मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
मोठ्या घरची लेक
बेनीमाधवसिंह गौरीपूर गावचे जमीनदार आणि नंबरदार होते. त्यांचे आजोबा एके काळी मोठे धनधान्यसंपन्न होते. गावातला पक्का तलाव आणि देऊळ, ज्यांची आता डागडुजीसुद्धा अवघड झाली होती, हे त्यांचेच कीर्तिस्तंभ. म्हणतात, एके काळी या दारात हत्ती झुलत असे; आता त्याच्या जागी एक म्हातारी म्हैस होती. तिच्या अंगात हाडांच्या सापळ्याशिवाय दुसरे काही उरले नव्हते; पण दूध मात्र बहुधा भरपूर देत असावी, कारण कोणी ना कोणी माणूस मडके घेऊन सदैव तिच्या उरावर बसलेलाच असे. बेनीमाधवसिंहांनी आपली अर्ध्याहून अधिक मालमत्ता वकिलांच्या चरणी वाहिली होती. आता त्यांचे उत्पन्न वर्षाला हजार रुपयांहून अधिक नव्हते. ठाकूरसाहेबांना दोन मुलगे होते. थोरल्याचे नाव श्रीकंठसिंह. त्याने पुष्कळ दिवस खपून, धडपड करून बी. ए.ची पदवी मिळवली होती. आता तो एका कचेरीत नोकरीला होता. धाकटा मुलगा लालबिहारीसिंह भरदार अंगापिंडाचा, देखणा जवान होता. भरलेला चेहरा, रुंद छाती. सकाळी उठल्या उठल्या तो म्हशीचे दोन शेर ताजे दूध पिऊन टाकी. श्रीकंठसिंहांची तऱ्हा याच्या अगदी उलट. डोळ्यांना सुखावणारे हे सारे गुण त्यांनी बी. ए.—त्या दोन अक्षरांवरून ओवाळून टाकले होते. या दोन अक्षरांनी त्यांचे शरीर दुबळे आणि चेहरा निस्तेज करून टाकला होता. म्हणूनच वैद्यकाच्या ग्रंथांवर त्यांचे विशेष प्रेम होते. आयुर्वेदिक औषधांवर त्यांचा अधिक विश्वास. सकाळ-संध्याकाळ त्यांच्या खोलीतून बहुधा खलबत्त्याचा मंजूळ, कानाला गोड लागणारा नाद ऐकू येत असे. लाहोर आणि कलकत्त्याच्या वैद्यांशी त्यांचा मोठा पत्रव्यवहार चालू असे.
मोठ्या घरची लेक
ही इंग्रजी पदवी गाठीशी असूनही श्रीकंठ इंग्रजी समाजरीतींचे फारसे चाहते नव्हते; उलट, बहुधा ते मोठ्या आवेशाने त्यांची निंदा आणि हेटाळणी करीत. म्हणूनच गावात त्यांना मोठा मान होता. दसऱ्याच्या दिवसांत ते मोठ्या उत्साहाने रामलीलेत भाग घेत आणि स्वतः कोणती ना कोणती भूमिका करीत. गौरीपुरात रामलीला सुरू केली ती त्यांनीच. प्राचीन हिंदू संस्कृतीचे गुणगान हा त्यांच्या धार्मिकतेचा प्रमुख भाग होता. एकत्र कुटुंबाचे तर ते एकमेव उपासक होते. हल्लीच्या बायकांना कुटुंबात मिळूनमिसळून राहण्याचा जो कंटाळा असतो, तो जातीला आणि देशाला, दोघांनाही घातक आहे, असे ते मानीत. आणि म्हणूनच गावातल्या ललना त्यांच्या निंदक होत्या! काही जणी तर त्यांना आपला वैरी मानायलाही कचरत नसत. खुद्द त्यांच्या पत्नीचाच या बाबतीत त्यांच्याशी मतभेद होता. तिला आपल्या सासू-सासऱ्यांचा किंवा धाकट्या-थोरल्या दिरांचा तिटकारा होता, म्हणून नव्हे; तर तिचे मत असे होते की, पुष्कळ सोसूनही, पुष्कळ पडते घेऊनही कुटुंबात निभाव लागत नसेल, तर रोजच्या कटकटीत आयुष्याची माती करून घेण्यापेक्षा आपली चूल वेगळी मांडलेली बरी. आनंदी एका मोठ्या उच्च कुळातली मुलगी होती. तिचे वडील एका छोट्याशा संस्थानाचे तालुकदार होते. प्रशस्त वाडा, एक हत्ती, तीन कुत्रे, ससाणे, बहिरी-शिकरे, झुंबरे-हंड्या, ऑनररी मॅजिस्ट्रेटी आणि कर्ज—प्रतिष्ठित तालुकदाराच्या उपभोगाच्या या साऱ्या वस्तू इथे हजर होत्या. नाव होते भूपसिंह. मोठे उदार मनाचे आणि तेजस्वी पुरुष होते; पण दुर्दैवाने मुलगा एकही नव्हता. सात मुली झाल्या, आणि दैवयोगाने त्या सगळ्याच्या सगळ्या जगल्या. पहिल्या जोशात त्यांनी तीन लग्ने हात सैल सोडून केली; पण पंधरा-वीस हजार रुपयांचे कर्ज डोक्यावर बसले, तेव्हा डोळे उघडले आणि त्यांनी हात आखडता घेतला.
मोठ्या घरची लेक
आनंदी ही चौथी मुलगी. ती आपल्या सगळ्या बहिणींहून अधिक रूपवती आणि गुणवती होती. म्हणून ठाकूर भूपसिंहांचा तिच्यावर फार जीव होता. सुंदर अपत्य बहुधा आई-बापांनाही अधिक लाडके असते. हिचे लग्न कुठे करावे, या विचाराने ठाकूरसाहेब मोठ्या धर्मसंकटात पडले होते. कर्जाचे ओझे वाढावे असेही त्यांना वाटत नव्हते, आणि आपण अभागी आहोत असे तिला वाटावे हेही त्यांना मान्य नव्हते. एक दिवस श्रीकंठ कसल्याशा वर्गणीचे पैसे मागायला त्यांच्याकडे आले. बहुधा नागरी-प्रचाराची वर्गणी असावी. भूपसिंह त्यांच्या स्वभावावर भाळले, आणि मोठ्या थाटामाटात श्रीकंठसिंहांचे आनंदीशी लग्न झाले. आनंदी आपल्या नव्या घरी आली, तेव्हा तिला इथला रंगढंग काही वेगळाच दिसला. ज्या थाटामाटाची तिला लहानपणापासून सवय होती, तो इथे नावालासुद्धा नव्हता. हत्ती-घोड्यांचे तर सोडाच, साधी सजवलेली सुंदर बैलगाडीसुद्धा नव्हती. रेशमी स्लिपर ती बरोबर घेऊन आली होती; पण इथे बाग कुठली! घराला खिडक्यासुद्धा नव्हत्या; ना जमिनीवर गालिचा, ना भिंतींवर चित्रे. हे एका साध्यासुध्या खेडवळ गृहस्थाचे घर होते; पण थोड्याच दिवसांत आनंदीने स्वतःला या नव्या परिस्थितीशी असे जुळवून घेतले, जणू तिने चैनीच्या वस्तू कधी पाहिल्याच नव्हत्या. (२) एक दिवस दुपारच्या वेळी लालबिहारीसिंह दोन पक्षी घेऊन आला आणि भावजयीला म्हणाला—लवकर शिजवून द्या, मला भूक लागली आहे. आनंदी स्वयंपाक करून त्याचीच वाट पाहत होती. आता ती हे नवे पक्वान्न करायला बसली. मडक्यात पाहिले, तो तूप पावशेरापेक्षा जास्त नव्हते. मोठ्या घरची लेक, काटकसर तिला काय ठाऊक! तिने सगळे तूप मटणात घालून टाकले. लालबिहारी जेवायला बसला, तो डाळीत तूप नव्हते. तो म्हणाला—डाळीत तूप का नाही घातलं?
मोठ्या घरची लेक
आनंदी म्हणाली—सगळं तूप मटणात गेलं. लालबिहारी मोठ्याने म्हणाला—परवाच तर तूप आणलंय, एवढ्यात संपलं! आनंदीने उत्तर दिले—आज सगळं मिळून पावशेरच असेल. ते सगळं मी मटणात घातलं. वाळलेले लाकूड जसे पटकन पेट घेते, तसा भुकेने बेभान झालेला माणूस बारीकसारीक गोष्टीवरून भडकतो. भावजयीचा हा उद्धटपणा लालबिहारीला फार झोंबला. तो फणकाऱ्याने म्हणाला—माहेरी तर म्हणे तुपाच्या नद्याच वाहत असतील! बायका शिव्या सोसतात, मारही सोसतात; पण माहेरची निंदा त्यांच्याने सोसवत नाही. आनंदी तोंड फिरवून म्हणाली—मेला हत्ती तरी सव्वा लाखाचा. तिकडे एवढं तूप रोज न्हावी-कहारच फस्त करतात. लालबिहारीचा तिळपापड झाला. त्याने ताट उचलून आपटले आणि म्हणाला—वाटतं, जीभ धरून उपटून काढावी. आनंदीलाही राग आला. तोंड लाल झाले. ती म्हणाली—ते असते, तर आज याची चांगलीच अद्दल घडवली असती. आता त्या अडाणी, उर्मट ठाकुराला राहवले नाही. त्याची बायको एका साधारण जमीनदाराची मुलगी होती. मनात येईल तेव्हा तो तिला बडवून काढी. त्याने खडाव उचलून आनंदीच्या दिशेने जोराने फेकली आणि म्हणाला—ज्याच्या जिवावर एवढ्या गुर्मीत आहात, त्यालाही पाहून घेईन आणि तुम्हालाही! आनंदीने हाताने खडाव अडवली; डोके वाचले, पण बोटाला चांगलाच मार लागला. रागाने वाऱ्यावर हलणाऱ्या पानासारखी थरथर कापत ती आपल्या खोलीत येऊन उभी राहिली. बाईचे बळ आणि धैर्य, मान आणि मर्यादा—सगळे पतीपुरतेच. तिला आपल्या पतीच्याच बळाचा आणि पुरुषार्थाचा अभिमान असतो. आनंदी अपमानाचा कडू घोट गिळून गप्प राहिली.
मोठ्या घरची लेक
(३) श्रीकंठसिंह दर शनिवारी घरी येत. ही घटना गुरुवारी घडली होती. दोन दिवस आनंदी कोपघरात राहिली. ना काही खाल्ले, ना प्यायले; त्यांची वाट पाहत राहिली. अखेर शनिवारी ते नेमाप्रमाणे संध्याकाळी घरी आले आणि बाहेरच बसून इकडच्या-तिकडच्या गप्पा, थोड्याशा देशकालाच्या बातम्या, थोडी नव्या खटल्यांची वगैरे चर्चा करू लागले. हे बोलणे रात्री दहा वाजेपर्यंत चालले. गावातल्या सभ्य गृहस्थांना या गोष्टींत असा आनंद मिळे, की त्यांना खाण्यापिण्याचीही शुद्ध राहत नसे. श्रीकंठांना त्यांच्यातून सुटका करून घेणे कठीण होऊन जाई. हे दोन-तीन तास आनंदीने मोठ्या कष्टाने काढले. कशीबशी जेवणाची वेळ झाली. पंचायत उठली. एकांत झाला, तेव्हा लालबिहारी म्हणाला—भैया, तुम्ही जरा भाभींना समजावून सांगा, की तोंड सांभाळून बोलत जावं; नाही तर एक दिवस अनर्थ घडेल. बेनीमाधवसिंहांनी मुलाची बाजू घेतली—हो, सुना-लेकींनी पुरुषांच्या तोंडाला तोंड द्यावं, हा स्वभाव काही चांगला नव्हे. लालबिहारी—त्या मोठ्या घरची लेक असतील, तर आम्हीही काही कुर्मी-कहार नाही. श्रीकंठांनी काळजीच्या स्वरात विचारले—पण झालं तरी काय? लालबिहारी म्हणाला—काहीसुद्धा नाही; उगाच आपल्या आपणच भांडायला उठल्या. माहेरापुढे आम्हा लोकांना काही किंमतच देत नाहीत. श्रीकंठ जेवणखाण आटोपून आनंदीकडे गेले. ती धुमसत बसली होती. हे महाशयही जरा तापलेलेच होते. आनंदीने विचारले—मन तर प्रसन्न आहे ना? श्रीकंठ म्हणाले—अगदी प्रसन्न आहे; पण तू हल्ली घरात हा काय धिंगाणा मांडला आहेस? आनंदीच्या कपाळाला आठ्या पडल्या; चिडचिडीने अंगाची लाही लाही झाली. ती म्हणाली—ज्याने तुमच्यापाशी ही आग लावली, तो सापडला तर त्याचं तोंड भाजून काढीन.
मोठ्या घरची लेक
श्रीकंठ—एवढी तापतेस कशाला? काय झालं ते तर सांग. आनंदी—काय सांगू, माझ्या नशिबाचे फेरे! नाही तर ज्याला शिपायाची नोकरी करायचीही अक्कल नाही, असलं एक गावंढळ पोरटं मला खडावेनं मारून असं ताठ्यात मिरवलं नसतं. श्रीकंठ—सगळं काय ते स्पष्ट सांग, तेव्हा कळेल. मला तर काहीच पत्ता नाही. आनंदी—परवा तुमच्या लाडक्या भावानं मला मटण शिजवायला सांगितलं. मडक्यात तूप पावशेरापेक्षा जास्त नव्हतं. ते सगळं मी मटणात घातलं. जेवायला बसला, तेव्हा म्हणू लागला—डाळीत तूप का नाही? बस्स, यावरूनच माझ्या माहेराला बरं-वाईट बोलू लागला—मला राहवलं नाही. मी म्हटलं, तिकडे एवढं तूप तर न्हावी-कहार फस्त करतात, आणि कुणाला पत्तासुद्धा लागत नाही. बस्स, एवढ्याशा गोष्टीवरून या अन्यायी माणसानं माझ्यावर खडाव फेकून मारली. हातानं अडवली नसती, तर डोकं फुटलं असतं. त्यालाच विचारा, मी जे सांगितलं ते खरं आहे की खोटं. श्रीकंठांचे डोळे लाल झाले. ते म्हणाले—इथवर मजल गेली! या पोराची एवढी हिंमत! बायकांच्या स्वभावाप्रमाणे आनंदी रडू लागली; कारण बायकांचे अश्रू पापण्यांवरच असतात. श्रीकंठ मोठे धीराचे आणि शांत पुरुष होते. त्यांना क्वचितच कधी राग येई; पण बायकांचे अश्रू पुरुषांच्या क्रोधाग्नीवर तेलाचे काम करतात. रात्रभर ते कूस बदलत राहिले. मनाच्या उलघालीमुळे त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी वडिलांकडे जाऊन ते म्हणाले—दादा, आता या घरात माझा निभाव लागणार नाही. असल्या बंडखोर गोष्टी बोलल्याबद्दल श्रीकंठांनी कितीतरी वेळा आपल्या कित्येक मित्रांना धारेवर धरले होते; पण दुर्दैव असे, की आज त्याच गोष्टी त्यांना स्वतःच्या तोंडाने बोलाव्या लागल्या! दुसऱ्यांना उपदेश करणे किती सोपे असते!
मोठ्या घरची लेक
बेनीमाधवसिंह घाबरून म्हणाले—का रे? श्रीकंठ—कारण मलाही माझ्या मानमर्यादेची थोडीफार चाड आहे. तुमच्या घरात आता अन्यायाचे आणि हटवादीपणाचे थैमान माजले आहे. ज्यांनी वडीलधाऱ्यांचा आदर राखायचा, ते त्यांच्या डोक्यावर बसतात. मी पडलो दुसऱ्याचा नोकर, घरी नसतो; इथे माझ्या पाठीमागे बायकांवर खडावांचा आणि जोड्यांचा वर्षाव होतो. कडू बोलण्याचे एक वेळ काही नाही; कुणी एकाच्या दोन ऐकवल्या, तरी इथवर मी सहन करू शकतो; पण माझ्यावर लाथा-बुक्क्या पडाव्यात आणि मी ब्रसुद्धा काढू नये, हे कदापि होणार नाही. बेनीमाधवसिंहांना काही उत्तर देता आले नाही. श्रीकंठ नेहमीच त्यांचा आदर करीत. त्यांचा हा अवतार पाहून म्हातारे ठाकूर अवाक झाले. एवढेच म्हणाले—बाळ, तू शहाणा असून असं बोलतोस? बायका अशाच घराचा नाश करतात; त्यांना फार डोक्यावर चढवणं बरं नव्हे. श्रीकंठ—एवढं मला कळतं; तुमच्या आशीर्वादानं मी इतका मूर्ख नाही. तुम्हाला ठाऊकच आहे, की माझ्याच समजावण्यानं याच गावातली कित्येक घरं सावरली; पण जिच्या मानमर्यादेला देवाच्या दरबारात मी जबाबदार आहे, तिच्याशी असला घोर अन्याय आणि पशूसारखी वागणूक मला सहन होणार नाही. खरं सांगतो, मी लालबिहारीला काही दंड करीत नाही, हेच काय कमी आहे! आता बेनीमाधवसिंहही तापले. असले बोलणे त्यांना आणखी ऐकवेना. ते म्हणाले—लालबिहारी तुझा भाऊ आहे. त्याच्या हातून कधी चूक-भूल झाली, तर त्याचे कान धर. पण... श्रीकंठ—लालबिहारीला मी आता माझा भाऊ समजत नाही. बेनीमाधवसिंह—बायकोपायी? श्रीकंठ—नाही; त्याच्या क्रौर्यामुळे आणि अविचारामुळे.
मोठ्या घरची लेक
दोघेही काही वेळ गप्प राहिले. ठाकूरसाहेबांना मुलाचा राग शांत करायचा होता; पण लालबिहारीने काही गैर केले आहे, हे मात्र त्यांना कबूल करायचे नव्हते. एवढ्यात गावातली आणखी कित्येक सभ्य मंडळी हुक्का-चिलमीच्या निमित्ताने तिथे येऊन बसली. श्रीकंठ बायकोपायी बापाशी भांडायला उठले आहेत, हे कानी आले तेव्हा कित्येक बायकांना मोठा हर्ष झाला. दोन्ही पक्षांची मधुर वचने ऐकायला त्यांचे जीव तळमळू लागले. गावात अशी काही कुटिल माणसेही होती, जी या घराण्याच्या सरळ, नीतीच्या वाटचालीवर मनातल्या मनात जळत असत. ती म्हणत—श्रीकंठ बापाला दबून असतो, म्हणून तो भित्रा आहे. त्याने विद्या शिकली, म्हणून तो पुस्तकांतला किडा आहे. बेनीमाधवसिंह त्याच्या सल्ल्याशिवाय काही करीत नाहीत, हा त्यांचा मूर्खपणा. या महाभागांच्या सदिच्छा आज पूर्ण होताना दिसत होत्या. कोणी हुक्का ओढायच्या निमित्ताने, तर कोणी साऱ्याची पावती दाखवायच्या निमित्ताने येऊन बसला. बेनीमाधवसिंह जुन्या पिढीतले होते. त्यांनी हे भाव ओळखले. काहीही झाले तरी या द्रोह्यांना टाळ्या पिटायची संधी द्यायची नाही, असा त्यांनी निश्चय केला. तत्काळ ते मृदू शब्दांत म्हणाले—बाळ, मी काही तुझ्या शब्दाबाहेर नाही. तुझ्या मनाला येईल ते कर; आता पोराच्या हातून अपराध घडला खरा. इलाहाबादच्या त्या अननुभवी, चिडलेल्या ग्रॅज्युएटला हे उमगले नाही. डिबेटिंग क्लबमध्ये आपला मुद्दा लावून धरायची त्याला सवय होती; असल्या डावपेचांची त्याला काय खबर? बापाने कोणत्या हेतूने बोलणे फिरवले होते, ते त्याच्या लक्षात आले नाही. तो म्हणाला—लालबिहारीबरोबर मी आता या घरात राहू शकत नाही. बेनीमाधव—बाळ, शहाणी माणसे मूर्खांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. तो अजाण पोर आहे. त्याच्या हातून जी काही चूक झाली, ती तू थोरला म्हणून माफ कर.
मोठ्या घरची लेक
श्रीकंठ—त्याचा हा दुष्टपणा मी कदापि सहन करणार नाही. एक तर तो तरी या घरात राहील, नाही तर मी. तुम्हाला तो अधिक प्रिय असेल, तर मला निरोप द्या; माझा भार मी स्वतः सांभाळीन. मला ठेवून घ्यायचं असेल, तर त्याला सांगा, त्याला हवं तिकडे त्यानं जावं. बस्स, हा माझा अखेरचा निर्णय आहे. लालबिहारीसिंह दाराच्या चौकटीशी गुपचूप उभा राहून थोरल्या भावाचे बोलणे ऐकत होता. तो त्यांचा फार आदर करी. श्रीकंठांच्या समोर खाटेवर बसावे, हुक्का ओढावा किंवा पान खावे, एवढी हिंमत त्याला कधी झाली नव्हती. बापाचाही तो इतका मान ठेवीत नसे. श्रीकंठांचेही त्याच्यावर मनापासून प्रेम होते. आठवते तेव्हापासून त्यांनी त्याला कधी दटावलेसुद्धा नव्हते. ते इलाहाबादहून येत, तेव्हा त्याच्यासाठी काही ना काही वस्तू हटकून आणीत. मुद्गलांची जोडी त्यांनीच त्याला करवून दिली होती. मागच्या वर्षी नागपंचमीच्या दिवशी कुस्तीच्या फडात त्याने आपल्याहून दीडपट तगड्या जवानाला चीत केले, तेव्हा त्यांनी हरखून आखाड्यातच जाऊन त्याला मिठी मारली होती, पाच रुपयांचे पैसे उधळले होते. अशा भावाच्या तोंडून आज असे काळीज चिरणारे बोलणे ऐकून लालबिहारीला फार खंत वाटली. तो हमसाहमशी रडू लागला. आपल्या करणीचा त्याला पश्चात्ताप होत होता, यात शंका नाही. भाऊ यायच्या आदल्या दिवसापासूनच त्याची छाती धडधडत होती—बघू, भैया काय म्हणतात. मी त्यांच्यासमोर कसा जाऊ, त्यांच्याशी कसा बोलू, माझे डोळे त्यांच्यासमोर वर कसे होणार? त्याला वाटले होते, भैया मला बोलावून समजावून सांगतील. या आशेच्या उलट आज त्याला ते निर्दयतेचा पुतळा झालेले दिसले. तो मूर्ख होता; पण त्याचे मन सांगत होते, भैया माझ्यावर अन्याय करीत आहेत.
मोठ्या घरची लेक
श्रीकंठांनी त्याला एकट्याला बोलावून दोन-चार कडक शब्द सुनावले असते, एवढेच नव्हे, दोन-चार थपडाही लगावल्या असत्या, तरी बहुधा त्याला एवढे दुःख झाले नसते; पण भावाचे हे म्हणणे, की आता मला याचे तोंडसुद्धा पाहायचे नाही, लालबिहारीला सोसवले नाही. तो रडतच घरात आला. खोलीत जाऊन त्याने कपडे घातले, डोळे पुसले, तो रडत होता असे कुणाला वाटू नये म्हणून. मग आनंदीच्या दाराशी येऊन तो म्हणाला—भाभी, भैयांनी ठरवलंय, की ते माझ्याबरोबर या घरात राहणार नाहीत. त्यांना आता माझं तोंड पाहायचं नाही; म्हणून मी आता जातो, त्यांना पुन्हा तोंड दाखवणार नाही. माझ्या हातून जो काही अपराध घडला, त्याची मला क्षमा करा. हे बोलता बोलता लालबिहारीचा गळा दाटून आला. (४) लालबिहारीसिंह मान खाली घालून आनंदीच्या दाराशी उभा होता, त्याच वेळी श्रीकंठसिंहही डोळे लाल करून बाहेरून आले. भावाला उभा पाहताच त्यांनी तिरस्काराने डोळे फिरवले आणि बाजूने वळसा घालून निघून गेले—जणू त्याच्या सावलीपासूनही दूर पळत होते. आनंदीने लालबिहारीची तक्रार तर केली होती; पण आता ती मनातल्या मनात पस्तावत होती. ती स्वभावानेच दयाळू होती. गोष्ट एवढी वाढेल, याची तिला जराही कल्पना नव्हती. हे एवढे तापतात तरी का, म्हणून ती मनातल्या मनात नवऱ्यावर चिडली होती. त्यात ही भीतीही होतीच, की यांनी मला इलाहाबादला चल म्हटले, तर मी काय करू, कसे करू? एवढ्यात, आता मी जातो, माझ्या हातून जो काही अपराध घडला त्याची क्षमा करा, असे लालबिहारी दाराशी उभा राहून म्हणताना तिने ऐकले, आणि तिचा उरलासुरला रागही विरघळून पाणी झाला. ती रडू लागली. मनाचा मळ धुवायला डोळ्यांतल्या पाण्याहून योग्य असे दुसरे काहीच नाही. श्रीकंठांना पाहून आनंदी म्हणाली—लाला बाहेर उभे राहून खूप रडताहेत. श्रीकंठ—मग मी काय करू? आनंदी—आत बोलवा. माझ्या जिभेला आग लागो! कुठून मी हे भांडण उकरून काढलं!
मोठ्या घरची लेक
श्रीकंठ—मी बोलावणार नाही. आनंदी—पस्तावाल. त्यांना फार खंत वाटते आहे; उगाच कुठे निघून गेले तर? श्रीकंठ उठले नाहीत. एवढ्यात लालबिहारी पुन्हा म्हणाला—भाभी, भैयांना माझा नमस्कार सांगा. त्यांना माझं तोंड पाहायचं नाही; म्हणून मीही माझं तोंड त्यांना दाखवणार नाही. एवढे बोलून लालबिहारी माघारी वळला आणि झपझप दरवाजाकडे निघाला. अखेर आनंदी खोलीतून बाहेर आली आणि तिने त्याचा हात धरला. लालबिहारीने मागे वळून पाहिले आणि डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाला—मला जाऊ द्या. आनंदी—कुठे चाललात? लालबिहारी—जिथे कुणी माझं तोंड पाहणार नाही तिथे. आनंदी—मी जाऊ देणार नाही. लालबिहारी—मी तुम्हा लोकांसोबत राहायच्या लायकीचा नाही. आनंदी—तुम्हाला माझी शपथ आहे, आता एक पाऊलसुद्धा पुढे टाकू नका. लालबिहारी—भैयांच्या मनातून माझ्याविषयीचा राग निघून गेला आहे, हे जोवर मला कळत नाही, तोवर मी या घरात कदापि राहणार नाही. आनंदी—मी देवाला साक्ष ठेवून सांगते, तुमच्याविषयी माझ्या मनात जराही किल्मिष नाही. आता श्रीकंठांचेही हृदय पाझरले. त्यांनी बाहेर येऊन लालबिहारीला मिठी मारली. दोघे भाऊ हमसाहमशी रडले. लालबिहारी हुंदके देत म्हणाला—भैया, यापुढे कधी म्हणू नका, की तुझं तोंड पाहणार नाही. याखेरीज तुम्ही जो दंड कराल, तो मी आनंदाने भोगीन. श्रीकंठ कापऱ्या स्वरात म्हणाले—लल्लू, या गोष्टी पार विसरून जा. देवाच्या मनात असेल, तर पुन्हा अशी वेळ येणार नाही. बेनीमाधवसिंह बाहेरून येत होते. दोघा भावांना एकमेकांच्या गळ्यात गळा घालून भेटताना पाहून ते आनंदाने पुलकित झाले. त्यांच्या तोंडून शब्द निघाले—मोठ्या घरच्या लेकी अशाच असतात. बिघडत चाललेले काम सावरून घेतात. गावात ज्याने ज्याने ही हकीकत ऐकली, त्याने त्याने याच शब्दांत आनंदीच्या उदारपणाची वाहवा केली—'मोठ्या घरच्या लेकी अशाच असतात.'