मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
मुक्तीचा मार्ग
शिपायाला आपल्या लाल पगडीचा, सुंदरीला आपल्या दागिन्यांचा आणि वैद्याला आपल्यासमोर बसलेल्या रोग्यांचा जो गर्व वाटतो, तोच शेतकऱ्याला आपली शेते डोलताना पाहून वाटतो. झींगुर आपल्या उसाच्या शेताकडे पाहत असे, तेव्हा त्याला जणू नशा चढे! तीन बिघे ऊस होता. त्यातून सहाशे रुपये तर सहज मिळतील. आणि देवाच्या कृपेने कुठे भाव चढला, तर मग विचारायलाच नको. दोन्ही बैल म्हातारे झाले आहेत. या खेपेला बटेसरच्या जत्रेतून नवी जोडी आणायची. कुठे आणखी दोन बिघे शेत मिळाले, तर तेही नावावर लिहून घ्यायचे. पैशाची कसली काळजी! वाणी आतापासूनच त्याची हांजी-हांजी करू लागले होते. गावात असा एकही माणूस नव्हता, ज्याच्याशी त्याचे भांडण झाले नसेल. आपल्यापुढे तो कुणालाच काही समजत नसे. एके दिवशी संध्याकाळी तो आपल्या मुलाला कडेवर घेऊन वाटाण्याच्या शेंगा तोडत होता. तेवढ्यात मेंढ्यांचा एक कळप आपल्याकडे येताना त्याला दिसला. तो मनाशी म्हणू लागला—इकडून मेंढ्या नेण्याची वाट नव्हती. शेताच्या बांधावरून कळप जाऊ शकला नसता का? मेंढ्या इकडून आणायची काय गरज? या शेत तुडवतील, चरतील. याची भरपाई कोण देणार? बुद्धू गडरिया दिसतोय. पठ्ठ्याला गर्व चढलाय; म्हणूनच तर शेतांमधून मेंढ्या घेऊन चाललाय. जरा याचा उद्धटपणा तर पाहा. मी उभा आहे हे दिसतंय, तरी मेंढ्या माघारी वळवत नाही. याने तरी कधी माझी भीड ठेवली आहे, म्हणून मी याची मुर्वत ठेवावी? आत्ता एखादा मेंढा विकत मागितला, तर पाच रुपयेच सांगेल. साऱ्या जगात चार-चार रुपयांना घोंगडी मिळते; पण हा पाच रुपयांच्या खाली बोलतच नाही. इतक्यात मेंढ्या शेताजवळ आल्या. झींगुर ओरडून म्हणाला—अरे, या मेंढ्या कुठं घेऊन येताय? काही सुचतं की नाही?
मुक्तीचा मार्ग
बुद्धू नम्रपणे म्हणाला—महतो, बांधावरून निघून जातील. वळसा घालून गेलो, तर कोसभराचा फेरा पडेल. झींगुर—मग तुमचा फेरा वाचवायला मी माझं शेत का तुडवू देऊ? बांधावरूनच न्यायच्या होत्या, तर दुसऱ्यांच्या शेतांच्या बांधावरून का नाही नेल्या? मला काय कुणी चुहड-चमार समजलात? की पैशाचा माज चढलाय? माघारी वळवा त्यांना! बुद्धू—महतो, आजच्या दिवस जाऊ द्या. पुन्हा कधी इकडून आलो, तर हवी ती शिक्षा करा. झींगुर—सांगितलं ना, माघारी वळवा त्यांना. एक मेंढी जरी बांधावर आली, तरी समजा, तुमची खैर नाही. बुद्धू—महतो, तुमची एक वेल जरी कुठल्या मेंढीच्या पायाखाली आली, तर मला समोर बसवून शंभर शिव्या द्या. बुद्धू बोलत तर मोठ्या नम्रपणे होता; पण माघारी फिरण्यात त्याला आपला कमीपणा वाटत होता. त्याने मनात विचार केला—अशा फुटकळ धमक्यांना भिऊन मेंढ्या माघारी वळवू लागलो, तर झालं माझं मेंढ्या चारणं! आज माघारी फिरलो, तर उद्या निघायला वाटच मिळणार नाही. सगळेच रुबाब गाजवू लागतील. बुद्धूही काही लेचापेचा माणूस नव्हता. त्याच्याकडे बारा कोडी मेंढ्या होत्या. त्या शेतात बसवण्यासाठी त्याला दर रात्री कोडीमागे आठ आणे मजुरी मिळे. शिवाय तो दूध विकत असे; लोकरीच्या घोंगड्या विणत असे. तो विचार करू लागला—एवढे तापताहेत, माझं काय वाकडं करणार आहेत? मी काही यांचा मिंधा नाही. मेंढ्यांनी हिरवीगार पाने पाहिली, तशा त्या अधीर झाल्या. शेतात घुसल्या. बुद्धू त्यांना काठीने मार-मारून शेताच्या कडेवरून हटवीत होता, आणि त्या इकडून-तिकडून निसटून शेतात शिरत होत्या. झींगुर लालबुंद होऊन म्हणाला—तुम्ही माझ्याशी मग्रुरी दाखवायला निघालात, तर तुमची सगळी मग्रुरी जिरवून टाकीन.
मुक्तीचा मार्ग
बुद्धू—तुम्हाला पाहून बिचकताहेत. तुम्ही बाजूला व्हा, म्हणजे मी सगळ्यांना बाहेर काढून नेतो. झींगुरने मुलाला कडेवरून खाली उतरवले आणि आपली काठी सावरून तो मेंढ्यांवर तुटून पडला. धोबीसुद्धा आपल्या गाढवाला इतक्या निर्दयपणे बडवीत नसेल. कुठल्या मेंढीचा पाय मोडला, कुठल्या मेंढीची कंबर. सगळ्यांनी बें-बें करून कल्लोळ सुरू केला. बुद्धू गप्प उभा राहून आपल्या सेनेचा विध्वंस आपल्या डोळ्यांनी पाहत राहिला. तो ना मेंढ्यांना हाकत होता, ना झींगुरला काही बोलत होता. बस, उभा राहून नुसता तमाशा पाहत राहिला. दोन मिनिटांत झींगुरने आपल्या अमानुष पराक्रमाने ही सेना पिटाळून लावली. मेषदलाचा संहार करून तो विजयाच्या गर्वाने म्हणाला—आता सरळ निघून जा. पुन्हा इकडून यायचं नावसुद्धा काढू नका. बुद्धू जखमी मेंढ्यांकडे पाहत म्हणाला—झींगुर, तुम्ही हे बरं केलं नाही. पस्तावाल! (२) केळ कापणेसुद्धा इतके सोपे नाही, जितके शेतकऱ्यावर सूड उगवणे. त्याची सारी कमाई शेतात असते, नाहीतर खळ्यात. कितीतरी दैवी आणि भौतिक आपत्तींतून पार पडल्यावर कुठे धान्य घरात येते; आणि कुठे या आपत्तींशी वैरानेही हातमिळवणी केली, तर बिचारा शेतकरी कुठलाच राहत नाही. झींगुरने घरी येऊन इतरांना या संग्रामाची हकीकत सांगितली, तेव्हा लोक समजावू लागले—झींगुर, तुम्ही मोठा अनर्थ केलात. सगळं ठाऊक असून न कळल्यासारखं करता! बुद्धू किती भांडखोर माणूस आहे, ठाऊक नाही का? अजूनही काही बिघडलेलं नाही. जाऊन त्याची समजूत काढा. नाहीतर तुमच्याबरोबर साऱ्या गावावर संकट येईल. झींगुरला गोष्ट पटली. तो पस्तावू लागला, की मी उगाच कुठल्या कुठे त्याला अडवले. मेंढ्यांनी थोडेबहुत चरलेच असते, तर मी काय देशोधडीला लागलो असतो?
मुक्तीचा मार्ग
खरे तर आम्हा शेतकऱ्यांचे भले दबून राहण्यातच आहे. आम्ही मान ताठ करून चाललेले देवालाही आवडत नाही. बुद्धूच्या घरी जायला मन तर तयार नव्हते; पण इतरांच्या आग्रहापुढे नाइलाज होऊन तो निघाला. मार्गशीर्ष महिना होता, धुके पडत होते. चोहीकडे अंधार दाटला होता. तो गावाबाहेर पडतो न पडतो तोच एकाएकी आपल्या उसाच्या शेताकडे आगीच्या ज्वाळा पाहून दचकला. छाती धडधडू लागली. शेतात आग लागली होती. तो बेभान धावत सुटला. मनोमन देवाला विनवीत होता, की माझ्या शेतात नसो; पण जसजसा तो जवळ पोचत होता, तसतसा हा आशेचा भ्रम विरत चालला होता. ज्या अनर्थाला टाळण्यासाठी तो घरून निघाला होता, तो घडलाच. हत्याऱ्याने आग लावलीच, आणि माझ्यापायी साऱ्या गावाची राखरांगोळी केली. त्याला असे वाटत होते, की ते शेत आज फार जवळ आले आहे, जणू मधल्या पडीक शेतांचे अस्तित्वच उरले नाही. शेवटी तो शेतावर पोचला, तेव्हा आगीने रौद्र रूप धारण केले होते. झींगुरने 'हाय-हाय' करून आकांत मांडला. गावचे लोक धावत आले, आणि शेतांतून तुरीची रोपे उपटून-उपटून आग झोडपू लागले. अग्नी आणि मानव यांच्या संग्रामाचे भीषण दृश्य उभे राहिले. एक प्रहरभर हाहाकार माजला होता. कधी एक पक्ष वरचढ होई, कधी दुसरा. अग्निपक्षाचे योद्धे मरून-मरून पुन्हा जिवंत होत, आणि दुप्पट जोराने, रणमत्त होऊन, शस्त्रांचे वार करू लागत. मानवपक्षात ज्या योद्ध्याची कीर्ती सर्वांत उज्ज्वल होती, तो बुद्धू होता. बुद्धू कमरेपर्यंत धोतर खोचून, प्राणांची बाजी लावून, आगीच्या लोळात उडी घेई, आणि शत्रूंना पराभूत करून, थोडक्यात बचावत, बाहेर येई. शेवटी मानवदलाचा विजय झाला; पण असा विजय, की ज्यावर पराभवालाही हसू यावे. साऱ्या गावाचा ऊस जळून खाक झाला, आणि उसाबरोबर साऱ्या आशा-आकांक्षांचीही राख झाली.
मुक्तीचा मार्ग
(३) आग कोणी लावली, हे उघड गुपित होते; पण बोलायची कुणाचीच छाती नव्हती. पुरावा काही नाही. पुराव्याविना तर्काला किंमत ती काय? झींगुरला घराबाहेर पडणे मुश्कील झाले. जिकडे जाई, तिकडे टोमणे ऐकावे लागत. लोक तोंडावर म्हणत—ही आग तुम्हीच लावायला लावली. तुम्हीच आमचा सर्वनाश केला. तुमचेच पाय गर्वाने जमिनीवर ठरत नव्हते. स्वतः तर बुडालात, सोबत साऱ्या गावाला बुडवलंत. बुद्धूची कुरापत काढली नसती, तर आज हा दिवस का पाहावा लागला असता? झींगुरला आपल्या बरबादीचे इतके दुःख नव्हते, जितके या लागट बोलण्याचे. तो दिवसभर घरात बसून राहू लागला. पौष महिना आला. जिथे रात्रभर चरक चालत, गुळाचा दरवळ पसरलेला असे, भट्ट्या धगधगत असत, आणि लोक भट्ट्यांसमोर बसून हुक्का ओढत, तिथे आता सन्नाटा पसरला होता. थंडीमुळे लोक संध्याकाळपासूनच दारे लावून पडून राहत, आणि झींगुरला शिव्याशाप देत. माघ तर याहूनही कष्टाचा होता. ऊस केवळ धन देणारा नव्हे, शेतकऱ्यांचा प्राणदाताही आहे. त्याच्याच आधाराने शेतकऱ्यांचा हिवाळा पार पडतो. गरम रस पितात, उसाच्या पाचटाची शेकोटी करून शेकतात, त्याचे वाढे जनावरांना खाऊ घालतात. रात्री भट्ट्यांच्या राखेत झोपणारी गावातली सगळी कुत्री थंडीने मेली. कितीतरी जनावरे चाऱ्याअभावी मरून गेली. थंडीचा कहर झाला, आणि सारा गाव खोकल्या-तापाने आजारी पडला. आणि ही सारी आपत्ती झींगुरची करणी होती—अभाग्या, हत्याऱ्या झींगुरची!
मुक्तीचा मार्ग
झींगुरने विचार करता करता निश्चय केला, की बुद्धूची दशाही आपल्यासारखीच करीन. त्याच्यामुळे माझा सर्वनाश झाला, आणि तो सुखाने लोळतोय! मीही त्याचा सर्वनाश करीन! ज्या दिवशी या घातक कलहाचे बीज पेरले गेले, त्याच दिवसापासून बुद्धूने इकडे येणे सोडले होते. झींगुरने त्याच्याशी घसट वाढवायला सुरुवात केली. त्याला बुद्धूला हे दाखवायचे होते, की तुमच्यावर मला मुळीच संशय नाही. एके दिवशी तो घोंगडी घ्यायच्या निमित्ताने गेला, मग दूध घ्यायच्या निमित्ताने. बुद्धू त्याचा भरपूर आदरसत्कार करी. चिलीम तर माणूस शत्रूलाही पाजतो; बुद्धू त्याला दूध आणि सरबत पाजल्याशिवाय येऊ देत नसे. झींगुर हल्ली ताग गुंडाळण्याच्या एका गिरणीत मजुरीला जात असे. बहुधा कित्येक दिवसांची मजुरी एकदम मिळे. बुद्धूच्याच तत्परतेमुळे झींगुरचा रोजचा खर्च चालत असे. म्हणून झींगुरने चांगलीच घसट वाढवली. एके दिवशी बुद्धूने विचारले—काय झींगुर, तुमचा ऊस जाळणारा तुम्हाला सापडला, तर काय कराल? खरं सांगा! झींगुर गंभीरपणे म्हणाला—मी त्याला म्हणेन, भैया, तुम्ही जे काही केलंत, फार चांगलं केलंत. माझा गर्व उतरवलात; मला माणूस बनवलंत. बुद्धू—मी तुमच्या जागी असतो, तर त्याचं घर जाळल्याशिवाय राहिलो नसतो. झींगुर—चार दिवसांच्या जिंदगीत वैर वाढवून काय फायदा? मी तर बरबाद झालोच, आता त्याला बरबाद करून काय मिळवणार? बुद्धू—बस, हाच तर माणसाचा धर्म; पण भाऊ, रागाच्या आहारी गेलं की बुद्धी उलटी फिरते.
मुक्तीचा मार्ग
(४) फाल्गुन महिना होता. शेतकरी ऊस लावण्यासाठी शेते तयार करीत होते. बुद्धूचा भाव चढला होता. मेंढ्यांसाठी लोकांची झुंबड उडाली होती. दोन-चार माणसे रोज दारात उभी राहून त्याची खुशामत करीत. बुद्धू कुणाशी सरळ तोंडाने बोलत नसे. मेंढ्या बसवण्याचे भाडे त्याने दुप्पट केले होते. कुणी हरकत घेतली, तर तो बेधडक सांगे—मग भैया, मेंढ्या काही मी तुमच्या गळ्यात बांधत नाही. मनात नसेल तर नका ठेवू; पण मी जे सांगितलं आहे, त्यातून एक कवडीही कमी होणार नाही. गरज होती, म्हणून या तुसडेपणानंतरही लोक त्याला घेरूनच राहत, जणू तीर्थावरचे पंडे एखाद्या यात्रेकरूच्या मागे लागलेले असावेत. लक्ष्मीचा आकार काही फार मोठा नाही, आणि तोही वेळप्रसंगानुसार लहानमोठा होत असतो. इतका, की कधी ती आपला विराट आकार आवरून कागदावरच्या चार अक्षरांत लपवते. कधी कधी तर माणसाच्या जिभेवर जाऊन बसते; आकाराचा लोपच होतो; पण तिला राहायला मात्र खूप जागा लागते. ती आली, आणि घर वाढू लागले. लहान घरात तिला राहवत नाही. बुद्धूचे घरही वाढू लागले. दारासमोर ओसरी घातली गेली, दोनच्या जागी सहा खोल्या बांधल्या गेल्या. म्हणा ना, घर नव्याने उभे राहू लागले. कुणा शेतकऱ्याकडून लाकूड मागितले, कुणाकडून कौलांची भट्टी लावायला गोवऱ्या, कुणाकडून बांबू तर कुणाकडून बोरू. भिंती उभारण्याची मजुरी मात्र द्यावी लागली. तीही रोख नव्हे, मेंढ्यांच्या कोकरांच्या रूपात. हा लक्ष्मीचा प्रताप. सारे काम वेठीत झाले. फुकटात चांगले ऐसपैस घर तयार झाले. गृहप्रवेशाच्या समारंभाची तयारी सुरू झाली.
मुक्तीचा मार्ग
इकडे झींगुर दिवसभर मजुरी करी, तेव्हा कुठे अर्धपोटी अन्न मिळे. बुद्धूच्या घरी सोन्याचा पाऊस पडत होता. झींगुर जळफळत होता, तर त्यात त्याचे काय चुकले? हा अन्याय कुणाला सहन होईल? एके दिवशी तो फेरफटका मारीत चमारांच्या वस्तीकडे गेला. त्याने हरिहरला हाक मारली. हरिहरने येऊन राम-राम केला, आणि चिलीम भरली. दोघे ओढू लागले. चमारांचा हा म्होरक्या मोठा दुष्ट माणूस होता. सगळे शेतकरी त्याला थरथर कापत. झींगुर चिलीम ओढता ओढता म्हणाला—हल्ली होळीची फाग-बीग गाणी होत नाहीत का? ऐकू येत नाहीत. हरिहर—कसली फाग? पोटाच्या धंद्यातून सवडच मिळत नाही. सांगा, हल्ली तुमचं कसं चाललंय? झींगुर—कसलं चाललंय! नाक कापलेल्याचं जगणं, तेही हलाखीचं! दिवसभर गिरणीत मजुरी करतो, तेव्हा चूल पेटते. चांदी तर हल्ली बुद्धूची आहे. ठेवायला जागा पुरत नाही. नवं घर बांधलं, आणखी मेंढ्या घेतल्या. आता गृहप्रवेशाची धामधूम आहे. सातही गावांत सुपारी देऊन आमंत्रणं जाणार. हरिहर—लक्ष्मीमाय आली की माणसाच्या डोळ्यांत नम्रता येते; पण त्याच्याकडे बघा, जमिनीवर पाय ठेवत नाही. बोलतो तेही ताठ्यात बोलतो. झींगुर—का नाही ताठ्यात बोलणार, या गावात त्याच्या तोडीचा आहे कोण? पण गड्या, हा अन्याय तर बघवत नाही. देवानं दिलं, तर मान खाली घालून चालावं. हे नव्हे, की आपल्या बरोबरीचं कुणाला समजूच नये. त्याच्या बढाया ऐकल्या की अंगाची लाही होते. कालचा उपटसुंभ आज शेठ झाला. निघालाय आमच्याशीच ऐट मारायला! काल-परवापर्यंत लंगोटी लावून शेतांत कावळे हाकत होता, आज त्याचा दिवा थेट आभाळात जळतोय.
मुक्तीचा मार्ग
हरिहर—सांगाल, तर काही करामत करू? झींगुर—काय करणार? याच भीतीनं तर तो गाय-म्हैस पाळत नाही. हरिहर—मेंढ्या तर आहेत? झींगुर—बगळा मारून हाती पिसंच येणार! हरिहर—मग तुम्हीच विचार करा. झींगुर—अशी युक्ती काढा, की पुन्हा कधी उभाच राहू नये. यानंतर कुजबुजत बोलणी सुरू झाली. हे एक गूढच आहे, की चांगुलपणात जितका द्वेष असतो, तितकेच वाईटपणात प्रेम. विद्वान विद्वानाला पाहून, साधू साधूला पाहून आणि कवी कवीला पाहून जळतो. एकाला दुसऱ्याचे तोंडही पाहायचे नसते; पण जुगारी जुगाऱ्याला पाहून, दारुडा दारुड्याला पाहून, चोर चोराला पाहून सहानुभूती दाखवतो, मदत करतो. एखादा पंडित अंधारात ठेच लागून पडला, तर दुसरे पंडितजी त्यांना उठवण्याऐवजी आणखी दोन लाथा घालतील, म्हणजे ते पुन्हा उठूच शकणार नाहीत; पण एका चोरावर संकट आलेले पाहून दुसरा चोर त्याला आडोसा देतो. वाईटपणाचा सगळेच तिरस्कार करतात; म्हणून वाइटांमध्ये परस्पर प्रेम असते. चांगुलपणाची सारे जग स्तुती करते; म्हणून चांगल्यांमध्ये वैर असते. चोराला मारून चोराला काय मिळणार? तिरस्कार. विद्वानाचा अपमान करून विद्वानाला काय मिळणार? कीर्ती. झींगुर आणि हरिहर यांची मसलत ठरली; कट रचण्याची पद्धत ठरवण्यात आली. त्याचे स्वरूप, वेळ आणि क्रम निश्चित झाला. झींगुर निघाला, तेव्हा ताठ्यात चालला होता. मारला शत्रूला, आता जातो कुठे! (५) दुसऱ्या दिवशी झींगुर कामावर निघाला, तेव्हा आधी बुद्धूच्या घरी गेला. बुद्धूने विचारले—काय, आज गेला नाहीत की काय?
मुक्तीचा मार्ग
झींगुर—जातोच आहे. तुम्हाला हेच सांगायला आलो होतो, की माझ्या कालवडीला तुमच्या मेंढ्यांबरोबर का चरायला नेत नाही? बिचारी खुंट्याला बांधल्या बांधल्या मरायला टेकलीय. ना गवत, ना चारा. काय खाऊ घालायचं? बुद्धू—भैया, मी गाय-म्हैस ठेवत नाही. चमार कसले पक्के हत्यारे असतात, ठाऊक आहे ना. याच हरिहरनं माझ्या दोन गाई मारल्या. काय खाऊ घालतो कुणास ठाऊक. तेव्हापासून कानाला खडा लावला, की आता गाय-म्हैस पाळणार नाही; पण तुमची एकच कालवड आहे, तिचं कोण काय करणार? हवं तेव्हा आणून सोडा. असे म्हणून बुद्धू त्याला आपल्या गृहप्रवेशाचे सामान दाखवू लागला. तूप, साखर, मैदा, भाजीपाला सगळे मागवून ठेवले होते. फक्त 'सत्यनारायणाची कथा' व्हायची बाकी होती. झींगुरचे डोळे विस्फारले. अशी तयारी त्याने स्वतः कधी केली नव्हती, आणि कुणाला करताना पाहिलीही नव्हती. मजुरी करून घरी परतल्यावर त्याने सर्वांत पहिले काम केले, ते म्हणजे आपली कालवड बुद्धूच्या घरी पोचवणे. त्याच रात्री बुद्धूकडे 'सत्यनारायणाची कथा' झाली. ब्राह्मणभोजनही घातले. सारी रात्र ब्राह्मणांचे आगतस्वागत करण्यात गेली. मेंढ्यांच्या कळपात जायला सवडच मिळाली नाही. सकाळी तो जेवून उठतो न उठतो (कारण रात्रीचे जेवण सकाळी मिळाले), तोच एका माणसाने येऊन बातमी दिली—बुद्धू, तुम्ही इथं बसलाय, आणि तिकडे मेंढ्यांत कालवड मरून पडलीय. भल्या माणसा, तिचं दावं तरी सोडलं नव्हतं?
मुक्तीचा मार्ग
बुद्धूने ऐकले, आणि जणू त्याला धक्काच बसला. झींगुरही जेवून तिथेच बसला होता. म्हणाला—हाय रे माझी कालवड! चला, जरा पाहू तर. मी तर दावं लावलं नव्हतं. तिला मेंढ्यांत सोडून मी आपल्या घरी गेलो. तुम्ही हे दावं केव्हा लावलंत? बुद्धू—देवाशपथ, मी तिचं दावं डोळ्यांनीसुद्धा पाहिलं नाही. मी तर तेव्हापासून मेंढ्यांत गेलोच नाही. झींगुर—तुम्ही गेला नसता, तर दावं कोण लावणार होतं? गेला असाल, आठवत नसेल. एक ब्राह्मण—मेली तर मेंढ्यांतच ना? जग तर हेच म्हणणार, की बुद्धूच्या हलगर्जीपणाने तिचा मृत्यू झाला; दावं कुणाचंही असो. हरिहर—मी काल संध्याकाळी यांना मेंढ्यांत कालवड बांधताना पाहिलं होतं. बुद्धू—मला! हरिहर—तुम्ही नाही का खांद्यावर काठी ठेवून कालवड बांधत होता? बुद्धू—मोठा सत्यवादी आहेस तू! तू मला कालवड बांधताना पाहिलंस? हरिहर—मग माझ्यावर कशाला उखडता भाऊ? तुम्ही नसेल बांधली, तर नसेल. ब्राह्मण—याचा निर्णय करावा लागेल. गोहत्येचे प्रायश्चित्त घ्यावे लागेल. काही थट्टा-मस्करी आहे का! झींगुर—महाराज, काही जाणूनबुजून तर बांधली नाही. ब्राह्मण—त्याने काय होते? हत्या अशीच लागते; कोणी गाईला मारायला जात नाही. झींगुर—हो, गाईंना सोडणं-बांधणं म्हणजे जोखमीचंच काम! ब्राह्मण—शास्त्रांत याला महापाप म्हटले आहे. गोहत्या ब्रह्महत्येपेक्षा कमी नाही. झींगुर—हो, शेवटी गाय ती गायच. म्हणूनच तर तिचा एवढा मान. जी माता, तीच गाय; पण महाराज, चूक झाली. असं काहीतरी करा, की बिचारा थोडक्यात सुटेल.
मुक्तीचा मार्ग
बुद्धू उभा राहून ऐकत होता, की आपल्यावर नाहक हत्या लादली जात आहे. झींगुरचे कारस्थानही त्याला उमगत होते. मी लाख सांगितले, की मी कालवड बांधली नाही, तरी मानणार कोण? लोक हेच म्हणतील, की प्रायश्चित्त टाळण्यासाठी असे सांगतोय. ब्राह्मणदेवांचेही त्याला प्रायश्चित्त द्यायला लावण्यात भलेच होते. मग असा प्रसंग ते थोडेच सोडणार होते! परिणाम असा झाला, की बुद्धूला हत्या लागली. ब्राह्मणही त्याच्यावर जळत होते. उट्टे काढायची संधी मिळाली. तीन महिने भिक्षा मागण्याचा दंड दिला, मग सात तीर्थक्षेत्रांची यात्रा, त्यावर पाचशे ब्राह्मणांचे भोजन आणि पाच गाईंचे दान. बुद्धूने ऐकले, आणि त्याचे अवसानच गळाले. तो रडू लागला, तेव्हा दंड कमी करून दोन महिन्यांचा केला. याखेरीज कोणतीही सवलत मिळू शकली नाही. ना कुठे अपील, ना कुठे फिर्याद! बिचाऱ्याला हा दंड मान्य करावा लागला. (६) बुद्धूने मेंढ्या देवाच्या भरवशावर सोडल्या. मुले लहान होती. बायको एकटी काय काय करणार? तो दारोदारी जाऊन उभा राही, आणि तोंड लपवून म्हणे: 'गाय की बाछी दियो बनवास.' भिक्षा तर मिळे; पण भिक्षेबरोबर दोन-चार कठोर, अपमानास्पद शब्दही ऐकावे लागत. दिवसभरात जे काही मिळे, ते संध्याकाळी एखाद्या झाडाखाली शिजवून खाई, आणि तिथेच राही. कष्टाची त्याला पर्वा नव्हती; मेंढ्यांबरोबर दिवसभर चालणे होतेच, झाडाखाली झोपणे होतेच, जेवणही याहून काही फार चांगले मिळत नसे; पण लाज होती भीक मागण्याची. विशेषतः एखादी कजाग बाई 'पोट भरायची चांगली युक्ती शोधून काढलीय' असा टोमणा मारी, तेव्हा त्याच्या काळजाला घरे पडत; पण करणार काय?
मुक्तीचा मार्ग
दोन महिन्यांनी तो घरी परतला. केस वाढलेले होते. इतका खंगला होता, की जणू साठ वर्षांचा म्हातारा. तीर्थयात्रेसाठी पैशांची सोय करायची होती. गडरियांना कोणता सावकार कर्ज देणार? मेंढ्यांचा काय भरवसा? कधी कधी रोग पसरतो, तर रात्रभरात कळपच्या कळप साफ होतो. त्यात ज्येष्ठ महिना, जेव्हा मेंढ्यांपासून काही उत्पन्नाची आशा नसते. एक तेली तयार झाला, तोही रुपयाला दोन आणे व्याजाने. आठ महिन्यांत व्याज मुद्दलाएवढे होईल. इथे कर्ज घ्यायची हिंमत झाली नाही; तिकडे दोन महिन्यांत कितीतरी मेंढ्या चोरीला गेल्या होत्या. मुले चरायला नेत. दुसऱ्या गावचे लोक गुपचूप एक-दोन मेंढ्या एखाद्या शेतात किंवा घरात लपवून ठेवीत, आणि मागाहून मारून खात. मुले बिचारी एक तर पकडू शकत नसत, आणि पाहिले तरी भांडणार कशी? सारा गाव एक होई. एका महिन्यात तर मेंढ्या निम्म्याही उरणार नाहीत. मोठा बिकट प्रश्न होता. नाइलाजाने बुद्धूने एका खाटकाला बोलावले, आणि सगळ्या मेंढ्या त्याला विकून टाकल्या. पाचशे रुपये हाती आले. त्यातले दोनशे रुपये घेऊन तो तीर्थयात्रेला गेला. बाकीचे रुपये ब्राह्मणभोजन वगैरेसाठी ठेवून गेला. बुद्धू गेल्यावर त्याच्या घरात दोनदा घरफोडी झाली; पण एवढे बरे, की घरचे लोक जागे झाले, आणि पैसे वाचले. (७) श्रावण महिना होता. चोहीकडे हिरवळ पसरली होती. झींगुरकडे बैल नव्हते. शेते त्याने वाट्याने कसायला दिली होती. बुद्धू प्रायश्चित्तातून मोकळा झाला होता, आणि त्याबरोबरच मायेच्या पाशातूनही. ना झींगुरकडे काही होते, ना बुद्धूकडे. कोण कुणावर जळणार, आणि कशासाठी जळणार?
मुक्तीचा मार्ग
तागाची गिरणी बंद पडल्यामुळे झींगुर आता खोदकामाची मजुरी करीत असे. शहरात एक भव्य धर्मशाळा बांधली जात होती. हजारो मजूर काम करीत. झींगुरही त्यांच्यातच होता. सातव्या दिवशी मजुरीचे पैसे घेऊन तो घरी येई, आणि रात्रभर राहून सकाळी पुन्हा निघून जाई. बुद्धूही मजुरीच्या शोधात इथेच पोचला. जमादाराने पाहिले, अशक्त माणूस आहे, अवघड काम याच्याकडून होणार नाही; म्हणून गवंड्यांना गारा पुरवायला ठेवून घेतले. बुद्धू डोक्यावर घमेले घेऊन गारा आणायला गेला, तर तिथे झींगुर दिसला. 'राम-राम' झाला, झींगुरने गारा भरून दिला, बुद्धू उचलून घेऊन आला. दिवसभर दोघे गप्प आपापले काम करीत राहिले. संध्याकाळी झींगुरने विचारले—काही रांधणार ना? बुद्धू—नाहीतर खाणार काय? झींगुर—मी तर एका वेळी भाजके दाणे खाऊन घेतो. या वेळेला सातूवर भागवतो. कोण खटपट करत बसणार! बुद्धू—इकडे-तिकडे लाकडं पडली आहेत, गोळा करून आणा. पीठ मी घरूनच घेऊन आलोय. घरीच दळून घेतलं होतं. इथं तर फार महाग मिळतं. याच दगडाच्या शिळेवर पीठ मळून घेतो. तुम्ही तर माझ्या हातचं खाणार नाही, म्हणून तुम्हीच रोट्या भाजा, मी पीठ तयार करून देतो. झींगुर—तवासुद्धा नाही! बुद्धू—तवे खूप आहेत. हेच गाऱ्याचं घमेलं घासून घेतो. आग पेटली, पीठ मळले. झींगुरने कच्च्या-पक्क्या रोट्या भाजल्या. बुद्धू पाणी घेऊन आला. दोघांनी लाल तिखट आणि मिठाबरोबर रोट्या खाल्ल्या. मग चिलीम भरली. दोघेही दगडी शिळांवर आडवे झाले, आणि चिलीम ओढू लागले. बुद्धू म्हणाला—तुमच्या उसाला आग मी लावली होती. झींगुर गमतीच्या सुरात म्हणाला—ठाऊक आहे. थोड्या वेळाने झींगुर म्हणाला—कालवड मीच बांधली होती, आणि हरिहरने तिला काहीतरी खाऊ घातलं होतं. बुद्धूही तशाच सुरात म्हणाला—ठाऊक आहे. मग दोघेही झोपी गेले.