मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
कफन
झोपडीच्या दारात बाप आणि लेक दोघे एका विझलेल्या शेकोटीपुढे गुपचूप बसले आहेत, आणि आत लेकाची तरुण बायको बुधिया बाळंतपणाच्या कळांनी आदळआपट करीत होती. मधूनमधून तिच्या तोंडून अशी जीव हादरवून टाकणारी किंकाळी निघे, की दोघेही काळीज धरून बसत. हिवाळ्याची रात्र होती; सृष्टी सामसुमीत बुडून गेली होती. सारा गाव अंधारात विरघळून गेला होता. घीसू म्हणाला—दिसतंय, वाचत नाही. दिवसभर धावपळ चाललीय; जा, बघून तरी ये. माधव चिडून म्हणाला—मरायचंच आहे तर लवकर का मरत नाही? बघून काय करू? 'तू मोठा निर्दयी आहेस रे! वर्षभर जिच्याबरोबर सुखासमाधानाने राहिलास, तिच्याशीच इतकी बेइमानी!' 'मग माझ्याच्याने तिचं तडफडणं आणि हातपाय आपटणं बघवत नाही.' चमारांचे कुटुंब होते आणि सगळ्या गावात बदनाम. घीसू एक दिवस काम करी, तर तीन दिवस आराम. माधव इतका कामचुकार होता, की अर्धा तास काम केले तर तासभर चिलीम ओढी. म्हणून त्यांना कुठे मजुरी मिळत नसे. घरात मूठभर जरी धान्य असले, तरी कामाला हात न लावण्याची त्यांची शपथ असे. दोन-चार उपास घडले, की घीसू झाडावर चढून लाकडे तोडून आणी आणि माधव बाजारात विकून येई; आणि ते पैसे टिकत तोवर दोघे इकडेतिकडे भटकत फिरत. उपासमारीची वेळ आली, की मग पुन्हा लाकडे तोडत किंवा मजुरी शोधत. गावात कामाला तोटा नव्हता. शेतकऱ्यांचे गाव होते; मेहनती माणसाला पन्नास कामे होती. पण या दोघांना लोक तेव्हाच बोलावत, जेव्हा दोघांकडून एकाचे काम मिळाले तरी त्यातच समाधान मानण्याखेरीज दुसरा इलाज उरत नसे. हे दोघे साधू असते, तर समाधान आणि धीर मिळवण्यासाठी त्यांना संयम-नियमांची मुळीच गरज पडली नसती. ते तर त्यांच्या स्वभावातच होते. विचित्र जगणे होते त्यांचे!
कफन
घरात मातीच्या दोन-चार भांड्यांखेरीज कसलीही मालमत्ता नाही. फाटक्या चिंध्यांनी आपली नग्नता झाकून जगत होते. जगाच्या काळज्यांपासून मुक्त. कर्जात बुडालेले. शिव्याही खात, मारही खात, पण कसलेही दुःख नाही. इतके दीन, की वसुलीची मुळीच आशा नसतानाही लोक त्यांना काही ना काही कर्ज देत. वाटाणे-बटाट्यांच्या हंगामात दुसऱ्यांच्या शेतांतून वाटाणे किंवा बटाटे उपटून आणत आणि भाजूनभुजून खात, किंवा दहा-पाच ऊस उपटून आणून रात्री चोखत. घीसूने याच आकाशवृत्तीवर साठ वर्षे काढली, आणि माधवही सुपुत्रासारखा बापाच्याच पावलावर पाऊल टाकून चालला होता; किंबहुना त्याचे नाव आणखीच उजळत होता. आत्ताही दोघे शेकोटीपुढे बसून बटाटे भाजत होते; कुणाच्या तरी शेतातून खणून आणलेले. घीसूची बायको तर फार दिवसांपूर्वीच वारली होती. माधवचे लग्न मागच्या वर्षी झाले होते. ही बाई आल्यापासून तिने या घराण्यात व्यवस्थेचा पाया घातला होता. दळणकांडण करून किंवा गवत खुरपून ती शेरभर पिठाची सोय करी, आणि या दोघा निर्लज्जांच्या पोटाची खळगी भरत असे. ती आल्यापासून हे दोघे आणखीच आळशी आणि आरामशीर झाले होते. किंबहुना जरा ताठ्यातही वागू लागले होते. कुणी कामाला बोलावले, तर अगदी निर्व्याजपणे दुप्पट मजुरी मागत. तीच बाई आज बाळंतपणाच्या कळांनी मरत होती, आणि हे दोघे बहुधा याचीच वाट पाहत होते, की ती एकदाची मेली की निवांत झोपावे. घीसू बटाटा काढून सोलता सोलता म्हणाला—जा, बघून ये, कशी आहे तिची अवस्था? हडळीची बाधा असेल, दुसरं काय? इथं तर मांत्रिकसुद्धा एक रुपया मागतो! माधवला भीती होती, की आपण खोलीत गेलो, तर घीसू बटाट्यांचा मोठा वाटा फस्त करील. म्हणाला—मला तिकडे जायला भीती वाटते.
कफन
'भीती कसली? मी आहे ना इथंच.' 'मग तुम्हीच जाऊन बघा ना?' 'माझी बायको मेली तेव्हा मी तीन दिवस तिच्याजवळून हललोसुद्धा नाही; आणि ही माझी लाज नाही का बाळगणार? जिचं कधी तोंडसुद्धा पाहिलं नाही, तिचं आज उघडं अंग पाहू! तिला अंगाचं भानही नसेल ना? मला पाहिलं तर मोकळेपणाने हातपायसुद्धा आपटता येणार नाहीत तिला!' 'मला वाटतं, एखादं पोरबाळ झालं, तर काय होईल? सुंठ, गूळ, तेल, काही म्हणजे काही नाही घरात!' 'सगळं येईल. देवाने दिलं तर! जे लोक आज एक पैसा देत नाहीत, तेच उद्या बोलावून रुपये देतील. मला नऊ पोरं झाली, घरात कधी काही नव्हतं; पण देवाने कसं ना कसं करून नाव पार लावलीच.' ज्या समाजात रात्रंदिवस राबणाऱ्यांची अवस्था यांच्या अवस्थेपेक्षा फारशी चांगली नव्हती, आणि शेतकऱ्यांच्या दुबळेपणाचा फायदा उठवायला जाणणारे लोक शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक संपन्न होते, तिथे अशी मनोवृत्ती तयार होणे यात काही नवल नव्हते. आम्ही तर म्हणू, घीसू शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक विचारी होता, आणि शेतकऱ्यांच्या विचारशून्य कळपात सामील होण्याऐवजी बसून खाणाऱ्यांच्या ओंगळ टोळीत जाऊन मिळाला होता. अर्थात, बसून खाणाऱ्यांचे नियम आणि नीती पाळावी इतकी ताकद मात्र त्याच्यात नव्हती. म्हणूनच त्याच्या टोळीतले इतर लोक गावचे म्होरके आणि मुखिया झाले होते, तर त्याच्याकडे सारा गाव बोट दाखवत होता. तरीही त्याला एवढे समाधान तर होतेच, की आपण फाटके असलो, तरी निदान शेतकऱ्यांसारखे जीव तोडून कष्ट तरी करावे लागत नाहीत, आणि आपल्या साधेपणाचा आणि गरिबीचा इतर लोक गैरफायदा तरी घेत नाहीत! दोघे बटाटे काढून काढून गरम गरमच खाऊ लागले. कालपासून पोटात काही नव्हते. ते थंड होऊ द्यावेत इतका धीर नव्हता.
कफन
कितीदा तरी दोघांच्या जिभा भाजल्या. सोलल्यावर बटाट्याचा बाहेरचा भाग तसा फार गरम वाटत नसे, पण दाताखाली येताच आतला भाग जीभ, घसा आणि टाळू भाजून काढी, आणि तो निखारा तोंडात धरून ठेवण्यापेक्षा तो आत पोचण्यातच जास्त खैर होती. तिथे त्याला थंड करायला भरपूर सामग्री होती. म्हणून दोघे भराभर गिळून टाकत, जरी या खटपटीत त्यांच्या डोळ्यांतून पाणी येई. घीसूला त्या वेळी ठाकुराचे वऱ्हाड आठवले; वीस वर्षांपूर्वी तो त्यात गेला होता. त्या मेजवानीत त्याला जी तृप्ती मिळाली होती, ती त्याच्या आयुष्यातली लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट होती, आणि आजही तिची आठवण ताजी होती. म्हणाला—ती पंगत विसरत नाही. तेव्हापासून तसलं जेवण, आणि तेही पोटभर, पुन्हा कधी मिळालं नाही. मुलीकडच्यांनी सगळ्यांना पोटभर पुऱ्या खाऊ घातल्या होत्या, सगळ्यांना! लहान-थोर सगळ्यांनी पुऱ्या खाल्ल्या, आणि त्याही अस्सल तुपातल्या! चटणी, रायतं, तीन तऱ्हेच्या सुक्या भाज्या, एक रस्साभाजी, दही, चटणी, मिठाई; आता काय सांगू, त्या पंगतीत काय चव लागली! कसली आडकाठी नव्हती; जे हवं ते मागा, जितकं हवं तितकं खा. लोकांनी असं खाल्लं, असं खाल्लं, की कुणाच्याने पाणीसुद्धा पिववलं नाही. पण वाढपी असे, की पत्रावळीत गरमागरम, गोल गोल, घमघमणाऱ्या कचोऱ्या टाकतच आहेत. नको नको म्हणतोय, पत्रावळीवर हात आडवा धरलाय, पण ते आपले वाढतच आहेत. आणि सगळ्यांनी तोंड धुतलं, तेव्हा पान-वेलचीसुद्धा मिळाली. पण मला पान घ्यायचं भान कुठं होतं? उभंसुद्धा राहवत नव्हतं. तडक जाऊन आपल्या कांबळ्यावर आडवा झालो. असा दर्यादिल होता तो ठाकूर! माधवने या पदार्थांची मनातल्या मनात चव घेत म्हटले—आता आपल्याला कुणी अशी पंगत देत नाही.
कफन
'आता कोण काय खाऊ घालणार? तो जमानाच वेगळा होता. आता सगळ्यांना काटकसर सुचते. लग्नकार्यात खर्च करू नका, क्रियाकर्मात खर्च करू नका. विचारा, गरिबांचा माल गोळा करून करून ठेवणार कुठं? गोळा करण्यात तर काही कसर नाही. हां, खर्चात मात्र काटकसर सुचते!' 'तुम्ही वीसेक पुऱ्या खाल्ल्या असतील?' 'विसापेक्षा जास्त खाल्ल्या होत्या!' 'मी पन्नास खाल्ल्या असत्या!' 'पन्नासपेक्षा कमी मी खाल्ल्या नसतील. चांगला पठ्ठा होतो. तू तर माझ्या निम्मासुद्धा नाहीस.' बटाटे खाऊन दोघांनी पाणी प्यायले आणि तिथेच शेकोटीपुढे आपापली धोतरे पांघरून, पाय पोटाशी घेऊन झोपी गेले. जणू दोन मोठमोठे अजगर वेटोळे घालून पडले आहेत. आणि बुधिया अजूनही कण्हत होती. २ सकाळी माधवने खोलीत जाऊन पाहिले, तर त्याची बायको थंड पडली होती. तिच्या तोंडावर माश्या घोंगावत होत्या. दगडासारखे झालेले डोळे वर लागले होते. सारे अंग धुळीने माखले होते. तिच्या पोटातच मूल मेले होते. माधव धावत घीसूकडे आला. मग दोघे मोठमोठ्याने हाय हाय करू लागले आणि छाती बडवू लागले. शेजाऱ्यांनी हा आक्रोश ऐकला, तेव्हा ते धावत आले आणि जुन्या रीतीप्रमाणे या अभाग्यांची समजूत घालू लागले. पण फार रडण्या-ओरडण्याला सवड नव्हती. कफनाची आणि लाकडांची तजवीज करायची होती. घरात पैशाचा पत्ता असा नव्हता, जसा घारीच्या घरट्यात मांसाचा. बाप-लेक रडत रडत गावच्या जमीनदाराकडे गेले. त्यांना या दोघांच्या तोंडाचाही तिटकारा होता. कितीदा तरी त्यांनी यांना स्वतःच्या हातांनी बडवले होते; चोरी केल्याबद्दल, कबूल करूनही कामावर न आल्याबद्दल. विचारले—काय रे घिसुआ, रडतोस का? आताशा तर तू कुठं दिसतसुद्धा नाहीस! दिसतंय, या गावात राहायचं नाही तुला.
कफन
घीसूने जमिनीवर डोके टेकवून, डोळ्यांत पाणी आणून म्हटले—सरकार! मोठ्या संकटात आहे. माधवची घरवाली रात्री गेली. रातभर तडफडत होती सरकार! आम्ही दोघे तिच्या उशाशी बसून होतो. औषधपाणी जे काही करता आलं, ते सगळं केलं, पण ती आम्हाला दगा देऊन गेली. आता एक भाकरी देणारंसुद्धा कुणी उरलं नाही मालक! बरबाद झालो. घर उजाड झालं. आपला गुलाम आहे; आता आपल्याशिवाय कोण तिला मातीला लावणार? आमच्या हातात जे काही होतं, ते सगळं औषधपाण्यात गेलं. सरकारचीच दया झाली, तरच तिची तिरडी उठेल. आपल्याशिवाय कुणाच्या दारात जाऊ? जमीनदारसाहेब दयाळू होते. पण घीसूवर दया करणे म्हणजे काळ्या कांबळ्यावर रंग चढवणे होते. मनात तर आले, म्हणावे, चल, चालता हो इथून. एरवी बोलावले तरी येत नाही, आज गरज पडली तेव्हा येऊन हांजी हांजी करतो आहे. हरामखोर कुठला, बदमाश! पण हा राग किंवा शिक्षेचा प्रसंग नव्हता. मनातल्या मनात चरफडत त्यांनी दोन रुपये काढून फेकले. पण सांत्वनाचा एक शब्दही तोंडातून निघाला नाही. त्याच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. जणू डोक्यावरचे ओझे उतरवले. जमीनदारसाहेबांनी दोन रुपये दिले, तेव्हा गावातल्या वाण्या-सावकारांना नाही म्हणायची हिंमत कशी होणार? घीसूला जमीनदाराच्या नावाची दवंडी पिटणेही चांगले जमत होते. कुणी दोन आणे दिले, कुणी चार आणे. तासाभरात घीसूकडे पाच रुपयांची चांगली रक्कम जमा झाली. कुठून धान्य मिळाले, कुठून लाकूड. आणि दुपारी घीसू आणि माधव बाजारातून कफन आणायला निघाले. इकडे लोक बांबूबिंबू तोडू लागले. गावातल्या हळव्या मनाच्या बायका येऊन येऊन प्रेत पाहत आणि तिच्या दीनवाण्या अवस्थेवर दोन अश्रू ढाळून निघून जात.
कफन
३ बाजारात पोचल्यावर घीसू म्हणाला—लाकूड तर तिला जाळण्यापुरतं मिळालंय, होय ना रे माधव! माधव म्हणाला—हो, लाकूड तर भरपूर आहे; आता कफन हवं. 'मग चल, एखादं हलकंसं कफन घेऊ.' 'हो, नाहीतर काय! प्रेत उचलता उचलता रात्र होईल. रात्री कफन कोण बघतो?' 'काय वाईट रीत आहे, की जिला जिवंतपणी अंग झाकायला चिंधीसुद्धा मिळाली नाही, तिला मेल्यावर नवं कफन हवं.' 'कफन प्रेताबरोबर जळूनच तर जातं.' 'मग काय, राहतं थोडंच? हेच पाच रुपये आधी मिळाले असते, तर काहीतरी औषधपाणी केलं असतं.' दोघे एकमेकांच्या मनातले ओळखून होते. बाजारात इकडेतिकडे फिरत राहिले. कधी या कापडवाल्याच्या दुकानात गेले, कधी त्याच्या दुकानात! तऱ्हेतऱ्हेची कापडे, रेशमी आणि सुती, पाहिली, पण काही पसंत पडले नाही. असे करता करता संध्याकाळ झाली. तेव्हा दोघे, कुठल्या दैवी प्रेरणेने कोण जाणे, एका मधुशाळेसमोर जाऊन पोचले. आणि जणू आधीच ठरलेल्या बेताप्रमाणे आत शिरले. तिथे थोडा वेळ दोघे घुटमळत उभे राहिले. मग घीसूने गादीसमोर जाऊन म्हटले—साहूजी, एक बाटली आम्हालाही द्या. त्यानंतर थोडा चखणा आला, तळलेले मासे आले, आणि दोघे ओसरीवर बसून शांतपणे पिऊ लागले. मातीचे अनेक पेले एकामागून एक रिचवल्यावर दोघांना झिंग चढली. घीसू म्हणाला—कफन घालून काय मिळालं असतं? शेवटी जळूनच तर जायचं. काही सुनेबरोबर तर गेलं नसतं. माधव आकाशाकडे पाहून, जणू देवांना आपल्या निष्पापपणाचे साक्षी करीत असावा, असा म्हणाला—जगाची रीत आहे, नाहीतर लोक बामणांना हजारो रुपये का देतात? कोण बघतो, परलोकात मिळतं की नाही!
कफन
'मोठ्या लोकांकडे पैसा आहे, फुंकू देत. आपल्याकडे फुंकायला काय आहे?' 'पण लोकांना काय उत्तर द्याल? लोक विचारणार नाहीत, कफन कुठंय?' घीसू हसला—अरे, सांगू की कमरेतून रुपये निसटले. खूप शोधले, मिळाले नाहीत. लोकांना विश्वास नाही बसणार, पण रुपये पुन्हा तेच देतील. माधवही हसला—या अनपेक्षित नशिबावर. म्हणाला—फार चांगली होती बिचारी! मेली, तीसुद्धा खूप खाऊपिऊ घालून! अर्ध्याहून जास्त बाटली उडाली. घीसूने दोन शेर पुऱ्या मागवल्या. चटणी, लोणचे, कलेजी. दारूच्या गुत्त्यासमोरच दुकान होते. माधव झटकन दोन पत्रावळींत सगळे सामान घेऊन आला. पुरा दीड रुपया खर्च झाला. फक्त थोडेसे पैसे उरले. दोघे या वेळी अशा ऐटीत बसून पुऱ्या खात होते, जसा रानात एखादा वाघ आपली शिकार फस्त करीत असावा. ना जाब द्यायचे भय होते, ना बदनामीची फिकीर. या सगळ्या भावनांवर त्यांनी फार पूर्वीच विजय मिळवला होता. घीसू तत्त्वज्ञान्याच्या थाटात म्हणाला—आपला आत्मा प्रसन्न होतो आहे, तर तिला पुण्य नाही का लागणार? माधवने श्रद्धेने मान लववून दुजोरा दिला—लागेल, लागेल, नक्की लागेल. देवा, तू अंतर्यामी आहेस. तिला वैकुंठाला ने. आम्ही दोघे मनापासून आशीर्वाद देतो आहोत. आज जे जेवण मिळालं, ते उभ्या आयुष्यात कधी मिळालं नव्हतं. क्षणभराने माधवच्या मनात एक शंका जागी झाली. म्हणाला—का हो दादा, आपणही कधी ना कधी तिथं जाणारच ना? घीसूने या भोळ्याभाबड्या प्रश्नाचे काही उत्तर दिले नाही. परलोकाच्या गोष्टींचा विचार करून त्याला या आनंदात विघ्न आणायचे नव्हते. 'तिथं आपल्याला विचारलं, की तुम्ही मला कफन का नाही दिलं, तर काय सांगाल?'
कफन
'सांगू तुझं डोंबल!' 'विचारील ती, नक्की!' 'तुला कसं ठाऊक की तिला कफन मिळणार नाही? तू मला इतका गाढव समजतोस? साठ वर्षं जगात काय गवत उपटत काढली? तिला कफन मिळेल, आणि छान मिळेल!' माधवला विश्वास बसला नाही. म्हणाला—कोण देणार? रुपये तर तुम्ही फस्त केले. ती तर मला विचारील. तिच्या भांगात शेंदूर तर मी भरला होता. घीसू तापून म्हणाला—मी सांगतो ना, तिला कफन मिळेल! तू ऐकत का नाहीस? 'कोण देणार, सांगत का नाही?' 'तेच लोक देतील, ज्यांनी या वेळी दिलं. हां, पुढच्या वेळी मात्र रुपये आपल्या हाती येणार नाहीत.' जसजसा अंधार वाढत गेला आणि ताऱ्यांची चमक तीव्र होत गेली, तसतशी मधुशाळेची रौनकही वाढत गेली. कुणी गात होता, कुणी फुशारक्या मारत होता, कुणी आपल्या सोबत्याच्या गळ्यात पडत होता. कुणी आपल्या दोस्ताच्या तोंडाला मातीचा पेला लावत होता. तिथल्या वातावरणात धुंदी होती, हवेत नशा. कितीतरी जण इथे येऊन एका घोटातच मस्त होत. दारूपेक्षा इथली हवाच त्यांना जास्त चढे. आयुष्यातल्या अडचणी त्यांना इथे ओढून आणत, आणि थोडा वेळ ते हे विसरून जात, की आपण जगतो आहोत की मरतो आहोत. की ना जगतो, ना मरतो. आणि हे दोघे बाप-लेक अजूनही मजेत चवीचवीने घोट घेत होते. सगळ्यांच्या नजरा यांच्यावर खिळल्या होत्या. दोघे किती नशीबवान आहेत! अख्खी बाटली दोघांच्या मधोमध आहे. पोटभर खाऊन माधवने उरलेल्या पुऱ्यांची पत्रावळ उचलून एका भिकाऱ्याला दिली; तो उभा राहून भुकेल्या डोळ्यांनी यांच्याकडे पाहत होता. आणि देण्यातला मोठेपणा, आनंद आणि उल्हास त्याने आयुष्यात पहिल्यांदा अनुभवला.
कफन
घीसू म्हणाला—घेऊन जा, भरपूर खा आणि आशीर्वाद दे! जिची कमाई आहे, ती तर मेली. पण तुझा आशीर्वाद तिला नक्की पोचेल. रोमारोमातून आशीर्वाद द्या, मोठ्या कष्टाच्या कमाईचे पैसे आहेत! माधव पुन्हा आकाशाकडे पाहून म्हणाला—ती वैकुंठाला जाईल दादा, वैकुंठाची राणी होईल. घीसू उठून उभा राहिला आणि जणू उल्हासाच्या लाटांवर तरंगत म्हणाला—हो, बेटा, वैकुंठाला जाईल. कुणाला छळलं नाही, कुणाला दडपलं नाही. मरता मरता आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी हौस पुरी करून गेली. ती नाही वैकुंठाला जाणार, तर काय हे गलेलठ्ठ लोक जाणार, जे गरिबांना दोन्ही हातांनी लुटतात, आणि आपलं पाप धुवायला गंगेत न्हातात आणि देवळांत जल वाहतात? श्रद्धेचा हा रंग लगेच पालटला. चंचलपणा हा नशेचा गुणच असतो. दुःखाचा आणि निराशेचा झटका आला. माधव म्हणाला—पण दादा, बिचारीने आयुष्यात फार दुःख भोगलं. किती दुःख सोसून मेली! तो डोळ्यांवर हात ठेवून रडू लागला, हंबरडे फोडून फोडून. घीसूने समजूत घातली—का रडतोस बेटा, आनंद मान, की ती मायाजालातून मुक्त झाली, जंजाळातून सुटली. मोठी भाग्यवान होती, एवढ्या लवकर मायामोहाची बंधने तोडून गेली. आणि दोघे उभे राहून गाऊ लागले—'ठगणी, का गं डोळे मिचकावतेस! ठगणी!' दारुड्यांचे डोळे यांच्यावर लागले होते, आणि हे दोघे आपल्याच धुंदीत मस्त गात होते. मग दोघे नाचू लागले. उड्याही मारल्या, बागडलेही. पडलेही, कंबरही लचकवली. हावभावही केले, अभिनयही केला. आणि शेवटी नशेत धुंद होऊन तिथेच कोसळले.