मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
मिरवणूक
पूर्ण स्वराज्याची मिरवणूक निघाली होती. काही तरुण, काही म्हातारे, काही मुले हातांत झेंडे-पताका घेऊन 'वन्देमातरम्' गात माल रस्त्यावरून पुढे गेले. दोन्ही बाजूंना बघ्यांच्या भिंती उभ्या होत्या—जणू या जथ्याशी त्यांचे काही देणेघेणे नाही, जणू हा काही खेळ चालला आहे आणि त्यांचे काम फक्त उभ्या उभ्या पाहत राहणे एवढेच आहे. दुकानाच्या ओट्यावर उभे राहून शंभूनाथ आपल्या शेजाऱ्याला, दीनदयालला म्हणाला—सगळेच्या सगळे काळाच्या जबड्यात चालले आहेत. पुढे घोडेस्वारांची तुकडी झोडपून पळवून लावील. दीनदयाल म्हणाला—महात्माजींनाही साठी बुद्धी नाठी झाली आहे. मिरवणुका काढून स्वराज्य मिळत असते, तर ते केव्हाच मिळून गेले असते. आणि मिरवणुकीत आहेत तरी कोण, पाहा—पोरटे, उनाड, डोक्यात वारे शिरलेले. शहरातला एकही मोठा माणूस नाही. मैकू चपला-स्लिपरांची माळ गळ्यात अडकवून उभा होता. या दोघा शेटजींचे बोलणे ऐकून तो हसला. शंभूने विचारले—का रे मैकू, हसलास का? आज स्वारी भलतीच खुशीत दिसते! मैकू—हसलो ते तुम्ही जे म्हणालात त्यावर, की मिरवणुकीत कोणी मोठा माणूस नाही. मोठी माणसे कशाला येतील मिरवणुकीत? या राज्यात त्यांना कोणते सुख कमी आहे? बंगल्यांत-महालांत राहतात, मोटारींतून फिरतात, साहेबलोकांबरोबर मेजवान्या झोडतात; कसली तकलीफ आहे त्यांना? मरतो आहोत ते आम्ही, ज्यांना भाकरीचा ठिकाणा नाही. या वखताला कोणी टेनिस खेळत असेल, कोणी चहा पीत असेल, कोणी ग्रामोफोन लावून गाणी ऐकत असेल, कोणी पारकात हवा खात असेल; ते इथे येतील पोलिसांचे कोरडे खायला? छान सांगितलेत! शंभू—या गोष्टी तुला काय कळणार, मैकू! ज्या कामाचे पुढारी चार मोठी माणसे असतात, त्याचा सरकारवरसुद्धा वचक बसतो. उनाड पोराटोरांचा घोळका अधिकाऱ्यांच्या नजरेत काय भरणार?
मिरवणूक
मैकूने अशा नजरेने पाहिले, जी जणू म्हणत होती—या गोष्टी समजण्याचा मक्ता काही तुम्हीच घेतलेला नाही; आणि तो म्हणाला—मोठ्या माणसाला घडवतो-बिघडवतो ते आम्हीच, की आणखी कोणी? ज्यांना कोणी विचारतसुद्धा नव्हते असे कितीतरी लोक आमच्याच हातून मोठे झाले, आणि आता मोटारींतून फिरतात आणि आम्हाला हलके समजतात. माणसांच्या नशिबाची हीच खुबी, की ज्याची जरा भरभराट झाली त्याने आमच्याकडे पाठ फिरवली. आमचा मोठा माणूस म्हणजे तोच, जो लंगोटी नेसून अनवाणी फिरतो, जो आमची दशा सुधारण्यासाठी जीव तळहातावर घेऊन फिरतो. बाकी आम्हाला कोणत्याही मोठ्या माणसाची पर्वा नाही. खरे विचाराल, तर या मोठ्या माणसांनीच आमची माती केली आहे. सरकारने यांना कुठे एखादी चांगलीशी जागा दिली, की लागले त्याचीच तळी उचलायला. दीनदयाल—नवा दारोगा मोठा कसाई आहे. चौकात पोचताच हंटर घेऊन तुटून पडेल. मग पाहा, सगळे कसे शेपूट घालून पळतात. मजा येईल. स्वातंत्र्याच्या नशेत धुंद झालेली मिरवणूक चौकात पोचली, तो समोर घोडेस्वारांची आणि शिपायांची एक तुकडी रस्ता अडवून उभी! तेवढ्यात दारोगा बीरबलसिंह घोडा पुढे काढून मिरवणुकीसमोर आले आणि म्हणाले—तुम्हाला पुढे जाण्याचा हुकूम नाही. मिरवणुकीचे वृद्ध नेते इब्राहिमअली पुढे होऊन म्हणाले—मी आपल्याला खात्री देतो, कोणत्याही प्रकारचा दंगाफसाद होणार नाही. आम्ही दुकाने लुटायला किंवा मोटारी फोडायला निघालेलो नाही. आमचा हेतू याहून कितीतरी उच्च आहे. बीरबल—मला हुकूम आहे, की मिरवणूक इथून पुढे जाता कामा नये. इब्राहिम—आपण आपल्या वरिष्ठांना एकदा विचारून तरी घ्यावे. बीरबल—मला त्याची काही गरज वाटत नाही. इब्राहिम—मग आम्ही इथेच बसतो. आपली मंडळी निघून गेली, की आम्ही पुढे जाऊ.
मिरवणूक
बीरबल—इथे उभे राहण्याचाही हुकूम नाही. तुम्हाला परत जावे लागेल. इब्राहिम गंभीरपणे म्हणाले—परत तर आम्ही जाणार नाही. आम्हाला अडवण्याचा कसलाही हक्क आपणांस नाही, आणि दुसऱ्या कोणालाही नाही. आपण आपले स्वार, संगिनी आणि बंदुका यांच्या जोरावर आम्हाला अडवू पाहता, तर खुशाल अडवा; पण आम्हाला माघारी फिरवणे आपल्याला जमणार नाही. कोण जाणे तो दिवस केव्हा उगवेल, जेव्हा केवळ राष्ट्राला गुलामगिरीच्या साखळ्यांत जखडून ठेवण्याच्या हेतूने काढलेल्या हुकुमांची तामिली करायला आम्ही, आमचे भाईबंद साफ नकार देऊ. बीरबल पदवीधर होता. त्याचा बाप पोलीस सुपरिंटेंडेंट होता. त्याच्या नसानसांत रुबाब भरलेला होता. वरिष्ठांच्या नजरेत त्याला मोठा मान होता. चांगला गोरापान, निळ्या डोळ्यांचा, भुऱ्या केसांचा तेजस्वी पुरुष होता. अंगात कोट चढवून वर हॅट घातली, की बहुधा आपणही याच देशातले रहिवासी आहोत हे तो विसरून जात असे. बहुधा तो स्वतःला राज्यकर्त्या जातीचाच एक अंश समजू लागे. पण इब्राहिमच्या शब्दांत जो धिक्कार भरलेला होता, त्याने तो क्षणभर खजील झाला. तरी प्रकरण नाजूक होते. मिरवणुकीला वाट दिली, तर जाब द्यावा लागणार; तिथेच उभी राहू दिली, तर हे लोक कोण जाणे किती वेळ उभे राहतील. या पेचात तो सापडला असतानाच त्याला डी. एस. पी. घोड्यावरून येताना दिसले. आता विचार करत बसायला वेळ नव्हता. कामगिरी दाखवायची हीच संधी होती. त्याने कमरेचा बॅटन काढला आणि घोड्याला टाच मारून तो मिरवणुकीवर घालू लागला. त्याला पाहताच बाकीच्या स्वारांनीही आपले घोडे मिरवणुकीवर घालायला सुरुवात केली. इब्राहिम दारोग्याच्या घोड्यासमोर उभा होता. त्याच्या डोक्यावर इतक्या जोराने बॅटन बसला, की त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. त्याला उभे राहवेना.
मिरवणूक
डोके धरून तो खाली बसला. त्याच क्षणी दारोगाजींच्या घोड्याने दोन्ही पाय उचलले, आणि जमिनीवर बसलेला इब्राहिम त्याच्या टापांखाली सापडला. मिरवणूक अजूनही शांत उभी होती. इब्राहिमला पडताना पाहून कित्येक जण त्याला उचलायला धावले; पण कोणालाच पुढे सरकता आले नाही. तिकडे स्वारांचे दंडुके मोठ्या निर्दयपणे बरसत होते. लोक दंडुके हातांवर झेलत होते आणि न डगमगता उभे होते. हिंसेच्या भावनेत वाहून न जाणे त्यांना क्षणाक्षणाला कठीण होत चालले होते. मार आणि अपमानच सोसायचा आहे, तर मग आपणही ही भिंत फोडून जाण्याचा प्रयत्न का करू नये? लोकांच्या मनात आले, शहरातल्या लाखो माणसांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. इथून हा झेंडा घेऊन परत फिरलो, तर मग कोणत्या तोंडाने स्वातंत्र्याचे नाव घेणार? पण जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा विचारसुद्धा कोणाच्या मनाला शिवला नाही. हा पोटार्थ्यांचा, भाड्याच्या तट्टांचा जमाव नव्हता. हे स्वातंत्र्याच्या खऱ्याखुऱ्या स्वयंसेवकांचे, आझादीसाठी वेडावलेल्यांचे संघटित दल होते—आपल्या जबाबदाऱ्या ते पुरेपूर ओळखून होते. कितीतरी जणांच्या डोक्यांतून रक्त वाहत होते, कितीतरी जणांचे हात जखमी झाले होते. एका लोंढ्यासरशी हे लोक स्वारांच्या रांगा चिरून पुढे जाऊ शकले असते; पण पायांत बेड्या पडलेल्या होत्या—तत्त्वाच्या, धर्माच्या, आदर्शाच्या. दहा-बारा मिनिटे असाच दंडुक्यांचा वर्षाव होत राहिला आणि लोक शांत उभे राहिले. (२) या मारझोडीची बातमी क्षणार्धात बाजारात जाऊन पोचली. इब्राहिम घोड्याखाली चिरडले गेले, कित्येक जण जखमी झाले, कित्येकांचे हात मोडले; पण ते लोक मागेही फिरत नाहीत आणि पोलीस त्यांना पुढेही जाऊ देत नाहीत. मैकू चेव येऊन म्हणाला—आता बुवा, इथे राहवत नाही. मीही चाललो.
मिरवणूक
दीनदयाल म्हणाला—आम्हीही येतो, भाऊ; होईल ते होईल! शंभू मिनिटभर मुकाट उभा राहिला. एकाएकी त्यानेही दुकान वाढवले आणि म्हणाला—एक दिवस मरायचे आहेच; जे व्हायचे ते होवो. शेवटी ते लोक सगळ्यांसाठीच तर जीव देत आहेत. पाहता पाहता बहुतेक दुकाने बंद झाली. दहा मिनिटांपूर्वी जे लोक गंमत पाहत उभे होते, ते इकडून-तिकडून धावत सुटले आणि हजारो माणसांचा एक प्रचंड जमाव घटनास्थळाकडे निघाला. हा हिंसेच्या मदाने उन्मत्त झालेल्या माणसांचा जमाव होता; त्याला तत्त्वांची आणि आदर्शांची पर्वा नव्हती. ही माणसे केवळ मरायलाच नव्हे, तर मारायलाही तयार होती. कितीतरी जणांच्या हातांत लाठ्या होत्या, कितीतरी जणांच्या खिशांत दगड भरलेले होते. ना कोणी कोणाशी काही बोलत होते, ना काही विचारत होते. बस, सगळेच्या सगळे मनाशी एक पक्का निर्धार करून झपाझप चालले होते—जणू काळ्याकुट्ट ढगांची घटा दाटून येत होती. हा जमाव दुरून दिसताच स्वारांमध्ये थोडी चलबिचल झाली. बीरबलसिंहांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. डी. एस. पी.ने आपली मोटार पुढे काढली. शांतता आणि अहिंसा यांचे व्रत घेतलेल्यांवर दंडुके बरसवणे ही एक गोष्ट होती, आणि एखाद्या उन्मत्त जमावाशी सामना करणे ही दुसरी. स्वार आणि शिपाई मागे सरकले. इब्राहिमच्या पाठीवर घोड्याने टाप ठेवली होती. ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले होते. या माणसांचा गलबला ऐकून आपोआपच त्यांचे डोळे उघडले. एका तरुणाला इशाऱ्याने बोलावून ते म्हणाले—काय रे कैलाश, शहरातून काही लोक येताहेत का? कैलाशने त्या दाटत येणाऱ्या घटेकडे पाहून म्हटले—होय जी, हजारो माणसे आहेत. इब्राहिम—मग आता खैर नाही. झेंडा मागे फिरवा. आपण ताबडतोब माघारी फिरले पाहिजे, नाही तर हलकल्लोळ माजेल. आपल्याला आपल्याच भावांशी लढाई करायची नाही. ताबडतोब परत चला.
मिरवणूक
असे म्हणत त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना उठता आले नाही. इशाऱ्याचाच काय तो अवकाश होता. हुकूम मिळताच लोक एखाद्या शिस्तबद्ध सैन्यासारखे माघारी वळले. पताकांचे बांबू, फेटे आणि रुमाल यांचे झटपट एक स्ट्रेचर तयार झाले. लोकांनी इब्राहिमना त्यावर झोपवले आणि ते परत फिरले. पण ते पराभूत झाले होते का? काही लोकांना त्यांना पराभूत मानण्यातच समाधान वाटत असेल, तर वाटो; पण खरे पाहता त्यांनी एक युग पालटून टाकणारा विजय मिळवला होता. ते जाणून होते, की आपला संघर्ष आपल्याच भावांशी आहे, ज्यांचे हित परिस्थितीमुळे आपल्या हितापेक्षा वेगळे आहे. त्यांच्याशी आपल्याला वैर करायचे नाही. शिवाय, शहरात लुटालूट आणि दंगलींना ऊत यावा, आणि आपल्या धर्मयुद्धाचा शेवट लुटलेल्या दुकानांत आणि फुटलेल्या डोक्यांत व्हावा, असेही त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या विजयाची सर्वांत उज्ज्वल खूण ही होती, की त्यांनी जनतेची सहानुभूती मिळवली होती. जे लोक आधी त्यांना हसत होते, तेच त्यांचे धैर्य आणि साहस पाहून त्यांच्या मदतीला धावून आले होते. मनोवृत्तीतला हा बदल हाच आपला खरा विजय आहे. आपल्याला कोणाशी लढाई करण्याची गरज नाही; आपला उद्देश केवळ जनतेची सहानुभूती मिळवणे, तिची मनोवृत्ती बदलून टाकणे एवढाच आहे. ज्या दिवशी आपण हे लक्ष्य गाठू, त्याच दिवशी स्वराज्याचा सूर्य उगवेल. (३) तीन दिवस उलटले होते. बीरबलसिंह आपल्या खोलीत बसून चहा पीत होते, आणि त्यांच्या पत्नी मिट्ठनबाई तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन समोर उभ्या होत्या. बीरबलसिंह म्हणाले—त्या वेळी मी तरी काय करणार होतो? मागे डी. एस. पी. उभा होता. त्यांना वाट दिली असती, तर मीच गोत्यात आलो असतो.
मिरवणूक
मिट्ठनबाई मान हलवून म्हणाल्या—निदान एवढे तरी तुम्हाला करता आले असते, की त्यांच्यावर दंडुके चालवू दिले नसते. माणसांवर दंडुके चालवणे हे तुमचे काम आहे? फार फार तर तुम्ही त्यांना अडवू शकला असतात. उद्या तुम्हाला गुन्हेगारांना वेताचे फटके मारण्याचे काम दिले, तर तुम्हाला बहुधा मोठा आनंद होईल, नाही? बीरबलसिंह खजील होऊन म्हणाले—तुला यातले काही कळायचे नाही. मिट्ठनबाई—मला चांगले कळते. डी. एस. पी. मागे उभा होता. तुम्हाला वाटले असेल, अशी कामगिरी दाखवण्याची संधी पुन्हा कधी मिळेल न मिळेल. तुम्हाला काय वाटते, त्या जमावात एकही भला माणूस नव्हता? त्यांच्यात कितीतरी माणसे अशी होती, की जी तुमच्यासारख्यांना नोकरीला ठेवू शकतील. विद्येत तर कदाचित त्यांच्यापैकी बहुतेक तुमच्यापेक्षा पुढे असतील; पण तुम्ही त्यांच्यावर दंडुके चालवत होतात, त्यांना घोड्याखाली तुडवत होतात! वा रे मर्दुमकी! बीरबल निर्लज्जपणे हसून म्हणाले—डी. एस. पी.ने माझे नाव नोट करून घेतले आहे. खरंच! दारोगाजींना वाटले होते, की ही बातमी सांगितली की मिट्ठनबाई खूश होतील. सज्जनपणा, भलेपणा वगैरे वरवरच्या गोष्टी आहेत; त्या अंतःकरणातून नव्हे, जिभेवरून बोलल्या जातात. स्वार्थ मनाच्या खोल तळाशी दडून बसलेला असतो. गंभीरपणे विचार करण्याजोगा विषय तोच. पण मिट्ठनबाईंच्या चेहऱ्यावर आनंदाची एकही रेषा उमटली नाही. वरवरच्या गोष्टी बहुधा खोल तळापर्यंत पोचल्या होत्या. त्या म्हणाल्या—घेतले असेलच, आणि कदाचित तुम्हाला लवकरच बढतीही मिळेल; पण निरपराध्यांच्या रक्ताने हात रंगवून बढती मिळवली, तर काय मिळवले! हे तुमच्या कामगिरीचे बक्षीस नव्हे, तुमच्या देशद्रोहाची किंमत आहे. तुमच्या कामगिरीचे बक्षीस तर तेव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही एखाद्या खुन्याला हुडकून काढाल, एखाद्या बुडत्या माणसाला वाचवाल.
मिरवणूक
इतक्यात एक शिपाई व्हरांड्यात उभा राहून म्हणाला—हुजूर, हा लिफाफा आणला आहे. बीरबलसिंहांनी बाहेर येऊन लिफाफा घेतला आणि आतले सरकारी पत्र काढून ते वाचू लागले. वाचून त्यांनी ते टेबलावर ठेवले. मिट्ठनने विचारले—काय, बढतीचा परवाना आला वाटते? बीरबलसिंह ओशाळून म्हणाले—तू आपली माझी थट्टाच करतेस! आज पुन्हा कुठलीशी मिरवणूक निघणार आहे. मला तिच्याबरोबर राहण्याचा हुकूम झाला आहे. मिट्ठन—मग काय, तुमची चंगळच आहे! तयार व्हा. आज पुन्हा तशीच सावजे मिळतील. चांगले पुढे होऊन हात दाखवा! डी. एस. पी.ही नक्की जातील. या खेपेला तुम्ही इन्स्पेक्टर व्हाल. खरंच! बीरबलसिंह कपाळाला आठ्या घालून म्हणाले—कधी कधी तू बिनबुडाच्या गोष्टी बोलायला लागतेस. समज, मी तिथे जाऊन मुकाट उभा राहिलो, तर त्याचा परिणाम काय होईल? मला कुचकामी ठरवले जाईल आणि माझ्या जागी दुसरा कोणीतरी पाठवला जाईल. माझी स्वराज्यवाद्यांशी सहानुभूती आहे असा कुठे संशय आला, तर माझे काही खरे नाही. बडतर्फ झालो नाही, तरी पोलीस लाइनीत हजेरी लावायची शिक्षा तर ठरलेलीच. माणूस ज्या जगात राहतो, त्याचीच रीत पाहून वागतो. मी शहाणा नसेन; पण एवढे मला कळते, की हे लोक देशाचा आणि आपल्या लोकांचा उद्धार करण्यासाठीच धडपडत आहेत. हेही मला ठाऊक आहे, की सरकारला हा विचारच चिरडून टाकायचा आहे. गुलामगिरीच्या जिण्याचा अभिमान बाळगावा इतका काही मी गाढव नाही; पण परिस्थितीपुढे लाचार आहे. वाद्यांचा आवाज कानांवर आला. बीरबलसिंहांनी बाहेर जाऊन चौकशी केली. कळले, की स्वराज्यवाल्यांची मिरवणूक येत आहे. त्यांनी झटपट वर्दी चढवली, फेटा बांधला आणि खिशात पिस्तूल ठेवून ते बाहेर आले. क्षणात घोडा तयार झाला. कॉन्स्टेबल आधीपासूनच तयार बसले होते. सगळे डबल मार्च करत मिरवणुकीच्या दिशेने निघाले.
मिरवणूक
( ४ ) डबल मार्च करत सगळे सुमारे पंधरा मिनिटांत मिरवणुकीसमोर जाऊन पोचले. त्यांना पाहताच असंख्य कंठांतून 'वन्देमातरम्'चा एकच नाद उठला—जणू आभाळात मेघांचा गडगडाट झाला—आणि मग सन्नाटा पसरला. त्या मिरवणुकीत आणि या मिरवणुकीत केवढा फरक होता! ती स्वराज्याच्या उत्सवाची मिरवणूक होती, ही एका हुतात्म्याच्या शोकाची. तीन दिवसांच्या भयंकर तापानंतर आणि यातनांनंतर आज त्या जीवनाचा अंत झाला, ज्याने कधी पदाची हाव धरली नाही, कधी सत्तेपुढे मान तुकवली नाही. मरताना त्यांनी अंतिम इच्छा सांगून ठेवली होती, की माझ्या देहाला गंगेत स्नान घालून दफन करावे आणि माझ्या कबरीवर स्वराज्याचा झेंडा रोवावा. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच साऱ्या शहरावर जणू शोकाचा पडदा पडला. ज्याने ऐकले तो एकदा असा दचकला, जणू त्याला गोळी लागली आहे, आणि तत्काळ त्यांच्या दर्शनासाठी धावत सुटला. सारे बाजार बंद झाले; इक्के-टांगे कुठे नावालाही दिसेनात, जणू शहर लुटले गेले असावे. पाहता पाहता सारे शहर लोटले. जनाजा उठला, तेव्हा लाख-सव्वा लाख माणसे बरोबर होती. अश्रूंनी लाल झाला नाही, असा एकही डोळा नव्हता. बीरबलसिंह आपल्या कॉन्स्टेबलांना आणि स्वारांना पाच-पाच गजांच्या अंतराने मिरवणुकीबरोबर चालण्याचा हुकूम देऊन स्वतः मागे गेले. मागच्या रांगांत सुमारे पन्नास गजांपर्यंत स्त्रिया होत्या. दारोग्याने त्यांच्याकडे नजर टाकली. पहिल्याच रांगेत मिट्ठनबाई दिसल्या. बीरबलसिंहांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांनी पुन्हा निरखून पाहिले—त्याच होत्या. मिट्ठनबाईंनी त्यांच्याकडे एकदा पाहिले आणि नजर फिरवली; पण त्या एका कटाक्षात असा काही धिक्कार, अशी काही शरम, अशी काही व्यथा, अशी काही घृणा भरलेली होती, की बीरबलसिंहांच्या अंगात डोक्यापासून पायांपर्यंत एक शिरशिरी उठली. ते स्वतःच्या नजरेत इतके हलके, इतके दुबळे, इतके क्षुद्र कधीच झाले नव्हते.
मिरवणूक
तेवढ्यात एका तरुणीने दारोगाजींकडे पाहून म्हटले—कोतवालसाहेब, आमच्यावर कुठे दंडुके चालवू नका बरं! आपणांस पाहून भीती वाटते आहे. दुसरी म्हणाली—त्या दिवशी माल रस्त्याच्या चौकात ज्यांनी या वीर पुरुषावर घाव घातले, ते आपलेच कोणी भाऊ होते ना! मिट्ठन म्हणाली—ते आपले कोणी भाऊ नव्हते, आपण स्वतःच होतात. कितीतरी तोंडांतून आवाज उमटले—अस्सं, हेच का ते महाशय? महाशय, आपल्याला नमस्कार असो! आपल्याच कृपेचे हे फळ, की आज आम्हीही आपल्या दंडुक्याचे दर्शन घ्यायला येऊन उभ्या राहिलो आहोत! बीरबलसिंहांनी मिट्ठनबाईंकडे भाल्यासारखी नजर फेकली; पण तोंडाने चकार शब्द काढला नाही. मग आणखी एक, तिसरी स्त्री म्हणाली—आम्ही सभा भरवून आपल्या गळ्यात जयमाला घालू आणि आपले गुणगान करू. चौथी म्हणाली—आपण अगदी इंग्रज वाटता; तरीच इतके गोरे! एका म्हातारीने भुवया चढवून म्हटले—माझ्या पोटी असले पोर जन्मले असते, तर मी त्याचा गळा मुरगळला असता. एका तरुणीने तिला फटकारून म्हटले—तुम्हीही काय बोलता, माताजी! कुत्रीसुद्धा मिठाला जागतात, आणि हे तर माणूस आहेत. म्हातारी चिडून म्हणाली—पोटाचे गुलाम! हाय रे पोट! हाय रे पोट! यावर कित्येक स्त्रियांनी म्हातारीला चांगलेच धारेवर धरले, आणि ती बिचारी ओशाळून म्हणाली—अगं बाई, मी कुठे काय म्हणतेय? पण स्वार्थापायी आंधळा होतो, तो माणूस तरी कसला? बीरबलसिंहांना आता अधिक ऐकवेना. घोडा पुढे काढून ते मिरवणुकीपासून कित्येक गज मागे गेले. पुरुषाने लाजवले तर आपल्याला राग येतो; स्त्रियांनी लाजवले तर मनात खंत दाटते. त्या स्त्रियांसमोर पुन्हा जाण्याची हिंमत या वेळी बीरबलसिंहांत नव्हती. त्यांना आपल्या वरिष्ठांचा राग आला. मलाच का पुन्हा पुन्हा या कामांवर नेमले जाते? आणखीही लोक आहेत, त्यांना का आणले जात नाही? सगळ्यांत गयागुजरा मीच आहे काय? सगळ्यांत भावनाशून्य मीच आहे काय?
मिरवणूक
मिट्ठो या वेळी मनातून मला किती भेकड आणि नीच समजत असेल! आत्ता कोणी मला ठार मारले, तरी कदाचित ती तोंडातून शब्दही काढणार नाही. कदाचित मनातून खूशच होईल, बरे झाले म्हणून. आत्ता कोणी जाऊन साहेबाला सांगितले, की बीरबलसिंहाची बायको मिरवणुकीत निघाली होती, तर माझे काही खरे नाही. मिट्ठोला सगळे कळते, समजते, तरीही ती निघाली. मला विचारलेसुद्धा नाही. काही काळजी नाही ना, म्हणून असल्या गोष्टी सुचतात. तिथे सगळेच बेफिकीर—कॉलेजांतली आणि शाळांतली पोरे, मजूर, धंदेवाले; यांना कसली चिंता! मरण तर आमच्यासारख्यांचे, ज्यांना बायकामुले आहेत आणि मानमर्यादेची फिकीर आहे. सगळ्याजणी माझ्याकडे कशा रोखून पाहत होत्या, जणू खाऊनच टाकतील. मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यांवरून पुढे सरकत होती. दोन्ही बाजूंना गच्च्यांवर, सज्ज्यांवर, कठड्यांवर, झाडांवर बघ्यांच्या जणू भिंती उभ्या होत्या. बीरबलसिंहांना आज त्यांच्या चेहऱ्यांवर एक नवी स्फूर्ती, एक नवा उत्साह, एक नवा अभिमान झळकताना दिसत होता. स्फूर्ती होती वृद्धांच्या चेहऱ्यांवर, उत्साह तरुणांच्या आणि अभिमान स्त्रियांच्या. हा स्वराज्याच्या वाटेवर चालण्याचा उल्हास होता. आता त्यांच्या प्रवासाचे लक्ष्य अज्ञात नव्हते; वाट चुकलेल्यांसारखे इकडेतिकडे भटकणे नव्हते, पददलितांसारखे मान खाली घालून रडणे नव्हते. स्वातंत्र्याचे सोनेरी शिखर दूर आकाशात चमकत होते. असे वाटत होते, की लोकांना मधल्या ओढ्यानाल्यांची आणि जंगलांची पर्वा नाही; सगळे त्या सोनेरी लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी आतुर झाले आहेत.
मिरवणूक
अकरा वाजायच्या सुमारास मिरवणूक नदीकाठी जाऊन पोचली. जनाजा खाली उतरवला आणि लोक पार्थिवाला गंगास्नान घालायला निघाले. त्याच्या थंड, शांत, पिवळ्या कपाळावर लाठीचा घाव स्पष्ट दिसत होता. रक्त गोठून काळे पडले होते. रक्त साकळल्यामुळे डोक्यावरचे लांब लांब केस एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यासारखे चिकटून बसले होते. या हुतात्म्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी कित्येक हजार माणसे कडे करून उभी राहिली. बीरबलसिंह मागे घोड्यावर स्वार होऊन थांबले होते. लाठीचा घाव त्यांनाही दिसला. त्यांच्या अंतरात्म्याने त्यांना जोराने धिक्कारले. त्यांना पार्थिवाकडे पाहवेना. त्यांनी तोंड फिरवले. ज्या माणसाच्या दर्शनासाठी, ज्याच्या चरणांची धूळ मस्तकी लावण्यासाठी लाखो माणसे व्याकूळ झाली आहेत, त्याचा मी एवढा अपमान केला! त्यांचा आत्मा या क्षणी कबूल करत होता, की त्या निर्दय प्रहारात कर्तव्यभावनेचा लवलेशही नव्हता—होता तो केवळ स्वार्थ, कामगिरी दाखवण्याची हाव आणि वरिष्ठांना खूश करण्याची लालसा. हजारो डोळे क्रोधाने भरून त्यांच्याकडे पाहत होते; पण समोर पाहण्याचे धैर्य त्यांना होत नव्हते. एका कॉन्स्टेबलने येऊन तारीफ केली—हुजुरांचा हात भलताच खोल बसला होता. अजूनही कवटी उघडीच आहे. सगळ्यांचे डोळे उघडले! बीरबलसिंहांनी ते झिडकारले—मी याला माझी मर्दुमकी नव्हे, माझा हलकटपणा समजतो. कॉन्स्टेबलने पुन्हा खुशामत केली—मोठा शिरजोर माणूस होता, हुजूर!
मिरवणूक
बीरबल तीव्रपणे म्हणाले—गप्प बस! शिरजोर कोणाला म्हणतात, ते तरी ठाऊक आहे? जे दरोडे घालतात, चोऱ्या करतात, खून करतात, त्यांना शिरजोर म्हणतात; जे देशाच्या भल्यासाठी जीव तळहातावर घेऊन फिरतात, त्यांना शिरजोर म्हणत नाहीत. आपले दुर्दैव हे, की ज्यांना मदत करायला हवी, त्यांच्याच विरोधात आपण उभे आहोत. ही घमेंड मिरवण्याची आणि आनंद मानण्याची गोष्ट नव्हे; लाजण्याची आणि रडण्याची गोष्ट आहे. स्नान आटोपले. मिरवणूक इथून पुन्हा निघाली. ( ५ ) पार्थिवाला मातीआड निजवून लोक परतू लागले, तेव्हा दोन वाजले होते. मिट्ठनबाई स्त्रियांबरोबर काही अंतर आली; पण क्वीन्स पार्कमध्ये येऊन थबकली. घरी जावेसे वाटेना. ते जीर्ण, घायाळ, रक्ताने माखलेले शव जणू तिच्या अंतःकरणात बसून तिला धिक्कारत होते. नवऱ्याविषयी तिचे मन इतके विटले होते, की आता त्याला धिक्कारण्याचीही तिची इच्छा उरली नव्हती. अशा स्वार्थी माणसावर भीतीशिवाय आणखी कशाचा परिणाम होऊ शकेल, यावर तिचा विश्वासच नव्हता. ती बराच वेळ पार्कमध्ये गवतावर बसून विचार करत राहिली; पण आपले कर्तव्य काय, याचा तिला काही निश्चय करता आला नाही. माहेरी जाता आले असते; पण तिथून महिन्या-दोन महिन्यांनी पुन्हा याच घरात यावे लागेल. नाही, मी कोणाच्या आश्रयावर जगणार नाही. माझ्या पोटापुरते मी कमवू शकणार नाही का? तिने नाना तऱ्हेच्या अडचणींची स्वतःच कल्पना करून पाहिली; पण आज तिच्या आत्म्यात कोण जाणे एवढे बळ कुठून आले होते. या कल्पना मनात आणणेसुद्धा तिला आपला दुबळेपणा वाटला.
मिरवणूक
एकाएकी तिला इब्राहिमअलींच्या वृद्ध विधवेची आठवण झाली. तिने ऐकले होते, त्यांना मुलेबाळे नाहीत. बिचाऱ्या एकट्या बसून रडत असतील. धीर देणारेही कोणी जवळ नसेल. ती त्यांच्या घराकडे निघाली. पत्ता तिने आधीच बरोबरच्या बायकांकडून विचारून घेतला होता. ती मनाशी विचार करत चालली होती—मी त्यांना कशी भेटू, त्यांना काय सांगू, कोणत्या शब्दांत त्यांची समजूत घालू? याच विचारांत बुडालेली ती इब्राहिमअलींच्या घरी जाऊन पोचली. घर एका गल्लीत होते, स्वच्छ, नीटनेटके; पण दारावर जणू उदासी बरसत होती. धडधडत्या हृदयाने तिने आत पाऊल टाकले. समोर व्हरांड्यात एका खाटेवर ती वृद्धा बसली होती, जिच्या पतीने आज स्वातंत्र्याच्या वेदीवर आपले बलिदान दिले होते. तिच्यासमोर साधे कपडे घातलेला एक तरुण डोळ्यांत अश्रू आणून उभा होता आणि वृद्धेशी काहीतरी बोलत होता. त्या तरुणाला पाहताच मिट्ठन चमकली—ते बीरबलसिंह होते. तिने संतापमिश्रित आश्चर्याने विचारले—तुम्ही इथे कसे आलात? बीरबलसिंह म्हणाले—तू जशी आलीस, तसाच. माझ्या अपराधांची क्षमा मागायला आलो आहे. मिट्ठनच्या गोऱ्या मुखावर आज अभिमानाचे, उल्हासाचे आणि प्रेमाचे जे उज्ज्वल तेज झळकले, ते शब्दांपलीकडचे होते. असे वाटले, जणू तिचे जन्मजन्मांतरीचे क्लेश मिटले आहेत; ती चिंतेच्या आणि मायेच्या बंधनांतून मुक्त झाली आहे.