मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
चढाओढ
१ जोखू भगत आणि बेचन चौधरी यांच्यात तीन पिढ्यांपासून वैर चालत आले होते. शेताच्या बांधावरून काही तंटा होता. त्यांच्या पणजोबांच्या वेळी कित्येकदा रक्तपात झाला. वडिलांच्या काळापासून कोर्टकचेऱ्या सुरू झाल्या. दोघेही कित्येकदा हायकोर्टापर्यंत जाऊन आले. मुलांच्या काळात या संग्रामाची भीषणता आणखीच वाढली; इतकी, की दोघेही पार दुबळे होऊन बसले. पूर्वी दोघे याच गावात निम्म्या-निम्म्या हिश्शाचे मालक होते. आता त्या तंट्याच्या शेताखेरीज त्यांच्यापाशी बोटभरही जमीन उरली नव्हती. जमीन गेली, पैसा गेला, मानमरातब गेला; पण तो वाद मात्र होता तसाच राहिला. हायकोर्टातल्या धुरंधर कायदेपंडितांना एक साधासा तंटा मिटवता आला नाही. या दोन सद्गृहस्थांनी गावाचे दोन परस्परविरोधी तट पाडले होते. एका तटाची भांग चौधरींच्या दारात घोटली जाई, तर दुसऱ्या तटाचे चरस-गांजाचे झुरके भगतांच्या दारात चालत. बायकांचे आणि मुलांचेही दोन-दोन तट पडले होते. इतकेच काय, या दोन्ही सद्गृहस्थांच्या सामाजिक आणि धार्मिक विचारांमध्येही एक विभाजक रेषा ओढलेली होती. चौधरी अंगावरचे कपडे न उतरवताच सातू खात आणि भगतांना ढोंगी म्हणत. भगत कपडे उतरवल्याशिवाय पाणीसुद्धा पीत नसत आणि चौधरींना भ्रष्ट ठरवीत. भगत सनातनधर्मी झाले, तेव्हा चौधरींनी आर्य समाजाचा आश्रय घेतला. ज्या कापडवाल्याकडून, वाण्याकडून किंवा भाजीवाल्याकडून चौधरी माल घेत, त्याच्याकडे नुसते पाहणेही भगतजी पाप समजत; आणि भगतजींच्या हलवायाची मिठाई, त्यांच्या गवळ्याचे दूध आणि तेल्याचे तेल चौधरींना वर्ज्य होते. फार काय, आरोग्याविषयीच्या त्यांच्या सिद्धांतांतही भिन्नता होती; भगतजींचा वैद्यकावर विश्वास, तर चौधरी युनानी पद्धतीला मानणारे. दोघे रोगाने मेले असते तरी बेहत्तर, पण आपले सिद्धांत त्यांनी सोडले नसते.
चढाओढ
( २ ) देशात राजकीय चळवळ सुरू झाली तेव्हा तिची कुणकुण त्या गावातही पोचली. चौधरींनी चळवळीची बाजू घेतली, भगत तिचे विरोधक झाले. एका गृहस्थाने येऊन गावात किसान सभा स्थापन केली. चौधरी तिच्यात सामील झाले, भगत अलिप्त राहिले. जागृती आणखी वाढली, स्वराज्याची चर्चा होऊ लागली. चौधरी स्वराज्यवादी झाले, भगतांनी राजनिष्ठेचा पक्ष धरला. चौधरींचे घर स्वराज्यवाद्यांचा अड्डा झाले, भगतांचे घर राजनिष्ठांचा क्लब बनले. चौधरी जनतेत स्वराज्यवादाचा प्रचार करू लागले—मित्रांनो, स्वराज्य म्हणजे आपले राज्य. आपल्या देशात आपले राज्य असावे हे चांगले, की दुसऱ्या कोणाचे राज्य असावे हे? लोक म्हणाले—आपले राज्य असावे हे चांगले. चौधरी—तर मग हे स्वराज्य मिळणार कसे? आत्मबळाने, पुरुषार्थाने, एकोप्याने. एकमेकांचा द्वेष करायचे सोडून द्या, आपले तंटे आपणच एकत्र बसून मिटवा. एक शंका—तुम्ही तर रोज कोर्टाची पायरी चढता. चौधरी—होय, पण आजपासून कोर्टात गेलो तर मला गोहत्येचे पाप लागो. तुम्ही आपली घामाची कमाई आपल्या बायकापोरांना खाऊ घालावी, आणि उरली तर परोपकाराला लावावी; वकील-मुखत्यारांचे खिसे कशाला भरता? ठाणेदाराला लाच कशाला देता, कचेरीतल्या कारकुनांची मनधरणी कशाला करता? पूर्वी आपली मुले आपल्या धर्माचे शिक्षण घेत; ती सदाचारी, त्यागी, पुरुषार्थी होत. आता ती परक्यांच्या शाळांत शिकून चाकरी करतात, लाच खातात, चैन करतात, आपल्या देवांची आणि पितरांची निंदा करतात, सिगारेट ओढतात, केसांचे भांग काढतात आणि साहेबलोकांचे पाय धरतात. आपल्या मुलांना धर्माला अनुसरून शिक्षण देणे हे आपले कर्तव्य नाही काय?
चढाओढ
लोक—वर्गणी काढून पाठशाळा उघडली पाहिजे. चौधरी—पूर्वी आपण दारूला शिवणेही पाप समजत होतो; आता गावोगाव, गल्लोगल्ली दारूची दुकाने आहेत. आपण आपल्या घामाच्या कमाईचे कोट्यवधी रुपये गांजा-दारूत उडवतो. लोक—जो दारू-भांग पिईल त्याला दंड केला पाहिजे. चौधरी—आपले आजे-पणजे, लहानथोर सगळे जाडेभरडे हातमागाचे कापड वापरत. आपल्या दोन्ही घरच्या आज्या चरख्यावर सूत कातत असत. सारा पैसा देशातच राही. आपले विणकर जुलाहे भाऊ सुखाने नांदत होते. आता आपण परदेशात बनलेल्या तलम, रंगीत कापडावर जीव टाकतो. अशा रीतीने परदेशचे लोक आपला पैसा वाहून नेतात; बिचारे जुलाहे भिकेला लागले. आपल्या भावांच्या पुढ्यातले ताट हिसकावून परक्यांच्या पुढे ठेवावे, हाच का आपला धर्म? लोक—जाडेभरडे कापड कुठे मिळतच नाही. चौधरी—आपल्या घरी विणलेले जाडेभरडे कापड वापरा, कोर्टकचेऱ्या सोडा, व्यसने टाका, आपल्या मुलांना धर्मकर्म शिकवा, एकोप्याने राहा; बस, हेच स्वराज्य. स्वराज्यासाठी रक्ताच्या नद्या वाहतील असे जे लोक म्हणतात ते वेडे आहेत; त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोक या गोष्टी मोठ्या आवडीने ऐकत; श्रोत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. चौधरी सर्वांचे श्रद्धास्थान झाले. ३ भगतही राजनिष्ठेचा उपदेश करू लागले— 'बंधूंनो, राजाचे काम राज्य करणे आणि प्रजेचे काम त्याची आज्ञा पाळणे; यालाच राजनिष्ठा म्हणतात, आणि आपल्या धर्मग्रंथांत आपल्याला याच राजनिष्ठेची शिकवण दिलेली आहे. राजा हा ईश्वराचा प्रतिनिधी आहे; त्याच्या आज्ञेविरुद्ध वागणे हे महापातक आहे. राजाला विमुख झालेला प्राणी नरकाचा धनी होतो.'
चढाओढ
एक शंका—राजानेही आपला धर्म पाळायला हवा ना. दुसरी शंका—आपले राजे तर नावापुरते; खरे राजे तर विलायतेतले वाणी-सावकार आहेत. तिसरी शंका—वाण्यांना पैसा कमवायचा ठाऊक; राज्य करणे त्यांना काय कळणार? भगतजी—लोक तुम्हांला शिकवतात की कोर्टात जाऊ नका, खटले पंचायतीत न्या. खरा न्याय करतील, दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करून दाखवतील, असे पंच आहेत कुठे? इथे तोंड पाहून निवाडे होतील. ज्यांचे वजन आहे त्यांचा जय होईल; ज्यांचे काहीच वजन नाही ते बिचारे भरडले जातील. कोर्टात सगळे कामकाज कायद्याने चालते; तिथे लहानमोठे सगळे सारखे, वाघ आणि बकरी एकाच पाणवठ्यावर पाणी पितात. ही कोर्टे सोडणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे. एक शंका—कोर्टात जायचे तर रुपयांची थैली कुठून आणायची? दुसरी शंका—कोर्टाचा न्याय म्हणायलाच न्याय; ज्याच्यापाशी पढवलेले साक्षीदार आणि डावपेचांत मुरलेले वकील असतात त्याचाच जय होतो. खरा कोण, खोटा कोण, याची पारख कोण करतो? हां, माणूस हैराण मात्र होतो. भगत—असे सांगतात की परदेशी वस्तू वापरू नका. हा गरिबांवर घोर अन्याय आहे. बाजारात जी वस्तू स्वस्त आणि चांगली मिळेल ती आपण घ्यावी; मग ती स्वदेशी असो की परदेशी. आपला पैसा काही फुकट येत नाही, की तो टाकाऊ, ओबडधोबड स्वदेशी वस्तूंवर फेकून द्यावा. एक शंका—पैसा आपल्या देशात तरी राहतो, परक्यांच्या हातात तर जात नाही ना?
चढाओढ
दुसरी शंका—आपल्या घरी चांगले खायला मिळाले नाही तर काय परजातीच्या लोकांच्या घरी जाऊन चांगलेचुंगले जेवायला लागायचे? भगत—लोक म्हणतात की मुलांना सरकारी शाळांत पाठवू नका—सरकारी शाळांत शिकले नसते तर आज आपल्या भावांना मोठमोठ्या नोकऱ्या कशा मिळाल्या असत्या, मोठमोठे कारखाने त्यांनी कसे चालवले असते? नवी विद्या शिकल्याशिवाय आता जगात निभाव लागणे शक्य नाही. जुनी विद्या शिकून पंचांग पाहणे आणि कथा वाचणे याशिवाय दुसरे काय येते? राज्यकारभार काय हे पोथ्या वाचणारे लोक करणार? एक शंका—आम्हांला राज्यकारभार नको; आम्ही आपल्या शेतीवाडीतच रमलो आहोत. कोणाचे गुलाम तर नाही ना आम्ही? दुसरी शंका—जी विद्या माणसाला घमेंडखोर बनवते तिच्यापेक्षा अडाणी राहिलेलेच बरे. ही नवी विद्या शिकून लोक सूटबूट, घड्याळ-छडी, हॅट-कोट वापरायला लागतात; आपल्या हौसेपायी देशाचा पैसा परक्यांच्या खिशात भरतात. हे देशाचे द्रोही आहेत. भगत—गांजा-दारूवर आजकाल लोकांची करडी नजर आहे. नशा ही वाईट खोड आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. नशेच्या दुकानांपासून सरकारला वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. दुकानात न गेल्याने लोकांचे व्यसन सुटत असेल तर फार चांगली गोष्ट. पण व्यसन्याचे व्यसन कुठे सुटते? तो दुकानात गेला नाही तर चोरून-लपून, कसेही करून, दुप्पट-चौपट दाम मोजून, शिक्षा भोगायची तयारी ठेवून आपली तलफ भागवीलच. सरकारचे नुकसान ते वेगळे आणि गरीब रयतेचे नुकसान ते वेगळे, असे काम करायचेच कशाला? आणि शिवाय कोणाकोणाला नशापाण्याने फायदाही होतो. मीच एक दिवस अफू खाल्ली नाही तर सांधे दुखू लागतात, दम लागतो आणि सर्दी होते. एक आवाज—दारू प्यायल्याने अंगात तरतरी येते.
चढाओढ
एक शंका—सरकार अधर्माने पैसा कमावते; हे त्याला शोभत नाही! अधर्म्याच्या राज्यात राहून प्रजेचे कल्याण कसे होणार? दुसरी शंका—आधी दारू पाजून वेडे केले. व्यसन जडले तशी पैशाची चटक लागली. एवढी मजुरी कोणाला मिळते की भाकरी-कपड्याचेही भागेल आणि दारूही उडेल? एक तर बायकापोरांना उपाशी मारा, नाही तर चोरी करा, जुगार खेळा आणि बेइमानी करा. दारूचे दुकान म्हणजे दुसरे काय? आपल्या गुलामगिरीचा अड्डा! ४ चौधरींचा उपदेश ऐकायला लोकांची झुंबड उडे; लोकांना उभे राहायला जागा मिळत नसे. दिवसेंदिवस चौधरींचा मान वाढू लागला; त्यांच्याकडे पंचायतींची, राष्ट्राच्या उन्नतीची चर्चा चाले. लोकांना या गोष्टींनी मोठा आनंद होई आणि हुरूप येई. त्यांचे राजकीय ज्ञान वाढत जाई. त्यांना आपला गौरव आणि आपले महत्त्व कळू लागले, आपल्या सामर्थ्याची जाणीव होऊ लागली; मनमानी आणि अन्याय पाहून आता त्यांच्या कपाळाला आठ्या पडू लागल्या. त्यांना स्वातंत्र्याची चव कळली. घरचा कापूस, घरचे सूत, घरचे कापड, घरचे अन्न, घरचीच अदालत; ना पोलिसांचे भय, ना कचेरीतल्या कारकुनांची खुशामत; ते सुखाने आणि शांततेने आयुष्य घालवू लागले. कित्येकांनी व्यसने सोडून दिली आणि सद्भावनांची जणू एक लाटच पसरू लागली. पण भगतजी इतके भाग्यवान नव्हते. लोकांना त्यांच्या उपदेशाचा दिवसेंदिवस वीट येत चालला होता. इतका, की पुष्कळदा त्यांच्या श्रोत्यांत पटवारी, चौकीदार, शाळामास्तर आणि याच कर्मचाऱ्यांचे स्नेहीसोबती यांच्याखेरीज दुसरे कोणी नसे. कधीकधी बडे अधिकारीही येऊन जात आणि भगतजींचा मोठा आदरसत्कार करीत; थोडा वेळ भगतजींचे अश्रू पुसले जात. पण क्षणभराचा सन्मान आठही प्रहरांच्या अपमानाची बरोबरी कशी करणार! ते जिकडे जात तिकडे लोक त्यांच्याकडे बोटे दाखवू लागत.
चढाओढ
कोणी म्हणे, खुशामत्या तट्टू आहे; कोणी म्हणे, गुप्त पोलिसांचा खबऱ्या आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याची वाहवा आणि आपली लोकनिंदा पाहून भगतजी दातओठ खात गप्प बसत. आपल्या शत्रूपुढे मान खाली घालावी लागण्याचा त्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता—ज्या कुळप्रतिष्ठेचे रक्षण ते वर्षानुवर्षे करीत आले होते आणि जिच्यावर त्यांनी आपले सर्वस्व वाहिले होते, ती धुळीला मिळाली. ही चिंता त्यांना आतून जाळत होती; क्षणभरही स्वस्थ बसू देत नव्हती. रोज हाच एक प्रश्न समोर उभा असे, की आपला गेलेला मान परत कसा मिळवू, आपल्या प्रतिपक्षाला पायांखाली कसा तुडवू? त्याचा गर्व कसा उतरवू? शेवटी त्यांनी सिंहाला त्याच्या गुहेतच चीत करायचे ठरवले. संध्याकाळची वेळ होती. चौधरींच्या दारात एक मोठी सभा चालली होती. आसपासच्या गावांतले शेतकरीही आले होते. हजारो माणसांची गर्दी होती. चौधरी त्यांना स्वराज्याविषयी उपदेश करीत होते. भारतमातेच्या जयजयकाराचा घोष पुन्हापुन्हा उठत होता. एका बाजूला बायकांचा घोळका होता. चौधरींनी आपला उपदेश संपवला आणि ते आपल्या गादीवर बसले. स्वयंसेवकांनी स्वराज्यफंडासाठी वर्गणी गोळा करायला सुरुवात केली, तोच भगतजी कोण जाणे कुठून झपाझप आले आणि श्रोत्यांसमोर उभे राहून मोठ्या आवाजात म्हणाले— बंधूंनो, मला इथे पाहून अचंबा करू नका; मी स्वराज्याचा विरोधक नाही. स्वराज्याची निंदा करील असा पतित प्राणी कोण असेल? पण चौधरींनी जो उपाय सांगितला आहे आणि ज्याच्यावर तुम्ही लोक भाळला आहात, तो काही ते मिळवण्याचा उपाय नव्हे. आपसात फूट आणि भांडणे असताना पंचायतींनी काय होणार? चैनबाजीचे भूत मानगुटीवर बसलेले असताना ते कसे उतरणार, दारूच्या दुकानांवर बहिष्कार कसा पडणार?
चढाओढ
सिगारेट, साबण, मोजे, बनियन, अद्धी-तंजेबसारखी तलम मलमल यांच्यापासून सुटका कशी होणार? रुबाबाची आणि हुकमतीची हाव कायम असताना सरकारी शाळा कशा सोडाल? परधर्मी शिक्षणाच्या बेडीतून कसे मुक्त व्हाल? स्वराज्य मिळवण्याचा एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे आत्मसंयम; हेच महौषध तुमचे सारे रोग मुळापासून नष्ट करील. आत्म्याची दुर्बलता हेच पारतंत्र्याचे मुख्य कारण आहे. आत्मा बलवान करा, इंद्रिये ताब्यात ठेवा, मन काबूत आणा; तेव्हाच तुमच्यात बंधुभाव उत्पन्न होईल, तेव्हाच वैमनस्य मिटेल, तेव्हाच मत्सर आणि द्वेष नाहीसे होतील, तेव्हाच भोगविलासावरून मन उठेल, तेव्हाच व्यसनांचा बीमोड होईल. आत्मबळाशिवाय स्वराज्य कधीही हाती लागणार नाही. स्वार्थ हे सर्व पापांचे मूळ आहे; तोच तुम्हांला कोर्टात नेतो, त्यानेच तुम्हांला परधर्मी शिक्षणाचे दास करून ठेवले आहे. या पिशाचाला आत्मबळाने ठार करा, म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण होईल. सगळ्यांना ठाऊक आहे, मी ५० वर्षे अफू खात आलो आहे; आजपासून मी अफूला गाईचे रक्त समजतो. चौधरींशी माझे तीन पिढ्यांचे वैर आहे; आजपासून चौधरी माझे भाऊ आहेत. आजपासून माझ्या घरातले कोणीही माणूस घरी कातलेल्या सुताच्या कापडाखेरीज दुसरे काही अंगावर घालताना दिसले, तर तुम्हांला वाटेल तो दंड मला करा. बस, मला एवढेच सांगायचे आहे. परमात्मा आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करो! एवढे बोलून भगतजी घराकडे निघाले, तोच चौधरींनी धावत येऊन त्यांना कडकडून मिठी मारली. तीन पिढ्यांचे वैर एका क्षणात शमले. त्या दिवसापासून चौधरी आणि भगत जोडीने स्वराज्याचा उपदेश करू लागले. त्यांच्यात दाट मैत्री जमली; आणि दोघांपैकी लोक कोणाला अधिक मान देतात हे ठरवणे कठीण होते. चढाओढीच्या ठिणगीने दोन्ही पुरुषांच्या हृदयातला दिवा उजळून टाकला होता.