मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
पंच परमेश्वर
१ जुम्मन शेख आणि अलगू चौधरी यांची घट्ट मैत्री होती. शेती दोघांची भागीदारीत होई. देण्याघेण्याच्या काही व्यवहारांतही त्यांची भागीदारी होती. एकाचा दुसऱ्यावर अढळ विश्वास होता. जुम्मन हजला गेले तेव्हा आपले घर अलगूच्या हवाली करून गेले होते, आणि अलगू जेव्हा केव्हा बाहेरगावी जात, तेव्हा आपले घर जुम्मनवर सोपवून जात. त्यांच्यात ना खाण्यापिण्याचा व्यवहार होता, ना धर्माचे नाते; फक्त विचार जुळत होते. मैत्रीचा मूलमंत्रही हाच आहे. या मैत्रीचा जन्म झाला तो दोघे मित्र अगदी लहान असतानाच, जेव्हा जुम्मनचे पूज्य पिताजी जुमराती त्यांना शिकवीत असत. अलगूने गुरुजींची खूप सेवा केली—भरपूर रकाब्या घासल्या, भरपूर प्याले धुतले. त्यांच्या हुक्क्याला क्षणभरही विसावा मिळत नसे, कारण प्रत्येक चिलमीमुळे अलगूची अर्धा तास पुस्तकांपासून सुटका होई. अलगूचे वडील जुन्या विचारांचे होते. शिक्षणापेक्षा गुरूच्या सेवाशुश्रूषेवर त्यांचा अधिक विश्वास होता. ते म्हणत, विद्या शिकून येत नाही; जे काही होते ते गुरूच्या आशीर्वादाने. बस, गुरुजींची कृपादृष्टी हवी. म्हणून जुमराती शेखांच्या आशीर्वादाचे किंवा सहवासाचे अलगूवर काही फळ दिसले नाही, तर ते असे मानून मनाचे समाधान करून घेतील, की विद्या मिळवण्यासाठी मी माझ्याकडून काहीही कसर ठेवली नाही; विद्या त्याच्या नशिबातच नव्हती, तर ती येणार तरी कशी?
पंच परमेश्वर
पण जुमराती शेख स्वतःच आशीर्वादाच्या लायकीचे नव्हते. त्यांचा आपल्या सोट्यावर जास्त भरवसा होता, आणि याच सोट्याच्या प्रतापाने आज आसपासच्या गावांत जुम्मनची पूजा होत होती. त्यांनी लिहिलेल्या गहाणखतावर किंवा खरेदीखतावर कचेरीचा मुहर्रिरसुद्धा लेखणी उचलू शकत नसे. त्या भागाचा टपालवाला, कॉन्स्टेबल आणि तहसिलीचा चपराशी—सगळे त्यांच्या कृपेची आस धरून असत. म्हणून अलगूला मान होता तो त्यांच्या धनामुळे, तर जुम्मन शेख आपल्या अनमोल विद्येमुळेच सर्वांच्या आदराला पात्र झाले होते. २ जुम्मन शेखांची एक म्हातारी खाला, म्हणजे मावशी, होती. तिच्याकडे थोडीशी मिळकत होती. पण तिच्या जवळच्या नात्यात कोणी नव्हते. जुम्मनने मोठमोठी वचने देऊन ती मिळकत आपल्या नावावर चढवून घेतली होती. दानपत्राची रजिस्ट्री होईपर्यंत खालाजानचा भरपूर आदरसत्कार झाला, तिला चमचमीत पदार्थ खाऊ घातले. हलव्या-पुलावाचा जणू पाऊसच पडला; पण रजिस्ट्रीच्या शिक्क्याने या सरबराईवरही जणू शिक्का मारला. जुम्मनची बायको करीमन रोट्यांबरोबर कडू बोलण्याचे तिखटजाळ कालवणही वाढू लागली. जुम्मन शेखही निष्ठुर झाले. आता बिचाऱ्या खालाजानला जवळजवळ रोजच असले बोलणे ऐकावे लागे— म्हातारी अजून किती दिवस जगणार आहे कुणास ठाऊक! दोन-तीन बिघे नापीक जमीन काय दिली, जणू आम्हाला विकतच घेतलं आहे! फोडणीच्या डाळीशिवाय रोटी घशाखाली उतरत नाही! जेवढा पैसा हिच्या पोटात आजवर ओतला, तेवढ्यात एव्हाना एक गाव विकत घेतलं असतं.
पंच परमेश्वर
काही दिवस खालाजानने ऐकून घेतले, सोसले; पण सहन होईना तेव्हा जुम्मनकडे तक्रार केली. जुम्मनने या स्थानिक अधिकाऱ्याच्या—गृहस्वामिनीच्या—कारभारात ढवळाढवळ करणे उचित मानले नाही. आणखी काही दिवस असेच रडतखडत गेले. शेवटी एके दिवशी खाला जुम्मनला म्हणाली—बेटा! तुझ्याबरोबर माझा निभाव लागायचा नाही. तू मला पैसे देत जा, मी आपलं वेगळं रांधून खाईन. जुम्मनने उद्धटपणे उत्तर दिले—पैसे काय इथे झाडाला लागतात? खाला नम्रपणे म्हणाली—मला थोडं कोरडंसुकं तरी हवं की नको? जुम्मनने गंभीर आवाजात उत्तर दिले—तू अमरपट्टा घेऊन आली आहेस, असं कुणी थोडंच समजतं? खाला चिडली. तिने पंचायत बोलावण्याची धमकी दिली. जुम्मन हसले, एखादा शिकारी हरणाला जाळ्याकडे जाताना पाहून मनातल्या मनात हसतो तसे. ते म्हणाले—हो, जरूर पंचायत बोलव. काय तो निकाल होऊन जाऊ दे. मलाही ही रात्रंदिवसाची कटकट आवडत नाही. पंचायतीत जीत कोणाची होणार, याबद्दल जुम्मनच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. आसपासच्या गावांत असा कोण होता, जो त्यांच्या उपकारांच्या ऋणाखाली नव्हता? असा कोण होता, जो त्यांच्याशी वैर घेण्याची हिंमत करील? कोणाच्या अंगात इतके बळ होते, की त्यांच्यासमोर उभा राहील? आणि आभाळातले फरिश्ते तर काही पंचायत करायला येणार नव्हते. ३ त्यानंतर कित्येक दिवस म्हातारी खाला हातात काठी घेऊन आसपासच्या गावांतून धावपळ करीत राहिली. कंबर वाकून कमान झाली होती. एकेक पाऊल टाकणे जड जात होते. पण आता प्रश्न उभा ठाकला होता; त्याचा निवाडा करून घेणे भागच होते.
पंच परमेश्वर
क्वचितच असा एखादा भला माणूस असेल, ज्याच्यापुढे म्हातारीने दुःखाचे अश्रू ढाळले नसतील. कोणी नुसते वरवर हूं-हां करून तिला वाटेला लावले. कोणी या अन्यायाबद्दल जमान्याला शिव्या दिल्या आणि म्हणाले—पाय कबरीत लोंबकळताहेत; आज मेलीस तर उद्याचा दिवस दुसरा; पण हाव काही सुटत नाही. आता तुला काय हवं? रोटी खा आणि अल्लाचं नाव घे. तुला शेतीवाडीशी काय करायचंय? काही असेही सज्जन होते, ज्यांना हास्यरसाचा आस्वाद घेण्याची चांगली संधी मिळाली. वाकलेली कंबर, बोळकं तोंड, तागासारखे पांढरे केस—एवढी सामग्री एकत्र जमल्यावर हसू का येऊ नये? त्या अबलेचे गाऱ्हाणे लक्ष देऊन ऐकणारे आणि तिचे सांत्वन करणारे न्यायप्रिय, दयाळू, दीनांचे कैवारी पुरुष फारच थोडे होते. चोहीकडे फिरून फिरून बिचारी अलगू चौधरीकडे आली. काठी खाली टाकली आणि दम खाऊन म्हणाली—बेटा, तूही घटकाभर माझ्या पंचायतीला येऊन जा. अलगू—मला बोलावून काय करशील? कितीतरी गावांची माणसं येतीलच की. खाला—माझं दुःख मी सगळ्यांपुढे रडून आले आहे. येणं न येणं त्यांच्या मर्जीची गोष्ट. अलगू—यायला म्हणून मी येईन; पण पंचायतीत तोंड उघडणार नाही. खाला—का रे बेटा? अलगू—आता याला काय उत्तर देऊ? माझी मर्जी! जुम्मन माझा जुना दोस्त आहे. त्याच्याशी वाकडं घेऊ शकत नाही. खाला—बेटा, वाकडं होईल या भीतीने ईमानाची गोष्ट बोलणार नाहीस का? आपल्या झोपलेल्या धर्मबुद्धीची सारी संपत्ती लुटली गेली तरी तिला पत्ता लागत नाही; पण ललकारी ऐकली की ती खडबडून जागी होते. मग तिला कोणी जिंकू शकत नाही. अलगूंना या प्रश्नाचे काही उत्तर देता आले नाही; पण त्यांच्या हृदयात हे शब्द घुमत होते— 'वाकडं होईल या भयाने ईमानाची गोष्ट बोलणार नाहीस का?'
पंच परमेश्वर
४ संध्याकाळी एका झाडाखाली पंचायत भरली. शेख जुम्मनने आधीपासूनच जाजमे अंथरून ठेवली होती. पान, वेलदोडे, हुक्के, तंबाखू वगैरेचीही व्यवस्था केली होती. हां, ते स्वतः मात्र अलगू चौधरींबरोबर जरा दूर बसले होते. पंचायतीला कोणी आले, की ते दबक्या सलामाने त्याचे स्वागत करीत. सूर्य मावळला आणि पाखरांची किलबिलती पंचायत झाडांवर भरली, तेव्हा इथेही पंचायतीला सुरुवात झाली. जाजमावरची बोटभर जागाही रिकामी उरली नाही; पण त्यात बहुतेक प्रेक्षकच होते. निमंत्रित मंडळींपैकी फक्त तेच आले होते, ज्यांना जुम्मनशी आपला काही ना काही जुना हिशेब चुकता करायचा होता. एका कोपऱ्यात आग धुमसत होती. न्हावी भराभर चिलमी भरत होता. धुमसणाऱ्या गोवऱ्यांतून जास्त धूर निघत होता की चिलमीच्या झुरक्यांतून, हे ठरवणे अशक्य होते. पोरे इकडून तिकडे धावत होती. कोणी एकमेकांना शिवीगाळ करीत होती, तर कोणी रडत होती. चोहीकडे गलका माजला होता. गावातली कुत्री हा मेळावा म्हणजे जेवणावळ समजून झुंडीच्या झुंडीने जमली होती. पंच बसले, तेव्हा म्हातारी खालाने त्यांना विनंती केली— 'पंचांनो! आज तीन वर्षं झाली, मी माझी सारी मिळकत माझ्या भाच्याच्या नावाने लिहून दिली. हे तुम्हा लोकांना ठाऊक असेलच. जुम्मनने मला हयातभर रोटी-कपडा द्यायचं कबूल केलं होतं. वर्षभर मी कशीबशी रडतकुढत त्याच्याबरोबर काढलं; पण आता हे रात्रंदिवसाचं रडणं सोसवत नाही. मला ना पोटभर रोटी मिळते, ना अंगभर कपडा. मी निराधार विधवा आहे. कोर्टकचेरी करू शकत नाही. तुमच्याशिवाय आणखी कोणाला माझं दुःख सांगू? तुम्ही लोक जो मार्ग काढून द्याल, त्याच मार्गाने मी चालेन. माझ्यात काही खोट दिसली तर माझ्या तोंडात मारा. जुम्मनमध्ये वाईटपणा दिसला तर त्याला समजवा. एका निराधार बाईचा तळतळाट का घेतो आहे? पंचांचा हुकूम मला शिरसावंद्य.'
पंच परमेश्वर
रामधन मिश्र, ज्यांची कित्येक कुळे जुम्मनने आपल्या गावात आणून वसवली होती, म्हणाले—जुम्मनमियाँ! पंच म्हणून कोणाकोणाची नावं देता? आताच हे काय ते ठरवून टाका. मग पंच जे काही सांगतील तेच मानावं लागेल. जुम्मनला या वेळी जमलेल्या मंडळींत विशेषतः तेच लोक दिसले, ज्यांच्याशी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचे वैमनस्य होते. जुम्मन म्हणाले—पंचांचा हुकूम म्हणजे अल्लाचा हुकूम. खालाजान ज्याचं नाव देतील, त्याला माझी काही हरकत नाही. खाला ओरडून म्हणाली—अरे अल्लाच्या बंद्या! पंचांची नावं का सांगत नाहीस? मलाही काही कळू दे! जुम्मन रागाने म्हणाले—आता या वेळी माझं तोंड उघडायला लावू नकोस. आता तुझी चलती आहे; ज्याला हवं त्याला पंच नेम. खालाजानने जुम्मनच्या बोलण्यातला टोमणा ओळखला. ती म्हणाली—बेटा! खुदाचं भय बाळग. पंच ना कोणाचे दोस्त असतात, ना कोणाचे दुश्मन. कसलं हे बोलणं तुझं? आणि तुझा कोणावरच विश्वास नसेल तर राहू दे; अलगू चौधरीला तरी मानतोस ना? घे, मी त्यांनाच सरपंच नेमते. जुम्मन शेख आनंदाने फुलून गेले; पण भावना लपवून म्हणाले—अलगू चौधरी तर अलगू चौधरी. मला जसे रामधन मिश्र, तसेच अलगू. अलगूंना या झमेल्यात अडकायचे नव्हते. ते अंग काढून घेऊ लागले. म्हणाले—खाला! तुला ठाऊक आहे, माझी जुम्मनशी घट्ट दोस्ती आहे. खाला गंभीर स्वरात म्हणाली—बेटा! दोस्तीसाठी कोणी आपलं ईमान विकत नाही. पंचाच्या दिलात खुदा वसतो. पंचांच्या तोंडून जे शब्द निघतात, ते खुदाकडून निघतात. अलगू चौधरी सरपंच झाले. रामधन मिश्र आणि जुम्मनच्या इतर विरोधकांनी मनातल्या मनात म्हातारीच्या नावाने खूप बोटे मोडली.
पंच परमेश्वर
अलगू चौधरी म्हणाले—शेख जुम्मन! आपण दोघे जुने दोस्त आहोत. वेळ पडली तेव्हा तू मला मदत केली आहेस, आणि मीही जमेल तेवढी तुझी सेवा करीत आलो आहे. पण या वेळी तू आणि म्हातारी खाला दोघेही माझ्या नजरेत सारखे आहात. तुला पंचांपुढे जे काही मांडायचं असेल ते मांड. जुम्मनला पक्का विश्वास होता, की आता डाव आपल्याच हाती आहे; अलगू हे सारे दिखाव्यापुरते बोलतो आहे. म्हणून ते शांत चित्ताने म्हणाले—पंचांनो! तीन वर्षांपूर्वी खालाजाननी आपली मिळकत बक्षीसपत्राने माझ्या नावे करून दिली. मी त्यांना हयातभर अन्नवस्त्र देण्याचे कबूल केले होते. खुदा साक्षी आहे, आजवर मी खालाजानना कसलाही त्रास दिलेला नाही. मी त्यांना आपल्या आईसमान मानतो. त्यांची खिदमत करणे हे माझे कर्तव्यच आहे; पण बायकांमध्ये जरा खटके उडत असतात. त्याला माझा काय इलाज? खालाजान माझ्याकडे महिन्याचा खर्च वेगळा मागतात. मिळकत किती आहे, हे पंचांपासून लपलेले नाही. तिच्यातून एवढा नफा होत नाही, की मी महिन्याचा खर्च देऊ शकेन. शिवाय बक्षीसपत्रात महिन्याच्या खर्चाचा कुठे उल्लेखही नाही; नाहीतर मी चुकूनसुद्धा या झमेल्यात पडलो नसतो. बस, मला एवढेच सांगायचे आहे. पुढे पंचांना अधिकार आहे, हवा तो फैसला करावा. अलगू चौधरींचा नेहमी कोर्टकचेरीशी संबंध येई, त्यामुळे ते पक्के कायदेबाज होते. त्यांनी जुम्मनची उलटतपासणी सुरू केली. एकेक प्रश्न जुम्मनच्या काळजावर हातोड्याच्या घावासारखा बसत होता. या प्रश्नांवर रामधन मिश्र भलतेच खूश होत चालले होते. जुम्मन चकित झाले होते—अलगूला झालंय तरी काय? आत्ता माझ्याबरोबर बसला होता, तेव्हा काय काय बोलत होता! एवढ्याशा वेळात असा कायापालट झाला, की माझ्या मुळावरच उठलाय! कोणत्या जुन्या रागाचा हा वचपा काढतोय, कोण जाणे! इतक्या दिवसांची दोस्ती काहीच कामी येणार नाही का?
पंच परमेश्वर
जुम्मन शेख अशा उलटसुलट विचारांत गुरफटले होते, तोच अलगूंनी फैसला सुनावला— जुम्मन शेख! पंचांनी या प्रकरणावर विचार केला. खालाजानला महिन्याचा खर्च द्यावा, हे त्यांना न्याय्य वाटते. आमचे मत असे आहे, की खालाच्या मिळकतीतून महिन्याचा खर्च देता येईल एवढा नफा निश्चितच होतो. बस, हाच आमचा फैसला. जुम्मनला खर्च देणे मंजूर नसेल, तर बक्षीसपत्र रद्द समजावे. ५ हा फैसला ऐकताच जुम्मन सुन्न झाले. जो आपला मित्र, त्याने शत्रूसारखे वागावे आणि गळ्यावर सुरी फिरवावी! याला काळाचा फेरा याशिवाय दुसरे काय म्हणावे? ज्याच्यावर पूर्ण भरवसा होता, त्यानेच ऐन वेळी दगा दिला. अशाच प्रसंगी खोट्या-खऱ्या मित्रांची परीक्षा होते. हीच कलियुगातली दोस्ती! लोक असे कपटी, दगाबाज नसते, तर देशावर संकटांचा कोप कशाला झाला असता? हे पटकी, प्लेग वगैरे रोग म्हणजे दुष्कर्मांची शिक्षाच आहे. पण रामधन मिश्र आणि इतर पंच अलगू चौधरींच्या या न्यायनिष्ठेची मनमोकळेपणाने तारीफ करीत होते. ते म्हणत होते—याला म्हणतात पंचायत! दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केले. दोस्ती आपल्या जागी; पण धर्माचे पालन करणे हे मुख्य. अशाच सत्यवचनी माणसांच्या बळावर पृथ्वी टिकून आहे; नाहीतर ती केव्हाच रसातळाला गेली असती. या फैसल्याने अलगू आणि जुम्मन यांच्या दोस्तीचे मूळच हादरले. आता ते एकत्र बोलताना दिसत नसत. इतका जुना मैत्रीचा वृक्ष सत्याचा एक हलकासा झोकाही सहन करू शकला नाही. खरोखर तो वाळूच्या जमिनीवरच उभा होता.
पंच परमेश्वर
आता त्यांच्यात शिष्टाचार जास्त दिसू लागला. एकमेकांची आवभगत जास्तच होऊ लागली. ते भेटत-बोलत होते, पण तलवार ढालीला भेटते तसे. जुम्मनच्या मनात मित्राची कुटिलता आठही प्रहर सलत असे. कसेही करून बदला घेण्याची संधी मिळावी, याच चिंतेत ते घडोघडी असत. ६ चांगली कामे सिद्धीला जायला फार वेळ लागतो; वाईट कामांचे तसे नसते. जुम्मनलाही बदला घेण्याची संधी लवकरच मिळाली. मागच्या वर्षी अलगू चौधरींनी बटेसरहून बैलांची एक फार चांगली जोडी विकत आणली होती. बैल पछाही जातीचे, देखणे, मोठमोठ्या शिंगांचे. महिनोन्महिने आसपासच्या गावांचे लोक त्यांचे दर्शन घेत राहिले. दैवयोगाने जुम्मनच्या पंचायतीनंतर महिन्याभरात या जोडीतला एक बैल मेला. जुम्मन दोस्तांना म्हणाले—ही दगाबाजीची सजा आहे. माणूस वाटेल ते करून जावो, पण खुदा बरंवाईट सगळं पाहत असतो. अलगूंना संशय आला, की जुम्मनने कुणाकरवी बैलाला विष घातलं आहे. चौधरीणीनेही या दुर्घटनेचा दोष जुम्मनवरच ठेवला. ती म्हणाली—जुम्मननेच काहीतरी करणी केली आहे. चौधरीण आणि करीमन यांच्यात यावरून एके दिवशी जोरदार वादविवाद झाला. दोन्ही देवींनी शब्दांची गंगा वाहवली. व्यंग्य, वक्रोक्ती, अन्योक्ती, उपमा वगैरे अलंकारांनी बोलणी झाली. जुम्मनने कशीबशी शांतता प्रस्थापित केली. त्यांनी आपल्या बायकोला दटावून समजावले. तिला त्या रणांगणावरून दूरही घेऊन गेले. तिकडे अलगू चौधरींनी समजावण्याचे काम आपल्या मुद्देसूद सोट्याने केले.
पंच परमेश्वर
आता एकटा बैल काय कामाचा? त्याला जोड खूप शोधली, पण मिळाली नाही. शेवटी तो विकून टाकावा असे ठरले. गावात समझू साहू म्हणून एक जण होते; ते इक्का-गाडी हाकत. गावातून गूळ, तूप लादून ते बाजारपेठेत नेत, आणि बाजारपेठेतून तेल, मीठ भरून आणून गावात विकत. या बैलावर त्यांचे मन बसले. त्यांनी विचार केला, हा बैल हाती लागला तर दिवसभरात बिनघोर तीन खेपा होतील. सध्या तर एका खेपेचीसुद्धा मारामार असते. त्यांनी बैल पाहिला, गाडीला जुंपून पळवून पाहिला, अंगावरचे भोवरे पारखून घेतले, घासाघीस केली आणि त्याला आणून दारात बांधलाच. महिन्याभरात किंमत चुकती करायचे ठरले. चौधरींनाही गरज होतीच; त्यांनी तोट्याची पर्वा केली नाही. समझू साहूंना नवा बैल मिळाला, तसे ते त्याला राबराब राबवू लागले. ते दिवसातून तीन-तीन, चार-चार खेपा करू लागले. ना चाऱ्याची फिकीर, ना पाण्याची. बस, खेपांशी मतलब. बाजारपेठेत नेले, तिथे थोडा सुका भुसा पुढ्यात टाकला. बिचाऱ्या जनावराने धड दमही खाल्ला नसेल, तोच पुन्हा जुंपले. अलगू चौधरींच्या घरी होता, तेव्हा नुसती चैन होती. सहा-सहा महिन्यांतून कधीतरी छकड्याला जुंपला जाई, तेव्हा खूप उड्या मारी, बागडे आणि कोसन्कोस धावत जाई. तिथे बैलराजांना खुराक, स्वच्छ पाणी, भरडलेली तुरीची डाळ, भुशाबरोबर पेंड मिळे; आणि एवढेच नव्हे, तर कधी कधी तुपाची चवही चाखायला मिळे. सकाळ-संध्याकाळ एक माणूस खरारा करी, अंग पुसे, कुरवाळी. कुठे ते सुखचैन, आणि कुठे ही आठही प्रहरांची रगड! महिन्याभरातच तो पिचून गेल्यासारखा झाला. इक्क्याचे जू दिसताच त्याचे रक्त सुकून जाई. एकेक पाऊल टाकणे जड जाई. हाडे वर आली होती; पण होता तो पाणीदार, मार सहन होत नसे.
पंच परमेश्वर
एके दिवशी चौथ्या खेपेला साहूजींनी दुप्पट ओझे लादले. दिवसभराचे थकलेले जनावर, पाय उचलत नव्हते. त्यात साहूजी चाबूक फटकारू लागले. बस, मग काय! बैल काळीज तोडून धावला. काही अंतर धावला आणि त्याला वाटले, जरा दम घ्यावा; पण साहूजींना लवकर घरी पोचायची घाई होती. म्हणून त्यांनी अगदी निर्दयपणे कित्येक चाबूक ओढले. बैलाने आणखी एकदा जोर लावला. पण या वेळी शक्तीने साथ सोडली. तो जमिनीवर कोसळला, आणि असा कोसळला की पुन्हा उठलाच नाही. साहूजींनी खूप बडवले, पाय धरून ओढले, नाकपुड्यांत काठी खुपसली. पण मेलेले जनावर कधी उठते का? तेव्हा साहूजींना काहीशी शंका आली. त्यांनी बैलाकडे निरखून पाहिले, त्याला सोडून बाजूला केले आणि गाडी घरी कशी पोचवायची याचा विचार करू लागले. ते खूप ओरडले-किंचाळले; पण खेड्याची वाट लहान मुलांच्या डोळ्यांसारखी, संध्याकाळ होताच मिटून जाते; कोणी दिसले नाही. आसपास एखादे गावही नव्हते. रागाच्या भरात त्यांनी मेलेल्या बैलावर आणखी कोरडे ओढले आणि शिव्याशाप देऊ लागले—अभाग्या! मरायचंच होतं तर घरी पोचल्यावर मरायचं ना! मेला लेकाचा अर्ध्या वाटेतच मेला! आता गाडी कोण ओढणार? अशा रीतीने साहूजी खूप चडफडले, जळफळले. त्यांनी गुळाची कित्येक पोती आणि तुपाची कित्येक पिंपे विकली होती; दोन-अडीचशे रुपये कमरेला बांधलेले होते. शिवाय गाडीवर मिठाची कित्येक पोती होती. म्हणून सोडून जाताही येत नव्हते. नाइलाजाने बिचारे गाडीवरच आडवे झाले. तिथेच रात्र जागून काढायचा त्यांनी निश्चय केला. चिलीम ओढली, गाणी गायली, मग हुक्का ओढला. अशा तऱ्हेने साहूजी मध्यरात्रीपर्यंत झोपेला चकवीत राहिले; आपल्या मते तर ते जागेच राहिले. पण पहाट होताच जाग आली आणि कमरेला हात लावला, तो थैली गायब!
पंच परमेश्वर
घाबरून इकडेतिकडे पाहिले, तर तेलाचे कित्येक डबेही नाहीसे! दुःखाने बिचारा डोके बडवू लागला, गडाबडा लोळू लागला. सकाळी रडत-भेकत घरी पोचला. साहूणीने ही वाईट बातमी ऐकली, तेव्हा आधी ती रडली, मग अलगू चौधरींना शिव्या घालू लागली—मेल्याने असला अवलक्षणी बैल दिला, की जन्मभराची कमाई लुटली गेली! या घटनेला कित्येक महिने लोटले. अलगू आपल्या बैलाचे पैसे मागत, तेव्हा साहू आणि साहूण दोघेही चवताळलेल्या कुत्र्यांसारखे अंगावर धावून येत आणि वाटेल ते बरळू लागत—वा! इथे तर सगळ्या जन्माची कमाई लुटली गेली, सत्यानाश झाला; आणि यांना पैशांचं पडलंय! मेलेला बैल दिला होता, वर पैसे मागायला निघालेत! डोळ्यांत धूळ फेकली, सत्यानाशी बैल गळ्यात बांधला; आम्हाला निव्वळ बावळट समजलात! आम्हीही वाण्याची पोरं आहोत; असले बुद्धू दुसरीकडे कुठे असतील. आधी एखाद्या डबक्यात जाऊन तोंड धुऊन या, मग पैसे घ्या! जीव राहवत नसेल, तर आमचा बैल सोडून न्या. महिनाभराच्या बदल्यात दोन महिने जुंपा. पैसे कशाला घेता? चौधरींचे वाईट चिंतणारे काही थोडे नव्हते. अशा प्रसंगी तेही जमत आणि साहूजींच्या बरळण्याला दुजोरा देत. असले फटकारे ऐकून बिचारे चौधरी हिरमुसले होऊन परत येत; पण दीडशे रुपयांवर अशा रीतीने पाणी सोडणे सोपे नव्हते. एकदा तेही तापले. साहूजी चिडून लाठी शोधायला घरात गेले. आता साहूणबाईंनी आघाडी सांभाळली. सवाल-जबाब होता होता हातघाईची पाळी आली. साहूणीने घरात घुसून दारे लावून घेतली. गलका ऐकून गावातले भले लोक जमा झाले. त्यांनी दोघांना समजावले. साहूजींना दिलासा देऊन घरातून बाहेर काढले. ते सल्ला देऊ लागले, की अशी डोकी फोडाफोडी करून काम भागणार नाही. पंचायत बोलवा. जे काही ठरेल, ते मान्य करा. साहूजी राजी झाले. अलगूंनीही होकार दिला.
पंच परमेश्वर
७ पंचायतीची तयारी सुरू झाली. दोन्ही पक्षांनी आपापले गट बांधायला सुरुवात केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच झाडाखाली पुन्हा पंचायत भरली. तीच संध्याकाळची वेळ होती. शेतांत कावळ्यांची पंचायत चालली होती. वादाचा मुद्दा असा होता, की वाटाण्याच्या शेंगांवर त्यांचा हक्क आहे की नाही; आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत राखणदाराच्या आरोळीवर आपली नाराजी व्यक्त करणे त्यांना आवश्यक वाटत होते. झाडाच्या फांद्यांवर बसलेल्या पोपटांच्या मंडळात असा प्रश्न उपस्थित झाला होता, की माणूस स्वतःच आपल्या मित्रांना दगा द्यायलाही कचरत नाही, तर मग त्याला आम्हाला बेमुर्वत म्हणण्याचा काय अधिकार? पंचायत बसल्यावर रामधन मिश्र म्हणाले—आता उशीर कशाला? पंचांची निवड व्हायला हवी. बोला चौधरी, कोणाकोणाला पंच नेमता? अलगू दीनपणे म्हणाले—समझू साहूंनीच निवडावे. समझू उभे राहिले आणि कडक आवाजात म्हणाले—माझ्याकडून जुम्मन शेख. जुम्मनचे नाव ऐकताच अलगू चौधरींचे काळीज धडधडू लागले, जणू कोणी अचानक थप्पड मारली असावी. रामधन अलगूंचे मित्र होते. त्यांनी ते ताडले. विचारले—काय चौधरी, तुमची काही हरकत तर नाही ना? चौधरी निराश होऊन म्हणाले—नाही, मला कसली हरकत असणार? * * * आपल्या जबाबदारीची जाणीव पुष्कळदा आपल्या संकुचित वागण्यात सुधारणा घडवून आणते. आपण वाट चुकून भरकटू लागतो, तेव्हा हीच जाणीव आपला भरवशाचा वाटाड्या बनते.
पंच परमेश्वर
वृत्तपत्राचा संपादक आपल्या शांत कुटीत बसून किती धाष्ट्र्याने आणि मोकळेपणाने आपल्या प्रखर लेखणीने मंत्रिमंडळावर हल्ला चढवतो; पण असेही प्रसंग येतात, जेव्हा तो स्वतःच मंत्रिमंडळात सामील होतो. मंडळाच्या भवनात पाऊल ठेवताच त्याची लेखणी किती मर्मज्ञ, किती विचारी, किती न्यायनिष्ठ होते! याचे कारण जबाबदारीची जाणीव. तरुण माणूस भर तारुण्यात किती उद्दाम असतो! आईवडील त्याच्याविषयी किती चिंतेत असतात! त्याला ते कुळाला लागलेला कलंक समजतात. पण थोड्याच काळात कुटुंबाचे ओझे डोक्यावर पडताच तोच भरकटलेल्या मनाचा, बेभान तरुण किती धीराचा, किती शांत होतो! हेही जबाबदारीच्या जाणिवेचेच फळ. जुम्मन शेखांच्या मनातही सरपंचाचे उच्च स्थान स्वीकारताच आपल्या जबाबदारीची भावना जागी झाली. त्यांनी विचार केला, मी या वेळी न्याय आणि धर्म यांच्या सर्वोच्च आसनावर बसलो आहे. माझ्या तोंडून या वेळी जे काही बाहेर पडेल, ते देववाणीसमान आहे; आणि देववाणीत माझ्या मनातल्या विकारांचा कदापि शिरकाव होता कामा नये. सत्यापासून तसूभरही ढळणे मला उचित नाही. पंचांनी दोन्ही पक्षांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. बराच वेळ दोन्ही गट आपापल्या बाजूचे समर्थन करीत राहिले. समझूने बैलाची किंमत द्यायला हवी, याबाबत तर सर्वांचे एकमत होते; पण दोन गृहस्थ या कारणाने सवलत द्यायच्या मताचे होते, की बैल मेल्यामुळे समझूचे नुकसान झाले. याउलट दोन सभ्य गृहस्थांना किमतीशिवाय समझूला काही दंडही करायचा होता, म्हणजे पुन्हा कोणी जनावरांशी अशी निर्दयता करण्याची हिंमत करू नये. शेवटी जुम्मनने फैसला सुनावला—अलगू चौधरी आणि समझू साहू! पंचांनी तुमच्या प्रकरणावर नीट विचार केला.
पंच परमेश्वर
समझूंनी बैलाची पुरी किंमत द्यावी हे उचित आहे. त्यांनी बैल घेतला, तेव्हा त्याला कसलाही आजार नव्हता. त्याच वेळी किंमत दिली गेली असती, तर आज समझूंनी तो परत घ्या, असा आग्रह धरला नसता. बैलाचा मृत्यू केवळ यामुळे झाला, की त्याच्याकडून भलतेच कठोर कष्ट करवून घेतले, आणि त्याच्या दाणावैरणीची कसलीही नीट व्यवस्था केली नाही. रामधन मिश्र म्हणाले—समझूंनी बैलाला जाणूनबुजून मारले आहे. म्हणून त्यांच्याकडून दंड घ्यायला हवा. जुम्मन म्हणाले—हा वेगळा प्रश्न आहे. आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. झगडू साहू म्हणाले—समझूंना थोडी सवलत मिळायला हवी. जुम्मन म्हणाले—ते अलगू चौधरींच्या मर्जीवर आहे. त्यांनी सवलत दिली, तर तो त्यांचा भलेपणा. अलगू चौधरींना आनंद पोटात मावेना. ते उठून उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले—पंच परमेश्वर की जय! चोहीकडून प्रतिध्वनी उमटला—पंच परमेश्वर की जय! प्रत्येक जण जुम्मनच्या न्यायबुद्धीची तारीफ करीत होता—याला म्हणतात न्याय! हे माणसाचे काम नाही; पंचात परमेश्वर वास करतो. हा त्याचाच महिमा. पंचांपुढे खोटे नाणे खरे म्हणून कोण खपवू शकेल? थोड्या वेळाने जुम्मन अलगूंकडे आले आणि त्यांच्या गळ्यात पडून म्हणाले—भैया, तू माझी पंचायत केलीस तेव्हापासून मी तुझ्या जिवावर उठलेला वैरी झालो होतो; पण आज मला कळलं, की पंचाच्या जागी बसल्यावर माणूस ना कोणाचा दोस्त राहतो, ना दुश्मन. न्यायाशिवाय त्याला दुसरं काही सुचत नाही. आज माझी खात्री पटली, की पंचाच्या जिभेतून खुदा बोलतो. अलगू रडू लागले. या पाण्याने दोघांच्या मनातला मळ धुऊन निघाला. मैत्रीची कोमेजलेली वेल पुन्हा हिरवीगार झाली.