मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
गवतवाली
मुलिया हिरव्यागार गवताचा भारा घेऊन आली, तेव्हा तिचा गव्हाळ चेहरा जरा लालबुंद झाला होता आणि तिच्या मोठमोठ्या, मदभऱ्या डोळ्यांत धास्ती दाटली होती. महावीरने तिचा लालावलेला चेहरा पाहून विचारले—काय गं मुलिया, आज बरं वाटत नाही का? मुलियाने काहीच उत्तर दिले नाही—तिचे डोळे डबडबले. महावीरने जवळ येऊन विचारले—काय झालं, सांगत का नाहीस? कुणी काही बोललं? अम्मा रागावली? एवढी उदास का आहेस? मुलिया हुंदका देत म्हणाली—काही नाही. काय होणार आहे? बरी तर आहे मी! महावीरने मुलियाला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले आणि म्हटले—गुपचूप रडत बसशील, पण सांगणार नाहीस? मुलियाने बोलणे टाळत म्हटले—काही असलं तर सांगेन ना! काय सांगू? मुलिया या ओसाड माळरानावरचे गुलाबाचे फूल होती. गव्हाळ वर्ण, हरिणीसारखे डोळे, खाली निमुळती होत गेलेली हनुवटी, गालांवर हलकीशी लाली, मोठ्या मोठ्या टोकदार पापण्या, आणि डोळ्यांत एक विलक्षण ओलावा, ज्यातून एक स्पष्ट वेदना, एक मूक व्यथा सतत डोकावत असे. चांभारांच्या या घरात ही अप्सरा कुठून आली होती, कुणास ठाऊक. डोक्यावर गवताची टोपली घेऊन ते विकायला जावे, असे होते का तिचे फुलासारखे कोमल अंग? त्या गावातही असे लोक होते, जे तिच्या तळव्यांखाली डोळ्यांच्या पायघड्या घालीत, तिच्या एका कटाक्षासाठी तळमळत, आणि ती एक शब्द जरी त्यांच्याशी बोलली असती, तरी जे धन्य होऊन गेले असते; पण तिला इथे येऊन वर्षाहून अधिक काळ लोटला, तरी कुणीही तिला तरुणांकडे पाहताना किंवा त्यांच्याशी बोलताना पाहिले नव्हते.
गवतवाली
ती गवत घेऊन निघाली, की वाटे, जणू सोनेरी पदराने रंगलेला उषेचा प्रकाश आपली प्रभा उधळीत चालला आहे. कोणी गझला गाई, कोणी छातीवर हात ठेवी, पण मुलिया आपली नजर खाली ठेवून आपल्या वाटेने निघून जाई. लोक थक्क होऊन म्हणत—एवढा गर्व! महावीरला अशी काय सोन्याची शिंगे फुटली आहेत? काही फार देखणा जवानही नाही तो. कुणास ठाऊक, ही त्याच्याबरोबर कशी राहते! पण आज अशी एक गोष्ट घडली, जी या जातीच्या इतर तरुणींना कदाचित एखादा गुप्त निरोप वाटली असती; मुलियाच्या काळजात मात्र ती शूळासारखी रुतली. सकाळची वेळ होती. आंब्याच्या मोहराच्या सुगंधाने वारा धुंद झाला होता, आकाश पृथ्वीवर सोन्याचा वर्षाव करीत होते. मुलिया डोक्यावर पाटी घेऊन गवत खुरपायला निघाली, तेव्हा तिचा गव्हाळ वर्ण सकाळच्या सोनेरी किरणांत बावनकशी सोन्यासारखा झळाळून उठला. अचानक समोरून तरुण चैनसिंह येताना दिसला. मुलियाने ठरवले, अंग चोरून बाजूने निघून जावे; पण चैनसिंहने तिचा हात धरला आणि म्हणाला—मुलिया, तुला माझी जराही दया येत नाही का? मुलियाचा तो फुलासारखा उमललेला चेहरा ज्वालेसारखा धगधगून उठला. ती जराही घाबरली नाही, जराही कचरली नाही. तिने पाटी जमिनीवर टाकली आणि म्हणाली—सोडा मला, नाहीतर मी ओरडते. चैनसिंहला आज आयुष्यात एक नवाच अनुभव आला. नीच जातींतल्या रूपाला आणि गोडव्याला उच्च जातीवाल्यांचे खेळणे होण्यापलीकडे दुसरे कामच काय असते? अशा कितीतरी मोहिमा त्याने जिंकल्या होत्या; पण आज मुलियाच्या चेहऱ्यावरचा तो रंग, तिचा तो क्रोध, तो अभिमान पाहून त्याचे धाबे दणाणले. शरमून त्याने तिचा हात सोडला. मुलिया झपाझप पुढे निघून गेली.
गवतवाली
झटापटीच्या आवेशात घावाची वेदना जाणवत नाही; ठणका मागाहून लागतो. मुलिया थोडी दूर गेली, तेव्हा क्रोध, भय आणि आपली असहायता यांची जाणीव होऊन तिचे डोळे भरून आले. काही वेळ तिने मन आवरले; मग ती हुंदके देऊन रडू लागली. ती इतकी गरीब नसती, तर कुणाची बिशाद होती तिचा असा अपमान करण्याची! ती रडत होती आणि गवत खुरपत होती. महावीरचा राग तिला ठाऊक होता. त्याला सांगितले, तर तो या ठाकुराच्या जिवावर उठेल. मग काय होईल, कोण जाणे! या विचारानेच तिच्या अंगावर काटा आला. म्हणूनच तिने महावीरच्या प्रश्नांना काहीच उत्तर दिले नव्हते. (२) दुसऱ्या दिवशी मुलिया गवताला गेली नाही. सासूने विचारले—तू का जात नाहीस? बाकी सगळ्या तर गेल्या. मुलियाने मान खाली घालून म्हटले—मी एकटी नाही जाणार. सासू चिडून म्हणाली—एकटी गेलीस तर काय वाघ उचलून नेईल तुला? मुलियाने मान आणखीच खाली घातली आणि दबक्या आवाजात म्हणाली—सगळे माझी छेड काढतात! सासूने दटावले, ना तू इतरांबरोबर जाणार, ना एकटी जाणार, मग जाणार तरी कशी? मी जाणारच नाही, असं सरळ सरळ का नाही सांगत? तर मग इथे माझ्या घरात राणी बनून राहणं चालायचं नाही. कुणालाही कातडं प्यारं नसतं, काम प्यारं असतं. तू मोठी सुंदर आहेस, तर तुझं सौंदर्य घेऊन काय चाटत बसू? उचल ती पाटी आणि गवत घेऊन ये! दारात कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत उभा राहून महावीर घोड्याला खरारा करीत होता. त्याने मुलियाला रडवेला चेहरा करून जाताना पाहिले; पण तो काही बोलू शकला नाही. त्याचे चालले असते, तर त्याने मुलियाला काळजात जपून ठेवले असते, डोळ्यांत लपवून ठेवले असते; पण घोड्याचे पोट भरणे तर भागच होते.
गवतवाली
गवत विकत घेऊन घालायचे, तर रोजचे बारा आण्यांहून कमी पडायचे नाहीत. एवढी मजुरी मिळते तरी कुणाला? मुश्किलीने दीड-दोन रुपये मिळतात, तेही कधी मिळतात, कधी नाही. या सत्यानाशी लॉऱ्या सुरू झाल्यापासून इक्केवाल्यांचा धंदाच बसला आहे. फुकटातसुद्धा कोणी विचारत नाही. महाजनाकडून दीडशे रुपये कर्ज काढून त्याने इक्का आणि घोडा विकत घेतला होता; पण लॉऱ्यांपुढे इक्क्याला विचारतो कोण? महाजनाचे व्याजसुद्धा फिटत नव्हते! मुद्दलाची तर गोष्टच सोडा. तो वरवरच्या मनाने म्हणाला—मन नसेल तर राहू दे. बघू काय होतं ते. या आपुलकीने मुलिया सुखावून गेली. म्हणाली—मग घोडा काय खाईल? आज तिने कालचा रस्ता सोडला आणि शेतांच्या बांधाबांधाने निघाली. पुन्हा पुन्हा ती सावध नजरेने इकडे-तिकडे पाहत चालली होती. दोन्ही बाजूंना उसाची शेते उभी होती. जरा कुठे सळसळ झाली, की तिच्या पोटात धस्स होई. कुणी उसात लपून तर बसले नसेल? पण नवे असे काहीच घडले नाही. उसाची शेते मागे पडली, आंब्याची बाग मागे पडली, भिजवलेली शेते दिसू लागली. दूरच्या विहिरीवर मोट चालली होती. शेतांच्या बांधांवर हिरवेगार गवत माजले होते. मुलियाचे मन लोभावले. इथे अर्ध्या तासात जितके गवत खुरपून होईल, तितके त्या सुक्या माळावर दुपारपर्यंतही होणार नाही. इथे बघतेय तरी कोण? कोणी ओरडले, तर निघून जाईन. ती बसून गवत खुरपू लागली, आणि तासाभरात तिची पाटी अर्ध्याहून अधिक भरली. ती आपल्या कामात इतकी गढून गेली होती, की चैनसिंह कधी आला ते तिला कळलेच नाही. अचानक कसलीशी चाहूल लागून तिने मान वर केली, तो समोर चैनसिंह उभा!
गवतवाली
मुलियाच्या छातीत धस्स झाले. मनात आले, पळून जावे, पाटी उलटी करावी आणि रिकामी पाटी घेऊन निघून जावे; पण चैनसिंह काही पावलांवरच थांबून म्हणाला—भिऊ नकोस, भिऊ नकोस. देव जाणतो, मी तुला काही बोलणार नाही. हवं तेवढं गवत खुरपून घे, माझंच शेत आहे. मुलियाचे हात बधिर झाले, खुरपे हातात जणू गोठून गेले. गवत दिसेनासेच झाले. वाटत होते, धरणी दुभंगावी आणि मी तिच्यात सामावून जावे. जमीन डोळ्यांसमोर तरंगू लागली. चैनसिंहने धीर दिला—खुरपत का नाहीस? मी तुला काही थोडाच बोलतोय? रोज इथेच येत जा, मी खुरपून देत जाईन. मुलिया चित्रासारखी स्तब्ध बसून राहिली. चैनसिंहने आणखी एक पाऊल पुढे टाकले आणि म्हणाला—तू मला एवढी का भितेस? तुला वाटतं, मी आजही तुला छळायला आलोय? देव जाणतो, कालसुद्धा तुला छळावं म्हणून मी तुझा हात धरला नव्हता. तुला पाहून आपोआपच हात पुढे झाले. मला काही शुद्धच राहिली नाही. तू निघून गेलीस, तेव्हा मी तिथेच बसून कितीतरी तास रडत राहिलो. वाटत होतं, हात तोडून टाकावा. कधी वाटे, विष खावं. तेव्हापासून तुला शोधतोय. आज तू या वाटेने आलीस. मी सारं रान पालथं घालत इथवर आलोय. आता तुझ्या मनाला येईल ती शिक्षा दे. तू माझं मुंडकं जरी छाटलंस, तरी मी मान हलवणार नाही. मी छचोर होतो, लुच्चा होतो; पण तुला पाहिल्यापासून माझ्या मनातली सारी खोट नाहीशी झाली आहे. आता तर एवढंच वाटतं, की मी तुझा कुत्रा असतो आणि तुझ्या मागोमाग फिरलो असतो; तुझा घोडा असतो, तर तू आपल्या हातांनी माझ्यापुढे गवत टाकलं असतंस. कसंही करून हा देह तुझ्या कामी यावा, हीच माझ्या मनाची सर्वांत मोठी आस आहे. कुठल्या खोट्या हेतूने मी हे बोलत असेन, तर माझं तारुण्य मातीमोल होवो. मोठा भाग्यवान आहे महावीर, त्याला अशी देवी मिळाली.
गवतवाली
मुलिया गुपचूप ऐकत राहिली; मग मान खाली घालून भाबडेपणाने म्हणाली—मग तुम्ही मला काय करायला सांगता? चैनसिंह आणखी जवळ येऊन म्हणाला—बस, तुझी दया हवी आहे. मुलियाने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तिची लाज कुठे पळाली, कुणास ठाऊक. बोचऱ्या शब्दांत ती म्हणाली—तुम्हाला एक गोष्ट बोलू, वाईट तर नाही वाटणार? तुमचं लग्न झालंय की नाही? चैनसिंह खालच्या आवाजात म्हणाला—लग्न तर झालंय; पण ते लग्न कसलं, नुसता पोरखेळ आहे. मुलियाच्या ओठांवर तुच्छतेचे हसू उमटले. ती म्हणाली—तरीसुद्धा माझा नवरा तुमच्या बायकोशी असाच बोलला असता, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? तुम्ही त्याची मान छाटायला तयार झाला असतात की नाही? बोला! महावीर चांभार आहे, म्हणून त्याच्या अंगात रक्त नाही, त्याला लाज नाही, आपल्या इभ्रतीची चाड नाही, असं वाटतं का तुम्हाला? माझं रूपरंग तुम्हाला आवडतं. घाटाच्या काठी माझ्याहून कितीतरी सुंदर बायका फिरत नसतात का? मी त्यांच्या तळव्यांचीसुद्धा बरोबरी करू शकत नाही. तुम्ही त्यांच्यापैकी कुणाकडे का नाही दया मागत? त्यांच्यापाशी दया नाही का? पण तिथे तुम्ही जाणार नाही, कारण तिथे जायला तुमच्या छातीत धडकी भरते. माझ्याकडे दया मागता, ते याचसाठी ना, की मी चांभारीण आहे, नीच जातीची आहे, आणि नीच जातीची बाई जराशा दरडावणीने-धमकीने किंवा जराशा आमिषाने तुमच्या मुठीत येईल. किती स्वस्त सौदा! ठाकूर आहात ना, असला स्वस्त सौदा कशाला सोडाल? चैनसिंह शरमून म्हणाला—मूला, तसं नाही. मी खरं सांगतो, यात उच्च-नीचाचा प्रश्नच नाही. सगळी माणसं सारखी आहेत. मी तर तुझ्या पायांवर डोकं ठेवायला तयार आहे.
गवतवाली
मुलिया—याचसाठी ना, की मी काही करू शकत नाही हे तुम्ही जाणता. जा, एखाद्या खत्रिणीच्या पायांवर डोकं ठेवा, म्हणजे कळेल पायांवर डोकं ठेवण्याचं काय फळ मिळतं ते! मग हे डोकं तुमच्या मानेवर राहणार नाही. चैनसिंह शरमेने अगदी मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. त्याचा चेहरा असा सुकून गेला होता, जणू तो महिनोन्महिन्यांच्या आजारातून उठला असावा. तोंडातून शब्द फुटत नव्हता. मुलिया एवढं फर्डं बोलू शकेल, याची त्याला कल्पनाही नव्हती. मुलिया पुढे म्हणाली—मीही रोज बाजारात जाते. मोठमोठ्या घरांची हकीगत मला ठाऊक आहे. मला असं एखादं मोठं घर दाखवा, ज्यात कुणी मोतद्दार, कुणी कोचवान, कुणी कहार, कुणी पंडा, कुणी महाराज घुसून बसलेला नाही? ही सगळी मोठ्या घरांची लीला आहे. आणि त्या बायका जे काही करतात, ते बरोबरच करतात. त्यांच्या घरचे पुरुषसुद्धा चांभारणी-कहारणींवर जीव टाकत फिरतातच की. देणं-घेणं बरोबर होऊन जातं. बिचाऱ्या गरीब माणसांच्या नशिबी या गोष्टी कुठल्या! माझ्या नवऱ्यासाठी या जगात जे काही आहे, ते मीच आहे. तो दुसऱ्या कुठल्या बाईकडे डोळा वर करूनसुद्धा पाहत नाही. मी जरा सुंदर आहे, हा योगायोग; पण मी काळीकभिन्न असते, तरी त्याने मला अशीच सांभाळली असती. याचा मला विश्वास आहे. मी चांभारीण असले, तरी विश्वासाची परतफेड दगाबाजीने करण्याइतकी नीच नाही. हां, तो आपल्या मनासारखं वागू लागला, माझ्या छातीवर मूग दळू लागला, तर मीही त्याच्या छातीवर मूग दळीन. तुम्ही माझ्या रूपाचेच दिवाने आहात ना? आज मला देवी आली, मी काणी झाले, तर माझ्याकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाही. बोला, खोटं बोलतेय का मी?
गवतवाली
चैनसिंहला नाही म्हणता आले नाही. मुलिया त्याच अभिमानाने भरलेल्या स्वरात म्हणाली—पण माझा एक नाही, दोन्ही डोळे फुटले, तरी तो मला अशीच सांभाळेल. मला उठवेल, बसवेल, भरवेल. अशा माणसाशी मी दगा करावा, असं तुम्हाला वाटतं? जा, आता पुन्हा कधी माझी छेड काढू नका, नाहीतर बरं होणार नाही! (३) तारुण्य म्हणजे जोश, बळ, दया, साहस, आत्मविश्वास, गौरव, आणि जे जे आयुष्य पवित्र, उज्ज्वल आणि परिपूर्ण करते ते सारे काही. तारुण्याची नशा म्हणजे घमेंड, निर्दयपणा, स्वार्थ, बढाई, विषयवासना, कडवटपणा, आणि जे जे आयुष्याला पशुता, विकार आणि अधःपतनाकडे नेते ते सारे काही. चैनसिंहला तारुण्याची नशा चढली होती. मुलियाच्या थंडगार शिंतोड्यांनी ती नशा उतरवली—जसे उकळत्या पाकात पाण्याचे शिंतोडे पडताच फेस विरून जातो, मळी बाहेर पडते आणि निर्मळ, शुद्ध रस उरतो. तारुण्याची नशा उतरली, केवळ तारुण्य उरले. रमणीचे शब्द जितक्या सहजतेने धर्म आणि इमान धुळीला मिळवतात, तितक्याच सहजतेने त्यांचा उद्धारही करू शकतात. चैनसिंह त्या दिवसापासून अगदी निराळाच माणूस झाला. राग त्याच्या नाकावर असे; उठसूट मजुरांना शिव्या देणे, दटावणे आणि मारणे ही त्याची सवय होती. कुळे त्याच्यापुढे थरथर कापत. मजूर त्याला येताना पाहून कामाला चटपटीने लागत; पण त्याने इकडे पाठ फिरवली रे फिरवली, की त्यांची चिलीम सुरू होई. सगळे मनातून त्याच्यावर जळत, त्याला शिव्या घालत; पण त्या दिवसापासून चैनसिंह इतका दयाळू, इतका गंभीर, इतका सहनशील झाला, की लोकांना नवल वाटू लागले.
गवतवाली
काही दिवस लोटले होते. एके दिवशी संध्याकाळी चैनसिंह शेत पाहायला गेला. मोट चालू होती. त्याने पाहिले, एका ठिकाणी पाट फुटला आहे आणि सारे पाणी वाहून चालले आहे. वाफ्यांत पाणी अजिबात पोचत नाही; पण वाफ्यांना पाणी देणारी म्हातारी गुपचूप बसली आहे. पाणी का येत नाही, याची तिला जराही फिकीर नाही. पूर्वी ही अवस्था पाहून चैनसिंहचा पारा चढला असता. त्याने त्या बाईची त्या दिवसाची सगळी मजुरी कापली असती आणि मोटकऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले असते; पण आज त्याला राग आला नाही. त्याने माती घेऊन पाट बांधला आणि शेतात जाऊन म्हातारीला म्हणाला—तू इथे बसली आहेस आणि सगळं पाणी वाहून चाललंय. म्हातारी घाबरून म्हणाली—आत्ताच फुटला असेल, राजा! मी आत्ता जाऊन बंद करते. असे म्हणता म्हणता ती थरथर कापू लागली. चैनसिंहने तिला धीर देत म्हटले—पळू नकोस, पळू नकोस, मी पाट बांधलाय. म्हातारबा बरेच दिवस दिसले नाहीत. कुठे कामाला जातात की नाही? म्हातारी गहिवरून म्हणाली—हल्ली तर रिकामेच बसलेत, भैया. कुठे कामच मिळत नाही. चैनसिंह नम्रपणे म्हणाला—मग आमच्याकडे लावून दे. थोडा ताग पडलाय, तो कातून देतील. असे म्हणत तो विहिरीकडे गेला. इथे चार मोटा चालत होत्या, पण या वेळी दोन हाकणारे बोरे खायला गेले होते. चैनसिंहला पाहताच मजुरांची पाचावर धारण बसली. ठाकुराने विचारले, दोघे कुठे गेले, तर काय उत्तर द्यायचे? सगळ्यांनाच बोलणी खावी लागतील. बिचारे मनातल्या मनात धास्तावत होते. चैनसिंहने विचारले—ते दोघे कुठे गेले?
गवतवाली
कुणाच्याच तोंडून आवाज फुटला नाही. इतक्यात समोरून ते दोघे मजूर धोतराच्या एका टोकात बोरे भरून येताना दिसले. मजेत गप्पा मारत येत होते. चैनसिंहवर नजर पडली, तशी दोघांचीही गाळण उडाली. पाय मणामणाचे झाले. आता ना पुढे येववे, ना मागे जाववे. दोघांनी ओळखले, आज बोलणी बसणार, कदाचित मजुरीही कापली जाईल. चाल मंदावली. इतक्यात चैनसिंहने हाक मारली—या, या पुढे, कशी आहेत बोरं? आणा, जरा मलाही द्या. माझ्याच झाडाची आहेत ना? दोघे आणखीच धास्तावले. आज ठाकूर जिवंत सोडत नाही. कसा गोड गोड बोलतोय! जितका गोड बोलतोय, तितकाच सोलून काढेल. बिचारे आणखीच आक्रसले. चैनसिंह पुन्हा म्हणाला—लवकर या हो, पिकलेली सगळी मी घेईन. जरा एकजण धावत जाऊन घरून थोडं मीठ तर आणा. (उरलेल्या दोन मजुरांना) तुम्हीही दोघे या, त्या झाडाची बोरं गोड असतात. बोरं खाऊन घेऊ, काम तर करायचंच आहे. आता त्या दोघा पळपुट्यांना जरा धीर आला. सगळ्यांनी येऊन सारी बोरे चैनसिंहपुढे ओतली आणि एकेक निवडून त्याला देऊ लागले. एकजण मीठ आणायला धावला. अर्धा तास चारही मोटा बंद राहिल्या. सगळी बोरे फस्त झाली आणि ठाकूर निघू लागले, तेव्हा त्या दोघा अपराध्यांनी हात जोडून म्हटले—भैयाजी, आज जीवदान द्या. खूप भूक लागली होती, नाहीतर कधी गेलो नसतो. चैनसिंह नम्रपणे म्हणाला—मग त्यात वाईट काय झालं? मीही तर बोरं खाल्ली. एखाद्या तासाचं नुकसान झालं, एवढंच ना? तुम्ही मनात आणलं, तर तासाभराचं काम अर्ध्या तासात कराल. मनात आणलं नाही, तर दिवसभरात तासाभराचंसुद्धा काम होणार नाही. चैनसिंह निघून गेल्यावर चौघे आपसांत बोलू लागले— एक म्हणाला—मालक असा असला, तर काम करायला जीव लागतो. नाहीतर चोवीस तास उरावर बसलेला!
गवतवाली
दुसरा—मला तर वाटलं, आज कच्चेच खाऊन टाकणार. तिसरा—बरेच दिवस पाहतोय, स्वभाव फार नरम झालाय. चौथा—संध्याकाळी पुरी मजुरी मिळाली, तर मग सांग! पहिला—तू म्हणजे निव्वळ शेणाचा गोळा. माणसाचा रोख ओळखत नाहीस. दुसरा—आता खूप मन लावून काम करू. तिसरा—मग काय! त्यांनी आपल्यावर सोपवलं, तर आपलाही धर्म आहे, की काही कसूर ठेवू नये. चौथा—मला तर भैया, अजूनही ठाकुरावर विश्वास बसत नाही. (४) एके दिवशी चैनसिंहला कुठल्याशा कामासाठी कचेरीत जायचे होते. पाच मैलांचा प्रवास होता. एरवी तो नेहमी आपल्या घोड्यावरूनच जात असे; पण आज ऊन फार कडक होते. त्याने विचार केला, इक्क्यानेच जावे. महावीरला निरोप धाडला, मला घेऊन जा. नऊच्या सुमारास महावीरने हाक मारली. चैनसिंह तयारच बसला होता. चटकन इक्क्यात बसला; पण घोडा इतका रोडावला होता, इक्क्याची गादी इतकी मळकी आणि फाटकी, सारा सरंजाम इतका टाकाऊ, की चैनसिंहला त्यावर बसायची लाज वाटली. त्याने विचारले—हा सगळा सरंजाम असा का बिघडलाय, महावीर? तुमचा घोडा तर इतका रोड कधीच नव्हता. हल्ली सवाऱ्या कमी आहेत की काय? महावीर म्हणाला—नाही मालक, सवाऱ्या का नाहीत? पण लॉऱ्यांपुढे इक्क्याला विचारतो कोण? कुठे दोन, अडीच, तीन रुपयांची मजुरी करून घरी परतायचो, आणि कुठे आता वीस आणेसुद्धा मिळत नाहीत. जनावराला काय घालू, आणि स्वतः काय खाऊ? मोठ्या संकटात सापडलोय. वाटतं, इक्का-घोडा विकून-बिकून तुम्हा लोकांकडे मजुरी करावी; पण कोणी गिऱ्हाईकच मिळत नाही. जास्त नाही, तरी बारा आणे तर घोड्यालाच लागतात, गवत वेगळं. जिथे आपलंच पोट भरत नाही, तिथे जनावराला कोण विचारतो! चैनसिंहने त्याच्या फाटक्या कुडत्याकडे पाहून म्हटले—दोन-चार बिघ्यांची शेती का नाही करत तुम्ही?
गवतवाली
महावीर मान खाली घालून म्हणाला—शेतीला मोठी ताकद लागते, मालक! मी तर हेच ठरवलंय, की कोणी गिऱ्हाईक मिळालं, तर इक्का मिळेल त्या किमतीला काढून टाकावा, आणि मग गवत खुरपून बाजारात न्यावं. हल्ली सासू-सून दोघी गवत खुरपतात. तेव्हा कुठे दहा-बारा आणे पैसे पदरी पडतात. चैनसिंहने विचारले—मग म्हातारी बाजारात जात असेल? महावीर संकोचून म्हणाला—नाही भैया, ती एवढ्या लांब कुठली चालणार! घरची जाते. दुपारपर्यंत गवत खुरपते, तिसऱ्या प्रहरी बाजारात जाते. तिथून घटकाभर रात्र झाल्यावर परतते. जीव अगदी मेटाकुटीला येतो भैया, पण करणार काय, नशिबापुढे काय चालणार! चैनसिंह कचेरीत पोचले, आणि महावीर सवाऱ्यांच्या शोधात इकडे-तिकडे इक्का फिरवीत शहराकडे निघून गेला. चैनसिंहने त्याला पाच वाजता यायला सांगितले होते. चार वाजत आले असताना चैनसिंह कचेरीतून मोकळे होऊन बाहेर पडले. आवारात पानाचे दुकान होते, आणखी थोडे पुढे एक दाट वडाचे झाड होते. त्याच्या सावलीत डझनावारी टांगे, इक्के, फिटनगाड्या उभ्या होत्या. घोडे सोडलेले होते. वकील, मुख्त्यार आणि अधिकारी यांच्या गाड्या इथेच उभ्या राहत. चैनसिंहने पाणी प्यायले, पान खाल्ले आणि विचार करू लागला, एखादी लॉरी मिळाली तर जरा शहरात जावे, तोच त्याची नजर एका गवतवालीवर पडली. डोक्यावर गवताची पाटी घेऊन ती मोतद्दारांशी घासाघीस करीत होती. चैनसिंहचे काळीज उडाले—ही तर मुलिया! नटूनथटून, गुलाबी साडी नेसून ती कोचवानांशी भाव करीत होती. कित्येक कोचवान जमा झाले होते. कोणी तिची थट्टा करीत होता, कोणी डोळे फाडून पाहत होता, कोणी हसत होता. एक काळाकभिन्न कोचवान म्हणाला—मूला, गवत तर फार तर सहा आण्यांचं आहे.
गवतवाली
मुलियाने वेड लावणाऱ्या डोळ्यांनी पाहत म्हटले—सहा आण्यांत घ्यायचं असेल, तर त्या समोर गवत विकणाऱ्या बाया बसल्यात, तिकडे जा, दोन-चार पैसे कमीत मिळेल. माझं गवत तर बारा आण्यांनाच जाईल! एक मध्यमवयीन कोचवान फिटनवरून म्हणाला—तुझा जमाना आहे, बारा आणे नको, एक रुपया माग! घेणारे झक मारत घेतील. वकिलांना बाहेर तर पडू दे. आता उशीर नाही. गुलाबी फेटा बांधलेला एक टांगेवाला म्हणाला—म्हाताऱ्याच्याही तोंडाला पाणी सुटलं! आता मुलिया, तो कशाला कुणाकडे बघेल! चैनसिंहला असा राग येत होता, की या दुष्टांना जोड्याने बडवावे. सगळेच्या सगळे कसे तिच्याकडे टक लावून पाहत आहेत, जणू डोळ्यांनीच पिऊन टाकतील. आणि मुलियाही इथे किती खूश आहे! ना लाजते, ना कचरते, ना दबते. कशी हसून हसून, रसिल्या डोळ्यांनी पाहून पाहून, डोक्यावरचा पदर सरकवून सरकवून, मान वळवून वळवून बोलते आहे! तीच ही मुलिया, जी वाघिणीसारखी उसळून उठली होती. इतक्यात चार वाजले. कचेरीतले कारकून आणि वकील-मुख्त्यार यांचा जणू एक मेळाच बाहेर पडला. कारकून लॉऱ्यांकडे धावले, वकील-मुख्त्यार या गाड्यांकडे निघाले. कोचवानांनीही चटकन घोडे जुंपले. कित्येक महाशयांनी मुलियाकडे रसिक नजरेने पाहिले आणि आपापल्या गाड्यांत जाऊन बसले. अचानक मुलिया गवताची पाटी घेऊन त्या फिटनमागे धावली. फिटनमध्ये इंग्रजी फॅशनचे एक तरुण वकीलसाहेब बसले होते. त्यांनी पायदानाजवळ गवत ठेवून घेतले आणि खिशातून काहीतरी काढून मुलियाला दिले. मुलिया हसली. दोघांत काही बोलणेही झाले, ते चैनसिंहला ऐकू आले नाही. क्षणभरात मुलिया प्रसन्न मुद्रेने घराकडे निघाली. चैनसिंह पानवाल्याच्या दुकानापाशी भान हरपल्यासारखा उभा राहिला. पानवाल्याने दुकान आवरले, कपडे घातले आणि आपल्या केबिनचे दार बंद करून तो खाली उतरला, तेव्हा कुठे चैनसिंहची समाधी भंगली. त्याने विचारले—दुकान बंद केलं?
गवतवाली
पानवाल्याने सहानुभूती दाखवत म्हटले—याचं औषध करा, ठाकूरसाहेब. हा आजार चांगला नाही. चैनसिंहने चकित होऊन विचारले—कसला आजार? पानवाला म्हणाला—कसला आजार! अर्ध्या तासापासून इथे असे उभे आहात, जणू मढंच उभं आहे. सारी कचेरी रिकामी झाली, सगळी दुकानं बंद झाली, मेहतरसुद्धा झाडू मारून निघून गेले, तुम्हाला काही पत्ता लागला? हा वाईट आजार आहे, लवकर औषध करून टाका. चैनसिंहने छडी सावरली आणि फाटकाकडे निघाला, तोच समोरून महावीरचा इक्का येताना दिसला. (५) इक्का थोडा दूर गेल्यावर चैनसिंहने विचारले—आज किती पैसे कमावले, महावीर? महावीर हसून म्हणाला—आज तर मालक, दिवसभर नुसता उभाच राहिलो. कुणी वेठबिगारीलासुद्धा धरलं नाही. वर चार पैशांच्या विड्या फुंकून बसलो. चैनसिंह थोडा वेळ थांबून म्हणाला—माझा एक सल्ला आहे. तुम्ही माझ्याकडून रोज एक रुपया घेत जा. बस, मी बोलावीन तेव्हा इक्का घेऊन येत जा. मग तुमच्या बायकोला गवत घेऊन बाजारात यावं लागणार नाही. बोला, कबूल? महावीरने पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत म्हटले—मालक, तुमचंच तर खातो. तुमची प्रजा आहे मी. केव्हाही मर्जी होईल, तेव्हा धरून आणायला सांगा. तुमच्याकडून रुपये... चैनसिंहने त्याचे बोलणे तोडत म्हटले—नाही, मला तुमच्याकडून वेठ करून घ्यायची नाही. तुम्ही माझ्याकडून रोज एक रुपया नेत जा. बायकोला गवत घेऊन बाजारात पाठवत जाऊ नका. तुमची अब्रू ती माझी अब्रू. आणि केव्हाही पैशाअडक्याचं काम पडलं, तर बिनधास्त येत जा. हां, पण बघा, मुलियाजवळ याची चुकूनसुद्धा वाच्यता करू नका. काय फायदा!
गवतवाली
कित्येक दिवसांनी एके संध्याकाळी मुलिया चैनसिंहला भेटली. चैनसिंह कुळांकडून सारा वसूल करून झपाझप घराकडे चालला होता, तोच जिथे त्याने मुलियाचा हात धरला होता, त्याच ठिकाणी मुलियाचा आवाज त्याच्या कानी आला. त्याने थबकून मागे पाहिले, तो मुलिया धावत येत होती. तो म्हणाला—काय आहे, मूला? धावतेस कशाला, मी उभाच आहे ना? मुलिया धापा टाकत म्हणाली—कित्येक दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं. आज तुम्हाला येताना पाहिलं, म्हणून धावले. आता मी गवत विकायला जात नाही. चैनसिंह म्हणाला—फार चांगलं झालं. 'तुम्ही मला कधी गवत विकताना पाहिलंत?' 'हो, एकदा पाहिलं होतं. महावीरने तुला सगळं सांगून टाकलं का? मी तर मना केलं होतं.' 'तो माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवत नाही.' दोघे क्षणभर गप्प उभे राहिले. कुणालाच काही बोलायला सुचत नव्हते. अचानक मुलिया हसून म्हणाली—इथेच तुम्ही माझा हात धरला होता. चैनसिंह शरमून म्हणाला—ते विसरून जा, मूला! माझ्या अंगात कुठलं भूत संचारलं होतं, कोण जाणे. मुलिया गहिवरल्या कंठाने म्हणाली—ते का विसरू? त्याच हात धरल्याची लाज तर राखताय! गरिबी माणसाला काय करायला लावील, सांगता येत नाही. तुम्ही मला वाचवलंत! मग दोघे गप्प झाले. थोड्या वेळाने मुलिया पुन्हा म्हणाली—तुम्हाला वाटलं असेल, मी हसण्या-बोलण्यात गुंग झाले होते? चैनसिंह ठामपणे म्हणाला—नाही मुलिया, मला एक क्षणभरसुद्धा तसं वाटलं नाही. मुलिया हसून म्हणाली—मला तुमच्याकडून हीच आशा होती, आणि आहे. वारा भिजलेल्या शेतांत विसावा घ्यायला चालला होता, सूर्य रात्रीच्या कुशीत विसावा घ्यायला चालला होता, आणि त्या मलूल प्रकाशात चैनसिंह उभा राहून मुलियाची विरत जाणारी आकृती पाहत होता.