मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
कजाकी
माझ्या बालपणीच्या आठवणींत 'कजाकी' ही कधीही न पुसली जाणारी व्यक्ती आहे. आज चाळीस वर्षे उलटून गेली, पण कजाकीची मूर्ती अजूनही डोळ्यांसमोर नाचते आहे. त्या दिवसांत मी वडिलांबरोबर आझमगडच्या एका तहसिलीत होतो. कजाकी जातीने पासी होता; मोठा हसतमुख, मोठा धाडसी, मोठा जिंदादिल. तो रोज संध्याकाळी डाकेची थैली घेऊन येई, रात्रभर राही आणि सकाळी डाक घेऊन निघून जाई. संध्याकाळी पुन्हा तिकडून डाक घेऊन हजर होई. मी दिवसभर अस्वस्थ होऊन त्याची वाट पाहत असे. चार वाजले रे वाजले, की व्याकूळ होऊन रस्त्यावर येऊन उभा राहत असे, आणि थोड्याच वेळात खांद्यावर भाला ठेवलेला, भाल्याचे घुंगरू वाजवत दुरून धावत येणारा कजाकी दिसू लागे. तो सावळ्या रंगाचा, पिळदार अंगाचा, उंचापुरा जवान होता. शरीर असे साच्यात ओतल्यासारखे, की कसबी मूर्तिकारालाही त्यात खोट काढता आली नसती. त्याच्या बारीकशा मिशा त्याच्या रेखीव चेहऱ्याला फार शोभून दिसत. मला पाहताच तो आणखी जोरात धावू लागे, त्याचे घुंगरू आणखी जोरात वाजू लागत, आणि माझ्या छातीत आनंदाची धडधड आणखी जोरात होऊ लागे. आनंदाच्या भरात मीही धावत सुटे, आणि क्षणार्धात कजाकीचा खांदा माझे सिंहासन बने. ती जागा म्हणजे माझ्या साऱ्या इच्छांचा स्वर्ग होता. कजाकीच्या रुंद खांद्यांवर मला जो उचंबळून येणारा आनंद मिळे, तो स्वर्गात राहणाऱ्यांनाही कदाचित मिळत नसेल. सारे जग माझ्या डोळ्यांना तुच्छ वाटू लागे, आणि कजाकी मला खांद्यावर घेऊन धावू लागला, की मग तर असे वाटे, जणू मी वाऱ्याच्या घोड्यावर बसून उडत चाललो आहे.
कजाकी
कजाकी डाकघरात पोचे तेव्हा घामाने निथळत असे; पण विश्रांती घ्यायची त्याला सवयच नव्हती. थैली ठेवताक्षणी तो आम्हा मुलांना घेऊन एखाद्या मैदानात निघून जाई; कधी आमच्याबरोबर खेळे, कधी बिरह्याची गाणी गाऊन ऐकवी, तर कधी गोष्टी सांगे. चोऱ्यांच्या, दरोड्यांच्या, मारामारीच्या, भुताखेतांच्या शेकडो गोष्टी त्याला तोंडपाठ होत्या. या गोष्टी ऐकून मी आश्चर्याने भारलेल्या आनंदात बुडून जाई. त्याच्या गोष्टींतले चोर आणि दरोडेखोर खरे वीर असत; ते श्रीमंतांना लुटून गोरगरीब, दीनदुबळ्या जिवांचे पालनपोषण करीत. मला त्यांचा तिरस्कार वाटण्याऐवजी आदर वाटे. २ एके दिवशी कजाकीला डाकेची थैली घेऊन यायला उशीर झाला. सूर्य मावळला, तरी तो दिसेना. मी हरवल्यासारखा रस्त्यावर दूरवर डोळे फाडफाडून पाहत होतो; पण ती ओळखीची आकृती दिसत नव्हती. कान देऊन ऐकत होतो; पण 'छुन-छुन' असा तो आनंदी नाद ऐकू येत नव्हता. उजेडाबरोबर माझी आशाही मावळत चालली होती. तिकडून कोणी येताना दिसले, की विचारी—कजाकी येतोय का? पण एकतर कोणी ऐकतच नसे, नाहीतर नुसती मान हलवे. एकाएकी 'छुन-छुन' आवाज कानांवर आला. अंधारात मला चहूकडे भुतेच दिसत; इतके, की माताजींच्या खोलीत कोनाड्यात ठेवलेली मिठाईसुद्धा अंधार पडल्यावर माझ्यासाठी वर्ज्य होई; पण तो आवाज ऐकताच मी त्या दिशेने जोरात धावत सुटलो. होय, तो कजाकीच होता. त्याला पाहताच माझी तगमग रागात बदलली. मी त्याला मारू लागलो, मग रुसून बाजूला जाऊन उभा राहिलो.
कजाकी
कजाकी हसून म्हणाला—मारशील, तर मी एक वस्तू आणलीय, ती देणार नाही. मी धीर करून म्हणालो—जा, नको देऊस, मी घेणारच नाही. कजाकी—आत्ता दाखवली, तर धावत येऊन कवेत घेशील. मी जरा नरमून म्हणालो—बरं, दाखव. कजाकी—मग ये, माझ्या खांद्यावर बस, पळत सुटतो. आज फार उशीर झालाय. बाबूजी भडकले असतील. मी ताठ्यात म्हणालो—आधी दाखव. माझा विजय झाला. कजाकीला उशिराची भीती नसती आणि तो आणखी एक मिनिटभर जरी थांबू शकला असता, तर कदाचित फासा उलटला असता. त्याने एक वस्तू दाखवली; ती त्याने एका हाताने छातीशी कवटाळून धरली होती. लांबट तोंड होते, आणि दोन डोळे चमकत होते. मी धावत जाऊन ती कजाकीच्या कुशीतून घेतली. ते हरणाचे पाडस होते. अहाहा! माझ्या त्या आनंदाची कोण कल्पना करील? त्यानंतर कठीण परीक्षा पास केल्या, चांगला हुद्दाही मिळाला, रायबहादूरही झालो, पण तो आनंद पुन्हा कधी लाभला नाही. मी ते कवेत घेऊन, त्याच्या मऊ स्पर्शाचा आनंद लुटत घराकडे धावलो. कजाकीला यायला इतका उशीर का झाला, याचा विचारसुद्धा मनात आला नाही. मी विचारले—हे कुठे मिळालं, कजाकी? कजाकी—भैया, इथून थोड्या अंतरावर एक लहानसं रान आहे. त्यात पुष्कळ हरणं आहेत. मला फार वाटत होतं, की एखादं पाडस मिळालं तर तुला द्यावं. आज हे पाडस हरणांच्या कळपाबरोबर दिसलं. मी कळपाकडे धावलो, तशी सगळीच्या सगळी पळाली. हे पाडसही पळालं, पण मी पाठलाग सोडला नाही. बाकीची हरणं तर फार दूर निघून गेली, हेच मागे राहिलं. मी त्याला पकडलं. म्हणून तर इतका उशीर झाला.
कजाकी
अशा गप्पा करत आम्ही दोघे डाकघरात पोचलो. बाबूजींनी मला पाहिले नाही, हरणाच्या पाडसालाही पाहिले नाही; त्यांची नजर पडली ती फक्त कजाकीवर. भडकून म्हणाले—आज इतका वेळ कुठे लावलास? आता थैली घेऊन आलायस, ती घेऊन मी काय करू? डाक तर निघून गेली. सांग, इतका वेळ कुठे लावलास? कजाकीच्या तोंडून शब्द फुटेना. बाबूजी म्हणाले—तुला बहुधा आता नोकरी करायची नाही. नीच आहेस ना, पोट भरलं की माज चढला! उपाशी मरायची पाळी येईल, तेव्हा डोळे उघडतील. कजाकी मुकाट्याने उभा राहिला. बाबूजींचा राग आणखी चढला. म्हणाले—ठीक आहे, थैली ठेव आणि आपल्या घरचा रस्ता धर. डुक्कर, आता डाक घेऊन आलाय! तुझं काय बिघडणार आहे, हवी तिथे मजुरी करशील. बालंट तर माझ्या माथी येणार—जाब तर माझ्याकडे मागितला जाणार. कजाकी रडवेला होऊन म्हणाला—सरकार, आता कधी उशीर नाही होणार! बाबूजी—आज उशीर का केलास, त्याचं उत्तर दे? कजाकीकडे याचे काही उत्तर नव्हते. नवल म्हणजे माझीही बोबडी वळली. बाबूजी फार तापट होते. त्यांना काम फार करावे लागे, म्हणून ते बारीकसारीक गोष्टींवरून चिडत. मी तर त्यांच्यासमोर कधी जातच नसे. तेही कधी माझे लाड करीत नसत. घरी ते फक्त दोनदा, तासा-तासाभरासाठी जेवायला येत; बाकी सारा दिवस कचेरीत लिहीत बसत. एखादा मदतनीस मिळावा म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे वारंवार विनंती केली होती; पण तिचा काही परिणाम झाला नव्हता. इतकेच काय, सुटीच्या दिवशीही बाबूजी कचेरीतच असत. त्यांचा राग शांत करणे फक्त माताजींना जमे, पण त्या कचेरीत कशा येणार! बिचाऱ्या कजाकीला त्याच वेळी माझ्या डोळ्यांदेखत कामावरून काढून टाकले.
कजाकी
त्याचा भाला, चपरास आणि फेटा काढून घेतला, आणि डाकघरातून चालते व्हायचा नादिरशाही हुकूम त्याला ऐकवला. आहा! त्या वेळी मला असे वाटत होते, की माझ्याकडे सोन्याची लंका असती, तर ती कजाकीला देऊन टाकली असती आणि बाबूजींना दाखवून दिले असते, की तुम्ही काढून टाकल्याने कजाकीचा केसही वाकडा झालेला नाही. एखाद्या योद्ध्याला आपल्या तलवारीचा जितका अभिमान असतो, तितकाच अभिमान कजाकीला आपल्या चपरासाचा होता. चपरास काढताना त्याचे हात थरथरत होते आणि डोळ्यांतून आसवे वाहत होती. आणि या साऱ्या गोंधळाचे मूळ होती ती कोमल वस्तू, जी माझ्या कुशीत तोंड लपवून, आईच्या कुशीत असावी तशी निवांत बसली होती. कजाकी निघाला, तेव्हा मीही हळूहळू त्याच्या मागोमाग गेलो. माझ्या घराच्या दाराशी येऊन कजाकी म्हणाला—भैया, आता घरी जा, तिन्हीसांज झाली. मी मुकाट्याने उभा राहून, सारी शक्ती एकवटून आसवांचा लोट दाबून धरत होतो. कजाकी पुन्हा म्हणाला—भैया, मी काही परमुलखात थोडाच निघून चाललोय. पुन्हा येईन आणि तुला खांद्यावर बसवून उड्या मारत पळवीन. बाबूजींनी नोकरी घेतली, म्हणून काय एवढंही करू देणार नाहीत! तुला सोडून मी कुठेही जाणार नाही, भैया! जा, अम्मांना सांग, कजाकी जातोय. त्याचं काही बोललं-चाललं चुकलं असेल, तर माफ करावं. मी धावतच घरी गेलो; पण अम्माजींना काही सांगण्याऐवजी हमसाहमशी रडू लागलो. अम्माजी स्वयंपाकघरातून बाहेर येऊन विचारू लागल्या—काय झालं बाळ? कोणी मारलं? बाबूजी काही बोलले का? बरं, थांब तर, आज घरी येऊ देत, मग विचारते. जेव्हा पाहावं तेव्हा माझ्या लेकराला मारत असतात. गप्प हो बाळ, आता तू त्यांच्याजवळ कधी जाऊ नकोस.
कजाकी
मी मोठ्या कष्टाने आवाज सावरून म्हणालो—कजाकी… अम्मांना वाटले, कजाकीने मारले; म्हणाल्या—बरं, येऊ दे कजाकीला. बघ, उभ्या उभ्या त्याला हाकलून लावते. हरकारा असून माझ्या राजाबेटाला मारतो! आजच्या आज त्याचा फेटा, भाला, सगळं काढून घ्यायला लावते. वा रे! मी घाईघाईने म्हणालो—नाही, कजाकीने नाही मारलं. बाबूजींनी त्याला काढून टाकलं; त्याचा फेटा, भाला काढून घेतला—चपरासही घेतला. अम्मा—हे तुझ्या बाबूजींनी फार वाईट केलं. बिचारा आपल्या कामात किती दक्ष असतो. मग त्याला का काढलं? मी म्हणालो—आज त्याला उशीर झाला होता. असे म्हणून मी हरणाचे पाडस कुशीतून खाली उतरवले. घरात ते पळून जाण्याची भीती नव्हती. अजूनपर्यंत अम्माजींचे लक्षही त्याच्याकडे गेले नव्हते. त्याला बागडताना पाहून त्या एकदम दचकल्या, आणि हा भयंकर प्राणी मला चावेल की काय, म्हणून झडप घालून त्यांनी माझा हात धरला! कुठे मी ओक्साबोक्शी रडत होतो, आणि कुठे अम्माजींची ती धांदल पाहून खळखळून हसू लागलो. अम्मा—अरे, हे तर हरणाचं पाडस आहे! कुठे मिळालं? मी हरणाच्या पाडसाचा सारा इतिहास आणि त्याचा भयंकर परिणाम आदीपासून अंतापर्यंत ऐकवला—अम्मा, हे इतकं जोरात पळत होतं, की दुसरा कोणी असता, तर पकडूच शकला नसता. सूं-सूं, वाऱ्यासारखं उडत चाललं होतं. कजाकी पाच-सहा तास याच्या मागे धावत होता. तेव्हा कुठे पाडस मिळालं. अम्माजी, कजाकीसारखं साऱ्या जगात कोणी धावू शकत नाही, म्हणून तर उशीर झाला. म्हणून बाबूजींनी बिचाऱ्याला काढून टाकलं—चपरास, फेटा, भाला, सगळं काढून घेतलं. आता बिचारा काय करील? उपाशी मरेल.
कजाकी
अम्मांनी विचारले—कुठे आहे कजाकी? जरा त्याला बोलावून तर आण. मी म्हणालो—बाहेरच तर उभा आहे. म्हणत होता, अम्माजींकडून माझं बोललं-चाललं माफ करवून घे. आतापर्यंत अम्माजी माझी हकीकत थट्टा समजत होत्या. त्यांना बहुधा वाटत होते, की बाबूजींनी कजाकीला दटावले असेल; पण माझे शेवटचे वाक्य ऐकून शंका आली, की खरोखरच कजाकी बडतर्फ तर झाला नाही ना. बाहेर येऊन त्या 'कजाकी! कजाकी!' अशा हाका मारू लागल्या; पण कजाकीचा कुठे पत्ता नव्हता. मी पुन्हा पुन्हा हाका मारल्या; पण कजाकी तिथे नव्हता. जेवण तर मी जेवलो—मुले दुःखात जेवण सोडत नाहीत, विशेषतः समोर रबडी असेल तर; पण रात्री उशिरापर्यंत पडल्या पडल्या विचार करत राहिलो—माझ्याकडे रुपये असते, तर एक लाख रुपये कजाकीला दिले असते आणि सांगितले असते—बाबूजींशी कधी बोलू नकोस. बिचारा उपाशी मरेल! बघू, उद्या येतो की नाही. आता येऊन तरी काय करणार? पण येतो म्हणून तर सांगून गेलाय. उद्या मी त्याला माझ्याबरोबर जेवायला घालीन. असे हवेत इमले बांधता बांधता मला झोप लागली. ३ दुसऱ्या दिवशी मी दिवसभर माझ्या पाडसाच्या सेवाचाकरीत गुंतलो होतो. आधी त्याचा नामकरण-संस्कार झाला. 'मुन्नू' नाव ठेवले. मग मी माझ्या सगळ्या सवंगड्यांशी आणि वर्गमित्रांशी त्याची ओळख करून दिली. एका दिवसातच तो माझ्याशी इतका माणसाळला, की माझ्या मागेमागे धावू लागला. इतक्याच वेळात मी त्याला माझ्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान देऊन टाकले. पुढे मी बांधणार असलेल्या भव्य वाड्यात त्याच्यासाठी वेगळी खोली बांधायचाही निश्चय केला; खाट, हवा खायला जाण्यासाठी फिटन गाडी, यांचीही योजना करून ठेवली.
कजाकी
पण संध्याकाळ होताच मी सारे काही सोडून रस्त्यावर जाऊन उभा राहिलो आणि कजाकीची वाट पाहू लागलो. ठाऊक होते, की कजाकीला कामावरून काढले आहे, आता त्याला इथे यायची काही गरज उरली नाही. तरीही, का कोण जाणे, मला अशी आशा वाटत होती, की तो येतो आहे. एकाएकी माझ्या मनात आले, की कजाकी उपाशी मरत असेल. मी तडक घरी आलो. अम्मा दिवाबत्ती करत होत्या. मी गुपचूप एका टोपलीत पीठ काढले, आणि पिठाने माखलेल्या हातांनी, टोपलीतून गळणाऱ्या पिठाची रेघ ओढत पळालो. येऊन रस्त्यावर उभा राहतो न राहतो, तोच समोरून कजाकी येताना दिसला. त्याच्याजवळ भालाही होता, कमरेला चपरासही होता, डोक्याला फेटाही बांधलेला होता. भाल्याला डाकेची थैलीही बांधलेली होती. मी धावत जाऊन त्याच्या कमरेला बिलगलो आणि आश्चर्याने म्हणालो—तुला चपरास आणि भाला कुठून मिळाला, कजाकी? कजाकीने मला उचलून खांद्यावर बसवत म्हटले—तो चपरास कुठल्या कामाचा होता, भैया. तो तर गुलामीचा चपरास होता, हा आपल्या खुशीचा चपरास आहे. आधी सरकारचा नोकर होतो, आता तुझा नोकर आहे. हे बोलता बोलता त्याची नजर तिथेच ठेवलेल्या टोपलीवर पडली. म्हणाला—हे पीठ कसलं, भैया? मी संकोचत म्हणालो—तुझ्यासाठीच तर आणलंय. तुला भूक लागली असेल, आज काय खाल्लं असशील? कजाकीचे डोळे मला दिसू शकले नाहीत, मी त्याच्या खांद्यावर बसलो होतो; हां, त्याच्या आवाजावरून कळले, की त्याचा गळा दाटून आला आहे. म्हणाला—भैया, नुसत्या कोरड्या रोट्या कशा खाऊ! डाळ, मीठ, तूप—बाकी तर काहीच नाही.
कजाकी
मला माझ्या चुकीची फार लाज वाटली. खरेच तर आहे, बिचारा कोरड्या रोट्या कशा खाईल? पण मीठ, डाळ, तूप आणू कसे? आता तर अम्मा चुलीपाशी असतील. पीठ घेऊन तर कसाबसा पळून आलो होतो (माझी चोरी पकडली गेली आहे, पिठाच्या रेघेने माग दिला आहे, हे मला तोपर्यंत ठाऊक नव्हते.) आता या तीन-तीन वस्तू कशा आणू? अम्मांकडे मागितल्या, तर कधीच देणार नाहीत. एकेका पैशासाठी तर तासन्तास रडवतात, एवढ्या सगळ्या वस्तू कशाला देतील? एकाएकी मला एक गोष्ट आठवली. माझ्या पुस्तकांच्या दप्तरात मी कित्येक आण्यांचे पैसे ठेवून दिले होते. पैसे जमवून ठेवण्यात मला मोठा आनंद वाटे. ठाऊक नाही, आता ती सवय का बदलली. अजूनही तसेच असते, तर कदाचित इतका फाकेमस्त राहिलो नसतो. बाबूजी माझे लाड तर कधी करीत नसत, पण पैसे मात्र भरपूर देत; कदाचित आपल्या कामात गुंतलेले असल्यामुळे माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी हाच उपाय त्यांना सर्वांत सोपा वाटत असे. नकार दिला, तर मी रडेन, हट्ट धरीन अशी भीती होती. ही अडचण ते दुरूनच टाळत. अम्माजींचा स्वभाव याच्या अगदी उलट होता. माझ्या रडण्याने आणि हट्टाने त्यांच्या कोणत्याही कामात व्यत्यय येण्याची भीती त्यांना नव्हती. माणूस पडल्या पडल्या दिवसभर रडणे ऐकू शकतो; पण हिशेब करताना मोठ्या आवाजानेही लक्ष विचलित होते. अम्मांचे माझ्यावर प्रेम तर फार होते, पण पैशाचे नाव ऐकताच त्यांच्या कपाळाला आठ्या पडत. माझ्याकडे पुस्तके नव्हती; हां, एक दप्तर होते, त्यात डाकघराचे दोन-चार फॉर्म घडी करून पुस्तकासारखे ठेवलेले होते. मी विचार केला—डाळ, मीठ आणि तूप यांना तेवढे पैसे पुरणार नाहीत का? माझ्या तर मुठीत मावत नाहीत. असा निश्चय करून मी म्हणालो—बरं, मला खाली उतरव, म्हणजे मी डाळ आणि मीठ आणून देतो; पण रोज येत जाशील ना?
कजाकी
कजाकी—भैया, खायला देशील, तर का नाही येणार! मी म्हणालो—मी रोज खायला देईन. कजाकी म्हणाला—मग मीही रोज येईन. मी खाली उतरलो आणि धावत जाऊन माझी सारी पुंजी घेऊन आलो. कजाकीला रोज बोलावण्यासाठी त्या वेळी माझ्याकडे कोहिनूर हिरा जरी असता, तरी तो त्याला नजर करायला मी मागेपुढे पाहिले नसते. कजाकीने आश्चर्याने विचारले—हे पैसे कुठे मिळाले, भैया? मी अभिमानाने म्हणालो—माझेच तर आहेत. कजाकी—तुझ्या अम्माजी तुला मारतील, म्हणतील—कजाकीने फूस लावून मागवून घेतले असतील. भैया, या पैशांची मिठाई घे आणि पीठ मडक्यात ठेवून दे. मी उपाशी नाही मरत. मला दोन हात आहेत. मी कसा उपाशी मरीन? मी पुष्कळ सांगितले, की पैसे माझे आहेत; पण कजाकीने घेतले नाहीत. त्याने बराच वेळ मला इकडे-तिकडे फिरवून आणले, गाणी ऐकवली आणि मला घरी पोचवून तो निघून गेला. माझ्या दाराशी पिठाची टोपलीही ठेवून गेला. मी घरात पाऊल टाकले न टाकले, तोच अम्माजींनी दटावून विचारले—काय रे चोरा, पीठ कुठे नेलं होतंस? आता चोरी करायला शिकतोयस! सांग, कोणाला पीठ देऊन आलास, नाहीतर तुझी चामडी सोलून काढीन. माझी तर पाचावर धारण बसली. अम्मा रागात सिंहीण होत असत. मी गांगरून म्हणालो—कोणालाच तर नाही दिलं. अम्मा—तू पीठ नाही काढलंस? बघ, साऱ्या अंगणात किती पीठ सांडलंय? मी गप्प उभा होतो. त्या कितीही धमकावत होत्या, गोंजारत होत्या, पण माझे तोंड उघडत नव्हते. येणाऱ्या संकटाच्या भीतीने जीव अर्धमेला झाला होता. 'रागावतेस कशाला, पीठ तर दाराशी ठेवलेलं आहे,' एवढे म्हणण्याचीही हिंमत होत नव्हती. ते उचलून आणणेही जमत नव्हते, जणू काही करण्याची शक्तीच लोपली होती. जणू पायांत हलण्याचे बळच उरले नव्हते.
कजाकी
एकाएकी कजाकीने हाक मारली—बहूजी, पीठ हे दाराशी ठेवलंय. भैया मला द्यायला घेऊन गेले होते. हे ऐकताच अम्मा दाराकडे गेल्या. कजाकीपासून त्या पडदा करीत नसत. त्यांनी कजाकीशी काही बोलणे केले की नाही, हे मला ठाऊक नाही; पण अम्माजी रिकामी टोपली घेऊन घरात आल्या. मग आतल्या खोलीत जाऊन त्यांनी पेटीतून काहीतरी काढले आणि दाराकडे गेल्या. मी पाहिले—त्यांची मूठ मिटलेली होती. आता मला तिथे उभे राहवेना. अम्माजींच्या मागोमाग मीही गेलो. अम्मांनी दाराशी अनेकदा हाका मारल्या, पण कजाकी निघून गेला होता. मी मोठ्या शौर्याने म्हणालो—मी जाऊन शोधून आणतो, अम्माजी. अम्माजींनी दार बंद करत म्हटले—तू अंधारात कुठे जाणार? आत्ता तर इथे उभा होता. मी म्हटलं—इथेच थांब, मी आलेच. तेवढ्यात कुठे सटकला कोण जाणे. फार संकोची आहे. पीठ तर घेतच नव्हता. मी जबरदस्तीने त्याच्या पंचात बांधून दिलं. मला तर बिचाऱ्याची फार दया येते. कोण जाणे, बिचाऱ्याच्या घरी खायला काही आहे की नाही. रुपये आणले होते, की देईन, पण कुठे गेला कोण जाणे. आता मलाही धीर आला. मी माझ्या चोरीची सगळी कहाणी सांगून टाकली. आईबाप मुलांशी समजूतदार मूल होऊन वागतात, तेव्हा त्यांच्यावर जितका प्रभाव पाडू शकतात, जितकी शिकवण देऊ शकतात, तितकी वडीलधारेपणाचा आव आणून नाही. अम्माजी म्हणाल्या—तू मला विचारलं का नाहीस? मी कजाकीला थोडंसं पीठ दिलं नसतं का? मी याला काहीच उत्तर दिले नाही. मनात म्हणालो—या वेळी तुला कजाकीची दया आली आहे, हवं ते देऊन टाक; पण मी मागितलं असतं, तर मारायला धावली असतीस. हां, आता कजाकी उपाशी मरणार नाही, या विचाराने मन प्रसन्न झाले. अम्माजी त्याला रोज खायला देतील, आणि तो रोज मला खांद्यावर बसवून फिरवून आणेल.
कजाकी
दुसऱ्या दिवशी मी दिवसभर मुन्नूबरोबर खेळत राहिलो. संध्याकाळी रस्त्यावर जाऊन उभा राहिलो. पण अंधार पडला, तरी कजाकीचा कुठे पत्ता नाही. दिवे लागले, रस्त्यावर सामसूम झाली; पण कजाकी आला नाही. मी रडत घरी आलो. अम्माजींनी विचारले—का रडतोस बाळ? कजाकी नाही आला का? मी आणखी जोराने रडू लागलो. अम्माजींनी मला छातीशी धरले; मला असे वाटले, की त्यांचाही कंठ दाटून आला आहे. त्या म्हणाल्या—बाळ, गप्प हो. मी उद्या एखाद्या हरकाऱ्याला पाठवून कजाकीला बोलावून घेते. मी रडता रडताच झोपी गेलो. सकाळी डोळे उघडताक्षणी मी अम्माजींना म्हणालो—कजाकीला बोलावून घे. अम्मा म्हणाल्या—माणूस गेलाय बाळ, कजाकी येतच असेल. मी खूश होऊन खेळू लागलो. मला ठाऊक होते, की अम्माजी जे बोलतात, ते नक्की पूर्ण करतात. त्यांनी सकाळीच एका हरकाऱ्याला पाठवले होते. दहा वाजता मी मुन्नूला घेऊन घरी आलो, तेव्हा कळले, की कजाकी आपल्या घरी भेटला नाही. रात्रीसुद्धा तो घरी गेला नव्हता. त्याची बायको रडत होती, की कोण जाणे कुठे निघून गेले. तिला भीती वाटत होती, की तो कुठे पळून तर गेला नाही ना. मुलांचे हृदय किती कोमल असते, याची कल्पना दुसऱ्या कोणाला करता येत नाही. आपल्या भावना व्यक्त करायला त्यांच्याजवळ शब्द नसतात. त्यांना हेही कळत नाही, की कोणती गोष्ट त्यांना व्याकूळ करते आहे, कोणता काटा त्यांच्या काळजात सलतो आहे, त्यांना वारंवार रडू का येते, ते का हिरमुसून बसून राहतात, खेळण्यात त्यांचे मन का लागत नाही? माझीही हीच अवस्था होती. कधी घरात येई, कधी बाहेर जाई, कधी रस्त्यावर जाऊन पोचे. डोळे कजाकीला शोधत होते. तो कुठे गेला? कुठे पळून तर गेला नाही!
कजाकी
तिसऱ्या प्रहरी मी हरवल्यासारखा रस्त्यावर उभा होतो. एकाएकी मला कजाकी एका गल्लीत दिसला. होय, तो कजाकीच होता. मी ओरडत त्याच्याकडे धावलो, पण गल्लीत त्याचा पत्ता नव्हता; कोण जाणे कुठे गायब झाला. मी गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पाहिले, पण कजाकीचा कुठे मागमूसही लागला नाही. घरी येऊन मी अम्माजींना हे सांगितले. मला असे वाटले, की हे ऐकून त्या फार चिंतेत पडल्या. यानंतर दोन-तीन दिवस कजाकी दिसला नाही. मीही आता त्याला थोडा थोडा विसरू लागलो. मुले आधी जितके प्रेम करतात, तितकीच मागाहून निष्ठुरही होतात; ज्या खेळण्यावर जीव टाकतात, त्यालाच दोन-चार दिवसांनी आपटून फोडूनही टाकतात. आणखी दहा-बारा दिवस गेले. दुपारची वेळ होती. बाबूजी जेवत होते. मी मुन्नूच्या पायांत पीनसचे पैंजण बांधत होतो. एक बाई घुंगट ओढून आली आणि अंगणात उभी राहिली. तिचे कपडे फाटलेले आणि मळलेले होते, पण ती गोरी, सुंदर स्त्री होती. तिने मला विचारले—भैया, बहूजी कुठं आहेत? मी तिच्याजवळ जाऊन तिच्या तोंडाकडे पाहत म्हणालो—तू कोण? काय विकतेस? बाई—काही विकत नाही, तुझ्यासाठी ह्या कमळाच्या बिया आणल्यात, भैया. तुला कमळाच्या बिया फार आवडतात ना? तिच्या हातातून लोंबणाऱ्या गाठोड्याकडे उत्सुक नजरेने पाहत मी विचारले—कुठून आणल्यास? बघू. बाई—तुझ्या हरकाऱ्यानं पाठवल्यात, भैया. मी उडी मारून विचारले—कजाकीने? बाईने मान हलवून 'हो' म्हटले आणि ती गाठोडे सोडू लागली. इतक्यात अम्माजीही स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. तिने अम्मांच्या पायांना स्पर्श केला. अम्मांनी विचारले—तू कजाकीची बायको ना? बाईने मान खाली घातली. अम्मा—हल्ली कजाकी काय करतो?
कजाकी
बाई रडत म्हणाली—बहूजी, ज्या दिवशी तुमच्याकडून पीठ घेऊन गेले, त्याच दिवसापासून आजारी पडलेत. बस, भैया-भैया करत असतात. भैयातच त्यांचा जीव गुंतलाय. दचकून दचकून 'भैया! भैया!' करत दाराकडे धावतात. कोण जाणे त्यांना काय झालंय, बहूजी! एक दिवस मला काही न सांगता-सवरता घरातून निघाले आणि एका गल्लीत लपून भैयांना बघत राहिले. भैयांनी त्यांना पाहिलं, तसे पळाले. तुमच्याकडे यायला लाजतात. मी म्हणालो—हां-हां, त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं ना, अम्माजी! अम्मा—घरात खायला-प्यायला काही आहे? बाई—हो बहूजी, तुमच्या आसिरवादानं खायप्यायची काही ददात नाही. आज सकाळी उठले आणि तळ्याकडे निघून गेले. मी पुष्कळ सांगत राहिले, बाहेर जाऊ नका, वारं लागेल, पण ऐकलं नाही! अशक्तपणानं पाय लटपटतात, पण तळ्यात उतरून ह्या कमळाच्या बिया तोडून आणल्या. मग मला म्हणाले—घेऊन जा, भैयांना देऊन ये. त्यांना कमळाच्या बिया फार आवडतात. खुशाली विचारून ये. मी गाठोड्यातून कमळाच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि मजेत चाखत होतो. अम्मांनी पुष्कळ डोळे वटारले; पण इथे एवढा धीर कुणाला! अम्मा म्हणाल्या—सांग, सगळं खुशाल आहे. मी म्हणालो—हेही सांग, की भैयांनी बोलावलंय. नाही आलास, तर पुन्हा कधी बोलणार नाहीत तुझ्याशी, हां! बाबूजी जेवून बाहेर आले होते. टॉवेलने हात-तोंड पुसत म्हणाले—आणि हेही सांग, की साहेबांनी तुम्हाला बहाल केलंय. लवकर जा, नाहीतर दुसरा माणूस ठेवतील. बाईने आपले कापड उचलले आणि ती निघून गेली. अम्मांनी पुष्कळ हाका मारल्या, पण ती थांबली नाही. बहुधा अम्माजींना तिला शिधा द्यायचा होता. अम्मांनी विचारले—खरंच बहाल झाला?
कजाकी
बाबूजी—मग काय खोटंच बोलावतोय? मी तर पाचव्याच दिवशी त्याच्या बहालीचा रिपोर्ट केला होता. अम्मा—हे तुम्ही फार चांगलं केलं. बाबूजी—त्याच्या आजारावर हेच औषध आहे. ४ सकाळी मी उठलो, तो काय पाहतो—कजाकी काठी टेकत टेकत येतो आहे. तो फार रोडावला होता. म्हातारा झाल्यासारखा दिसत होता. हिरव्यागार झाडाचे वाळून नुसते खोड उरले होते. मी त्याच्याकडे धावलो आणि त्याच्या कमरेला बिलगलो. कजाकीने माझ्या गालांचे मुके घेतले आणि मला उचलून खांद्यावर बसवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला मी उचलवेना. तेव्हा तो जनावरासारखा हात आणि गुडघे टेकून जमिनीवर ओणवा झाला, आणि मी त्याच्या पाठीवर स्वार होऊन डाकघराकडे निघालो. त्या वेळी मी आनंदाने फुलून गेलो होतो, आणि बहुधा कजाकी तर माझ्याहूनही जास्त खूश होता. बाबूजी म्हणाले—कजाकी, तुम्हाला बहाल केलंय. आता कधी उशीर करू नका. कजाकी रडत पिताजींच्या पायांवर कोसळला. पण कदाचित दोन्ही सुखे भोगणे माझ्या नशिबी लिहिलेलेच नव्हते—मुन्नू मिळाला, तर कजाकी दुरावला; कजाकी आला, तर मुन्नू हातचा गेला, आणि असा गेला, की त्याच्या जाण्याचे दुःख आजही आहे. मुन्नू माझ्याच ताटात खात असे. मी जेवायला बसल्याशिवाय तोही काही खात नसे. त्याला भाताची फार आवड होती, पण त्यावर भरपूर तूप पडल्याशिवाय त्याचे समाधान होत नसे. तो माझ्याच बरोबर झोपे आणि माझ्याच बरोबर उठेही. स्वच्छता तर त्याला इतकी प्रिय होती, की मलमूत्रविसर्जनासाठी तो घराबाहेर मैदानात निघून जाई. कुत्र्यांचा त्याला तिटकारा होता; कुत्र्यांना तो घरात शिरू देत नसे. कुत्रा दिसताच ताटावरून उठे आणि त्याला पळवून घराबाहेर हाकलून देई.
कजाकी
कजाकीला डाकघरात सोडून मी जेवायला गेलो, तेव्हा मुन्नूही येऊन बसला. दोन-चारच घास खाल्ले होते, तोच एक मोठासा केसाळ झबरा कुत्रा अंगणात दिसला. मुन्नू त्याला पाहताच धावला. परक्याच्या घरात कुत्र्याचा उंदीर होतो. झबरा कुत्रा त्याला येताना पाहून पळाला. मुन्नूने आता परत यायला हवे होते, पण तो कुत्रा म्हणजे त्याच्या लेखी यमाचा दूतच होता. त्याला घरातून हाकलूनच मुन्नूचे समाधान झाले नाही. तो त्याला घराबाहेर मैदानातही पळवू लागला. इथे आपली हुकमत चालत नाही, हे बहुधा मुन्नूच्या ध्यानात राहिले नाही. तो अशा मुलखात पोचला होता, जिथे झबऱ्याचाही तितकाच हक्क होता, जितका मुन्नूचा. कुत्र्यांना पळवता पळवता मुन्नूला बहुधा आपल्या बाहुबळाचा गर्व वाटू लागला होता. घरात आपल्या पाठीशी घरधन्याचा धाक उभा असतो, हे त्याला समजत नव्हते. या मैदानात येताच झबऱ्याने उलटून मुन्नूची मान दाबून धरली. बिचाऱ्या मुन्नूच्या तोंडून आवाजसुद्धा निघाला नाही. शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला, तेव्हा मी धावलो. पाहिले, तो मुन्नू मरून पडला होता, आणि झबऱ्याचा कुठे पत्ता नव्हता.