मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
पौषाची रात्र
हल्कू आत येऊन बायकोला म्हणाला—सहना आलाय. आण, ठेवलेले रुपये आहेत ते त्याला देऊन टाकतो. कसा का होईना, एकदाचा पिच्छा तरी सुटेल. मुन्नी झाडलोट करत होती. मागे वळून म्हणाली—तीनच तर रुपये आहेत. ते देऊन टाकले तर कांबळं कुठून येणार? माघ-पौषाच्या रात्री रानात कशा काढायच्या? त्याला सांगा, पीक आलं की रुपये देऊ. आत्ता नाही. हल्कू क्षणभर द्विधा मनःस्थितीत उभा राहिला. पौष डोक्यावर येऊन ठेपला होता; कांबळ्याशिवाय रात्री रानात त्याला काही केल्या झोपता येणार नव्हतं. पण सहना ऐकणार नाही; दमदाटी करील, शिव्या देईल. थंडीत मेलो तर मेलो, ही ब्याद तरी डोक्यावरून टळेल. असा विचार करत तो आपला अवजड, धिप्पाड देह घेऊन (हल्कू म्हणजे हलका, पण हा देह ते नाव खोटं ठरवत होता) बायकोजवळ आला आणि आर्जवं करत म्हणाला—आण, दे ना, पिच्छा तरी सुटेल. कांबळ्यासाठी दुसरा काहीतरी उपाय शोधीन. मुन्नी त्याच्यापासून दूर सरकली आणि डोळे वटारून म्हणाली—केलात हो तुम्ही दुसरा उपाय! जरा ऐकू तरी, कोणता उपाय करणार आहात ते? कोणी धर्मादाय म्हणून देणार आहे का कांबळं? कोण जाणे किती थकबाकी आहे, काही केल्या फिटतच नाही. मी म्हणते, तुम्ही ही शेती का सोडून देत नाही? मरमर राबा, पीक आलं की थकबाकी भरा, चला, मोकळे झालो! थकबाकी फेडायलाच तर आपला जन्म झालाय. पोटासाठी मजुरी करा. पुरे झाली असली शेती. मी रुपये देणार नाही, नाही म्हणजे नाही देणार. हल्कू हिरमुसून म्हणाला—मग काय त्याच्या शिव्या खाऊ? मुन्नी उसळून म्हणाली—शिव्या का देईल? त्याचं काय राज्य आहे काय?
पौषाची रात्र
पण हे बोलता बोलताच तिच्या ताणलेल्या भुवया सैल पडल्या. हल्कूच्या त्या वाक्यात जे कठोर सत्य होतं, ते जणू एखाद्या भयंकर जनावरासारखं तिच्याकडे रोखून पाहत होतं. तिने जाऊन कोनाड्यातून रुपये काढले आणि आणून हल्कूच्या हातावर ठेवले. मग म्हणाली—या खेपेपासून तुम्ही शेती सोडूनच द्या. मजुरीत निदान सुखाने एक भाकर तरी खायला मिळेल. कोणाची दमदाटी तरी ऐकावी लागणार नाही. छान आहे शेती! मजुरी करून आणायचं, तेही त्यातच ओतायचं, आणि वर दमदाटी ती वेगळीच. हल्कूने रुपये घेतले आणि जणू आपलं काळीजच काढून द्यायला निघाला असावा, अशा तऱ्हेने तो बाहेर पडला. मजुरीतून एकेक पैसा पोटाला चिमटा घेऊन बाजूला काढत त्याने कांबळ्यासाठी तीन रुपये जमवले होते. ते आज हातातून चालले होते. प्रत्येक पावलागणिक आपल्या दैन्याच्या ओझ्याखाली त्याची मान खाली दबत चालली होती. पौषाची अंधारी रात्र. आकाशात तारे थंडीने कुडकुडत असल्यासारखे दिसत होते. हल्कू आपल्या शेताच्या कडेला उसाच्या पाचटाच्या छपरीखाली बांबूच्या बाजल्यावर आपली जुनी, जाडीभरडी चादर पांघरून पडल्या पडल्या थरथरत होता. बाजल्याखाली त्याचा सोबती, कुत्रा जबरा, पोटात तोंड खुपसून थंडीने कूं-कूं करत होता. दोघांपैकी एकालाही झोप येत नव्हती. हल्कू गुडघे गळ्याशी आवळून घेत म्हणाला—काय रे जबरा, थंडी वाजते? सांगत होतो ना, घरी पेंढ्यावर पडून राहा म्हणून. इथं काय घ्यायला आलास? आता खा थंडी, मी काय करू? तुला वाटलं, मी इथं शिरा-पुरी खायला चाललोय, म्हणून धावत धावत पुढं पुढं आलास. आता बोंब मार आजीच्या नावानं.
पौषाची रात्र
जबराने पडल्या पडल्याच शेपटी हलवली, आपली कूं-कूं लांबवत लांबवत एकदा जांभई दिली आणि तो गप्प झाला. आपल्या कूं-कूंमुळे धन्याला झोप लागत नाहीये, हे त्याच्या श्वानबुद्धीने बहुधा ओळखलं असावं. हल्कूने हात बाहेर काढून जबराची गार पडलेली पाठ कुरवाळत म्हटलं—उद्यापासून माझ्याबरोबर येऊ नकोस, नाहीतर गार होऊन जाशील. हे मुडदं पश्चिमेचं वारं कुठून बर्फ घेऊन येतंय कोण जाणे. उठतो, आणखी एक चिलीम भरतो. कशीबशी रात्र तरी सरू दे. आठ चिलमी तर ओढून झाल्या. ही शेतीची मजा! आणि एकेक नशीबवान असे पडलेत, की थंडी त्यांच्याजवळ गेली तर उबेने घाबरून पळ काढील. जाड जाड गाद्या, रजया, कांबळी. काय बिशाद आहे थंडीची, तिथवर पोचायची! नशिबाचा खेळ आहे. राबायचं आम्ही, अन् मजा मारणार दुसरे. हल्कू उठला आणि खड्ड्यातून थोडासा विस्तव काढून त्याने चिलीम भरली. जबराही उठून बसला. हल्कू चिलीम ओढत म्हणाला—ओढतोस चिलीम? थंडी काही जात नाही म्हणा, पण हां, जरा मन रमतं. जबराने प्रेमाने ओथंबलेल्या डोळ्यांनी त्याच्या तोंडाकडे पाहिलं. हल्कू—आजची रात्र आणखी थंडी सोसून घे. उद्यापासून मी इथं पेंढा अंथरून ठेवीन. त्यात शिरून बसायचं, मग नाही थंडी वाजणार. जबराने पुढचे पंजे त्याच्या गुडघ्यांवर ठेवले आणि आपलं तोंड त्याच्या तोंडाजवळ नेलं. हल्कूला त्याचा गरम श्वास जाणवला. चिलीम ओढून हल्कू पुन्हा आडवा झाला, आणि या वेळी काहीही झालं तरी झोपायचंच, असा निश्चय करून आडवा झाला. पण क्षणभरातच त्याच्या उरात कापरं भरलं. कधी या कुशीवर वळे, कधी त्या कुशीवर; पण थंडी एखाद्या पिशाच्चासारखी त्याची छाती दाबून बसली होती.
पौषाची रात्र
जेव्हा काही केल्या राहवेना, तेव्हा त्याने जबराला हळूच उचललं आणि त्याचं डोकं थोपटून त्याला आपल्या कुशीत झोपवलं. कुत्र्याच्या अंगाला कसली कोण जाणे दुर्गंधी येत होती, पण त्याला कुशीत कवटाळून धरताना हल्कूला असं सुख मिळत होतं, जे गेल्या कित्येक महिन्यांत त्याच्या वाट्याला आलं नव्हतं. जबराला बहुधा वाटत असावं, की स्वर्ग इथेच आहे; आणि हल्कूच्या पवित्र मनात तर त्या कुत्र्याविषयी घृणेचा वाससुद्धा नव्हता. आपल्या एखाद्या जिवलग मित्राला किंवा भावालाही त्याने इतक्याच तत्परतेने उराशी कवटाळलं असतं. ज्या दारिद्र्याने आज त्याला या दशेला आणून सोडलं होतं, त्याने तो घायाळ झाला नव्हता. नाही; या अनोख्या मैत्रीने जणू त्याच्या आत्म्याची सारी दारं उघडून टाकली होती, आणि त्याचा अणुरेणू प्रकाशाने उजळून निघाला होता. इतक्यात जबराला कुठल्याशा जनावराची चाहूल लागली. या खास जिव्हाळ्याने त्याच्यात एक नवी तरतरी आणली होती, जी वाऱ्याच्या गार झोतांना कस्पटासमान लेखत होती. तो चटकन उठला आणि छपरीबाहेर येऊन भुंकू लागला. हल्कूने त्याला अनेकदा चुचकारून बोलावलं; पण तो त्याच्याजवळ आला नाही. रानाच्या चहूबाजूंनी धावत धावत भुंकत राहिला. क्षणभर परत आलाच, तर लगेच पुन्हा धाव घेई. कर्तव्य त्याच्या उरात एखाद्या हौसेसारखं उसळ्या मारत होतं. आणखी एक तास उलटला. रात्रीने वाऱ्यात थंडीचा जाळ पेटवायला सुरुवात केली. हल्कू उठून बसला आणि दोन्ही गुडघे छातीशी घेऊन त्याने आपलं डोकं त्यांत लपवलं; तरीही थंडी कमी झाली नाही. असं वाटत होतं, की अंगातलं सगळं रक्त गोठून गेलं आहे, धमन्यांतून रक्ताऐवजी बर्फ वाहतो आहे.
पौषाची रात्र
अजून किती रात्र उरली आहे, हे पाहायला त्याने वाकून आकाशाकडे नजर टाकली. सप्तर्षी अजून आकाशात अर्धेसुद्धा वर चढले नाहीत. ते वर आले, की मग कुठे पहाट होईल. अजून प्रहराहून जास्त रात्र बाकी आहे. हल्कूच्या शेतापासून साधारण बंदुकीच्या गोळीच्या टप्प्याइतक्या अंतरावर आंब्याची एक बाग होती. पानगळ सुरू झाली होती. बागेत पानांचा खच पडला होता. हल्कूने विचार केला, जावं, पानं गोळा करावीत आणि ती पेटवून मनसोक्त शेकावं. रात्री कोणी मला पानं गोळा करताना पाहिलं, तर समजेल कोणी भूतच आहे. कोण जाणे, एखादं जनावरच दबा धरून बसलं असेल; पण आता असं नुसतं बसून राहवत नाही. त्याने जवळच्या तुरीच्या शेतात जाऊन काही झाडं उपटली, त्यांचा एक झाडू बांधला आणि हातात धुमसती गोवरी घेऊन तो बागेच्या दिशेने निघाला. त्याला येताना पाहून जबरा जवळ आला आणि शेपटी हलवू लागला. हल्कू म्हणाला—आता नाही राहवत रे जबरू! चल, बागेत पानं गोळा करून शेकू. अंगात ऊब आली की मग परत येऊन झोपू. अजून तर रात्र खूप आहे. जबराने कूं-कूं करून संमती दर्शवली आणि तो पुढे पुढे बागेकडे चालू लागला. बागेत गडद अंधार पसरला होता, आणि त्या अंधारात निर्दय वारा पानांना तुडवत चालला होता. झाडांवरून दवाचे थेंब टप-टप खाली गळत होते. अचानक एक झुळूक मेंदीच्या फुलांचा सुगंध घेऊन आली. हल्कू म्हणाला—किती छान वास आला रे जबरू! तुझ्या नाकात येतोय का काही सुगंध? जबराला कुठेतरी जमिनीवर पडलेलं एक हाड सापडलं होतं. तो ते चघळत होता.
पौषाची रात्र
हल्कूने विस्तव जमिनीवर ठेवला आणि तो पानं गोळा करू लागला. थोड्याच वेळात पानांचा एक ढीग जमला. हात गारठून आखडत होते. अनवाणी पाय गोठून जात होते. आणि तो पानांचा डोंगर रचत होता. याच शेकोटीत तो थंडीला जाळून राख करून टाकणार होता. थोड्याच वेळात शेकोटी भडकली. तिच्या ज्वाळा वरच्या झाडाच्या पानांना शिवून शिवून पळू लागल्या. त्या अस्थिर उजेडात बागेतले प्रचंड वृक्ष असे भासत होते, जणू त्या अथांग अंधाराला त्यांनी आपल्या माथ्यांवर तोलून धरलं आहे. अंधाराच्या त्या अनंत सागरात हा उजेड एखाद्या नावेसारखा हेलकावे खात, हिंदकळत असल्यासारखा वाटत होता. हल्कू शेकोटीसमोर बसून शेकत होता. क्षणभरातच त्याने अंगावरची दुपदरी चादर काढून काखेत दाबली आणि दोन्ही पाय पसरले; जणू तो थंडीला ललकारत होता, कर, तुझ्या मनात येईल ते कर. थंडीच्या अमर्याद शक्तीवर विजय मिळवल्याचा अभिमान त्याला मनात लपवता येत नव्हता. तो जबराला म्हणाला—काय रे जबरू, आता नाही ना थंडी वाजत? जबराने कूं-कूं करून जणू म्हटलं—आता थोडीच वाजत राहणार थंडी! 'आधीच हा उपाय सुचला नाही, नाहीतर एवढं कशाला कुडकुडत बसलो असतो.' जबराने शेपटी हलवली. 'बरं, ये, ही शेकोटी उडी मारून ओलांडू. बघू, कोण पार जातो ते. भाजलास पठ्ठ्या, तर मी काही औषधपाणी करणार नाही.' जबराने या अग्निराशीकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. 'उद्या मुन्नीला सांगू नकोस हां, नाहीतर भांडण काढील.' असं म्हणत त्याने उडी घेतली आणि तो त्या शेकोटीवरून अलगद पार गेला. पायांना जरा झळ लागली, पण ती काही विशेष गोष्ट नव्हती. जबरा आगीला वळसा घालून त्याच्याजवळ येऊन उभा राहिला.
पौषाची रात्र
हल्कू म्हणाला—चल, चल, हे नाही चालायचं. वरून उडी मारून ये. हल्कूने पुन्हा उडी मारली आणि तो शेकोटीच्या अलीकडे आला. पानं जळून गेली होती. बागेत पुन्हा अंधार पसरला होता. राखेखाली थोडाथोडा विस्तव शिल्लक होता; वाऱ्याची झुळूक आली की तो जागा होई, पण क्षणात पुन्हा डोळे मिटून घेई. हल्कूने पुन्हा चादर पांघरली आणि गरम राखेजवळ बसून तो एक गाणं गुणगुणू लागला. त्याच्या अंगात ऊब आली होती. पण जसजशी थंडी वाढत चालली, तसतसा आळस त्याच्यावर स्वार होऊ लागला. जबरा जोरात भुंकत शेताकडे धावला. हल्कूला असं वाटलं, की जनावरांचा एक कळप त्याच्या शेतात शिरला आहे. बहुधा नीलगायींचा कळप असावा. त्यांच्या उड्या मारण्याचे, धावण्याचे आवाज स्पष्ट कानावर येत होते. मग असं वाटलं, की त्या शेतात चरत आहेत. त्यांच्या चरण्याचा करकर आवाज ऐकू येऊ लागला. त्याने मनाशी म्हटलं—छे, जबरा असताना कोणतंही जनावर शेतात येऊच शकत नाही. लचकेच तोडील तो. मलाच भास होतोय. कुठे काय? आता तर काहीच ऐकू येत नाही. मलाही कसा भ्रम झाला! त्याने मोठ्याने हाक मारली—जबरा, जबरा! जबरा भुंकतच राहिला. त्याच्याजवळ आला नाही. पुन्हा शेत चरलं जात असल्याची चाहूल लागली. आता त्याला स्वतःची समजूत घालता आली नाही. जागेवरून हलणं त्याला विषासारखं वाटत होतं. किती छान ऊब धरून बसला होता! या थंडीत, या दहिवरात शेतात जाणं, जनावरांमागे धावणं त्याला अशक्य वाटलं. तो जागचा हलला नाही. त्याने जोरात आरोळी ठोकली—लिहो-लिहो! लिहो!!
पौषाची रात्र
जबरा पुन्हा भुंकू लागला. जनावरं शेत चरत होती. पीक तयार झालंय. केवढं चांगलं पीक आलं होतं, पण ही दुष्ट जनावरं त्याची धूळधाण उडवताहेत. हल्कू पक्का निश्चय करून उठला आणि दोन-तीन पावलं चालला; पण तेवढ्यात वाऱ्याचा असा गार, बोचरा, विंचवाच्या नांगीसारखा झोत अंगाला लागला, की तो पुन्हा विझत चाललेल्या शेकोटीजवळ येऊन बसला आणि राख उकरून आपलं गारठलेलं अंग शेकू लागला. जबरा घसा फोडून भुंकत होता, नीलगायी शेताचा फडशा पाडत होत्या, आणि हल्कू गरम राखेजवळ शांत बसून होता. निष्क्रियतेने त्याला दोरखंडांसारखं चहूबाजूंनी जखडून टाकलं होतं. त्याच राखेजवळ, उबदार जमिनीवर चादर पांघरून तो झोपी गेला. सकाळी त्याला जाग आली तेव्हा चोहीकडे ऊन पसरलं होतं. आणि मुन्नी म्हणत होती—आज झोपूनच राहायचंय का? तुम्ही इथं येऊन रमून गेलात, आणि तिकडे सगळ्या शेताचं वाटोळं झालं. हल्कू उठून म्हणाला—तू शेताकडून येतेयस का? मुन्नी म्हणाली—हो, सगळ्या शेताचा सत्यानाश झालाय. असं कोणी झोपतं का कधी? इथं खोपटं घालून काय उपयोग झाला तुमचा? हल्कूने बहाणा केला—मरता मरता वाचलो, अन् तुला आपल्या शेताचं पडलंय. पोटात अशी कळ आली, ते माझं मलाच ठाऊक. दोघे मग शेताच्या बांधावर आले. पाहतात तो, सगळं शेत तुडवलं गेलं आहे, आणि जबरा खोपटाखाली उताणा पडला आहे, जणू त्याच्यात प्राणच नाहीत. दोघे शेताची दशा पाहत होते. मुन्नीच्या चेहऱ्यावर उदासी पसरली होती. पण हल्कू प्रसन्न होता. मुन्नी काळजीने म्हणाली—आता मजुरी करून शेतसारा भरावा लागणार. हल्कू प्रसन्न चेहऱ्याने म्हणाला—रात्रीच्या थंडीत इथं झोपावं तर लागणार नाही.