मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
ईदगाह
रमजानचे पुरे तीस रोजे संपले आणि आज ईद उजाडली आहे. किती रम्य, किती प्रसन्न पहाट आहे ही! झाडांवर काही आगळीच हिरवाई आहे, शेतांत काही आगळीच टवटवी, आभाळात काही आगळीच लाली. आजचा सूर्य तर पाहा, किती गोजिरा, किती शीतल! जणू साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देतो आहे. गावात केवढी लगबग उडाली आहे! ईदगाहला जायची तयारी चालली आहे. कुणाच्या कुडत्याला गुंडी नाही; तो शेजारच्या घरी सुई-दोरा आणायला धावतो आहे. कुणाचे जोडे कडक झाले आहेत; त्यांना तेल लावायला तो तेल्याच्या घराकडे पळतो आहे. चला, बैलांचे वैरण-पाणी पटापट उरकून घेऊ. ईदगाहवरून परतेपर्यंत दुपार होईल. तीन कोसांची पायपीट, त्यात शेकडो माणसांच्या गाठीभेटी; दुपारच्या आधी परतणे अशक्यच. सगळ्यांत जास्त खूश आहेत ती पोरे. कुणी एक रोजा धरला आहे, तोही दुपारपर्यंतच; कुणी तेवढाही नाही. पण ईदगाहला जाण्याचा आनंद मात्र त्यांच्या वाट्याचा आहे. रोजे असतील मोठ्या-म्हाताऱ्यांसाठी; यांच्यासाठी आहे ती ईद. रोज ईदच्या नावाचा जप चालायचा; आज ती आली. आता यांना घाई झाली आहे, की मंडळी ईदगाहला निघत का नाहीत? घरसंसाराच्या काळज्यांशी यांना काय करायचे आहे! शेवयांसाठी घरात दूध-साखर आहे की नाही, याची यांना काय फिकीर? यांना शेवया खायला मिळाल्या की झाले. अब्बाजान एवढे भांबावून चौधरी कायमअलींच्या घराकडे का धावत सुटले आहेत, हे त्यांना काय ठाऊक! चौधरींनी आज डोळे फिरवले तर ही सारी ईद मोहरम होऊन जाईल, याची त्यांना काय खबर! त्यांच्या स्वतःच्या खिशांत तर कुबेराचे धन भरलेले आहे. घडीघडी खिशातून आपला खजिना काढून मोजतात आणि खूश होऊन पुन्हा ठेवून देतात. महमूद मोजतो, एक-दोन, दहा-बारा! त्याच्याजवळ बारा पैसे आहेत. मोहसिनजवळ एक, दोन, तीन, आठ, नऊ, पंधरा पैसे आहेत. या अगणित पैशांत ते अगणित वस्तू आणणार आहेत: खेळणी, मिठाई, बिगूल, चेंडू आणि आणखी काय काय, कोण जाणे.
ईदगाह
आणि सगळ्यांत जास्त खूश आहे हामिद. चार-पाच वर्षांचा, गरीब चेहऱ्याचा, किडकिडीत पोरगा तो. त्याचा बाप गेल्या वर्षी पटकीला बळी पडला, आणि आई कोण जाणे कशाने पिवळी पडत पडत एक दिवस मरून गेली. काय दुखणे होते, कुणालाच कळले नाही. सांगितले असते तरी ऐकणारे कोण होते? मनावर जे काही गुदरत होते ते ती मनातल्या मनात सोसत राहिली, आणि सोसवेनासे झाले तेव्हा जगाचा निरोप घेऊन गेली. आता हामिद आपल्या म्हाताऱ्या दादीच्या, अमीनाच्या, कुशीत झोपतो आणि तितकाच आनंदात आहे. त्याचे अब्बाजान रुपये कमवायला गेले आहेत; पुष्कळशा थैल्या घेऊन येणार आहेत. अम्मीजान अल्लामियाँच्या घरून त्याच्यासाठी फार फार छान वस्तू आणायला गेली आहे. म्हणून हामिद खूश आहे. आशा ही मोठी चीज आहे, आणि त्यात मुलांची आशा! त्यांची कल्पना तर राईचा पर्वत करते. हामिदच्या पायांत जोडे नाहीत; डोक्यावर एक जुनीपुराणी टोपी आहे, तिचा जरीचा गोट काळा पडला आहे; तरीही तो खूश आहे. त्याचे अब्बाजान थैल्या आणि अम्मीजान अल्लाघरच्या नियामती घेऊन येतील, तेव्हा तो मनातल्या साऱ्या हौशी पुरवून घेईल. मग पाहील, महमूद, मोहसिन, नूरे आणि सम्मी तेवढे पैसे कुठून काढतात ते! अभागी अमीना आपल्या खोलीत बसून रडते आहे. आज ईदचा दिवस आणि तिच्या घरात दाणा नाही! आज आबिद असता तर ईद अशीच आली असती आणि निघून गेली असती का? या अंधारात आणि निराशेत ती बुडत चालली आहे. कुणी बोलावले होते या मेल्या ईदला! या घरात तिचे काही काम नाही. पण हामिद! कुणाच्या मरण्याजगण्याशी त्याला काय करायचे आहे? त्याच्या आत प्रकाश आहे, बाहेर आशा. संकटाला आपली सारी फौज घेऊन येऊ दे; हामिदची आनंदाने भरलेली नजर त्याची दाणादाण उडवील. हामिद आत जाऊन दादीला म्हणतो—तू भिऊ नकोस अम्मा, मी सगळ्यांच्या आधी परत येईन. अजिबात भिऊ नकोस.
ईदगाह
अमीनाचे काळीज तुटते आहे. गावातली मुले आपापल्या बापांबरोबर निघाली आहेत. हामिदला अमीनाशिवाय दुसरा बाप कोण आहे! त्याला एकट्याला जत्रेला कसे जाऊ द्यायचे? त्या गर्दीत पोर कुठे हरवले तर काय करायचे? नाही, अमीना त्याला असे जाऊ देणार नाही. एवढासा जीव! तीन कोस चालणार तरी कसा? पायांना फोड येतील. जोडेही नाहीत. ती थोड्या थोड्या अंतरावर त्याला कडेवर घेईल; पण मग इथे शेवया कोण शिजवणार? पैसे असते तर परतता परतता सारे सामान गोळा करून झटपट शेवया करून टाकल्या असत्या. इथे तर जिन्नस जमवायलाच तासन् तास लागणार. मागून आणण्यावरच तर सारी मदार. त्या दिवशी फहीमनचे कपडे शिवून दिले होते. त्याचे आठ आणे मिळाले होते. ती अधेली तिने याच ईदसाठी इमानासारखी जपून ठेवली होती; पण काल गवळण उरावर येऊन बसली, तेव्हा काय करणार! हामिदसाठी दुसरे काही नसले तरी दोन पैशांचे दूध तर हवेच. आता सारे मिळून दोन आणे उरले आहेत. तीन पैसे हामिदच्या खिशात, पाच अमीनाच्या बटव्यात. एवढीच काय ती पुंजी, आणि ईदचा सण! आता अल्लाच नाव पैलतीराला लावो. धोबीण, न्हावीण, भंगीण आणि कासारीण, साऱ्याच येणार. प्रत्येकीला शेवया हव्यात, आणि थोडे कुणाच्याच डोळ्यांत भरत नाही. कुणाकुणापासून तोंड लपवणार? आणि तोंड तरी का लपवायचे? वर्षाचा सण आहे. जीव सुखरूप राहो; त्यांचेही नशीब तर तिच्याच नशिबाला बांधलेले आहे. पोराला खुदा सलामत ठेवो, हेही दिवस निघून जातील.
ईदगाह
गावातून जत्रेची मंडळी निघाली. इतर मुलांबरोबर हामिदही चालला होता. कधी सगळीच्या सगळी पळत पुढे निघून जात; मग एखाद्या झाडाखाली उभी राहून मागच्यांची वाट पाहत. ही माणसे इतकी हळूहळू का चालताहेत! हामिदच्या पायांना तर जणू पंख फुटले आहेत. तो कधी थकेल होय! शहराची शीव आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना श्रीमंतांचे बगीचे आहेत. भोवती पक्क्या भिंती घातलेल्या आहेत. झाडांना आंबे आणि लिची लगडल्या आहेत. मधूनच एखादा पोरगा खडा उचलून आंब्यावर नेम धरतो. माळी आतून शिव्या देत बाहेर येतो. पोरे तोवर तिथून फर्लांगभर दूर पोहोचली आहेत. पोट धरून हसताहेत. माळ्याला कसे बनवले! मोठमोठ्या इमारती येऊ लागल्या. ही अदालत, हे कॉलेज, हे क्लबघर! एवढ्या मोठ्या कॉलेजात किती मुले शिकत असतील! सगळी मुले नाहीत काही. मोठमोठी माणसे आहेत, खरेच. त्यांना एवढ्या मोठ्या मिशा आहेत. एवढे मोठे झाले तरी अजून शिकायला जातात. कोण जाणे कधीपर्यंत शिकणार, आणि एवढे शिकून करणार तरी काय! हामिदच्या मदरशात दोन-तीन थोराड मुले आहेत, अगदी कवडीमोलाची; रोज मार खातात, कामचुकार नुसती. इथेही तसलीच माणसे असणार, दुसरे काय! क्लबघरात जादू होते. म्हणतात, इथे मढ्यांच्या कवट्या धावतात. आणखीही मोठमोठे खेळ होतात, पण आत कुणालाच जाऊ देत नाहीत. आणि इथे संध्याकाळी साहेब लोक खेळतात. मोठमोठी माणसे खेळतात, दाढीमिशावाली; आणि मडमासुद्धा खेळतात, खरेच. आमच्या अम्माच्या हातात ते द्या, काय बरे त्याचे नाव, बॅट, तर तिला ती धरताच यायची नाही. फिरवायला गेली की कोलमडूनच पडायची. महमूद म्हणाला—आमच्या अम्मीजानचे तर हातच थरथरायला लागतील, अल्लाकसम.
ईदगाह
मोहसिन म्हणाला—चल रे, मणांनी पीठ दळून टाकते ती. एवढीशी बॅट धरली तर म्हणे हात थरथरायला लागतील! रोज शेकडो घागरी पाणी काढते. पाच घागरी तर तुझी म्हैसच पिऊन टाकते. एखाद्या मडमेला एक घागर पाणी भरावे लागले, तर डोळ्यांपुढे अंधारी येईल तिच्या. महमूद—पण धावते थोडीच! उड्या तर नाही ना मारता येत. मोहसिन—हो, उड्या नाही मारता येत; पण त्या दिवशी आमची गाय सुटली होती आणि चौधरींच्या शेतात घुसली होती, तेव्हा अम्मा एवढी जोरात धावली की मला तिला गाठताच आले नाही, खरेच! पुढे निघाले. हलवायांची दुकाने लागली. आज ती खूप सजवलेली होती. एवढी मिठाई खाते तरी कोण? बघा ना, एकेका दुकानात मणांनी असेल. म्हणतात, रात्री जिन येऊन विकत घेऊन जातात. अब्बा सांगत होते, की मध्यरात्री एक माणूस प्रत्येक दुकानावर जातो आणि जेवढा माल उरला असेल तेवढा तोलून घेतो, आणि खरेखुरे रुपये देतो, अगदी असेच रुपये. हामिदचा विश्वास बसेना—असले रुपये जिनांना कुठून मिळणार? मोहसिन म्हणाला—जिनांना रुपयांची काय कमी! वाटेल त्या खजिन्यात शिरतील. लोखंडी दरवाजेसुद्धा त्यांना अडवू शकत नाहीत, जनाब; तुम्ही आहात कुठल्या भ्रमात! हिरेमाणकेसुद्धा असतात त्यांच्याजवळ. ज्याच्यावर खूश झाले त्याला टोपल्या भरभरून जवाहीर देऊन टाकतात. आत्ता इथे बसले आहेत, तर पाच मिनिटांत कलकत्त्याला पोहोचतील. हामिदने पुन्हा विचारले—जिन खूप मोठेमोठे असत असतील? मोहसिन—एकेक आभाळाएवढा असतो रे. जमिनीवर उभा राहिला तर डोके आभाळाला टेकेल; पण मनात आणले तर एका लोट्यात शिरून बसेल. हामिद—लोक त्यांना खूश कसे करत असतील? कुणी मला तो मंत्र सांगितला, तर मी एका जिनाला खूश करून घेईन.
ईदगाह
मोहसिन—आता ते काही मला ठाऊक नाही; पण चौधरीसाहेबांच्या ताब्यात पुष्कळ जिन आहेत. कुठलीही वस्तू चोरीला गेली, की चौधरीसाहेब तिचा पत्ता लावून देतात आणि चोराचे नावही सांगतात. जुमरातीचे वासरू त्या दिवशी हरवले होते. तीन दिवस वणवण केली, कुठेच सापडेना. शेवटी झक मारत चौधरींकडे गेले. चौधरींनी लगेच सांगून टाकले, कोंडवाड्यात आहे; आणि तिथेच सापडले. जिन येऊन त्यांना साऱ्या दुनियेच्या खबरा देऊन जातात. चौधरींजवळ एवढे धन का आहे आणि त्यांना एवढा मान का आहे, हे आता त्याच्या ध्यानात आले. पुढे निघाले. ही पोलीस लाइन. इथेच सगळे कानिस्टिबल कवायत करतात. रैटन! फाय फो! रात्री बिचारे फिरून फिरून पहारा देतात, नाहीतर चोऱ्या व्हायच्या. मोहसिनने हरकत घेतली—हे कानिस्टिबल पहारा देतात म्हणे! तुला फार कळते ना! अहो हजरत, हेच तर चोऱ्या करवतात. शहरात जेवढे चोर-दरोडेखोर आहेत, ते सगळे यांना सामील आहेत. रात्री हे लोक चोरांना सांगतात, चोरी करा; आणि स्वतः दुसऱ्या मोहल्ल्यात जाऊन 'जागते रहो! जागते रहो!' अशी आरोळी देत फिरतात. म्हणून तर यांच्याजवळ एवढे रुपये येतात. माझे मामू एका ठाण्यात कानिस्टिबल आहेत. महिन्याला वीस रुपये मिळतात, पण घरी पन्नास रुपये पाठवतात. अल्लाकसम. मी एकदा विचारले होते, मामू, तुम्हांला एवढे रुपये मिळतात कुठून? हसून म्हणाले—बेटा, अल्ला देतो. मग आपणहूनच म्हणाले—आम्ही मनात आणले तर एका दिवसात लाखो मारून आणू. पण आम्ही एवढेच घेतो, की आपली बदनामी होऊ नये आणि नोकरीही जाऊ नये. हामिदने विचारले—हे लोक चोऱ्या करवतात, तर यांना कुणी पकडत नाही?
ईदगाह
त्याच्या अडाणीपणाची कीव करत मोहसिन म्हणाला—अरे वेड्या, यांना कोण पकडणार? पकडणारे तर हेच स्वतः. पण अल्ला यांना शिक्षाही चांगलीच देतो. हरामाचा माल हरामातच जातो. थोड्याच दिवसांपूर्वी मामूंच्या घराला आग लागली. सारी जमापुंजी जळून गेली. एक भांडेसुद्धा उरले नाही. कित्येक दिवस झाडाखाली झोपले, अल्लाकसम, झाडाखाली. मग कोण जाणे कुठून शंभर रुपये कर्ज काढून आणले, तेव्हा कुठे भांडीकुंडी आली. हामिद—शंभर म्हणजे पन्नासापेक्षा जास्त असतात ना? 'कुठे पन्नास, कुठे शंभर! पन्नास म्हणजे एक थैलीभर होतात. शंभर तर दोन थैल्यांतसुद्धा मावायचे नाहीत.' आता वस्ती दाट होऊ लागली होती. ईदगाहला निघालेल्यांचे घोळके दिसू लागले. एकाहून एक भपकेदार कपडे घातलेले. कुणी एक्क्या-टांग्यात बसलेले, कुणी मोटारीत; सारेच अत्तराने घमघमलेले, साऱ्यांच्याच मनांत उल्हास. खेडुतांचा हा छोटासा जथा आपल्या दारिद्र्याची खबरही नसल्यासारखा, समाधानात आणि सबुरीत मग्न होऊन चालला होता. मुलांना शहरातली प्रत्येक गोष्ट नवलाची होती. ज्या वस्तूकडे पाहत, तिच्याकडे पाहतच राहत. मागून वारंवार हॉर्न वाजला तरी भानावर येत नसत. हामिद तर मोटारीखाली जाता जाता वाचला. अचानक ईदगाह दिसला. वर चिंचेच्या दाट झाडांची सावली आहे. खाली पक्की फरशी आहे, तिच्यावर जाजम अंथरलेले आहे. आणि रोजेदारांच्या रांगा एकामागे एक कोण जाणे कुठवर गेल्या आहेत; पक्क्या चौथऱ्याच्या खालपर्यंत, जिथे जाजमही नाही. नवे येणारे येऊन मागच्या रांगेत उभे राहतात. पुढे जागा नाही. इथे कुणी धन आणि हुद्दा पाहत नाही. इस्लामच्या नजरेत सगळे सारखे. या खेडुतांनीही वजू केला आणि ते मागच्या रांगेत उभे राहिले. किती सुंदर संचालन, किती सुंदर व्यवस्था!
ईदगाह
लाखो मस्तके एकदम सिजद्यात झुकतात, मग सारेच्या सारे एकदम उभे राहतात, एकदम वाकतात आणि एकदम गुडघ्यांवर बसतात. अनेकदा हीच क्रिया होते; जणू विजेचे लाखो दिवे एकदम उजळावेत आणि एकदम विझावेत, आणि हाच क्रम चालू राहावा. किती अपूर्व दृश्य होते ते! त्यातल्या सामुदायिक हालचाली, त्याचा विस्तार आणि त्याची अनंतता हृदय श्रद्धेने, अभिमानाने आणि आत्मानंदाने भरून टाकत होती; जणू बंधुभावाच्या एकाच धाग्याने या साऱ्या आत्म्यांना एका माळेत ओवले होते. (२) नमाज संपली आहे. लोक एकमेकांच्या गळाभेटी घेत आहेत. मग मिठाईच्या आणि खेळण्यांच्या दुकानांवर धाड पडते. खेडुतांचा हा जथा या बाबतीत मुलांपेक्षा कमी उत्साही नाही. हा बघा, पाळणा. एक पैसा देऊन चढा. कधी आभाळात चालल्यासारखे वाटेल, कधी जमिनीवर कोसळल्यासारखे. हे चक्र; लाकडाचे हत्ती, घोडे, उंट दांड्यांना लटकवलेले आहेत. एक पैसा देऊन बसा आणि पंचवीस फेऱ्यांची मजा लुटा. महमूद, मोहसिन, नूरे आणि सम्मी या घोड्यांवर आणि उंटांवर बसतात. हामिद दूर उभा आहे. त्याच्याजवळ तीनच तर पैसे आहेत. आपल्या खजिन्याचा तिसरा हिस्सा एवढ्याशा गरगर फिरण्यासाठी तो देऊ शकत नाही. सगळे चक्रावरून उतरतात. आता खेळणी घ्यायची. इकडे दुकानांची रांग लागली आहे. तऱ्हेतऱ्हेची खेळणी आहेत: शिपाई आणि गवळण, राजा आणि वकील, भिश्ती, धोबीण आणि साधू. वा! किती सुंदर खेळणी आहेत! आता बोलतीलच असे वाटते. महमूद शिपाई घेतो; खाकी वर्दी आणि लाल पगडीवाला, खांद्यावर बंदूक घेतलेला. वाटते, आत्ताच कवायत करून येतो आहे. मोहसिनला भिश्ती आवडला. कंबर वाकलेली, पाठीवर पखाल; पखालीचे तोंड एका हाताने धरलेले. किती खुशीत आहे! बहुधा एखादे गाणे गातो आहे. बस्स, आता पखालीतून पाणी ओतणारच. नूरेचा वकिलावर जीव जडला.
ईदगाह
काय विद्वत्ता आहे त्यांच्या चेहऱ्यावर! काळा चोगा, आत पांढरी अचकन, अचकनच्या पुढच्या खिशात घड्याळ, सोनेरी साखळी, एका हातात कायद्याचे बाड. वाटते, आत्ताच एखाद्या अदालतीतून उलटतपासणी किंवा युक्तिवाद करून येत आहेत. ही सारी दोन-दोन पैशांची खेळणी. हामिदजवळ एकूण तीन पैसे; एवढी महाग खेळणी तो कशी घेणार? खेळणे हातातून निसटले तर चक्काचूर व्हायचे. जरा पाणी लागले तर सारा रंग धुऊन जायचा. असली खेळणी घेऊन तो काय करणार; काय कामाची ती! मोहसिन म्हणतो—माझा भिश्ती रोज पाणी भरून जाईल; सकाळ-संध्याकाळ. महमूद—आणि माझा शिपाई घराचा पहारा करील. कुणी चोर आला, की लगेच बंदुकीचा बार काढील. नूरे—आणि माझा वकील जोरदार खटले लढवील. सम्मी—आणि माझी धोबीण रोज कपडे धुईल. हामिद खेळण्यांची निंदा करतो—मातीचीच तर आहेत; पडली तर चक्काचूर होतील. पण तो आशाळभूत डोळ्यांनी खेळण्यांकडे पाहतो आहे, आणि थोडा वेळ तरी ती हातात घेता आली तर, असे त्याला वाटते आहे. त्याचे हात नकळत पुढे होतात; पण मुले एवढी त्यागी नसतात, विशेषतः हौस अजून नवी असताना. हामिदचा जीव नुसता तळमळत राहतो. खेळण्यांनंतर मिठाईची पाळी. कुणी रेवड्या घेतल्या आहेत, कुणी गुलाबजाम, कुणी सोहन हलवा. मजेत खाताहेत. हामिद या बिरादरीच्या बाहेर आहे. अभाग्याजवळ तीन पैसे तर आहेत. मग काही घेऊन का खात नाही? आशाळभूत डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहतो आहे. मोहसिन म्हणतो—हामिद, रेवडी घे ना, किती खमंग वास येतोय बघ! हामिदला शंका आली, ही नुसती क्रूर थट्टा आहे; मोहसिन एवढा उदार नाही. पण हे ठाऊक असूनही तो त्याच्याजवळ जातो. मोहसिन द्रोणातून एक रेवडी काढून हामिदपुढे धरतो. हामिद हात पसरतो. मोहसिन रेवडी आपल्याच तोंडात टाकतो. महमूद, नूरे आणि सम्मी टाळ्या पिटून पिटून खूप हसतात. हामिद ओशाळतो.
ईदगाह
मोहसिन—बरे, या वेळी नक्की देतो हामिद, अल्लाकसम, घे. हामिद—ठेव तुझ्याजवळच. माझ्याजवळ काय पैसे नाहीत? सम्मी—तीनच तर पैसे आहेत. तीन पैशांत काय काय घेशील? महमूद—माझ्याकडून गुलाबजाम घे हामिद. मोहसिन बदमाश आहे. हामिद—मिठाई काय एवढी मोठी नियामत लागून गेली आहे! पुस्तकात तिचे किती दोष लिहिले आहेत. मोहसिन—पण मनात तर म्हणत असशील, मिळाली तर खाऊन टाकावी. तुझे पैसे का नाही काढत? महमूद—आम्हांला कळते याची चलाखी. आमचे सगळे पैसे खर्च झाले, की हा आम्हांला दाखवून दाखवून, आमच्या तोंडाला पाणी आणत खाईल. मिठाईच्या दुकानांनंतर काही दुकाने लोखंडी वस्तूंची आहेत, काही गिलिटाच्या आणि काही खोट्या दागिन्यांची. मुलांना ओढ वाटावी असे इथे काही नव्हते. ती सगळी पुढे निघून जातात. हामिद लोखंडाच्या दुकानापाशी थांबतो. तिथे कित्येक चिमटे मांडलेले होते. त्याच्या मनात आले, दादीजवळ चिमटा नाही. तव्यावरून रोट्या उतरवताना तिचा हात भाजतो. तो चिमटा नेऊन दादीला दिला, तर तिला किती आनंद होईल! मग तिची बोटे कधीच भाजणार नाहीत. घरात एक कामाची वस्तू होईल. खेळण्यांचा काय उपयोग? पैसे फुकट जातात. घटकाभराचाच तर आनंद. मग खेळण्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. किंवा घरी पोहोचेपर्यंतच फुटून-तुटून त्यांचा चुराडा होऊन जाईल. चिमटा किती कामाची वस्तू! रोट्या तव्यावरून उतरवा, चुलीत शेका. कुणी विस्तव मागायला आले, तर झटकन चुलीतून निखारा काढून द्या. अम्माला बिचारीला बाजारात यायला फुरसत कुठे, आणि एवढे पैसे तरी कुठे मिळतात? रोज हात भाजून घेते. हामिदचे सोबती पुढे गेले आहेत. पाणपोईवर सारेच्या सारे सरबत पिताहेत. बघा, किती हावरट आहेत सगळे! एवढी मिठाई घेतली, मला कुणी एकसुद्धा दिली नाही. वर म्हणतात, माझ्याबरोबर खेळ; माझे हे काम कर.
ईदगाह
आता कुणी काही काम सांगू दे, मग विचारतो एकेकाला. खाऊ देत मिठाई; आपोआप तोंड सडेल, फोड-पुटकुळ्या उठतील, जीभ आपोआपच चटोर होईल. मग घरातून पैसे चोरतील आणि मार खातील. पुस्तकात काही खोट्या गोष्टी थोड्याच लिहिल्या आहेत! माझी जीभ कशाला बिघडेल? अम्मा चिमटा बघताच धावत येऊन माझ्या हातातून घेईल आणि म्हणेल—माझ्या बाळाने अम्मासाठी चिमटा आणला! हजारो दुवा देईल. मग शेजारच्या बायांना दाखवील. साऱ्या गावात बोलबाला होईल, हामिदने चिमटा आणला. किती चांगला मुलगा! यांच्या खेळण्यांबद्दल यांना कोण दुवा देणार? मोठ्यांच्या दुवा थेट अल्लाच्या दरबारात पोहोचतात आणि ताबडतोब कबूल होतात. माझ्याजवळ पैसे नाहीत, म्हणून तर मोहसिन आणि महमूद असा तोरा दाखवतात. मीही यांना तोरा दाखवीन. खेळू देत खेळणी आणि खाऊ देत मिठाई. मी नाही खेळत खेळणी; कुणाचा तोरा का सहन करू? मी गरीब असेन, पण कुणाकडे काही मागायला तर जात नाही ना? शेवटी अब्बाजान कधी ना कधी येतीलच. अम्मीजानही येईल. मग यांना विचारीन, किती खेळणी हवीत? एकेकाला टोपल्या भरभरून खेळणी देईन आणि दाखवून देईन, की दोस्तांशी असे वागायचे असते. असे नाही, की एका पैशाच्या रेवड्या घेतल्या तर चिडवून चिडवून खाव्यात. सारेच्या सारे खूप हसतील, की हामिदने चिमटा घेतला. हसू देत! मला काय त्याचे! त्याने दुकानदाराला विचारले—हा चिमटा केवढ्याला आहे? दुकानदाराने त्याच्याकडे पाहिले आणि बरोबर कुणी मोठे माणूस नाही हे बघून म्हणाला—तो तुझ्या कामाचा नाही रे! 'विकायचा आहे की नाही?' 'विकायचा का नाही? नाहीतर इथे कशाला वाहून आणला आहे?' 'मग सांगत का नाही, किती पैशांचा आहे?' 'सहा पैसे पडतील.' हामिदचा धीर खचला. 'नीट खरे सांगा!' 'नीट खरे म्हणजे पाच पैसे पडतील. घ्यायचा असेल तर घे, नाहीतर चालू लाग.'
ईदगाह
हामिदने काळीज घट्ट करून विचारले—तीन पैशांना देणार? असे म्हणत तो पुढे चालू लागला, दुकानदाराचे खेकसणे ऐकायला नको म्हणून. पण दुकानदार खेकसला नाही. त्याने हाक मारून चिमटा देऊन टाकला. हामिदने तो बंदूक असावी तसा खांद्यावर टाकला आणि ऐटीत छाती काढून सवंगड्यांकडे आला. ऐकू या तर, सगळे काय काय टीका करतात ते. मोहसिन हसून म्हणाला—हा चिमटा कशाला आणलास रे वेड्या! याचे काय करणार? हामिदने चिमटा जमिनीवर आपटून म्हटले—जरा तुझा भिश्ती जमिनीवर टाकून दाखव. बेट्याच्या साऱ्या बरगड्यांचा चुरा होईल. महमूद म्हणाला—हा चिमटा काय खेळणे आहे? हामिद—खेळणे का नाही? आत्ता खांद्यावर घेतला, की बंदूक झाली. हातात घेतला, की फकिरांचा चिमटा झाला. मनात आणले तर याच्याकडून टाळांचे काम करून घेऊ शकतो. एक चिमटा हाणला तर तुमच्या साऱ्या खेळण्यांचा जीव जाईल. तुमच्या खेळण्यांनी कितीही जोर लावला तरी माझ्या चिमट्याचा केसही वाकडा करू शकणार नाहीत. माझा बहाद्दर वाघ आहे हा—चिमटा. सम्मीने खंजिरी घेतली होती. तो भारावून म्हणाला—माझ्या खंजिरीशी बदलतोस? दोन आण्यांची आहे. हामिदने खंजिरीकडे तुच्छतेने पाहिले—माझ्या चिमट्याने मनात आणले तर तुझ्या खंजिरीचे पोट फाडून टाकील. नुसता एक चामड्याचा पडदा लावला, की लागली ढब-ढब वाजायला. एवढेसे पाणी लागले की खलास. माझा बहाद्दर चिमटा आगीत, पाण्यात, वावटळीत, वादळात तसाच ठाम उभा राहील. चिमट्याने सगळ्यांनाच भुरळ घातली; पण आता पैसे कुणाजवळ उरले आहेत! शिवाय जत्रेपासून दूर निघून आले आहेत; नऊ केव्हाच वाजून गेले, ऊन तापू लागले आहे. घरी पोहोचायची घाई झाली आहे. बापाजवळ हट्ट धरला तरी चिमटा मिळणे शक्य नाही. हामिद आहे मोठा चलाख. म्हणूनच बदमाशाने आपले पैसे राखून ठेवले होते.
ईदगाह
आता मुलांचे दोन तट पडले आहेत. मोहसिन, महमूद, सम्मी आणि नूरे एका बाजूला, हामिद एकटा दुसऱ्या बाजूला. शास्त्रार्थ चालला आहे. सम्मी तर धर्मभ्रष्ट झाला; विरुद्ध पक्षाला जाऊन मिळाला. पण मोहसिन, महमूद आणि नूरेसुद्धा, हामिदपेक्षा एक-एक, दोन-दोन वर्षांनी मोठे असूनही, हामिदच्या प्रहारांनी धास्तावले आहेत. त्याच्या बाजूला न्यायाचे बळ आहे आणि नीतीची शक्ती. एकीकडे माती आहे, दुसरीकडे लोखंड; आणि ते या घटकेला स्वतःला पोलाद म्हणवते आहे. ते अजिंक्य आहे, प्राणघातक आहे. एखादा वाघ आला, तर मियाँ भिश्तींची बोबडी वळेल, मियाँ शिपाई मातीची बंदूक टाकून पळतील, वकीलसाहेबांची पाचावर धारण बसेल, चोग्यात तोंड लपवून ते जमिनीवर लोळण घेतील. पण हा चिमटा, हा बहाद्दर, हा रुस्तमे-हिंद झेप घेऊन वाघाच्या मानगुटीवर बसेल आणि त्याचे डोळे काढील. मोहसिनने सारा जोर पणाला लावून म्हटले—बरे, पण पाणी तर नाही भरू शकत! हामिदने चिमटा सरळ उभा धरून म्हटले—भिश्तीला एक दम भरील, की तो धावत पाणी आणून याच्या दारात सडा घालू लागेल. मोहसिन हरला; पण महमूदने कुमक पाठवली—बच्चमजी पकडले गेले, तर अदालतीत बांधलेल्या हातांनी फिरावे लागेल. तेव्हा तर वकीलसाहेबांचेच पाय धरावे लागतील. या जबरदस्त युक्तिवादाला हामिदला उत्तर देता आले नाही. त्याने विचारले—आम्हांला पकडायला कोण येणार? नूरे ताठ्यात म्हणाला—हा शिपाई, बंदूकवाला. हामिदने वेडावून दाखवत म्हटले—हे बिचारे आमच्या बहाद्दर रुस्तमे-हिंदला पकडणार! बरे आण, आत्ताच जरा कुस्ती होऊन जाऊ दे. याचा चेहरा बघूनच लांबून पळतील. पकडणार काय बिचारे! मोहसिनला एक नवा टोला सुचला—तुझ्या चिमट्याचे तोंड रोज आगीत जळणार.
ईदगाह
त्याला वाटले होते, हामिद निरुत्तर होईल; पण तसे झाले नाही. हामिदने तत्काळ उत्तर दिले—आगीत बहाद्दरच उडी घेतात. जनाब, तुमचे हे वकील, शिपाई आणि भिश्ती पोरींसारखे घरात दडून बसतील. आगीत उडी घेणे हे काम फक्त हा रुस्तमे-हिंदच करू शकतो. महमूदने आणखी एक जोर लावला—वकीलसाहेब खुर्ची-टेबलावर बसतील; तुझा चिमटा तर स्वयंपाकघरात जमिनीवर पडून राहील. या युक्तिवादाने सम्मी आणि नूरे यांच्याही जिवात जीव आला. पठ्ठ्याने काय मुद्द्याची गोष्ट सांगितली! चिमटा स्वयंपाकघरात पडून राहण्याशिवाय दुसरे काय करू शकतो? हामिदला एखादे सणसणीत उत्तर सुचले नाही, तेव्हा त्याने दांडगाई सुरू केली—माझा चिमटा स्वयंपाकघरात राहणार नाही. वकीलसाहेब खुर्चीवर बसले, की जाऊन त्यांना जमिनीवर आपटील आणि त्यांचा कायदा त्यांच्याच पोटात घालील. बोलण्यात काही दम नव्हता; चक्क शिवीगाळच होती. पण कायदा पोटात घालण्याची गोष्ट भाव खाऊन गेली. अशी भाव खाऊन गेली, की तिन्ही शूरवीर तोंडाकडे पाहतच राहिले; जणू अर्ध्या पैशाच्या एखाद्या पतंगाने चार पैशांच्या भारी पतंगाला काटून टाकावे. कायदा ही तोंडातून बाहेर पडणारी वस्तू. ती पोटात घालायची, ही गोष्ट विसंगत असली तरी तिच्यात काहीतरी नावीन्य होते. हामिदने मैदान मारले. त्याचा चिमटा रुस्तमे-हिंद आहे. आता यावर मोहसिन, महमूद, नूरे, सम्मी कुणाचीच हरकत असू शकत नाही. जेत्याला हरलेल्यांकडून जो मान मिळणे स्वाभाविक असते, तो हामिदलाही मिळाला. इतरांनी तीन-तीन, चार-चार आणे खर्च केले, पण एकही कामाची वस्तू त्यांना घेता आली नाही. हामिदने तीन पैशांत बाजी मारली. खरेच तर आहे, खेळण्यांचा काय भरवसा? फुटून-तुटून जातील. हामिदचा चिमटा तर वर्षानुवर्षे टिकेल. तहाच्या अटी ठरू लागल्या. मोहसिन म्हणाला—जरा तुझा चिमटा दे, आम्हीही बघू. तू आमचा भिश्ती घेऊन बघ.
ईदगाह
महमूद आणि नूरे यांनीही आपापली खेळणी पुढे केली. या अटी मान्य करायला हामिदची काही हरकत नव्हती. चिमटा आळीपाळीने सगळ्यांच्या हातांत गेला आणि त्यांची खेळणी आळीपाळीने हामिदच्या हातात आली. किती देखणी खेळणी आहेत! हामिदने हरलेल्यांचे अश्रू पुसले—मी तुम्हांला चिडवत होतो, खरेच. हा लोखंडाचा चिमटा या खेळण्यांची काय बरोबरी करणार! वाटते, आत्ता बोलतील, आत्ता बोलतील. पण मोहसिनच्या पार्टीचे या सांत्वनाने समाधान होत नाही. चिमट्याचा दरारा चांगलाच बसला आहे. चिकटलेले तिकीट आता पाण्याने सुटत नाही. मोहसिन—पण या खेळण्यांबद्दल आम्हांला कुणी दुवा तर देणार नाही ना? महमूद—दुवेचे काय घेऊन बसलास! उलट मार पडला नाही म्हणजे मिळवली. अम्मा नक्की म्हणणार, जत्रेत तुला ही मातीची खेळणीच मिळाली? हामिदला कबूल करावे लागले, की चिमटा बघून दादी जेवढी खूश होईल, तेवढी खेळणी बघून कुणाचीही आई होणार नाही. तीन पैशांतच तर त्याला सारे काही करायचे होते, आणि त्या पैशांचा असा उपयोग केल्याबद्दल पस्तावण्याची मुळीच गरज नव्हती. शिवाय आता तर चिमटा रुस्तमे-हिंद आहे आणि साऱ्या खेळण्यांचा बादशहा. वाटेत महमूदला भूक लागली. त्याच्या बापाने त्याला केळी खायला दिली. महमूदने फक्त हामिदला वाटेकरी केले. त्याचे बाकीचे मित्र तोंडाकडे पाहत राहिले. हा त्या चिमट्याचा प्रसाद होता. (३) अकरा वाजता साऱ्या गावात गडबड उडाली. जत्रेला गेलेले परत आले. मोहसिनच्या धाकट्या बहिणीने धावत येऊन त्याच्या हातातून भिश्ती हिसकावून घेतला आणि आनंदाच्या भरात तिने अशी उडी मारली, की मियाँ भिश्ती खाली आले आणि स्वर्गवासी झाले. यावरून भावाबहिणीत मारामारी झाली. दोघेही खूप रडले. त्यांची अम्मा हा गोंगाट ऐकून भडकली आणि तिने दोघांना वरून आणखी दोन-दोन चापट्या लगावल्या.
ईदगाह
मियाँ नूरेच्या वकिलाचा अंत त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसा, याहून अधिक गौरवशाली झाला. वकील काही जमिनीवर किंवा कोनाड्यात बसू शकत नाही. त्याच्या इभ्रतीचा विचार तर करायलाच हवा. भिंतीत दोन खुंट्या ठोकल्या. त्यांच्यावर लाकडाची एक फळी ठेवली. फळीवर कागदाचा गालिचा अंथरला. वकीलसाहेब राजा भोजाप्रमाणे सिंहासनावर विराजमान झाले. नूरेने त्यांना पंख्याने वारा घालायला सुरुवात केली. अदालतींत वाळ्याचे पडदे आणि विजेचे पंखे असतात. मग इथे साधा पंखाही नसावा? कायद्याची गरमी डोक्यात चढेल की नाही! बांबूचा पंखा आला आणि नूरे वारा घालू लागला. पंख्याच्या वाऱ्याने की पंख्याच्या तडाख्याने, कोण जाणे, वकीलसाहेब स्वर्गलोकातून मृत्युलोकात आले आणि त्यांचा मातीचा देह मातीला मिळाला! मग मोठ्या आकांताने शोक झाला, आणि वकीलसाहेबांच्या अस्थी उकिरड्यावर फेकून दिल्या. आता राहिला महमूदचा शिपाई. त्याला ताबडतोब गावचा पहारा देण्याचा चार्ज मिळाला. पण पोलिसातला शिपाई म्हणजे काही सामान्य असामी नव्हे, की त्याने आपल्या पायांनी चालावे. तो पालखीतून जाणार. एक टोपली आली; शिपाईसाहेबांना आरामात पहुडता यावे म्हणून तिच्यात लाल रंगाच्या काही फाटक्यातुटक्या चिंध्या अंथरल्या. महमूदने ही टोपली उचलली आणि तो आपल्या दारापुढे फेऱ्या घालू लागला. त्याचे दोन्ही धाकटे भाऊ शिपायाच्या वतीने 'छोनेवाले, जागते लहो' अशी आरोळी देतात. पण रात्र तर अंधारी असायलाच हवी; महमूदला ठेच लागते. टोपली त्याच्या हातातून निसटून पडते आणि मियाँ शिपाई आपल्या बंदुकीसकट जमिनीवर येतात आणि त्यांच्या एका तंगडीत बिघाड होतो. आपण चांगले डॉक्टर आहोत, हे महमूदला आज कळले. त्याला असे मलम सापडले आहे, की ज्याने तो मोडलेली तंगडी चुटकीसरशी जोडू शकतो. फक्त उंबराचा चीक हवा. उंबराचा चीक येतो. तंगडी जोडली जाते; पण शिपायाला उभे करताच तंगडी दगा देते.
ईदगाह
शस्त्रक्रिया अयशस्वी झाली; तेव्हा त्याची दुसरी तंगडीही मोडून टाकतात. आता निदान एका जागी आरामात बसू तरी शकतो. एका तंगडीवर त्याला ना चालता येत होते, ना बसता येत होते. आता तो शिपाई संन्यासी झाला आहे. आपल्या जागी बसल्या बसल्या पहारा देतो. कधी कधी देवही होतो. त्याच्या डोक्यावरचा झालरीचा फेटा खरवडून काढला आहे. आता त्याचे हवे तसे रूपांतर करता येते. कधी कधी तर तो तराजूत वजन म्हणूनही कामी येतो. आता मियाँ हामिदची हकीकत ऐका. त्याचा आवाज ऐकताच अमीना धावली आणि त्याला उचलून घेऊन त्याचे लाड करू लागली. अचानक त्याच्या हातातला चिमटा बघून ती दचकली. 'हा चिमटा कुठून आणलास?' 'मी विकत घेतला आहे.' 'किती पैशांना?' 'तीन पैसे दिले.' अमीनाने ऊर बडवून घेतला. काय हे बावळट पोर! दुपार झाली, काही खाल्ले नाही की प्यायले नाही. आणि आणले काय, तर चिमटा! साऱ्या जत्रेत तुला दुसरी कुठली वस्तू मिळाली नाही, म्हणून हा लोखंडाचा चिमटा उचलून आणलास? हामिद अपराध्यासारखा म्हणाला—तुझी बोटे तव्यावर भाजायची; म्हणून मी हा घेतला. म्हातारीचा राग तत्काळ मायेत बदलला; आणि माया तरी कशी? जी बोलकी असते आणि आपली सारी कळ शब्दांत उधळून टाकते, ती नव्हे. ही मुकी माया होती; अगदी घट्ट, रसाने आणि गोडीने भरलेली. पोरात केवढा त्याग, केवढी सद्भावना आणि केवढा विवेक आहे! दुसऱ्यांना खेळणी घेताना आणि मिठाई खाताना बघून याचा जीव किती तळमळला असेल! एवढा संयम याला साधला तरी कसा? तिथेही याला आपल्या म्हाताऱ्या दादीची आठवण राहिली. अमीनाचे मन भरून आले. आणि आता एक मोठी विलक्षण गोष्ट घडली; हामिदच्या या चिमट्याहूनही विलक्षण. बाळ हामिदने म्हाताऱ्या हामिदचा पार्ट केला होता. म्हातारी अमीना बालिका अमीना झाली. ती रडू लागली. पदर पसरून हामिदला दुवा देत होती आणि अश्रूंचे मोठमोठे थेंब ढाळत होती. याचे रहस्य हामिदला काय कळणार!