मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
दोन बैलांची कथा
जनावरांमध्ये गाढव सर्वांत बुद्धिहीन समजला जातो. एखाद्या माणसाला पहिल्या नंबरचा मूर्ख म्हणायचे असले, की आपण त्याला गाढव म्हणतो. गाढव खरोखरच मूर्ख आहे, की त्याच्या साधेपणाने, त्याच्या निरुपद्रवी सहनशीलतेने त्याला ही पदवी मिळवून दिली आहे, हे निश्चित सांगता येत नाही. गाई शिंगे मारतात; व्यालेली गाय तर बघता बघता सिंहिणीचे रूप धारण करते. कुत्राही तसा फार गरीब प्राणी, पण कधीकधी त्यालाही राग येतोच. गाढवाला मात्र रागावलेले कधी ऐकले नाही, पाहिलेही नाही. त्या बिचाऱ्याला हवे तेवढे बडवा, कसलेही खराब, कुजके गवत त्याच्यापुढे टाका; त्याच्या चेहऱ्यावर असंतोषाची छटासुद्धा कधी दिसायची नाही. वैशाखात एखाद्या वेळी तो बागडत असेलही; पण आम्ही तरी त्याला कधी खूश झालेले पाहिले नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक कायमची खिन्नता कायमची वस्तीला आलेली असते. सुख असो की दुःख, तोटा असो की फायदा, कोणत्याही अवस्थेत त्याला बदलताना पाहिले नाही. ऋषिमुनींचे जेवढे म्हणून गुण आहेत, ते सारे त्याच्या ठायी पराकोटीला पोचले आहेत; तरी माणूस त्याला मूर्ख म्हणतो. सद्गुणांचा एवढा अनादर दुसरीकडे कुठे पाहिला नाही. कदाचित साधेपणा या जगाला मानवतच नसावा. पाहा ना, आफ्रिकेत हिंदुस्थानी लोकांचे एवढे हाल का होत आहेत? अमेरिकेत त्यांना पाऊल का ठेवू दिले जात नाही? बिचारे दारू पीत नाहीत, अडीअडचणीसाठी चार पैसे गाठीला बांधून ठेवतात, जीव तोडून काम करतात, कोणाशी भांडणतंटा करत नाहीत, चार शब्द ऐकून घ्यावे लागले तरी मूग गिळून बसतात. तरीही बदनाम! म्हणे, ते जीवनमान खाली आणतात. तेही अरेला कारे करायला शिकले असते, तर कदाचित सुसंस्कृत म्हणवले जाऊ लागले असते. जपानचे उदाहरण डोळ्यांसमोर आहे. एकाच विजयाने त्याला जगातल्या सुसंस्कृत राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवले.
दोन बैलांची कथा
पण गाढवाला एक धाकटा भाऊही आहे; तो त्याच्यापेक्षा थोडासाच कमी गाढव आहे, आणि तो म्हणजे 'बैल'. ज्या अर्थाने आपण 'गाढव' हा शब्द वापरतो, जवळजवळ त्याच अर्थाने 'कालवडीचा काका', म्हणजेच 'बैलोबा', हा शब्दही वापरतो. काही लोक बैलाला कदाचित मूर्खशिरोमणी ठरवतील; पण आमचे मत तसे नाही. बैल कधीकधी मारतोही, कधीकधी अडेल बैलही पाहायला मिळतो. आणखीही कित्येक रीतींनी तो आपला असंतोष व्यक्त करतो; म्हणून त्याचे स्थान गाढवाच्या खालचे आहे. झूरी काछी याच्या दोन बैलांची नावे होती हिरा आणि मोती. दोघेही पछाई वाणाचे; दिसायला देखणे, कामाला चोख, अंगापिंडाने उंचेपुरे. पुष्कळ दिवस एकत्र राहता राहता दोघांत सख्ख्या भावांसारखा जिव्हाळा जडला होता. दोघे समोरासमोर किंवा शेजारीशेजारी बसून एकमेकांशी मुक्या भाषेत विचारांची देवाणघेवाण करत. एकाच्या मनातले दुसऱ्याला कसे कळे, ते आम्हांला सांगता येणार नाही. जीवसृष्टीत आपणच श्रेष्ठ असा दावा करणाऱ्या माणसाला जी लाभलेली नाही, अशी कुठलीतरी गुप्त शक्ती त्यांच्यापाशी खचितच होती. दोघे एकमेकांना चाटून आणि हुंगून आपले प्रेम व्यक्त करत; कधीकधी शिंगेही भिडवत; वैरभावाने नव्हे, तर केवळ गंमत म्हणून, आपुलकीने; दोस्तांत गट्टी जमली की पाठीत धपाटे घालणे सुरू होते ना, तसे. त्याशिवाय दोस्ती जरा फुसकी, जरा हलकीच राहते; तिच्यावर फारसा भरवसा ठेवता येत नाही. हे दोन बैल नांगराला किंवा गाडीला जुंपले जाऊन माना डोलवत चालू लागले, की जास्तीत जास्त ओझे आपल्याच मानेवर यावे अशी प्रत्येकाची धडपड असे. दिवसभराच्या कामानंतर दुपारी किंवा संध्याकाळी जू उतरले, की दोघे एकमेकांना चाटूनपुसून आपला शीण घालवत. गव्हाणीत पेंड-भुसा पडला की दोघे बरोबर उठत, बरोबरच गव्हाणीत तोंड घालत आणि बरोबरच खाली बसत. एकाने तोंड काढून घेतले की दुसराही काढून घेई.
दोन बैलांची कथा
योगायोग असा, की झूरीने एकदा ही जोडी सासुरवाडीला पाठवून दिली. आपल्याला का पाठवत आहेत, हे बैलांना काय ठाऊक! त्यांना वाटले, धन्याने आपल्याला विकून टाकले. आपले असे विकले जाणे त्यांना बरे वाटले की वाईट, कोण जाणे; पण झूरीचा मेहुणा गया याला ही जोडी घरापर्यंत नेताना नाकी नऊ आले. मागून हाकावे, तर दोघे उजवीकडे-डावीकडे पळत; कासरा धरून पुढून ओढावे, तर दोघे मागे जोर लावत. मारावे, तर दोघे शिंगे खाली करून डुरकत. देवाने त्यांना वाचा दिली असती, तर त्यांनी झूरीला विचारले असते—तुम्ही आम्हां गरिबांना का हाकलून देता? तुमची सेवा करण्यात आम्ही कसलीही कसूर केली नव्हती. एवढ्या मेहनतीने भागत नव्हते, तर आणखी काम करून घ्यायचे होते. तुमच्या चाकरीत मरून जाणेही आम्हांला कबूल होते. दाणावैरणीबद्दल आम्ही कधी तक्रार केली नाही. तुम्ही जे काही खाऊ घातले, ते मान खाली घालून खाल्ले; मग तुम्ही आम्हांला या जुलमी माणसाच्या हाती का विकून टाकले? संध्याकाळच्या वेळी दोन्ही बैल आपल्या नव्या ठिकाणी पोचले. दिवसभर उपाशी होते; पण गव्हाणीला बांधल्यावर एकानेही तिच्यात तोंड घातले नाही. मन जड झाले होते. ज्याला ते आपले घर समजत होते, ते आज त्यांना दुरावले होते. हे नवे घर, नवे गाव, नवी माणसे, सारेच त्यांना परके परके वाटत होते. दोघांनी आपल्या मुक्या भाषेत मसलत केली, एकमेकांकडे तिरक्या नजरेने पाहिले आणि ते आडवे झाले. गावात निजानीज झाली, तेव्हा दोघांनी जोर लावून दावी तोडून टाकली आणि घरची वाट धरली! दावी चांगली मजबूत होती. कोणी बैल ती तोडू शकेल असे वाटलेही नसते; पण या दोघांच्या अंगात या वेळी दुप्पट बळ संचारले होते. एकेका हिसक्यासरशी दोर तुटले.
दोन बैलांची कथा
झूरी सकाळी झोपून उठला, तो पाहतो तर दोन्ही बैल गव्हाणीपाशी उभे! दोघांच्या गळ्यांत अर्धे अर्धे दावे लोंबते आहे. गुडघ्यांपर्यंत पाय चिखलाने बरबटले आहेत; आणि दोघांच्या डोळ्यांत बंडखोर माया चमकते आहे. बैलांना पाहून झूरीचा ऊर मायेने भरून आला. धावत जाऊन त्याने त्यांना गळामिठी घातली. प्रेमाने कवटाळण्याचे आणि मुके घेण्याचे ते दृश्य फारच मनोहर होते. घरची आणि गावातली पोरे गोळा झाली आणि टाळ्या पिटून त्यांचे स्वागत करू लागली. गावाच्या इतिहासात ही घटना अभूतपूर्व नसली, तरी महत्त्वाची होती. बालसभेने ठराव केला, की दोन्ही पशुवीरांना मानपत्र दिले पाहिजे. कोणी आपल्या घरून भाकरी आणल्या, कोणी गूळ, कोणी कोंडा, कोणी भूस. एक मुलगा म्हणाला—असे बैल कुणापाशीच नसतील. दुसऱ्याने दुजोरा दिला—एवढ्या लांबून दोघे एकटेच चालत आले. तिसरा म्हणाला—बैल नाहीतच ते, मागल्या जन्मीची माणसं आहेत. याचा प्रतिवाद करण्याची कोणाची छाती झाली नाही. झूरीच्या बायकोने बैलांना दारात पाहिले, तशी तिच्या अंगाची आग झाली. म्हणाली—कसले निमकहराम बैल आहेत हे! एक दिवससुद्धा तिथं काम केलं नाही. पळून आले. आपल्या बैलांवरचा हा आरोप झूरीला ऐकवला नाही—निमकहराम कशाचे? दाणावैरण दिली नसेल, मग काय करणार! बायको तोऱ्यात म्हणाली—हो तर, बैलांना खाऊ घालणं फक्त तुम्हांलाच ठाऊक; बाकीचे सगळे तर त्यांना नुसतं पाणी पाजूनच ठेवतात! झूरीने तिला डिवचले—चारा मिळाला असता, तर कशाला पळाले असते? बायको चिडली—पळाले ते एवढ्यासाठी, की ती माणसं तुमच्यासारखी भोळसटपणे बैलांना गोंजारत बसत नाहीत. खाऊ घालतात, तर रगडून कामही करून घेतात. हे दोघे पडले कामचुकार; काढला पळ. आता बघतेच, पेंड आणि कोंडा कुठून मिळतो ते! वाळल्या भुशाखेरीज काही द्यायची नाही; खावोत नाहीतर मरोत.
दोन बैलांची कथा
तसेच झाले. गड्याला सक्त ताकीद मिळाली, की बैलांना नुसता कोरडा भुसाच घालायचा. बैलांनी गव्हाणीत तोंड घातले, तर सारे बेचव. ना कसला स्निग्धपणा, ना कसला रस! काय खाणार? आशाळभूत नजरेने ते दाराकडे पाहू लागले. झूरी गड्याला म्हणाला—थोडीशी पेंड का टाकत नाहीस रे? 'मालकीणबाई माझा जीवच घेतील.' 'चोरून टाकून ये.' 'नको दादा, मागाहून तुम्हीही त्यांचीच री ओढाल.' ( ३ ) दुसऱ्या दिवशी झूरीचा मेहुणा पुन्हा आला आणि बैलांना घेऊन निघाला. त्याने दोघांना गाडीला जुंपले. दोन-चार वेळा मोतीने गाडी रस्त्याकडेच्या चरात पाडू पाहिली; पण हिराने सावरून धरले. तो अधिक सोशीक होता. संध्याकाळी घरी पोचल्यावर त्याने दोघांना जाडजूड दोरांनी बांधले आणि कालच्या खोडीची चांगली अद्दल घडवली. मग पुन्हा तोच कोरडा भुसा पुढे टाकला. आपल्या स्वतःच्या दोन्ही बैलांना मात्र पेंड, चुणी, सारे काही दिले. दोन्ही बैलांचा असा अपमान कधीच झाला नव्हता. झूरीने त्यांना फुलाच्या छडीनेसुद्धा कधी शिवले नव्हते. त्याने नुसते चुचकारले की दोघे वाऱ्यावर उडू लागत. इथे मार पडला. दुखावलेल्या स्वाभिमानाची वेदना होतीच, त्यात वाट्याला आला कोरडा भुसा! त्यांनी गव्हाणीकडे डोळे वर करूनही पाहिले नाही. दुसऱ्या दिवशी गयाने बैलांना नांगराला जुंपले; पण या दोघांनी जणू पाऊल न उचलण्याची शपथच घेतली होती. तो मारून मारून थकला; पण दोघांनी पाऊल उचलले नाही. एकदा त्या निर्दयाने हिराच्या नाकावर सपासप दांडकी हाणली, तेव्हा मात्र मोतीचा राग अनावर झाला. तो नांगरासकट पळत सुटला. नांगर, दोर, जू, जोती, साऱ्यांचा मोडूनतोडून चक्काचूर झाला. गळ्यात लांबलचक दोर नसते, तर दोघे हाती लागले नसते. हिरा मुक्या भाषेत म्हणाला—पळण्यात काही अर्थ नाही. मोतीने त्याच भाषेत उत्तर दिले—यानं तर तुझा जीवच घ्यायचा बाकी ठेवला होता. आता मात्र जबर मार पडणार.
दोन बैलांची कथा
'पडू दे. बैलाच्या जन्माला आलो आहोत, तर मार कुठवर चुकवणार?' 'गया दोन माणसांना घेऊन धावत येतो आहे. दोघांच्या हातांत लाठ्या आहेत.' मोती म्हणाला—म्हणशील तर मीही जरा इंगा दाखवतो. लाठी घेऊन येतो आहे. हिराने समजूत घातली—नको रे बाबा! गुपचूप उभा राहा. 'मला मारलं, तर मीही एक-दोघांना लोळवीन.' 'नको. आपल्या जातीचा तो धर्म नाही.' मोती मनातल्या मनात चरफडत राहिला. गया येऊन पोचला आणि दोघांना पकडून घेऊन निघाला. नशीब, की त्याने या वेळी मारहाण केली नाही; नाहीतर मोतीही उलटला असता. त्याचा नूर पाहून गया आणि त्याचे मदतनीस समजून चुकले, की या घटकेला वेळ मारून नेणेच शहाणपणाचे. आज पुन्हा दोघांच्या पुढ्यात तोच कोरडा भुसा आला. दोघे निमूट उभे राहिले. घरातली माणसे जेवायला बसली. तेवढ्यात एक लहानशी मुलगी दोन भाकरी घेऊन बाहेर आली आणि दोघांच्या तोंडात एकेक देऊन निघून गेली. त्या एका भाकरीने त्यांची भूक काय भागणार! पण दोघांच्या मनाला जणू अन्न मिळाले. इथेही कुणी सज्जन जीव नांदतो आहे तर! मुलगी भैरोची होती. तिची आई वारली होती. सावत्र आई तिला सारखी मारत असे; म्हणून या बैलांविषयी तिला एक प्रकारची आपुलकी वाटू लागली होती. दोघे दिवसभर जुंपले जात, दांडकी खात, अडून बसत. संध्याकाळी त्यांना दावणीला बांधण्यात येई, आणि रात्री तीच मुलगी त्यांना दोन भाकरी भरवून जाई. प्रेमाच्या या प्रसादाची बरकतच अशी, की दोन-दोन घास कोरडा भुसा खाऊनही दोघे खंगत नव्हते; पण दोघांच्या डोळ्यांत, रोमारोमांत बंड भरले होते. एक दिवस मोती मुक्या भाषेत म्हणाला—आता नाही सोसवत, हिरा! 'काय करायचं म्हणतोस?' 'एखाद्याला शिंगांवर उचलून भिरकावून देईन.' 'पण ठाऊक आहे ना, आपल्याला भाकरी भरवणारी ती गोड पोर या घराच्या धन्याचीच लेक आहे. ती बिचारी अनाथ होईल.'
दोन बैलांची कथा
'मग मालकिणीला भिरकावू का? तीच तर त्या पोरीला मारते.' 'पण बाईमाणसावर शिंग चालवायचं नसतं, हे विसरतोस तू.' 'तू तर कुठूनच वाट काढू देत नाहीस. चल तर, आज दावं तोडून पळून जाऊ.' 'हां, हे मला कबूल; पण एवढा जाडजूड दोर तुटणार कसा?' 'त्याला उपाय आहे. आधी दोर थोडासा चावून घे. मग एका हिसक्यात तुटतो.' रात्री मुलगी भाकरी भरवून निघून गेली, तेव्हा दोघे दोर चावू लागले; पण जाड दोर तोंडात मावेना. बिचारे पुन्हा पुन्हा जोर लावत आणि हताश होत. एकाएकी घराचे दार उघडले आणि तीच मुलगी बाहेर आली. दोघे मान खाली घालून तिचा हात चाटू लागले. दोघांच्या शेपट्या ताठ उभ्या राहिल्या. तिने दोघांच्या कपाळांवरून हात फिरवला आणि ती म्हणाली—सोडते तुम्हांला. गुपचूप पळून जा; नाहीतर इथली माणसं मारून टाकतील. यांच्या नाकांत वेसण घालायची, अशी आज घरात मसलत चालली आहे. तिने गळ्यातले दावे सोडले; पण दोघे मुकाट उभेच राहिले. मोतीने आपल्या भाषेत विचारले—आता निघत का नाहीस? हिरा म्हणाला—चलायला हरकत नाही; पण उद्या या अनाथ पोरीवर संकट येईल. सगळे हिच्यावरच संशय घेतील. तोच मुलगी एकदम ओरडली—आत्याकडचे दोन्ही बैल पळून चालले! दादा, ओ दादा! दोन्ही बैल पळून चालले! लवकर धावा! गया गडबडून आतून बाहेर आला आणि बैलांना पकडायला निघाला. ते दोघे पळाले. गयाने पाठलाग केला. ते आणखी वेगाने धावू लागले. गयाने आरडाओरडा केला. मग गावातली काही माणसे बरोबर घेण्यासाठी तो माघारी फिरला. दोघा मित्रांना पळायला संधी मिळाली. ते सरळ धावतच सुटले; इतके, की वाटेचे भानच राहिले नाही. ज्या ओळखीच्या वाटेने आले होते, तिचा इथे पत्ता नव्हता. नवी नवी गावे लागू लागली. तेव्हा दोघे एका शेताच्या कडेला उभे राहून विचार करू लागले, आता काय करावे?
दोन बैलांची कथा
हिरा म्हणाला—वाट चुकलो वाटतं. 'तूही तर बेफाम पळत सुटलास. तिथंच त्याला लोळवायला हवा होता.' 'त्याला लोळवलं असतं, तर जग काय म्हणालं असतं? त्यानं आपला धर्म सोडला तर सोडू दे, पण आपण आपला धर्म का सोडायचा?' दोघे भुकेने व्याकूळ झाले होते. शेतात वाटाणा उभा होता. ते चरू लागले. मधूनमधून कानोसा घेत, कोणी येत तर नाही ना! पोट भरले आणि आपण मोकळे आहोत याची जाणीव झाली, तेव्हा दोघे मस्तीत येऊन उड्या मारू लागले, बागडू लागले. आधी दोघांनी ढेकर दिला. मग शिंगे भिडवली आणि ते एकमेकांना रेटू लागले. मोतीने हिराला कित्येक पावले मागे रेटले; इतके, की तो चरात पडला. तेव्हा त्यालाही राग आला. सावरून उठला आणि पुन्हा मोतीला भिडला. मोतीने पाहिले—खेळाचे भांडण होऊ पाहते आहे; तेव्हा तो बाजूला सरला. ( ४ ) अरे! हे काय! कुणी वळू डुरकत इकडेच येतो आहे. होय, वळूच तो. तो समोर येऊन ठेपला. दोघे मित्र भांबावून इकडेतिकडे पाहत आहेत. वळू कसला, साक्षात हत्तीच. त्याच्याशी भिडणे म्हणजे जिवाला मुकणे; पण न भिडले तरी जीव वाचेलसे दिसत नाही. यांच्याच दिशेने येतोही आहे. किती भयंकर रूप! मोती मुक्या भाषेत म्हणाला—चांगलेच अडकलो. जीव कसा वाचायचा? काहीतरी उपाय काढ. हिरा काळजीच्या सुरात म्हणाला—आपल्याच घमेंडीत धुंद आहे. विनवण्या-गयावया ऐकायचा नाही. 'पळून का जाऊ नये?' 'पळणं म्हणजे भेकडपणा.' 'मग मर इथंच. हा गडी तर पोबारा करतो.' 'आणि त्यानं पाठलाग केला तर?' 'तर मग काहीतरी उपाय काढ, लवकर!' 'उपाय एकच, दोघांनी मिळून एकदम त्याच्यावर तुटून पडायचं. मी पुढून मुसंडी मारतो, तू मागून मार. दुहेरी मार पडला की पळ काढील. तो माझ्यावर झेपावला रे झेपावला, की तू बाजूनं त्याच्या पोटात शिंग खुपस. जिवावरचा खेळ आहे; पण दुसरा उपाय नाही.'
दोन बैलांची कथा
दोघे मित्र तळहातावर शिर घेऊन झेपावले. संघटित शत्रूंशी लढण्याचा अनुभव वळूला कधीच आला नव्हता. त्याला सवय होती ती एकाच शत्रूशी कुस्ती खेळायची. तो हिरावर झेपावताच मोतीने मागून हल्ला चढवला. वळू त्याच्याकडे वळला, तर हिराने मुसंडी मारली. एकेकाला गाठून दोघांना लोळवावे, असा वळूचा बेत होता; पण हे दोघेही वस्ताद होते. ते त्याला ती संधीच देत नव्हते. एकदा वळू चवताळून हिराचा निकाल लावण्यासाठी निघाला, तोच मोतीने बाजूने येऊन त्याच्या पोटात शिंग भोसकले. वळू संतापून मागे फिरला, तर हिराने दुसऱ्या कुशीत शिंग खुपसले. शेवटी बिचारा जखमी होऊन पळाला, आणि दोघा मित्रांनी दूरवर त्याचा पाठलाग केला; इतका, की वळू दमछाक होऊन खाली कोसळला. तेव्हा कुठे दोघांनी त्याला सोडले. दोघे मित्र विजयाच्या धुंदीत डुलत डुलत चालले होते. मोती आपल्या सांकेतिक भाषेत म्हणाला—माझ्या तर मनात होतं, बच्चमजीला ठारच करावं. हिराने त्याला फटकारले—पडलेल्या वैऱ्यावर शिंग चालवू नये. 'हे सगळं ढोंग आहे. वैऱ्याला असा मारावा, की तो पुन्हा उठूच नये.' 'आता घरी कसं पोचायचं, त्याचा विचार कर.' 'आधी काही खाऊन घेऊ, मग विचार करू.' समोर वाटाण्याचे शेत होतेच. मोती त्यात घुसला. हिरा नको नको म्हणत राहिला; पण त्याने एक ऐकले नाही. दोन-चार घास खाल्ले असतील नसतील, तोच दोन माणसे लाठ्या घेऊन धावत आली आणि त्यांनी दोघा मित्रांना घेरले. हिरा बांधावर होता, तो निसटला. मोती पाणी दिलेल्या शेतात होता. त्याचे खूर चिखलात रुतू लागले. त्याला पळता आले नाही. तो पकडला गेला. हिराने पाहिले, सोबती संकटात आहे; तसा तो माघारी फिरला. अडकायचे तर दोघे बरोबरच अडकू. राखणदारांनी त्यालाही पकडले. सकाळी दोघा मित्रांची रवानगी कोंडवाड्यात झाली.
दोन बैलांची कथा
( ५ ) सारा दिवस उलटला तरी खायला एक काडीसुद्धा मिळू नये, असा प्रसंग दोघा मित्रांवर आयुष्यात पहिल्यांदाच आला. हा कसला धनी, तेच त्यांना कळेना. याच्यापेक्षा तर गया तरी बरा होता. तिथे कित्येक म्हशी होत्या, कित्येक शेळ्या, कित्येक घोडे, कित्येक गाढवे; पण कोणाच्याही पुढ्यात चारा नव्हता; सारी जनावरे मढ्यांसारखी जमिनीवर पडली होती. कित्येक तर इतकी अशक्त झाली होती, की त्यांना उभेही राहवत नव्हते. सारा दिवस दोघे मित्र फाटकाकडे टक लावून पाहत राहिले; पण चारा घेऊन येणारे कोणी दिसले नाही. तेव्हा दोघांनी भिंतीची खारट माती चाटायला सुरुवात केली; पण त्याने काय तृप्ती होणार! रात्रीही काही खायला मिळाले नाही, तेव्हा हिराच्या मनात बंडाची ज्वाळा भडकली. तो मोतीला म्हणाला—आता नाही राहवत, मोती! मोतीने मान खाली टाकून उत्तर दिले—मला तर वाटतं, प्राण चालला आहे. 'इतक्या लवकर हिंमत हरू नकोस, गड्या! इथून पळायचा काहीतरी उपाय शोधायला हवा.' 'चल, भिंत पाडून टाकू.' 'माझ्याच्यानं तर आता काही व्हायचं नाही.' 'बस, याच जोरावर मिजास करत होतास!' 'सगळी मिजास उतरली.' कोंडवाड्याची भिंत कच्ची होती. हिरा धष्टपुष्ट तर होताच; त्याने आपली अणकुचीदार शिंगे भिंतीत रोवली आणि जोर लावला, तशी मातीची एक ढलपी निघाली. मग त्याचा हुरूप वाढला. तो धावत येऊन येऊन भिंतीवर धडका देऊ लागला आणि प्रत्येक धडकेसरशी थोडीथोडी माती पाडू लागला. त्याच वेळी कोंडवाड्याचा चौकीदार कंदील घेऊन जनावरांची हजेरी घ्यायला आला. हिराची ही दांडगाई पाहून त्याने त्याला कित्येक दांडकी ठेवून दिली आणि जाडजूड दोराने बांधून टाकले. मोती पडल्या पडल्या म्हणाला—शेवटी मार खाल्लास; काय मिळालं? 'अंगात होता तेवढा जोर तर लावून पाहिला.'
दोन बैलांची कथा
'असला जोर लावून काय उपयोग, की आणखीच बंधनात पडलास!' 'जोर तर लावतच राहीन, कितीही बंधनं पडली तरी.' 'जिवाला मुकावं लागेल.' 'पर्वा नाही. नाहीतरी मरायचंच आहे. विचार कर, भिंत पडली असती तर किती जीव वाचले असते! एवढे भाऊबंद इथं कोंडले आहेत. कुणाच्याही अंगात जीव उरलेला नाही. आणखी दोन-चार दिवस हीच गत राहिली, तर सगळे मरून जातील.' 'हो, हे मात्र खरं. बरं तर, घे, मीही जोर लावतो.' मोतीनेही भिंतीत त्याच जागी शिंग मारले. थोडीशी माती पडली आणि हिंमत वाढली. मग तो भिंतीला शिंगे लावून असा जोर करू लागला, जणू एखाद्या प्रतिस्पर्ध्याशीच झुंजतो आहे. शेवटी सुमारे दोन तासांच्या झटापटीनंतर भिंत वरून जवळजवळ हातभर ढासळली. त्याने दुप्पट जोराने दुसरा धक्का दिला, तशी अर्धी भिंत कोसळली. भिंत कोसळायचा अवकाश, अर्धमेली होऊन पडलेली सारी जनावरे खडबडून जागी झाली. तिन्ही घोड्या भरधाव पळत सुटल्या. मग शेळ्या बाहेर पडल्या. त्यानंतर म्हशीही सटकल्या; पण गाढवे अजून जशीच्या तशी उभी होती. हिराने विचारले—तुम्ही दोघं का पळून जात नाही? एक गाढव म्हणाले—पुन्हा पकडले गेलो तर? 'मग काय बिघडलं? आत्ता तर पळायची संधी आहे.' 'आम्हांला भीती वाटते. आम्ही इथंच पडून राहू.' मध्यरात्र उलटून गेली होती. पळावे की न पळावे, या विचारात दोन्ही गाढवे अजून उभीच होती. आणि मोती आपल्या मित्राचा दोर तोडण्याच्या खटपटीत होता. त्याने हात टेकले, तेव्हा हिरा म्हणाला—तू जा, मला इथंच पडून राहू दे. कदाचित कुठंतरी भेट होईल. मोती डोळ्यांत पाणी आणून म्हणाला—तू मला इतका आपमतलबी समजतोस, हिरा? तू आणि मी इतके दिवस एकत्र राहिलो. आज तू संकटात सापडलास, तर मी तुला सोडून निघून जाऊ? हिरा म्हणाला—फार मार पडेल. हा तुझाच उपद्व्याप आहे, हे लोकांना कळेल.
दोन बैलांची कथा
मोती अभिमानाने म्हणाला—ज्या अपराधासाठी तुझ्या गळ्यात दोर पडला, त्यासाठी मला मार पडला तर त्याची काय फिकीर! एवढं तर झालंच, की नऊ-दहा जीव वाचले. ते सगळे दुवा तर देतील. असे म्हणत मोतीने दोन्ही गाढवांना शिंगांनी ढोसून ढोसून कोंडवाड्याबाहेर घालवले आणि मग आपल्या जिवलगाजवळ येऊन तो झोपी गेला. पहाट होताच मुनशी, चौकीदार आणि इतर नोकरांत कशी खळबळ उडाली, ते लिहिण्याची गरज नाही. एवढेच पुरे, की मोतीला बेदम चोप मिळाला आणि त्यालाही जाडजूड दोराने बांधून टाकण्यात आले. ( ६ ) एक आठवडाभर दोघे मित्र तिथे बांधलेले पडून राहिले. कोणी चाऱ्याची एक काडीही टाकली नाही. हां, एक वेळ पाणी दाखवले जाई. तोच त्यांचा आधार. दोघे इतके अशक्त झाले होते, की उठवतही नव्हते. हाडांचे सापळे दिसू लागले होते. एक दिवस कोंडवाड्यासमोर डुगडुगी वाजू लागली आणि दुपार होता होता तिथे पन्नास-साठ माणसे जमली. तेव्हा दोघा मित्रांना बाहेर काढले आणि त्यांची पाहणी सुरू झाली. लोक येऊन येऊन त्यांचे रूप पाहत आणि हिरमुसले होऊन निघून जात. असल्या मेल्यागत बैलांना कोण गिऱ्हाईक मिळणार? तेवढ्यात एक दाढीवाला माणूस आला; त्याचे डोळे लाल होते आणि चेहरा अत्यंत कठोर. दोघा मित्रांच्या कुल्ल्यांत बोटे खुपसून पाहत तो मुनशीजींशी बोलू लागला. त्याचा चेहरा पाहताच अंतर्ज्ञानाने दोघा मित्रांचे काळीज थरकापले. तो कोण आहे आणि आपल्याला का चाचपतो आहे, याविषयी त्यांना कसलीच शंका उरली नाही. दोघांनी भेदरलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि माना खाली घातल्या. हिरा म्हणाला—गयाच्या घरून उगीच पळालो. आता जीव वाचत नाही. मोतीने अश्रद्धेने उत्तर दिले—म्हणतात, देव सगळ्यांवर दया करतो. मग त्याला आपली दया का येत नाही?
दोन बैलांची कथा
'देवाला आपलं मरणं आणि जगणं दोन्ही सारखंच. चल, बरंच आहे; काही दिवस त्याच्यापाशी तरी राहू. एकदा देवानं त्या पोरीच्या रूपानं आपल्याला वाचवलं होतं. आता वाचवणार नाही का?' 'हा माणूस सुरी चालवणार. बघशील तू.' 'मग चिंता कसली? मांस, कातडं, शिंगं, हाडं, सगळं कशा ना कशाच्या कामी येईल.' लिलाव झाल्यावर दोघे मित्र त्या दाढीवाल्याबरोबर निघाले. दोघांच्या अंगाचा कण अन् कण थरथरत होता! बिचाऱ्यांना पाऊलही उचलवत नव्हते; पण भीतीपोटी पडत-धडपडत धावत होते, कारण चाल जराशी मंदावली की तो जोरात दांडके हाणी. वाटेत गाई-बैलांचा एक कळप हिरव्यागार कुरणात चरताना दिसला. सारी जनावरे खुशीत होती; तुकतुकीत, चपळ. कोणी उड्या मारत होते, कोणी सुखाने बसून रवंथ करत होते. किती सुखाचे जिणे होते यांचे; पण किती आपमतलबी आहेत सगळे! आपले दोन भाऊ खाटकाच्या हाती सापडून कसे दुःखात आहेत, याची कोणालाच फिकीर नाही! एकाएकी दोघांना वाटले, ही तर ओळखीची वाट. होय, याच रस्त्याने गयाने त्यांना नेले होते. तीच शेते, त्याच बागा, तीच गावे लागू लागली. क्षणाक्षणाला त्यांची चाल वेगावू लागली. सारा शीण, सारा अशक्तपणा कुठल्या कुठे पळाला. अहा! हे पाहा! आपलेच शिवार आले. याच विहिरीवर आपण मोट ओढायला येत असू. होय, हीच ती विहीर. मोती म्हणाला—आपलं घर जवळ आलं. हिरा म्हणाला—देवाची कृपा. 'मी तर आता घराकडे धूम ठोकतो.' 'हा जाऊ देईल होय!' 'याला मी लोळवतो.' 'नको, नको, धावत दावणीकडे चल. तिथून आपण पुढं जायचंच नाही.' दोघे बेभान होऊन वासरांसारखे बागडत घराकडे धावले. ती पाहा आपली दावण! दोघे धावत आपल्या दावणीपाशी आले आणि उभे राहिले. दाढीवालाही मागोमाग धावत येत होता. झूरी दारात बसून ऊन खात होता. बैलांना पाहताच तो धावला आणि आळीपाळीने त्यांना गळामिठी घालू लागला. मित्रांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. एक जण झूरीचा हात चाटत होता.
दोन बैलांची कथा
दाढीवाल्याने जाऊन बैलांचे दोर धरले. झूरी म्हणाला—माझे बैल आहेत. 'तुमचे बैल कसे? मी कोंडवाड्यातून लिलावात घेऊन आलो आहे.' 'मला तर वाटतं, चोरून घेऊन आला आहात. मुकाट्यानं चालते व्हा. माझे बैल आहेत. मी विकीन तेव्हाच ते विकले जातील. माझ्या बैलांचा लिलाव करायचा कुणाला काय अधिकार!' 'जाऊन ठाण्यात फिर्याद करीन.' 'माझे बैल आहेत. त्याचा पुरावा हा, की ते माझ्या दारात उभे आहेत.' दाढीवाला चिडून बैलांना जबरदस्तीने धरून न्यायला पुढे सरसावला. त्याच क्षणी मोतीने शिंग चालवले. दाढीवाला मागे हटला. मोतीने पाठलाग केला. दाढीवाला पळाला. मोती मागे धावला. गावाबाहेर गेल्यावर तो थांबला; पण तिथेच उभा राहून दाढीवाल्याच्या वाटेवर नजर ठेवून होता. दाढीवाला दूर उभा राहून धमक्या देत होता, शिव्या हासडत होता, दगड फेकत होता. आणि मोती विजयी वीरासारखा त्याची वाट अडवून उभा होता. गावातले लोक गंमत पाहत होते आणि हसत होते. दाढीवाला हार खाऊन निघून गेला, तेव्हा मोती ऐटीत परतला. हिरा म्हणाला—मला भीती वाटत होती, की रागाच्या भरात तू त्याला मारून तर बसणार नाहीस ना. 'त्यानं मला धरलं असतं, तर मी त्याला मारल्याशिवाय सोडलं नसतं.' 'आता यायचा नाही.' 'आला तर लांबूनच समाचार घेईन. बघतो, कसा नेतो ते!' 'आणि त्यानं गोळी घालायला लावली तर?' 'मरून जाईन; पण त्याच्या कामी तर येणार नाही.' 'आपल्या जिवाला कुणी जीवच समजत नाही.' 'एवढ्यासाठीच, की आपण इतके साधेभोळे असतो.' थोड्याच वेळात गव्हाणी पेंड, भुसा, कोंडा, दाणा यांनी भरल्या आणि दोघे मित्र खाऊ लागले. झूरी उभा राहून दोघांना कुरवाळत होता आणि डझनावारी पोरे गंमत पाहत होती. साऱ्या गावात जणू उत्सवाचा आनंद भरला होता. त्याच वेळी मालकिणीने येऊन दोघांच्या कपाळांचे मुके घेतले.