली होती. त्याच वेळी पोपट पंख मिटून उंच फांदीवरून खाली उतरला, आकाशातून एखादा तारा तुटावा तसा, आणि येऊन पिंजऱ्यात बसला. महादेव हरखून धावला आणि पिंजरा उचलून म्हणाला, 'ये आत्मारामा, तू त्रास तर फार दिलास, पण माझ्या जन्माचे सार्थकही केलेस. आता तुला चांदीच्या पिंजऱ्यात ठेवीन आणि सोन्याने मढवीन.' त्याच्या रोमारोमांतून परमात्म्याच्या गुणगानाचा ध्वनी निघू लागला: प्रभो, तू किती दयाळू आहेस! हे तुझे अपार वात्सल्य आहे, नाहीतर माझ्यासारखा पापी, पतित प्राणी या कृपेला कुठला पात्र होता! या पवित्र भावांनी त्याचा आत्मा गहिवरून गेला. भक्तीत तल्लीन होऊन तो म्हणाला— 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता, राम के चरन में चित्त लागा.' त्याने एका हातात पिंजरा लटकावला, काखेत कळशी दाबली आणि घराकडे निघाला. ( ५ ) महादेव घरी पोचला तेव्हा अजून थोडा अंधार होता. वाटेत एका कुत्र्याखेरीज कोणाचीही गाठ पडली नाही, आणि कुत्र्यांना मोहरांचे विशेष प्रेम नसते. त्याने कळशी एका नांदीत लपवली आणि ती कोळशांनी नीट झाकून आपल्या खोलीत ठेवून आला. दिवस उजाडल्यावर तो थेट पुरोहितजींच्या घरी गेला.
आत्माराम
पुरोहितजी पूजेला बसून विचार करीत होते: उद्याच खटल्याची तारीख आहे आणि अजून हातात फुटकी कवडीसुद्धा नाही; यजमानांपैकी कोणी चकार शब्दही काढीत नाही. इतक्यात महादेवाने पाया पडून नमस्कार केला. पंडितजींनी तोंड फिरवले. ही अवलक्षणी मूर्ती कुठून उपटली! आज अन्नाचा दाणा तरी नशिबी आहे की नाही, कोण जाणे. रागावून त्यांनी विचारले, 'काय रे, काय आहे? काय म्हणतोस? या वेळी आम्ही पूजेत असतो, ठाऊक नाही?' महादेव म्हणाला, 'महाराज, आज माझ्या घरी सत्यनारायणाची कथा आहे.' पुरोहितजी चकित झाले. कानांवर विश्वास बसेना. महादेवाच्या घरी कथा होणे ही, त्याच्या घरातून एखाद्या भिकाऱ्याला भीक वाढली जाण्याइतकीच असाधारण घटना होती. त्यांनी विचारले, 'आज काय आहे?' महादेव म्हणाला, 'काही नाही, सहज इच्छा झाली, की आज देवाची कथा ऐकावी.' सकाळपासूनच तयारी सुरू झाली. बेंदो आणि आसपासच्या इतर गावांत आमंत्रणाची सुपारी फिरली. कथेनंतर जेवणाचेही आमंत्रण होते. जो ऐके तो आश्चर्य करी, 'आज ही वाळूत हरळी कशी उगवली!' संध्याकाळी सगळे लोक जमले आणि पंडितजी आपल्या सिंहासनावर विराजमान झाले, तेव्हा महादेव उभा राहून मोठ्या आवाजात म्हणाला— 'बंधूंनो, माझे सारे आयुष्य लबाडीत आणि कपटात गेले. मी किती माणसांना दगा दिला, किती खऱ्याचे खोटे केले, त्याची गणती नाही; पण आता देवाने माझ्यावर दया केली आहे, माझ्या तोंडाला लागलेले काळे त्याला पुसून टाकायचे आहे. मी तुम्हां सर्व बांधवांना गर्जून सांगतो, की ज्याचे माझ्याकडे जे काही निघत असेल, ज्याची ठेव मी गिळली असेल, ज्याचा चोख माल मी हिणकस केला असेल, त्याने येऊन आपली एकेक कवडी वसूल करून घ्यावी. कोणी इथे येऊ शकला नसेल, तर तुम्ही जाऊन त्याला सांगा, की उद्यापासून महिनाभर, वाटेल तेव्हा यावे आणि आपला हिशेब चुकता करून घ्यावा. साक्षीपुराव्याची गरज नाही.'
आत्माराम
सारे लोक स्तब्ध झाले. कोणी सूचकपणे मान हलवून म्हणाला, 'आम्ही म्हणतच होतो!' कोणी अविश्वासाने म्हणाला, 'कशाच्या बळावर फेडणार आहे? हजारोंचा टोटल होईल!' एका ठाकुराने थट्टा केली, 'आणि जे स्वर्गवासी झाले, त्यांचे?' महादेवाने उत्तर दिले, 'त्यांच्या घरची माणसे तर असतील?' पण या घटकेला लोकांना वसुलीपेक्षा, याला एवढे धन मिळाले तरी कुठून, हे जाणून घेण्याचीच अधिक इच्छा होती. महादेवाजवळ येण्याचे कोणालाच धाडस झाले नाही. खेड्यातली माणसे ती, गाडलेली मढी उकरून काढणे त्यांना काय ठाऊक! शिवाय बहुतेकांना, महादेवाकडून आपले काय येणे आहे, हे आठवतही नव्हते; आणि अशा पवित्र प्रसंगी काही चूकभूल होईल ही भीती त्यांची तोंडे बंद ठेवीत होती. सर्वांत मोठी गोष्ट ही, की महादेवाच्या साधुत्वाने त्यांना वश करून टाकले होते. अचानक पुरोहितजी म्हणाले, 'तुला आठवते, मी एक कंठा करायला सोने दिले होते आणि तू वजनात कित्येक मासे उडवले होतेस?' महादेव—'होय, आठवते. आपले किती नुकसान झाले असेल?' पुरोहित—'५० रुपयांहून कमी नसेल.' महादेवाने कमरेतून दोन मोहरा काढल्या आणि पुरोहितजींच्या पुढ्यात ठेवल्या. पुरोहितांच्या हावरेपणावर लोक टीका करू लागले, 'ही बेइमानी आहे; फार तर दोन-चार रुपयांचे नुकसान झाले असेल. बिचाऱ्याकडून ५० रुपये उकळले. नारायणाचेही भय नाही. म्हणवायला पंडित, पण नियत अशी खोटी! राम राम!!' लोकांच्या मनात महादेवाविषयी एक प्रकारची श्रद्धा उत्पन्न झाली. एक तास उलटला, पण त्या हजारो माणसांतून एकही उभा राहिला नाही. तेव्हा महादेव पुन्हा म्हणाला, 'असे दिसते, की तुम्ही सारे आपापला हिशेब विसरला आहात. तेव्हा आज कथा होऊ द्या; मी महिनाभर तुमची वाट पाहीन. त्यानंतर तीर्थयात्रेला निघून जाईन. तुम्हां सर्व बंधूंना माझी विनंती आहे, की तुम्ही माझा उद्धार करावा.'
आत्माराम
महिनाभर महादेव येणेकऱ्यांची वाट पाहत राहिला. रात्री चोरांच्या भीतीने झोप येत नसे. आता तो कोणतेच काम करीत नसे. दारूची चटकही सुटली. दारी येणाऱ्या साधू-अतिथींचा तो यथायोग्य सत्कार करी. दूरदूरपर्यंत त्याची कीर्ती पसरली. अखेर महिना पुरा झाला, आणि एकही माणूस हिशेब मागायला आला नाही. आता महादेवाला कळले, की जगात किती धर्म आहे, किती सद्वर्तन आहे! आता त्याला उमगले, की जग वाइटांसाठी वाईट आहे आणि चांगल्यांसाठी चांगले. ( ६ ) या घटनेला ५० वर्षे होऊन गेली. तुम्ही बेंदोला गेलात, तर दुरूनच एक सोनेरी कळस दिसतो. तो ठाकुरद्वाराचा कळस. त्याला लागूनच एक पक्के बांधलेले तळे आहे; त्यात कमळे भरपूर फुललेली असतात. तिथले मासे कोणी पकडत नाही. तळ्याच्या काठी एक भव्य समाधी आहे. हेच आत्मारामाचे स्मारक. त्याच्याविषयी निरनिराळ्या दंतकथा प्रचलित आहेत. कोणी म्हणतो, त्याचा रत्नजडित पिंजरा स्वर्गाला गेला. कोणी म्हणतो, तो 'सत्त गुरुदत्त' म्हणत म्हणत अंतर्धान पावला. पण खरी गोष्ट अशी, की त्या पक्षीरूपी चंद्राला कोणा मांजररूपी राहूने ग्रासले. लोक सांगतात, मध्यरात्री अजूनही तळ्याच्या काठी आवाज येतो— 'सत्त गुरुदत्त शिवदत्त दाता, राम के चरन में चित्त लागा.' महादेवाविषयीही कितीतरी आख्यायिका आहेत. त्यांतली सर्वांत मान्य अशी, की आत्माराम समाधिस्थ झाल्यानंतर तो कित्येक संन्याशांबरोबर हिमालयात निघून गेला आणि तिथून परत आला नाही. तो आत्माराम याच नावाने प्रसिद्ध झाला.