मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
प्रेरणा
माझ्या वर्गात सूर्यप्रकाशइतका उपद्व्यापी मुलगा दुसरा नव्हता; किंबहुना असे म्हणा ना, की अध्यापनाच्या दहा वर्षांत इतक्या अवघड स्वभावाच्या शिष्याशी माझी गाठ पडली नव्हती. लबाडीचे खेळ म्हणजे त्याचा जीव की प्राण. शिक्षकांची टर उडवण्यात आणि त्यांना चिडवण्यात, अभ्यासू मुलांची खोडी काढण्यात आणि त्यांना रडवण्यातच त्याला आनंद वाटे. असे असे कट रची, असे असे फास टाकी, असे असे डाव मांडी, की पाहून थक्क व्हावे. टोळी जमवण्यात तर तो तरबेज होता. स्वतःच नेमलेल्या फौजदारांची एक फौजच त्याने उभी केली होती आणि तिच्या दहशतीच्या जोरावर तो शाळेवर राज्य करी. मुख्याध्यापकांची आज्ञा एक वेळ मोडली जाईल, पण त्याचा हुकूम मोडण्याची कोणाची टाप नव्हती. शाळेचे चपराशी आणि अर्दली त्याला चळचळा कापत. इन्स्पेक्टरांची तपासणी व्हायची होती; मुख्याध्यापकांनी हुकूम काढला, की मुलांनी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी यावे. हेतू हा, की तपासणीबद्दल काही जरुरीच्या गोष्टी मुलांना सांगून ठेवाव्यात. पण दहा वाजले, इन्स्पेक्टरसाहेब येऊन बसले, आणि शाळेत एकही मुलगा नाही! अकरा वाजता सारे विद्यार्थी असे अवतरले, जणू कोणी पिंजरा उघडून दिला असावा. इन्स्पेक्टरसाहेबांनी शेऱ्यात लिहिले—डिसिप्लिन फार खराब आहे. प्रिन्सिपॉलसाहेबांची फजिती झाली, शिक्षकांची बदनामी झाली; आणि हा सारा खोडसाळपणा सूर्यप्रकाशचा होता. पण पुष्कळ चौकशी करूनही कोणी सूर्यप्रकाशचे नावसुद्धा घेतले नाही. वर्ग चालवण्याच्या आपल्या पद्धतीचा मला अभिमान होता. ट्रेनिंग कॉलेजात या विषयात मी नाव कमावले होते. पण इथे माझ्या त्या साऱ्या कौशल्याला जणू गंज चढला होता.
प्रेरणा
या सैतानाला सन्मार्गावर कसे आणावे, याबाबत अक्कलच चालेना. शिक्षकांची अनेकदा बैठक झाली; पण ही गाठ काही सुटली नाही. नव्या शिक्षणपद्धतीला धरून मी दंडनीतीचा पुरस्कर्ता नव्हतो; पण इथे आम्ही त्या नीतीपासून दूर राहिलो ते केवळ एवढ्याचसाठी, की न जाणो, उपचारच रोगापेक्षा असाध्य होऊन बसायचा! सूर्यप्रकाशला शाळेतून काढून टाकण्याचा प्रस्तावही आला; पण तो आपल्याच असमर्थतेचा पुरावा ठरेल असे वाटून तो मार्ग पत्करण्याचे धाडस आम्हांला झाले नाही. वीस-बावीस अनुभवी आणि शिक्षणशास्त्रात पारंगत असे आचार्य बारा-तेरा वर्षांच्या एका उद्दाम पोराला सुधारू शकू नयेत, हा विचार फारच निराश करणारा होता. तसे पाहिले तर सारी शाळाच त्याच्यापुढे 'त्राहि त्राहि' करीत होती; पण सर्वांत मोठ्या संकटात होतो मी, कारण तो माझ्या वर्गातला विद्यार्थी होता आणि त्याच्या खोड्यांची फळे मला भोगावी लागत. शाळेत आलो की सतत एकच धाकधूक लागलेली असे: पाहू, आज कोणते अरिष्ट ओढवते! एके दिवशी मी आपल्या टेबलाचा खण उघडला, तर त्यातून एक भला मोठा बेडूक टुणकन बाहेर पडला. मी दचकून मागे सरलो, तसा वर्गात एकच गलका झाला. त्याच्याकडे रागाने डोळे वटारून पाहण्यापलीकडे मला काही करता आले नाही. सारा तास उपदेशात गेला, आणि तो पठ्ठ्या मान खाली घालून गालातल्या गालात हसत होता. हा खालच्या वर्गांतून पास कसा झाला, याचे मला आश्चर्य वाटे. एके दिवशी मी रागाने म्हणालो—तू या वर्गातून जन्मात पास होणार नाहीस. सूर्यप्रकाश जराही न डगमगता म्हणाला—माझ्या पास होण्याची काळजी आपण करू नका. मी नेहमी पास होत आलो आहे आणि या खेपेलाही होईन. 'अशक्य!' 'अशक्य ते शक्य होईल!'
प्रेरणा
मी आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे पाहू लागलो. हुशारातला हुशार मुलगाही आपल्या यशाची ग्वाही इतक्या निःशंकपणे देऊ शकला नसता. मला वाटले, हा प्रश्नपत्रिका लांबवत असावा. मी प्रतिज्ञा केली: या खेपेला याची एकही चाल चालू देणार नाही. पाहतो, किती दिवस या वर्गात पडून राहतो ते. आपण होऊन वैतागून निघून जाईल. वार्षिक परीक्षेच्या वेळी मी विलक्षण दक्षता बाळगली; पण सूर्यप्रकाशची उत्तरपत्रिका पाहिली तेव्हा माझ्या विस्मयाला पारावार उरला नाही. माझे दोन पेपर होते; दोन्हींत त्याचे गुण वर्गात सर्वांत जास्त होते. माझ्या कोणत्याही पेपरातला एकही प्रश्न त्याला सोडवता येणार नाही, हे मला पक्के ठाऊक होते. मी ते सिद्धही करू शकलो असता; पण त्याच्या उत्तरपत्रिकांचे काय करणार! अक्षरात संशय यावा एवढा फरक नव्हता. मी प्रिन्सिपॉलांना सांगितले, तर तेही चक्रावले; पण त्यांनाही डोळ्यांदेखत माशी गिळावी लागली. मी बहुधा स्वभावानेच निराशावादी आहे. इतर शिक्षक सूर्यप्रकाशबद्दल जराही चिंतेत असलेले मला दिसत नसत; जणू असली मुले शाळेत येणे ही काही नवी गोष्ट नव्हे. पण माझ्यासाठी तो एक बिकट कोडे होता. हेच ढंग राहिले, तर एक दिवस तो एक तर तुरुंगात असेल, नाही तर वेड्यांच्या इस्पितळात. ( २ ) त्याच वर्षी माझी बदली झाली. इथली हवा मला मानवली होती, प्रिन्सिपॉल आणि इतर शिक्षक यांच्याशी स्नेह जमला होता; तरीही बदलीने मला आनंद झाला, कारण सूर्यप्रकाश आता माझ्या वाटेतला काटा राहणार नव्हता. मुलांनी मला निरोपाची मेजवानी दिली आणि झाडून सारे स्टेशनपर्यंत पोचवायला आले. त्या वेळी सगळ्या मुलांचे डोळे पाण्याने भरले होते! मलाही आपले अश्रू आवरले नाहीत. एकाएकी माझी नजर सूर्यप्रकाशवर गेली; तो सर्वांच्या मागे ओशाळून उभा होता. त्याचेही डोळे ओले झाले आहेत, असे मला वाटले.
प्रेरणा
निघता निघता त्याच्याशी दोन-चार शब्द बोलावेत, असे मला राहून राहून वाटत होते. कदाचित त्यालाही मला काही सांगायचे होते; पण आधी ना मी बोललो, ना तो; याची रुखरुख मात्र मला पुष्कळ दिवस लागून राहिली. त्याचा संकोच क्षम्य होता; पण माझे आखडून राहणे अक्षम्य होते. त्या हळव्या, खंतावलेल्या मनःस्थितीत माझे दोन-चार निष्कपट शब्द त्याच्या मनावर परिणाम करून गेले असते, हे शक्य होते; पण अशा गमावलेल्या संधींचेच तर नाव जीवन! गाडी संथ गतीने निघाली. मुले बरीच पावले तिच्याबरोबर धावली. मी खिडकीबाहेर डोके काढून उभा होतो. काही वेळ त्यांचे हलणारे रुमाल मला दिसत राहिले. मग त्या रेषा आकाशात विरून गेल्या; पण एक लहानखुरी आकृती अजूनही फलाटावर उभी होती. मी अंदाज केला, तो सूर्यप्रकाशच. त्या क्षणी माझे हृदय एखाद्या व्याकूळ कैद्याप्रमाणे तिरस्कार, मनातली अढी आणि उदासीनता यांची बंधने तटातट तोडून त्याला कवटाळण्यासाठी तडफडू लागले. नव्या ठिकाणच्या नव्या चिंतांनी फार लवकर मला आपल्याकडे ओढून घेतले. मागल्या दिवसांची आठवण एक हुरहूर होऊन राहिली. ना कोणाचे पत्र आले, ना मी कोणाला पत्र लिहिले. जगाची रीतच बहुधा अशी आहे. पाऊस सरल्यावर पावसाची हिरवळ किती दिवस टिकते? योगायोगाने मला इंग्लंडमध्ये विद्याभ्यास करण्याची संधी मिळाली. तिथे तीन वर्षे गेली. तिथून परतलो, तर मला एका कॉलेजचा प्रिन्सिपॉल करण्यात आले. हे यश मला अगदीच अनपेक्षित होते. माझी कल्पना स्वप्नातही एवढी दूर उडाली नव्हती; पण हुद्द्याची हाव आता याहूनही उंच फांदीवर आसरा घेऊ पाहत होती. शिक्षणमंत्र्यांशी घसट वाढवली. मंत्रिमहोदयांची माझ्यावर मेहेरनजर होती; पण खरे म्हणजे शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांचे त्यांना ज्ञान नव्हते. मी हाती लागताच त्यांनी सारा भार माझ्यावर टाकला.
प्रेरणा
घोड्यावर स्वार ते होते, लगाम माझ्या हातात होता. परिणाम असा झाला, की त्यांच्या राजकीय विरोधकांशी माझे वाकडे आले. माझ्यावर वाजवी-गैरवाजवी हल्ले होऊ लागले. मी तत्त्वतः सक्तीच्या शिक्षणाच्या विरोधात आहे. माझे मत असे, की ज्या गोष्टींचा संबंध माणसाच्या स्वतःशीच आहे, त्या गोष्टींत प्रत्येकाला अधिक स्वातंत्र्य असले पाहिजे. माझे मत असे, की सक्तीच्या शिक्षणाची गरज युरोपात आहे, भारतात नाही. भौतिकता हे पाश्चात्त्य संस्कृतीचे मूलतत्त्व आहे. तिथे कोणत्याही कामाची प्रेरणा आर्थिक लाभावर आधारलेली असते. जगण्याच्या गरजा जास्त आहेत; म्हणून जीवनसंग्रामही अधिक भीषण आहे. आईबाप चैनीचे गुलाम होऊन मुलांना लवकरात लवकर काही कमावण्यास भाग पाडतात. स्वतः दारू सोडून रोजचा एक शिलिंग वाचवण्याऐवजी ते आपल्या कोवळ्या वयाच्या मुलावर एक शिलिंगाची मजुरी करण्यासाठी दडपण आणतील. भारतीय जीवनात सात्त्विक साधेपणा आहे. परिस्थितीने अगदीच नाइलाज केल्याशिवाय आम्ही आपल्या मुलांकडून मजुरी करवून घेत नाही. दरिद्रातल्या दरिद्री हिंदुस्थानी मजुरालाही शिक्षणाने होणारे भले पटलेले आहे. आपल्या पोराने चार अक्षरे शिकावीत, अशी आस त्याच्या मनात असते. त्यामुळे त्याला काही अधिकार मिळेल म्हणून नव्हे; तर केवळ एवढ्यासाठी, की विद्या हा मानवी शीलाचा एक अलंकार आहे. हे जाणूनही तो आपल्या मुलाला शाळेत पाठवत नसेल, तर त्याचा नाइलाज आहे असे समजावे. अशा स्थितीत त्याच्यावर कायद्याचा प्रहार करणे माझ्या दृष्टीने न्यायाला धरून नाही. शिवाय माझ्या मते आपल्या देशात अजून लायक शिक्षकांची वाण आहे. अर्धवट शिकलेल्या आणि तुटपुंजा पगार मिळवणाऱ्या शिक्षकांकडून, ते आपल्यापुढे काही उच्च आदर्श ठेवतील, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. फार फार तर एवढेच होईल, की चार-पाच वर्षांत मुलाला अक्षरओळख होईल.
प्रेरणा
याला मी डोंगर पोखरून उंदीर काढणे समजतो. वयात आल्यावर हा प्रश्न एका महिन्यात सहज सुटू शकतो. मी अनुभवाने सांगू शकतो, की तरुणपणी आपण एका महिन्यात जेवढे ज्ञान मिळवू शकतो, तेवढे लहानपणी तीन वर्षांतही मिळवू शकत नाही; मग उगाचच मुलांना शाळेत कोंडून काय फायदा? शाळेबाहेर राहिला असता तर त्याला स्वच्छ हवा तरी मिळाली असती, निसर्गाचे अनुभव तरी आले असते. पाठशाळेत कोंडून तर तुम्ही त्याच्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही घडणींच्या मुळावरच घाव घालता. म्हणून प्रांतिक कायदेमंडळात सक्तीच्या शिक्षणाचा ठराव आला, तेव्हा माझ्या प्रेरणेने मिनिस्टरसाहेबांनी त्याला विरोध केला. परिणामी ठराव नामंजूर झाला. मग काय विचारता! मिनिस्टरसाहेबांवर आणि माझ्यावर अशी काही झोड उठली की विचारू नका. वैयक्तिक आरोप होऊ लागले. मी पडलो गरिबाची बायको; साऱ्यांची वहिनी व्हायची पाळी माझ्यावरच आली. मला देशद्रोही, प्रगतीचा शत्रू आणि नोकरशाहीचा गुलाम म्हटले गेले. माझ्या कॉलेजात जरा कुठे खुट्ट झाले, की कौन्सिलात माझ्यावर भडिमार सुरू होई. मी एका चपराशाला कामावरून काढले. सारे कौन्सिल हात धुऊन माझ्या मागे लागले. शेवटी मिनिस्टरसाहेबांना नाइलाजाने त्या चपराशाला परत कामावर घ्यावे लागले. हा अपमान मला असह्य होता. कदाचित कोणालाच तो सहन झाला नसता. मिनिस्टरसाहेबांविषयी माझी तक्रार नाही. त्यांचा नाइलाज होता. हां, या वातावरणात काम करणे मात्र मला अशक्यप्राय झाले. आपल्या कॉलेजची अंतर्गत व्यवस्था लावण्याचाही अधिकार मला नाही! अमक्याला परीक्षेला का पाठवले नाही, अमक्याऐवजी तमक्याला शिष्यवृत्ती का दिली नाही, अमक्या शिक्षकाला अमका वर्ग का दिला जात नाही, असल्या पोकळ आक्षेपांनी माझ्या नाकी नऊ आणले होते. या नव्या आघाताने कंबरडेच मोडले. मी राजीनामा दिला.
प्रेरणा
मिनिस्टरसाहेब निदान या बाबतीत तरी न्यायबुद्धीने वागतील, एवढी आशा मला नक्कीच होती; पण त्यांनी न्यायापेक्षा धोरण श्रेष्ठ मानले, आणि कित्येक वर्षांच्या निष्ठेचे मला हे फळ मिळाले, की मला पदावरून दूर करण्यात आले. जगाचा इतका कडू अनुभव मला तोवर कधी आला नव्हता. ग्रहही काही वाईट आले होते; त्याच दिवसांत पत्नीचे निधन झाले. अंत्यदर्शनही घेता आले नाही. संध्याकाळी नदीकाठी फिरायला गेलो होतो. तिची प्रकृती जरा बरी नव्हती. परतलो, तर समोर तिचा मृतदेह. बहुधा हृदयक्रिया बंद पडली असावी. या आघाताने कंबरडेच मोडले. आईच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठमोठे महापुरुष कृतार्थ झाले आहेत. मी जो काही झालो, तो पत्नीच्या कृपेने आणि आशीर्वादाने; तीच माझी भाग्यविधाती होती. केवढा अलौकिक त्याग, केवढे अफाट धैर्य! तिच्या गोडव्यात तिखटपणाचा लवलेशही नव्हता. तिच्या कपाळाला आठी पडलेली मी कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. निराश होणे तर तिला ठाऊकच नव्हते. मी कित्येकदा फार आजारी पडलो आहे. वैद्यांनीही आशा सोडली आहे; पण तिचा धीर आणि शांती कणभरही ढळली नाही. पतीच्या हयातीतच आपल्याला मरण येईल, असा तिचा विश्वास होता, आणि झालेही तसेच. आयुष्यात तोवर मी तिच्याच आधारावर उभा होतो. तो आधारच उरला नाही, तेव्हा जीवन कुठून उरणार? खाणे आणि झोपणे याचे नाव जीवन नव्हे. जीवन म्हणजे सतत पुढे जात राहण्याचा ध्यास. तो ध्यासच नाहीसा झाला. मला जगाविषयी विरक्ती आली. आणि एकांतवासात आयुष्याचे दिवस घालवण्याचा निश्चय करून मी एका लहानशा खेड्यात जाऊन राहिलो. चहूकडे उंच उंच टेकाडे होती, एका बाजूने गंगा वाहत होती. मी नदीच्या काठी एक छोटेसे घर बांधले आणि त्यातच राहू लागलो.
प्रेरणा
( ३ ) पण काम करणे हा तर मनुष्यस्वभावच. रिकामपणात आयुष्य कसे सरणार? मी एक लहानशी पाठशाळा काढली; एका झाडाच्या सावलीत गावातली मुले गोळा करून त्यांना काही शिकवीत असे. तिची इथे इतकी कीर्ती झाली, की आसपासच्या गावांतले विद्यार्थीही येऊ लागले. एके दिवशी मी आपल्या वर्गाला शिकवीत होतो, तोच पाठशाळेजवळ एक मोटार येऊन थांबली आणि तिच्यातून जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर उतरले. माझ्या अंगावर त्या वेळी फक्त एक कुडता आणि धोतर होते. या वेशात एका हाकिमाला भेटायची लाज वाटत होती. डेप्युटी कमिशनर माझ्याजवळ आले, तेव्हा मी संकोचत हात पुढे केला; पण माझ्याशी हस्तांदोलन करण्याऐवजी ते माझ्या पायांकडे वाकले आणि त्यांनी पायांवर डोके ठेवले. मी असा काही गांगरून गेलो, की माझ्या तोंडून एक शब्दही फुटेना. मी इंग्रजी चांगले लिहितो; तत्त्वज्ञानाचाही आचार्य आहे, व्याख्यानेही चांगली देतो; पण या गुणांतला एकही श्रद्धेला पात्र नाही. श्रद्धा ही तर ज्ञानी आणि साधू यांच्याच हक्काची वस्तू. मी ब्राह्मण असतो तर गोष्ट वेगळी. तसे म्हटले तर एखाद्या सिव्हिलियनने कुण्या ब्राह्मणाच्या पायांवर डोके ठेवावे, हीसुद्धा कल्पनेपलीकडची गोष्ट. मी अजून या विस्मयातच होतो, तोच डेप्युटी कमिशनरांनी डोके वर केले आणि माझ्याकडे पाहून म्हटले—आपण बहुधा मला ओळखले नाही. एवढे ऐकताच माझ्या स्मृतीचे डोळे उघडले. मी म्हणालो—आपले नाव सूर्यप्रकाश तर नव्हे? 'होय, मी आपला तोच अभागी शिष्य.' 'बारा-तेरा वर्षे झाली.' सूर्यप्रकाश हसून म्हणाला—शिक्षक मुलांना विसरून जातात; पण मुले त्यांना कायम लक्षात ठेवतात. मीही तशाच थट्टेच्या सुरात म्हणालो—तुझ्यासारख्या मुलांना विसरणे अशक्य आहे.
प्रेरणा
सूर्यप्रकाश विनयाने म्हणाला—त्याच अपराधांची क्षमा मागण्यासाठी आपल्या सेवेशी आलो आहे. मी नेहमी आपली खबर ठेवीत असे. आपण इंग्लंडला गेलात, तेव्हा मी आपल्याला अभिनंदनाचे पत्र लिहिले; पण ते पाठवू शकलो नाही. आपण प्रिन्सिपॉल झालात, तेव्हा मी इंग्लंडला जाण्याच्या तयारीत होतो. तिथे मी नियतकालिकांतले आपले लेख वाचीत असे. परत आलो तेव्हा कळले, की आपण राजीनामा दिला आहे आणि कुठेतरी खेड्यात निघून गेला आहात. या जिल्ह्यात येऊन मला वर्षाहून अधिक काळ झाला; पण आपण इथे एकांतवास करीत आहात, याची जराही कल्पना नव्हती. या ओसाड गावात आपले मन कसे रमते? एवढ्याशा वयातच आपण वानप्रस्थ घेतलात? सूर्यप्रकाशची उन्नती पाहून मला किती आश्चर्ययुक्त आनंद झाला, ते मी सांगू शकत नाही. तो माझा मुलगा असता, तरी याहून अधिक आनंद झाला नसता. मी त्याला आपल्या झोपडीत आणले आणि आपली रामकहाणी ऐकवली. सूर्यप्रकाश म्हणाला—म्हणजे असे म्हणा, की आपण आपल्याच एका भाईबंदाच्या विश्वासघाताला बळी पडलात. माझा अनुभव अजून फारच थोडा आहे; पण एवढ्या दिवसांतच मला कळून चुकले आहे, की आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे आपल्या लोकांना अजून येत नाही. मिनिस्टरसाहेब भेटले की विचारीन, हाच का आपला धर्म? मी उत्तर दिले—बाबा रे, त्यांचा दोष नाही. कदाचित त्या परिस्थितीत मीही तेच केले असते, जे त्यांनी केले. मला माझ्या स्वार्थलोलुपतेची शिक्षा मिळाली, आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आव आणून नाही, खरे सांगतो: इथे मला जी शांती आहे, ती दुसरीकडे कुठेच नव्हती. या एकांत जीवनात मला जीवनाच्या तत्त्वांचे जे ज्ञान झाले, ते संपत्ती आणि सत्ता यांच्या शर्यतीत कदापि शक्य नव्हते.
प्रेरणा
इतिहास-भूगोलाचे ग्रंथ चाटूनपुसून आणि युरोपातल्या विद्यालयांना शरण जाऊनही मला आपले ममत्व पुसून टाकता आले नाही; उलट हा रोग दिवसेंदिवस अधिकच असाध्य होत चालला होता. पायऱ्यांवर पाय ठेवल्याशिवाय तुम्ही गच्चीच्या उंचीवर पोचू शकत नाही. संपत्तीच्या हवेलीवर पोचताना दुसऱ्यांची आयुष्येच जिन्याचे काम करतात. त्यांना तुडवूनच तुम्ही उद्दिष्टापर्यंत पोचू शकता. तिथे सौजन्य आणि सहानुभूती यांना जागाच नाही. मला असे वाटते, की त्या वेळी मी हिंस्र जनावरांनी वेढलेला होतो आणि माझी सारी शक्ती आपल्या बचावातच खर्ची पडत होती. इथे मला आपल्या सभोवार समाधान आणि साधेपणा दिसतो. माझ्याकडे जी माणसे येतात, ती काही स्वार्थ घेऊन येत नाहीत; आणि माझ्या सेवेतही स्तुतीची किंवा मोठेपणाची लालसा नाही. असे म्हणून मी सूर्यप्रकाशच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. कपटी हास्याच्या जागी खंतेची छटा होती. कदाचित तो हे दाखवायला आला होता, की आपण ज्याच्याविषयी एवढे निराश झाला होतात, तो आज या पदाला शोभा आणतो आहे. त्याला माझ्याकडून आपल्या कर्तबगारीची वाखाणणी हवी होती. मला आता आपली चूक उमगली. एका संपन्न माणसासमोर समृद्धीची निंदा करणे योग्य नव्हे. मी लगेच विषय बदलून म्हणालो—पण तू आपली हकीकत तर सांग. तुझा हा कायापालट कसा झाला? तुझ्या खोड्या आठवल्या की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. कुण्या देवतेच्या वरदानाशिवाय हे वैभव लाभणे शक्यच नव्हते. सूर्यप्रकाश हसून म्हणाला—आपला आशीर्वाद होता. मी फार आग्रह केल्यावर सूर्यप्रकाशने आपली हकीकत सांगायला सुरुवात केली—आपण निघून आल्यानंतर काही दिवसांनी माझा मामेभाऊ शाळेत दाखल झाला. त्याचे वय आठ-नऊ वर्षांहून जास्त नव्हते. प्रिन्सिपॉलसाहेब त्याला होस्टेलमध्ये घेत नव्हते, आणि मामासाहेबांनाही त्याच्या राहण्याची सोय करता येत नव्हती.
प्रेरणा
त्यांना या पेचात पाहून मी प्रिन्सिपॉलसाहेबांना म्हणालो—त्याला माझ्या खोलीत ठेवा. प्रिन्सिपॉलसाहेबांनी हे नियमाविरुद्ध असल्याचे सांगितले. यावर मी चिडून त्याच दिवशी होस्टेल सोडले, आणि एक भाड्याचे घर घेऊन मोहनबरोबर राहू लागलो. त्याची आई कित्येक वर्षांपूर्वी वारली होती. इतका किडकिडीत, अशक्त आणि गरीब मुलगा होता, की पहिल्या दिवसापासूनच मला त्याची दया येऊ लागली. कधी त्याचे डोके दुखे, कधी ताप येई. दिवसाआड कोणते ना कोणते दुखणे उभेच असे. इकडे सांज झाली, की त्याला डुलक्या येऊ लागत. मोठ्या मुश्किलीने जेवायला उठे. दिवस वर येईपर्यंत झोपून राही, आणि मी उचलून बसवल्याशिवाय उठायचे नाव घेत नसे. रात्री पुष्कळदा दचकून माझ्या खाटेवर येई आणि माझ्या गळ्याला मिठी मारून झोपे. मला त्याचा कधी राग येत नसे. का कोण जाणे, माझा त्याच्यावर जीव जडला. पूर्वी नऊ वाजता उठणारा मी आता पहाटेच उठून बसे आणि त्याच्यासाठी दूध गरम करी. मग त्याला उठवून त्याचे हात-तोंड धुऊन देई आणि त्याला न्याहारी करायला लावी. त्याच्या प्रकृतीचा विचार करून रोज त्याला मोकळ्या हवेत फिरायला नेई. कधी पुस्तक घेऊन न बसणारा मी त्याला तासन्तास शिकवीत बसे. आपल्या जबाबदारीची एवढी जाणीव मला कशी झाली, याचे मलाच आश्चर्य वाटते. त्याला काही दुखलेखुपले, की माझा जीव टांगणीला लागे. डॉक्टरकडे धाव घेई, औषधे आणी आणि मोहनची मनधरणी करून त्याला औषध पाजी. त्याच्या मनाविरुद्ध काही होऊ नये, ही काळजी सतत लागलेली असे. या बिचाऱ्याचे इथे माझ्याशिवाय दुसरे कोण आहे? माझ्या उनाड मित्रांपैकी कोणी त्याला चिडवले किंवा त्याची खोडी काढली, तर माझ्या कपाळाला आठ्या चढत. काही मुले तर मला 'म्हातारी दाई' म्हणून चिडवीत; पण मी हसून सोडून देई.
प्रेरणा
त्याच्यासमोर मी एकही वावगा शब्द तोंडातून काढीत नसे. भीती वाटे, की माझे पाहून पाहून हाही बिघडायचा. त्याने मला आपला आदर्श मानावे, अशा रीतीने मला त्याच्यासमोर राहायचे होते; आणि त्यासाठी मी आपले चारित्र्य सुधारले पाहिजे, हे तर उघडच होते. माझे ते नऊ वाजता झोपून उठणे, बारा वाजेपर्यंत भटकत फिरणे, नवनव्या खोड्यांचे बेत आखणे आणि शिक्षकांचा डोळा चुकवून शाळेतून पसार होणे, सारे आपोआप सुटले. आरोग्य आणि सदाचरण यांच्या तत्त्वांचा मी शत्रू होतो; पण आता माझ्याइतका त्या नियमांचा राखणदार दुसरा नव्हता. मी ईश्वराची टवाळी करीत असे; पण आता पक्का आस्तिक झालो होतो. तो मोठ्या भाबडेपणाने विचारी, परमात्मा सगळीकडे असतो, तर माझ्याजवळही असेल ना? या प्रश्नाची थट्टा करणे मला अशक्य होते. मी म्हणे—हो, परमात्मा तुझ्या, माझ्या, सगळ्यांच्या जवळ असतो आणि आपले रक्षण करतो. हे आश्वासन मिळाले, की त्याचा चेहरा आनंदाने फुलून येई; बहुधा त्याला परमात्म्याचे अस्तित्व जाणवू लागे. वर्षभरातच मोहन कुठल्या कुठे पालटला. मामासाहेब दुसऱ्यांदा आले, तेव्हा त्याला पाहून चकित झाले. डोळ्यांत पाणी आणून म्हणाले—बाळ! तू याला जीवदान दिलेस; नाही तर मी आशा सोडली होती. याचे पुण्यफळ तुला ईश्वर देईल. याची आई स्वर्गात बसून तुला आशीर्वाद देते आहे. सूर्यप्रकाशचे डोळे त्या क्षणीही पाणावले होते. मी विचारले—मोहनचाही तुझ्यावर फार जीव असेल! सूर्यप्रकाशच्या पाणावलेल्या डोळ्यांत हुरहुरीने भरलेला आनंद चमकला. तो म्हणाला—तो मला एक मिनिटभरही सोडीत नसे. माझ्याबरोबर बसे, माझ्याबरोबर जेवे, बरोबरच झोपे. मीच त्याचे सर्वस्व होतो. हाय! तो आता या जगात नाही. पण माझ्यासाठी तो अजूनही तसाच जिताजागता आहे.
प्रेरणा
मी जो काही आहे, तो त्यानेच घडवलेला आहे. दैवी योजनेसारखा तो माझा वाटाड्या झाला नसता, तर कदाचित आज मी कुठल्या तरी तुरुंगात पडलेला असतो. एके दिवशी मी म्हणून गेलो होतो—तू रोज अंघोळ केली नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. अंघोळ तो का कोण जाणे, चुकवीत असे. माझ्या या धमकीचा परिणाम असा झाला, की तो रोज सकाळी अंघोळ करू लागला. कितीही थंडी असो, कितीही गार वारा सुटो, तो स्नान केल्याशिवाय राहत नसे. मी कशाने खूश होतो, याकडे त्याचे सारखे लक्ष असे. एके दिवशी मी काही मित्रांबरोबर थिएटर पाहायला गेलो; बजावून गेलो होतो, की तू जेवून झोपून जा. रात्री तीन वाजता परतलो, तर पाहतो तो हा बसलेलाच. मी विचारले—तू झोपला नाहीस? म्हणाला—झोप आली नाही. त्या दिवसापासून मी थिएटरला जायचे नाव काढले नाही. मुलांमध्ये मायेची जी एक भूक असते—दूध, मिठाई आणि खेळणी यांच्यापेक्षाही अधिक धुंद करणारी, जिच्यापायी आईच्या मांडीपुढे त्यांना जगातल्या खजिन्याचीही पर्वा वाटत नाही—मोहनची ती भूक कधी शमतच नसे; डोंगरांवर आदळून घुमणाऱ्या सारसाच्या हाकेसारखी ती सतत त्याच्या नसानसांत घुमत असे. जमिनीवर पसरलेली वेल कुठलाही आधार मिळताच त्याला बिलगते, तशीच मोहनची गत होती. तो मला असा बिलगला होता, की वेगळे केले असते तर त्याच्या कोवळ्या वेलीचे तुकडे तुकडे झाले असते. तो माझ्याबरोबर तीन वर्षे राहिला आणि मग माझ्या जीवनात प्रकाशाची एक रेषा उमटवून अंधारात विलीन झाला. त्या जीर्ण कुडीत कसल्या कसल्या आकांक्षा भरलेल्या होत्या! कदाचित माझ्या जीवनात एक आधार निर्माण करण्यासाठीच ईश्वराने त्याला पाठवले होते. उद्देश पुरा झाला, मग तो कशाला राहणार?
प्रेरणा
( ४ ) 'उन्हाळ्याची सुट्टी होती. दोन सुट्ट्यांत मोहन माझ्याबरोबरच राहिला होता. मामाजींनी आग्रह केला तरी घरी गेला नव्हता. या खेपेला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काश्मीरची सफर करायचे ठरवले आणि मला तिचा प्रमुख केले. काश्मीर पाहण्याची इच्छा मला फार दिवसांपासून होती. ही संधी म्हणजे पर्वणीच वाटली. मोहनला मामाजींकडे पाठवून मी काश्मीरला निघून गेलो! दोन महिन्यांनी परतलो, तर कळले की मोहन आजारी आहे. काश्मीरमध्ये मला मोहनची वारंवार आठवण येई आणि वाटे, परत फिरावे. माझा त्याच्यावर एवढा जीव आहे, याचा अंदाज मला काश्मीरला गेल्यावर आला; पण मित्रांनी पिच्छा सोडला नाही. त्याच्या आजारपणाची बातमी कळताच मी अधीर झालो आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडे जाऊन पोचलो. मला पाहताच त्याच्या पिवळ्या पडलेल्या, सुकलेल्या चेहऱ्यावर आनंदाची तरतरी उमटली. मी धावत जाऊन त्याला कवटाळले. त्याच्या डोळ्यांत ती दूरवर लागलेली नजर आणि चेहऱ्यावर ती अलौकिक आभा होती, जी घिरट्या घालणाऱ्या मृत्यूची सूचना देते. मी आवेगाने कापणाऱ्या आवाजात विचारले—ही तुझी काय दशा झाली आहे मोहन? दोनच महिन्यांत ही पाळी आली? मोहन निरागस हसून म्हणाला—तुम्ही काश्मीरची सैर करायला गेला होतात, मी आकाशाची सैर करायला निघालो आहे. 'पण ही दुःखाची कहाणी सांगून मला रडायचे नाही आणि रडवायचेही नाही. मी निघून गेल्यावर मोहन इतक्या कष्टाने अभ्यास करू लागला, जणू तपश्चर्याच करीत होता. वर्षभराचा अभ्यास दोन महिन्यांत संपवायचा आणि शाळा उघडल्यावर या श्रमांचे बक्षीस म्हणून माझ्याकडून वाहवा मिळवायची, याचा त्याला ध्यासच लागला होता. मी कशी त्याची पाठ थोपटीन, शाबासकी देईन, आपल्या मित्रांजवळ त्याचे कौतुक सांगेन, या कल्पनांनी, बालमनाला साजेशा साऱ्या उत्साहानिशी आणि तल्लीनतेनिशी, त्याला भारून टाकले.
प्रेरणा
मामाजींना कचेरीच्या कामांतून एवढी सवड कुठली, की त्याच्या करमणुकीकडे लक्ष द्यावे? कदाचित त्याला रोज काही ना काही अभ्यास करताना पाहून त्यांना मनातून बरेच वाटत असेल! त्याला खेळताना पाहिले असते, तर ते नक्कीच रागावले असते. अभ्यास करताना पाहून काय बरे म्हणणार! परिणाम असा झाला, की मोहनला बारीक बारीक ताप येऊ लागला; पण त्या अवस्थेतही त्याने अभ्यास सोडला नाही. आणखीही काही कुपथ्ये झाली, तापाचा जोर आणखीच वाढला; पण त्या अवस्थेतही ताप जरा उतरला, की तो पुस्तके पाहू लागे. त्याचा जीव माझ्यातच अडकलेला असे. तापातही नोकरांना विचारी—भैयांचे पत्र आले? ते केव्हा येणार? याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नव्हती. माझी काश्मीरची सफर एवढी महागात पडेल हे मला ठाऊक असते, तर तिकडे जायचे नाव काढले नसते. त्याला वाचवण्यासाठी माझ्याकडून जे काही होण्यासारखे होते, ते सारे मी केले; पण ताप टायफॉइडचा होता, त्याचा जीव घेऊनच उतरला. त्याच्या जीवनाची स्वप्ने माझ्यासाठी एखाद्या ऋषीचा आशीर्वाद होऊन मला प्रोत्साहन देऊ लागली, आणि त्याचेच हे शुभ फळ, की आज आपण मला या स्थितीत पाहत आहात. मोहनच्या बालमनातल्या आकांक्षा प्रत्यक्षात आणताना मला हे समाधान वाटते, की कदाचित त्याचा पवित्र आत्मा मला पाहून प्रसन्न होत असेल. हीच ती प्रेरणा, जिने कठिणातल्या कठीण परीक्षांतही माझी नौका पार लावली; नाही तर मी आजही तोच मंदबुद्धी सूर्यप्रकाश आहे, ज्याचे तोंड पाहिले तरी आपल्याला चीड येत असे.' त्या दिवसापासून मी सूर्यप्रकाशला अनेकदा भेटलो आहे. तो या बाजूला आला, की मला भेटल्याशिवाय जात नाही. मोहनला तो अजूनही आपले इष्टदैवत मानतो. मानवी स्वभावाचे हे एक असे रहस्य आहे, जे मला आजतागायत उमगलेले नाही.