मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
मनोवृत्ती
एखादी सुंदर तरुणी भल्या सकाळी गांधी पार्कमधल्या बिलोरी बाकावर गाढ झोपलेली आढळावी, ही दचकवणारीच गोष्ट. सुंदर स्त्रिया पार्कात हवा खायला येतात, हसतात, धावतात, फुलझाडांशी खेळतात; तिकडे कोणाचे लक्षही जात नाही. पण एखादी तरुणी वाटेकडेच्या बाकावर बेभान झोपावी, ही गोष्ट अगदीच विलक्षण; ती लक्ष जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेते. वाटेवर कितीतरी माणसे फेरफटका मारत आहेत; म्हातारेही आणि तरुणही. प्रत्येकजण तिथे क्षणभर थबकतो, एक नजर ते दृश्य पाहतो आणि मग पुढे जातो. तरुण मंडळी अर्थपूर्ण गूढ हसत, वयस्क मंडळी काळजीने मान हलवीत, आणि तरुणी लाजेने नजर खाली वळवून. बसंत आणि हाशिम निकर आणि बनियन घालून अनवाणी धावत आहेत. नाताळच्या सुटीत ऑलिंपियन रेस व्हायची आहे, तिचीच दोघे तयारी करीत आहेत. या जागी पोचताच दोघे थांबतात आणि चोरट्या नजरेने तरुणीकडे पाहत आपापसात तर्क लढवू लागतात. बसंत म्हणाला, 'हिला झोपायला दुसरीकडे कुठे जागाच मिळाली नाही?' हाशिमने उत्तर दिले, 'कोणी वेश्या आहे.' 'पण वेश्यासुद्धा असला निर्लज्जपणा करीत नाहीत.' 'वेश्या निर्लज्ज नसेल तर ती वेश्याच नव्हे.' 'अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्यांत कुलवधू आणि वेश्या दोघी सारख्याच वागतात. कोणतीही वेश्या सहसा रस्त्यावर झोपायला तयार होत नाही.' 'रूपाचे प्रदर्शन मांडण्याची ही नवी आर्ट आहे.' 'आर्टचे सर्वांत सुंदर रूप म्हणजे झाकणे, दाखवणे नव्हे. वेश्या हे रहस्य पुरेपूर जाणते.' 'तिचे झाकणे असते ते केवळ आकर्षण वाढवण्यासाठी.' 'असेल; पण नुसती इथे झोपली म्हणून ही वेश्या आहे असे सिद्ध होत नाही. हिच्या भांगात शेंदूर आहे.' 'वेश्या वेळ पडली की सौभाग्यवतीही बनतात. रात्रभर प्याल्यांवर प्याले झडले असतील. कामक्रीडा रंगल्या असतील. शिणवट्याने गळून गेली असेल आणि गारवा मिळताच झोपली असेल.' 'मला तर कुलवधूसारखी वाटते.' 'कुलवधू पार्कात झोपायला येईल?'
मनोवृत्ती
'असेल, घरी रुसून आली असेल.' 'मग जाऊन विचारूनच का घेऊ नये?' 'निव्वळ बावळट आहेस. काहीही ओळखपाळख नसताना कोणाला उठवायचे तरी कसे?' 'अरे, जाऊन ओळख करून घेऊ. उलट वर उपकार केल्याचा आव आणू.' 'आणि कुठे तिने झिडकारले तर?' 'झिडकारण्यासारखे काही असेल तर ना! तिच्याशी अगदी सौजन्याने आणि सहृदयतेने ओथंबलेले बोलू. असले बोलणे ऐकून कोणतीही तरुणी चिडू शकत नाही. अरे, तारुण्य ओसरलेल्या बायकासुद्धा रसभरी बोलणी ऐकून फुलून जातात. ही तर नवयौवना आहे. रूप आणि तारुण्य यांचा इतका सुंदर संगम मी कधी पाहिला नव्हता.' 'माझ्या हृदयावर तर हे रूप आयुष्यभरासाठी कोरले गेले. कदाचित कधीच विसरू शकणार नाही.' 'मी तरी अजून तेच म्हणतो, ही कोणी वेश्या आहे.' 'रूपाची देवी वेश्या का असेना, ती उपास्यच.' 'इथेच उभ्या उभ्या कवींसारखे बोलत राहणार? जरा तिथपर्यंत का येत नाहीस? तू नुसता उभा राहा, जाळे मी टाकतो.' 'कोणी कुलवधू आहे.' 'कुलवधूने पार्कात जाऊन झोपावे, याचा एकच अर्थ होतो: तिला लक्ष वेधून घ्यायचे आहे; आणि ही वेश्येची मनोवृत्ती आहे.' 'हल्लीच्या तरुणीसुद्धा फारवर्ड होऊ लागल्या आहेत.' 'फारवर्ड तरुणी तरुणांपासून नजर चोरत नाहीत.' 'हो, पण आहे कुलवधू; आणि कुलवधूशी कसलेही बोलणे काढणे मी आचरटपणा समजतो.' 'मग चल, धावायला लागू.' 'पण मनात तर ती मूर्ती धावते आहे.' 'मग ये, बसू या. ती उठून जायला निघाली की तिच्या मागोमाग जाऊ. मी सांगतो, वेश्या आहे.' 'आणि मी सांगतो, कुलवधू आहे.' 'मग लागली दहा-दहाची पैज.' दोन म्हातारे गृहस्थ जमिनीकडे पाहत हळूहळू येत आहेत, जणू हरवलेले तारुण्य शोधत आहेत. एकाची कंबर वाकलेली, केस काळे, देह स्थूल; दुसऱ्याचे केस पिकलेले, पण कंबर ताठ, अंगाने शिडशिडीत. दोघांचेही दात पडलेले, पण कवळ्या बसवलेल्या; दोघांच्याही डोळ्यांवर चष्मे. जाडे महाशय वकील आहेत, सडपातळ महोदय डॉक्टर.
मनोवृत्ती
वकील—पाहिलीत ही विसाव्या शतकाची करामत! डॉक्टर—हो, पाहिली. हिंदुस्थान काही जगावेगळा नाही. 'पण याला तुम्ही सभ्यपणा तर म्हणणार नाही?' 'सभ्यतेच्या नावाने गळा काढण्याचे दिवस आता राहिले नाहीत.' 'असेल कुठल्या तरी चांगल्या घरची मुलगी.' 'वेश्या आहे साहेब, एवढेही तुम्हाला कळत नाही?' 'वेश्या इतकी गबाळी नसते.' 'आणि चांगल्या घरच्या मुली गबाळ्या असतात?' 'नवे स्वातंत्र्य आहे, नवी धुंदी आहे.' 'आपले काय, बरे-वाईट कसेतरी निभावले. ज्यांच्या वाट्याला येईल ते भोगतील.' 'आयुष्य नरकाहूनही वाईट होऊन जाईल.' 'अफसोस! तारुण्याने निरोप घेतला.' 'पण डोळ्यांनी कुठे निरोप घेतलाय? ते मन कुठे निरोप घेऊन गेलेय?' 'बस, डोळ्यांनी पाहत राहा आणि जीव जाळत राहा.' 'मला तर पुन्हा तरुण व्हावेसे वाटते. खरे विचाराल तर आजच्या जीवनातच आयुष्याची खरी बहार आहे. आमच्या वेळी कुठे एखादा चेहरासुद्धा नजरेला पडत नसे. आज जिकडे जावे तिकडे सौंदर्याचीच उधळण.' 'ऐकलंय, की तरुणींना जगात सर्वांत जास्त तिटकारा कशाचा असेल, तर तो म्हाताऱ्या पुरुषांचा.' 'मला हे पटत नाही. पुरुषाचे खरे तेज त्याचे तारुण्य नव्हे, त्याचे सामर्थ्य. कितीतरी म्हातारे तरुणांपेक्षा जास्त कणखर असतात. मला तर याचे नेहमीच अनुभव येतात. मी स्वतःला तर कोणत्याही तरुणापेक्षा कमी समजत नाही.' 'हे सगळे खरे; पण म्हाताऱ्यांचे काळीज कच्चे होत जाते. तसे नसते तर या रमणीला अशा अवस्थेत पाहून आपण असे निघून आलो नसतो. मला तर तिला डोळे भरून पाहतासुद्धा आले नाही. भीती वाटत होती, की कुठे तिने डोळे उघडले आणि मला टक लावून पाहताना पाहिले, तर ती मनात काय म्हणेल!' 'खूश झाली असती, की म्हाताऱ्यावरसुद्धा आपली जादू चालली.' 'अहो, पुरे करा.' 'तुम्ही काही दिवस 'ओकासा' घेऊन पाहा.' 'चंद्रोदय रसायन खाऊन पाहिले. सगळे लुबाडण्याचे धंदे आहेत.'
मनोवृत्ती
'मग मंकी ग्लँड बसवून घ्या ना.' 'तुम्ही या तरुणीशी माझे जमवून द्या. मी तयार आहे.' 'हो, ही माझी जबाबदारी; पण मित्रा, आमचा वाटाही राहील हं.' 'म्हणजे?' 'म्हणजे असे, की अधूनमधून मीही तुमच्या घरात डोकावून डोळे निववून घेत जाईन.' 'या हेतूने याल, तर मी तुमचा वैरी होईन.' 'ओहो, मंकी ग्लँडचे नाव ऐकताच तुम्ही तर तरुण झालात!' 'मला तर वाटते, हीसुद्धा डॉक्टरांनी लुबाडण्यासाठी शोधून काढलेली एक क्लृप्ती आहे. खरंच!' 'अहो साहेब, या रमणीच्या स्पर्शात तारुण्य आहे, तुम्ही कुठल्या भ्रमात आहात! तिच्या एकेका अवयवात, एकेका कटाक्षात, एकेका स्मितात, एकेका विभ्रमात तारुण्य भरलेले आहे. शंभर मंकी ग्लँडना एका रमणीच्या बाहुपाशाची सर नाही.' 'बरं, पावले उचला; अशील येऊन बसले असतील.' 'हा चेहरा लक्षात राहील.' 'तुम्ही पुन्हा आठवण करून दिलीत.' 'ती अशी झोपली आहे ती याचसाठी, की लोकांनी तिचे रूप, तिची अंगलट, तिचे विस्कटलेले केस, तिची उघडी मान पाहावी आणि ऊर बडवून घ्यावा. असे निघून जाणे म्हणजे तिच्यावर अन्याय आहे. ती बोलावते आहे आणि तुम्ही पळ काढता आहात.' 'आपण जसे मनापासून प्रेम करू शकतो, तसे तरुणाला कधी करता येईल?' 'अगदी बरोबर. रसिक म्हाताऱ्यांच्या शोधात असणाऱ्या बायकांशी माझी गाठ पडलेली आहे. तरुण म्हणजे उथळ, उच्छृंखल, चंचल आणि गर्विष्ठ. प्रेमाच्या बदल्यात त्यांना काहीतरी हवे असते. आमचे तसे नाही; आम्ही निःस्वार्थपणे स्वतःला अर्पण करतो.' 'तुमच्या बोलण्याने मनाला गुदगुल्या झाल्या.' 'पण एक लक्षात ठेवा, कुठे तिचा तरुण प्रियकर भेटला तर?' 'भेटला तर भेटू दे, आम्ही असल्यांना भीत नाही.' 'तुमच्या लग्नाची काही बोलणी चालली होती ना?' 'हो, चालली होती; पण आपलीच पोरे वैर धरायला कंबर कसून उभी राहिली तर काय करणार? माझा मुलगा यशवंत तर मला बंदूक दाखवू लागला. ही जमान्याची खुबी!'
मनोवृत्ती
ऑक्टोबरचे ऊन तापू लागले होते. दोघे मित्र निघून गेले. दोन स्त्रिया, एक वृद्धा आणि दुसरी नवयौवना, पार्कच्या फाटकाशी मोटारीतून उतरल्या आणि पार्कात हवा खायला आल्या. त्यांचीही नजर झोपेने बेहाल झालेल्या त्या तरुणीवर पडली. वृद्धा म्हणाली, 'भलतीच निर्लज्ज आहे.' नवयौवनेने तिरस्काराने तिच्याकडे पाहत म्हटले, 'थाट तर मोठ्या घरच्या बायकांचा आहे.' 'नुसता थाटच बघ! यामुळेच तर पुरुष म्हणतात, बायकांना स्वातंत्र्य मिळता कामा नये.' 'मला तर कोणी वेश्या वाटते.' 'वेश्या का असेना; पण असला निर्लज्जपणा करून सगळ्या स्त्रीजातीची मान खाली घालायचा हिला काय अधिकार?' 'काय मजेत झोपली आहे, जणू आपल्याच घरी आहे.' 'निलाजरेपणा आहे हा. मला पडदा नको, पुरुषांची गुलामी नको; पण स्त्रियांच्या ठायी जी प्रतिष्ठा आणि लज्जाशीलता असते, ती मात्र मला सोडायची नाही. एखादी तरुणी रस्त्यावर सिगारेट ओढताना दिसली, की माझ्या अंगाची लाही लाही होते. तसाच अर्ध्या छातीचा जंपरही मला खपत नाही. आपल्या धर्माची लाज सोडून दिल्यानेच आपण फार फारवर्ड आहोत असे सिद्ध होणार आहे का? पुरुष कुठे छाती किंवा पाठ उघडी टाकून फिरतात?' 'याच मुद्द्यावर बाईजी, मी तुम्हाला धारेवर धरते तेव्हा तुम्ही चिडता. पुरुष स्वतंत्र आहे. तो मनातून जाणून असतो की आपण स्वतंत्र आहोत. तो स्वातंत्र्याचे सोंग आणत नाही. स्त्री मनातून जाणून असते की आपण स्वतंत्र नाही, म्हणून ती स्वातंत्र्याचे ढोंग करते. जे बलवान असतात ते ताठा दाखवत नाहीत; जे दुबळे असतात तेच ताठा मिरवतात. स्वतःचे अश्रू पुसण्याइतकासुद्धा अधिकार तुम्ही त्यांना द्यायला तयार नाही?' 'मी तर म्हणते, स्त्री स्वतःला झाकून पुरुषाला जितके नाचवू शकते, तितके स्वतःला उघडे करून नाचवू शकत नाही.' 'पुरुषाला आकर्षित करण्याची काळजी स्त्रीनेच का करावी? पुरुष स्त्रीपासून का पडदा करीत नाही?'
मनोवृत्ती
'आज माझे तोंड उघडायला लावू नकोस, मीनू. या पोरटीला उठवून सांग, म्हणावे, जा, घरी जाऊन झोप. इतकी माणसे ये-जा करताहेत आणि ही निर्लज्ज पाय पसरून पडली आहे. हिला इथे झोप तरी कशी लागली?' 'रात्री किती उकडत होते बाईजी! गारवा मिळाला आणि बिचारीचा डोळा लागला.' 'रात्रभर इथेच होती ही; मला तर थोडी थोडी शंकाच येते.' मीनू तरुणीजवळ येऊन तिचा हात धरून हलवते, 'इथे का झोपला आहात देवीजी? एवढा दिवस वर आला, उठा, घरी जा.' तरुणी डोळे उघडते, 'अगबाई, एवढा दिवस वर आला? मी झोपले होते का? मला अधूनमधून भोवळ येत असते. वाटले, हवेने थोडा फायदा होईल. इथे आले; पण अशी भोवळ आली की या बाकावर बसले, मग मला शुद्धच राहिली नाही. अजूनही मला उभे राहता येत नाही. वाटते, पडेन. पुष्कळ औषधे केली, पण काही गुण येत नाही. आपण डॉक्टर श्यामनाथांना ओळखत असाल, ते माझे सासरे.' नवयौवना आश्चर्याने म्हणाली, 'असं? ते तर आत्ताच इकडूनच गेले.' 'खरंच? पण ते मला ओळखणार कसे? अजून माझे गौने होऊन मी सासरी गेलेले नाही.' 'म्हणजे तुम्ही त्यांचे चिरंजीव बसंतलाल यांच्या पत्नी?' तरुणीने लाजून मान खाली घालून होकार दिला. मीनू हसून म्हणाली, 'बसंतलाल तर आत्ताच इकडून गेले. माझी त्यांची युनिव्हर्सिटीतली ओळख आहे.' 'असं? पण त्यांनी मला पाहिले आहे कुठे?' 'मग मी धावत जाऊन डॉक्टरसाहेबांना कळवू?' 'नको हो, मी थोड्या वेळात अगदी बरी होईन.' 'बसंतलालसुद्धा तो तिथे उभा आहे, त्याला बोलावू?' 'नको हो, कोणालाही बोलावू नका.' 'मग चला, माझ्या मोटारीतून तुम्हाला तुमच्या घरी पोचवते.' 'आपली मोठी कृपा होईल.' 'कोणत्या मोहल्ल्यात?' 'बेगमगंज, मिस्टर जयरामदासांच्या घरी.' 'मी आजच मिस्टर बसंतलालना सांगेन.' 'मला काय ठाऊक, ते या पार्कात येतात म्हणून!' 'पण कोणी माणूस तरी बरोबर घ्यायचे होते ना?' 'कशाला? काही गरज नव्हती.'