मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
दंड
अल्लारक्खीच्या पगारातून काही ना काही दंड कापला गेला नाही, असा महिना क्वचितच जाई. कधीकधी तर ६ रुपयांपैकी ५ रुपयेच तिच्या हाती पडत; पण एवढे सारे सोसूनही ती सफाई खात्याचे दारोगा मु. खैरातअली खाँ यांच्या तावडीत मात्र कधी येत नसे. खाँसाहेबांच्या हाताखाली शेकडो मेहतराण्या होत्या. कुणाचाही पगार कापला जात नसे, कुणाला दंड होत नसे, साधी दटावणीसुद्धा मिळत नसे. खाँसाहेबांचे नाव चांगले होते, ते दयाळू होते. पण अल्लारक्खीला मात्र त्यांच्या हातून सतत शासन भोगावे लागे. ती कामचुकार नव्हती, उद्धट नव्हती, गबाळी नव्हती, कुरूपही नव्हती. या थंडीच्या दिवसांत रात्र प्रहरभर उरलेली असतानाच ती झाडू घेऊन घराबाहेर पडे आणि नऊ वाजेपर्यंत मन लावून रस्ता झाडीत राही. तरीही तिला दंड व्हायचाच. तिचा नवरा हुसैनीसुद्धा सवड मिळाली की तिचे काम करून टाकी; पण अल्लारक्खीच्या नशिबातच दंड भरणे लिहिलेले होते. पगाराचा दिवस इतरांसाठी हसण्याचा दिवस असे, अल्लारक्खीसाठी रडण्याचा. त्या दिवशी तिचा जीव जणू सुळावर टांगलेला असे. कोण जाणे किती पैसे कापले जाणार! परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसारखी ती पुन्हा पुन्हा दंडाच्या रकमेचा अंदाज बांधीत बसे. त्या दिवशी ती दमून जरा दम खायला म्हणून बसली होती. नेमके त्याच वेळी दारोगाजी आपल्या एक्क्यातून येत होते. 'हुजूरआली, मी पुन्हा कामाला लागते,' असे ती सांगतच राहिली, पण त्यांनी एक ऐकून घेतले नाही; आपल्या वहीत तिचे नाव टिपून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तसेच घडले. ती हलवायाकडून एका पैशाचे सेवडे घेऊन खात होती. तेवढ्यात दारोगा कोण जाणे कुठून उगवला आणि पुन्हा तिचे नाव लिहिले गेले. कुठे दडून बसलेला असतो कोण जाणे! जरा कुठे विसावा घ्यायला जावे, की भुतासारखा येऊन पुढ्यात उभा राहतो.
दंड
नाव तर त्याने दोनच दिवस लिहिले होते, पण दंड किती करतो, ते अल्लाच जाणे! आठ आण्यांचा वाढून रुपया न होवो! ती मान खाली घालून पगार घ्यायला जाई आणि आपल्या अंदाजापेक्षा थोडे जास्तच कापले गेलेले तिला आढळे. थरथरत्या हातांनी रुपये घेऊन, भरल्या डोळ्यांनी ती परत फिरे. दाद मागायची तरी कुणाकडे? दारोग्यापुढे तिचे ऐकणार कोण? आज पुन्हा तोच पगाराचा दिवस होता. या महिन्यात तिच्या अंगावर पिणाऱ्या पोरीला खोकला आणि ताप येऊ लागला होता. थंडीही कडाक्याची पडली होती. थोडे थंडीमुळे आणि थोडे पोरीच्या रडण्या-किंचाळण्यामुळे तिला रात्र-रात्र जागून काढावी लागे. बरेच दिवस कामावर जायला उशीर झाला होता. दारोग्याने तिचे नाव लिहून घेतले होते. या खेपेला निम्मे रुपये कापले जाणार. निम्मे जरी हाती पडले तरी नशीब म्हणायचे. किती कापले आहेत कुणास ठाऊक! तिने भल्या पहाटे पोरीला कडेवर घेतले आणि झाडू घेऊन ती रस्त्यावर येऊन पोचली. पण ती द्वाड पोर कडेवरून उतरायलाच तयार नव्हती. अल्लारक्खीने तिला पुन्हा पुन्हा दारोगा येण्याची भीती घातली: आत्ता येईल तो, मलाही मारील, तुझेही नाक-कान कापून नेईल. पण पोरीला आपले नाक-कान कापून घेणे कबूल होते, कडेवरून उतरणे कबूल नव्हते. शेवटी धाकदपटशा, लाडीगोडी, कशानेही ती उतरेना, तेव्हा अल्लारक्खीने तिला कडेवरून खाली ठेवले आणि तिला रडत-किंचाळत तशीच सोडून झाडू मारायला सुरुवात केली. पण ती करंटी एका जागी बसून मनसोक्त रडतही नव्हती. अल्लारक्खीच्या मागे मागे लागून ती पुन्हा पुन्हा तिची साडी ओढी, तिच्या पायाला बिलगे, मग जमिनीवर लोळण घेई आणि क्षणभरात पुन्हा रडू लागे. तिने झाडू उगारून म्हटले, 'गप्प बस, नाहीतर झाडूनेच हाणीन, जीव जाईल तुझा. आत्ता तो दाढीजळ्या दारोगा येईल...'
दंड
धमकी तोंडातून पुरती बाहेर पडलीही नव्हती, तोच दारोगा खैरातअली खाँ समोरून आला आणि सायकलवरून खाली उतरला. अल्लारक्खीचा चेहरा पांढराफटक पडला, काळीज धडधडू लागले. या अल्ला! याने ऐकले तर नसेल ना! फुटोत माझे डोळे! समोरून आला आणि मला दिसला नाही. आज हा पायगाडीवरून येणार आहे, हे कुणाला ठाऊक होते? रोज तर एक्क्यातून यायचा. नसानसांतले रक्त वाहायचे थांबले; हातात झाडू धरून ती जागच्या जागी थिजून उभी राहिली. दारोग्याने दरडावून म्हटले—कामाला निघालीस की एक शेपूट बरोबर घेऊन येतेस. हिला घरी का नाही ठेवून आलीस? अल्लारक्खी काकुळतीच्या स्वरात म्हणाली—हिला बरं नाही हुजूर, घरी कुणापाशी ठेवून येऊ... 'काय झालंय हिला?' 'ताप येतो हुजूर!' 'आणि तू हिला अशी सोडून रडवते आहेस. ही मरायची की जगायची?' 'कडेवर घेऊन घेऊन काम कसं करू हुजूर!' 'रजा का घेत नाहीस?' 'पगार कापला जातो हुजूर, मग पोट कसं भरायचं?' 'हिला उचल आणि घरी जा. हुसैनी परत आला की त्याला इकडे झाडायला पाठवून दे.' अल्लारक्खीने पोरीला उचलले आणि ती जायला निघाली, तेव्हा दारोगाजींनी विचारले—मला शिव्या का देत होतीस? अल्लारक्खीचा उरलासुरला जीवही निघून गेला. कापले असते तरी अंगातून रक्ताचा थेंब निघाला नसता. थरथर कापत ती म्हणाली—नाही हुजूर, तुम्हांला शिवी दिली असेल तर माझे डोळे फुटोत. आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. संध्याकाळी हुसैनी आणि अल्लारक्खी दोघे पगार घ्यायला निघाले. अल्लारक्खी फार उदास होती. हुसैनीने तिला धीर दिला—तू एवढी उदास का झालीस? पगारच कापला जाईल ना, जाऊ दे कापला. या खेपेला तुझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो, दारूचा किंवा ताडीचा एक घोटसुद्धा घेणार नाही.
दंड
'मला भीती वाटते, तो कामावरून काढून तर नाही ना टाकणार! जळो माझी जीभ. कुठल्या कुठे जाऊन पोचलं!' 'काढून टाकील तर टाकू दे, अल्ला त्याचं भलं करो. रडायचं तरी कुठवर?' 'तुम्ही मला उगीचच घेऊन चालला आहात. साऱ्याच्या साऱ्या हसतील मला.' 'काढून टाकलं तर विचारणार नाही का मी, की कोणत्या आरोपावरून काढून टाकता? शिवी देताना कुणी ऐकलं? मोगलाई लागली आहे की काय, की वाटेल त्याला काढून टाकावं? आणि कुठेच दाद लागली नाही तर पंचांपुढे फिर्याद मांडीन. चौधरीच्या दारावर डोकं आपटीन.' 'अशीच एकी राहिली असती तर दारोग्याला एवढा दंड करता आला असता का?' 'रोग जेवढा मोठा, तेवढंच औषधही मोठं असतं, वेडे!' तरीही अल्लारक्खीचे मन शांत झाले नाही. तिच्या चेहऱ्यावर खिन्नतेचा धूरच जणू पसरला होता. शिवी ऐकूनही दारोगा का चिडला नाही, त्याच वेळी त्याने तिला काढून का टाकले नाही, हे तिला उमगत नव्हते. तो थोडा दयाळूही वाटत होता. त्याचे हे गूढ तिला उकलत नव्हते; आणि जी गोष्ट आपल्याला समजत नाही, तिचीच आपल्याला भीती वाटते. नुसता दंडच करायचा असता तर त्याने वहीत तिचे नाव लिहिले असते. तिला हाकलून बाहेर काढायचे त्याने ठरवूनच टाकले आहे, म्हणूनच तो दयाळू झाला होता. तिने ऐकले होते, की ज्यांना फाशी द्यायची असते त्यांना शेवटपर्यंत भरपूर पुरी-मिठाई खाऊ घालतात, ज्याला भेटायचे असेल त्याला भेटू देतात. नक्की काढून टाकणार तो. म्युनिसिपालिटीची कचेरी आली. हजारो मेहतराण्या जमल्या होत्या; रंगीबेरंगी कपडे घालून, नटूनथटून. पान-सिगारेटवालेही आले होते. खाऊच्या पाट्या घेऊन फिरणारे फेरीवालेही. पठाणांची एक टोळीही आपल्या ऋणकोंकडून रुपये वसूल करायला येऊन पोचली. हे दोघेही जाऊन उभे राहिले.
दंड
पगार वाटायला सुरुवात झाली. आधी मेहतराण्यांची पाळी होती. जिचे नाव पुकारले जाई, ती लगबगीने पुढे जाई आणि आपले रुपये घेऊन दारोग्याला फुकटच्या दुवा देत निघून जाई. चंपाच्या नंतर नेहमी अल्लारक्खीचेच नाव पुकारले जात असे. आज अल्लारक्खीचे नावच उडून गेले होते. चंपानंतर जहूरनचे नाव पुकारले गेले; यादीत तिचे नाव अल्लारक्खीच्या खाली असे. अल्लारक्खीने हताश नजरेने हुसैनीकडे पाहिले. मेहतराण्या तिच्याकडे पाहून पाहून आपसात कुजबुजू लागल्या. तिला वाटले, घरी निघून जावे; ही थट्टा सोसवत नाही. धरणी दुभंगतही नाही, की तिच्या पोटात गडप व्हावे. एकामागून एक नावे येत गेली आणि अल्लारक्खी समोरच्या झाडांकडे पाहत राहिली. कुणाचे नाव येते, कोण जाते, कोण आपल्याकडे टक लावून बघते, कोण आपल्याला हसते, याची आता तिला पर्वा उरली नव्हती. अचानक आपले नाव ऐकून ती दचकली. हळूच उठली आणि नव्या नवरीसारखी पावले टाकीत निघाली. खजिनदाराने पुरे ६ रुपये तिच्या हातावर ठेवले. तिला नवल वाटले. खजिनदाराची चूक तर नाही ना झाली? या तिन्ही वर्षांत पुरा पगार तर कधी मिळाला नाही. आणि या खेपेला तर निम्मा मिळाला तरी पुष्कळ. कदाचित खजिनदार रुपये परत मागेल, म्हणून ती क्षणभर तिथेच उभी राहिली. 'आता का उभी आहेस, जात का नाहीस?' असे खजिनदाराने विचारले, तेव्हा ती हळूच म्हणाली, 'हे तर पुरे रुपये आहेत.' खजिनदाराने चकित होऊन तिच्याकडे पाहिले. 'मग काय हवं आहे तुला, कमी मिळावेत?' 'काही दंड नाही?' 'नाही, या खेपेला काही दंड नाही.' अल्लारक्खी निघाली, पण तिचे मन प्रसन्न नव्हते; दारोगाजींना आपण शिवी का दिली, याचा तिला पस्तावा होत होता!