मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
मंत्र
१ संध्याकाळची वेळ होती. डॉक्टर चड्ढा गोल्फ खेळायला जायच्या तयारीत होते. मोटार दारासमोर उभी होती, तोच दोन भोई एक डोली घेऊन येताना दिसले. डोलीच्या मागोमाग एक म्हातारा काठी टेकत टेकत येत होता. डोली दवाखान्यासमोर येऊन थांबली. म्हाताऱ्याने हळूहळू पुढे होऊन दारावर सोडलेल्या चिकेतून आत डोकावले. एवढ्या स्वच्छ, चकचकीत जमिनीवर पाय ठेवताना त्याला भीती वाटत होती, की कुणी दरडावून अंगावर येईल. डॉक्टरसाहेब टेबलासमोर उभे आहेत हे दिसत असूनही काही बोलायचे धाडस त्याला होईना. डॉक्टरसाहेबांनी चिकेच्या आतूनच गरजून विचारले—कोण आहे? काय पाहिजे? म्हाताऱ्याने हात जोडले—हुजूर, फार गरीब माणूस आहे मी. माझा पोरगा कित्येक दिवसांपासून..... डॉक्टरसाहेबांनी सिगार पेटवली—उद्या सकाळी ये, उद्या सकाळी. आम्ही या वेळी रोगी पाहत नाही. म्हाताऱ्याने गुडघे टेकून जमिनीवर डोके ठेवले आणि म्हणाला—सरकार, तुमच्या पाया पडतो, पोरगा मरून जाईल. हुजूर, चार दिवस झाले, डोळे...... डॉक्टर चड्ढांनी मनगटाकडे नजर टाकली. आणखी फक्त १० मिनिटे उरली होती. खुंटीवरची गोल्फ-स्टिक उतरवत ते म्हणाले—उद्या सकाळी ये, उद्या सकाळी. ही आमची खेळायची वेळ आहे. म्हाताऱ्याने पगडी काढून उंबऱ्यावर ठेवली आणि रडत म्हणाला—हुजूर, एकदा नजर टाका. फक्त एक नजर! पोरगा हातचा जाईल हुजूर. सात पोरांतून एवढा एकच उरलाय हुजूर. आम्ही दोघं रडून रडून मरून जाऊ सरकार. तुमची भरभराट होवो, दीनबंधू! असले अडाणी, गावंढळ खेडूत इथे जवळजवळ रोजच येत असत. डॉक्टरसाहेब त्यांचा स्वभाव चांगलाच ओळखून होते. कुणी कितीही काहीही सांगो, हे आपलेच तुणतुणे वाजवीत राहणार; कुणाचे ऐकणार नाहीत. त्यांनी हळूच चिक उचलली आणि बाहेर पडून ते मोटारीकडे निघाले. म्हातारा हे म्हणत त्यांच्यामागे धावला—सरकार, मोठं पुण्य लागेल, हुजूर दया करा. फार दीनदुबळा आहे मी, जगात दुसरं कुणी नाही हो, बाबूजी!
मंत्र
पण डॉक्टरसाहेबांनी त्याच्याकडे मान वळवून पाहिलेसुद्धा नाही. मोटारीत बसून ते म्हणाले—उद्या सकाळी ये. मोटार निघून गेली. म्हातारा कितीतरी मिनिटे पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला. आपल्या मौजमजेपुढे कुणाच्या जिवाचीसुद्धा पर्वा न करणारी माणसे या जगात असतात, यावर बहुधा त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. सुसंस्कृत जग इतके निर्मम, इतके कठोर असते, याचा असा काळीज चिरणारा अनुभव त्याला आजवर आला नव्हता. लागलेली आग विझवायला, प्रेताला खांदा द्यायला, कुणाचे छप्पर उचलून द्यायला आणि कुणाचे भांडण मिटवायला सदैव तयार असणाऱ्या जुन्या जमान्यातल्या माणसांपैकी तो होता. मोटार दिसत होती तोवर म्हातारा तिकडे टक लावून पाहत उभा राहिला. डॉक्टरसाहेब परत येतील अशी आशा बहुधा त्याला अजूनही वाटत होती. मग त्याने भोयांना डोली उचलायला सांगितले. डोली जिकडून आली होती, तिकडेच परत गेली. सगळीकडून निराश होऊन तो डॉक्टर चड्ढांकडे आला होता. त्यांची मोठी कीर्ती ऐकली होती. इथून निराश झाल्यावर तो दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरकडे गेला नाही. कपाळावर हात मारून बसला. त्याच रात्री त्याचा हसता-खेळता सात वर्षांचा मुलगा आपली बाललीला संपवून या जगातून निघून गेला. म्हाताऱ्या आई-बापांच्या जगण्याला हाच एक आधार होता. याचेच तोंड पाहून ते जगत होते. हा दिवा विझताच आयुष्याची अंधारी रात्र सुनीसुनी होऊन खायला उठली. म्हातारपणाची अफाट माया भग्न हृदयातून बाहेर पडली आणि त्या अंधारात आर्त स्वराने आक्रोश करू लागली.
मंत्र
२ कित्येक वर्षे लोटली. डॉक्टर चड्ढांनी भरपूर कीर्ती आणि पैसा मिळवला; पण त्याबरोबरच आपली प्रकृतीही जपली, आणि ही एक असाधारण गोष्ट होती. वयाच्या ५० व्या वर्षीही त्यांचा चटपटीतपणा आणि चपळाई पाहून तरुणांनाही लाज वाटावी, हा त्यांच्या नियमित जीवनाचा प्रसाद होता. त्यांच्या प्रत्येक कामाची वेळ ठरलेली होती. त्या नियमापासून ते तसूभरही ढळत नसत. बहुधा लोक आरोग्याचे नियम पाळतात ते आजारी पडल्यावर. डॉक्टर चड्ढा उपचार आणि संयम यांचे रहस्य पुरते जाणून होते. त्यांच्या मुलांची संख्याही याच नियमाला धरून होती. त्यांना फक्त दोनच मुले झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. तिसरे अपत्य झाले नाही. म्हणून श्रीमती चड्ढाही अजून तरुण दिसत. मुलीचे तर लग्न झाले होते. मुलगा कॉलेजात शिकत होता. तोच आई-वडिलांच्या जगण्याचा आधार होता. शील आणि विनय यांची मूर्ती, मोठा रसिक, मोठा उदार, विद्यालयाचा अभिमान, तरुणांच्या मेळाव्याची शोभा; त्याच्या चेहऱ्यावरून तेजाची प्रभा फाकत असे. आज त्याचाच विसावा वाढदिवस होता. संध्याकाळची वेळ होती. हिरव्यागार हिरवळीवर खुर्च्या मांडल्या होत्या. एका बाजूला शहरातले धनिक आणि अधिकारी, दुसऱ्या बाजूला कॉलेजचे विद्यार्थी बसून जेवत होते. विजेच्या दिव्यांनी सारे मैदान झगमगत होते. करमणुकीची साधनेही जमवली होती. एक छोटेसे प्रहसन करायची तयारी होती. ते प्रहसन खुद्द कैलासनाथने लिहिले होते. मुख्य ॲक्टरही तोच होता. या वेळी तो रेशमी शर्ट घालून, उघड्या डोक्याने, अनवाणी, इकडून तिकडे मित्रांच्या आदरातिथ्यात गुंतला होता. कुणी हाक मारी—कैलास, जरा इकडे ये; कुणी तिकडून बोलावी—कैलास, तिकडेच राहणार आहेस की काय? सगळे त्याची थट्टा करीत होते, चेष्टामस्करी करीत होते. बिचाऱ्याला जरा श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नव्हती.
मंत्र
अचानक एका तरुणीने त्याच्याजवळ येऊन म्हटले—काय रे कैलास, तुझे साप कुठे आहेत? जरा मला दाखव ना. कैलासने हात हलवून म्हटले—मृणालिनी, आत्ता माफ कर, उद्या दाखवीन. मृणालिनीने हट्ट धरला—मुळीच नाही, तुला दाखवावेच लागतील. आज मी ऐकायची नाही. तू रोज उद्या-उद्या करीत असतोस. मृणालिनी आणि कैलास दोघे वर्गमित्र होते आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. कैलासला साप पाळायचा, त्यांच्याशी खेळायचा आणि त्यांना डोलवायचा शौक होता. त्याने तऱ्हेतऱ्हेचे साप पाळले होते. त्यांच्या स्वभावाचे, वागण्याचे तो सतत निरीक्षण करीत असे. थोड्या दिवसांपूर्वीच त्याने विद्यालयात 'साप' या विषयावर एक गाजलेले व्याख्यान दिले होते. साप डोलवूनही दाखवले होते. प्राणिशास्त्रातले मोठमोठे पंडितसुद्धा ते व्याख्यान ऐकून थक्क झाले होते. ही विद्या तो एका म्हाताऱ्या गारुड्याकडून शिकला होता. सर्पविषावरच्या जडीबुटी जमवायचे त्याला वेडच होते. एखाद्या माणसाकडे चांगली जडीबुटी आहे एवढे कळायचा अवकाश, की त्याला चैन पडत नसे. ती मिळवल्याशिवाय तो राहत नसे. हेच त्याचे व्यसन होते. यापायी त्याने हजारो रुपये उधळले होते. मृणालिनी कितीतरी वेळा आली होती; पण साप पाहायची एवढी उत्सुकता तिला कधी वाटली नव्हती. आज तिची उत्सुकता खरोखरच जागी झाली होती, की तिला कैलासवरचा आपला हक्क सगळ्यांना दाखवायचा होता, कुणास ठाऊक; पण तिचा हट्ट अवेळी होता. त्या खोलीत केवढी गर्दी होईल, गर्दी पाहून साप किती बिथरतील आणि रात्रीच्या वेळी छेडले जाणे त्यांना किती नकोसे वाटेल, या गोष्टींचा तिला जरासुद्धा विचार सुचला नाही. कैलास म्हणाला—नको, उद्या नक्की दाखवीन. आत्ता नीट दाखवताही येणार नाहीत. खोलीत मुंगी शिरायलाही जागा उरणार नाही.
मंत्र
एक महाशय चिडवीत म्हणाले—दाखवत का नाहीस रे? एवढ्याशा गोष्टीसाठी केवढी टाळाटाळ चालवलीय! मिस गोविंद, मुळीच ऐकू नका. पाहू या, कसा दाखवत नाही ते! दुसऱ्या महाशयांनी आणखी भर घातली—मिस गोविंद इतक्या साध्याभोळ्या आहेत, म्हणूनच तुम्ही एवढा तोरा मिरवता. दुसरी एखादी सुंदरी असती, तर एवढ्यावरून फणकारली असती. तिसरे साहेब थट्टा करीत म्हणाले—अहो, बोलणंच टाकलं असतं. ही काय रीत झाली! आणि वर तुमचा दावा, की मृणालिनीसाठी जीव हजर आहे! हे टारगट आपल्याला फूस लावताहेत, हे मृणालिनीने ओळखले आणि ती म्हणाली—तुम्ही माझी वकिली करू नका, माझी वकिली मी स्वतः करीन. मला आत्ता सापांचा खेळ पाहायचा नाही. चला, संपला विषय! यावर मित्रांनी हास्याचा गडगडाट केला. एक साहेब म्हणाले—पाहायचं तर तुम्हाला सगळंच असतं, पण कुणी दाखवायला तर हवा ना? मृणालिनीचा ओशाळलेला चेहरा पाहून कैलासला कळून चुकले, की आत्ताचा आपला नकार तिला खरोखरच लागला आहे. प्रीतिभोजन संपून गाणे सुरू होताच त्याने मृणालिनीला आणि इतर मित्रांना सापांच्या पेटाऱ्यासमोर नेले आणि पुंगी वाजवायला सुरुवात केली. मग एकेक कप्पा उघडून तो एकेक साप बाहेर काढू लागला. वा! काय कमाल होती! जणू हे जीव त्याचा एकेक शब्द, त्याच्या मनातला एकेक भाव समजत होते. कुणाला त्याने उचलून घेतले, कुणाला गळ्यात घातले, कुणाला हाताभोवती गुंडाळले. मृणालिनी पुन्हा पुन्हा मना करीत होती, की यांना गळ्यात घालू नकोस, लांबूनच दाखव. फक्त जरा डोलव. कैलासच्या गळ्याला सापांचे विळखे पडलेले पाहून तिचा जीव जात होता. उगाच याला साप दाखवायला सांगितले, असा पश्चात्ताप तिला होत होता; पण कैलास एक ऐकत नव्हता. प्रेयसीसमोर आपली सर्पकला दाखवायची अशी संधी मिळाल्यावर तो कसला चुकवतो! एका मित्राने टोमणा मारला—दात पाडून टाकले असतील?
मंत्र
कैलास हसून म्हणाला—दात पाडणं हे मदाऱ्यांचं काम. एकाचेही दात पाडलेले नाहीत. म्हणत असाल तर दाखवतो. असे म्हणून त्याने एक काळा साप पकडला आणि म्हणाला—याच्याहून मोठा आणि विषारी साप माझ्याकडे दुसरा नाही. हा कुणाला डसला, तर माणूस क्षणार्धात मरेल. विषाची लहरसुद्धा यायची नाही. याच्या दंशावर मंत्र नाही. याचे दात दाखवू? मृणालिनीने त्याचा हात धरला—नको, नको कैलास, देवाच्या नावानं सोड त्याला! तुझ्या पाया पडते! यावर दुसरे एक मित्र म्हणाले—मला तर विश्वास बसत नाही; पण तू म्हणतोस तर मानतो. कैलासने सापाची मान पकडून म्हटले—नाही साहेब, डोळ्यांनी पाहून मग माना. दात पाडून वश केला, तर त्यात काय मोठं? साप फार शहाणा असतो. या माणसापासून आपल्याला काही अपाय होणार नाही, अशी त्याची खात्री पटली, तर तो त्याला कधीही डसणार नाही. कैलासच्या अंगात या वेळी भूत संचारले आहे, हे पाहून हा खेळ थांबवावा म्हणून मृणालिनी म्हणाली—बरं बाबा, आता इथून चला. ऐका, गाणं सुरू झालं. आज मीसुद्धा काहीतरी म्हणून दाखवणार आहे. असे म्हणत तिने कैलासचा खांदा धरून चलण्याचा इशारा केला आणि ती खोलीतून बाहेर पडली; पण विरोधकांच्या शंकांचे निरसन केल्याशिवाय कैलासला दम घ्यायचा नव्हता. त्याने सापाची मान पकडून जोराने दाबली, इतक्या जोराने दाबली की त्याचा चेहरा लालबुंद झाला, अंगातल्या साऱ्या शिरा तटतटल्या. सापाने त्याच्या हातून असे वागणे आजवर कधी पाहिले नव्हते. हे आपल्याकडून काय मागताहेत, ते त्याला कळेना. बहुधा यांना आपल्याला मारून टाकायचे आहे, असा त्याचा भ्रम झाला. म्हणून तो स्वसंरक्षणासाठी सज्ज झाला.
मंत्र
कैलासने त्याची मान चांगली दाबून त्याचे तोंड उघडले आणि त्याचे विषारी दात दाखवत तो म्हणाला—ज्या सज्जनांना शंका असेल, त्यांनी येऊन पाहावे. बसला विश्वास, की अजून काही शंका आहे? मित्रांनी जवळ येऊन त्याचे दात पाहिले आणि ते चकित झाले. प्रत्यक्ष पुराव्यापुढे संशयाला जागा कुठली? मित्रांच्या शंका फेडल्यावर कैलासने सापाची मान सैल केली आणि त्याला जमिनीवर ठेवायला गेला. पण तो काळा नाग रागाने वेडापिसा झाला होता. मान सैल पडताच त्याने फणा उभारून कैलासच्या बोटाला कडकडून दंश केला आणि तिथून पळाला. कैलासच्या बोटातून टपटप रक्त गळू लागले. त्याने बोट जोराने दाबून धरले आणि आपल्या खोलीकडे धाव घेतली. तिथे टेबलाच्या खणात एक जडीबुटी ठेवलेली होती; ती वाटून लावली की जीवघेणे विषसुद्धा उतरत असे. मित्रांमध्ये एकच खळबळ उडाली. बाहेर मैफलीतही बातमी पोचली. डॉक्टरसाहेब घाबरून धावत आले. ताबडतोब बोटाच्या मुळाशी घट्ट बंद आवळला आणि जडीबुटी वाटायला दिली. डॉक्टरसाहेबांचा जडीबुटीवर विश्वास नव्हता. बोटाचा डसलेला भाग त्यांना नश्तराने कापून टाकायचा होता; पण कैलासचा जडीबुटीवर पूर्ण विश्वास होता. मृणालिनी पियानोवर बसली होती. ही बातमी ऐकताच ती धावत आली आणि कैलासच्या बोटातून ठिबकणारे रक्त रुमालाने पुसू लागली. जडीबुटी वाटली जात होती, पण त्या एका मिनिटातच कैलासचे डोळे मिटू मिटू लागले, ओठ पिवळे पडू लागले. शेवटी त्याला उभे राहवेना. तो जमिनीवर बसला. सगळे पाहुणे खोलीत जमा झाले. कुणी काही सांगत होता, कुणी काही. तेवढ्यात जडीबुटी वाटून आली. मृणालिनीने बोटावर लेप लावला. आणखी एक मिनिट गेले. कैलासचे डोळे मिटले. तो आडवा झाला आणि हाताने वारा घालायचा इशारा केला. आईने धावत येऊन त्याचे डोके मांडीवर घेतले, आणि विजेचा टेबल-फॅन लावला.
मंत्र
डॉक्टरसाहेबांनी वाकून विचारले—कैलास, कसं वाटतंय? कैलासने हळूच हात उचलला, पण त्याला काही बोलता आले नाही! मृणालिनीने करुण स्वरात विचारले—जडीबुटीचा काहीच गुण येणार नाही का? डॉक्टरसाहेबांनी डोके धरले—काय सांगू, मी याच्या बोलण्याला भुललो. आता नश्तरानेसुद्धा काही उपयोग होणार नाही. अर्धा तास हीच अवस्था होती. कैलासची स्थिती क्षणाक्षणाला बिघडत चालली होती. शेवटी त्याचे डोळे थिजले, हात-पाय गार पडले, चेहऱ्याची कांती निस्तेज झाली, नाडीचा पत्ताच लागेना. मृत्यूची सारी लक्षणे दिसू लागली. घरात एकच हलकल्लोळ माजला. एकीकडे मृणालिनी डोके आपटू लागली, दुसरीकडे आई टाहो फोडून जमिनीवर आदळू लागली. मित्रांनी डॉक्टर चड्ढांना धरून ठेवले, नाहीतर त्यांनी तो नश्तर स्वतःच्या गळ्यावर चालवला असता. एक महाशय म्हणाले—कुणी मंत्राने विष उतरवणारा मिळाला, तर कदाचित अजूनही जीव वाचेल. एका मुसलमान सद्गृहस्थांनी याला दुजोरा दिला—अहो साहेब, कबरीत पडलेली प्रेतं जिवंत झाली आहेत. असे एकेक करामती लोक आहेत. डॉक्टर चड्ढा म्हणाले—माझ्या अकलेवर धोंडा पडला होता, म्हणून याच्या बोलण्याला भुललो. नश्तर चालवला असता, तर ही वेळच का आली असती? बाळा, साप पाळू नकोस, असं मी वारंवार समजावीत होतो; पण ऐकतो कोण! बोलवा, कुणा झाडफूक करणाऱ्यालाच बोलवा. माझं सर्वस्व घेऊ दे, माझी सारी इस्टेट मी त्याच्या पायांवर ठेवीन. लंगोटी नेसून घराबाहेर पडेन; पण माझा कैलास, माझा लाडका कैलास उठून बसू दे. देवासाठी कुणाला तरी बोलवा. एका महाशयांची एका मांत्रिकाशी ओळख होती. ते धावत जाऊन त्याला घेऊन आले; पण कैलासचा चेहरा पाहून त्याला मंत्र टाकायचे धाडस झाले नाही. तो म्हणाला—आता काय होणार सरकार? जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं!
मंत्र
अरे मूर्खा, जे व्हायचे नव्हते ते होऊन गेले, असे का म्हणत नाहीस? जे व्हायचे होते, ते कुठे झाले? आई-बापांनी लेकाच्या कपाळी मुंडावळ्या कुठे पाहिल्या? मृणालिनीच्या मनोरथांचा वृक्ष पानाफुलांनी बहरला का? ज्या सोनेरी स्वप्नांनी आयुष्य आनंदाचा झरा झाले होते, ती स्वप्ने पुरी झाली का? आयुष्याच्या नाचऱ्या, तारकांनी जडवलेल्या सागरात मौजेची लयलूट करीत असतानाच त्यांची नौका बुडाली नाही का? जे व्हायचे नव्हते, ते झाले! तेच हिरवेगार मैदान होते, तेच सोनेरी चांदणे एखाद्या निःशब्द संगीतासारखे सृष्टीवर पसरले होते, तीच मित्रमंडळी होती, तीच करमणुकीची साधने होती. पण जिथे हास्याचे स्वर होते, तिथे आता करुण आक्रोश होता आणि अश्रूंचे पाट वाहत होते. ३ शहरापासून कित्येक मैल दूर एका छोट्याशा घरात एक म्हातारा आणि एक म्हातारी शेगडीसमोर बसून थंडीची रात्र काढत होते. म्हातारा नारळीचा हुक्का ओढीत होता आणि मधूनमधून खोकत होता. म्हातारी दोन्ही गुडघ्यांत डोके खुपसून आगीकडे टक लावून बसली होती. कोनाड्यात घासलेटची एक चिमणी जळत होती! घरात ना खाट होती, ना अंथरूण. एका कोपऱ्यात थोडासा पेंढा पडला होता. याच खोलीत एक चूल होती. म्हातारी दिवसभर गोवऱ्या आणि वाळलेली लाकडे गोळा करीत असे. म्हातारा दोरी वळून बाजारात विकून येई. हीच त्यांची उपजीविका होती. त्यांना कुणी रडताना पाहिले नव्हते, की हसताना. त्यांचा सारा वेळ जगण्यातच खर्ची पडत असे. मरण दारात उभे होते; रडायला किंवा हसायला फुरसत कुठली! म्हातारीने विचारले—उद्यासाठी तर तागच नाही, काम काय करणार? 'जाऊन झगडू साहकडून दहा शेर ताग उधार आणीन.' 'आधीचे पैसे तर दिलेच नाहीत, आणखी उधार कसा देईल?'
मंत्र
'नाही दिला तर नाही. गवत काही कुठे पळून गेलेलं नाही. दुपारपर्यंत दोन आण्याचंसुद्धा कापणार नाही का मी?' तेवढ्यात दारावर कुणीतरी हाक मारली—भगत, भगत, झोपलात का? जरा दार उघडा. भगतने उठून दार उघडले. एका माणसाने आत येऊन सांगितले—ऐकलंत का? डॉक्टर चड्ढाबाबूंच्या मुलाला साप डसला. भगतने चमकून विचारले—चड्ढाबाबूंच्या मुलाला! तेच ना चड्ढाबाबू, जे छावणीत बंगल्यात राहतात? 'हो हो, तेच. शहरात एकच गवगवा झालाय. जायचं तर जा, नशीब नाही का उघडणार?' म्हाताऱ्याने कठोरपणे मान हलवली—मी नाही जात. मला काय घेणं-देणं? तेच चड्ढा ना. चांगलं ओळखतो मी. पोराला घेऊन त्यांच्याकडेच तर गेलो होतो. खेळायला निघाले होते. पाया पडलो, की एक नजर पाहा; पण सरळ तोंडानं बोललेसुद्धा नाहीत. देव बसल्या जागी ऐकत होता. आता कळेल, पोराचं दुःख काय असतं ते. त्यांना पोरं बरीच आहेत का? 'नाही हो, हाच तर एक मुलगा होता. ऐकलंय, सगळ्यांनी हात टेकलेत.' 'देव मोठा कर्ता-करविता आहे. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून पाणी आलं होतं; पण यांना जराही दया आली नव्हती. मी त्यांच्या दारात असतो, तरी विचारपूस केली नसती.' 'मग नाही जाणार? आम्ही ऐकलं, ते सांगितलं.' 'बरं केलं, बरं केलं. काळीज गार झालं, डोळे निवले. पोरगंही एव्हाना गार पडलं असेल! तू जा. आज सुखाची झोप घेईन. (म्हातारीला) जरा तंबाखू आण गं. आणखी एक चिलीम ओढतो. आता कळेल साहेबांना! सारी साहेबी उतरेल. आमचं काय बिघडलं? पोरगा मेला म्हणून आमचं काही राज्य गेलं नाही. जिथं सहा पोरं गेली, तिथं आणखी एक गेलं. तुमचं मात्र राज्यच ओस पडेल. त्याच्यासाठीच तर सगळ्यांचे गळे दाबून दाबून माया जमवली होती ना! आता काय कराल? एकदा पाहायला जाईन; पण काही दिवसांनी. तब्येतीची विचारपूस करीन.'
मंत्र
तो माणूस निघून गेला. भगतने दार लावून घेतले, आणि चिलमीत तंबाखू भरून ओढू लागला. म्हातारी म्हणाली—एवढ्या रात्री, या कडाक्याच्या थंडीत कोण जाणार? 'अगं, भर दुपार असती, तरी मी गेलो नसतो. दारात गाडी न्यायला आली असती, तरी गेलो नसतो. विसरलो नाही मी. पन्नाचा चेहरा आजही डोळ्यांसमोर फिरतोय. या निर्दयानं त्याच्याकडे एक नजरसुद्धा टाकली नाही! तो वाचणार नाही, हे काय मला ठाऊक नव्हतं? चांगलं ठाऊक होतं. चड्ढा काही देव नव्हते, की त्यांनी एक नजर टाकल्यानं अमृताचा पाऊस पडला असता. नाही, नुसतं मन धावत होतं. जरा तेवढाच दिलासा मिळाला असता; बस्स, म्हणून त्यांच्याकडे धावत गेलो होतो. आता कधीतरी जाईन आणि म्हणेन, काय साहेब, बोला, कसा काय रंग आहे? जग नावं ठेवील, ठेवू दे; पर्वा नाही. लहान माणसांत तर सगळेच दोष असतात. मोठ्यांत कुठलाच दोष नसतो. ते देव असतात.' अशी बातमी ऐकून भगत बसून राहिला, असा प्रसंग त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच आला होता. ८० वर्षांच्या आयुष्यात सापाची खबर आली आणि तो धावत गेला नाही, असे कधी झाले नव्हते. माघ-पौषातली अंधारी रात्र, चैत्र-वैशाखातले ऊन आणि झळा, श्रावण-भाद्रपदातले दुथडी भरून वाहणारे नदी-नाले, कशाचीही त्याने कधी पर्वा केली नव्हती. तो तत्काळ घराबाहेर पडत असे, निःस्वार्थ, निष्काम. देण्याघेण्याचा विचार कधी त्याच्या मनातसुद्धा आला नाही. हे तसले कामच नव्हते. जिवाचे मोल कोण देऊ शकतो? हे एक पुण्यकर्म होते. शेकडो निराश जिवांना त्याच्या मंत्रांनी जीवनदान दिले होते; पण आज त्याचे पाऊल घराबाहेर पडले नाही. ही बातमी ऐकूनही तो झोपायला निघाला आहे. म्हातारी म्हणाली—तंबाखू शेगडीजवळ ठेवलीय. तिचेसुद्धा आज अडीच पैसे पडले. देतच नव्हती.
मंत्र
असे म्हणून म्हातारी आडवी झाली. म्हाताऱ्याने चिमणी विझवली, काही वेळ उभा राहिला, मग बसला. शेवटी आडवा झाला; पण ही बातमी त्याच्या छातीवर ओझ्यासारखी बसली होती. आपली काहीतरी वस्तू हरवली आहे, असे त्याला वाटत होते; जणू सारे कपडे ओले झाले आहेत, किंवा पायांना चिखल लागला आहे; जणू कुणीतरी त्याच्या मनात बसून त्याला घराबाहेर पडायला टोचत आहे. थोड्याच वेळात म्हातारी घोरू लागली. म्हातारी माणसे बोलता बोलता झोपतात आणि जरासे खुट्ट झाले की जागी होतात. तेव्हा भगत उठला, त्याने आपली काठी घेतली आणि हळूच दार उघडले. म्हातारीने विचारले—कुठे निघालात? 'कुठं नाही, किती रात्र आहे ते पाहत होतो.' 'अजून खूप रात्र आहे, झोपा.' 'झोप येत नाही' 'झोप कशी येणार? मन तर चड्ढांच्या घरी लागलंय.' 'चड्ढांनी माझ्यावर असे कोणते उपकार केलेत, की तिथं जावं? त्यांनी येऊन पाया पडले, तरी जाणार नाही.' 'उठलात तर याच इराद्यानं.' 'नाही गं, एवढा वेडा नाही मी, की जो माझ्या वाटेत काटे पेरतो, त्याच्यासाठी फुलं पेरत फिरू.' म्हातारी पुन्हा झोपली. भगतने दार लावले आणि पुन्हा येऊन बसला; पण प्रवचन ऐकायला बसलेल्या श्रोत्यांच्या कानांवर वाजंत्रीचा आवाज पडताच त्यांची जी अवस्था होते, तशीच काहीशी त्याच्या मनाची अवस्था होती. डोळे प्रवचनकाराकडे असले, तरी कान वाजंत्रीकडेच असतात. मनातही वाजंत्रीचे सूर घुमत राहतात. लाजेखातर माणूस जागचा उठत नाही. निर्दय सूडाची भावना भगतसाठी प्रवचनकार होती; पण त्याचे हृदय त्या दुर्दैवी तरुणाकडे लागले होते, जो या क्षणी मरत होता, ज्याच्यासाठी एकेक क्षणाचा उशीर जीवघेणा होता. त्याने पुन्हा दार उघडले, इतक्या हळूच की म्हातारीलाही चाहूल लागली नाही. तो बाहेर पडला. त्याच वेळी गावचा चौकीदार गस्त घालीत होता. तो म्हणाला—भगत, कसे काय उठलात? आज तर कडाक्याची थंडी आहे! कुठे निघालात की काय?
मंत्र
भगत म्हणाला—नाही रे, कुठं जाणार मी! किती रात्र आहे ते पाहत होतो. किती वाजले असतील रे? चौकीदार म्हणाला—एक वाजला असेल, आणखी काय. आत्ताच ठाण्यावरून येत होतो, तर डॉक्टर चड्ढाबाबूंच्या बंगल्यावर मोठी गर्दी जमली होती. त्यांच्या मुलाची हकीकत तुम्ही ऐकली असेलच. जनावर लागलंय. मेलाही असेल कदाचित. तुम्ही गेलात, तर एखाद वेळ वाचेलही. ऐकलं, दहा हजारांपर्यंत द्यायला तयार आहेत. भगत—मी नाही जाणार, मग त्यांनी दहा लाख दिले तरी. दहा हजार काय नि दहा लाख काय, घेऊन करायचंय काय मला? उद्या मरून जाईन; मग भोगायला कोण बसलंय! चौकीदार निघून गेला. भगतने पुढे पाऊल टाकले. नशेत माणसाचे शरीर जसे त्याच्या ताब्यात राहत नाही, पाय टाकतो एकीकडे आणि पडतो भलतीकडे, म्हणायचे असते एक आणि तोंडातून निघते भलतेच, तशीच अवस्था या वेळी भगतची होती. मनात सूड होता, अहंकार होता, द्वेष होता; पण कृती मनाच्या ताब्यात नव्हती. ज्याने कधी तलवार चालवली नाही, तो मनात आणले तरी तलवार चालवू शकत नाही. त्याचे हात कापतात, उठतच नाहीत! भगत काठी खटखट वाजवीत झपाझप चालला होता. जाणीव त्याला अडवीत होती, अंतर्मन पुढे ढकलीत होते. सेवक मालकावर मात करीत होता. अर्धी रात्र उलटून गेल्यावर भगत अचानक थांबला. सूडभावनेने कृतीवर मात केली—मी उगाच एवढ्या लांब आलो. या कडाक्याच्या थंडीत मरायची मला काय गरज पडली होती? सुखानं झोपलो का नाही? झोप येत नव्हती, तर न येईना; दोन-चार भजनं तरी म्हणत बसलो असतो. उगाच एवढ्या लांब धावत आलो. चड्ढांचा मुलगा जगो की मरो, माझ्या बापाचं काय जातंय! त्यांनी माझ्याशी असा कोणता चांगुलपणा केला होता, की मी त्यांच्यासाठी जीव टाकावा? जगात हजारो मरतात, हजारो जगतात. मला कुणाच्या मरण्या-जगण्याशी काय घेणं!
मंत्र
पण अंतर्मनाने आता दुसरेच रूप घेतले, जे सूडभावनेशी बरेचसे मिळतेजुळते होते—तो काही झाडफूक करायला चाललेला नाही; लोक काय करताहेत ते पाहणार आहे. जरा डॉक्टरसाहेबांचे रडणे-ओरडणे पाहील, कसे डोके आपटतात, कसे टाहो फोडून कोसळतात. मोठी माणसेसुद्धा लहानांसारखी रडतात, की धीर धरतात, ते पाहील. ती माणसे तर विद्वान असतात, धीर धरत असतील. सूडभावनेला असा धीर देत तो पुन्हा पुढे निघाला. तेवढ्यात दोन माणसे येताना दिसली. दोघे बोलत बोलत येत होते—चड्ढाबाबूंचं घर उजाड झालं, हाच तर एक मुलगा होता. भगतच्या कानावर हे शब्द पडले. त्याची चाल आणखीनच भरभर झाली. थकव्याने पाय उचलत नव्हते. डोके इतके पुढे झुकत चालले होते, की आता तोंडघशी पडतो की काय असे वाटावे. असा तो सुमारे १० मिनिटे चालला असेल, तेव्हा डॉक्टरसाहेबांचा बंगला नजरेस पडला. विजेचे दिवे जळत होते; पण सगळीकडे सामसूम होती. रडण्या-ओरडण्याचा आवाजही येत नव्हता. भगतचे काळीज धडधडू लागले. आपल्याला फार उशीर तर झाला नाही ना! तो धावू लागला. आयुष्यात इतक्या वेगाने तो कधीच धावला नव्हता. बस्स, असे वाटत होते, जणू त्याच्यामागे मृत्यू धावत येत आहे. ४ दोन वाजले होते. पाहुणे निरोप घेऊन गेले होते. रडणाऱ्यांत फक्त आकाशातल्या चांदण्या उरल्या होत्या. बाकी सगळे रडून रडून थकले होते. लोक मोठ्या अधीरतेने पुन्हा पुन्हा आकाशाकडे पाहत होते, की कधी एकदाची सकाळ होते आणि प्रेत गंगेच्या कुशीत सोपवता येते.
मंत्र
अचानक भगतने दारात येऊन हाक मारली. डॉक्टरसाहेबांना वाटले, कुणी रोगी आला असेल. दुसरा कुठला दिवस असता, तर त्यांनी त्या माणसाला हाकलून लावले असते; पण आज ते बाहेर आले. पाहतात, तो एक म्हातारा माणूस उभा आहे; कंबर वाकलेली, बोळके तोंड, भुवयासुद्धा पांढऱ्या झालेल्या. काठीच्या आधाराने थरथरत उभा होता. डॉक्टरसाहेब मोठ्या नम्रपणे म्हणाले—काय आहे बाबा? आज आमच्यावर असं संकट कोसळलंय, की काही बोलवत नाही. पुन्हा कधीतरी या. आता महिनाभर तरी मी बहुधा कुठलाही रोगी पाहू शकणार नाही. भगत म्हणाला—ऐकलंय बाबूजी, म्हणूनच आलो. भैया कुठं आहेत? जरा मलाही दाखवा. देव मोठा कर्ता-करविता आहे, मेलेल्यालाही जिवंत करू शकतो. कुणास ठाऊक, अजूनही त्याला दया येईल! चड्ढा व्यथित स्वरात म्हणाले—चला, पाहा; पण तीन-चार तास झाले. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. कितीतरी झाडफूक करणारे पाहून पाहून निघून गेले. डॉक्टरसाहेबांना आशा कसली वाटणार? पण म्हाताऱ्याची मात्र त्यांना दया आली; ते त्याला आत घेऊन गेले. भगतने प्रेताकडे एक मिनिटभर पाहिले. मग हसून म्हणाला—अजून काही बिघडलं नाही बाबूजी. वा! नारायणाची इच्छा असेल, तर अर्ध्या तासात भैया उठून बसतील. तुम्ही उगाच धीर सोडताय. जरा भोयांना पाणी भरायला सांगा. भोई पाणी भरभरून कैलासला आंघोळ घालू लागले. पाइपचे पाणी बंद झाले होते. भोई फारसे नव्हते. म्हणून पाहुण्यांनी आवाराबाहेरच्या विहिरीतून पाणी भरभरून भोयांना दिले. मृणालिनी कळशी घेऊन पाणी आणीत होती. म्हातारा भगत उभा राहून हसत हसत मंत्र म्हणत होता, जणू विजय त्याच्यासमोर उभा होता. एकदा मंत्र पुरा झाला, की तो कैलासला एक जडीबुटी हुंगवीत असे. अशा तऱ्हेने कैलासच्या डोक्यावर किती घडे ओतले, आणि भगतने किती वेळा मंत्र टाकला, कुणास ठाऊक.
मंत्र
शेवटी उषेने आपले लाल लाल डोळे उघडले, तेव्हा कैलासचे लाल लाल डोळेही उघडले! क्षणात त्याने आळस दिला आणि प्यायला पाणी मागितले. डॉक्टर चड्ढांनी धावत जाऊन नारायणीला मिठी मारली, नारायणी धावत जाऊन भगतच्या पाया पडली, आणि मृणालिनी डोळ्यांत पाणी आणून कैलासला विचारू लागली—आता कसं वाटतंय? क्षणात सगळीकडे बातमी पसरली. मित्रमंडळी अभिनंदन करायला येऊ लागली. डॉक्टरसाहेब मोठ्या श्रद्धेने प्रत्येकापुढे भगतची कीर्ती गात फिरत होते. सगळेच भगतचे दर्शन घ्यायला उत्सुक झाले; पण आत जाऊन पाहतात, तो भगतचा कुठे पत्ताच नव्हता. नोकर म्हणाले—आत्ता तर इथेच बसून चिलीम ओढत होते. आम्ही तंबाखू देऊ लागलो, तर घेतली नाही; आपल्याजवळची तंबाखू काढून भरली. इकडे भगतचा चहूकडे शोध सुरू झाला, आणि तिकडे भगत, म्हातारी उठायच्या आत घरी पोचावे म्हणून झपाझप घराकडे निघाला होता! पाहुणे निघून गेल्यावर डॉक्टरसाहेब नारायणीला म्हणाले—म्हातारा कुठे निघून गेला कुणास ठाऊक. एका चिलमीभर तंबाखूचासुद्धा मिंधा झाला नाही? नारायणी—मी तर ठरवलं होतं, त्याला मोठी रक्कम द्यायची. चड्ढा—रात्री मी त्याला ओळखलं नाही; पण जरा उजाडल्यावर ओळखलं. एकदा हा एका रोग्याला घेऊन आला होता. आता मला आठवतंय, मी खेळायला निघालो होतो आणि रोग्याला पाहायला नकार दिला होता. आज त्या दिवसाची आठवण होऊन मला जी खंत वाटते आहे, ती मी सांगू शकत नाही. मी आता त्याला शोधून काढीन आणि त्याच्या पाया पडून माझ्या अपराधाची क्षमा मागेन. तो काही घेणार नाही, हे मला ठाऊक आहे. त्याचा जन्मच कीर्तीचा वर्षाव करण्यासाठी झाला आहे. त्याच्या सज्जनपणाने मला असा आदर्श दाखवला आहे, जो आता आयुष्यभर माझ्यासमोर राहील.