मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
नशा
ईश्वरी एका बड्या जमीनदाराचा मुलगा, आणि मी एका गरीब कारकुनाचा; अंगमेहनतीखेरीज ज्याच्यापाशी दुसरी कसलीही मालमत्ता नव्हती अशा कारकुनाचा. आम्हा दोघांत सतत वादविवाद चालत. मी जमीनदारांची निंदा करी; त्यांना हिंस्र पशू म्हणे, रक्त शोषणाऱ्या जळवा म्हणे, झाडांच्या शेंड्यावर फोफावणारे बांडगूळ म्हणे. तो जमीनदारांची बाजू घेई; पण साहजिकच त्याची बाजू जरा लंगडी पडे, कारण जमीनदारांच्या बाजूने मांडायला त्याच्यापाशी एकही मुद्दा नव्हता. सगळी माणसे सारखी नसतात, लहान-मोठे नेहमीच असत आले आहेत आणि असणारच, हे म्हणणे म्हणजे लेचापेचा युक्तिवाद होता. माणुसकीच्या किंवा नीतीच्या कोणत्याही नियमाने या व्यवस्थेचे समर्थन करणे कठीण होते. वादाच्या या गरमागरमीत मी पुष्कळदा तापत असे आणि जिव्हारी लागेल असे काहीतरी बोलून जात असे; पण ईश्वरी हरूनसुद्धा हसतच राही. त्याला तापलेला मी कधी पाहिला नाही. आपली बाजू कमकुवत आहे हे तो जाणून होता, हेच बहुधा त्याचे कारण असावे. नोकरांशी तो कधी धड तोंडाने बोलत नसे. श्रीमंतांच्या अंगी जो एक निर्दयपणा आणि उद्दामपणा असतो, त्यातला भरपूर वाटा त्यालाही मिळाला होता. नोकराने अंथरूण घालायला जरासा उशीर केला, दूध हवे त्यापेक्षा जास्त गरम किंवा गार झाले, सायकल नीट पुसली गेली नाही, की त्याचा तोल सुटे. आळस किंवा बेअदबी त्याला जराही खपत नसे; पण मित्रांशी, आणि विशेषतः माझ्याशी, त्याचे वागणे स्नेहाने आणि नम्रतेने भरलेले असे. त्याच्या जागी मी असतो तर कदाचित त्याच्यात होता तोच कठोरपणा माझ्यातही आला असता; कारण माझे लोकप्रेम तत्त्वांवर नव्हे, तर स्वतःच्या परिस्थितीवर उभे होते. पण तो माझ्या जागी असता तरी बहुधा श्रीमंतच राहिला असता; कारण तो स्वभावानेच विलासी आणि ऐश्वर्याचा भोक्ता होता.
नशा
या खेपेला दसऱ्याच्या सुट्टीत घरी जायचे नाही असे मी ठरवले. गाडीभाड्याला माझ्यापाशी पैसे नव्हते, आणि घरच्यांना त्रास द्यावा असेही मला वाटत नव्हते. मला ठाऊक आहे, ते मला जे काही देतात ते त्यांच्या ऐपतीपेक्षा कितीतरी जास्त आहे. शिवाय परीक्षेचाही विचार होता. अजून पुष्कळ अभ्यास व्हायचा होता, आणि घरी जाऊन अभ्यास करतो कोण! बोर्डिंग-हाऊसमध्ये भुतासारखे एकटे पडून राहावे असेही वाटेना. म्हणून ईश्वरीने मला त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले तेव्हा मी आग्रहाची वाट न पाहता कबूल झालो. ईश्वरीबरोबर परीक्षेची तयारी उत्तम होईल. तो श्रीमंत असूनही मेहनती आणि बुद्धिमान आहे. त्याचबरोबर तो म्हणाला—पण गड्या, एक गोष्ट ध्यानात ठेव. तिथे जमीनदारांची निंदा केलीस तर सारा मामला बिघडेल आणि माझ्या घरच्यांना वाईट वाटेल. देवाने कुळांना जमीनदारांच्या सेवेसाठीच जन्माला घातले आहे, याच दाव्यावर ती मंडळी कुळांवर सत्ता गाजवतात. कुळालाही तसेच वाटते. जमीनदारात आणि कुळात मुळात काहीच फरक नाही हे जर त्याला कोणी सुचवून दिले, तर जमीनदारांचा मागमूसही उरणार नाही. मी म्हणालो—म्हणजे तिथे गेल्यावर मी काही वेगळाच होईन असे तुला वाटते की काय? 'होय, मला तरी तसेच वाटते.' 'तुझा समज चुकीचा आहे.' ईश्वरीने यावर काही उत्तर दिले नाही. बहुधा त्याने ही बाब माझ्या विवेकावर सोपवली. आणि फार चांगले केले. तो आपल्या म्हणण्याला चिकटून बसला असता, तर मीही हट्टाला पेटलो असतो.
नशा
( २ ) सेकंड क्लास तर सोडाच, मी कधी इंटर क्लासनेही प्रवास केला नव्हता. या खेपेला सेकंड क्लासने प्रवास करण्याचे भाग्य लाभले. गाडी तर रात्री नऊ वाजता यायची; पण प्रवासाच्या आनंदात आम्ही संध्याकाळीच स्टेशनवर जाऊन पोचलो. थोडा वेळ इकडेतिकडे फिरल्यावर रिफ्रेशमेंट-रूममध्ये जाऊन आम्ही जेवलो. माझा वेष आणि एकंदर रंगढंग पाहून, मालक कोण आणि त्याच्या मागे फिरणारे शेपूट कोण हे ओळखायला त्या पारखी खानसाम्यांना वेळ लागला नाही; पण का कोण जाणे, त्यांचा तो उद्धटपणा मला झोंबत होता. पैसे गेले ईश्वरीच्या खिशातून. माझ्या वडिलांना जेवढा पगार मिळतो, त्यापेक्षा जास्त या खानसाम्यांना बक्षिसीतच मिळत असेल कदाचित. एक अधेली तर निघताना ईश्वरीनेच दिली. तरीही, ज्या तत्परतेने आणि विनयाने ते ईश्वरीची सेवा करीत होते, तीच तत्परता आणि तोच विनय त्या सर्वांनी माझ्याशीही दाखवावा अशी माझी अपेक्षा होती. ईश्वरीने हुकूम सोडला की सगळेच्या सगळे कसे धावतात! पण मी काही मागितले की तेवढा उत्साह दाखवत नाहीत. जेवणात मला काही चव लागली नाही. माझे सारे लक्ष याच भेदभावाकडे खिळून राहिले होते. गाडी आली, आम्ही दोघे चढलो. खानसाम्यांनी ईश्वरीला सलाम केला. माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही. ईश्वरी म्हणाला—किती अदबशीर आहेत हे सगळे! नाहीतर आमचे नोकर; एकही काम करायचा धड ढंग नाही. मी खट्टू होऊन म्हणालो—तूही आपल्या नोकरांना असेच रोज आठ आणे बक्षीस देत जा, म्हणजे तेही कदाचित यांच्याहून जास्त अदबशीर होतील. 'म्हणजे हे सगळे केवळ बक्षिसाच्या लोभाने एवढी अदब दाखवतात असे तुला वाटते?' 'छे, छे, मुळीच नाही. रीतभात आणि अदब तर यांच्या रक्तातच भिनली आहे.'
नशा
गाडी सुटली. डाकगाडी होती. प्रयागहून निघाली ती थेट प्रतापगढला जाऊन थांबली. एका माणसाने आमच्या डब्याचे दार उघडले. मी तत्काळ ओरडलो—दुसरा दर्जा आहे हा, सेकंड क्लास आहे! तो प्रवासी डब्यात आला आणि एका विलक्षण उपेक्षेच्या नजरेने माझ्याकडे पाहून म्हणाला—जी हां, या सेवकालाही तेवढे समजते; आणि मधल्या बर्थवर बसला. मला किती लाज वाटली, सांगता येत नाही. पहाट होता होता आम्ही मुरादाबादला पोचलो. स्टेशनवर आमच्या स्वागतासाठी काही माणसे उभी होती. दोन सभ्य गृहस्थ होते; पाच वेठबिगारी. वेठबिगाऱ्यांनी आमचे लगेज उचलले. दोघे सभ्य गृहस्थ मागोमाग चालू लागले. एक मुसलमान होता, रियासत अली; दुसरा ब्राह्मण, रामहरख. दोघांनीही माझ्याकडे परक्या नजरेने पाहिले; जणू म्हणत होते, तू कावळा असून हंसाच्या जोडीला कसा? रियासत अलींनी ईश्वरीला विचारले—हे बाबूसाहेब आपल्याबरोबर शिकतात काय? ईश्वरीने उत्तर दिले—हो, बरोबर शिकतातही आणि बरोबर राहतातही. असे म्हणा ना, की यांच्यामुळेच मी अलाहाबादला पडून आहे; नाहीतर केव्हाच लखनौला निघून आलो असतो. या खेपेला मी यांना ओढूनच आणले. यांच्या घरून कित्येक तारा आल्या होत्या; पण मी नकाराचीच उत्तरे धाडायला लावली. शेवटची तार तर अर्जंट होती, जिला शब्दामागे चार आणे पडतात; पण तिलाही इथून उत्तर नकाराचेच गेले. दोघाही सज्जनांनी माझ्याकडे चकित नजरेने पाहिले. ते दबून जाण्याचा प्रयत्न करीत असल्यासारखे दिसले. रियासत अली अर्धवट शंकेच्या सुरात म्हणाले—पण आपण फारच साध्या पोशाखात राहता. ईश्वरीने शंकेचे निरसन केले—महात्मा गांधींचे भक्त आहेत, साहेब! खादीशिवाय दुसरे काही घालतच नाहीत. जुने सगळे कपडे जाळून टाकले! असे म्हणा की राजेच आहेत. वर्षाला अडीच लाखांची रियासत आहे. पण यांचा अवतार पाहा, तर वाटते, आत्ताच अनाथालयातून धरून आणले आहे.
नशा
रामहरख म्हणाले—श्रीमंतांचा असा स्वभाव फार क्वचित पाहायला मिळतो. कोणाला अंदाजच यायचा नाही. रियासत अलींनी दुजोरा दिला—आपण महाराजा चांगलींना पाहिले असते तर तोंडात बोटे घातली असती. जाड्याभरड्या कापडाची मिरजई आणि गावठी चामड्याचा जोडा घालून बाजारांतून हिंडत असत. असे ऐकतो की एकदा वेठीला धरले गेले होते; आणि त्यांनीच दहा लाख खर्चून कॉलेज काढले. मी मनातल्या मनात शरमेने मरत होतो; पण काय होते कोण जाणे, ही धडधडीत थाप त्या वेळी मला हास्यास्पद वाटली नाही. त्याच्या प्रत्येक वाक्याबरोबर मी जणू त्या काल्पनिक वैभवाच्या अधिकाधिक जवळ येत चाललो होतो. मी काही पट्टीचा घोडेस्वार नाही. हां, लहानपणी ओझ्याच्या तट्टांवर कित्येकदा बसलो आहे. इथे पाहतो तो दोन उंचेपुरे, धिप्पाड घोडे आमच्यासाठी तयार उभे. माझे तर धाबेच दणाणले. स्वार झालो खरा, पण सर्वांग लटलटत होते. चेहऱ्यावर मात्र मी आठी पडू दिली नाही. घोडा ईश्वरीच्या मागे लावून दिला. नशीब एवढेच की ईश्वरीने घोडा दौडवला नाही; नाहीतर मी बहुधा हातपाय मोडून घेऊनच परतलो असतो. हा किती पाण्यात आहे हे ईश्वरीने ओळखले असेल, हेही शक्य आहे. ( ३ ) ईश्वरीचे घर कसले, किल्लाच होता तो. इमामबाड्यासारखा दरवाजा, दारात फेऱ्या घालणारा पहारेकरी, नोकरांची गणतीच नाही; एक हत्ती बांधलेला. ईश्वरीने आपले वडील, काका, थोरले काका वगैरे सर्वांशी माझी ओळख करून दिली, आणि तीही त्याच अतिशयोक्तीने. असा काही बोलबाला केला की विचारू नका. नोकरचाकरच नव्हे, घरची माणसेही माझा मान राखू लागली. खेड्यातले जमीनदार; लाखांचा नफा, पण पोलीस कॉन्स्टेबललाही अंमलदार समजणारे. कित्येक गृहस्थ तर मला हुजूर-हुजूर म्हणू लागले.
नशा
जरा एकांत मिळाला तेव्हा मी ईश्वरीला म्हटले—तू मोठा सैतान आहेस गड्या, माझी अशी विटंबना का चालवली आहेस? ईश्वरी ठामपणे हसत म्हणाला—या गाढवांपुढे हीच चाल खेळणे भाग होते; नाहीतर धड तोंडाने बोललेसुद्धा नसते. थोड्या वेळाने एक न्हावी आमचे पाय चेपायला आला. कुंवर मंडळी स्टेशनवरून आली आहेत, दमली असतील. ईश्वरीने माझ्याकडे खूण करून सांगितले—आधी कुंवरसाहेबांचे पाय चेप. मी बाजेवर पडलो होतो. कोणी माझे पाय चेपले आहेत असे माझ्या आयुष्यात क्वचितच कधी घडले असेल. याला मी श्रीमंतांचे चोचले, रईसांचा गाढवपणा, बड्या लोकांची मुजोरी आणि आणखी काय काय म्हणून ईश्वरीची टर उडवीत असे; आणि आज मीच पाळण्यापासूनचा रईस असल्याचे सोंग वठवीत होतो! एवढ्यात दहा वाजले. जुन्या वळणाची माणसे होती. नवा प्रकाश अजून फक्त डोंगराच्या शिखरापर्यंतच पोचला होता! आतून जेवणाचे बोलावणे आले. आम्ही स्नानाला निघालो. मी नेहमी आपले धोतर स्वतःच धुऊन पिळतो; पण इथे मीही ईश्वरीप्रमाणेच आपले धोतर तसेच टाकून दिले. स्वतःच्या हाताने स्वतःचे धोतर धुऊन पिळायची लाज वाटत होती. आत जेवायला निघालो. हॉस्टेलमध्ये जोडे घालूनच टेबलावर ठाण मांडत असू. इथे पाय धुणे आवश्यक होते. कहार पाणी घेऊन उभा होता. ईश्वरीने पाय पुढे केले. कहाराने त्याचे पाय धुतले. मीही पाय पुढे केले. कहाराने माझेही पाय धुतले. माझे विचार कुठे निघून गेले होते कोण जाणे.
नशा
( ४ ) वाटले होते, तिथे खेड्यात एकाग्र होऊन भरपूर अभ्यास करू; पण इथे सारा दिवस हिंडण्याफिरण्यातच जात असे. कधी नदीत बजऱ्यातून सैर चालली आहे; कधी मासे नाहीतर पाखरे यांची शिकार चालली आहे, कधी पहिलवानांची कुस्ती पाहतो आहोत, कधी शतरंजच्या पटावर ठाण मांडून बसलो आहोत. ईश्वरी भरपूर अंडी मागवी आणि खोलीत 'स्टोव्ह'वर आमलेटे होत. नोकरांचा एक जथा सदैव भोवती असे. स्वतःचे हातपाय हलवायची काही गरज नाही. नुसती जीभ हलवली की पुरे. अंघोळीला बसले की अंघोळ घालायला माणूस हजर; आडवे झाले की वारा घालायला दोन माणसे उभी. मी महात्मा गांधींचा कुंवर चेला म्हणून प्रसिद्ध होतो. घरात आतपासून बाहेरपर्यंत माझा दरारा होता. न्याहारीला जराही उशीर होता कामा नये, नाहीतर कुंवरसाहेब नाराज व्हायचे. अंथरूण अगदी वेळेवर घातलेच पाहिजे, कुंवरसाहेबांची झोपायची वेळ झाली. मी ईश्वरीपेक्षाही जास्त नाजूक मिजाजाचा बनलो होतो, किंवा मला तसे बनायला भाग पाडले होते. ईश्वरीने स्वतःच्या हाताने अंथरूण घातले तर चालेल; पण कुंवर पाहुणे आपल्या हातांनी आपले अंथरूण कसे घालणार! त्यांच्या मोठेपणाला बट्टा लागेल ना. एके दिवशी खरोखर तसेच घडले. ईश्वरी आत घरात होता. बहुधा आईशी काही बोलत बसल्यामुळे त्याला उशीर झाला. इकडे दहा वाजले. माझे डोळे झोपेने जड झाले होते; पण अंथरूण घालू कसा? कुंवर पडलो ना! साडेअकराच्या सुमाराला कहार आला. मोठा शेफारलेला नोकर होता. घरच्या कामधंद्यात माझे अंथरूण घालायचे त्याच्या ध्यानातच राहिले नाही. आता आठवण झाली तसा धावत आला. मी त्याला असा काही फैलावर घेतला की त्याच्याही ते चांगलेच लक्षात राहिले असेल. माझे ओरडणे ऐकून ईश्वरी बाहेर आला आणि म्हणाला—फार चांगले केलेस. हे सगळे हरामखोर याच वागणुकीला पात्र आहेत.
नशा
असेच एके दिवशी ईश्वरी कुठेतरी मेजवानीला गेला होता. संध्याकाळ झाली; पण लॅम्प लागला नाही. लॅम्प टेबलावर ठेवलेला होता. काड्यापेटीही तिथेच होती; पण ईश्वरी स्वतः कधी लॅम्प लावीत नाही. मग कुंवरसाहेब कसे लावणार? माझी चिडचिड चालली होती. वर्तमानपत्र येऊन पडले होते. जीव तिकडे ओढ घेत होता, पण लॅम्पचा पत्ता नाही. दैवयोगाने त्याच वेळी मुन्शी रियासत अली तिथे उगवले. मी त्यांच्यावरच उसळलो, अशी काही खरडपट्टी काढली की बिचारा पार भांबावून गेला—तुम्हा लोकांना एवढीसुद्धा काळजी नाही की निदान लॅम्प तरी लावून घ्यावा! अशा कामचुकार माणसांचा इथे निभाव कसा लागतो कोण जाणे. माझ्याकडे तासभरसुद्धा टिकाव लागायचा नाही. रियासत अलींनी थरथरत्या हातांनी लॅम्प लावला. तिथे एक ठाकूर वरचेवर येत असे. जरा लहरी माणूस होता. महात्मा गांधींचा परम भक्त. मला महात्माजींचा चेला समजून तो माझा फार आब राखी; पण मला काही विचारायला संकोचत असे. एके दिवशी मला एकटा पाहून तो आला आणि हात जोडून म्हणाला—सरकार तर गांधीबाबांचे चेले हायेत ना? लोक म्हणत्यात, हितं सुराज झालं की जमीनदार राहायचे न्हाईत. मी ऐट मारली—जमीनदार राहण्याची गरजच काय? गरिबांचे रक्त शोषण्याखेरीज ही मंडळी दुसरे करतात तरी काय? ठाकुराने पुन्हा विचारले—म्हंजे सरकार, समद्या जमीनदारांची जमीन हिसकावून घेनार का? मी म्हणालो—पुष्कळ जण तर खुशीने देऊन टाकतील. जे खुशीने देणार नाहीत त्यांची जमीन हिसकावून घ्यावीच लागेल. आम्ही तर तयारच बसलो आहोत. स्वराज्य झाले रे झाले की आमचे सारे इलाखे कुळांच्या नावे बक्षीसपत्र करून देऊ. मी खुर्चीवर पाय लोंबकळत सोडून बसलो होतो. ठाकूर माझे पाय चेपू लागला. मग म्हणाला—आजकाल जमीनदार लोक लई जुलूम करत्यात, सरकार! आमालाबी हुजुरांनी आपल्या इलाख्यात थोडीशी जमीन दिली, तर तिथंच येऊन हुजुरांच्या सेवेत राहू.
नशा
मी म्हणालो—अजून तरी माझ्या हातात काही अधिकार नाही, बाबा; पण अधिकार हाती आला रे आला की सर्वांत आधी तुलाच बोलावीन. तुला मोटार-ड्रायव्हरी शिकवून माझा ड्रायव्हर करून टाकीन. असे ऐकले की त्या दिवशी ठाकुराने खूप भांग ढोसली, बायकोला खूप बडवले आणि गावच्या सावकाराशी भांडायला उठला. ( ५ ) सुट्टी अशा रीतीने संपली आणि आम्ही परत प्रयागला निघालो. गावातले पुष्कळ लोक आम्हांला पोचवायला आले. ठाकूर तर आमच्याबरोबर स्टेशनपर्यंत आला. मीही माझा पार्ट अगदी सफाईने वठवला आणि कुबेराला साजेशा माझ्या विनयाचा आणि देवपणाचा शिक्का प्रत्येकाच्या हृदयावर उमटवला. मनातून तर वाटत होते, प्रत्येक नोकराला चांगले बक्षीस द्यावे; पण ती ऐपत कुठे होती? परतीचे तिकीट होतेच, फक्त गाडीत बसायचे होते; पण गाडी आली ती खच्चून भरलेली. दुर्गापूजेची सुट्टी उपभोगून सगळेच लोक परत चालले होते. सेकंड क्लासमध्ये तीळ ठेवायला जागा नाही. इंटर क्लासची अवस्था त्याहूनही वाईट. ही शेवटची गाडी होती. काही केल्या मागे थांबता येण्यासारखे नव्हते. मोठ्या मुश्किलीने तिसऱ्या वर्गात जागा मिळाली. आमच्या ऐश्वर्याने तिथे आपला रंग जमवला; पण मला त्या डब्यात बसणे नको वाटत होते. आलो होतो आरामात लोळत, चाललो होतो अंग चोरून. कूस बदलायलाही जागा नव्हती. काही माणसे शिकलीसवरलेलीही होती. ती आपसात इंग्रजी राज्याची स्तुती करीत चालली होती. एक गृहस्थ म्हणाले—असा न्याय तर कोणत्याच राज्यात पाहिला नाही. लहानमोठे सगळे सारखे. राजानेसुद्धा कोणावर अन्याय केला, तर अदालत त्याचीही मानगूट पकडते. दुसऱ्या गृहस्थांनी दुजोरा दिला—अहो साहेब, तुम्ही बादशहावर दावा लावू शकता. अदालतीत बादशहावर डिक्री होते.
नशा
पाठीवर मोठेसे गाठोडे बांधलेला एक माणूस कलकत्त्याला चालला होता. गाठोडे ठेवायला कुठे जागाच मिळत नव्हती. पाठीवरच बांधून होता. त्यामुळे बेचैन होऊन तो पुन्हा पुन्हा दाराशी येऊन उभा राही. मी दाराजवळच बसलो होतो. तो पुन्हा पुन्हा येऊन आपले गाठोडे माझ्या तोंडावर घाशी, ते मला फारच खटकत होते. एक तर आधीच हवा कमी; त्यात तो गावंढळ माझ्या तोंडासमोरच येऊन उभा राही, तेव्हा जणू कोणी माझा गळाच दाबतो आहे असे वाटे. मी काही वेळ स्वतःला आवरून बसून राहिलो. एकाएकी माझा संताप उसळला. मी त्याला धरून मागे ढकलले आणि दोन थपडा जोरजोरात लगावल्या. तो डोळे वटारून म्हणाला—का मारता बाबूजी? आमीबी भाडं भरलंय! मी उठून आणखी दोन-तीन थपडा ठेवून दिल्या. गाडीत वादळ उठले. चारी बाजूंनी माझ्यावर भडिमार सुरू झाला. 'एवढा नाजूक मिजाज असेल तर पहिल्या वर्गात का नाही बसलात!' 'कोणी मोठा माणूस असेल तर आपल्या घरचा. मला असे मारले असते, तर दाखवला असता इंगा.' 'काय गुन्हा केला होता बिचाऱ्याने? गाडीत श्वास घ्यायला जागा नाही; खिडकीशी जरा श्वास घ्यायला उभा राहिला तर त्याच्यावर एवढा संताप! श्रीमंत झाला म्हणजे माणूस आपली माणुसकी अगदीच गमावून बसतो की काय?' 'हेही इंग्रजी राज्यच बरे, तुम्ही ज्याचे गुणगान करीत होता ते!' एक खेडूत म्हणाला—हापिसात पाय ठेवाया मिळत न्हाई, अन् वर एवढा तोरा! ईश्वरी इंग्रजीत म्हणाला—व्हॉट ॲन इडियट यू आर, बीर! आणि माझी नशा आता थोडीथोडी उतरू लागल्यासारखी वाटत होती.