मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
लॉटरी
झटपट श्रीमंत व्हायची हाव कोणाला नसते? त्या दिवसांत लॉटरीची तिकिटे आली, तेव्हा माझा मित्र विक्रम याचे वडील, काका, अम्मा आणि भाऊ या सगळ्यांनी एकेक तिकीट विकत घेतले. कोणाचे नशीब जोर करील, कोणी सांगावे? कोणाच्याही नावाने येवो, पैसा तर घरातच राहील! पण विक्रमला धीर धरवेना. इतरांच्या नावाने पैसे आले, तर मग त्याला कोण विचारतो? फार झाले तर पाच-दहा हजार त्याच्या हातावर ठेवतील. एवढ्या पैशांत त्याचे काय होणार? आयुष्यात त्याचे बेत मोठमोठे होते. पहिले म्हणजे त्याला साऱ्या जगाची सफर करायची होती, अगदी कानाकोपऱ्याची. पेरू, ब्राझील, टिंबक्टू, होनोलुलू हे सगळे त्याच्या प्रोग्रॅममध्ये होते. वावटळीसारखे महिना-दोन महिने भिरभिरून परत येणाऱ्यांतला तो नव्हता. एकेका ठिकाणी कित्येक दिवस मुक्काम ठोकून तिथली राहणी, रीतिरिवाज वगैरेंचा अभ्यास करायचा आणि जगप्रवासावर एक भलामोठा ग्रंथ लिहायचा, अशी त्याची इच्छा होती. मग त्याला एक फार मोठे ग्रंथालय उभारायचे होते; त्यात जगभरातल्या उत्तमोत्तम साहित्यकृती जमा करायच्या. ग्रंथालयासाठी दोन लाखांपर्यंत खर्च करायला तो तयार होता; आणि बंगला, मोटार, फर्निचर या तर किरकोळ गोष्टी. वडिलांच्या किंवा काकांच्या नावाने पैसे आले, तर पाच हजारांच्या वर काही मिळायचा रंग नाही; अम्माच्या नावाने आले, तर वीस हजार मिळतील; पण भाऊसाहेबांच्या नावाने आले, तर त्याच्या हाती फुटकी कवडीही लागायची नाही. तो स्वाभिमानी होता.
लॉटरी
घरच्यांकडूनसुद्धा खैरात किंवा बक्षीस म्हणून काही घेणे त्याला अपमानासारखे वाटे. तो नेहमी म्हणे—बाबा रे, कोणापुढे हात पसरण्यापेक्षा एखाद्या खड्ड्यात बुडून मेलेले बरे. माणसाला या जगात स्वतःसाठी जागा काढता येत नसेल, तर त्याने इथून प्रस्थान ठेवावे. तो अगदीच बेकार होता. घरात लॉटरीच्या तिकिटासाठी त्याला पैसे कोण देणार, आणि तो मागणार तरी कसा? खूप विचार करून तो म्हणाला—आपण दोघे भागीत तिकीट का घेऊ नये? ही कल्पना मलाही पसंत पडली. मी त्या दिवसांत शाळामास्तर होतो. वीस रुपये मिळत. त्यात मोठ्या मुश्किलीने गुजराण होई. दहा रुपयांचे तिकीट घेणे म्हणजे माझ्या दृष्टीने हत्ती विकत घेणे होते. हां, एक महिना दूध, तूप, न्याहारी आणि वरचे सारे खर्च छाटले, तर पाच रुपयांची सोय होण्यासारखी होती. तरीही मन कचरत होते. कुठून तरी एखादी वरकड रक्कम हाती आली, तर जरा हिंमत वाढेल. विक्रम म्हणाला—म्हणशील तर माझी अंगठी विकून टाकू? सांगेन, बोटातून निसटून पडली. अंगठी दहा रुपयांपेक्षा कमीची नव्हती. तिच्या पैशांत अख्खे तिकीट आले असते. काहीही खर्च न करता तिकिटात निम्मी भागी मिळत असेल, तर वाईट काय? इतक्यात विक्रम पुन्हा म्हणाला—पण बाबा, तुला रोख द्यावे लागतील. पाच रुपये रोख घेतल्याशिवाय मी भागी करणार नाही. आता मला औचित्याची आठवण झाली. म्हणालो—नको, हे वाईट आहे. चोरी उघडकीला आली, तर खजील व्हावे लागेल, आणि तुझ्याबरोबर मलाही बोलणी खावी लागतील.
लॉटरी
शेवटी असे ठरले, की जुनी पुस्तके एखाद्या सेकंडहँड पुस्तकांच्या दुकानात विकून टाकायची आणि त्या पैशांतून तिकीट घ्यायचे. पुस्तकांइतकी बिनगरजेची वस्तू आमच्यापाशी दुसरी नव्हती. आम्ही दोघे बरोबरच मॅट्रिक पास झालो होतो; आणि ज्यांनी पदव्या घेतल्या, डोळे फोडून घेतले आणि घरचे पैसे उधळले, तेही जोडे झिजवीत हिंडत आहेत हे पाहून आम्ही तिथेच हॉल्ट केला. मी शाळामास्तर झालो आणि विक्रम उनाडक्या करू लागला. आमची जुनी पुस्तके आता वाळवीखेरीज आमच्या कोणत्याच कामाची नव्हती. आम्हांला जेवढी चाटता आली तेवढी चाटली, त्यांचे सत्त्व काढून घेतले; आता ती उंदीर चाटोत की वाळवी, आम्हांला पर्वा नव्हती. आज आम्ही दोघांनी ती अडगळीतून बाहेर काढली आणि झाडूनपुसून त्यांचे एक मोठेसे गाठोडे बांधले. मी पडलो मास्तर; एखाद्या बुकसेलरच्या दुकानात पुस्तके विकताना मला संकोच वाटे. मला सगळेच ओळखत. म्हणून ही कामगिरी विक्रमवर सोपवली गेली, आणि अर्ध्या तासात तो दहा रुपयांची एक नोट घेऊन उड्या मारीत येऊन पोहोचला. त्याला इतका खूश मी कधीच पाहिला नव्हता. पुस्तके चाळीस रुपयांपेक्षा कमीची नव्हती; पण हे दहा रुपये त्या वेळी आम्हांला जणू वाटेत पडलेले सापडले. आता तिकिटात निम्मी भागी होणार. दहा लाखांची रक्कम मिळणार. पाच लाख माझ्या वाट्याला येणार, पाच विक्रमच्या. आम्ही आपले यातच गुंग होतो. मी समाधानाचा भाव दाखवीत म्हणालो—पाच लाख काही थोडे नसतात, बरे. विक्रम इतका समाधानी नव्हता. म्हणाला—पाच लाख कसले, आपल्याला तर या घटकेला पाचशेसुद्धा खूप आहेत बाबा; पण आयुष्याचा प्रोग्रॅम मात्र बदलावा लागला. माझी प्रवासाची स्कीम तर टळणे शक्य नाही. हां, ग्रंथालय गडप झाले. मी हरकत घेतली—अरे, प्रवासात तू दोन लाखांपेक्षा जास्त तर खर्च करणार नाहीस ना?
लॉटरी
'छे हो, त्याचे बजेट आहे साडेतीन लाखांचे. सात वर्षांचा प्रोग्रॅम आहे. वर्षाला पन्नास हजार रुपयेच तर झाले.' 'महिन्याला चार हजार म्हण. मला वाटते, दोन हजारांत तू अगदी आरामात राहू शकशील.' विक्रम तापून म्हणाला—मला थाटात राहायचे आहे, भिकाऱ्यांसारखे नाही. 'दोन हजारांतही तू थाटात राहू शकतोस.' 'जोपर्यंत तुम्ही तुमच्या वाट्यातले दोन लाख मला देत नाही, तोपर्यंत ग्रंथालय उभे राहायचे नाही.' 'तुझे ग्रंथालय शहरात अजोड असलेच पाहिजे असे काही नाही.' 'मी तर अजोडच बांधणार.' 'तो तुझा अधिकार; पण माझ्या पैशांतून तुला काही मिळायचे नाही. माझ्या गरजा पाहा. तुझ्या घरी भरपूर जायदाद आहे. तुझ्या डोक्यावर कसलेच ओझे नाही; माझ्या डोक्यावर तर साऱ्या प्रपंचाचा भार आहे. दोन बहिणींची लग्ने आहेत, दोन भावांचे शिक्षण आहे, नवे घर बांधायचे आहे. मी तर ठरवून टाकले आहे, की सगळे पैसे सरळ बँकेत जमा करीन. त्यांच्या व्याजावर भागवीन. काही अशा अटी घालून ठेवीन, की माझ्यामागेही कोणाला या रकमेला हात लावता येऊ नये.' विक्रम सहानुभूतीने म्हणाला—हो, अशा स्थितीत तुझ्याकडे काही मागणे म्हणजे अन्याय आहे. असो, मीच तोशीस सोसीन. पण बँकेच्या व्याजाचा दर तर फार उतरला आहे. आम्ही कित्येक बँकांचे व्याजाचे दर पाहिले; मुदतीच्या ठेवीचेही, सेव्हिंग बँकेचेही. दर खरोखरच फार कमी होता. शेकडा दोन-अडीच रुपये व्याजाने पैसे ठेवणे व्यर्थ आहे. त्यापेक्षा सावकारीचा धंदा का सुरू करू नये? विक्रमही प्रवासाला जाणार नाही. दोघांच्या भागीत पेढी चालेल; थोडी पुंजी जमली, की मग तो प्रवास करील. सावकारीत व्याजही चांगले मिळेल आणि आपला रुबाबही राहील. हां, चांगला जामीन असल्याशिवाय कोणालाही पैसा द्यायचा नाही, मग असामी कितीही पतदार का असेना. आणि जामिनावर तरी पैसे द्यायचेच कशाला? मालमत्ता गहाण लिहून घेऊनच पैसे देऊ. मग कसलाच घोर राहणार नाही.
लॉटरी
हाही टप्पा पार पडला. आता प्रश्न निघाला, की तिकिटावर नाव कोणाचे असावे. आपलेच नाव असावे असा विक्रमने फार हट्ट धरला; त्याचे नाव नसेल, तर तो तिकीटच घेणार नाही. दुसरा उपाय न दिसल्यामुळे मी कबूल केले, आणि तेही कसलीही लिखापढी न करता; त्यामुळे पुढे मला फार मनस्ताप झाला. ( २ ) वाट पाहण्याचे दिवस एकेक करून सरू लागले. पहाट होताच आमचे डोळे कॅलेंडरकडे जात. माझे घर विक्रमच्या घराला लागूनच होते. शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यावर आम्ही दोघे एकत्र बसून आपापले मनोरथ रचीत असू, आणि तेही अशा कुजबुजीत, की कोणाच्या कानी पडू नये. तिकीट घेतल्याचे गुपित आम्हांला लपवून ठेवायचे होते. हे गुपित जेव्हा सत्याचे रूप धारण करील, तेव्हा लोक केवढे थक्क होतील! त्या प्रसंगातला नाट्यमय आनंद आम्हांला गमवायचा नव्हता. एक दिवस बोलता बोलता लग्नाचा विषय निघाला. विक्रम तत्त्वज्ञाच्या गांभीर्याने म्हणाला—बाबा, लग्नबिग्नाचे लचांड काही मला गळ्यात बांधून घ्यायचे नाही! फुकटची काळजी आणि हायहाय. बायकोचे नखरे झेलण्यातच कितीतरी पैसे उडून जातील. मी याला विरोध केला—हो, ते खरे; पण आयुष्यातल्या सुखदुःखांत कोणी सोबती नसेल, तर जगण्यात मजा ती काय? वैवाहिक जीवनाविषयी मी तरी इतका विरक्त नाही. हां, सोबती असा हवा, की जो शेवटपर्यंत साथ देईल; आणि असा सोबती पत्नीशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही.
लॉटरी
विक्रम गरजेपेक्षा जास्तच तिरसटपणे म्हणाला—असो, ज्याचा त्याचा दृष्टिकोन. तुम्हांला बायको लखलाभ, कुत्र्यासारखे तिच्या मागे मागे फिरणे लखलाभ, आणि पोरे म्हणजे जगातले सर्वांत मोठे वैभव आणि ईश्वराची सर्वांत मोठी कृपा असे मानणेही लखलाभ. हा बंदा तर मोकळाच राहणार; आपल्या मर्जीने वाटेल तिथे गेला, वाटेल तेव्हा उडाला आणि वाटेल तेव्हा घरी आला. असे नाही, की सदा न् कदा एक पहारेकरी तुमच्या डोक्यावर बसलेला. घरी यायला जरासा उशीर झाला, की लगेच जाब विचारला जातो, इतका वेळ कुठे होतात? तुम्ही कुठे बाहेर निघालात, की लगेच प्रश्न, कुठे चाललात? आणि दुर्दैवाने पत्नीबाईही बरोबर निघाल्या, तर मग बुडून मरण्याखेरीज तुम्हांला दुसरा मार्गच उरत नाही. नाही भैया, मला तुमच्याविषयी जराही सहानुभूती नाही. पोराला जरासे पडसे झाले, की तुम्ही जीव तोडून धावत सुटलात होमिओपॅथिक डॉक्टरकडे. जरा वय झाले, की पोरे देवाला साकडे घालू लागतात, की आता तुम्ही प्रस्थान ठेवावे आणि त्यांनी चैन उडवावी. संधी मिळाली, तर तुम्हांला विष चारले आणि जाहीर केले की तुम्हांला कॉलरा झाला होता. मी या जंजाळात पडत नाही. कुंती आली. ती विक्रमची धाकटी बहीण, अकराएक वर्षांची. सहावीत शिकत होती आणि न चुकता नापास होत होती. भारी वात्रट, भारी खट्याळ! तिने इतक्या धाडकन दार उघडले, की आम्ही दोघे दचकून उठून उभे राहिलो. विक्रम रागावून म्हणाला—तू फार द्वाड आहेस कुंती; तुला इथे कोणी बोलावले? कुंतीने गुप्त पोलिसासारखी खोलीभर नजर फिरवून म्हटले—तुम्ही लोक सदानकदा इथे दार लावून बसून कसल्या गप्पा मारीत असता? जेव्हा पाहावे तेव्हा इथेच बसलेले. ना कुठे फिरायला जाता, ना खेळ बघायला; काही जादूमंतर जागवीत असाल, नाही?
लॉटरी
विक्रम तिची मान पकडून हलवीत म्हणाला—हो, एक मंतर जागवतो आहोत, ज्याने तुला असा नवरा मिळेल, की जो रोज मोजून पाच हंटर ओढील, सटासट! कुंती त्याच्या पाठीवर बसून म्हणाली—मी अशा नवऱ्याशी लग्न करीन, जो माझ्यापुढे उभा राहून शेपूट हलवीत राहील. मी मिठाईचे द्रोण फेकीन आणि तो चाटील. जरा जरी कुरकुर केली, तर कान लाल करीन. अम्माला लॉटरीचे पैसे मिळाले, की ती मला पन्नास हजार देणार आहे. बस्स, मग चैन करीन. मी दोन्ही वेळा ठाकूरजींपाशी अम्मासाठी प्रार्थना करते. अम्मा म्हणते, कुमारिकांची प्रार्थना कधी फुकट जात नाही. माझे मन तर सांगते, अम्माला नक्की पैसे मिळणार. मला आठवले, एकदा मी खेड्यात माझ्या आजोळी गेलो होतो, तेव्हा दुष्काळ पडला होता. भाद्रपद महिना आला होता; पण पाण्याचा थेंब नाही. तेव्हा लोकांनी वर्गणी काढून गावातल्या सगळ्या कुमारिकांना जेवण घातले होते. आणि त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मुसळधार पाऊस पडला होता. कुमारिकांच्या प्रार्थनेत नक्कीच सामर्थ्य असते. मी विक्रमकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले, विक्रमने माझ्याकडे. डोळ्यांनीच आम्ही सल्लामसलत केली आणि निर्णयही घेऊन टाकला. विक्रम कुंतीला म्हणाला—बरे, तुला एक गोष्ट सांगू, कोणाला सांगणार तर नाहीस? नाही, तू तर फार शहाणी मुलगी आहेस, कोणाला सांगणार नाहीस. या खेपेला मी तुझा खूप अभ्यास घेईन आणि तुला पास करून देईन. गोष्ट अशी, की आम्ही दोघांनीही लॉटरीचे तिकीट घेतले आहे. आमच्यासाठीही देवाची प्रार्थना करीत जा; आम्हांला पैसे मिळाले, तर तुला छान छान दागिने करून देऊ. खरेच! कुंतीचा विश्वास बसेना. आम्ही शपथा घेतल्या. ती नखरे करू लागली. तिला नखशिखान्त सोन्याने आणि हिऱ्यांनी मढवून टाकण्याची आम्ही प्रतिज्ञा केली, तेव्हा कुठे ती आमच्यासाठी प्रार्थना करायला राजी झाली.
लॉटरी
पण तिच्या पोटात मणांनी मिठाई पचू शकत होती, ही एवढीशी गोष्ट मात्र पचली नाही. ती थेट आत पळाली आणि क्षणात साऱ्या घरभर ही बातमी पसरली. आता जो तो विक्रमला फैलावर घेतो आहे; अम्माही, काकाही, वडीलही; केवळ विक्रमच्या हिताच्या कळकळीने की आणखी कोणत्या भावनेने, कोण जाणे—बसल्या बसल्या तुला मूर्खपणाच सुचतो. पैसे नेऊन पाण्यात टाकलेस. घरात इतक्या माणसांनी तिकिटे घेतलीच होती, तुला घ्यायची काय गरज होती? तुला त्यातून काही मिळाले नसते का? आणि तुम्हीसुद्धा मास्तरसाहेब, अगदीच बावळट आहात. पोराला चांगल्या गोष्टी कसल्या शिकवणार, उलट त्याचे वाटोळे करून टाकता आहात. विक्रम पडला लाडका लेक. त्याला आणखी काय बोलणार? रुसून एक-दोन वेळा जेवला नाही, तर आफतच ओढवायची. सगळा राग माझ्यावर निघाला. याच्या संगतीने पोरगा बिघडत चालला आहे. 'पर उपदेश कुशल बहुतेरे' ही म्हण माझ्या डोळ्यांसमोर होती. मला माझ्या लहानपणातला एक प्रसंग आठवला. होळीचा दिवस होता. दारूची एक बाटली मागवलेली होती. माझे मामासाहेब त्या दिवसांत आमच्याकडे आलेले होते. मी गुपचूप कोठडीत जाऊन ग्लासात घोटभर दारू ओतली आणि पिऊन टाकली. अजून घसा जळतच होता आणि डोळे लालच होते, तोच मामासाहेब कोठडीत आले आणि त्यांनी मला जणू घरफोडी करताना रंगेहाथ पकडले; आणि असे संतापले, असे संतापले, की माझे काळीज सुकून खारकेसारखे झाले. अम्मानेही खडसावले, वडिलांनीही खडसावले; आसवे ढाळून मला त्यांचा क्रोधाग्नी शांत करावा लागला. आणि दुपारीच मामासाहेब नशेने बेभान होऊन गाऊ लागले, मग रडले, मग त्यांनी अम्माला शिव्या दिल्या, दादांनी अडवले तेव्हा त्यांना मारायला धावले, आणि शेवटी ओकून जमिनीवर बेशुद्ध पडलेले दिसले.
लॉटरी
( ३ ) विक्रमचे वडील थोरले ठाकूरसाहेब आणि काका धाकटे ठाकूरसाहेब हे दोघेही जडवादी होते; पूजापाठाची टिंगल करणारे, पक्के नास्तिक. पण आता दोघेही मोठे निष्ठावान आणि ईश्वरभक्त झाले होते. थोरले ठाकूरसाहेब तर पहाटे गंगास्नानाला जात आणि देवळांच्या फेऱ्या घालीत दुपारी सर्वांगाला चंदन फासून घरी परतत. धाकटे ठाकूरसाहेब घरीच गरम पाण्याने स्नान करीत आणि संधिवाताने जखडलेले असूनही रामनाम लिहायला बसत. ऊन पडले, की पार्ककडे निघून जात आणि मुंग्यांना पीठ घालीत. संध्याकाळ होताच दोघे भाऊ आपल्या ठाकूरद्वारात जाऊन बसत आणि मध्यरात्रीपर्यंत भागवताची कथा तल्लीन होऊन ऐकत. विक्रमचे थोरले भाऊ प्रकाश यांचा साधुमहात्म्यांवर अधिक विश्वास होता. ते मठ, साधूंचे आखाडे आणि कुट्या पालथ्या घालीत; आणि माताजींना तर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत स्नान, पूजा आणि व्रत यांखेरीज दुसरे कामच नव्हते. त्या वयातही त्यांना नटण्यामुरडण्याची हौस होती; पण हल्ली त्या पुरत्या तपस्विनी बनल्या होत्या. लोक उगाच लालसेला नावे ठेवतात. मला तर वाटते, आपल्यात जी ही भक्ती, निष्ठा आणि धर्मप्रेम आहे, ते केवळ आपल्या लालसेमुळे, आपल्या हावेमुळे. आपला धर्म आपल्या स्वार्थाच्या बळावर उभा आहे. हाव माणसाच्या मनावर आणि बुद्धीवर एवढा संस्कार करू शकते, हा माझ्यासाठी अगदी नवा अनुभव होता. आम्ही दोघेही ज्योतिष्यांना आणि पंडितांना प्रश्न विचारून अधूनमधून स्वतःला दुःखी करून घेत असू.
लॉटरी
लॉटरीचा दिवस जसजसा जवळ येत चालला, तसतशी आमच्या मनाची शांती उडत चालली. मन सदैव तिकडेच टांगलेले असे. मला आपोआप, विनाकारण शंका येऊ लागली, की विक्रमने मला वाटा द्यायला नकार दिला, तर मी काय करू? साफ नाकारले, की तू तिकिटात भागी केलीच नाहीस, तर? ना काही लेखी आहे, ना दुसरा कोणता पुरावा. सारे काही विक्रमचे मन कसे राहते यावर अवलंबून. त्याचे मन जरासे डळमळले, की माझा कारभार आटोपला. कुठे दाद मागता येणार नाही, तोंडसुद्धा उघडता येणार नाही. आता काही बोलावे म्हटले तरी फायदा नाही. त्याच्या मनात पाप आले असेल, तर तो आत्तापासूनच नाकारील; आले नसेल, तर या संशयाने त्याच्या जिव्हारी लागेल. तो काही तसला माणूस नाही. पण बाबा, दौलत हाती आल्यावर इमान शाबूत ठेवणे कठीण असते! अजून तर पैसे मिळालेले नाहीत. या घटकेला इमानदार व्हायला काय खर्च पडतो? कसोटीची वेळ तर तेव्हा येईल, जेव्हा दहा लाख रुपये हातात असतील. मी माझे अंतःकरण चाचपून पाहिले—तिकीट माझ्या नावाचे असते आणि मला दहा लाख मिळाले असते, तर मी निम्मे पैसे हूं की चूं न करता विक्रमच्या हवाली केले असते का? कोण सांगणार! पण जास्त शक्यता हीच होती, की मी टाळाटाळ केली असती, म्हटले असते—तू मला पाच रुपये उसने दिले होतेस. त्याचे दहा घे, शंभर घे, आणखी घेऊन काय करणार? पण नाही, माझ्या हातून इतकी बेइमानी झाली नसती. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे वर्तमानपत्र पाहत होतो, तोच विक्रम एकदम म्हणाला—आपले तिकीट लागलेच, तर मला हळहळ वाटेल, की उगाच तुझ्याशी भागी केली! तो निष्कपटपणे हसला; पण ही होती त्याच्या अंतरंगाची झलक, जी तो विनोदाच्या आड लपवू पाहत होता.
लॉटरी
मी चमकून म्हणालो—खरे? पण तशीच हळहळ मलाही वाटू शकते ना? 'पण तिकीट तर माझ्या नावाचे आहे ना?' 'त्याने काय होते?' 'बरे, समज, मी तुझी भागी नाकारली तर?' माझे रक्त गोठले. डोळ्यांपुढे अंधारी आली. 'तुझी नियत इतकी खोटी असेल असे मला वाटत नाही.' 'पण तसे होणे फार शक्य आहे. पाच लाख! विचार कर! डोके गरगरते.' 'तर मग बाबा, अजून सारे ठीक आहे तोवरच लिखापढी करून टाक. हा संशय राहावाच कशाला?' विक्रम हसून म्हणाला—तू फार संशयी आहेस यार! मी तुझी परीक्षा पाहत होतो. असे कुठे होईल का? पाच लाख काय, पाच कोटी असले, तरी देवाची इच्छा असेल तर नियत ढळू देणार नाही. पण त्याच्या या आश्वासनांवर माझा मुळीच विश्वास बसला नाही. मनात एक संशय घर करून बसला. मी म्हणालो—ते मला ठाऊक आहे, की तुझी नियत कधीच ढळायची नाही; पण लिखापढी करून घ्यायला काय हरकत आहे? 'निरर्थक आहे.' 'निरर्थक तर निरर्थक.' 'मग पक्क्या कागदावर लिहावे लागेल. दहा लाखांची कोर्ट-फीच साडेसात हजार होईल. कोणत्या भ्रमात आहात तुम्ही!' मी विचार केला, साध्या लिखापढीच्या जोरावर मला कायदेशीर कारवाई करता येणार नाही, न का येईना! पण यांना खजील करण्याची, यांची बेअब्रू करण्याची, सर्वांसमक्ष यांना बेइमान ठरवण्याची संधी तरी माझ्या हाती येईल; आणि जगात बदनामीचे भय नसेल, तर माणूस काय काय करील कोण जाणे. अपमानाच्या भयाचा धाक कायद्याच्या भयापेक्षा जराही कमी नसतो. म्हणालो—माझा साध्या कागदावरही विश्वास बसेल. विक्रम बेफिकिरीने म्हणाला—ज्या कागदाला कायद्याने काहीच किंमत नाही, तो लिहून वेळ का वाया घालवायचा?
लॉटरी
माझी खात्री झाली, की विक्रमच्या मनात आत्तापासूनच पाप शिरले आहे. नाही तर साधा कागद लिहायला अडचण ती कसली? चिडून म्हणालो—तुझी नियत आत्तापासूनच बिघडली. तो निर्लज्जपणे म्हणाला—मग काय, अशा स्थितीत तुझी नियत बदलली नसती असे तुला सिद्ध करायचे आहे? 'माझी नियत इतकी कच्ची नाही.' 'राहू दे, राहू दे. मोठा आला नियतवाला! भल्याभल्यांना पाहिले आहे!' 'तुला आत्ताच्या आत्ता लिहून द्यावे लागेल. माझा तुझ्यावर विश्वास उरला नाही.' 'तुझा माझ्यावर विश्वास नसेल, तर मीही लिहून देत नाही.' 'म्हणजे तुला वाटते, तू माझे पैसे गिळंकृत करशील?' 'कोणाचे पैसे आणि कसले पैसे?' 'मी सांगून ठेवतो विक्रम, आपल्या दोस्तीचाच शेवट होईल; इतकेच काय, याहूनही कितीतरी भयंकर परिणाम होईल.' हिंसेची एक ज्वाळाच माझ्या आत भडकून उठली. इतक्यात दिवाणखान्यातून खडाजंगीचा आवाज ऐकू आला आणि माझे लक्ष तिकडे गेले. तिथे दोघे ठाकूर बसत असत. आदर्श भावांमध्ये असावे तसे त्यांचे सख्य होते. राम-लक्ष्मणांतही एवढेच असेल. खडाजंगी तर सोडाच, त्यांच्यात कधी वाद झाल्याचेही मी ऐकले नव्हते. थोरले ठाकूर जे म्हणतील, तो धाकट्या ठाकुरांसाठी कायदा असे; आणि धाकट्या ठाकुरांचा कल पाहूनच थोरले ठाकूर कोणतीही गोष्ट बोलत. आम्हां दोघांना आश्चर्य वाटले. दिवाणखान्याच्या दाराशी जाऊन उभे राहिलो. दोघे भाऊ आपापल्या खुर्च्यांवरून उठून उभे राहिले होते, एकेक पाऊल पुढेही सरकले होते; डोळे लाल, चेहरे विकृत, कपाळाला आठ्या, मुठी आवळलेल्या. वाटत होते, आता हातघाई होणारच. धाकटे ठाकूर आम्हांला पाहून मागे सरकत म्हणाले—एकत्र कुटुंबात जे काही, जिथून कुठून आणि कोणाच्याही नावाने येईल, ते सर्वांचे असते, समान.
लॉटरी
थोरल्या ठाकुरांनी विक्रमला पाहून आणखी एक पाऊल पुढे टाकले—मुळीच नाही; मी एखादा गुन्हा केला, तर पकडला जाईन मी, एकत्र कुटुंब नाही. शिक्षा मला होईल, एकत्र कुटुंबाला नाही. हा वैयक्तिक प्रश्न आहे. 'याचा निकाल कोर्टात लागेल.' 'खुशाल कोर्टात जा; माझ्या मुलाच्या, माझ्या बायकोच्या किंवा माझ्या नावाने लॉटरी लागली, तर तुमचा तिच्याशी काहीही संबंध असणार नाही; अगदी तसाच, जसा तुमच्या नावाने लॉटरी लागली, तर माझा, माझ्या बायकोचा किंवा माझ्या मुलाचा तिच्याशी काही संबंध असणार नाही.' 'तुमची अशी नियत आहे हे मला ठाऊक असते, तर मीही बायकोमुलांच्या नावाने तिकिटे घेऊ शकलो असतो.' 'ती तुमची चूक.' 'एवढ्याचसाठी, की मला विश्वास होता, तुम्ही भाऊ आहात.' 'हा जुगार आहे, हे तुम्ही समजून घ्यायला हवे. जुगारातल्या हारजितीचा घराण्यावर काही परिणाम होऊ शकत नाही; उद्या तुम्ही रेसमध्ये पाच-दहा हजार हरून आलात, तर घराणे त्याला जबाबदार असणार नाही.' 'पण भावाचा हक्क दडपून तुम्ही सुखी राहू शकणार नाही.' 'तुम्ही ना ब्रह्मदेव आहात, ना ईश्वर, ना कोणी महात्मा.' दोघा भावांत जुंपली आहे आणि मल्लयुद्ध होऊ घातले आहे हे विक्रमच्या आईने ऐकले, तेव्हा त्या धावत बाहेर आल्या आणि दोघांची समजूत घालू लागल्या. धाकटे ठाकूर चिडून म्हणाले—तुम्ही माझी काय समजूत घालता? त्यांची घाला, जे चार-चार तिकिटे घेऊन बसले आहेत. माझ्यापाशी काय आहे? एक तिकीट. त्याचा काय भरवसा! माझ्यापेक्षा ज्यांना पैसे मिळण्याचा चौपट चान्स आहे, त्यांची नियत बिघडावी, ही लाजेची आणि दुःखाची गोष्ट आहे. ठकुराईन दिराला धीर देत म्हणाल्या—बरे, माझ्या पैशांतले निम्मे तुमचे. आता तरी खूश?
लॉटरी
थोरल्या ठाकुरांनी बायकोला मध्येच तोडले—निम्मे का म्हणून घेतील? मी एक दमडीही देणार नाही. आम्ही भीडमुर्वत आणि सौजन्य दाखवले, तरी यांना पाचव्या हिश्शापेक्षा जास्त काही केल्या मिळायचे नाही. निम्म्याचा दावा कोणत्या नियमाने होऊ शकतो? ना बुद्धीच्या, ना धर्माच्या, ना नीतीच्या. धाकटे ठाकूर खिजून म्हणाले—साऱ्या दुनियेचा कायदा तुम्हांलाच तर ठाऊक आहे! 'ठाऊक आहेच; तीस वर्षे वकिली केली नाही की काय?' 'समोर कलकत्त्याचा बॅरिस्टर उभा करीन, तेव्हा ही सारी वकिली जिरेल.' 'बॅरिस्टरची ऐशीतैशी, मग तो कलकत्त्याचा असो की लंडनचा!' 'मी निम्मे घेणार, अगदी तसेच, जसे घरच्या मालमत्तेत माझे निम्मे आहे.' इतक्यात विक्रमचे थोरले भाऊसाहेब डोक्याला आणि हाताला पट्टी बांधलेले, लंगडत, कपड्यांवर ताज्या रक्ताचे डाग घेऊन, प्रसन्न चेहऱ्याने आले आणि एका आरामखुर्चीत कोसळले. थोरल्या ठाकुरांनी घाबरून विचारले—ही काय अवस्था रे तुझी! आं, हा मार कसा लागला? कोणाशी मारामारी तर नाही झाली? प्रकाश खुर्चीत आडवे होऊन एकदा कण्हले, मग हसून म्हणाले—जी, काही नाही; तसा काही फारसा मार लागलेला नाही. 'मार लागला नाही असे कसे म्हणतोस? सारा हात आणि डोके सुजले आहे. कपडे रक्ताने भिजले आहेत. हा काय प्रकार आहे? मोटारीचा अपघात तर नाही झाला?' 'अगदी किरकोळ मार आहे साहेब, दोन-चार दिवसांत बरा होईल. घाबरण्यासारखे काही नाही.' प्रकाश यांच्या चेहऱ्यावर आशेने भरलेले, शांत हसू होते. क्रोध, लाज किंवा सूडाची भावना यांचा मागमूसही नव्हता. थोरल्या ठाकुरांनी आणखी अधीर होऊन विचारले—पण झाले काय, ते का सांगत नाहीस? कोणाशी मारामारी झाली असेल, तर ठाण्यात फिर्याद नोंदवून देतो.
लॉटरी
प्रकाश हलक्या मनाने म्हणाले—मारामारी कोणाशीच झाली नाही साहेब! त्याचे असे झाले, की मी जरा झक्कड बाबांकडे गेलो होतो. तुम्हांला तर ठाऊकच आहे, ते माणसांचे तोंड पाहिले की दूर पळतात आणि दगड घेऊन मारायला धावतात. जो भिऊन पळाला, तो गेला. जो दगडांचा मार खाऊनही त्यांच्या मागे लागून राहिला, तो परीस झाला. ते हीच परीक्षा घेतात. आज मी तिथे पोहोचलो, तेव्हा पन्नासएक माणसे जमली होती; कोणी मिठाई घेऊन, कोणी मौल्यवान भेटी घेऊन, कोणी कापडाचे तागे घेऊन. झक्कड बाबा ध्यानस्थ बसले होते. अचानक त्यांनी डोळे उघडले आणि हा जनसमुदाय पाहिला, तसे कित्येक दगड वेचून ते त्यांच्या मागे धावले. मग काय, एकच पळापळ झाली. लोक पडत-धडपडत पळाले. भुर्रकन उडून गेले. एकही टिकला नाही. एकटा मी घंटाघरासारखा तिथेच ठाम उभा राहिलो. बस, त्यांनी दगड भिरकावलाच. पहिला नेम डोक्याला लागला. त्यांचा नेम अचूक असतो. कवटी झिणझिणली. रक्ताची धार लागली. पण मी हललो नाही. मग बाबाजींनी दुसरा दगड फेकला. तो हाताला लागला. मी खाली पडलो आणि बेशुद्ध झालो. शुद्धीवर आलो, तेव्हा तिथे सामसूम होती. बाबाजीही नाहीसे झाले होते. ते अंतर्धान पावत असतात. कोणाला हाक मारू, कोणाला गाडी आणायला सांगू? वेदनेने हात फुटतो की काय असे होत होते आणि डोक्यातून अजूनही रक्त वाहत होते. कसाबसा उठलो आणि थेट डॉक्टरकडे गेलो. त्यांनी पाहून सांगितले—हाड मोडले आहे. आणि पट्टी बांधली. गरम पाण्याने शेकायला सांगितले आहे. संध्याकाळी पुन्हा येणार आहेत. पण मार लागला तो लागला; आता लॉटरी माझ्या नावाने आलीच म्हणून समजा. हे नक्की. झक्कड बाबांचा मार खाऊन कोणाची मनोकामना अपुरी राहिली, असे कधी झालेलेच नाही. मी तर सर्वांत आधी बाबांची कुटी बांधून देईन.
लॉटरी
थोरल्या ठाकूरसाहेबांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा उमटली. ताबडतोब पलंग घातला गेला. प्रकाश त्यावर पहुडले. ठकुराईन पंख्याने वारा घालू लागल्या; त्यांचाही चेहरा प्रसन्न होता. एवढा मार खाऊन दहा लाख पदरात पडणे हा काही वाईट सौदा नव्हता. धाकट्या ठाकूरसाहेबांच्या जिवाची उलघाल चालली होती. थोरले ठाकूर जेवायला गेले आणि ठकुराईनही प्रकाश यांच्या जेवणाची व्यवस्था करायला गेल्या, तसे धाकट्या ठाकुरांनी प्रकाशना विचारले—फार जोराने दगड मारतात का? जोराने कसले मारत असतील? प्रकाश त्यांचा हेतू ओळखून म्हणाले—अहो साहेब, दगड नाही मारत, बाँबगोळे मारतात. देह आहे राक्षसासारखा धिप्पाड, आणि इतके बलवान, की एका ठोशात वाघसिंहांचा निकाल लावतात. कोणी असातसा माणूस असेल, तर एकाच दगडात खलास व्हायचा. कितीतरी जण मेलेसुद्धा; पण आजवर झक्कड बाबांवर खटला भरला गेला नाही. आणि दोन-चार दगड मारून थांबत नाहीत; तुम्ही खाली पडून बेशुद्ध होईपर्यंत ते मारीतच राहतात. पण खरे रहस्य हेच, की तुम्ही जितका जास्त मार खाल, तितके तुमच्या उद्दिष्टाच्या जवळ पोहोचाल... प्रकाश यांनी असे अंगावर शहारे आणणारे चित्र रंगवले, की धाकटे ठाकूरसाहेब थरथर कापू लागले. दगड खाण्याची हिंमत झाली नाही. ( ४ ) अखेर नशिबाच्या निवाड्याचा दिवस उजाडला—जुलैची वीस तारीख. कत्तलची रात्र! आम्ही पहाटे उठलो, तेव्हा जणू एक नशा चढली होती; आशा आणि भीती यांच्या द्वंद्वाची. दोघा ठाकुरांनी घटकाभर रात्र असतानाच गंगास्नान केले होते आणि ते देवळात बसून पूजा करीत होते. आज माझ्या मनात श्रद्धा जागी झाली. देवळात जाऊन मी मनातल्या मनात ठाकूरजींची स्तुती करू लागलो—अनाथांच्या नाथा, तुझी कृपादृष्टी आमच्यावर होणार नाही का? तुला ठाऊक नाही का, आम्ही किती कष्टाने तिकीट घेतले आहे? तू तर अंतर्यामी आहेस. जगात आमच्यापेक्षा जास्त तुझी दया कोण डिझर्व्ह करतो?
लॉटरी
विक्रम सूटबूट घालून देवळाच्या दाराशी आला, मला खुणेने बोलावून एवढेच म्हणाला—मी पोस्टात जातो, आणि वाऱ्यासारखा नाहीसा झाला. थोड्या वेळाने प्रकाश मिठाईची ताटे घेऊन घरातून निघाले आणि देवळाच्या दाराशी उभे राहून कंगालांना वाटू लागले; त्यांची एक गर्दीच जमली होती. आणि दोघे ठाकूर भगवंताच्या चरणी लीन होऊन बसले होते; मान खाली, डोळे मिटलेले, भक्तिप्रेमात बुडालेले. थोरल्या ठाकुरांनी मान वर करून पुजाऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले—भगवान तर मोठे भक्तवत्सल आहेत, काय पुजारीजी? पुजाऱ्याने दुजोरा दिला—होय सरकार, भक्तांच्या रक्षणासाठी तर भगवान क्षीरसागरातून धावले आणि गजेंद्राला मगरीच्या जबड्यातून सोडवले. क्षणभराने धाकट्या ठाकूरसाहेबांनी मान वर केली आणि ते पुजारीजींना म्हणाले—काय पुजारीजी, भगवान तर सर्वशक्तिमान आहेत, अंतर्यामी, सर्वांच्या मनातले जाणतात ना? पुजाऱ्याने दुजोरा दिला—होय सरकार, अंतर्यामी नसते, तर सर्वांच्या मनातली गोष्ट कशी जाणली असती? शबरीचे प्रेम पाहून स्वतः तिची मनोकामना पूर्ण केली. पूजा संपली. आरती झाली. दोघा भावांनी आज मोठ्या आवाजात आरती म्हटली आणि थोरल्या ठाकुरांनी तबकात दोन रुपये टाकले. धाकट्या ठाकुरांनी चार रुपये टाकले. थोरल्या ठाकुरांनी एकदा कोपदृष्टीने पाहिले आणि तोंड फिरवले. अचानक थोरल्या ठाकुरांनी पुजाऱ्याला विचारले—तुमचे मन काय सांगते, पुजारीजी? पुजारी म्हणाला—सरकारांची फत्ते आहे. धाकट्या ठाकुरांनी विचारले—आणि माझी? पुजाऱ्याने तितक्याच तत्परतेने सांगितले—तुमचीही फत्ते आहे! थोरले ठाकूर श्रद्धेत बुडून भजन गात देवळातून बाहेर पडले—'प्रभुजी, मैं तो आयो सरन तिहारे, हाँ प्रभुजी.' एका मिनिटात धाकटे ठाकूरसाहेब गात गात देवळातून बाहेर पडले— 'अब पति राखो मोरे दयानिधि तोरी गति लखि न परे.'
लॉटरी
मीही मागोमाग निघालो आणि मिठाई वाटण्यात प्रकाशबाबूंना मदत करू पाहिली; पण त्यांनी ताट बाजूला घेत म्हटले—तुम्ही राहू द्या, मी आत्ता वाटून टाकतो. आता उरली आहे तरी किती? मी ओशाळून पोस्टाच्या दिशेने निघालो, तोच विक्रम हसत हसत सायकलवरून येऊन पोहोचला. त्याला पाहताच सगळे जणू वेडे झाले. दोघे ठाकूर समोरच उभे होते. दोघांनी ससाण्यासारखी झडप घातली. प्रकाश यांच्या ताटात थोडीशी मिठाई उरली होती. त्यांनी ताट जमिनीवर आपटले आणि धाव घेतली. आणि मी तर त्या उन्मादात विक्रमला उचलूनच घेतले; पण कोणी त्याला काही विचारीत नाही, सगळे जयजयकाराच्या आरोळ्या ठोकताहेत. थोरल्या ठाकुरांनी आकाशाकडे पाहिले—बोलो राजा रामचंद्र की जय! धाकट्या ठाकुरांनी उडी मारली—बोलो हनुमानजी की जय! प्रकाश टाळ्या वाजवीत किंचाळले—दुहाई झक्कड बाबा की! विक्रम आणखी जोराने खदखदून हसला; मग बाजूला उभा राहून म्हणाला—ज्याचे नाव आले आहे, त्याच्याकडून एक लाख घेईन. बोला, आहे कबूल? थोरल्या ठाकुरांनी त्याचा हात पकडला—आधी सांग तर! 'ना! असे नाही सांगत.' धाकटे ठाकूर भडकले—नुसते सांगण्यासाठी एक लाख? शाबास! प्रकाश यांनीही कपाळाला आठ्या घातल्या—पोस्ट ऑफिस काय आम्ही पाहिलेले नाही? 'बरे तर, आपापले नाव ऐकायला तयार व्हा.' सगळे फौजी अटेन्शनच्या पवित्र्यात निश्चल उभे राहिले. 'शुद्धबुद्ध ठिकाणावर ठेवा.' सगळे पूर्ण सावध झाले. 'बरे तर ऐका कान उघडे ठेवून; या शहराचा सफाया झाला आहे. या शहराचाच नाही, साऱ्या भारताचा सफाया झाला आहे. अमेरिकेतल्या एका काळ्या (आफ्रिकन) माणसाचे नाव आले.' थोरले ठाकूर खेकसले—खोटे, खोटे, साफ खोटे! धाकट्या ठाकुरांनी पवित्रा बदलला—कधीच नाही. तीन महिन्यांची तपश्चर्या अशीच फुकट जायची? वा! प्रकाश छाती ठोकून म्हणाले—इथे डोके फोडून घेतले, हात मोडून घेतला; थट्टा आहे काय!
लॉटरी
इतक्यात आणखी शेपन्नास माणसे रडवे चेहरे घेऊन इकडून गेली. ती बिचारीही पोस्टातून आपल्या नशिबाला रडत परत येत होती. बाजी मारून गेला अमेरिकेचा काळा (आफ्रिकन) माणूस! अभागी! पिशाच! दुष्ट! आता कोणाचा विश्वास बसल्याशिवाय कसा राहणार? थोरले ठाकूर चिडून देवळात गेले आणि त्यांनी पुजाऱ्याला डिसमिस करून टाकले—एवढ्यासाठीच तुम्हांला इतके दिवस पोसले! फुकटचा माल खाता आणि चैन करता. धाकट्या ठाकूरसाहेबांचे तर जणू कंबरडेच मोडले. दोन-तीन वेळा कपाळ बडवून घेतले आणि तिथेच बसकण मारली; पण प्रकाश यांच्या रागाला पारावार नव्हता. त्यांनी आपला जाडजूड सोटा घेतला आणि ते झक्कड बाबांचा चांगला समाचार घ्यायला निघाले. माताजी एवढेच म्हणाल्या—सगळ्यांनी लबाडी केली आहे. मी कधीच मानायची नाही. आपले देव तरी काय करणार! कोणाच्या हातातून हिसकावून थोडेच आणणार आहेत? रात्री कोणीच जेवले नाही. मीही खिन्न बसलो होतो, तोच विक्रम येऊन म्हणाला—चल, हॉटेलात काहीतरी खाऊन येऊ. घरात तर चूल पेटली नाही. मी विचारले—तू पोस्टातून आलास, तेव्हा इतका खुशीत का होतास? तो म्हणाला—पोस्टासमोर हजारोंची गर्दी पाहिली, तेव्हा मला आपल्या लोकांच्या गाढवपणाचे हसू आले. एका शहरात जर इतकी माणसे आहेत, तर साऱ्या हिंदुस्थानात याच्या हजारपटीहून कमी नसतील, आणि जगात तर लाखपटीहूनही जास्त होतील. आणि मी आशेचा जो एक डोंगरच उभा करून ठेवला होता, तो जणू एकदम इतका लहान झाला की मोहरीएवढा उरला, आणि मला हसू आले. जसे एखाद्या दानशूर पुरुषाने छटाकभर धान्य हातात घेऊन लाख माणसांना जेवणाचे आमंत्रण द्यावे; आणि इथे आमच्या घरातला एकेक माणूस समजतो आहे की...... मीही हसलो—हो, खरी गोष्ट तर हीच आहे; आणि आपण दोघे लिखापढीसाठी भांडून मरत होतो. पण खरे सांग, तुझी नियत बिघडली होती की नाही? विक्रम गालातल्या गालात हसत म्हणाला—आता विचारून काय करणार? झाकली मूठ झाकलीच राहू दे.