मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
राजा हरदौल
बुंदेलखंडात ओरछा हे एक जुने राज्य आहे. तिथले राजे बुंदेले. या बुंदेल्यांनी डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यांत आपले आयुष्य घालवले आहे. एके काळी ओरछ्याचे राजे होते जुझारसिंह. मोठे धाडसी आणि बुद्धिमान. त्या वेळी दिल्लीच्या तख्तावर शाहजहान बादशहा होते. शाहजहान लोदीने बंड केले आणि बादशाही मुलूख लुटत-उद्ध्वस्त करत तो ओरछ्याच्या दिशेने आला, तेव्हा राजा जुझारसिंहांनी त्याच्याशी झुंज घेतली. राजाच्या या कामगिरीने गुणांची कदर करणारे शाहजहान फार प्रसन्न झाले. त्यांनी तत्काळ राजाकडे दक्षिणेचा कारभार सोपवला. त्या दिवशी ओरछ्यात मोठा आनंदोत्सव झाला. बादशाही दूत खिल्लत आणि सनद घेऊन राजाकडे आला. जुझारसिंहांना मोठमोठी कामे करण्याची संधी मिळाली. प्रवासाची तयारी सुरू झाली, तेव्हा राजांनी आपल्या धाकट्या भावाला, हरदौलसिंहाला, बोलावून म्हटले—'भैया, मी तर चाललो. आता हे राज्य तुझ्या हवाली. तूही त्याच्यावर जिवापाड प्रेम कर. न्याय हाच राजाचा सर्वांत मोठा साथीदार. न्यायाच्या गढीत कोणताही शत्रू घुसू शकत नाही, मग तो रावणाची सेना घेऊन येवो की इंद्राचे बळ. पण खरा न्याय तोच, ज्याला प्रजाही न्याय मानते. तुझे काम केवळ न्याय करणे एवढेच नसेल; तुझ्या न्यायाचा प्रजेला विश्वासही द्यावा लागेल. आणखी मी तुला काय समजावू, तू स्वतः समजदार आहेस.'
राजा हरदौल
एवढे बोलून त्यांनी आपली पगडी उतरवली आणि हरदौलसिंहाच्या डोक्यावर ठेवली. हरदौल रडत रडत त्यांच्या पायांना बिलगला. मग राजा राणीचा निरोप घ्यायला राणीवशात आले. राणी दाराशी उभी राहून रडत होती. त्यांना पाहताच ती त्यांच्या पायांवर कोसळली. जुझारसिंहांनी तिला उठवून छातीशी धरले आणि म्हणाले, 'प्रिये, ही रडायची वेळ नाही. बुंदेल्यांच्या स्त्रिया अशा प्रसंगी रडत नसतात. देवाच्या मनात असेल, तर आपण लवकरच भेटू. माझ्यावर अशीच प्रीती ठेव. राज्य मी हरदौलच्या हाती सोपवले आहे; तो अजून पोरसवदा आहे. त्याने अजून जग पाहिलेले नाही. तुझ्या सल्ल्याने त्याला मदत करीत राहा.' राणीची वाचाच बसली. ती मनाशी म्हणू लागली, 'हाय! हे म्हणतात, बुंदेल्यांच्या स्त्रिया अशा प्रसंगी रडत नसतात. बहुधा त्यांना हृदयच नसते, किंवा असले तरी त्यात प्रेम नसते!' राणीने काळजावर दगड ठेवून आसवे गिळली आणि हात जोडून, स्मित करीत राजाकडे पाहू लागली. पण ते स्मित होते का? अंधाऱ्या मैदानात मशालीचा उजेड जसा अंधाराला आणखीनच अथांग करतो, तसे राणीचे स्मित तिच्या मनातले अथांग दुःख आणखीनच उघडे करीत होते. जुझारसिंह निघून गेल्यावर हरदौलसिंह राज्य करू लागला. थोड्याच दिवसांत त्याच्या न्यायाने आणि प्रजेवरच्या मायेने प्रजेचे मन जिंकले. लोक जुझारसिंहांना विसरून गेले. जुझारसिंहांचे शत्रूही होते आणि मित्रही. पण हरदौलसिंहाला कोणी शत्रू नव्हता; सगळे मित्रच. तो इतका हसतमुख आणि गोड बोलणारा होता, की एकदा त्याच्याशी जो बोलला, तो जन्मभर त्याचा भक्त होऊन राहिला. साऱ्या राज्यात असा कोणी नव्हता, ज्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येत नसे. रात्रंदिवस त्याच्या दरबाराचे फाटक सर्वांसाठी उघडे असे.
राजा हरदौल
इतका सर्वांचा लाडका राजा ओरछ्याला कधीच लाभला नव्हता. तो उदार होता, न्यायी होता, विद्येची आणि गुणांची कदर करणारा होता; पण त्याच्यातला सर्वांत मोठा गुण म्हणजे त्याचे शौर्य. त्याचा हा गुण परमोच्च टोकाला पोहोचला होता. ज्या जातीच्या जगण्याचा आधारच तलवार असतो, ती आपल्या राजाच्या दुसऱ्या कोणत्याही गुणावर इतकी भाळत नाही, जितकी त्याच्या शौर्यावर. हरदौल आपल्या गुणांनी प्रजेच्या मनाचाही राजा झाला; आणि हे मुलखावर आणि मालमत्तेवर राज्य करण्यापेक्षाही कठीण असते. असे एक वर्ष लोटले. तिकडे दक्षिणेत जुझारसिंहांनी आपल्या व्यवस्थेने चहूकडे बादशाही दरारा बसवला, आणि इकडे ओरछ्यात हरदौलने प्रजेवर मोहिनीमंत्र टाकला. २ फाल्गुनाचा महिना होता. अबीर-गुलालाने जमीन लाल झाली होती, मदनाचा अंमल लोकांना चेतवीत होता. रब्बीच्या पिकाने शेतांत सोनेरी गालिचा अंथरला होता आणि खळ्यांत सोनेरी महाल उभारले होते. संतोष या सोनेरी गालिच्यावर डौलाने मिरवत होता आणि निश्चिंतता या सोनेरी महालात ताना आळवीत होती. याच दिवसांत दिल्लीचा नामांकित तलवारबाज कादिरखान ओरछ्याला आला. मोठमोठ्या पहिलवानांनी त्याच्यापुढे हात टेकले होते. दिल्लीपासून ओरछ्यापर्यंत मर्दुमकीच्या धुंदीत मस्त झालेले शेकडो जण त्याच्यासमोर उभे ठाकले, पण कोणीही त्याला जिंकू शकला नाही. त्याच्याशी लढणे म्हणजे नशीब आजमावणे नव्हे, तर मृत्यूशी झुंज घेणे होते. तो कोणत्याही इनामाचा भुकेला नव्हता; जसा काळजाचा दिलेर, तसाच मनाचा राजा. ऐन होळीच्या दिवशी त्याने मोठ्या थाटामाटात ओरछ्यात दवंडी दिली, की 'खुदाचा शेर, दिल्लीचा कादिरखान ओरछ्याला येऊन ठेपला आहे.
राजा हरदौल
ज्याला आपला जीव जड झाला असेल, त्याने यावे आणि आपल्या नशिबाचा फैसला करून घ्यावा.' ओरछ्याचे मोठमोठे बुंदेले वीर ही घमेंडखोर भाषा ऐकून तापले. होळीच्या फागांच्या आणि डफाच्या तानेऐवजी ढोलाचा वीरश्रीचा नाद घुमू लागला. हरदौलचा आखाडा हा ओरछ्याच्या पहिलवानांचा आणि तलवारबाजांचा सर्वांत मोठा अड्डा होता. संध्याकाळी इथे साऱ्या शहरातले वीर जमा झाले. कालदेव आणि भालदेव म्हणजे बुंदेल्यांचे नाक; शेकडो मैदाने त्यांनी मारलेली. हेच दोघे पहिलवान कादिरखानाची घमेंड उतरवायला पुढे सरसावले. दुसऱ्या दिवशी किल्ल्यासमोर तलावाच्या काठी मोठ्या मैदानात ओरछ्याचे लहान-थोर सारे जमले. कसले कसले देखणे, छबिले तरुण होते!—डोक्यावर रंगीबेरंगी तिरकी पगडी, कपाळावर चंदनाचा टिळा, डोळ्यांत मर्दुमकीची धुंदी, कमरेला तलवार. आणि कसले कसले म्हातारे होते!—ताठ पिळदार मिशा, साधी पण तिरकी पगडी, कानांपर्यंत बांधलेल्या दाढ्या; दिसायला म्हातारे, पण कामात तरणेबांड, कुणाला काडीची किंमत न देणारे. त्यांची मर्दानी चालढाल तरुणांना लाजवीत होती. प्रत्येकाच्या तोंडून शौर्याच्याच गोष्टी निघत होत्या. तरुण म्हणत होते—बघू या, आज ओरछ्याची लाज राहते की नाही. पण म्हातारे म्हणत—ओरछ्याची हार कधी झाली नाही आणि होणारही नाही. वीरांचा हा जोश पाहून राजा हरदौलने मोठ्याने बजावले, 'खबरदार! बुंदेल्यांची लाज राहो वा न राहो, पण त्यांच्या प्रतिष्ठेला बट्टा लागता कामा नये. ओरछ्याचे लोक तलवारीने जिंकू शकले नाहीत, म्हणून दांडगाई करून बसले, असे म्हणण्याची संधी जर कुणी इतरांना दिली, तर त्याने स्वतःला जातीचा शत्रू समजावे.'
राजा हरदौल
सूर्य उगवला होता. अचानक नगाऱ्यावर टिपरी पडली, आणि आशेने आणि भीतीने लोकांचे काळीज उसळून तोंडाशी आले. कालदेव आणि कादिरखान दोघे लंगोट कसून सिंहांसारखे आखाड्यात उतरले आणि एकमेकांना कडकडून भेटले. मग दोन्हीकडून तलवारी निघाल्या आणि दोघांच्या बगलेत गेल्या. मग जणू ढगांच्या दोन तुकड्यांतून विजा चमकू लागल्या. पुरते तीन तास असेच वाटत राहिले, की हे दोन निखारे आहेत. हजारो माणसे उभी राहून हा खेळ पाहत होती, आणि मैदानात मध्यरात्रीसारखी शांतता पसरली होती. हां, कधी कालदेवाने एखादा पेचदार हात टाकला किंवा एखादा डावपेचाचा वार चुकवला, की लोकांच्या माना आपोआप उंचावत; पण कुणाच्याही तोंडून एक शब्द फुटत नसे. आखाड्याच्या आत तलवारींची ओढाताण चालली होती; पण पाहणाऱ्यांसाठी आखाड्याबाहेरच्या मैदानात याहूनही मोठा खेळ होता. जातीच्या प्रतिष्ठेच्या विचाराने मनातल्या भावना पुन्हा पुन्हा दाबून धरणे आणि आनंदाचा किंवा दुःखाचा एकही उद्गार तोंडाबाहेर पडू न देणे, हे तलवारीचे वार चुकवण्यापेक्षा कठीण काम होते. अचानक कादिरखान 'अल्लाहो-अकबर' असे ओरडला; जणू ढगच गडगडला, आणि तो गडगडताच कालदेवाच्या डोक्यावर वीज कोसळली. कालदेव पडताच बुंदेल्यांचा धीर सुटला. प्रत्येक चेहऱ्यावर दुबळ्या संतापाचे आणि ठेचलेल्या अभिमानाचे चित्र उमटले. हजारो लोक आवेशाने आखाड्याकडे धावले; पण हरदौल म्हणाला—खबरदार! आता कुणीही पुढे होऊ नये. या आवाजाने पायांत साखळीचे काम केले. प्रेक्षकांना थोपवून ते आखाड्यात गेले आणि त्यांनी कालदेवाला पाहिले, तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. घायाळ सिंह जमिनीवर पडून तडफडत होता. त्याच्या आयुष्यासारखेच त्याच्या तलवारीचेही दोन तुकडे झाले होते.
राजा हरदौल
तो दिवस सरला, रात्र आली. पण बुंदेल्यांच्या डोळ्याला झोप कुठली! लोकांनी कुशी बदलत रात्र काढली. दुःखी माणूस जसा अस्वस्थपणे सकाळची वाट पाहतो, तसे बुंदेले राहून राहून आकाशाकडे पाहत आणि त्याच्या संथ चालीवर चिडत. त्यांच्या जातीच्या अभिमानावर खोल घाव बसला होता. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवताच तीन लाख बुंदेले तलावाच्या काठी पोहोचले. भालदेव सिंहासारखा आखाड्याकडे निघाला, तेव्हा काळजांत धडधड होऊ लागली. काल कालदेव आखाड्यात उतरला होता, तेव्हा बुंदेल्यांचा हुरूप वाढलेला होता; पण आज ती गोष्ट नव्हती. मनात आशेच्या जागी भीती शिरली होती. कादिरखान एखादा वर्मी वार करी, तेव्हा लोकांचे काळीज उसळून ओठांपर्यंत येई. सूर्य माथ्यावर चढत चालला होता आणि लोकांची मने बसत चालली होती. भालदेव आपल्या भावापेक्षा चपळ आणि तडफदार होता, यात शंका नाही. त्याने कित्येकदा कादिरखानाला खाली पाहायला लावले; पण दिल्लीचा तो कसलेला पहिलवान दर वेळी सावरत असे. पुरते तीन तास दोघा बहाद्दरांच्या तलवारी चालत राहिल्या. अचानक 'खटाक' असा आवाज झाला आणि भालदेवाच्या तलवारीचे दोन तुकडे झाले. राजा हरदौल आखाड्यासमोर उभे होते. त्यांनी झटकन आपली तलवार भालदेवाकडे फेकली. भालदेव तलवार घ्यायला वाकलाच होता, तोच कादिरखानाची तलवार त्याच्या मानेवर आली. घाव खोल नव्हता, नुसता एक 'चरा' होता; पण त्याने लढाईचा निकाल लावला.
राजा हरदौल
निराश बुंदेले आपापल्या घरी परतले. भालदेव अजूनही लढायला तयार होता, तरी हरदौलने समजावून सांगितले, 'बंधूंनो, आपली हार त्याच क्षणी झाली, जेव्हा आपल्या तलवारीने दगा दिला. कादिरखानाच्या जागी आपण असतो, तर निःशस्त्र माणसावर वार केला नसता, आणि शत्रूच्या हातात तलवार येईपर्यंत त्याच्यावर हात उगारला नसता; पण कादिरखानात हे औदार्य कुठले? बलवान शत्रूचा सामना करताना औदार्य गुंडाळून ठेवावे लागते. तरीही आपण दाखवून दिले आहे, की तलवारीच्या लढाईत आपण त्याच्या तोडीचे आहोत; आता एवढेच दाखवायचे राहिले आहे, की आपल्या तलवारीतही तसेच पाणी आहे.' अशा रीतीने लोकांचे सांत्वन करून राजा हरदौल राणीवशात गेले. कुलीनाने विचारले—लाला, आज आखाड्यात काय रंग झाला? हरदौलने मान खाली घालून उत्तर दिले—आजही कालचाच प्रकार झाला. कुलीना—भालदेव मारला गेला का? हरदौल—नाही, जिवानिशी तर नाही; पण हार झाली. कुलीना—मग आता काय करायचे? हरदौल—मी स्वतः याच विचारात आहे. आजवर ओरछ्याला कधी मान खाली घालावी लागली नव्हती. आमच्याकडे धन नव्हते; पण आमच्या शौर्यापुढे राज्य आणि धन यांना आम्ही काडीचीही किंमत देत नव्हतो. आता कोणत्या तोंडाने आम्ही आमच्या शौर्याची घमेंड मिरवणार?—ओरछ्याची आणि बुंदेल्यांची लाज आता जाणार. कुलीना—आता काहीच आशा उरली नाही का? हरदौल—आमच्या पहिलवानांत असा कोणी नाही, जो त्याच्यावर बाजी मारील. भालदेवाच्या हारीने बुंदेल्यांची हिंमत खचली आहे. आज साऱ्या शहरावर शोककळा पसरली आहे. शेकडो घरांत चूल पेटली नाही. दिवा लागला नाही. आमच्या देशाची आणि जातीची जी गोष्ट आमचा मान होती, ती आता शेवटचा श्वास घेते आहे.
राजा हरदौल
भालदेव आमचा उस्ताद होता. तो हरल्यानंतर मी मैदानात उतरणे हा उद्धटपणा आहे; पण बुंदेल्यांची पत जात असेल, तर माझे शिरही तिच्यासोबत जाईल. कादिरखान आपल्या कलेत खरोखरच एकमेव आहे; पण आमचा भालदेव त्याच्याहून कधीच कमी नाही. ती तलवार भालदेवाच्या हातात नसती, तर मैदान नक्कीच त्याच्या हाती राहिले असते. ओरछ्यात फक्त एकच तलवार अशी आहे, जी कादिरखानाच्या तलवारीचे तोंड फिरवू शकेल. ती आहे भैयांची तलवार. ओरछ्याचे नाक राखावे असे तुम्हांला वाटत असेल, तर ती मला द्या. हा आमचा शेवटचा प्रयत्न असेल. या वेळीही हार झाली, तर ओरछ्याचे नाव कायमचे बुडेल! कुलीना विचार करू लागली, तलवार यांना द्यावी की न द्यावी? महाराज मनाई करून गेले आहेत; त्यांची आज्ञा होती, की दुसऱ्या कुणाची सावलीसुद्धा तिच्यावर पडता कामा नये. अशा स्थितीत मी त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले, तर ते रागावतील का? कधीच नाही. मी किती कठीण प्रसंगी तलवार काढून दिली, हे ऐकल्यावर त्यांना खराखुरा आनंदच होईल. बुंदेल्यांची आन कुणाला त्यांच्याइतकी प्रिय आहे? त्यांच्याहून अधिक ओरछ्याचे भले चिंतणारा कोण असणार? या वेळी त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हेच आज्ञापालन आहे. असा विचार करून कुलीनाने तलवार हरदौलला दिली. उजाडताच ही बातमी पसरली, की राजा हरदौल कादिरखानाशी लढायला जात आहेत. एवढे ऐकताच लोकांत खळबळ उडाली, सारे दचकले. वेड्यासारखे लोक आखाड्याकडे धावले. प्रत्येक जण म्हणत होता, की आम्ही जिवंत आहोत तोवर महाराजांना लढू देणार नाही. पण लोक आखाड्याजवळ पोहोचले, तो पाहतात तर आखाड्यात विजा चमकत आहेत.
राजा हरदौल
त्या वेळी बुंदेल्यांच्या काळजावर काय बेतत होते, याचा अंदाज करणे कठीण. त्या लांबरुंद मैदानात नजर जाईल तिथवर माणसेच माणसे दिसत होती. पण चहूकडे शांतता होती. प्रत्येक डोळा आखाड्याकडे लागला होता आणि प्रत्येकाचे हृदय हरदौलच्या कल्याणासाठी देवाची प्रार्थना करीत होते. कादिरखानाचा एकेक वार हजारो काळजांचे तुकडे करी आणि हरदौलच्या एकेका घावाने मनांत आनंदाच्या लाटा उसळत. आखाड्यात दोन पहिलवानांचा सामना होता, आणि आखाड्याबाहेर आशा-निराशेचा. अखेर घंटेवर पहिल्या प्रहराचे टोले पडले, आणि हरदौलची तलवार वीज होऊन कादिरच्या डोक्यावर कोसळली. हे पाहताच बुंदेले आनंदाने बेभान झाले. कुणाला कुणाची शुद्ध राहिली नाही. कुणी कुणाला मिठी मारी, कुणी उड्या मारी, तर कुणी ढांगा टाकी. हजारो माणसांवर शौर्याची नशा चढली. तलवारी आपोआप म्यानांतून बाहेर पडल्या, भाले चमकू लागले. विजयाच्या आनंदात शेकडो जीव बळी गेले. पण हरदौल आखाड्याबाहेर आले आणि त्यांनी बुंदेल्यांकडे करड्या नजरेने पाहिले, तेव्हा क्षणार्धात लोक सावरले. तलवारी म्यानांत जाऊन लपल्या. भान आले. हा आनंद कशासाठी, हा जोश कशासाठी, आणि हे वेड कशापायी? बुंदेल्यांसाठी ही काही नवी गोष्ट नव्हती. या विचाराने लोकांची मने शांत झाली. हरदौलच्या या पराक्रमाने त्याला प्रत्येक बुंदेल्याच्या मनात मान-प्रतिष्ठेच्या अशा उच्च स्थानी नेऊन बसवले, जिथे न्याय आणि औदार्यही त्याला पोहोचवू शकले नव्हते. तो पहिल्यापासूनच सर्वांचा लाडका होता; आणि आता तो आपल्या जातीचा वीरश्रेष्ठ आणि बुंदेली दिलेरीचा शिरोमणी झाला.
राजा हरदौल
राजा जुझारसिंहांनीही दक्षिणेत आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखवली. ते केवळ लढाईतच वीर नव्हते, तर राज्यकारभारातही अद्वितीय होते. त्यांनी आपल्या चोख व्यवस्थेने दक्षिणेच्या प्रांतांना बलवान राज्य बनवले, आणि वर्षभरानंतर बादशहाची परवानगी घेऊन ते ओरछ्याकडे निघाले. ओरछ्याची आठवण त्यांना सतत बेचैन करीत राहिली होती. आह ओरछा! तुझे पुन्हा दर्शन होईल, तो दिवस कधी येईल! राजा मजलांमागून मजला मारीत येत होते; ना भूक होती, ना तहान; ओरछ्याच्या माणसांची माया त्यांना ओढून आणीत होती. अखेर ते ओरछ्याच्या जंगलांत येऊन पोहोचले. सोबतची माणसे मागे राहिली. दुपारची वेळ होती. ऊन कडक होते. ते घोड्यावरून उतरले आणि एका झाडाच्या सावलीत जाऊन बसले. योगायोग असा, की आज हरदौलही विजयाच्या आनंदात शिकारीला निघाले होते. शेकडो बुंदेले सरदार त्यांच्यासोबत होते. सगळे अभिमानाच्या नशेत धुंद होते. त्यांनी राजा जुझारसिंहांना एकटे बसलेले पाहिले; पण ते आपल्या घमेंडीत इतके बुडाले होते, की यांच्याजवळ फिरकलेसुद्धा नाहीत. त्यांना वाटले, कोणी वाटसरू असेल. हरदौलचीही नजर फसली. ते घोड्यावर बसून ऐटीत जुझारसिंहांसमोर आले, आणि 'तुम्ही कोण?' असे विचारणार, तोच भावाशी नजरानजर झाली. ओळखताच त्यांनी घोड्यावरून उडी मारली आणि भावाला प्रणाम केला. राजांनीही उठून हरदौलला छातीशी धरले! पण त्या छातीत आता भावाची माया नव्हती. मायेची जागा मत्सराने घेतली होती; आणि तीही केवळ एवढ्यासाठी, की हरदौल लांबूनच अनवाणी त्यांच्याकडे धावत आला नाही, त्याच्या स्वारांनी दुरूनच त्यांना मुजरा केला नाही. संध्याकाळ होता होता दोघे भाऊ ओरछ्याला पोहोचले. राजा परतल्याची बातमी कळताच नगरात आनंदाचे नगारे वाजू लागले. ठिकठिकाणी आनंदोत्सव सुरू झाला आणि बघता बघता सारे शहर दिव्यांनी झगमगू लागले.
राजा हरदौल
आज राणी कुलीनाने स्वतःच्या हातांनी स्वयंपाक केला. नऊ वाजले असतील. दासीने येऊन सांगितले—महाराज, भोजन तयार आहे. दोघे भाऊ जेवायला गेले. राजांसाठी सोन्याच्या ताटात वाढले होते आणि हरदौलसाठी चांदीच्या ताटात. कुलीनाने स्वतः स्वयंपाक केला होता, स्वतः ताटे वाढली होती, आणि स्वतःच ती समोर आणली होती; पण याला काळाचे चक्र म्हणा की नशिबाचे फेरे, तिने चुकून सोन्याचे ताट हरदौलपुढे ठेवले आणि चांदीचे राजांपुढे. हरदौलने काही लक्ष दिले नाही; वर्षभर सोन्याच्या ताटात जेवून जेवून त्याला त्याची सवयच झाली होती. पण जुझारसिंहांचा तिळपापड झाला. तोंडाने ते काही बोलले नाहीत, पण त्यांच्या भिवया चढल्या आणि चेहरा लाल झाला. त्यांनी राणीकडे रोखून पाहिले आणि जेवू लागले. पण घास विषासारखा लागत होता. दोन-चार घास खाऊन ते उठून आले. त्यांच्या चढलेल्या भिवया पाहून राणी घाबरली. आज किती प्रेमाने तिने स्वयंपाक केला होता, किती प्रतीक्षेनंतर हा शुभ दिवस उगवला होता, तिच्या आनंदाला पारावार नव्हता; पण राजांचा तो चेहरा पाहून तिच्या तोंडचे पाणी पळाले. राजे उठून गेल्यावर तिने ताटाकडे पाहिले, तेव्हा तिच्या काळजात धस्स झाले आणि पायाखालची जमीन सरकली. तिने कपाळ बडवून घेतले—देवा! आजची रात्र सुखरूप पार पडू दे; मला शकुन काही चांगले दिसत नाहीत. राजा जुझारसिंह शीशमहालात पहुडले. चतुर न्हाविणीने राणीचा शृंगार केला आणि ती हसून म्हणाली—उद्या महाराजांकडून याचे बक्षीस घेईन. असे म्हणून ती निघून गेली. पण कुलीना तिथून उठली नाही. ती खोल विचारात बुडाली होती. कोणते तोंड घेऊन मी त्यांच्यासमोर जाऊ? न्हाविणीने उगाच माझा शृंगार केला. माझा शृंगार पाहून ते खूश तरी होतील का? या वेळी माझ्या हातून अपराध घडला आहे, मी अपराधी आहे; अशा वेळी नटूनथटून त्यांच्याकडे जाणे मला शोभत नाही.
राजा हरदौल
नाही, नाही; आज मला त्यांच्याकडे भिकारणीच्या वेषात गेले पाहिजे. मी त्यांची क्षमा मागेन. या वेळी मला हेच उचित आहे. असा विचार करून राणी मोठ्या आरशासमोर उभी राहिली. ती अप्सरेसारखी दिसत होती. सौंदर्याची कितीतरी चित्रे तिने पाहिली होती; पण या क्षणी आरशातले चित्र तिला सर्वांत सुंदर वाटत होते. सौंदर्य आणि आत्मप्रेम यांची संगत असते. हळद आपला रंग दाखवल्याशिवाय राहत नाही. क्षणभर कुलीना सौंदर्याच्या धुंदीने फुलून गेली. ती ताठ उभी राहिली. लोक म्हणतात, की सौंदर्यात जादू असते, आणि अशी जादू, जिला कोणताही उतारा नाही. धर्म आणि कर्म, तन आणि मन, सारे सौंदर्यावरून ओवाळून टाकले जाते. मी सुंदर नसेन, पण इतकी कुरूपही नाही. माझ्या सौंदर्यात एवढेही सामर्थ्य नाही का, की महाराजांकडून माझा अपराध माफ करवून घेईल! या बाहुलता जेव्हा त्यांच्या गळ्यातला हार होतील, हे डोळे जेव्हा प्रेमाच्या धुंदीने लाल होऊन त्यांच्याकडे पाहतील, तेव्हा माझ्या सौंदर्याची शीतलता त्यांचा क्रोधाग्नी शांत करणार नाही का! पण थोड्याच वेळात राणी भानावर आली. आह! हे मी कसले स्वप्न पाहते आहे! माझ्या मनात असले विचार का येतात! मी चांगली असेन वा वाईट, त्यांची दासी आहे. माझ्या हातून अपराध घडला आहे; मी त्यांची क्षमा मागितली पाहिजे. हा साजशृंगार या वेळी शोभत नाही! असा विचार करून राणीने सारे दागिने उतरवले. अत्तराने दरवळणारी हिरव्या रेशमाची साडी बाजूला केली. मोत्यांनी भरलेला भांग मोकळा केला, आणि ती हमसाहमशी रडली. हाय! ही मिलनाची रात्र विरहाच्या रात्रीपेक्षाही अधिक दुःखदायक आहे. भिकारणीचा वेष घेऊन राणी शीशमहालाकडे निघाली. पाय पुढे पडत होते, पण मन मागे मागे ओढ घेत होते. दारापर्यंत आली, पण आत पाऊल टाकू शकली नाही. काळीज धडधडू लागले. असे वाटले, जणू तिचे पाय लटलटत आहेत. राजा जुझारसिंह म्हणाले, 'कोण आहे? कुलीना! आत का येत नाहीस?'
राजा हरदौल
कुलीनाने काळीज घट्ट करून म्हटले—महाराज, कशी येऊ? माझ्या जागी मला क्रोध बसलेला दिसतो. राजा—मन दोषी आहे, म्हणून डोळ्याला डोळा भिडवू देत नाही, असे का नाही म्हणत? कुलीना—निःसंशय माझ्या हातून अपराध घडला आहे; पण एक अबला तुमच्यापाशी क्षमेचे दान मागते आहे. राजा—याचे प्रायश्चित्त घ्यावे लागेल. कुलीना—ते कसे? राजा—हरदौलच्या रक्ताने. कुलीना डोक्यापासून पायापर्यंत थरथरली. म्हणाली—आज माझ्या चुकीने जेवणाच्या ताटांची उलटापालट झाली, म्हणून? राजा—नाही; हरदौलने तुझ्या प्रेमाचीच उलटापालट केली, म्हणून! लोखंड आगीच्या धगीने जसे लाल होते, तसा राणीचा चेहरा लाल झाला. क्रोधाचा अग्नी सद्भावनांची राख करतो; प्रेम आणि प्रतिष्ठा, दया आणि न्याय, सारे जळून खाक होते. एक मिनिटभर राणीला असे वाटले, जणू हृदय आणि मेंदू दोन्ही उकळत आहेत. पण आत्मसंयमाच्या शेवटच्या प्रयत्नाने तिने स्वतःला सावरले; एवढेच म्हणाली—हरदौलला मी स्वतःचा मुलगा आणि भाऊ मानते. राजे उठून बसले आणि जरा नरम स्वरात म्हणाले—नाही, हरदौल पोर नाही; पोर मी आहे, ज्याने तुझ्यावर विश्वास ठेवला. कुलीना, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मला तुझा अभिमान होता. मला वाटत होते, चंद्र-सूर्य ढळतील, पण तुझे मन ढळणार नाही. पण आज मला कळले, की तो माझा पोरकटपणा होता. थोरांनी खरेच म्हटले आहे, की स्त्रीचे प्रेम म्हणजे पाण्याची धार; जिकडे उतार मिळतो, तिकडे वाहून जाते. सोने जास्त तापले की वितळते. कुलीना रडू लागली. क्रोधाची आग पाणी होऊन डोळ्यांतून वाहू लागली. आवाज ताब्यात आला, तेव्हा म्हणाली—तुमचा हा संशय मी कसा दूर करू? राजा—हरदौलच्या रक्ताने.
राजा हरदौल
राणी—माझ्या रक्ताने डाग पुसला जाणार नाही? राजा—तुझ्या रक्ताने तो आणखी पक्का होईल. राणी—दुसरा काहीच उपाय नाही? राजा—नाही. राणी—हा तुमचा अखेरचा निर्णय आहे? राजा—हो, हा माझा अखेरचा निर्णय आहे. हे बघ, या पानदानात पानाचा विडा ठेवला आहे. तुझ्या सतीत्वाची कसोटी हीच, की तू हा विडा स्वतःच्या हाताने हरदौलला खाऊ घालावास. माझ्या मनातला भ्रम तेव्हाच निघेल, जेव्हा या घरातून हरदौलचे प्रेत निघेल. राणीने तिरस्काराने त्या विड्याकडे पाहिले आणि ती आल्या पावली परत फिरली. राणी विचार करू लागली—हरदौलचे प्राण घेऊ? निर्दोष, सच्चरित्र, वीर हरदौलच्या जिवावर माझ्या सतीत्वाची परीक्षा देऊ? जो मला बहीण मानतो, त्या हरदौलच्या रक्ताने माझे हात काळे करू? हे पाप कुणाच्या माथी बसेल? एका निर्दोषाचे रक्त रंग दाखवल्याशिवाय राहील का? आह! अभागी कुलीना! आज तुला तुझ्या सतीत्वाची परीक्षा द्यावी लागते आहे, आणि तीही इतकी कठीण? नाही, हे पाप माझ्या हातून होणार नाही. राजांना मी कुलटा वाटत असेन, तर वाटो; त्यांना माझ्यावर संशय असेल, तर असो. हे पाप माझ्या हातून होणार नाही. राजांना असा संशय का आला? केवळ ताटांची अदलाबदल झाली म्हणून? नाही, नक्कीच आणखी काहीतरी आहे. आज हरदौल त्यांना जंगलात भेटला होता. राजांनी त्याच्या कमरेला तलवार पाहिली असणार. कुणी सांगावे, हरदौलकडून त्यांचा काही अपमानही घडला असेल. माझा अपराध काय? माझ्यावर एवढा मोठा आळ का घेतला जातो? केवळ ताटांची अदलाबदल झाली म्हणून? हे देवा! मी माझे दुःख कुणाला सांगू? तूच माझा साक्षी आहेस. काय व्हायचे ते होवो, पण हे पाप माझ्या हातून होणार नाही.
राजा हरदौल
राणीने पुन्हा विचार केला—महाराज, तुमचे हृदय इतके क्षुद्र आणि नीच आहे का? तुम्ही मला हरदौलचा जीव घ्यायला सांगता? त्याचा अधिकार आणि मान जर तुम्हांला पाहवत नसेल, तर तसे स्पष्ट का सांगत नाही? पुरुषासारखी लढाई का लढत नाही? स्वतःच्या हाताने त्याचे शिर का कापत नाही, आणि ते काम मला करायला का सांगता? तुम्हांला पुरते ठाऊक आहे, मी ते करू शकत नाही. माझा जर तुम्हांला वीट आला असेल, मी जर तुमच्या जिवाला जंजाळ झाले असेन, तर मला काशीला किंवा मथुरेला पाठवून द्या. मी बिनबोभाट निघून जाईन. पण देवासाठी, माझ्या माथी इतका मोठा कलंक लागू देऊ नका. पण मी जिवंत तरी का राहू? आता आयुष्यात मला कोणतेच सुख उरले नाही. आता मला मरणच बरे. मी स्वतः प्राण देईन, पण हे महापाप माझ्या हातून होणार नाही. विचारांनी पुन्हा कलाटणी घेतली. तुला पाप करावेच लागेल. याहून मोठे पाप कदाचित आजवर जगात झाले नसेल; पण हे पाप तुला करावे लागेल. तुझ्या पातिव्रत्यावर संशय घेतला जातो आहे, आणि हा संशय तुला मिटवावा लागेल. तुझा जीव धोक्यात असता, तर काही हरकत नव्हती. स्वतःचा जीव देऊन हरदौलला वाचवले असतेस. पण या वेळी तुझ्या पातिव्रत्याला धग लागते आहे. म्हणून तुला हे पाप करावेच लागेल, आणि पाप केल्यावर हसावे लागेल, आनंदी राहावे लागेल. तुझे चित्त जरासुद्धा विचलित झाले, तुझा चेहरा थोडासुद्धा उतरला, तर एवढे मोठे पाप करूनही संशय मिटवण्यात तू यशस्वी होणार नाहीस. तुझ्या मनाचे काहीही होवो, पण हे पाप तुला करावेच लागेल. पण हे होणार तरी कसे! मी हरदौलचे शिर उतरवू?
राजा हरदौल
या विचाराने राणीच्या अंगाला कापरे भरले. नाही, माझा हात त्याच्यावर कधीच उठू शकत नाही. प्रिय हरदौल, मी तुला विष खाऊ घालू शकत नाही. मी मानते, माझ्यासाठी तू आनंदाने विषाचा विडा खाशील. हो, मला ठाऊक आहे, तू 'नाही' म्हणणार नाहीस. पण माझ्या हातून हे महापाप होऊ शकत नाही; एकदा नाही, हजारदा नाही. ४ हरदौलला या गोष्टींची काहीच खबर नव्हती. मध्यरात्री एक दासी रडत रडत त्याच्याकडे गेली आणि तिने त्याला सारी हकीकत जशीच्या तशी सांगितली. ती दासी पानदान घेऊन राणीच्या मागोमाग राजमहालातून दारापर्यंत गेली होती, आणि सगळे बोलणे ऐकून आली होती. राजांचा रागरंग पाहून हरदौलने आधीच ताडले होते, की राजांच्या मनात कोणता ना कोणता काटा नक्कीच सलतो आहे. दासीच्या बोलण्याने त्याचा संशय आणखी पक्का झाला. त्याने दासीला सक्त ताकीद दिली, की खबरदार! दुसऱ्या कुणाच्या कानावर या गोष्टींचा सुगावासुद्धा लागता कामा नये. आणि तो स्वतः मरायला तयार झाला. हरदौल हा बुंदेल्यांच्या शौर्याचा सूर्य होता. त्याच्या भुवईच्या नुसत्या इशाऱ्याने तीन लाख बुंदेले मरायला आणि मारायला गोळा होऊ शकत होते. ओरछा त्याच्यावरून ओवाळून टाकलेला होता. जुझारसिंहांनी उघड्या मैदानात त्याचा सामना केला असता, तर ते नक्कीच तोंडघशी पडले असते. कारण हरदौलही बुंदेला होता, आणि बुंदेले आपल्या शत्रूची कोणत्याही प्रकारे भीडमुर्वत ठेवत नाहीत; मरणे-मारणे हा त्यांच्या आयुष्यातला एक चांगला विरंगुळा असतो. कुणी आम्हाला आव्हान द्यावे, कुणी आमची कुरापत काढावी, अशी त्यांना सदा आस लागलेली असते. त्यांना सदा रक्ताची तहान असते, आणि ती तहान कधीच भागत नाही.
राजा हरदौल
पण या वेळी एका स्त्रीला त्याच्या रक्ताची गरज होती, आणि त्याचे धैर्य त्याच्या कानात सांगत होते, की एका निर्दोष, पतिव्रता अबलेसाठी आपल्या देहाचे रक्त देताना माघार घेऊ नकोस. भैयांना जर असा संशय असता, की मी त्यांच्या रक्ताचा तहानलेला आहे आणि त्यांना मारून राज्य बळकावू पाहतो, तर काही हरकत नव्हती. राज्यासाठी कत्तल आणि रक्तपात, दगा आणि फसवणूक हे सारे योग्यच मानले गेले आहे. पण त्यांच्या या संशयाचा निकाल माझ्या मरणाशिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रकारे लागू शकत नाही. या वेळी माझा धर्म हाच, की स्वतःचे प्राण देऊन त्यांचा हा संशय दूर करावा. त्यांच्या मनात असा जिव्हारी लागणारा संशय निर्माण करूनही मी जगतच राहिलो आणि माझ्या मनाचे पावित्र्य जपत बसलो, तर तो माझा निर्लज्जपणा आहे. नाही, या चांगल्या कामात फार मागेपुढे पाहणे बरे नाही. मी आनंदाने विषाचा विडा खाईन. शूरवीराला याहून श्रेष्ठ मरण ते कोणते असू शकते! रागाच्या भरात, रणवाद्यांचे भय वाढवणारे सूर ऐकत रणांगणात आपला जीव तुच्छ मानणे इतके कठीण नसते. आज खरा वीर हरदौल आपल्या हृदयाच्या थोरवीवरून आपले सारे शौर्य आणि धैर्य ओवाळून टाकायला सिद्ध झाला आहे. दुसऱ्या दिवशी हरदौलने भल्या पहाटे स्नान केले. अंगावर शस्त्रास्त्रे सजवून तो हसत हसत राजांकडे गेला. राजेही नुकतेच झोपेतून उठले होते; त्यांचे आळसावलेले डोळे हरदौलच्या मूर्तीकडे लागले होते. समोर संगमरवरी चौरंगावर विष मिसळलेले पान सोन्याच्या तबकात ठेवलेले होते. राजे कधी पानाकडे पाहत, तर कधी मूर्तीकडे; बहुधा त्यांच्या विचारांनी विषाच्या या गाठीचा आणि त्या मूर्तीचा काही संबंध जोडला होता. अशा वेळी हरदौल एकाएकी दालनात येऊन पोहोचला, तेव्हा राजे दचकले. त्यांनी सावरून विचारले, 'या वेळी कुठे निघालास?'
राजा हरदौल
हरदौलचा चेहरा प्रफुल्लित होता. तो हसून म्हणाला, 'काल तुम्ही इथे परत आलात, याच आनंदात आज मी शिकारीला चाललो आहे. ईश्वराने तुम्हांला अजिंक्य केले आहे; स्वहस्ते मला विजयाचा विडा द्यावा.' असे म्हणून हरदौलने चौरंगावरून पानदान उचलले आणि ते राजांसमोर ठेवून विडा घेण्यासाठी हात पुढे केला. हरदौलचा खुललेला चेहरा पाहून राजांच्या मत्सराची आग आणखीनच भडकली.—दुष्टा, माझ्या जखमेवर मीठ चोळायला आला आहेस! माझा मान आणि विश्वास धुळीला मिळवूनही तुझे मन भरले नाही! माझ्याकडे विजयाचा विडा मागतोस! हो, हा विजयाचा विडाच आहे. पण तुझ्या विजयाचा नव्हे, माझ्या विजयाचा. मनातल्या मनात एवढे बोलून जुझारसिंहांनी विडा हातात घेतला. क्षणभर ते काहीतरी विचार करीत राहिले, मग हसून त्यांनी तो विडा हरदौलला दिला. हरदौलने मान झुकवून विडा घेतला, तो कपाळाला लावला, एकदा अतिशय करुणपणे चहूकडे पाहिले, आणि मग विडा तोंडात ठेवला. एका खऱ्या रजपुताने आपले पुरुषत्व दाखवून दिले. विष हलाहल होते; घशाखाली उतरताच हरदौलच्या चेहऱ्यावर प्रेतकळा पसरली आणि डोळे विझले. त्याने एक दीर्घ उसासा टाकला, दोन्ही हात जोडून जुझारसिंहांना प्रणाम केला आणि तो जमिनीवर बसला. त्याच्या कपाळावर घामाचे थंडगार थेंब दिसत होते, आणि श्वास जलद चालू लागला होता; पण चेहऱ्यावर प्रसन्नतेची आणि समाधानाची झलक दिसत होती. जुझारसिंह आपल्या जागेवरून तसूभरही हलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर मत्सराने भरलेले हसू पसरले होते, पण डोळ्यांत पाणी भरून आले होते. उजेड आणि अंधार यांचे मीलन झाले होते.