मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
दुधाचे मोल
आता मोठमोठ्या शहरांत सुइणी, नर्सी, लेडी डॉक्टर, सगळ्याच निपजल्या आहेत; पण खेड्यापाड्यांत बाळंतपणाच्या खोल्यांवर अजूनही भंगिणींचीच सत्ता चालते, आणि नजीकच्या काळात त्यात काही बदल होईल अशी आशा नाही. बाबू महेशनाथ आपल्या गावचे जमीनदार होते, शिकलेसवरलेले होते आणि बाळंतपणाच्या खोल्यांत सुधारणा व्हायला हवी हे त्यांना मान्य होते; पण त्या वाटेत जे अडथळे होते, त्यांच्यावर मात करणार तरी कशी? कोणतीही नर्स खेड्यात यायला तयार झाली नाही, आणि खूप विनवण्या केल्यावर एखादी तयार झालीच, तर तिने एवढी भलीमोठी फी मागितली, की मान खाली घालून परत येण्याखेरीज बाबूसाहेबांना दुसरे काही सुचले नाही. लेडी डॉक्टरकडे जाण्याची तर त्यांची हिंमतच झाली नाही. तिची फी भागवायला बाबूसाहेबांना कदाचित आपली अर्धी जायदाद विकावी लागली असती. म्हणून तीन मुलींनंतर जेव्हा हा चौथा मुलगा जन्माला आला, तेव्हा पुन्हा तोच गूदड आणि तीच गूदडची बायको. मुले बहुधा रात्रीच जन्माला येतात. एके दिवशी मध्यरात्री शिपायाने गूदडच्या दारात अशी आरोळी ठोकली, की आजूबाजूचे शेजारीपाजारीही जागे झाले. मुलगी थोडीच झाली होती, की मेलेल्या आवाजात हाक मारावी! गूदडच्या घरी या शुभ प्रसंगाची महिनोन् महिने तयारी चालली होती. भीती एकच, की पुन्हा मुलगी होऊ नये; नाहीतर तोच ठरलेला एक रुपया आणि एक साडी, एवढ्यावरच बोळवण होणार. या विषयावरून नवराबायकोत कितीतरी वेळा भांडण झाले होते, पैजा लागल्या होत्या. बायको म्हणे—या खेपेला मुलगा झाला नाही, तर तोंड दाखवणार नाही; हो हो, तोंड दाखवणार नाही. सगळी लक्षणं मुलाची आहेत. आणि गूदड म्हणे—बघशील, मुलगी होईल, पैजेवर सांगतो, मुलगीच होईल. मुलगा निघाला तर मिशा भादरीन; हो हो, मिशा भादरीन. बहुधा गूदडला वाटत असावे, की अशा रीतीने बायकोची मुलाची आस बळकट करून आपण मुलाच्या आगमनाचा मार्ग मोकळा करतो आहोत.
दुधाचे मोल
भुंगी म्हणाली—आता भादर मिशा, मेल्या! मी सांगत होते, मुलगा होईल. ऐकतच नव्हतास. आपलंच टुमणं लावलं होतंस. मी स्वतः तुझ्या मिशा भादरीन; खुंटसुद्धा ठेवणार नाही. गूदड म्हणाला—बरं, भादर हो बये! मिशा काय पुन्हा उगवणारच नाहीत? तिसऱ्या दिवशी बघ, होत्या तशा पुन्हा हजर. पण जे काही मिळेल, त्यातलं अर्धं मी ठेवून घेणार, आधीच सांगून ठेवतो. भुंगीने ठेंगा दाखवला आणि आपले तीन महिन्यांचे बाळ गूदडच्या हवाली करून ती शिपायाबरोबर चालू लागली. गूदडने हाक मारली—अगं! ऐक तर, अशी पळतेस कुठं? मलाही बधाईचा ढोल वाजवायला जावं लागेल. याला कोण सांभाळणार? भुंगीने लांबूनच सांगितले—याला तिथंच जमिनीवर निजवून दे. मी येऊन पाजून जाईन. (२) महेशनाथांच्या घरी या खेपेला भुंगीची भारी बडदास्त ठेवली जाऊ लागली. सकाळी हरीरा मिळे, दुपारी पुऱ्या आणि शिरा, तिसऱ्या प्रहरी पुन्हा तेच, आणि रात्री पुन्हा. आणि गूदडलाही भरपेट वाढलेले ताट मिळे. भुंगी आपल्या बाळाला दिवसारात्रीत एक-दोनदाच पाजू शकत असे. त्याच्यासाठी वरच्या दुधाची सोय केली होती. भुंगीचे दूध बाबूसाहेबांचे भाग्यवान बाळ पीत असे. आणि हा क्रम बाराव्या दिवशीही थांबला नाही. मालकीणबाई चांगल्या धष्टपुष्ट होत्या; पण या खेपेला असा योग आला, की त्यांना दूधच आले नाही. तिन्ही मुलींच्या वेळी एवढे भरपूर दूध येई, की मुलींना अपचन होई. या खेपेला एक थेंबही नाही. भुंगी सुईणही होती आणि दाईही. मालकीणबाई म्हणत—भुंगी, आमच्या बाळाला वाढवून दे; मग तू जगशील तोवर बसून खात राहा. पाच बिघे माफीची जमीन मिळवून देईन. नातूपणतू सुखानं राहतील. आणि वरचे दूध न पचल्यामुळे भुंगीचे लाडके पोर सारखे उलट्या काढी आणि दिवसेंदिवस रोडावत चालले होते. भुंगी म्हणे—बहूजी, जावळाला मी पाटल्या घेणार हं, आताच सांगून ठेवते. बहूजी उत्तर देत—हो हो, घे बाई पाटल्या, धमकावतेस कशाला? चांदीच्या घेणार की सोन्याच्या?
दुधाचे मोल
'वा बहूजी! चांदीच्या पाटल्या घालून कुणाला तोंड दाखवू? आणि हसं कुणाचं होईल?' 'बरं, सोन्याच्या घे बाई, सांगितलं ना.' 'आणि लग्नात कंठा घेणार, आणि चौधरींसाठी (गूदडसाठी) हातातले तोडे.' 'तेही घे; देवानं तो दिवस तर दाखवावा.' घरात मालकिणीच्या खालोखाल भुंगीचे राज्य होते. मोलकरणी, स्वयंपाकीणबाई, नोकरचाकर, सगळे तिचा धाक मानत. इतकेच काय, खुद्द बहूजीसुद्धा तिच्यापुढे नमत. एकदा तर तिने महेशनाथांनाही फटकारले होते. त्यांनी हसून ते टाळले. बोलणे भंग्यांवरून निघाले होते. महेशनाथ म्हणाले होते—जगात आणखी काहीही होवो, भंगी भंगीच राहणार. यांना माणसात आणणं कठीण. त्यावर भुंगी म्हणाली होती—मालक, भंगीच तर मोठमोठ्यांना माणसात आणतात; त्यांना कोण काय माणसात आणणार! ही उद्धट जीभ चालवल्यावर दुसऱ्या एखाद्या वेळी भुंगीच्या डोक्यावरचे केस शाबूत राहिले असते काय? पण आज बाबूसाहेब खदखदून हसले आणि म्हणाले—भुंगी अगदी मार्मिक बोलते. (३) भुंगीची राजवट वर्षाच्या पुढे टिकू शकली नाही. बाळाने भंगिणीचे दूध प्यावे यावर भूदेवांनी हरकत घेतली; मोटेराम शास्त्री तर प्रायश्चित्ताचाच प्रस्ताव मांडून बसले. दूध सोडवले खरे, पण प्रायश्चित्ताची गोष्ट हसण्यावारी गेली. महेशनाथ फटकारून म्हणाले—प्रायश्चित्ताचं छान बोललात शास्त्रीजी! कालपर्यंत त्याच भंगिणीचं रक्त पिऊन वाढला, आणि आता त्यात विटाळ शिरला! वा रे तुमचा धर्म! शास्त्रीजी शेंडी झटकून म्हणाले—हे सत्य आहे, की तो कालपर्यंत भंगिणीचे रक्त पिऊन वाढला. मांस खाऊन वाढला, हेही सत्य आहे; परंतु कालची गोष्ट कालची, आजची गोष्ट आजची. जगन्नाथपुरीत तर स्पृश्य-अस्पृश्य सगळे एका पंगतीला जेवतात, पण इथे तर तसे जेवता येत नाही. आजारपणात आम्हीसुद्धा अंगावर कपडे ठेवून जेवतो, खिचडीसुद्धा खातो बाबूजी; परंतु बरे झाल्यावर नेम पाळावाच लागतो. आपद्धर्माची गोष्ट निराळी.
दुधाचे मोल
'म्हणजे याचा अर्थ असा, की धर्म बदलत राहतो—कधी एक, कधी दुसरा?' 'मग काय! राजाचा धर्म निराळा, प्रजेचा धर्म निराळा; श्रीमंताचा धर्म निराळा, गरिबाचा धर्म निराळा. राजेमहाराजे वाटेल ते खावोत, वाटेल त्याच्याबरोबर खावोत, वाटेल त्याच्याशी लग्नसंबंध जोडोत; त्यांना कोणतेही बंधन नाही. समर्थ पुरुष आहेत ते. बंधने आहेत ती मधल्यांसाठी.' प्रायश्चित्त काही झाले नाही; पण भुंगीला गादीवरून उतरावे लागले. हां, दानदक्षिणा मात्र एवढी मिळाली, की ती तिला एकटीला नेता आली नाही; आणि सोन्याच्या पाटल्याही मिळाल्या. एकीऐवजी दोन नव्या, सुंदर साड्या; मुलींच्या वेळी मिळाल्या होत्या तशा साध्या नैनसुखाच्या नव्हेत. (४) याच वर्षी प्लेगने जोर धरला आणि गूदड पहिल्याच तडाख्यात सापडला. भुंगी एकटी राहिली, पण संसार होता तसाच चालू राहिला. लोक टपून बसले होते, की आता भुंगी गेली. अमक्या भंग्याशी बोलणी झाली, तमके चौधरी आले; पण भुंगी कुठे आली नाही, कुठे गेली नाही. असे करता करता पाच वर्षे लोटली, आणि तिचे पोर मंगल, अशक्त आणि सदा आजारी असूनही, धावू लागले. सुरेशपुढे ते अगदी चिमुरडे दिसे. एके दिवशी भुंगी महेशनाथांच्या घराची मोरी साफ करीत होती. महिनोन् महिने घाण साचली होती. अंगणात पाणी तुंबून राहू लागले होते. मोरीत एक लांब जाड बांबू घालून ती जोरजोराने हलवत होती. उजवा हात पुरा मोरीच्या आत होता, तोच एकाएकी तिने किंचाळून हात बाहेर काढला, आणि त्याच क्षणी एक काळा साप मोरीतून निघून पळाला. लोकांनी धावत जाऊन त्याला मारले खरे, पण भुंगीला वाचवू शकले नाहीत. त्यांना वाटले, पाणसाप आहे, विषारी नसणार; म्हणून आधी जरा हयगय झाली. विष अंगभर भिनले आणि लहरी येऊ लागल्या, तेव्हा कळले, की तो पाणसाप नव्हता, गेहुवन नाग होता.
दुधाचे मोल
मंगल आता अनाथ झाला. दिवसभर तो महेशबाबूंच्या दाराशी घुटमळत असे. घरात एवढे उष्टे उरे, की असली दहा-पाच पोरे पोसली गेली असती. खाण्याची काही कमतरता नव्हती. हां, त्याला वाईट वाटे ते तेव्हा, जेव्हा त्याला मातीच्या वाडग्यांत वरूनच अन्न वाढले जाई. सगळे लोक चांगल्या चांगल्या भांड्यांतून जेवतात, आणि त्याच्यासाठी मातीचे वाडगे! एरवी या भेदभावाचे त्याला मुळीच भान नसे; पण गावातली पोरे चिडवून चिडवून त्याचा अपमान करीत राहत. कोणी त्याला आपल्याबरोबर खेळायलाही घेत नसे. इतकेच काय, तो ज्या गोणपाटावर झोपे, त्यालाही कोणी शिवत नसे. घरासमोर एक कडुनिंबाचे झाड होते. त्याच्याखाली मंगलचा मुक्काम होता. एक फाटका गोणपाटाचा तुकडा, मातीचे दोन वाडगे, आणि एक धोतर, तेही सुरेशबाबूंचे उतरलेले. थंडी, उन्हाळा, पावसाळा, कोणत्याही ऋतूत ती जागा सारखीच आरामशीर होती; आणि नशिबाचा बलवान मंगल होरपळणाऱ्या उन्हाच्या झळा, हाडे गोठवणारी थंडी आणि मुसळधार पाऊस यांतही जिवंत होता, आणि पूर्वीपेक्षा कितीतरी धडधाकट. बस्स, त्याचे स्वतःचे म्हणावे असे कोणी असलेच, तर गावातले एक कुत्रे; आपल्या भाईबंदांच्या जुलमाला कंटाळून ते मंगलच्या आश्रयाला आले होते. दोघे एकच अन्न खात, एकाच गोणपाटावर झोपत; दोघांचा पिंडही सारखाच होता, आणि दोघे एकमेकांचा स्वभाव ओळखून होते. आपसात कधी भांडण होत नसे.
दुधाचे मोल
गावातले धर्मात्मे लोक बाबूसाहेबांच्या या उदारपणाचे आश्चर्य करीत. अगदी दारासमोर, पन्नास हातही अंतर नसेल, मंगलने पडून राहावे, हे त्यांना सोळा आणे धर्मविरुद्ध वाटे. छी! असेच चालले, तर थोड्याच दिवसांत धर्म बुडाला म्हणून समजा. भंगीसुद्धा देवानेच घडवला आहे, हे आम्हालाही ठाऊक आहे. त्यांच्यावर आपण कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये, हे कोणाला ठाऊक नाही? देवाचे तर नावच पतितपावन आहे; पण समाजाची मर्यादा म्हणूनही काही असते की नाही! त्या दारी जायला संकोच वाटतो. गावचे मालक आहेत, जावे तर लागतेच; पण एवढे समजा, की किळस वाटते. मंगल आणि टॉमी यांची चांगलीच गट्टी जमली होती. मंगल म्हणे—हे बघ टॉमी भाऊ, जरा आणखी सरकून झोप. मी पडू तरी कुठं? सगळं गोणपाट तर तूच अडवलंस. टॉमी कुंई कुंई करी, शेपूट हलवी, आणि सरकायच्याऐवजी आणखी अंगावर चढून येई आणि मंगलचे तोंड चाटू लागे. संध्याकाळी तो रोज एकदा आपले घर पाहायला आणि थोडा वेळ रडायला जाई. पहिल्या वर्षी गवताचे छप्पर कोसळले, दुसऱ्या वर्षी एक भिंत पडली, आणि आता नुसत्या अर्ध्या अर्ध्या भिंती उभ्या होत्या, ज्यांची वरची टोके सुळक्यासारखी टोकदार झाली होती. इथेच त्याला मायेची संपत्ती लाभली होती. तीच आठवण, तीच ओढ, तीच तहान त्याला एकदा तरी त्या ओसाड जागी खेचून नेई, आणि टॉमी नेहमी त्याच्याबरोबर असे. मंगल त्या टोकदार भिंतीवर बसे आणि आयुष्याच्या सरलेल्या आणि येणाऱ्या दिवसांची स्वप्ने पाहू लागे, आणि टॉमी उड्या मारमारून त्याच्या मांडीवर येऊन बसायचा फुकट प्रयत्न करीत राही.
दुधाचे मोल
(५) एके दिवशी काही मुले खेळत होती. मंगलही तिथे जाऊन दूर उभा राहिला. सुरेशला त्याची दया आली, की खेळणाऱ्यांच्या जोड्या पुऱ्या होत नव्हत्या, हे सांगता येत नाही. काहीही असो, त्याने ठरवले, की आज मंगललाही खेळात घ्यावे. इथे कोण बघायला येतोय. काय रे मंगल, खेळणार? मंगल म्हणाला—नको भैया, कुठं मालकांनी पाहिलं, तर माझी कातडी सोलून काढतील. तुम्हांला काय, तुम्ही तर बाजूला व्हाल. सुरेश म्हणाला—मग इथं कोण येतोय बघायला, रे? चल, आपण घोडा-घोडा खेळू. तू घोडा हो, आम्ही तुझ्या पाठीवर बसून दौडवू. मंगलने शंका काढली—मी सारखा घोडाच राहणार, की बसायलाही मिळणार? ते आधी सांगा. हा प्रश्न तिरपागडा होता. त्यावर कोणी विचारच केला नव्हता. सुरेशने क्षणभर विचार करून म्हटले—तुला कोण आपल्या पाठीवर बसवणार, विचार कर? तू भंगी आहेस की नाहीस? मंगलही ताठ झाला. म्हणाला—मी कुठं म्हणतो, मी भंगी नाही; पण तुम्हांला माझ्याच आईनं आपलं दूध पाजून वाढवलंय. मलाही बसायला मिळाल्याशिवाय मी घोडा होणार नाही. तुम्ही लोक मोठे लबाड. स्वतः मजेत बसणार, आणि मी नुसता घोडाच होऊन राहणार. सुरेशने दरडावून म्हटले, तुला घोडा व्हावंच लागेल, आणि तो मंगलला पकडायला धावला. मंगल पळाला. सुरेशने पाठलाग केला. मंगलने पावले आणखी जलद उचलली. सुरेशनेही जोर लावला; पण खाऊन खाऊन तो थुलथुलीत झाला होता, आणि धावताना त्याला धाप लागे. शेवटी त्याने थांबून म्हटले—ये, घोडा हो मंगल; नाहीतर कधी हाती लागलास, तर बेदम मारीन. 'तुम्हीही घोडा होणार ना?' 'बरं, आम्हीही होऊ.' 'तुम्ही नंतर सटकाल. आधी तुम्ही घोडा व्हा. मी बसून घेतो, मग मी होईन.'
दुधाचे मोल
सुरेशला खरोखरच हूल द्यायची होती. मंगलची ही मागणी ऐकून तो सवंगड्यांना म्हणाला—बघितलात याचा बदमाशपणा? भंगी आहे ना! तिघांनी मंगलला घेरले आणि जबरदस्तीने घोडा बनवले. सुरेशने चटकन त्याच्या पाठीवर बैठक जमवली आणि टिकटिक करून म्हणाला—चल घोड्या, चल! मंगल काही अंतर चालला खरा, पण त्या ओझ्याने त्याची कंबर मोडून जात होती. त्याने हळूच पाठ आकसली आणि सुरेशच्या मांडीखालून तो सरकला. सुरेशराव धप्पकन खाली पडले आणि भोंगा वाजवू लागले. आईने ऐकले, सुरेश कुठेतरी रडतो आहे. सुरेश कुठेही रडला, तरी त्यांच्या तिखट कानांवर त्याची चाहूल पडल्यावाचून राहत नसे; आणि त्याचे रडणेही अगदी निराळे असे, जणू छोट्या लायनीच्या इंजिनाचा आवाज. त्या मोलकरणीला म्हणाल्या—बघ गं, सुरेश कुठं रडतोय; विचार, कुणी मारलं? इतक्यात सुरेश स्वतःच डोळे चोळत आला. रडायची संधी मिळाली, की तो आईकडे फिर्याद घेऊन यायचाच. आई मिठाई किंवा सुकामेवा देऊन त्याचे डोळे पुशी. स्वारी होती आठ वर्षांची, पण होती अगदी बावळट. अति लाडाने त्याच्या बुद्धीचे तेच केले होते, जे अति खाण्याने त्याच्या देहाचे केले होते. आईने विचारले—का रडतोस सुरेश, कुणी मारलं? सुरेश रडत म्हणाला—मंगलनं मला शिवलं. आईचा विश्वास बसला नाही. मंगल इतका गरीब होता, की त्याच्याकडून कसल्याही खोडीची शंका येत नसे; पण सुरेश शपथा घेऊ लागला, तेव्हा विश्वास ठेवणे भागच पडले. मंगलला बोलावून त्यांनी दटावले—काय रे मंगल, आता तुला बदमाशी सुचू लागली? मी तुला सांगितलं होतं, सुरेशला कधी शिवायचं नाही; आठवतं की नाही, बोल! मंगल दबक्या आवाजात म्हणाला—आठवतं की. 'मग तू त्याला का शिवलंस?' 'मी नाही शिवलं.' 'तू नाही शिवलंस, तर तो रडत का होता?' 'पडले, म्हणून रडू लागले.'
दुधाचे मोल
चोरी तर चोरी, वर शिरजोरी! देवीजी दात ओठ खाऊन गप्प राहिल्या. मारले असते, तर त्याच क्षणी स्नान करावे लागले असते. छडी तर हातात घ्यावीच लागली असती, आणि विटाळाचा विजेचा प्रवाह त्या छडीच्या वाटेने त्यांच्या देहात घुसला असता. म्हणून जेवढ्या शिव्या देता आल्या तेवढ्या दिल्या, आणि हुकूम सोडला, की आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. पुन्हा या दारात तुझं तोंड दिसलं, तर तुझं रक्तच पिईन. फुकटच्या भाकरी खाऊन खाऊन खोड्या सुचतात; इत्यादी. मंगलला स्वाभिमान कसला असणार; हां, भीती होती. त्याने गुपचूप आपले वाडगे उचलले, गोणपाटाचा तुकडा काखेत दाबला, धोतर खांद्यावर टाकले आणि रडत रडत तिथून निघाला. आता तो इथे कधीही येणार नाही. फार तर काय होईल, उपाशी मरेल. काय बिघडले! असे जगून तरी काय फायदा! गावात त्याला दुसरा कुठे थारा होता! भंग्याला कोण आसरा देणार! तो त्याच पडक्या घराकडे निघाला, जिथे चांगल्या दिवसांच्या आठवणी त्याचे अश्रू पुसू शकत होत्या, आणि तिथे तो धाय मोकलून रडला. त्याच क्षणी टॉमीही त्याला शोधत शोधत तिथे पोचला, आणि दोघे पुन्हा आपले दुःख विसरले. (६) पण जसजसा दिवसाचा उजेड मावळू लागला, तसतशी मंगलची खंतही ओसरू लागली. बालपणाची जीव कासावीस करणारी भूक देहाचे रक्त पिऊन पिऊन अधिकच बळावत चालली होती. डोळे पुन्हा पुन्हा वाडग्यांकडे वळत. तिथे एव्हाना सुरेशची उष्टी मिठाई मिळाली असती. इथे काय माती खायची? त्याने टॉमीचा सल्ला घेतला—काय खाशील रे टॉमी? मी तर उपाशीच पडून राहणार. टॉमीने कुंई कुंई करून बहुधा म्हटले—असला अपमान तर जन्मभर सोसायचाच आहे. असा धीर सोडशील, तर कसं भागायचं? मला बघ ना; कधी कुणी काठी हाणली, की मी केकाटतो, आणि मग जरा वेळानं शेपूट हलवत त्याच्याच जवळ जाऊन पोचतो. तू आणि मी याचसाठी जन्माला आलोय, भाऊ!
दुधाचे मोल
मंगल म्हणाला—मग तू जा, जे मिळेल ते खाऊन घे; माझी पर्वा करू नकोस. टॉमी आपल्या श्वानभाषेत म्हणाला—एकटा नाही जाणार; तुला बरोबर घेऊनच जाईन. 'मी नाही जात.' 'मग मीही नाही जात.' 'उपाशी मरशील.' 'मग तू काय जगणार आहेस?' 'माझ्यासाठी रडायला कोण बसलंय?' 'इथंही तीच गत आहे, भाऊ. आश्विनात ज्या कुत्रीवर प्रेम केलं होतं, तिनं दगा दिला; आता ती कल्लूबरोबर असते. नशीब एवढंच, की आपली पिल्लं घेऊन गेली; नाहीतर माझा जीव संकटात पडला असता. पाच-पाच पिल्लं कोण पोसणार?' क्षणभराने भुकेने आणखी एक युक्ती शोधून काढली. 'मालकीणबाई आपल्याला शोधत असतील, नाही रे टॉमी?' 'मग काय? बाबूजी आणि सुरेश जेवले असतील. कहाराने त्यांच्या ताटांतलं उष्टं काढून घेतलं असेल आणि आपल्याला हाका मारत असेल.' 'बाबूजी आणि सुरेश दोघांच्याही ताटांत तूप भरपूर असतं, आणि ती गोड गोड वस्तू—हां, साय!' 'सगळंच्या सगळं उकिरड्यावर टाकलं जाईल.' 'बघू, आपल्याला शोधायला कोणी येतं का?' 'शोधायला कोण येणार? तू काय कुणी पुरोहित आहेस? एकदा "मंगल, मंगल" अशी हाक होईल, बस्स; मग थाळी मोरीत ओतली जाईल.' 'बरं, मग चल, जाऊ. पण मी लपून राहीन; कुणी माझं नाव घेऊन हाक मारली नाही, तर मी परत येईन. हे लक्षात ठेव.' दोघे तिथून निघाले आणि येऊन महेशनाथांच्या दाराशी अंधारात अंग चोरून उभे राहिले; पण टॉमीला दम कुठला? तो हळूच आत शिरला. पाहतो तो महेशनाथ आणि सुरेश ताटावर बसले आहेत. तो ओसरीत हळूच बसला; पण कोणी काठी हाणेल अशी त्याला भीती वाटत होती. नोकरांत बोलणे चालले होते. एक म्हणाला—आज मंगल्या दिसत नाही. मालकिणीनं दटावलं होतं, म्हणून पळाला असेल बहुतेक.
दुधाचे मोल
दुसऱ्याने उत्तर दिले—बरं झालं, हाकलून दिला ते. सकाळी सकाळी भंग्याचं तोंड बघावं लागायचं. मंगल आणखी अंधारात सरकला. आशा खोल पाण्यात बुडाली. महेशनाथ ताटावरून उठले. नोकर त्यांचे हात धुवतो आहे. आता हुक्का ओढतील आणि झोपतील. सुरेश आईजवळ बसून एखादी गोष्ट ऐकता ऐकता झोपी जाईल. गरीब मंगलची कोणाला काळजी आहे? एवढा वेळ झाला, कोणी चुकूनसुद्धा हाक मारली नाही. काही वेळ तो निराश होऊन तिथे उभा राहिला; मग एक दीर्घ सुस्कारा सोडून तो निघणारच होता, तोच कहार पत्रावळीत ताटातले उष्टे घेऊन जाताना दिसला. मंगल अंधारातून निघून उजेडात आला. आता मनाला आवरावे तरी कसे? कहार म्हणाला—अरे, तू इथं होतास? आम्हाला वाटलं, कुठं निघून गेलास. घे, खाऊन घे; मी फेकायलाच नेत होतो. मंगल केविलवाणेपणाने म्हणाला—मी तर केव्हाचा इथं उभा होतो. 'मग बोलला का नाहीस?' 'भीतीनं.' 'बरं, घे, खाऊन घे.' त्याने पत्रावळ उंचावरून मंगलच्या पसरलेल्या हातांत टाकली. मंगलने त्याच्याकडे अशा डोळ्यांनी पाहिले, ज्यांत दीन कृतज्ञता भरली होती. टॉमीही आतून बाहेर आला होता. दोघे तिथेच कडुनिंबाखाली पत्रावळीतून खाऊ लागले. मंगलने एका हाताने टॉमीचे डोके कुरवाळत म्हटले—बघितलंस, पोटाची आग अशी असते! या लाथाडलेल्या भाकरीसुद्धा मिळाल्या नसत्या, तर काय केलं असतं? टॉमीने शेपूट हलवले. 'सुरेशला अम्मानं वाढवलं होतं.' टॉमीने पुन्हा शेपूट हलवले. 'लोक म्हणतात, दुधाचं मोल कुणी फेडू शकत नाही; आणि मला दुधाचं हे मोल मिळतंय.' टॉमीने पुन्हा शेपूट हलवले.