मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
रामलीला
गेली कित्येक वर्षे मी रामलीला पाहायला गेलेलो नाही. माकडांचे ओबडधोबड मुखवटे लावलेली, गुडघ्यापर्यंतच्या विजारी आणि काळे कुडते घातलेली माणसे 'हू-हू' करत धावताना पाहून आता हसू येते; मजा वाटत नाही. काशीची लीला जगप्रसिद्ध आहे. ऐकले आहे, की लोक दूरदूरहून ती पाहायला येतात. मीही मोठ्या हौसेने गेलो होतो; पण मला तर तिथली लीला आणि एखाद्या अगदी आडगावातली लीला यांत काहीच फरक दिसला नाही. हो, रामनगरच्या लीलेतला साजसरंजाम मात्र काहीसा चांगला आहे. राक्षसांचे आणि माकडांचे मुखवटे पितळेचे आहेत. गदाही पितळेच्याच; वनवासी बंधूंचे मुकुट कदाचित खऱ्या जरीकामाचे असतील; पण साजसरंजाम सोडला, तर तिथेही तेच 'हू-हू', बाकी काही नाही. तरीही तिथे लाखो लोकांची गर्दी लोटलेली असते. पण एक काळ असा होता, की मलाही रामलीलेत आनंद वाटे. आनंद हा तर फारच हलका शब्द झाला. तो आनंद उन्मादाहून कमी नव्हता. योगायोगाने त्या दिवसांत आमच्या घरापासून अगदी थोड्या अंतरावर रामलीलेचे मैदान होते, आणि ज्या घरात लीलेतल्या पात्रांना रंगरूप चढवले जाई, ते घर तर आमच्या घराला अगदी लागूनच होते. दुपारी दोन वाजल्यापासून पात्रांची सजावट सुरू होई. मी भर दुपारपासूनच तिथे जाऊन बसे, आणि ज्या उत्साहाने धावून धावून तिथली जाडीभरडी कामे करीत असे, तेवढ्या उत्साहाने आज मी माझे पेन्शनसुद्धा आणायला जात नाही. एका खोलीत राजकुमारांचा शृंगार होई. त्यांच्या अंगाला पिवळी रामरज वाटून फासली जाई, तोंडाला पावडर लावली जाई, आणि पावडरवर लाल, हिरव्या, निळ्या रंगाचे बारीक ठिपके रेखले जात. सारे कपाळ, भुवया, गाल, हनुवटी ठिपक्यांनी नटून जात. या कामात एकच माणूस वाकबगार होता. तोच आळीपाळीने तिन्ही पात्रांचा शृंगार करी. रंगाच्या वाट्यांत पाणी आणून देणे, रामरज वाटणे, पंख्याने वारा घालणे हे माझे काम.
रामलीला
ही सगळी तयारी होऊन विमान निघे, तेव्हा त्यावर रामचंद्रजींच्या मागे बसताना मला जो उल्हास वाटे, जो अभिमान वाटे, अंगावर जो रोमांच उभा राही, तो आता लाटसाहेबांच्या दरबारात खुर्चीवर बसूनही येत नाही. एकदा होम मेंबर साहेबांनी कायदेमंडळात माझ्या एका ठरावाला अनुमोदन दिले होते, तेव्हा मला काहीसा तसाच उल्हास वाटला होता, तसाच अभिमान वाटला होता, अंगावर तसाच रोमांच उभा राहिला होता. हो, आणि एकदा माझ्या थोरल्या मुलाचे नाव नायब तहसीलदारीसाठी नक्की झाले, तेव्हाही मनात अशाच काही लहरी उठल्या होत्या; पण त्यांच्यात आणि बालपणीच्या त्या बेभान ओढीत फार मोठे अंतर आहे. तेव्हा तर असे वाटे, की मी स्वर्गातच बसलो आहे. त्या दिवशी निषादाच्या नावेची लीला होती. दोन-चार पोरांच्या नादी लागून मी विटी-दांडू खेळू लागलो होतो. आज शृंगार पाहायला गेलो नाही. विमानही निघाले; पण मी खेळ सोडला नाही. मला माझा डाव घ्यायचा होता. आपला डाव सोडून द्यायला जितका स्वार्थत्याग लागला असता, तो माझ्या आवाक्याच्या कितीतरी पलीकडचा होता. माझ्यावर राज्य असते, तर मी केव्हाच पळ काढला असता; पण दुसऱ्याला पिदवण्यात काही निराळीच गंमत असते. असो, डाव पुरा झाला. मनात आणले असते, तर थोडी लबाडी करून आणखी पाच-दहा मिनिटे पिदवू शकलो असतो, तेवढा वाव भरपूर होता; पण आता त्याला वेळ नव्हता. मी सरळ ओढ्याकडे धावलो. विमान पाण्याच्या काठी पोहोचलेही होते. मी दुरूनच पाहिले, नावाडी होडी घेऊन येतो आहे. धावलो, पण माणसांच्या गर्दीत धावणे कठीण होते. शेवटी गर्दी बाजूला सारत, जिवाच्या कराराने पुढे घुसत मी घाटावर पोहोचलो, तोवर निषादाने आपली नाव सोडली होती. रामचंद्रांवर माझी केवढी श्रद्धा होती! स्वतःच्या धड्याची पर्वा न करता मी त्यांना शिकवीत असे, म्हणजे ते नापास होऊ नयेत.
रामलीला
वयाने माझ्याहून मोठे असूनही ते खालच्या वर्गात होते. पण तेच रामचंद्र नावेत बसून असे तोंड फिरवून चालले होते, जणू माझी त्यांची ओळखच नाही. नकलेतसुद्धा अस्सलाचा थोडाफार वास येतोच. भक्तांवर ज्यांची नजर नेहमीच कठोर राहिली आहे, ते मला काय तारणार? पहिल्यांदाच मानेवर जू ठेवलेले वासरू जसे उड्या मारू लागते, तसा मी व्याकूळ होऊन उड्या मारू लागलो. कधी झेप घेऊन ओढ्याकडे जात होतो, तर कधी कोणी मदतीला मिळतो का म्हणून मागे धावत होतो; पण सगळे आपापल्या धुंदीत मस्त होते, माझा आकांत कोणाच्याही कानावर पोहोचला नाही. त्यानंतर मोठमोठी संकटे सोसली; पण त्या वेळी जेवढे दुःख झाले, तेवढे पुन्हा कधी झाले नाही. मी ठरवले होते, की आता रामचंद्रांशी कधी बोलणार नाही, खायची कोणतीही वस्तू त्यांना कधी देणार नाही; पण ओढा पार करून ते पुलाकडून परत आले मात्र, मी धावत जाऊन विमानावर चढलो, आणि असा खूश झालो, जणू काही घडलेच नव्हते. ( २ ) रामलीला संपली होती. आता राज्याभिषेक व्हायचा होता; पण कोण जाणे का, उशीर होत होता. बहुधा वर्गणी कमी जमली असावी. या दिवसांत रामचंद्रांना कोणी विचारतही नव्हते. ना घरी जायला सुटी मिळत होती, ना जेवणाची काही सोय होत होती. चौधरीसाहेबांकडून दुपारी तीनच्या सुमाराला एक शिधा मिळे. बाकी दिवसभर कोणी पाण्यालाही विचारीत नसे; पण माझी श्रद्धा अजूनही जशीच्या तशी होती. माझ्या दृष्टीने ते अजूनही रामचंद्रच होते. घरी मला खायला जे काही मिळे, ते नेऊन मी रामचंद्रांना देऊन येई. त्यांना खाऊ घालण्यात मला जो आनंद मिळे, तो स्वतः खाण्यात कधीच मिळाला नाही. एखादी मिठाई किंवा फळ हाती पडताच मी जीव खाऊन चावडीकडे धावत सुटे. रामचंद्र तिथे भेटले नाहीत, तर चारी दिशांना त्यांना शोधत फिरे, आणि ती वस्तू त्यांना खाऊ घातल्याशिवाय मला चैन पडत नसे. असो. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला.
रामलीला
रामलीलेच्या मैदानात भलामोठा शामियाना उभारला, तो खूप सजवला. वेश्यांचे ताफेही येऊन दाखल झाले. संध्याकाळी रामचंद्रांची स्वारी निघाली, आणि प्रत्येक दारात त्यांची आरती ओवाळण्यात आली. ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे कोणी रुपये दिले, कोणी पैसे. माझे वडील पोलिसातले होते; म्हणून त्यांनी काहीही न देताच आरती ओवाळली. त्या क्षणी मला जी शरम वाटली, ती सांगता येणार नाही. योगायोगाने त्या वेळी माझ्याजवळ एक रुपया होता; माझे मामा दसऱ्याच्या आधी आले होते आणि मला एक रुपया देऊन गेले होते. तो रुपया मी जपून ठेवला होता. दसऱ्याच्या दिवशीही तो मला खर्च करवला नव्हता. मी लगेच तो रुपया आणून आरतीच्या ताटात टाकला. पिताजी माझ्याकडे रागाने पाहत राहिले, एवढेच. ते बोलले काही नाहीत; पण असे तोंड केले, की माझ्या या उद्धटपणाने त्यांच्या रुबाबाला बट्टा लागला, हे स्पष्ट दिसत होते. रात्रीचे दहा वाजता वाजता ही प्रदक्षिणा पुरी झाली. आरतीचे ताट रुपयांनी आणि पैशांनी भरून गेले होते. नक्की सांगता येत नाही, पण आता अंदाज करतो तेव्हा वाटते, की चार-पाचशे रुपयांहून कमी नसावेत. चौधरीसाहेबांनी यापेक्षा काहीसा जास्तच खर्च करून ठेवला होता. कसेही करून निदान आणखी २०० रुपये तरी वसूल व्हावेत, याची त्यांना मोठी काळजी लागली. आणि त्यासाठी त्यांना सर्वांत चांगली युक्ती हीच सुचली, की मैफलीत वेश्यांकरवी ते वसूल करावेत. लोक येऊन बसले आणि मैफलीचा रंग जमला, की आबदीजानने रसिकांची मनगटे धरधरून असे हावभाव करावेत, की लोकांनी लाजत-लाजत का होईना, काही ना काही काढून द्यावेच. आबदीजान आणि चौधरीसाहेब यांची खलबते सुरू झाली. योगायोगाने त्या दोन जीवांचे बोलणे मी ऐकत होतो. चौधरीसाहेबांना वाटले असेल, हे कार्टे यातले काय समजणार; पण इथे देवाच्या कृपेने आम्ही अकलेचे पुतळे होतो. सगळी कहाणी समजत चालली होती.
रामलीला
चौधरी—हे पाहा आबदीजान, हे तुझे जरा अतीच होते आहे. आपली काही ही पहिलीच गाठ नाही. देवाच्या मनात असेल, तर इथे तुझे येणे-जाणे कायमचे राहील. या खेपेला वर्गणी फारच कमी आली, नाहीतर मी तुला एवढा आग्रह केला नसता. आबदी—माझ्याशीच जमीनदारी डावपेच खेळता, होय? पण इथे हुजुरांची डाळ शिजायची नाही. वा! रुपये वसूल करायचे मी, आणि मिशांवर ताव मारायचा तुम्ही! कमाईची छान तऱ्हा शोधून काढलीत. या कमाईने तर खरोखरच तुम्ही थोड्याच दिवसांत राजे व्हाल. तिच्यापुढे जमीनदारी पाणी भरेल! बस, उद्याच एक कोठा उघडा. खुदाकसम, मालामाल होऊन जाल. चौधरी—तुला थट्टा सुचते आहे, आणि इथे माझी पुरती पंचाईत झाली आहे. आबदी—मग तुम्हीसुद्धा माझ्याशीच उस्तादी करता ना! तुमच्यासारख्या कित्येकांना मी रोज बोटांवर नाचवते. चौधरी—शेवटी तुझा मनसुबा तरी काय आहे? आबदी—जे काही वसूल करीन, त्यातले अर्धे माझे आणि अर्धे तुमचे. द्या टाळी. चौधरी—ठीक आहे, मंजूर. आबदी—बरं, तर आधी माझे १०० रुपये मोजून द्या. नंतर तुम्ही टाळाटाळ करू लागाल. चौधरी—वा! तेही घेणार आणि हेही? आबदी—अस्सं! म्हणजे मी माझी बिदागी सोडून देईन, असे वाटले होते की काय तुम्हाला? वा रे तुमची अक्कल! असणारच म्हणा. वेडा असला, तरी आपल्या मतलबाला पक्का शहाणा! चौधरी—म्हणजे तू दुहेरी फी घ्यायचेच ठरवले आहेस तर?
रामलीला
आबदी—तुम्हाला शंभरदा गरज असेल तर! नाहीतर माझे १०० रुपये कुठे गेलेले नाहीत. मला काय पिसाळलेले कुत्रे चावले आहे, की लोकांच्या खिशात हात घालत फिरू? चौधरींचे काही चालले नाही. आबदीपुढे नमते घ्यावे लागले. नाच सुरू झाला. आबदीजान भलतीच नखरेल बाई होती. एक तर कोवळ्या वयाची, त्यात देखणी. आणि तिच्या अदा तर अशा कहर होत्या, की माझेही मन धुंद होऊ लागले होते. माणसे ओळखण्याची कलाही तिच्यात काही कमी नव्हती. ज्याच्यासमोर जाऊन बसली, त्याच्याकडून काही ना काही घेतलेच. पाच रुपयांहून कमी क्वचितच कोणी दिले असतील. पिताजींच्या समोरही ती जाऊन बसली. मला तर शरमेने धरणी पोटात घेईल तर बरे, असे झाले. तिने त्यांचे मनगट धरले, तेव्हा तर मी चरकलोच. मला खात्री होती, की पिताजी तिचा हात झिडकारतील, आणि कदाचित हाडतूड करून घालवूनही देतील; पण हे काय होते आहे! देवा! माझे डोळे मला फसवत तर नाहीत ना! पिताजी मिशांतल्या मिशांत हसत आहेत. इतके मृदू हसू मी त्यांच्या चेहऱ्यावर कधीच पाहिले नव्हते. त्यांच्या डोळ्यांतून प्रेम ओसंडत होते. त्यांच्या अंगावर रोमांच फुलत होते; पण देवाने माझी लाज राखली. ते पाहा, त्यांनी हळूच आबदीच्या कोमल हातांतून आपले मनगट सोडवून घेतले. अरे! हे पुन्हा काय झाले? आबदी तर त्यांच्या गळ्यात हात घालते आहे. आता मात्र पिताजी तिला नक्की मारतील. या हडळीला जराही लाज नाही! एका गृहस्थांनी हसून म्हटले—इथे तुझी डाळ शिजायची नाही, आबदीजान! दुसरे दार पाहा. या गृहस्थांनी माझ्या मनातलेच म्हटले होते, आणि अगदी योग्य म्हटले होते; पण कोण जाणे का, पिताजींनी त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि मिशांवर ताव मारला. तोंडाने तर काही बोलले नाहीत; पण त्यांचा चेहरा संतापाने ओरडून सांगत होता—अरे वाण्या, तू मला समजतोस तरी काय?
रामलीला
अशा प्रसंगी आम्ही जीवसुद्धा ओवाळून टाकायला तयार असतो, रुपयांची काय कथा! तुझ्या मनात असेल तर पारखून बघ. तुझ्या दुप्पट रक्कम देऊन टाकली नाही, तर तोंड दाखवणार नाही! केवढे आश्चर्य! केवढा घोर अनर्थ! हे धरणी, तू दुभंगत का नाहीस! हे आकाशा, तू कोसळत का नाहीस? अरे, मला मरण का येत नाही! पिताजी खिशात हात घालत आहेत. त्यांनी काहीतरी काढले, आणि शेटजींना दाखवून आबदीजानला देऊन टाकले. हाय! ही तर मोहोर आहे! चारी बाजूंनी टाळ्या वाजू लागल्या. शेटजींचा पार मामा झाला. पिताजींची फजिती झाली की नाही, हे मात्र मी ठरवू शकत नाही. मी एवढेच पाहिले, की पिताजींनी एक मोहोर काढून आबदीजानला दिली. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांत असा अभिमानाने भरलेला उल्हास होता, जणू त्यांनी हातिमताईच्या कबरीवर लाथ मारली असावी. हेच ते पिताजी, ज्यांनी मला आरतीत एक रुपया टाकताना पाहून माझ्याकडे असे पाहिले होते, जणू मला फाडून खातील. माझ्या त्या अगदी उचित वागण्याने त्यांच्या रुबाबाला धक्का लागत होता, आणि आता या घृणास्पद, ओंगळ, निंद्य प्रकारावर त्यांचा अभिमान आणि आनंद अंगात मावत नव्हता. आबदीजानने मोहक हसून पिताजींना सलाम केला आणि ती पुढे सरकली; पण मला तिथे बसवेना. शरमेने माझी मान खाली जात होती. ही गोष्ट मी आपल्या डोळ्यांनी पाहिली नसती, तर तिच्यावर मी कधीच विश्वास ठेवला नसता. बाहेर जे काही पाहत-ऐकत असे, त्याचा रिपोर्ट मी अम्माला न चुकता देत असे; पण ही गोष्ट मी तिच्यापासून लपवून ठेवली. मला ठाऊक होते, हे ऐकून तिला फार दुःख होईल. रात्रभर गाणे चालू होते. तबल्याची थाप माझ्या कानांवर येत होती. वाटत होते, जाऊन पाहावे; पण धीर होत नव्हता. मी कोणाला तोंड कसे दाखवणार? कोणी पिताजींचा विषय काढलाच, तर मी काय करणार!
रामलीला
पहाटे रामचंद्रांची पाठवणी व्हायची होती. खाटेवरून उठल्याबरोबर डोळे चोळत मी चावडीकडे धावलो. भीती वाटत होती, की रामचंद्र निघून तर गेले नसतील! पोहोचलो तो पाहिले, तवायफांच्या गाड्या निघायला तयार आहेत. पंचवीस-पन्नास लोक हिरमुसली तोंडे करून, हळहळत त्यांना घेरून उभे आहेत. मी त्यांच्याकडे डोळा वर करूनही पाहिले नाही. सरळ रामचंद्रांपाशी पोहोचलो. लक्ष्मण आणि सीता बसून रडत होते, आणि रामचंद्र खांद्यावर लोटी-दोरी टाकून उभे होते आणि त्यांची समजूत घालत होते. तिथे माझ्याशिवाय दुसरे कोणी नव्हते. मी चाचरत रामचंद्रांना विचारले—तुमची पाठवणी झाली? रामचंद्र—हो, झाली म्हणायची. आमची कसली पाठवणी? चौधरीसाहेबांनी सांगितले, जा; आम्ही चाललो. 'रुपये आणि कपडे नाही मिळाले?' 'अजून नाही मिळाले. चौधरीसाहेब म्हणतात, या वेळी शिलकीत रुपये नाहीत. नंतर कधीतरी येऊन घेऊन जा.' 'काहीच नाही मिळाले?' 'एक पैसासुद्धा नाही. म्हणतात, काही शिल्लकच उरली नाही. मला वाटले होते, काही रुपये मिळाले तर शाळेची पुस्तके घेईन. पण कसले काय, काहीच मिळाले नाही. वाटखर्चीसुद्धा दिली नाही. म्हणतात, असे कितीसे दूर आहे, पायी चालत जा.' मला असा संताप आला, की जावे आणि चौधरीला चांगलेच फैलावर घ्यावे. वेश्यांसाठी रुपये, गाड्या, सगळे काही; पण बिचाऱ्या रामचंद्रांसाठी आणि त्यांच्या सोबत्यांसाठी काहीच नाही. ज्यांनी रात्री आबदीजानवर दहा-दहा, वीस-वीस रुपये उधळले होते, त्यांच्याकडे यांच्यासाठी दोन-दोन, चार-चार आणेसुद्धा नाहीत? पिताजींनीही तर आबदीजानला एक मोहोर दिली. पाहू या, यांच्या नावाने काय देतात ते. मी धावत पिताजींकडे गेलो. ते कुठेतरी तपासाला जायला तयार होऊन उभे होते. मला पाहून म्हणाले—कुठे भटकतो आहेस? अभ्यासाच्या वेळी तुला भटकायचे सुचते?
रामलीला
मी म्हणालो—चावडीवर गेलो होतो. रामचंद्र निघाले आहेत. चौधरीसाहेबांनी त्यांना काहीच दिले नाही. 'मग तुला त्याची काय पडली आहे?' 'ते जाणार कसे? जवळ वाटखर्चीसुद्धा नाही!' 'काय, खर्चालाही काही दिले नाही? हा चौधरीसाहेबांचा अन्यायच आहे.' 'तुम्ही २ रुपये दिलेत, तर मी ते त्यांना देऊन येतो. एवढ्या पैशांत कदाचित ते घरी पोहोचतील.' पिताजींनी करड्या नजरेने पाहत म्हटले—जा, पुस्तक घेऊन बस. माझ्याजवळ रुपये नाहीत. एवढे बोलून ते घोड्यावर स्वार झाले. त्याच दिवशी पिताजींवरची माझी श्रद्धा उडाली. त्यानंतर त्यांच्या रागावण्या-दटावण्याची मी कधी पर्वा केली नाही. माझे मन म्हणे—तुम्हाला मला उपदेश करण्याचा काहीही अधिकार नाही. मला त्यांच्या तोंडाचाच तिटकारा आला. ते जे सांगत, त्याच्या बरोबर उलट मी करी. त्यात माझेच नुकसान झाले, हे खरे; पण त्या वेळी माझे अंतःकरण बंडखोर विचारांनी भरून गेले होते. माझ्याजवळ दोन आण्यांचे पैसे पडून होते. ते पैसे उचलले आणि जाऊन लाजत-लाजत रामचंद्रांना दिले. ते पैसे पाहून रामचंद्रांना जो आनंद झाला, तो माझ्या अपेक्षेपलीकडचा होता. ते त्यांच्यावर तुटून पडले, जणू तहानलेल्याला पाणी मिळाले. ते दोन आण्यांचे पैसे घेऊन तिन्ही मूर्ती निघाल्या. त्यांना कसब्याबाहेरपर्यंत पोहोचवायला फक्त मीच त्यांच्यासोबत गेलो. त्यांना निरोप देऊन परतलो, तेव्हा माझे डोळे पाणावले होते; पण हृदय आनंदाने उचंबळून आले होते.