मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
मिठाचा दारोगा
मिठाचे नवे खाते निघाले आणि देवाने दिलेल्या या वस्तूचा व्यवहार करायला बंदी झाली, तेव्हा लोक चोरून-लपून तिचा व्यापार करू लागले. नाना तऱ्हेच्या लबाड्या-लटपटींना सुरुवात झाली; कोणी लाच चारून काम साधून घेई, तर कोणी चलाखीने. अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपात होती. पटवारीगिरीसारखी सर्वांनी मान द्यावा अशी जागा सोडून लोक या खात्यात बंदूकधारी शिपायाची, बरकंदाजाची, नोकरी पत्करीत. इथल्या दारोग्याच्या जागेसाठी तर वकिलांच्याही तोंडाला पाणी सुटे. तो काळच असा होता, की इंग्रजी शिक्षण आणि ख्रिस्ती धर्म या दोन्ही गोष्टी लोकांना एकच वाटत. फारसीचा बोलबाला होता. प्रेमाच्या कथा आणि शृंगाररसाची काव्ये वाचून फारसी शिकलेली मंडळी सर्वोच्च हुद्द्यांवर नेमली जात. मुंशी वंशीधरही जुलेखाची विरहकथा संपवून, शिरीन-फरहादचे प्रेमाख्यान हे नल-नीलांच्या लढाईपेक्षा आणि अमेरिकेच्या शोधापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे असे समजत, नोकरीधंद्याच्या शोधात निघाले. त्यांचे वडील जग पाहिलेले गृहस्थ होते. ते समजावू लागले, 'बाळ! घराची काय दैना झाली आहे ती तू पाहतोच आहेस. कर्जाच्या ओझ्याखाली आपण दबून गेलो आहोत. घरात मुली आहेत, त्या गवतासारख्या भराभर वाढत चालल्या आहेत. मी म्हणजे नदीच्या दरडीवरचे झाड; केव्हा कोसळेन याचा नेम नाही! आता तूच या घराचा धनी, तूच कर्ताधर्ता.
मिठाचा दारोगा
'नोकरीत हुद्द्याकडे लक्ष देऊ नकोस; तो म्हणजे पिराचा दर्गा. नजर ठेवावी ती तिथे चढणाऱ्या नजराण्यावर आणि चादरीवर. जिथे काही वरकमाई असेल असे काम शोध. महिन्याचा पगार म्हणजे पौर्णिमेचा चंद्र; एक दिवस दिसतो आणि मग कलेकलेने क्षीण होत नाहीसा होतो. वरकमाई म्हणजे वाहता झरा; त्याने तहान सदैव भागते. पगार माणूस देतो, म्हणून तो वाढत नाही. वरकमाई देव देतो, म्हणून तिला बरकत येते. तू स्वतः शिकलासवरलेला आहेस, तुला मी काय सांगावे! 'या बाबतीत तारतम्य फार हवे. माणूस पाहा, त्याची गरज पाहा आणि वेळ पाहा; मग जे योग्य वाटेल ते कर. गरजू माणसाशी कडकपणे वागण्यात फायदाच फायदा असतो. पण ज्याला गरजच नाही त्याला कचाट्यात पकडणे जरा कठीण. या गोष्टींची मनाशी खूणगाठ बांधून ठेव; ही माझी जन्मभराची कमाई आहे.' एवढा उपदेश करून वडिलांनी आशीर्वाद दिला. वंशीधर आज्ञाधारक पुत्र होते. त्यांनी हे सारे लक्ष देऊन ऐकले आणि मग घराबाहेर पाऊल टाकले. या अफाट जगात धीर हाच त्यांचा मित्र, बुद्धी हीच वाटाड्या आणि स्वावलंबन हाच काय तो आधार होता. पण निघाले होते चांगल्या शकुनावर; जाताक्षणीच मीठ खात्यात दारोग्याच्या जागेवर त्यांची नेमणूक झाली. पगार चांगला, आणि वरकमाईला तर अंतच नव्हता. वृद्ध मुंशीजींना ही आनंदाची बातमी कळली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. सावकार जरा नरमले, दारूवाल्या कलालाच्या आशेच्या वेलीला पालवी फुटली. शेजाऱ्यांच्या काळजात कळा येऊ लागल्या. थंडीचे दिवस होते आणि रात्रीची वेळ. मीठ खात्याचे शिपाई, चौकीदार नशेत धुंद होते. मुंशी वंशीधरांना इथे येऊन अजून सहा महिन्यांहून जास्त झाले नव्हते; पण एवढ्या थोड्या अवधीतच आपल्या कार्यकुशलतेने आणि चोख वर्तनाने त्यांनी अधिकाऱ्यांची मने जिंकली होती. अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर फार विश्वास बसला होता.
मिठाचा दारोगा
मिठाच्या कचेरीपासून मैलभर पूर्वेला यमुना वाहत होती; तिच्यावर नावांचा एक पूल बांधलेला होता. दारोगाजी दार लावून गोड झोपेत होते. अचानक जाग आली, तो नदीच्या खळखळाटाऐवजी गाड्यांचा खडखडाट आणि नावाड्यांचा गलबला कानी पडला. ते उठून बसले. इतक्या रात्री गाड्या नदीपलीकडे का जात असाव्यात? नक्कीच काहीतरी गोलमाल आहे. तर्काने संशय बळावला. त्यांनी वर्दी चढवली, पिस्तूल खिशात टाकले आणि बघता बघता घोडा दौडवीत पुलावर येऊन पोहोचले. गाड्यांची एक लांबलचक रांग पूल ओलांडून जाताना दिसली. त्यांनी दरडावून विचारले, 'कोणाच्या गाड्या आहेत या?' थोडा वेळ सगळे चिडीचूप. माणसांत काही कुजबुज झाली, मग सर्वांत पुढच्याने सांगितले, 'पंडित अलोपीदीनांच्या.' 'कोण पंडित अलोपीदीन?' 'दातागंजचे.' मुंशी वंशीधर चमकले. पंडित अलोपीदीन हे या भागातले सर्वांत प्रतिष्ठित जमीनदार होते. लाखो रुपयांची त्यांची देवघेव चाले; इकडे लहानापासून थोरापर्यंत त्यांचा ऋणको नाही असा कोण होता? व्यापारही चांगला अफाट पसरलेला. मोठे चलाख, पोहोचलेले गृहस्थ. इंग्रज अधिकारी त्यांच्या भागात शिकारीला येत आणि त्यांच्याकडेच पाहुणचार घेत. बाराही महिने त्यांचे अन्नछत्र चालू असे. मुंशींनी विचारले, 'गाड्या कुठे चालल्या आहेत?' उत्तर आले, 'कानपूरला.' पण यांत काय आहे, या प्रश्नावर मात्र सगळे गप्प झाले. दारोगासाहेबांचा संशय आणखीच वाढला. थोडा वेळ उत्तराची वाट पाहून ते मोठ्याने ओरडले, 'काय रे, सगळ्यांची वाचा बसली की काय? मी विचारतोय, यांत काय लादले आहे?' या खेपेसही कोणी उत्तर दिले नाही, तेव्हा त्यांनी घोडा एका गाडीला भिडवून पोते चाचपले. शंकेला जागाच उरली नाही. ते मिठाचे खडे होते.
मिठाचा दारोगा
पंडित अलोपीदीन आपल्या सजवलेल्या रथात बसून, अर्धवट झोपेत, अर्धवट जागे असे चालले होते. एकाएकी कित्येक गाडीवानांनी घाबरेघुबरे धावत येऊन त्यांना जागे केले आणि म्हणाले, 'महाराज! दारोग्याने गाड्या अडवल्या आहेत, आणि घाटावर उभे राहून ते आपल्याला बोलावत आहेत.' पंडित अलोपीदीनांची लक्ष्मीवर अढळ श्रद्धा होती. ते म्हणत असत, की या जगाचे तर सोडाच, स्वर्गातही लक्ष्मीचेच राज्य आहे. त्यांचे हे म्हणणे अगदी खरेच होते. न्याय आणि नीती ही सारी लक्ष्मीचीच खेळणी; ती त्यांना हवे तसे नाचवते. पडल्या-पडल्याच ते गुर्मीत म्हणाले, 'चला, आम्ही येतो.' असे म्हणून पंडितजींनी अगदी निश्चिंतपणे पानाचे विडे लावून खाल्ले. मग रजई पांघरूनच दारोग्यापाशी येऊन ते म्हणाले, 'बाबूजी, आशीर्वाद! बोला, आमच्या हातून असा कोणता अपराध घडला, की आपण गाड्या अडवल्यात? आम्हा ब्राह्मणांवर तर आपली कृपादृष्टी असायला हवी.' वंशीधर रुक्षपणे म्हणाले, 'सरकारी हुकूम.' पं. अलोपीदीन हसून म्हणाले, 'आम्हाला ना सरकारी हुकूम ठाऊक, ना सरकार. आमचे सरकार तर आपणच. आपला आणि आमचा तर घरचा मामला; आम्ही कधी आपल्या शब्दाबाहेर जाऊ का? आपण उगाच तसदी घेतलीत. इकडून जावे आणि या घाटाच्या देवतेला भेट चढवू नये, असे होणेच शक्य नाही. मी तर स्वतःच आपल्या सेवेला हजर होणार होतो.' ऐश्वर्याच्या या मोहिनी घालणाऱ्या वंशीच्या सुरांचा वंशीधरांवर काहीच परिणाम झाला नाही. प्रामाणिकपणाचा नवा जोश अंगात होता. ते कडाडले, 'कवड्यांसाठी आपले इमान विकत फिरणाऱ्या नमकहरामांपैकी मी नाही. आपण या क्षणी अटकेत आहात. कायद्याप्रमाणे आपल्याला कोर्टापुढे उभे केले जाईल. बस्स, जास्त बोलायला मला फुरसत नाही. जमादार बदलूसिंह! यांना ताब्यात घेऊन चल; माझा हुकूम आहे.'
मिठाचा दारोगा
पं. अलोपीदीन स्तंभित झाले. गाडीवानांत खळबळ उडाली. असे कठोर बोल ऐकून घेण्याची पंडितजींच्या आयुष्यातली बहुधा ही पहिलीच वेळ. बदलूसिंह पुढे झाला, पण त्यांच्या दराऱ्यामुळे त्यांचा हात धरण्याची त्याची छाती झाली नाही. धर्माने धनाचा असा अनादर केलेला पंडितजींनी कधी पाहिला नव्हता. त्यांनी विचार केला, हा अजून उद्धट पोरगा आहे. मायामोहाच्या जाळ्यात अजून सापडलेला नाही. अल्लड आहे, बुजतो आहे. ते अगदी दीनवाणे होऊन म्हणाले, 'बाबूसाहेब, असे करू नका, आम्ही धुळीला मिळू. अब्रू मातीमोल होईल. आमचा अपमान करून आपल्या हाती काय लागणार? आम्ही काही आपल्या शब्दाबाहेर थोडेच आहोत!' वंशीधर कठोर स्वरात म्हणाले, 'असल्या गोष्टी मला ऐकायच्या नाहीत.' ज्या आधाराला अलोपीदीन अभेद्य खडक समजून होते, तोच पायांखालून सरकतो आहे असे त्यांना वाटले. स्वाभिमानाला आणि धनैश्वर्याला जबर धक्का बसला. तरीही धनाच्या संख्याबळावर त्यांचा अजून पुरा भरवसा होता. ते आपल्या मुखत्याराला म्हणाले, 'लालाजी, एक हजाराच्या नोटा बाबूसाहेबांना नजर करा; ते या घडीला भुकेल्या सिंहासारखे झाले आहेत.' वंशीधर भडकून म्हणाले, 'एक हजारच काय, एक लाखही मला सत्याच्या मार्गावरून ढळवू शकणार नाहीत.' धर्माचा हा अविचारी हट्ट आणि देवांनाही दुर्लभ असा त्याग पाहून मन फार चरफडले. आता दोन शक्तींमध्ये संग्राम सुरू झाला. धनाने उसळ्या मारमारून हल्ले चढवायला सुरुवात केली. एकावरून पाच, पाचावरून दहा, दहावरून पंधरा आणि पंधरावरून वीस हजारांपर्यंत मजल गेली; पण धर्म अलौकिक शौर्याने त्या बहुसंख्य सेनेपुढे एकटा, पर्वतासारखा अढळ, अविचल उभा होता.
मिठाचा दारोगा
अलोपीदीन निराश होऊन म्हणाले, 'आता याहून पुढे जाण्याची माझी हिंमत नाही. यापुढे आपली मर्जी.' वंशीधरांनी आपल्या जमादाराला दरडावून हाक मारली. बदलूसिंह मनातल्या मनात दारोगाजींना शिव्या देत पंडित अलोपीदीनांकडे सरकला. पंडितजी घाबरून दोन-तीन पावले मागे हटले. अगदी काकुळतीला येऊन म्हणाले, 'बाबूसाहेब, देवासाठी माझ्यावर दया करा; मी पंचवीस हजारांवर हे मिटवायला तयार आहे.' 'अशक्य गोष्ट आहे.' 'तीस हजारांवर?' 'काही केल्या शक्य नाही.' 'चाळीस हजारांवरसुद्धा नाही?' 'चाळीस हजारच काय, चाळीस लाखांवरही अशक्य आहे.' 'बदलूसिंह, या माणसाला अटक कर. आता मला एक शब्दही ऐकायचा नाही.' धर्माने धनाला पायांखाली तुडवले. एक धट्टाकट्टा माणूस हातकड्या घेऊन आपल्याकडे येताना अलोपीदीनांनी पाहिला. ते निराश, केविलवाण्या नजरेने चहूकडे पाहू लागले. आणि मग मूर्च्छा येऊन खाली कोसळले. दुनिया झोपली होती, पण दुनियेची जीभ जागी होती. सकाळी पाहावे तो आबालवृद्ध सर्वांच्या तोंडी हीच एक गोष्ट. जो तो पंडितजींच्या या कृत्यावर टीकाटिप्पणी करीत होता; निंदेचा नुसता भडिमार चालला होता, जणू या एका पाप्याबरोबर जगातले पापच आता संपून गेले होते. पाण्याला दूध म्हणून विकणारा गवळी, खोट्या रोजनिश्या भरणारे अधिकारी, रेल्वेतून बिनतिकिटाचा प्रवास करणारे बाबू लोक, बनावट दस्तऐवज बनवणारे शेठ-सावकार, हे सगळेच्या सगळे देव असल्याच्या थाटात माना हलवीत होते.
मिठाचा दारोगा
दुसऱ्या दिवशी पंडित अलोपीदीन आरोपी म्हणून, कॉन्स्टेबलांच्या बरोबर, हातांत हातकड्या, हृदयात खंत आणि क्षोभ घेऊन, लाजेने मान खाली घालून अदालतीकडे निघाले, तेव्हा साऱ्या शहरात खळबळ उडाली. जत्रेतसुद्धा डोळे इतके आतुर होत नसतील. गर्दी एवढी लोटली, की छप्पर कोणते नि भिंत कोणती यात फरकच उरला नाही. पण अदालतीत पोहोचण्याचीच काय ती खोटी होती. पं. अलोपीदीन या अथांग अरण्याचे सिंह होते. अधिकारी त्यांचे भक्त, कारकून त्यांचे सेवक, वकील-मुखत्यार त्यांचे आज्ञाधारक, आणि अर्दली, चपराशी नि चौकीदार तर त्यांचे फुकटचे गुलाम होते. त्यांना पाहताच लोक चहूबाजूंनी धावले. सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. अलोपीदीनांनी हे कृत्य केले म्हणून नव्हे, तर ते कायद्याच्या पंजात सापडले कसे, याचे. ज्याच्यापाशी अशक्य ते शक्य करून दाखवणारा पैसा आणि अजोड वाक्चातुर्य आहे, असा माणूस कायद्याच्या पंजात का सापडावा? प्रत्येकजण त्यांना सहानुभूती दाखवीत होता. हा हल्ला परतवण्यासाठी मोठ्या तत्परतेने वकिलांची एक फौज उभी करण्यात आली. न्यायाच्या रणांगणात धर्म आणि धन यांचे युद्ध जुंपले. वंशीधर गप्प उभे होते. सत्याखेरीज त्यांच्यापाशी कोणतेही बळ नव्हते, आणि स्पष्ट बोलण्याखेरीज कोणतेही शस्त्र. साक्षीदार होते, पण लोभाने डळमळलेले. एवढेच काय, खुद्द न्यायही आपल्याशी जरा फटकूनच आहे असे मुंशीजींना दिसत होते. तो न्यायाचा दरबार होता खरा, पण तिथल्या कर्मचाऱ्यांवर पक्षपाताची नशा चढली होती. आणि पक्षपात नि न्याय यांचा मेळ कसा बसावा? जिथे पक्षपात आहे, तिथे न्यायाची कल्पनाही करता येत नाही. खटला लवकरच संपला.
मिठाचा दारोगा
डेप्युटी मॅजिस्ट्रेटने आपल्या निकालपत्रात लिहिले, पं. अलोपीदीन यांच्याविरुद्ध दिलेले पुरावे निराधार आणि दिशाभूल करणारे आहेत. ते एक फार मोठे गृहस्थ आहेत. थोड्याशा फायद्यासाठी त्यांनी असले दुःसाहस केले असेल, ही गोष्ट कल्पनेपलीकडची आहे. मिठाचा दारोगा मुंशी वंशीधर याचा फारसा दोष नाही; तथापि त्याच्या उद्धटपणामुळे आणि अविचारामुळे एका भल्या गृहस्थाला त्रास सोसावा लागला, ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे. तो आपल्या कामात जागरूक आणि दक्ष असतो याचा आम्हांला आनंद आहे; परंतु मिठाच्या खटल्यातील त्याच्या अवाजवी नमकहलालीने त्याचा विवेक आणि बुद्धी भ्रष्ट करून टाकली. यापुढे त्याने सावध राहावे. वकिलांनी हा निकाल ऐकला आणि आनंदाने उड्या मारल्या. पं. अलोपीदीन हसत-हसत बाहेर पडले. आप्तस्वकीयांनी रुपयांची लयलूट केली. औदार्याचा सागर उसळला. त्याच्या लाटांनी अदालतीचा पायासुद्धा हादरवून टाकला. वंशीधर बाहेर आले तेव्हा चहूकडून त्यांच्यावर उपहासाच्या बाणांचा वर्षाव होऊ लागला. चपराश्यांनी वाकून वाकून सलाम ठोकले. पण या घडीला एकेक कडू शब्द, एकेक इशारा त्यांच्या अभिमानाचा अग्नी अधिकच चेतवीत होता. हा खटला जिंकला असता तर कदाचित ते असे ताठ मानेने चालले नसते. आज त्यांना जगाचा एक खेदजनक, विचित्र अनुभव आला. न्याय आणि विद्वत्ता, लांबलचक पदव्या, मोठमोठ्या दाढ्या, ढगळ झगे, यांतले एकही खऱ्या आदराला पात्र नाही. वंशीधरांनी धनाशी वैर विकत घेतले होते; त्याची किंमत मोजणे भाग होते. जेमतेम एक आठवडा गेला असेल, तोच निलंबनाचा हुकूम येऊन थडकला. कर्तव्यनिष्ठेची शिक्षा मिळाली. बिचारे भग्न हृदयाने, दुःखाने आणि खेदाने व्याकूळ होऊन घराकडे निघाले. म्हातारे मुंशीजी तर आधीपासूनच कुरकुरत होते, की निघता निघता या पोराला समजावून सांगितले होते, पण याने एक ऐकले नाही.
मिठाचा दारोगा
सगळी मनमानी करतो. आम्ही कलालाचे आणि खाटकाचे तगादे सोसावेत, म्हातारपणी भगत होऊन बसावे, आणि तिकडे याचा आपला तोच कोरडा पगार! आम्हीही नोकरी केली आहे, आणि काही मोठे हुद्देदारही नव्हतो. पण काम केले ते मनसोक्त केले; आणि हे महाशय निघालेत प्रामाणिक व्हायला! घरात अंधार असला तरी चालेल, मशिदीत दिवा मात्र लावणारच. धिक्कार असो असल्या अकलेला! सारे शिकणे-सवरणे फुकट गेले. त्यानंतर थोड्याच दिवसांनी मुंशी वंशीधर अशा दुरवस्थेत घरी पोहोचले आणि म्हाताऱ्या वडिलांनी ती बातमी ऐकली, तेव्हा त्यांनी कपाळ बडवून घेतले. म्हणाले, 'जीव म्हणतो, तुझे आणि माझे दोघांचेही डोके फोडून टाकावे.' बराच वेळ ते पस्तावून हात चोळीत राहिले. रागाच्या भरात काही कठोर शब्दही बोलले; आणि वंशीधर तिथून बाजूला झाले नसते तर या रागाने नक्कीच उग्र रूप धारण केले असते. वृद्ध आईलाही दुःख झाले. जगन्नाथ आणि रामेश्वरच्या यात्रेचे मनोरथ धुळीला मिळाले. पत्नी तर कित्येक दिवस धड तोंडाने बोललीसुद्धा नाही. असाच एक आठवडा गेला. संध्याकाळची वेळ होती. म्हातारे मुंशीजी बसल्या बसल्या रामनामाची माळ जपत होते. तेवढ्यात त्यांच्या दाराशी एक सजवलेला रथ येऊन थांबला. हिरवे-गुलाबी पडदे, पश्चिमेकडच्या जातिवंत बैलांची जोडी, त्यांच्या गळ्यांत निळे दोरे, शिंगे पितळेने मढवलेली. कित्येक नोकर खांद्यांवर लाठ्या टाकून बरोबर होते. मुंशीजी स्वागताला धावले; पाहतात तो पंडित अलोपीदीन! त्यांनी वाकून दंडवत घातला आणि लाळघोटेपणाने बोलू लागले, 'आमचे भाग्य उजळले, आपले पाय या दाराला लागले! आपण आमचे पूज्य दैवत; आपल्याला कोणते तोंड दाखवावे? तोंडाला तर काळे फासले गेले आहे. पण काय करणार, पोरगा अभागी, कुपुत्र निपजला; नाहीतर आपल्यापासून तोंड कशाला लपवावे लागले असते? देवाने एक वेळ निपुत्रिक ठेवावे, पण असले संतान देऊ नये.'
मिठाचा दारोगा
अलोपीदीन म्हणाले, 'नाही भाईसाहेब, असे म्हणू नका.' मुंशीजी चकित होऊन म्हणाले, 'असल्या संतानाला दुसरे काय म्हणू?' अलोपीदीन वात्सल्याने भरलेल्या स्वरात म्हणाले, 'कुलदीपक, आणि पूर्वजांची कीर्ती उजळणारा! धर्मासाठी आपले सर्वस्व अर्पण करू शकतील असे धर्मनिष्ठ पुरुष जगात आहेत तरी किती!' पं. अलोपीदीन वंशीधरांना म्हणाले, 'दारोगाजी, याला खुशामत समजू नका; खुशामत करायची असती तर मला एवढी तसदी घेण्याची गरज नव्हती. त्या रात्री आपण आपल्या अधिकाराच्या बळावर मला ताब्यात घेतले होते; पण आज मी स्वखुशीने आपल्या ताब्यात आलो आहे. मी हजारो रईस आणि अमीर पाहिले, हजारो बड्या हुद्देदारांशी माझा संबंध आला; पण मला हरवले ते आपणच. बाकी सर्वांना मी माझा आणि माझ्या पैशाचा गुलाम करून सोडले. आपल्याला एक विनंती करण्याची मला परवानगी द्या.' अलोपीदीनांना येताना पाहून वंशीधरांनी उठून त्यांचा आदरसत्कार केला, पण स्वाभिमान राखून. त्यांनी ओळखले, की हे गृहस्थ मला खजील करायला आणि डिवचायला आले आहेत. क्षमा मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही; उलट आपल्या वडिलांचे ते तोंडपुजेपणाचे बोलणे त्यांना असह्य वाटू लागले. पण पंडितजींचे बोलणे ऐकले तेव्हा मनातले किल्मिष धुऊन गेले. त्यांनी पंडितजींकडे ओझरती नजर टाकली. तिथे सद्भाव झळकत होता. अभिमानाने आता लज्जेपुढे मान झुकवली. संकोचून ते म्हणाले, 'आपण असे म्हणता हा आपला मोठेपणा आहे. माझ्या हातून जो काही उद्धटपणा घडला, त्याची क्षमा करा. मी धर्माच्या बेडीत जखडलेला होतो; एरवी मी आपला दासच आहे. आपली जी आज्ञा असेल ती मला शिरसावंद्य.' अलोपीदीन नम्रपणे म्हणाले, 'नदीकाठी आपण माझी विनंती मान्य केली नव्हती; पण आज मात्र ती मान्य करावीच लागेल.' वंशीधर म्हणाले, 'माझी काय योग्यता! पण माझ्या हातून जी काही सेवा होण्यासारखी असेल, तिच्यात कसूर होणार नाही.'
मिठाचा दारोगा
अलोपीदीनांनी एक स्टँप लावलेला कागद काढला आणि तो वंशीधरांपुढे ठेवून म्हणाले, 'हे पद स्वीकारा आणि आपली सही करा. मी ब्राह्मण आहे; माझे हे मागणे पुरे केल्याशिवाय मी दारातून हलणार नाही.' मुंशी वंशीधरांनी तो कागद वाचला, तेव्हा कृतज्ञतेने त्यांचे डोळे भरून आले. पं. अलोपीदीनांनी त्यांना आपल्या साऱ्या मालमत्तेचा कायमचा मॅनेजर नेमले होते. वर्षाला सहा हजार पगार, शिवाय रोजचा खर्च वेगळा, स्वारीसाठी घोडा, राहायला बंगला, नोकरचाकर फुकट. कापऱ्या आवाजात ते म्हणाले, 'पंडितजी, आपल्या औदार्याची स्तुती करावी एवढे सामर्थ्य माझ्यात नाही! पण एवढ्या उच्च पदाला मी पात्र नाही.' अलोपीदीन हसून म्हणाले, 'मला या घडीला एका अपात्र माणसाचीच गरज आहे.' वंशीधर गंभीरपणे म्हणाले, 'तसा मी आपला दासच आहे. आपल्यासारख्या कीर्तिमान, सज्जन पुरुषाची सेवा करायला मिळणे हे माझे भाग्यच. पण माझ्यापाशी ना विद्या आहे, ना बुद्धी, ना या उणिवा भरून काढणारा स्वभाव. एवढ्या मोठ्या कामासाठी एखादा मोठा मर्मज्ञ, अनुभवी माणूस हवा.' अलोपीदीनांनी कलमदानातून लेखणी काढली आणि ती वंशीधरांच्या हातात देत म्हणाले, 'मला ना विद्वत्तेची आस आहे, ना अनुभवाची, ना मर्मज्ञतेची, ना कार्यकुशलतेची. या गुणांचे मोल काय, याची मला चांगलीच ओळख पटली आहे. आता सुदैवाने आणि सुसंधीने मला असा मोती दिला आहे, की ज्याच्यापुढे योग्यता आणि विद्वत्ता यांची चमक फिकी पडते. ही लेखणी घ्या, फार विचार करू नका, सही करून टाका. परमेश्वरापाशी एवढीच प्रार्थना, की त्याने आपल्याला सदैव तोच नदीकाठचा, बेमुर्वत, उद्धट, कठोर पण धर्मनिष्ठ दारोगाच ठेवावे.' वंशीधरांचे डोळे डबडबले. हृदयाच्या लहानशा पात्रात एवढा उपकार मावेना. त्यांनी पुन्हा एकदा पंडितजींकडे भक्तीने आणि श्रद्धेने पाहिले आणि थरथरत्या हाताने मॅनेजरीच्या कागदावर सही केली. अलोपीदीनांनी हर्षभराने त्यांना मिठी मारली.