मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
मोटेरामजी शास्त्री
पंडित मोटेरामजी शास्त्रींना कोण ओळखत नाही? अधिकाऱ्यांचा कल पाहून पाऊल टाकणे हा त्यांचा बाणा. स्वदेशी चळवळीच्या दिवसांत त्यांनी त्या चळवळीला कडाडून विरोध केला होता. स्वराज्याच्या चळवळीच्या दिवसांतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून राजनिष्ठेची सनद पदरात पाडून घेतली होती. पण एवढ्या उड्या मारूनही त्यांच्या नशिबाची साखरझोप काही मोडली नाही आणि अध्यापनाचे लचांड काही पाठ सोडीना, तेव्हा अखेर त्यांनी एक नवी युक्ती शोधून काढली. घरात जाऊन धर्मपत्नीला म्हणाले, 'या म्हाताऱ्या पोपटांना पढवता पढवता माझ्या डोक्याचा भुगा होत चालला आहे. इतके दिवस विद्यादान करून असे काय फळ मिळाले, की यापुढे आणखी काही मिळेल अशी आशा धरावी?' धर्मपत्नी काळजीत पडून म्हणाली, 'पण पोटापाण्यालाही काही आधार हवा ना?' मोटेराम—तुला जेव्हा पाहावे तेव्हा पोटाचीच चिंता लागलेली असते. जेवणाचे आमंत्रण आले नाही, असा दिवस क्वचितच उजाडत असेल. आणि कोणी निंदा केली तरी बेहत्तर, पण घरी न्यायची पत्रावळ बांधून घेतल्याशिवाय मी काही परतत नाही. सगळे यजमान काय आजच मरून चालले आहेत? पण जन्मभर नुसते पोटच जगवले, तर काय मिळवले? जगातले थोडे सुखही भोगायला हवे ना. मी वैद्य व्हायचे ठरवले आहे. बायकोने आश्चर्याने विचारले—वैद्य कसे होणार? वैद्यकी थोडीतरी शिकला आहात का? मोटेराम—वैद्यक शिकून काही होत नाही. जगात विद्येला एवढे महत्त्व नाही, जेवढे बुद्धीला आहे. दोन-चार साध्यासुध्या क्लृप्त्या आहेत, बस्स, बाकी काही नाही. मी भिषगाचार्य आहे की नाही, याची परीक्षा घेत फिरायची कोणाला काय गरज पडली आहे! एक भला मोठा साइनबोर्ड करून घेईन. त्यावर हे शब्द लिहिलेले असतील—'येथे स्त्री-पुरुषांच्या रोगांची चिकित्सा विशेष रीतीने केली जाते.'
मोटेरामजी शास्त्री
दोन-चार पैशांचा हिरडा-बेहडा-आवळा कुटून, वस्त्रगाळ करून ठेवीन. बस्स, या धंद्याला एवढे सामान पुरेसे आहे. हां, वर्तमानपत्रांत जाहिरात देईन आणि नोटिसा वाटायला लावीन. लंका, मद्रास, रंगून, कराची अशा दूरदूरच्या ठिकाणच्या सद्गृहस्थांची पत्रे त्यांत छापली जातील. माझ्या चिकित्साकौशल्याचे साक्षीदार तेच. त्या त्या गावी या नावांची माणसे राहतात की नाही, याचा शोध घेत हिंडायचे जनतेला काय पडले आहे? मग बघ, वैद्यकी कशी चालते ती. स्त्री—पण काही कळल्या-सवरल्याशिवाय औषध द्याल, तर त्याने गुण काय येणार? मोटेराम—गुण न येवो, माझे काय जाते! वैद्याचे काम औषध देणे; मृत्यूला हरवण्याचा मक्ता तो घेत नाही. आणि शिवाय जेवढी माणसे आजारी पडतात, ती सगळीच काही मरत नाहीत. माझे तर म्हणणे असे, की ज्यांना कुठलेच औषध दिले जात नाही, ते विकार शमला की आपोआप बरे होतात. वैद्यांना न मागता यश मिळते. पाच रोग्यांतला एक जरी बरा झाला, तरी त्याचे श्रेय मला नक्कीच मिळणार. उरलेले चार मेले, तर ते थोडेच माझी निंदा करायला येणार आहेत! मी पुष्कळ विचार करून पाहिले; याहून चांगला धंदा दुसरा नाही. लेख लिहिणे मला येतेच, कवित्तेही रचतोच; वर्तमानपत्रांत आयुर्वेदाच्या महत्त्वावर दोन-चार लेख लिहून टाकीन. त्यांत जागोजागी दोन-चार कवित्तेही घुसडीन, आणि लिहीन तेही जरा चटकदार भाषेत. मग बघ, किती बावळट जाळ्यात सापडतात ते. एवढे दिवस मी नुसते पोपटच पढवीत बसलो होतो, असे समजू नकोस. शहरातल्या यशस्वी वैद्यांच्या चाली मी निरखीत आलो आहे आणि इतक्या दिवसांनंतर मला त्यांच्या यशाचा मूलमंत्र उमगला आहे. देवाच्या मनात असेल, तर एक दिवस तू नखशिखांत सोन्याने मढलेली असशील.
मोटेरामजी शास्त्री
बायकोने मनातला आनंद दाबून धरीत म्हटले—या वयात मी कसले दागिने घालणार! आता ती हौसही उरली नाही. पण हे तर सांगा, तुम्हांला औषधे करताही येत नाहीत; कशी करणार? रस कसे तयार होणार? औषधे ओळखतासुद्धा येत नाहीत ना तुम्हांला? मोटेराम—प्रिये! तू खरोखरच मोठी मूर्ख आहेस. अगं, वैद्याला यांतल्या एकाही गोष्टीची गरज नसते. वैद्याच्या चिमटीतली राख हाच रस, हेच भस्म, हेच रसायन. गरज आहे ती फक्त थोड्या थाटामाटाची. एक मोठीशी खोली हवी, तिच्यात एक सतरंजी असावी, कोनाड्यांत दहा-पाच कुप्या-बाटल्या असाव्यात. याशिवाय दुसऱ्या कशाचीही जरुरी नाही; बाकी सगळे बुद्धी आपोआप करून घेते. माझ्या साहित्यमिश्रित लेखांचा मोठा प्रभाव पडेल, तू बघशीलच. अलंकारांचे मला किती ज्ञान आहे, हे तर तुला ठाऊकच आहे. अलंकारांच्या बाबतीत माझ्यापुढे टिकाव धरील असा कोणी आज या भूमंडळावर मला दिसत नाही. शेवटी इतके दिवस काही माशा मारीत बसलो नव्हतो! दहा-पाच माणसे तर काव्यचर्चेच्या निमित्तानेच माझ्याकडे येत-जात राहतील. बस्स, तेच माझे दलाल. त्यांच्याच मार्फत रोगी येतील. मी आयुर्वेदाच्या ज्ञानाच्या जोरावर नव्हे, तर शृंगारकाव्यातल्या नायिकाभेदाच्या ज्ञानाच्या जोरावर धडाक्यात वैद्यकी करीन; तू नुसती बघत राहा. बायकोने अविश्वासाने म्हटले—मला तर भीती वाटते, की हे विद्यार्थीही तुमच्या हातचे जातील की काय. मग ना घरचे राहाल, ना घाटचे. तुमच्या नशिबात पोरे शिकवणेच लिहिले आहे; चहूकडून ठेचा खाल्ल्यावर तुम्हांला परत तेच पोपट पढवावे लागतील. मोटेराम—माझ्या योग्यतेवर तुझा विश्वास का बसत नाही?
मोटेरामजी शास्त्री
स्त्री—कारण तिथेही तुम्ही लबाडीच करणार. तुमच्या लबाडीचा मला तिटकारा आहे. जे तुम्ही नाही आणि होऊही शकत नाही, ते व्हायचा सोस कशाला? तुम्हांला लीडर होता आले नाही; डोके आपटून गप्प बसलात. फळाला येते ती तुमची लबाडीच, आणि म्हणूनच मला चीड येते. मला वाटते, तुम्ही भल्या माणसासारखे राहावे, निष्कपट आयुष्य घालवावे. पण माझे तुम्ही कधी ऐकता? मोटेराम—मग माझे हे नायिकाभेदाचे ज्ञान शेवटी कधी कामी यायचे? स्त्री—एखाद्या रईसाच्या पदरी खुशमस्कऱ्या म्हणून का राहत नाही? दोन-चार सुंदर कवित्ते ऐकवलीत की तो खूश होईल आणि काही ना काही हातावर टेकवीलच. वैद्यकीचे सोंग कशाला आणता? मोटेराम—मला अशा अशा खुब्या ठाऊक आहेत, की ज्या वैद्यांच्या बापजाद्यांनाही ठाऊक नसतील. आणि सगळे वैद्य रुपया-दोन रुपयांसाठी वणवण भटकतात; मी माझी फी पाच रुपये ठेवीन, शिवाय गाडीभाडे वेगळे. लोकांना वाटेल, हे कोणी मोठे वैद्य असले पाहिजेत; नाहीतर एवढी फी कशाला असती? या खेपेला बायकोला थोडा विश्वास वाटला. म्हणाली—एवढ्या वेळात आता कुठे एक कामाची गोष्ट बोललात. पण एवढे लक्षात ठेवा, इथे तुमचा जम बसायचा नाही; दुसऱ्या एखाद्या शहरात जावे लागेल. मोटेराम—(हसून) एवढेही मला कळत नाही की काय? लखनौमध्ये आपला अड्डा जमायचा. वर्षभरात असा दरारा बसवीन, की सारे वैद्य धुळीला मिळतील. मला आणखीही कितीतरी मंत्र येतात. रोग्याला दोन-तीनदा पाहिल्याशिवाय मी त्याच्यावर उपचारच करणार नाही. रोग्याची प्रकृती नीट ओळखून घेतल्याखेरीज मी त्याला औषध देऊ शकत नाही. बोल, कशी वाटते युक्ती? बायकोची कळी खुलली. म्हणाली—आता मात्र मी तुम्हांला मानले. तुमची वैद्यकी नक्की चालणार; आता मला काही शंका उरली नाही. पण गरिबांवर हा मंत्र चालवू नका, नाहीतर फसाल.
मोटेरामजी शास्त्री
वर्ष उलटले. भिषगाचार्य पंडित मोटेरामजी शास्त्री यांचा लखनौत एकच बोलबाला झाला. अलंकारांचे ज्ञान तर त्यांना होतेच, थोडेफार गाणे-बजावणेही येत असे. त्यात भर म्हणजे गुप्तरोगांचे तज्ज्ञ. रसिकांचे भाग्य उजळले. पंडितजी त्यांना कवित्ते ऐकवीत, हसवीत आणि शक्तिवर्धक औषधे खाऊ घालीत; आणि ते रसिक, पौष्टिक औषधांची ज्यांना विशेष ओढ असते अशा रईसांमध्ये पंडितजींची तोंड फाटेस्तोवर स्तुती करीत. वर्षभरातच वैद्यराजांचा असा जम बसला, की तसा क्वचितच कोणाचा बसत असेल. गुप्तरोगांचे चिकित्सक लखनौत एकमेव तेच होते. चिकित्साही गुप्तपणेच करीत. विधवा राण्या आणि शौकीन, अदूरदर्शी रईस यांच्यात त्यांची खूप पूजा होऊ लागली. आपल्यापुढे ते कोणाला मोजीतच नसत. पण बायको त्यांना सारखी बजावीत असे, की राण्यांच्या भानगडीत पडू नका, नाहीतर एक दिवस पस्तावाल. पण होणारे चुकत नाही, कोणी लाख समजावले तरी. पंडितजींच्या उपासकांत बिडहलच्या राणीसाहेबही होत्या. राजेसाहेबांचा स्वर्गवास झाला होता; राणीसाहेबांना कोण जाणे कोणता जुनाट रोग जडला होता. पंडितजी त्यांच्याकडे दिवसातून पाच-पाच वेळा जात. त्यांनी क्षणभरही आपल्याजवळून हलू नये, असे राणीसाहेबांना वाटे. पंडितजींना पोचायला उशीर झाला की त्या बेचैन होत. एक मोटार नेहमी पंडितजींच्या दाराशी उभी असे. आता पंडितजींनी चांगलीच कात टाकली होती. तनजेबाची अचकन घालीत, बनारसी फेटा बांधीत आणि पायांत पंप जोडा चढवीत. मित्रमंडळीही त्यांच्याबरोबर मोटारीत बसून भरधाव मिरवीत असत. कित्येक मित्रांना त्यांनी राणीसाहेबांच्या दरबारात नोकरीला लावून दिले. राणीसाहेब आपल्या मसीहाचा शब्द कसा मोडणार? पण निष्ठुर दैवाचे चक्र काही निराळेच कारस्थान रचीत होते.
मोटेरामजी शास्त्री
एके दिवशी पंडितजी राणीसाहेबांच्या गोऱ्यापान मनगटावर एक हात ठेवून नाडी पाहत होते आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या हृदयाच्या गतीची परीक्षा करीत होते, तोच कित्येक माणसे हातांत सोटे घेऊन खोलीत घुसली आणि पंडितजींवर तुटून पडली. राणीने पळत जाऊन दुसऱ्या खोलीचा आसरा घेतला आणि दार लावून घेतले. पंडितजींवर बेसुमार मार पडू लागला. तसे पंडितजीही दमदार गडी होते; एक गुप्ती नेहमी जवळ बाळगीत. पण बेसावध असताना एवढ्या माणसांनी दाबून धरल्यावर करणार काय? कधी याचे पाय धरीत, कधी त्याचे. तोंडातून सारखा हाय! हाय! असा आवाज निघत होता; पण त्या निर्दयांना त्यांची जराही दया येत नव्हती. एकाने एक लाथ हाणून म्हटले—या दुष्टाचे नाक कापा. दुसरा म्हणाला—याच्या तोंडाला काळे आणि चुना फासून सोडून द्या. तिसरा—काय वैद्यराज महाराज, बोला, काय पसंत आहे? नाक कापून घेणार की तोंडाला काळे फासून घेणार? पंडित—हाय! हाय! मेलो. दुसरे काय वाटेल ते करा, पण नाक कापू नका. एक—आता परत इकडे फिरकणार नाहीस ना? पंडित—चुकूनसुद्धा नाही, सरकार! हाय, मेलो. दुसरा—आजच्या आज लखनौमधून पोबारा कर. नाहीतर खैर नाही. पंडित—सरकार, मी आजच निघून जातो. जानव्याची शपथ घेऊन सांगतो. माझे तोंड तुम्हांला इथे दिसणार नाही. तिसरा—बरे तर गड्यांनो, प्रत्येकाने पाच-पाच लाथा घाला आणि सोडून द्या. पंडित—अहो सरकार, मरून जाईन, दया करा. चौथा—तुझ्यासारख्या पाखंड्यांनी मेलेलेच बरे. हं, तर होऊ द्या सुरू. पंचलाथी पडू लागली; धमाधम आवाज येऊ लागले. जणू नगाऱ्यावर टिपरीच पडत होती. प्रत्येक धमाक्यानंतर एकदा हाय असा आवाज निघे, जणू तो त्याचा प्रतिध्वनीच. पंचलाथी-पूजा आटोपल्यावर त्या लोकांनी मोटेरामजींना फरफटत बाहेर काढले आणि मोटारीत बसवून घरी पाठवून दिले. निघता निघता ताकीद दिली, की उजाडायच्या आत पळ काढ, नाहीतर निराळाच इलाज केला जाईल.
मोटेरामजी शास्त्री
मोटेरामजी लंगडत, कण्हत, काठी टेकीत घरात गेले आणि धाडकन खाटेवर कोसळले. बायकोने घाबरून विचारले—कसे वाटते आहे? अहो, काय झाले तुम्हांला? अगं बाई! हा तुमचा चेहरा असा कसा झाला? मोटेराम—हाय देवा, मेलो. स्त्री—कुठे दुखते आहे? म्हणूनच सांगत होते, फार रबडी खाऊ नका. लवणभास्कर आणू का? मोटेराम—हाय! दुष्टांनी जीव घेतला. त्या चांडाळणीपायी माझी ही दुर्दशा झाली. मारून मारून सगळ्यांनी माझी कणीक तिंबून काढली. स्त्री—म्हणजे मार खाऊन आला आहात म्हणा की. हो, मार खाल्लेलाच दिसतो. बरे झाले. तुम्हांला लाथांचीच भाषा कळते. सांगत होते, राणीकडे येणे-जाणे करू नका; पण तुम्ही कधी ऐकलेत? मोटेराम—हाय, हाय! तुलाही याच वेळी तोंडसुख घ्यायचे सुचले! माझी इथे पुरती वाट लागली आहे आणि तू तोंडसुख घेते आहेस. कोणाला तरी सांगून हातगाडीबिडी मागव; रातोरात लखनौ सोडून पळायचे आहे. नाहीतर सकाळी जीव वाचायचा नाही. स्त्री—नाही, अजून तुमचे पोट भरलेले नाही. आणखी थोडे दिवस इथली हवा खा. तिथे कशी मजेत पोरे शिकवीत होतात; पण नाही, वैद्य व्हायची हुक्की आली. फार बरे झाले; आता जन्मभर विसरणार नाही. तुम्ही मार खात होतात तेव्हा राणी कुठे होती, की तिने तुम्हांला वाचवले नाही? पंडित—हाय, हाय! ती हडळ तर पळून गेली. तिच्याचपायी हे सारे. असे होईल हे काय ठाऊक होते? नाहीतर तिच्यावर उपचार केलेच कशाला असते? स्त्री—तुम्ही आहातच करंट्या नशिबाचे. वैद्यकी कशी झकास चालली होती! पण तुमच्या करणीने सगळ्याचा सत्यानाश केला. शेवटी परत तीच मास्तरकी करावी लागली ना. करंट्या नशिबाचेच तुम्ही. सकाळी मोटेरामजींच्या दाराशी हातगाडी उभी होती आणि त्यावर सामानसुमान लादले जात होते. मित्रांपैकी एकही दृष्टीस पडत नव्हता. पंडितजी पडल्या पडल्या कण्हत होते आणि बायको सामान लादून घेत होती.