मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
लेखक
सकाळी महाशय प्रवीणांनी वीस वेळा उकळलेल्या चहाचा प्याला तयार केला आणि साखर-दुधाशिवायच तो पिऊन टाकला. हीच त्यांची न्याहारी. गोड, दुधाळ चहा मिळून महिने लोटले होते. दूध आणि साखर त्यांच्या लेखी जीवनावश्यक वस्तूंत मोडत नव्हत्या. बायकोला उठवून पैसे मागावेत म्हणून ते आत गेलेही, पण फाटक्या, मळक्या रजईत ती गाढ झोपलेली पाहून तिला उठवावेसे वाटले नाही. वाटले, थंडीमुळे बिचारीला रात्रभर झोप लागली नसेल, आत्ता कुठे डोळा लागला असेल. कच्च्या झोपेतून उठवणे बरे नव्हते. ते गुपचूप परत आले. चहा पिऊन त्यांनी लेखणी-दौत हाती घेतली आणि आपल्या पुस्तकाच्या लेखनात ते तल्लीन झाले. त्यांच्या मते ते या शतकातले सर्वांत थोर पुस्तक ठरणार होते; त्याचे प्रकाशन झाले की ते त्यांना अज्ञातवासातून काढून कीर्तीच्या आणि समृद्धीच्या स्वर्गात नेऊन बसवणार होते. अर्ध्या तासाने बायको डोळे चोळत आली आणि म्हणाली, 'चहा घेतलात तुम्ही?' प्रवीण हसतमुखाने म्हणाले, 'हो, घेतला. फार छान झाला होता.' 'पण दूध-साखर कुठून आणलीत?' 'दूध-साखर घातली की त्याची चवच बिघडते. डॉक्टरांचेही हेच मत आहे, चहा नेहमी कोराच प्यावा. युरोपात तर दूध घालायची पद्धतच नाही. हा शोध आपल्याकडच्या गोडाचा सोस असलेल्या श्रीमंतांचा.' 'कोण जाणे, तुम्हाला हा फिका चहा कसा आवडतो. मला उठवले का नाहीत? पैसे तर ठेवले होते.'
लेखक
महाशय प्रवीण पुन्हा लिहू लागले. तरुणपणीच त्यांना हा रोग जडला होता आणि आज वीस वर्षे ते तो जोपासत आले होते. या रोगात देह झिजला, आरोग्य झिजले आणि चाळिशीतच म्हातारपणाने त्यांना गाठले; पण रोग असाध्य होता. सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत साहित्याचा हा उपासक अंतर्जगात बुडून, साऱ्या जगाकडे पाठ फिरवून, हृदयाची फुले आणि नैवेद्य वाहत असे. पण भारतात सरस्वतीची उपासना करणे म्हणजे लक्ष्मीची भक्ती सोडणे. मन तर एकच होते. दोन्ही देवींना एकाच वेळी कसे प्रसन्न करणार, दोघींच्या वराला पात्र कसे ठरणार? आणि लक्ष्मीची ही अवकृपा केवळ पैशाच्या चणचणीच्या रूपाने प्रकट होत नसे; तिचा सर्वांत निर्दय खेळ हा होता, की नियतकालिकांचे संपादक आणि पुस्तकांचे प्रकाशक उदारपणे सहृदयतेचे दानसुद्धा देत नसत. कदाचित साऱ्या जगानेच त्याच्याविरुद्ध एखादा कट रचला होता. इतका, की या सततच्या अभावाने त्याचा आत्मविश्वास जणू चिरडून टाकला होता. बहुधा आता त्याला असे जाणवू लागले होते की आपल्या लेखनात काही सत्त्व नाही, काही प्रतिभा नाही; आणि ही भावना काळीज चिरणारी होती. हे दुर्लभ मनुष्यजीवन असेच वाया गेले. जगाने आपला सन्मान केला नसेल, पण आपले जीवितकार्य इतके क्षुद्र नाही, एवढा दिलासाही उरला नव्हता. आयुष्याच्या गरजा कमी कमी होत संन्यासाची सीमाही ओलांडून गेल्या होत्या. काही समाधान असलेच तर एवढेच, की त्यांची जीवनसखी त्यागात आणि तपात त्यांच्याही दोन पावले पुढे होती. सुमित्रा या दशेतही प्रसन्न होती. प्रवीणजींची जगाविरुद्ध तक्रार असेल, पण चेंडूत भरलेल्या हवेसारखी सुमित्रा त्यांना बाहेरच्या ठोकरांपासून वाचवत असे. आपल्या नशिबाला रडणे तर दूरच, या देवीने कपाळावर कधी आठीसुद्धा येऊ दिली नाही.
लेखक
चहाचा प्याला उचलत सुमित्रा म्हणाली, 'मग तासभर, अर्धा तास कुठे फिरून का येत नाही? जीव ओतून काम करूनही काही निष्पन्न होत नाही हे कळून चुकले, मग उगाच डोके का शिणवता?' मान वर न करता, कागदावर लेखणी चालवत प्रवीण म्हणाले, 'लिहिण्यात निदान एवढे समाधान तरी असते, की मी काहीतरी करतो आहे. फिरायला गेलो की मला वाटते, आपण वेळ फुकट घालवतो आहोत.' 'एवढी शिकलीसवरलेली माणसे रोज हवा खायला जातात, ती काय आपला वेळ फुकट घालवतात?' 'पण त्यांच्यातले बहुतेक असे आहेत, की ते फिरायला गेले म्हणून त्यांच्या कमाईत काडीचाही फरक पडत नाही. बहुतेक सरकारी नोकर आहेत, ज्यांना महिन्याला पगार मिळतो; नाहीतर लोक ज्यांना मान देतात अशा पेशांतले आहेत. मी तर मिलमधला मजूर. कधी मजुराला हवा खाताना पाहिले आहेस? ज्यांना खायची ददात नाही, त्यांनाच हवा खायचीही गरज असते. ज्यांच्या भाकरीचेच वांधे आहेत, ते हवा खायला जात नाहीत. शिवाय आरोग्याची आणि आयुष्य वाढवायची गरज त्यांना, ज्यांच्या जीवनात आनंद आहे, गोडी आहे. मला तर जगणेच ओझे झाले आहे. हे ओझे आणखी काही दिवस डोक्यावर वागवत राहावे, अशी मला मुळीच इच्छा नाही.' निराशेत बुडालेले हे शब्द ऐकून सुमित्रा डोळ्यांत पाणी आणून आत निघून गेली. तिचे मन सांगत होते, लक्ष्मीची अवकृपा राहिली तरी राहो, या तपस्व्याच्या कीर्तीचे चांदणे एक दिवस नक्की पसरेल. पण प्रवीणमहोदय आता निराशेच्या त्या टोकाला पोचले होते, जिथून उलट्या दिशेला उगवणाऱ्या आशेच्या उषेची लालीसुद्धा दिसत नाही.
लेखक
एका रईसाकडे कसलासा समारंभ आहे. त्याने महाशय प्रवीणांनाही आमंत्रण दिले. आज त्यांचे मन आनंदाच्या घोड्यावर बसून नाचते आहे. दिवसभर ते याच कल्पनेत गुंग होते—राजेसाहेब कोणत्या शब्दांत आपले स्वागत करतील आणि आपण कोणत्या शब्दांत त्यांचे आभार मानायचे, कोणत्या विषयांवर बोलणे होईल आणि कोणकोणत्या थोर मंडळींशी आपली ओळख होईल. दिवसभर ते या कल्पनांचा आनंद लुटत राहिले. या प्रसंगासाठी त्यांनी एक कविताही रचली; तिच्यात जीवनाची तुलना एका उद्यानाशी केली होती. आज त्यांनी आपल्या साऱ्या धारणा बाजूला सारल्या, कारण श्रीमंतांच्या भावनांना धक्का लावणे त्यांना शक्य नव्हते. दुपारपासूनच त्यांनी तयारी सुरू केली. दाढी केली, साबण लावून आंघोळ केली, डोक्याला तेल लावले. अडचण होती ती कपड्यांची. अचकन शिवून घेतली त्याला जमाना लोटला होता. तिची अवस्थाही त्यांच्याच अवस्थेसारखी जीर्ण झाली होती. जरा थंडी किंवा ऊन लागले की जसे त्यांना पडसे होई किंवा डोके दुखू लागे, तशीच ती अचकनही नाजूक प्रकृतीची होती. ती बाहेर काढली आणि झटकून-पुसून ठेवली. सुमित्रा म्हणाली, 'उगाच आमंत्रण स्वीकारलेत. लिहून कळवायचे, माझी प्रकृती बरी नाही. या फाटक्या अवतारात जाणे तर आणखीच वाईट.' तत्त्वज्ञाच्या गांभीर्याने प्रवीण म्हणाले, 'ज्यांना देवाने हृदय आणि पारख दिली आहे, ते माणसाचा पोशाख पाहत नाहीत, त्याचे गुण आणि चारित्र्य पाहतात. शेवटी काहीतरी विशेष असेल, म्हणूनच ना राजेसाहेबांनी मला बोलावले? मी काही कुणी अधिकारी नाही, जमीनदार नाही, जहागीरदार नाही, ठेकेदार नाही; एक साधासुधा लेखक आहे. लेखकाचे मोल म्हणजे त्याचे लेखन. या हिशेबाने कोणत्याही लेखकापुढे मान खाली घालावी असे मला काहीच कारण नाही.'
लेखक
त्यांच्या भोळेपणाची कीव येऊन सुमित्रा म्हणाली, 'कल्पनेच्या जगात राहून राहून तुम्ही प्रत्यक्ष जगापासून तुटला आहात. मी सांगते, राजेसाहेबांकडे लोकांची नजर सगळ्यात जास्त कपड्यांवरच जाईल. साधेपणा चांगला खरा, पण त्याचा अर्थ असा नव्हे की माणसाने गबाळे व्हावे!' या बोलण्यात प्रवीणांना काही तथ्य वाटले. विद्वानांप्रमाणे त्यांनाही आपली चूक कबूल करायला वेळ लागत नसे. म्हणाले, 'मला वाटते, दिवेलागणीनंतर जावे.' 'मी तर म्हणते, जायचेच कशाला?' 'आता तुला कसे समजावू? प्रत्येक प्राण्याच्या मनात आदराची आणि सन्मानाची एक भूक असते. तू विचारशील, ही भूक का असते? कारण तो आपल्या आत्मविकासाचा एक टप्पा आहे. अवघ्या ब्रह्मांडात व्यापून राहिलेल्या त्या महान सत्तेचे आपण सूक्ष्म अंश आहोत. अंशात पूर्णाचे गुण असणारच. म्हणून कीर्ती आणि सन्मान ही आत्मोन्नतीकडे आणि ज्ञानाकडे असलेली आपली स्वाभाविक ओढ आहे. ही लालसा मी वाईट मानत नाही.' विषय संपवण्यासाठी सुमित्रा म्हणाली, 'बरे बाबा, जा. मी तुमच्याशी वाद घालत नाही. पण उद्याची काहीतरी सोय करून या, कारण माझ्याजवळ आता एकच आणा उरला आहे. ज्यांच्याकडून उसने मिळू शकत होते, त्यांच्याकडून घेऊन झाले; आणि ज्यांच्याकडून घेतले, त्यांचे परत करणे अजून जमलेले नाही. मला आता दुसरा कोणताच उपाय सुचत नाही.'
लेखक
क्षणभराने प्रवीण म्हणाले, 'दोन-एक मासिकांकडून माझ्या लेखांचे पैसे यायचे आहेत. कदाचित उद्यापर्यंत येतील; आणि उद्या उपास घडलाच, तर काय काळजी? काम करणे हा आमचा धर्म. आम्ही काम करतो, आणि तन-मन ओतून करतो. एवढे करूनही उपाशी राहायची पाळी आली, तर तो माझा दोष नव्हे. फार तर मरेनच ना! आमच्यासारखी लाखो माणसे रोज मरतात. जगाचा रहाटगाडा जसाच्या तसा चालू राहतो. मग आम्ही उपाशी मरू याचे दुःख कशाला? मरण काही भिण्यासारखी गोष्ट नाही. तिरडी गात-वाजवत नेणाऱ्या कबीरपंथीयांचा मी तर चाहता आहे. मला मरणाचे भय नाही. तूच सांग, मी जे करतो त्याहून अधिक काही करणे माझ्या शक्तीबाहेर आहे की नाही? सारे जग गोड झोप घेत असते आणि मी लेखणी घेऊन बसलेला असतो. लोक हसतात-खिदळतात, मौजमजा करतात; मला ते सारे वर्ज्य आहे. इतके, की महिनोन्महिने हसायची वेळ आलेली नाही. होळीच्या दिवशीसुद्धा मी सुटी घेतली नाही. आजारी पडलो तरी लिखाणाची काळजी डोक्यावर स्वार असते. आठव, तू आजारी होतीस आणि वैद्याकडे जायलाही मला वेळ मिळत नव्हता. जग कदर करत नसेल, तर न करो. आपला प्रकाश पसरतो आहे की त्याच्यापुढे कुणी आडोसा धरला आहे, याच्याशी त्याला काही कर्तव्य नसते.' 'माझाही असा कोणता मित्र, ओळखीचा किंवा नातलग आहे, ज्याचा मी ऋणी नाही? इतका, की आता घराबाहेर पडायचीही लाज वाटते. समाधान एवढेच, की लोक माझ्या हेतूवर शंका घेत नाहीत. ते मला फारशी मदत करू शकत नसतील, पण त्यांना माझ्याविषयी सहानुभूती नक्कीच आहे. माझ्या आनंदाला एवढे पुरे, की आज तो दिवस तरी उगवला, एका रईसाने माझा सन्मान केला!'
लेखक
मग अचानक त्यांच्यावर जणू एक नशा चढली. ताठ्याने म्हणाले, 'नाही, मी आता रात्री जाणार नाही. माझे दारिद्र्य आता बेअब्रूच्या पातळीला जाऊन पोचले आहे. त्याच्यावर पडदा टाकण्यात काही अर्थ नाही. मी आत्ताच जाणार. ज्याला रईस आणि राजे आमंत्रण देतात, तो कुणी ऐरागैरा माणूस असू शकत नाही. राजेसाहेब काही साधेसुधे रईस नाहीत. ते केवळ या शहरातलेच नव्हेत, तर भारतातल्या नामांकित रईसांपैकी आहेत. आता एवढे होऊनही कुणी मला हलका समजला, तर तो स्वतःच हलका.' संध्याकाळची वेळ आहे. प्रवीणजी आपली फाटकी, जुनी अचकन, झिजलेले-कुजलेले जोडे आणि बेढब टोपी घालून घराबाहेर पडले. उगाचच एखाद्या गावंढळ भुरट्यासारखे दिसत होते. धिप्पाड अंगापिंडाचे, भरदार चेहऱ्याचे गृहस्थ असते, तर या थाटातही एक ऐट दिसली असती. स्थूलपणाचा स्वतःचाच एक दरारा असतो. पण साहित्यसेवा आणि स्थूलपणा यांचे वाकडे आहे. एखादा साहित्यसेवक गुटगुटीत, दुप्पट अंगाचा असेल, तर खुशाल समजा, त्याच्यात माधुर्य नाही, लवचीकपणा नाही, हृदय नाही. जळणे हे दिव्याचे काम. काठोकाठ भरलेला दिवा तोच, जो कधी जळलाच नाही. तरीही स्वारी ताठ्यात चालली आहे. अंगाअंगातून गर्व ओसंडतो आहे. एरवी घराबाहेर पडले की ते दुकानांकडे नजर चुकवत गल्लीबोळांतून निसटत; पण आज ते मान ताठ करून त्यांच्या समोरून चालले आहेत. आज ते त्यांच्या तगाद्यांना दात घशात घालणारे उत्तर द्यायला तयार आहेत. पण संध्याकाळची वेळ; प्रत्येक दुकानावर गिऱ्हाइके बसलेली. कुणीच त्यांच्याकडे पाहत नाही. आपल्या हलाखीत जी रक्कम त्यांना डोईजड वाटत होती, तिच्यात दुकानदारांच्या दृष्टीने एवढी जोखीम नव्हती, की ओळखीच्या माणसाला भर बाजारात हटकावे; विशेषतः आज ते कुणाला तरी भेटायला निघालेले दिसत होते तेव्हा.
लेखक
प्रवीणांनी एकदा अख्ख्या बाजाराची फेरी मारली, पण मन भरले नाही. मग दुसरी फेरी मारली, तीही फुकट. तेव्हा ते स्वतःच हाफिज समदच्या दुकानावर जाऊन उभे राहिले. हाफिजजी बिसातीचा, म्हणजे बारीकसारीक चिजवस्तूंचा, व्यापार करीत. बऱ्याच दिवसांपूर्वी—प्रवीण या दुकानातून एक छत्री घेऊन गेले होते आणि अजून तिचे पैसे चुकते करू शकले नव्हते. प्रवीणांना पाहून हाफिजजी म्हणाले, 'महाशयजी, छत्रीचे पैसे अजून मिळाले नाहीत. असली शंभर-पन्नास गिऱ्हाइके भेटली, तर दिवाळेच निघेल. आता तर बरेच दिवस झाले.' प्रवीणांची कळी खुलली. मनातली मुराद पुरी झाली. म्हणाले, 'मी विसरलो नाही हाफिजजी. या दिवसांत काम इतके होते, की घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. पैसा तर हाती येत नाही, पण आपल्या दुवांनी कदर करणाऱ्यांची काही कमतरता नाही. दोन-चार माणसे सदा भोवती गराडा घालूनच असतात. आत्ता राजेसाहेबांकडे—अहो, तेच, कोपऱ्यावरच्या बंगल्यात राहतात ते—त्यांच्याकडेच चाललो आहे. मेजवानी आहे. रोज असा ना असा प्रसंग येतच असतो.' हाफिज समद भारावून म्हणाला, 'अरे वा! आपण राजेसाहेबांकडे तशरीफ नेत आहात! बरोबरच आहे, आपल्यासारख्या गुणी माणसांची कदर रईसच करू शकतात, दुसरे कोण करणार? सुभानअल्ला! या जमान्यात आपल्या तोडीचा दुसरा नाही. कधी संधी मिळाली, तर या गरिबाला विसरू नका. राजेसाहेबांची इकडे नजर वळली तर मग काय विचारता! एक अख्खे दुकानच त्यांच्या एकट्यासाठी लागेल. अडीच-तीन लाखांचे सालाना उत्पन्न आहे ना?'
लेखक
अडीच-तीन लाख प्रवीणांना जरा क्षुल्लकच वाटले. नुसता तोंडी जमाखर्चच आहे, तर दहा-वीस लाख सांगायला काय हरकत? म्हणाले, 'अडीच-तीन लाख! आपण तर त्यांना शिव्याच देता आहात. त्यांचे उत्पन्न दहा लाखांहून कमी नाही. एका गृहस्थांचा अंदाज तर वीस लाखांचा आहे. इलाखा आहे, इमारती आहेत, दुकाने आहेत, ठेके आहेत, अमानतीचे पैसे आहेत, आणि सगळ्यात मोठे म्हणजे सरकार बहादुरांची मेहेरनजर आहे.' हाफिज मोठ्या नम्रतेने म्हणाला, 'हे दुकान आपलेच आहे जनाब, एवढाच अर्ज आहे. अरे मुरादी, जरा दोन पैशांचे चांगलेसे पान बनवून आण. साहेबांसाठी. या, दोन मिनिटे बसा. एखादी चीज पसंत असेल तर दाखवतो. आपण तर घरचेच आहात.' पान खात प्रवीण म्हणाले, 'आत्ता माफ करा. तिथे उशीर होईल. पुन्हा कधीतरी हजर होईन.' तिथून उठून ते एका कापडवाल्याच्या दुकानापुढे थांबले. त्याचे नाव मनोहरदास. यांना उभे पाहून त्याने डोळे वर केले. बिचाऱ्याने यांच्या नावाने कधीच आंघोळ केली होती. त्याची समजूत होती, बहुधा ते या शहरात राहतच नाहीत. त्याला वाटले, पैसे द्यायला आले आहेत. म्हणाला, 'भाई प्रवीणजी, आपण तर कित्येक दिवसांत दर्शनच दिले नाही. चिठ्ठी किती वेळा पाठवली, पण आमच्या माणसाला आपल्या घराचा पत्ताच सापडला नाही. मुनीमजी, जरा पाहा तर, यांच्या नावावर किती येणे आहे?' तगाद्याचे नाव निघताच प्रवीणांच्या तोंडचे पाणी पळत; पण आज ते असे उभे होते, जणू त्यांनी असे कवच धारण केले आहे, की ज्याच्यावर कोणत्याही अस्त्राचा घाव बसूच शकत नाही. म्हणाले, 'जरा या राजेसाहेबांकडून परत येतो, मग निवांत बसतो. आत्ता घाईत आहे.' राजेसाहेबांकडे मनोहरदासचे कित्येक हजार रुपये येणे होते. तरीही तो त्यांची कास सोडत नसे.
लेखक
एकाचे तीन वसूल करी. त्याने प्रवीणजींना वरच्या दर्जाच्या लोकांत जमा केले, ज्यांचा पेशाच रईसांना लुटणे हा असतो. म्हणाला, 'पान तरी खाऊन जा, महाशय! राजेसाहेब एका दिवसाचे; आम्ही तर बाराही महिन्यांचे, भाईसाहेब! काही कापड लागत असेल तर घेऊन जा. आता होळी येते आहे. संधी मिळाली तर जरा राजेसाहेबांच्या खजिनदाराला सांगा, जुना हिशेब बरेच दिवस पडून आहे, आता तरी चुकता व्हावा! आम्ही असा कोणता मोठा नफा घेतो, की दोन-दोन वर्षे हिशेबच होऊ नये?' प्रवीण म्हणाले, 'आत्ता पान-बीन राहू द्या भाई, उशीर होईल. त्यांना मला भेटायची एवढी हौस आहे आणि ते माझा एवढा मान ठेवतात, तर माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये हा माझाही धर्म आहे. आम्हाला गुणग्राहक हवेत, आम्ही पैशाचे भुकेले नाही. कुणी आमचा मान राखला, तर आम्ही त्याची गुलामी करू. कुणाला आपल्या संस्थानाचा गर्व असेल, तर आम्हाला त्याची पर्वा नाही.' प्रवीण राजेसाहेबांच्या भव्य वाड्यासमोर पोचले, तेव्हा दिवे लागले होते. अमीर-उमरावांच्या आणि रईसांच्या मोटारी उभ्या होत्या. गणवेश घातलेले दरवान दारावर उभे होते. एक गृहस्थ पाहुण्यांचे स्वागत करीत होते. प्रवीणजींना पाहून ते जरा कचरले. मग त्यांना डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळून म्हणाले, 'आपल्याजवळ निमंत्रणपत्र आहे?' प्रवीणांच्या खिशात निमंत्रणपत्र होते. पण या भेदभावाचा त्यांना राग आला. त्यांच्याकडेच निमंत्रणपत्र का मागावे? इतरांना का विचारू नये? म्हणाले, 'जी नाही, माझ्याजवळ निमंत्रणपत्र नाही. आपण इतर महाशयांकडे निमंत्रणपत्र मागत असाल, तर मीही दाखवू शकतो. नाहीतर हा भेदभाव मी माझा अपमान समजतो. आपण राजेसाहेबांना सांगा, प्रवीणजी आले होते आणि दारातूनच परत गेले.'
लेखक
'नाही नाही, महाशय, आत चलावे. माझा आपला परिचय नव्हता. गुस्ताखी माफ करा. आपल्यासारख्या थोर मंडळींमुळेच तर मैफलीला शोभा आहे. देवाने आपल्याला अशी वाणी दिली आहे, की काय सांगावे!' या माणसाने प्रवीणांना कधीही पाहिले नव्हते. पण त्याने जे काही म्हटले, ते कोणत्याही साहित्यसेवकाविषयी म्हणता येते; आणि आमची खात्री आहे, अशी दाद कोणताही साहित्यसेवक धुडकावून लावू शकत नाही. प्रवीण आत गेले, तो त्यांना दिसले, बारादरीसमोरच्या विस्तीर्ण, सजवलेल्या प्रांगणात विजेचे दिवे प्रकाशाची उधळण करत आहेत. मधोमध एक हौद, हौदात संगमरवराची परी, परीच्या डोक्यावर कारंजे; आणि कारंज्याचे तुषार रंगीत दिव्यांनी रंगून असे दिसत होते, जणू इंद्रधनुष्य वितळून वरून बरसते आहे. हौदाभोवती चारी बाजूंनी मेजे मांडलेली होती. मेजांवर पांढरी शुभ्र आच्छादने, वर सुंदर पुष्पगुच्छ. प्रवीणांना पाहताच राजेसाहेबांनी त्यांचे स्वागत केले, 'यावे, यावे! या वेळच्या 'हंस'मध्ये आपला लेख पाहून मन उचंबळून आले. मी तर थक्क झालो. या शहरात आपल्यासारखी रत्नेही दडलेली आहेत, हे ठाऊकच नव्हते.' मग ते उपस्थित सज्जनांना त्यांची ओळख करून देऊ लागले, 'महाशय प्रवीणांचे नाव आपण ऐकले असेलच. ते हेच. काय माधुर्य, काय ओज, काय भाव, काय कल्पकता, काय चमत्कृती, काय प्रवाह—वा! वा! माझा तर आत्माच जणू नाचू लागतो!' इंग्रजी सूट घातलेल्या एका सज्जनांनी प्रवीणांकडे असे पाहिले, जणू ते प्राणिसंग्रहालयातले एखादे जनावर आहेत, आणि म्हणाले, 'आपण इंग्रजी कवींचाही अभ्यास केला आहे—बायरन, शेली, कीट्स वगैरे?' प्रवीणांनी कोरडेपणाने उत्तर दिले, 'जी हो, थोडेबहुत पाहिले तर आहे.' 'या महाकवींपैकी कुणाच्या तरी रचनांचा आपण अनुवाद केलात, तर आपल्या हातून हिंदी भाषेची अमर सेवा घडेल.'
लेखक
प्रवीण स्वतःला बायरन, शेली वगैरेंपेक्षा तसूभरही कमी समजत नसत. ते इंग्रजी कवी होते. त्यांची भाषा, शैली, विषयांची मांडणी, सगळेच इंग्रजांच्या आवडीला साजेसे होते. त्यांचा अनुवाद करण्यात प्रवीणांना काही भूषण वाटत नव्हते; जसे त्या कवींनाही यांच्या रचनांचा अनुवाद करण्यात भूषण वाटले नसते. म्हणाले, 'आत्मदर्शनाचा आपल्याकडे अजून इतका दुष्काळ पडलेला नाही, की आपण परदेशी कवींकडे भीक मागावी. माझे तर मत आहे, निदान या बाबतीत तरी भारत अजूनही पश्चिमेला काही शिकवू शकतो.' ही ताळतंत्र सोडलेली बडबड होती. इंग्रजीच्या त्या भक्त महाशयांनी प्रवीणांना वेडाच ठरवले. राजेसाहेबांनी प्रवीणांकडे अशा नजरेने पाहिले, जी सांगत होती—जरा वेळ-प्रसंग पाहून बोला! आणि म्हणाले, 'इंग्रजी साहित्याचे काय विचारता! कवितेत तर त्याला तोडच नाही.' इंग्रजीभक्त महाशयांनी प्रवीणांकडे गर्वाने पाहिले, 'आपल्या कवींना अजून कवितेचा अर्थच कळलेला नाही. अजूनही विरह आणि नखशिखांत सौंदर्यवर्णन यांवरच त्यांची कविता उभी आहे.' प्रवीणांनी शेरास सव्वाशेर असे उत्तर दिले, 'मला वाटते, आपण आजच्या कवींचा अभ्यास केलेला नाही; किंवा केला असेल, तर वरवर नजर फिरवून.' आता राजेसाहेबांनी प्रवीणांचे तोंड बंद करायचे ठरवले, 'हे मिस्टर परांजपे, प्रवीणजी! यांचे लेख इंग्रजी वृत्तपत्रांत छापून येतात आणि मोठ्या आदराने वाचले जातात.' याचा अर्थ असा होता, की आता आपण भलतेसलते बोलू नका. प्रवीण समजले. परांजपेंसमोर त्यांना मान खाली घालावी लागली. परकी वेशभूषेचा आणि भाषेचा हा भक्त, आपल्याच लोकांशी द्रोह करूनही इतका मान मिळवतो, हे त्यांना असह्य होते. पण करणार काय? त्याच वेशातले दुसरे एक सज्जन आले. राजेसाहेबांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले, 'यावे, डॉक्टर चड्ढा! मिजाज कसा आहे?'
लेखक
डॉक्टरसाहेबांनी राजेसाहेबांशी हस्तांदोलन केले आणि मग प्रवीणांकडे कुतूहलाने पाहत विचारले, 'आपला परिचय?' राजेसाहेबांनी प्रवीणांची ओळख करून दिली, 'हे महाशय प्रवीण. देशी भाषेतले चांगले कवी आणि लेखक आहेत.' डॉक्टरसाहेब एका खास ढंगात म्हणाले, 'अस्सं! आपण कवी आहात!' आणि आणखी काही न विचारता पुढे निघून गेले. मग त्याच वेशातले आणखी एक महाशय पधारले. हे नामांकित बॅरिस्टर होते. राजेसाहेबांनी त्यांनाही प्रवीणांचा परिचय करून दिला. त्यांनीही त्याच ढंगात म्हटले, 'अस्सं! आपण कवी आहात!' आणि पुढे निघून गेले. हेच नाटक अनेकदा झाले. आणि प्रत्येक वेळी प्रवीणांना हीच दाद मिळाली—'अस्सं! आपण कवी आहात!' हे वाक्य दर वेळी प्रवीणांच्या काळजावर नवा घाव घाली. त्याच्या पोटात दडलेला भाव प्रवीण पुरता ओळखून होते. त्याचा सरळसाधा अर्थ असा होता: तुम्ही आपले मनातले मांडे खाता, खा. इथे तुमचे काय काम? तुमची एवढी हिंमत, की या सभ्य समाजात बिनदिक्कत येता! प्रवीण मनातल्या मनात स्वतःवरच चडफडत होते. आमंत्रण मिळाले तेव्हा त्यांनी स्वतःला धन्य मानले होते; पण इथे येऊन त्यांचा जो अपमान होत होता, त्यापुढे ती समाधानाची झोपडी स्वर्ग होती. त्यांनी आपल्या मनाला धिक्कारले—'तुझ्यासारख्या मानाला हपापलेल्यांची हीच शिक्षा. आता तरी डोळे उघडले ना, तू किती मानाचा धनी आहेस ते! या स्वार्थी जगात तू कुणाच्या कामी येणार नाहीस; तुझ्याकडून कुणाला एखादा खटला मिळेल अशी आशाही नाही. डॉक्टर किंवा हकीम तुझा मान का ठेवतील? त्यांना तुझ्या घरी फुकट यायची हौस नाही. तू लिहिण्यासाठी जन्मला आहेस, लिहीत राहा. बस. याखेरीज जगात तुझे काही प्रयोजन नाही.'
लेखक
अचानक लोकांत गडबड उडाली. आजच्या प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. या महाशयांची हायकोर्टाचे जज म्हणून नेमणूक झाली होती. त्याच निमित्ताने हा जलसा होत होता. राजेसाहेबांनी लगबगीने पुढे होऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि येऊन प्रवीणांना म्हणाले, 'आपण आपली कविता लिहून आणलीच असेल?' प्रवीण म्हणाले, 'मी कोणतीही कविता लिहिलेली नाही.' 'खरेच? मग तर तुम्ही कहरच केलात. अहो भल्या माणसा, आता तरी काहीतरी लिहून काढा. दोन-चारच ओळी होऊ द्या. बस! अशा प्रसंगी एखादी कविता वाचली गेलीच पाहिजे.' 'मला इतक्या घाईत काही लिहिता येत नाही.' 'म्हणजे मी इतक्या लोकांशी आपली ओळख उगाचच करून दिली?' 'अगदी उगाच.' 'अहो भाईजान, एखाद्या जुन्या कवीचे काहीतरी ऐकवा. इथे कोण ओळखणार आहे!' 'जी नाही, क्षमा करा. मी काही भाट नाही, की कथेकरीही नाही.' असे म्हणून प्रवीणजी तत्काळ तिथून निघाले. घरी पोचले, तेव्हा त्यांचा चेहरा खुललेला होता. सुमित्रेने खुशीत विचारले, 'इतक्या लवकर कसे आलात?' 'तिथे माझी काही गरज नव्हती.' 'चला, चेहरा तर खुललेला आहे; चांगलाच मानसन्मान झाला असेल.' 'हो, मान झाला खरा, ध्यानीमनी नव्हता असा.' 'खूप खूश आहात.' 'त्याचे कारण, आज मला कायमचा धडा मिळाला. मी दिवा आहे, आणि जळण्यासाठीच घडलो आहे. आज मी हे तत्त्व विसरलो होतो. देवाने मला फार भरकटू दिले नाही. ही माझी झोपडीच माझा स्वर्ग आहे. आज मला हे तत्त्व गवसले, की साहित्यसेवा ही निखळ तपश्चर्या आहे.'