मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
परीक्षा
(१) देवगड संस्थानचे दिवाण सरदार सुजानसिंह म्हातारे झाले, तेव्हा त्यांना परमेश्वराची आठवण झाली. त्यांनी महाराजांकडे जाऊन विनंती केली, की दीनबंधू! या दासाने चाळीस वर्षे श्रीमंतांची सेवा केली; आता माझे वयही उतरणीला लागले, राज्यकारभार सांभाळण्याचे त्राण उरले नाही. कुठे चूकभूल झाली, तर म्हातारपणी बट्टा लागायचा. आयुष्यभर कमावलेले नाव मातीमोल व्हायचे. राजेसाहेब आपल्या अनुभवी, नीतिनिपुण दिवाणांचा फार आदर करीत. त्यांनी पुष्कळ समजावले; पण दिवाणसाहेब ऐकेनात, तेव्हा हार मानून त्यांनी त्यांची प्रार्थना मान्य केली. मात्र एक अट घातली: संस्थानासाठी नवा दिवाण तुम्हीच शोधून द्यायचा. दुसऱ्या दिवशी देशातल्या नामांकित वृत्तपत्रांत जाहिरात झळकली: देवगडसाठी एका सुयोग्य दिवाणाची आवश्यकता आहे. जे सज्जन स्वतःला या पदाला योग्य समजत असतील, त्यांनी विद्यमान दिवाण सरदार सुजानसिंह यांच्या सेवेत हजर व्हावे. ते पदवीधर असलेच पाहिजेत असे नाही, पण शरीराने धडधाकट असणे आवश्यक आहे; मंदाग्नीच्या रोग्याने इथवर येण्याचे कष्ट घेण्याची काही गरज नाही. महिनाभर उमेदवारांचे राहणीमान, आचारविचार यांच्यावर नजर ठेवली जाईल. विद्येचा विचार कमी, पण कर्तव्याचा विचार अधिक केला जाईल. जे महाशय या परीक्षेत पुरे उतरतील, ते या उच्च पदावर विराजमान होतील.
परीक्षा
(२) या जाहिरातीने सगळ्या मुलखात खळबळ उडवून दिली. एवढे मोठे पद, आणि कसलीही अट नाही! केवळ नशिबाचा खेळ. शेकडो लोक आपापले नशीब अजमावायला निघाले. देवगडात नवनवी, रंगीबेरंगी माणसे दिसू लागली. प्रत्येक आगगाडीतून उमेदवारांची जणू एक जत्राच उतरे. कोणी पंजाबहून येई, कोणी मद्रासहून; कोणी नव्या फॅशनचा शौकीन, तर कोणी जुन्या साधेपणावर जीव ओवाळून टाकणारा. पंडितांना आणि मौलवींनाही आपापले नशीब अजमावण्याची संधी मिळाली. बिचारे आपल्याकडे सनद नाही म्हणून नेहमी रडत असत; इथे तिची काही गरजच नव्हती. रंगीत अमामे, चोगे, नाना प्रकारचे अंगरखे आणि कानटोप्या देवगडात आपला थाटमाट मिरवू लागल्या. पण सर्वांत जास्त भरणा पदवीधरांचा होता; कारण सनदेची अट नसली, तरी सनद गाठीशी असली, की निदान मूठ तरी झाकलेली राहते. सरदार सुजानसिंहांनी या महानुभावांच्या आदरसत्काराची फार चांगली व्यवस्था केली होती. मंडळी आपापल्या खोल्यांत बसून, रोजे पाळणाऱ्या मुसलमानांसारखी महिन्याचे दिवस मोजत असत. प्रत्येक जण आपापल्या अकलेप्रमाणे आपले जीवन चांगल्या रूपात दाखवण्याची धडपड करीत असे. मिस्टर 'अ' सकाळी नऊ वाजेपर्यंत झोपत असत; हल्ली ते बागेत फेरफटका मारीत उषेचे दर्शन घेत. मि. 'ब' यांना हुक्क्याचे व्यसन होते; पण हल्ली रात्र बरीच झाल्यावर दारे लावून अंधारात सिगार ओढत. मि. 'द', 'स' आणि 'ज' यांनी आपापल्या घरी नोकरांच्या नाकी नऊ आणलेले असत; पण हल्ली ही सज्जन मंडळी 'आपण' आणि 'जनाब' म्हटल्याशिवाय नोकरांशी बोलत नसत. महाशय 'क' नास्तिक होते, हक्सलेचे उपासक; पण हल्ली त्यांची धर्मनिष्ठा पाहून देवळाच्या पुजाऱ्याला आपली जागा जाते की काय, अशी धास्ती वाटत असे.
परीक्षा
मिस्टर 'ल' यांना पुस्तकांचा तिटकारा होता; पण हल्ली ते मोठमोठे ग्रंथ चाळण्या-वाचण्यात बुडालेले असत. कोणाशीही बोला, तो नम्रतेचा आणि सदाचाराचा अवतारच वाटे. शर्माजी घटकाभर रात्र उरली असतानाच वेदमंत्र म्हणू लागत, आणि मौलवीसाहेबांना तर नमाज आणि कुराणपठणाशिवाय दुसरे कामच नव्हते. लोकांना वाटे, एका महिन्याची कटकट आहे, कशीबशी निभावून न्यावी; एकदा काम फत्ते झाले, की मग कोण विचारतो? पण माणसांचा तो म्हातारा जवाहिऱ्या आडोशाला बसून पाहत होता, की या बगळ्यांमध्ये हंस कुठे लपला आहे! (३) एके दिवशी नव्या फॅशनवाल्यांना सुचले, की आपापसांत 'हॉकी'चा सामना व्हावा. हा प्रस्ताव हॉकीच्या मुरलेल्या खेळाडूंनी मांडला. शेवटी हीसुद्धा एक विद्याच की! ती का म्हणून लपवून ठेवायची? कुणास ठाऊक, हाताच्या थोड्याशा कसबानेच काम होऊन जाईल. चला, ठरले. कोर्टे आखली गेली, खेळ सुरू झाला, आणि चेंडू एखाद्या कचेरीतल्या अप्रेंटिससारखा ठोकरा खाऊ लागला. देवगड संस्थानात हा खेळ म्हणजे अगदी नवलाईची गोष्ट होती. शिकलेसवरलेले सभ्य लोक बुद्धिबळ आणि पत्ते यांसारखे गंभीर खेळ खेळत. धावण्या-उड्या मारण्याचे खेळ म्हणजे पोरांचे खेळ समजले जात. खेळ मोठ्या जोशात चालला होता. चढाई करणारे खेळाडू चेंडू घेऊन सुसाट सुटत, तेव्हा जणू एखादी लाट पुढे पुढे येते आहे असे वाटे. पण दुसऱ्या बाजूचे खेळाडू ही चढती लाट अशी अडवून धरत, की जणू लोखंडी भिंतच. संध्याकाळपर्यंत हीच धामधूम चालली. सगळे घामाने निथळू लागले. रक्तातली ऊब डोळ्यांतून आणि चेहऱ्यांवरून झळकत होती. धापा टाकत टाकत सगळे गळून गेले, पण हार-जीत काही ठरू शकली नाही.
परीक्षा
अंधार पडला होता. या मैदानापासून थोडे दूर एक ओढा होता. त्यावर पूल नव्हता. वाटसरूंना ओढ्यातूनच चालत यावे लागे. खेळ नुकताच थांबला होता आणि खेळाडू बसून दम खात होते, तोच एक शेतकरी धान्याने भरलेली गाडी घेऊन त्या ओढ्यात उतरला. पण एक तर ओढ्यात चिखल होता, आणि शिवाय काठाचा चढ इतका उभा होता, की गाडी वर चढू शकत नव्हती. तो कधी बैलांना ललकारी, कधी चाकांना हाताने रेटा देई; पण ओझे जास्त होते आणि बैल अशक्त. गाडी वर चढत नसे, आणि चढलीच तर थोडी वर जाऊन पुन्हा घसरत खाली येई. शेतकरी पुन्हा पुन्हा जोर लावी आणि पुन्हा पुन्हा चिडून बैलांना मारी; पण गाडी वर यायचे नावच घेत नव्हती. बिचारा निराश होऊन इकडेतिकडे पाही, पण तिथे कोणी मदतीला येणारा दिसत नव्हता. गाडी एकटी सोडून कुठे जाताही येत नव्हते. मोठ्या संकटात सापडला होता. एवढ्यात खेळाडू हातांत काठ्या घेऊन डुलत-झुलत तिकडून निघाले. शेतकऱ्याने त्यांच्याकडे भेदरलेल्या डोळ्यांनी पाहिले, पण कोणाकडे मदत मागण्याचे धाडस त्याला झाले नाही. खेळाडूंनीही त्याला पाहिले, पण मिटलेल्या डोळ्यांनी; त्या डोळ्यांत सहानुभूती नव्हती. त्यांत स्वार्थ होता, मस्ती होती; पण उदारतेचे आणि वात्सल्याचे नावही नव्हते. (४) पण त्याच घोळक्यात एक असाही माणूस होता, ज्याच्या हृदयात दया होती आणि धाडस होते. आज हॉकी खेळताना त्याच्या पायांना मार लागला होता. तो लंगडत हळूहळू चालला होता. अचानक त्याची नजर गाडीवर पडली. तो थबकला. शेतकऱ्याचा चेहरा पाहताच त्याला सारे काही कळून चुकले. त्याने काठी एका बाजूला ठेवली, कोट काढला, आणि शेतकऱ्याजवळ जाऊन म्हणाला—मी तुझी गाडी काढून देऊ का?
परीक्षा
शेतकऱ्याने पाहिले, तर एक कमावलेल्या शरीराचा उंच माणूस समोर उभा आहे. तो वाकून म्हणाला—हुजूर! आपल्याला मी हे कसं सांगणार? तरुण म्हणाला—तू इथं बराच वेळ अडकून पडलेला दिसतोस. बरं, तू गाडीवर बसून बैल सांभाळ, मी चाकांना रेटा देतो; आत्ता गाडी वर चढते बघ. शेतकरी गाडीवर जाऊन बसला. तरुणाने जोर लावून चाकांना रेटा दिला. चिखल फारच होता. तो गुडघ्यापर्यंत जमिनीत रुतला; पण त्याने हिंमत सोडली नाही. त्याने पुन्हा जोर लावला; तिकडे शेतकऱ्याने बैलांना ललकारले. बैलांना आधार मिळाला, त्यांना धीर आला; त्यांनी खांदे झुकवून एकदा जोर केला, तो गाडी ओढ्यातून वर काठावर आलीसुद्धा. शेतकरी तरुणापुढे हात जोडून उभा राहिला. म्हणाला—महाराज! आज आपल्यामुळं मी तरलो; नाहीतर सारी रात्र इथंच बसून काढावी लागली असती. तरुण हसून म्हणाला—मग, मला काही बक्षीस देतोस की नाही? शेतकरी गंभीरपणे म्हणाला—नारायणाची इच्छा असेल, तर दिवाणपद आपल्यालाच मिळेल. तरुणाने शेतकऱ्याकडे निरखून पाहिले. त्याच्या मनात एक शंका आली—हे सुजानसिंह तर नव्हेत? आवाज जुळतो, चेहरामोहराही तोच. शेतकऱ्यानेही त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्याच्या मनातली शंका त्याने बहुधा ओळखली. स्मित करून तो म्हणाला—खोल पाण्यात बसल्यावरच मोती मिळतो. (५) अखेर महिना पुरा झाला. निवडीचा दिवस येऊन ठेपला. उमेदवार मंडळी पहाटेपासूनच आपल्या नशिबाचा फैसला ऐकायला आतुर झाली होती. दिवस ढकलणे डोंगराएवढे जड झाले. प्रत्येक चेहऱ्यावर आशा-निराशेचे रंग येत-जात होते. कोण जाणे, आज कुणाचे नशीब उघडेल? कुणास ठाऊक, कुणावर लक्ष्मीची कृपादृष्टी होईल?
परीक्षा
संध्याकाळी राजेसाहेबांचा दरबार भरला. शहरातले रईस आणि धनाढ्य लोक, संस्थानचे अधिकारी आणि दरबारी, आणि दिवाणपदाच्या उमेदवारांचा घोळका—सगळे रंगीबेरंगी थाटमाट करून दरबारात येऊन विराजमान झाले! उमेदवारांची काळजे धडधडत होती. तेव्हा सरदार सुजानसिंह उभे राहून म्हणाले—दिवाणपदाच्या माझ्या उमेदवार महाशयांनो! मी आपल्याला जे कष्ट दिले, त्याबद्दल मला क्षमा करावी. या पदासाठी मला अशा पुरुषाची आवश्यकता होती, ज्याच्या हृदयात दया असेल आणि त्याचबरोबर आत्मबलही. हृदय असे, जे उदार असेल; आत्मबल असे, जे संकटाला वीरतेने तोंड देईल. आणि या संस्थानाच्या सुदैवाने आम्हाला असा पुरुष मिळाला आहे. असे गुण असलेले लोक जगात थोडेच आहेत, आणि जे आहेत ते कीर्तीच्या आणि मानसन्मानाच्या शिखरावर बसलेले आहेत; त्यांच्यापर्यंत आमचा हात पोचत नाही. पंडित जानकीनाथांसारखा दिवाण लाभल्याबद्दल मी संस्थानाचे अभिनंदन करतो. संस्थानच्या अधिकाऱ्यांनी आणि रईसांनी जानकीनाथांकडे पाहिले. उमेदवारांच्या घोळक्याचे डोळेही तिकडे वळले; पण त्या डोळ्यांत आदर होता, तर या डोळ्यांत असूया. सरदारसाहेब पुढे म्हणाले—आपल्याला हे मान्य करायला काही हरकत नसावी, की जो पुरुष स्वतः जखमी असूनही एका गरीब शेतकऱ्याची भरलेली गाडी दलदलीतून काढून ओढ्याच्या काठावर चढवतो, त्याच्या हृदयात धाडस, आत्मबल आणि उदारता यांचा वास असतो. असा माणूस गरिबांना कधी छळणार नाही. त्याचा संकल्प दृढ आहे, आणि तो त्याचे चित्त स्थिर ठेवील. तो एखाद्या वेळी फसेलही, पण दया आणि धर्म यांपासून कधीही ढळणार नाही.