मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
म्हातारी काकी
१ म्हातारपण म्हणजे बहुधा बालपणाचे पुन्हा येणेच असते. म्हाताऱ्या काकींमध्ये जिभेच्या चवीखेरीज दुसरी कोणतीच आस उरली नव्हती; आणि आपल्या दुःखाकडे लोकांचे लक्ष वेधायला रडण्याखेरीज दुसरा आधारही नव्हता. सारी इंद्रिये—डोळे, हात, पाय—केव्हाच साथ सोडून गेली होती. जमिनीवर पडून असत; आणि घरच्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध काही केले, जेवणाची वेळ टळली किंवा पोटभर मिळाले नाही, अथवा बाजारातून काही आले आणि त्यांना मिळाले नाही, की त्या रडू लागत. त्यांचे रडणे-मुसमुसणे साधेसुधे नसे; त्या घसा फोडून फोडून रडत. त्यांच्या पतिराजांना स्वर्गवासी होऊन बराच काळ लोटला होता. मुलगे ऐन तारुण्यात एकामागून एक देवाघरी गेले होते. आता एका पुतण्याशिवाय त्यांचे कोणी नव्हते. त्याच पुतण्याच्या नावे त्यांनी आपली सारी मालमत्ता लिहून दिली होती. मालमत्ता लिहून घेताना पुतण्याने मोठमोठी वचने दिली; पण कुली-डेपोंचे दलाल मजुरांना जी सोनेरी स्वप्ने दाखवतात, तसलीच ती सारी वचने होती. त्या मालमत्तेचे वर्षाचे उत्पन्न दीड-दोनशे रुपयांहून कमी नव्हते, तरीही म्हाताऱ्या काकींना पोटभर अन्नसुद्धा मुश्किलीने मिळे. यात दोष त्यांचा पुतण्या पंडित बुद्धिराम यांचा होता, की त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती रूपा हिचा, हे ठरवणे सोपे नाही. बुद्धिराम स्वभावाने सज्जन होते, पण जोवर त्यांच्या तिजोरीला धक्का लागत नाही तोवरच. रूपा स्वभावाने तापट होती खरी, पण देवाला भिऊन वागणारी होती. म्हणून काकींना तिचा तापटपणा तितकासा खुपत नसे, जितका बुद्धिरामांचा भलेपणा खुपे.
म्हातारी काकी
बुद्धिरामांना कधी कधी आपल्या अत्याचाराची खंत वाटे. मनात येई, याच मालमत्तेच्या जोरावर आज मी भला माणूस म्हणून मिरवतो आहे. तोंडी दिलासा आणि कोरडी सहानुभूती यांनी परिस्थिती सुधारली असती, तर कदाचित त्यांची काही हरकत नसती; पण जास्तीच्या खर्चाची भीती त्यांच्या सदिच्छेला दाबून ठेवी. इतकी, की दारात एखादा प्रतिष्ठित माणूस बसलेला असावा आणि नेमके त्याच वेळी काकींनी आपले रडगाणे सुरू करावे, तर ते भडकून उठत आणि घरात येऊन त्यांना जोरात दटावत. मुलांना म्हाताऱ्या माणसांचा स्वभावतःच राग असतो; त्यात आईवडिलांचा हा रंग दिसल्यावर ती काकींना आणखीच छळत. कोणी चिमटा काढून पळे, कोणी त्यांच्यावर तोंडातल्या पाण्याची चूळ टाकी. काकी किंचाळून रडत; पण त्या केवळ खाण्यासाठी रडतात हे सगळ्यांना ठाऊक होते, म्हणून त्यांच्या दुःखाकडे आणि आक्रोशाकडे कोणी लक्ष देत नसे. हां, काकी चिडून मुलांना शिव्या देऊ लागल्या, की मात्र रूपा तत्काळ घटनास्थळी हजर होई. या भीतीने काकी आपल्या जिभेची तलवार क्वचितच उपसत; वास्तविक उपद्रव शमवण्याचा हा उपाय रडण्यापेक्षा कितीतरी अधिक उपयोगी होता. सगळ्या कुटुंबात काकींवर कोणाचे प्रेम असलेच, तर ते बुद्धिरामांच्या धाकट्या मुलीचे, लाडलीचे. लाडली आपल्या दोन्ही भावांच्या भीतीने आपल्या वाट्याची मिठाई, चणे-फुटाणे काकींजवळ बसून खात असे. हाच तिचा आसरा होता. काकींच्या खादाडपणामुळे त्यांचा आश्रय तिला फार महाग पडे, तरीही भावांच्या अन्यायापेक्षा तो कितीतरी परवडण्याजोगा होता. स्वार्थाच्या याच जुळणीने दोघींमध्ये सहानुभूती रुजवली होती.
म्हातारी काकी
२ रात्रीची वेळ होती. बुद्धिरामांच्या दारात सनई वाजत होती आणि गावातल्या पोरांचा घोळका डोळे विस्फारून गाण्याचा आस्वाद घेत होता. खाटांवर पाहुणे आराम करीत न्हाव्यांकडून मुठींनी अंग रगडून घेत होते. जवळच उभा असलेला भाट बिरुदावली गात होता, आणि जाणकार पाहुण्यांच्या 'वाहवा, वाहवा'वर असा खूश होत होता, जणू ती वाहवा खरे तर त्यालाच मिळायला हवी होती. इंग्रजी शिकलेले एक-दोन तरुण या सगळ्या व्यवहारांपासून अलिप्त होते. या गावंढळ मंडळीत बोलणे किंवा मिसळणे त्यांना आपल्या प्रतिष्ठेला न शोभणारे वाटत होते. आज बुद्धिरामांचा थोरला मुलगा सुखराम याच्या लग्नाचा टिळा आला आहे. हा त्याचाच समारंभ. घरात बायका गाणी गात होत्या आणि रूपा पाहुण्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेत गुंतली होती. भट्ट्यांवर कढया चढल्या होत्या. एकीत पुऱ्या-कचोऱ्या तळल्या जात होत्या, दुसरीत इतर पक्वान्ने बनत होती. एका मोठ्या हंड्यात मसालेदार भाजी शिजत होती. तूप आणि मसाल्याचा भूक चाळवणारा सुगंध सगळीकडे दरवळत होता. म्हाताऱ्या काकी आपल्या कोठडीत एखाद्या दुःखी विचारासारख्या बसून होत्या. चवीची आठवण करून देणारा तो सुगंध त्यांना बेचैन करीत होता. त्या मनातल्या मनात विचार करीत होत्या: बहुतेक मला पुऱ्या मिळायच्या नाहीत. इतका वेळ झाला, कोणी जेवण घेऊन आले नाही. वाटते, सगळ्यांची जेवणे झाली. माझ्यासाठी काही उरले नाही. या विचाराने त्यांना रडू आले, पण अपशकुनाच्या भीतीने त्या रडू शकल्या नाहीत. 'अहाहा! काय सुगंध आहे! आता मला कोण विचारतो? जिथे भाकरीचीच मारामार, तिथे पोटभर पुऱ्या मिळण्याइतके भाग्य कुठून असणार?' या विचाराने त्यांना रडू आले, काळजात कळ उठू लागली. पण रूपाच्या भीतीने त्या पुन्हा गप्प बसल्या.
म्हातारी काकी
काकी बराच वेळ याच दुःखद विचारांत बुडून राहिल्या. तूप-मसाल्याचा सुगंध राहून राहून मनाला बेभान करीत होता. तोंडाला पुन्हा पुन्हा पाणी सुटत होते. पुऱ्यांची चव आठवून काळजात गुदगुल्या होऊ लागत. कोणाला हाक मारू? आज लाडली पोरही आली नाही. ती दोन कारटी नेहमी सतावत असतात; आज त्यांचाही कुठे पत्ता नाही. काय बनते आहे ते तरी कळले असते. काकींच्या कल्पनेत पुऱ्यांचे चित्र नाचू लागले. चांगल्या लालसर, टम्म फुगलेल्या, मऊमऊ असतील. रूपाने कणकेत भरपूर मोहन घातले असेल. कचोऱ्यांना ओवा आणि वेलचीचा घमघमाट येत असेल. एक पुरी मिळाली असती, तर जरा हातात घेऊन पाहिली असती. कढईसमोर जाऊन का बसू नये? पुऱ्या चुरचुरत तरंगत असतील. कढईतून गरमागरम काढून ताटात ठेवल्या जात असतील. फुले आपण घरातही हुंगू शकतो, पण बागेतला वास काही वेगळाच असतो. असा निर्णय करून काकी उकिडव्या बसून हातांच्या आधाराने सरकत सरकत मोठ्या मुश्किलीने उंबरठा उतरल्या आणि हळूहळू रांगत कढईजवळ येऊन बसल्या. इथे आल्यावर त्यांना तेवढेच समाधान मिळाले, जितके भुकेल्या कुत्र्याला जेवणाऱ्यासमोर बसून मिळते. रूपा त्या वेळी कामाच्या ओझ्याने हैराण झाली होती. कधी या खोलीत जाई, कधी त्या खोलीत; कधी कढईजवळ येई, कधी कोठीघरात जाई. कोणीतरी बाहेरून येऊन सांगितले—'महाराज थंडाई मागताहेत.' ती थंडाई देऊ लागली. तेवढ्यात आणखी कोणी येऊन म्हणाले—'भाट आलाय, त्याला काहीतरी द्या.' भाटासाठी ती शिधा काढत होती, तोच तिसऱ्या एका माणसाने येऊन विचारले—'जेवण तयार व्हायला अजून किती उशीर आहे? जरा ढोल-टाळ काढून द्या.' एकटी बिचारी बाई धावपळ करून करून बेजार झाली होती; वैतागत होती, मनातल्या मनात धुमसत होती, पण राग दाखवायला संधी मिळत नव्हती. भीती वाटे, शेजारणी म्हणतील, एवढ्याशानेच उतू गेली.
म्हातारी काकी
तहानेने तिचा स्वतःचा घसा कोरडा पडला होता. उकाड्याने ती होरपळत होती, पण घोटभर पाणी प्यायला किंवा पंखा घेऊन वारा घ्यायलाही उसंत नव्हती. शिवाय धास्ती होती, की जरा नजर वळली की वस्तूंची लूट होईल. अशा स्थितीत तिने काकींना कढईजवळ बसलेले पाहिले आणि तिचा तिळपापड झाला. राग आवरला नाही. शेजारणी बसल्या आहेत, त्या मनात काय म्हणतील, पुरुषमंडळीत लोकांनी ऐकले तर काय म्हणतील, याचेही भान राहिले नाही. बेडूक जसा गांडुळावर झडप घालतो, तशी ती काकींवर झडपली आणि दोन्ही हातांनी त्यांना हिसडा देऊन म्हणाली—आग लागो असल्या पोटाला! पोट आहे की भट्टी? कोठडीत बसल्याने काय जीव गुदमरत होता? अजून पाहुणे जेवले नाहीत, देवाला नैवेद्य दाखवला नाही, तोवर धीर नाही धरवला? आली छाताडावर बसायला! जळो असली जीभ! दिवसभर खात नसती, तर कोण जाणे कोणाच्या मडक्यात तोंड घातलं असतं! गाव बघेल तर म्हणेल, म्हातारीला पोटभर खायला मिळत नाही, म्हणूनच अशी तोंड वासून फिरते. मरतही नाही आणि खाटही सोडत नाही, चेटकीण! आमचं नाव बाजारात विकायला निघाली आहे. नाक कापल्याशिवाय राहायची नाही. एवढं कोंबते, कुठे भस्म होतं कोण जाणे. हं! भलं हवं असेल तर जाऊन कोठडीत बसा. घरची माणसं जेवायला बसतील तेव्हा तुम्हालाही मिळेल. तुम्ही काही देवी नाही, की कोणाच्या तोंडात पाण्याचा थेंब गेला नाही तरी चालेल, पण तुमची पूजा आधी व्हायला हवी! काकींनी मान वर केली नाही; त्या रडल्या नाहीत, बोलल्या नाहीत. गुपचूप रांगत आपल्या कोठडीत निघून गेल्या. घाव इतका जबर होता, की हृदयाची आणि मेंदूची सारी शक्ती, सारे विचार आणि सारा भार त्या एकाच ठिकाणी ओढला गेला होता. नदीकाठचा एखादा मोठा कडा तुटून कोसळला, की आजूबाजूचे सारे पाणी चहूबाजूंनी ती जागा भरून काढायला धावते.
म्हातारी काकी
३ जेवण तयार झाले. अंगणात पत्रावळी मांडल्या गेल्या, पाहुणे जेवू लागले. बायकांनी पंगतीची गाणी सुरू केली. पाहुण्यांचे न्हावी आणि नोकरचाकरही त्याच पंगतीत, पण जरा बाजूला जेवायला बसले होते; आणि रीतीप्रमाणे सगळ्यांची जेवणे झाल्याशिवाय कोणालाच उठता येत नव्हते. जरा शिकलेसवरलेले एक-दोन पाहुणे नोकरांच्या सावकाश चाललेल्या लांबलचक जेवणावर चरफडत होते. हे बंधन त्यांना निरर्थक आणि बिनबुडाचे वाटत होते. कोठडीत आल्यावर काकी पस्तावत होत्या: मी कशाला तिथे तडमडायला गेले! त्यांना रूपाचा राग आला नव्हता; आपल्या उतावळेपणाचे दुःख होते. खरेच तर आहे; पाहुण्यांची जेवणे झाल्याशिवाय घरची माणसे कशी जेवणार? मला इतका वेळसुद्धा धीर धरवला नाही. सगळ्यांसमोर इज्जत गेली. आता कोणी बोलवायला येत नाही तोवर जाणार नाही. मनाशी असा विचार करून त्या बोलावण्याची वाट पाहू लागल्या. पण तुपाचा तो रुचकर वास त्यांच्या धीराची मोठीच परीक्षा पाहत होता. एकेक क्षण त्यांना एकेका युगासारखा वाटत होता. आता पत्रावळी मांडल्या असतील. आता पाहुणे आले असतील. लोक हातपाय धुताहेत, न्हावी पाणी घालतो आहे. वाटते, लोक जेवायला बसले. पंगतीचे गाणे चालले आहे—असा विचार करून मन रिझवण्यासाठी त्या आडव्या झाल्या. हळूहळू एक गाणे गुणगुणू लागल्या. त्यांना वाटले, गाता गाता खूप वेळ झाला. इतका वेळ लोक जेवतच असतील का? कोणाचा आवाज ऐकू येत नाही. नक्कीच लोक जेवूनखाऊन निघून गेले. मला कोणी बोलवायला आले नाही. रूपा चिडली आहे, कोण जाणे बोलावणारही नाही. तिला वाटत असेल, आपोआप येतील; त्या काही पाहुण्या नाहीत, की त्यांना बोलवायला जावे. काकी जायला तयार झाल्या. एका मिनिटात पुऱ्या आणि मसालेदार भाज्या समोर येतील, या खात्रीने त्यांच्या जिभेला गुदगुल्या होऊ लागल्या.
म्हातारी काकी
त्यांनी मनात नाना बेत रचले—आधी भाजीबरोबर पुऱ्या खाईन, मग दही-साखरेबरोबर; कचोऱ्या रायत्याबरोबर मस्त लागतील! कोणाला वाईट वाटो की बरे, मी तर मागून मागून खाणार. हेच ना लोक म्हणतील, की यांना काही ताळतंत्र नाही? म्हणू देत. इतक्या दिवसांनी पुऱ्या मिळताहेत, तर काय नुसते तोंड उष्टे करून उठून येईन! त्या उकिडव्या बसून हातांच्या आधाराने सरकत अंगणात आल्या. पण हाय रे दुर्दैव! आशेने आपल्या जुन्या खोडीप्रमाणे वेळेचा खोटाच अंदाज बांधला होता. पाहुण्यांची पंगत अजून बसलेलीच होती. कोणी जेवून बोटे चाटत होता, कोणी तिरक्या नजरेने पाहत होता, की बाकीचे अजून जेवताहेत की नाही. कोणी या काळजीत होता, की पानावर पुऱ्या उरताहेत, कशातरी पोटात ढकलता आल्या तर! कोणी दही खाऊन मिटक्या मारत होता, पण दुसरा द्रोण मागायला संकोचत होता—तेवढ्यात काकी रांगत रांगत त्यांच्यामध्ये जाऊन पोचल्या. काही जण दचकून उठून उभे राहिले. ओरडू लागले—अरे, ही म्हातारी कोण? ही कुठून आली? सांभाळा, कोणाला शिवेल! पंडित बुद्धिराम काकींना पाहताच संतापाने तडफडले. पुऱ्यांचे ताट घेऊन उभे होते. ताट जमिनीवर आपटले, आणि एखादा निर्दय सावकार आपल्या बेइमान, पळपुट्या कर्जदाराला पाहताच झडप घालून त्याची नरडी धरतो, तशी झेप घेऊन त्यांनी काकींचे दोन्ही हात धरले आणि त्यांना फरफटत आणून अंधाऱ्या कोठडीत धाडकन आपटले. आशेची बाग गरम वाऱ्याच्या एकाच झळीने होरपळून उद्ध्वस्त झाली. पाहुणे जेवले. घरची माणसे जेवली. वाजंत्रीवाले, धोबी, चमार यांचीही जेवणे झाली; पण काकींना कोणी विचारले नाही. बुद्धिराम आणि रूपा दोघांनीही काकींना त्यांच्या निर्लज्जपणाबद्दल शिक्षा करायचे ठरवले होते. त्यांच्या म्हातारपणाची, दीनपणाची, हरपलेल्या बुद्धीची कोणालाच कणव येत नव्हती. एकटी लाडली त्यांच्यासाठी मनातल्या मनात कुढत होती.
म्हातारी काकी
लाडलीचे काकींवर फार प्रेम होते. बिचारी भोळी पोर होती. पोरकट खोड्या आणि चंचलपणा यांचा तिच्यात लवलेशही नव्हता. दोन्ही वेळा आईवडिलांनी काकींना निर्दयपणे फरफटले, तेव्हा लाडलीचे काळीज पिळवटून निघाले. तिला राग येत होता: ही माणसे काकींना भरपूर पुऱ्या का देऊन टाकत नाहीत? पाहुणे काय सगळ्याच्या सगळ्या खाऊन टाकणार आहेत? आणि काकींनी पाहुण्यांच्या आधी खाल्ले, तर असे काय बिघडणार आहे? तिला काकींजवळ जाऊन त्यांची समजूत घालायची होती, पण आईच्या भीतीने ती जात नव्हती. तिने आपल्या वाट्याच्या पुऱ्या मुळीच खाल्ल्या नव्हत्या. आपल्या बाहुल्यांच्या पेटाऱ्यात बंद करून ठेवल्या होत्या. त्या पुऱ्या तिला काकींकडे न्यायच्या होत्या. तिचे मन अधीर झाले होते. माझा आवाज ऐकताच काकी उठून बसतील; पुऱ्या पाहून किती खूश होतील! माझे किती लाड करतील! ४ रात्रीचे अकरा वाजले होते. रूपा अंगणात पडून झोपली होती. लाडलीच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. काकींना पुऱ्या खाऊ घालायच्या आनंदात तिला झोप येत नव्हती. बाहुल्यांचा पेटारा तिने समोरच ठेवला होता. अम्मा झोपली आहे अशी खात्री झाल्यावर ती हळूच उठली आणि विचार करू लागली, जावे कसे? चहूकडे अंधार होता. फक्त चुलींमध्ये विस्तव चमकत होता, आणि चुलींजवळ एक कुत्रा पडून होता. लाडलीची नजर दारासमोरच्या कडुनिंबाकडे गेली. तिला वाटले, त्यावर हनुमान बसले आहेत. त्यांची शेपटी, त्यांची गदा, सगळे स्पष्ट दिसते आहे. भीतीने तिने डोळे गच्च मिटले. तेवढ्यात कुत्रा उठून बसला, आणि लाडलीला धीर आला. झोपलेल्या अनेक माणसांपेक्षा उठून इकडेतिकडे फिरणारा एक कुत्रा तिला जास्त धीर देऊन गेला. तिने पेटारा उचलला आणि ती काकींच्या कोठडीकडे निघाली.
म्हातारी काकी
५ काकींना फक्त एवढेच आठवत होते, की कोणीतरी माझे हात धरून मला फरफटले; मग असे वाटले, जणू कोणी उचलून डोंगरावर नेते आहे. त्यांचे पाय पुन्हा पुन्हा दगडांवर आपटले; मग कोणीतरी त्यांना डोंगरावरून खाली आपटले, आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्या शुद्धीवर आल्या तेव्हा कोणाची जराही चाहूल लागत नव्हती. त्यांना वाटले, सगळे जेवूनखाऊन झोपले, आणि त्यांच्याबरोबर माझे नशीबही झोपले. रात्र कशी काढायची? रामा! काय खाऊ? पोटात आग भडकली आहे! हाय! कोणी माझी आठवणसुद्धा काढली नाही! माझेच पोट मारल्याने काय यांचे धन वाढणार आहे? म्हातारी कधी मरेल कोण जाणे, तिचा जीव कशाला दुखवा—एवढीसुद्धा दया या लोकांना येत नाही. मी काय पोटापुरत्या भाकरीच खाते, की आणखी काही? त्यावर ही गत! मी आंधळी, अपंग; ना काही ऐकू, ना काही उमजू. अंगणात गेले तर गेले; बुद्धिरामला एवढे म्हणता आले नसते का, की काकी, अजून लोक जेवताहेत, नंतर या? मला फरफटले, आपटले. त्याच पुऱ्यांसाठी रूपाने सगळ्यांसमोर शिव्या दिल्या. त्याच पुऱ्यांसाठी एवढी दैना केली, तरीही त्यांचे दगडी काळीज द्रवले नाही. सगळ्यांना खाऊ घातले, मला साधे विचारलेसुद्धा नाही. तेव्हाच दिल्या नाहीत, तर आता काय देणार? असा विचार करून काकी निराशेतल्या समाधानाने आडव्या झाल्या. खंतीने गळा दाटून येत होता, पण पाहुण्यांच्या भीतीने त्या रडत नव्हत्या. अचानक त्यांच्या कानावर आवाज आला—काकी, ऊठ; मी पुऱ्या आणल्यात. काकींनी लाडलीचा आवाज ओळखला. चटकन उठून बसल्या. दोन्ही हातांनी लाडलीला चाचपले आणि तिला मांडीवर बसवून घेतले. लाडलीने पुऱ्या काढून दिल्या. काकींनी विचारले—तुझ्या अम्माने दिल्यात का? लाडली म्हणाली—नाही, या माझ्या वाट्याच्या आहेत.
म्हातारी काकी
काकी पुऱ्यांवर तुटून पडल्या. पाच मिनिटांत पेटारा रिकामा झाला. लाडलीने विचारले—काकी, पोट भरलं? थोडासा पाऊस गारवा आणण्याऐवजी उलट उकाडा वाढवतो, तशीच या थोड्याशा पुऱ्यांनी काकींची भूक आणि हाव आणखी चेतवली होती. म्हणाल्या—नाही गं बाळ, जा, अम्माकडून आणखी मागून आण. लाडली म्हणाली—अम्मा झोपलीय. उठवलं तर मारेल. काकींनी पेटारा पुन्हा चाचपला. त्यात थोडा चुरा पडला होता. तो काढून त्यांनी खाऊन टाकला. पुन्हा पुन्हा ओठ चाटत होत्या. मिटक्या मारीत होत्या. आणखी पुऱ्या कशा मिळतील, या विचाराने जीव कासावीस होत होता. समाधानाचा बांध फुटला, की इच्छेच्या प्रवाहाला सीमा उरत नाही. दारुड्याला दारूची नुसती आठवण झाली, तरी तो धुंद होऊन जातो. काकींचे अधीर मन इच्छेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. योग्य-अयोग्याचा विचार उरला नाही. काही वेळ त्या ती इच्छा आवरत राहिल्या. मग एकाएकी लाडलीला म्हणाल्या—माझा हात धरून मला तिथे घेऊन चल, जिथे पाहुणे जेवायला बसले होते. त्यांचा हेतू लाडलीला कळला नाही. तिने काकींचा हात धरला आणि नेऊन उष्ट्या पत्रावळींजवळ बसवले. ती दीन, भुकेली, बुद्धी हरपलेली म्हातारी पत्रावळींवरचे पुऱ्यांचे तुकडे वेचून वेचून खाऊ लागली. अहाहा! दही किती चविष्ट होते, कचोऱ्या किती खमंग, खस्ता किती हलके-खुसखुशीत! काकींची बुद्धी हरपली होती, तरी एवढे त्यांना कळत होते, की मी जे करते आहे ते मी कधीही करता कामा नये. मी दुसऱ्यांच्या उष्ट्या पत्रावळी चाटते आहे. पण म्हातारपण म्हणजे हाव नावाच्या रोगाची अखेरची अवस्था; तेव्हा सगळ्या इच्छा एकाच केंद्रावर येऊन थांबतात. म्हाताऱ्या काकींच्या बाबतीत हे केंद्र म्हणजे त्यांची जीभ होती.
म्हातारी काकी
६ नेमक्या त्याच वेळी रूपाचे डोळे उघडले. तिला जाणवले, लाडली आपल्याजवळ नाही. ती दचकली; खाली तर पडली नाही ना, म्हणून खाटेच्या आजूबाजूला पाहू लागली. तिथे ती दिसली नाही म्हणून उठून बसली, तो काय दिसले? लाडली उष्ट्या पत्रावळींजवळ गुपचूप उभी आहे, आणि म्हाताऱ्या काकी पत्रावळींवरचे पुऱ्यांचे तुकडे उचलून उचलून खात आहेत. रूपाचे काळीज सुन्न झाले. एखाद्या गाईच्या मानेवरून सुरी फिरताना पाहून तिची जी अवस्था झाली असती, तीच त्या क्षणी झाली. एका ब्राह्मणीने दुसऱ्यांच्या उष्ट्या पत्रावळी चाचपाव्यात, यापेक्षा करुण दृश्य असूच शकत नव्हते. पुऱ्यांच्या काही घासांसाठी तिची चुलतसासू असले पतित, नीच कृत्य करते आहे! हे असे दृश्य होते, की पाहणाऱ्यांची काळजे थरकापतात. वाटत होते, जणू पृथ्वी थांबली आहे, आकाश गरगर फिरते आहे; जगावर कोणती तरी नवी आपत्ती कोसळणार आहे. रूपाला राग आला नाही. दुःखापुढे राग कसला? करुणेने आणि भीतीने तिचे डोळे भरून आले. या अधर्माचे पाप कोणाच्या माथी? तिने मनापासून आकाशाकडे हात उचलून म्हटले—परमात्मा, माझ्या लेकरांवर दया कर. या अधर्माची शिक्षा मला देऊ नकोस, नाहीतर माझा सत्यानाश होईल.
म्हातारी काकी
आपला स्वार्थ आणि अन्याय रूपाला कधी असा डोळ्यांसमोर उभा दिसला नव्हता. ती विचार करू लागली—हाय! मी किती निर्दय आहे! जिच्या मालमत्तेतून मला वर्षाला दोनशे रुपये मिळताहेत, तिची ही दैना! आणि माझ्यामुळे! हे दयाळू भगवंता! माझ्या हातून फार मोठी चूक झाली, मला क्षमा कर. आज माझ्या मुलाचा टिळा होता. शेकडो माणसे जेवली. मी त्यांच्या इशाऱ्यांवर राबणारी दासी होऊन राहिले. स्वतःच्या नावासाठी शेकडो रुपये खर्च केले, पण जिच्या जिवावर हजारो रुपये खाल्ले, तिला या समारंभातसुद्धा पोटभर जेवण देऊ शकले नाही. केवळ ती म्हातारी असहाय आहे, एवढ्याचसाठी ना! रूपाने दिवा लावला, आपल्या कोठीघराचे दार उघडले, आणि एका ताटात सगळे पदार्थ मांडून ते घेऊन ती काकींकडे निघाली. मध्यरात्र उलटून गेली होती. आकाशात ताऱ्यांची ताटे मांडली होती आणि त्यांवर बसलेले देव स्वर्गीय पक्वान्ने सजवत होते; पण त्यांच्यापैकी कोणालाही तो परमानंद मिळू शकला नसता, जो आपल्यासमोर ताट पाहून म्हाताऱ्या काकींना मिळाला. रूपा दाटलेल्या कंठाने म्हणाली—काकी, उठा, जेवून घ्या. माझ्या हातून आज मोठी चूक झाली, तिचा राग मानू नका. परमेश्वराजवळ प्रार्थना करा, की त्याने माझ्या अपराधाची क्षमा करावी! मिठाई मिळताच मार आणि अपमान सारे विसरून जाणाऱ्या भोळ्या लेकरांसारख्या म्हाताऱ्या काकी सगळे विसरून बसून जेवत होत्या. त्यांच्या रोमारोमांतून मनापासूनच्या सदिच्छा उमटत होत्या, आणि रूपा बसून या स्वर्गीय दृश्याचा आनंद लुटण्यात तल्लीन झाली होती.