मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
राणी सारंधा
१ काळोख्या रात्रीच्या सन्नाट्यात खडकांवर आदळत वाहणारी धसान नदी, घुमघुम आवाज करीत फिरणाऱ्या जात्यांसारखी गोड वाटत होती. नदीच्या उजव्या काठावर एक टेकाड आहे. त्यावर एक जुना किल्ला उभा आहे; त्याला रानटी झाडांनी वेढून टाकले आहे. टेकाडाच्या पूर्वेला एक लहानसे गाव आहे. ही गढी आणि हे गाव, दोन्ही एका बुंदेला सरदाराच्या कीर्तीच्या खुणा आहेत. शतके लोटली; बुंदेलखंडात किती राज्ये उदयाला आली आणि मावळली, मुसलमान आले आणि गेले, बुंदेला राजे उठले आणि पडले—या उलथापालथींची झळ लागली नाही असे एकही गाव, एकही मुलूख नव्हता; पण या किल्ल्यावर कोणत्याही शत्रूचा विजयध्वज फडकला नाही, आणि या गावात कधी बंडाचे पाऊलही पडले नाही. हे त्याचे भाग्य. अनिरुद्धसिंह शूर रजपूत होता. काळच असा होता, की प्रत्येक माणसाला फक्त आपल्या मनगटाचा आणि पराक्रमाचाच भरवसा होता. एकीकडे मुसलमानी फौजा पाय रोवून उभ्या असत, तर दुसरीकडे बलवान राजे आपल्या दुबळ्या भाऊबंदांचा गळा घोटायला टपलेले असत. अनिरुद्धसिंहापाशी घोडेस्वारांची आणि पायदळाची एक लहानशी, पण चैतन्याने सळसळणारी तुकडी होती. तिच्या बळावर तो आपल्या कुळाचे आणि मानमर्यादेचे रक्षण करीत असे. स्वस्थ बसणे त्याच्या नशिबी कधी नव्हतेच. तीन वर्षांपूर्वी त्याचे शीतलादेवीशी लग्न झाले होते; पण अनिरुद्ध विहाराचे दिवस आणि विलासाच्या रात्री डोंगरांत काढत असे, आणि शीतलेचे दिवस त्याच्या जिवाची खैर मागण्यात जात. तिने कितीतरी वेळा पतीला विनवले होते, कितीतरी वेळा ती त्याच्या पायांवर पडून रडली होती—तुम्ही माझ्या डोळ्यांआड होऊ नका, मला हरिद्वारला घेऊन चला, तुमच्याबरोबरचा वनवासही मला गोड, हा विरह आता सोसवत नाही. तिने प्रेमाने सांगून पाहिले, हट्ट धरून पाहिले, गयावया केली; पण अनिरुद्ध बुंदेला होता. शीतलेचे कोणतेही शस्त्र त्याच्यापुढे चालले नाही.
राणी सारंधा
२ काळोखी रात्र होती. सारे जग झोपले होते, पण आकाशात तारे जागे होते. शीतलादेवी पलंगावर पडून कूस बदलत होती आणि तिची नणंद सारंधा जमिनीवर बसून गोड आवाजात गात होती— बिनु रघुबीर कटत नहिं रैन। शीतला म्हणाली—जीव जाळू नकोस. तुलाही झोप येत नाही का? सारंधा—तुला अंगाई ऐकवतेय. शीतला—माझ्या डोळ्यांतून झोप तर पार उडून गेली आहे. सारंधा—कुणालातरी शोधायला गेली असेल. इतक्यात दार उघडले आणि एक पिळदार शरीराचा, देखणा पुरुष आत आला. तो अनिरुद्ध होता. त्याचे कपडे ओले होते आणि अंगावर एकही शस्त्र नव्हते. शीतला खाटेवरून उतरून जमिनीवर बसली. सारंधेने विचारले—भैया, हे कपडे ओले कसे? अनिरुद्ध—नदी पोहून आलो. सारंधा—शस्त्रे कुठे गेली? अनिरुद्ध—हिसकावून घेतली. सारंधा—आणि बरोबरची माणसे? अनिरुद्ध—सगळे धारातीर्थी पडले. शीतला दबक्या आवाजात म्हणाली, देवानेच कुशल राखले. पण सारंधेच्या कपाळाला आठ्या पडल्या आणि चेहरा अभिमानाने तळपू लागला. ती म्हणाली—भैया, तुम्ही कुळाची मर्यादा घालवलीत. असे कधी झाले नव्हते. सारंधेचा भावावर जीव होता. तिच्या तोंडून हा धिक्कार ऐकून अनिरुद्ध लाजेने आणि खेदाने व्याकूळ झाला. क्षणभर प्रेमाने दाबून टाकलेला त्याच्यातला वीराग्नी पुन्हा धगधगून उठला. तो तसाच माघारी फिरला आणि 'सारंधा, तू मला कायमचे जागे केलेस. ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही,' असे म्हणून बाहेर निघून गेला. काळोखी रात्र होती. आकाशात ताऱ्यांचा उजेड अगदी अंधुक होता. अनिरुद्ध किल्ल्याबाहेर पडला. क्षणार्धात नदीपलीकडे पोचला आणि मग अंधारात दिसेनासा झाला. शीतला त्याच्या मागोमाग किल्ल्याच्या भिंतीपर्यंत आली; पण अनिरुद्धाने झेप घेऊन बाहेर उडी टाकली, तेव्हा ती विरहिणी एका खडकावर बसून रडू लागली.
राणी सारंधा
इतक्यात सारंधाही तिथे येऊन पोचली. शीतला नागिणीसारखी फणकारून म्हणाली—मर्यादा एवढी प्रिय आहे? सारंधा—हो. शीतला—स्वतःचा नवरा असता, तर काळजात लपवून ठेवला असतास. सारंधा—नाही, त्याच्या छातीत सुरा खुपसला असता. शीतला तोऱ्यात म्हणाली—एक दिवस त्याला चोळीत लपवीत फिरशील; माझे हे शब्द गाठीला बांधून ठेव. सारंधा—ज्या दिवशी असे होईल, त्या दिवशी मीही माझा शब्द खरा करून दाखवीन. या घटनेनंतर तीन महिन्यांनी अनिरुद्ध महरौनी जिंकून परतला, आणि वर्षभराने सारंधेचे लग्न ओरछ्याचे राजे चंपतराय यांच्याशी झाले. पण त्या दिवशीचे बोलणे दोघींच्याही काळजात काट्यासारखे सलत राहिले. ३ राजे चंपतराय मोठे तेजस्वी पुरुष होते. सारी बुंदेला जात त्यांच्या नावावर जीव ओवाळत असे आणि त्यांचे वर्चस्व मानत असे. गादीवर बसताक्षणीच त्यांनी मोगल बादशहांना खंडणी देणे बंद केले आणि आपल्या मनगटाच्या जोरावर राज्य वाढवायला सुरुवात केली. मुसलमानांच्या फौजा पुन्हा पुन्हा त्यांच्यावर चालून येत, पण हार खाऊन परत जात. याच सुमारास अनिरुद्धाने सारंधेचे चंपतरायांशी लग्न लावून दिले. सारंधेला मनासारखे वरदान मिळाले. आपला पती बुंदेला जातीचा कुलतिलक असावा, ही तिची इच्छा पुरी झाली. राजांच्या रणवासात पाच राण्या होत्या खऱ्या; पण जी देवी हृदयात माझी पूजा करते, ती सारंधा आहे, हे राजांना लवकरच कळून चुकले. पण काही अशा घटना घडल्या, की चंपतरायांना मोगल बादशहाचा आश्रित व्हावे लागले. आपले राज्य आपले भाऊ पहाडसिंह यांच्या हवाली करून ते दिल्लीला गेले. शाहजहानच्या कारकिर्दीचा तो अखेरचा काळ होता. शहजादा दारा शिकोह राज्यकारभार सांभाळीत असत. युवराजांच्या डोळ्यांत सौजन्य होते आणि मनात उदारपणा.
राणी सारंधा
त्यांनी चंपतरायांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या होत्या, म्हणून त्यांचा खूप आदरसत्कार केला, आणि कालपीची मोलाची जहागीर त्यांना नजर केली; तिचे उत्पन्न नऊ लाख होते. रोजच्या लढाया-भांडणांतून चंपतरायांची सुटका झाली ती ही पहिलीच वेळ, आणि त्याबरोबरच भोगविलासाचा जोर वाढला. रात्रंदिवस मौजमजेचीच चर्चा चालू लागली. राजे विलासात बुडाले, राण्या रत्नजडित दागिन्यांवर भाळल्या. पण सारंधा या दिवसांत फार उदास आणि अवघडलेली असे. या रंगढंगांपासून ती दूर दूरच राही; ते नाचगाण्याचे जलसे तिला सुने सुने वाटत. एके दिवशी चंपतराय सारंधेला म्हणाले—सारन, तू उदास का असतेस? मी तुला कधी हसताना पाहत नाही. माझ्यावर रागावली आहेस का? सारंधेचे डोळे भरून आले. ती म्हणाली—स्वामी, आपण असा विचार का करता? जिथे आपण प्रसन्न, तिथे मीही आनंदात. चंपतराय—मी इथे आल्यापासून तुझ्या मुखकमलावर कधी मनोहर हसू पाहिले नाही. तू कधी स्वतःच्या हाताने मला विडा भरवला नाहीस. कधी माझे पागोटे सावरून दिले नाहीस. कधी माझ्या अंगावर शस्त्रे चढवली नाहीस. प्रेमाची वेल कोमेजू तर लागली नाही ना? सारंधा—प्राणनाथ, आपण मला असे विचारता, की ज्याचे उत्तर माझ्यापाशी नाही. खरे सांगायचे तर या दिवसांत माझे मन जरा उदासच असते. आनंदात राहावे असे मला फार वाटते, पण काळजावर जणू एक ओझे ठेवलेले असते. चंपतराय स्वतः आनंदात मग्न होते. त्यामुळे सारंधेने असंतुष्ट राहावे असे कोणतेही योग्य कारण असूच शकत नाही, असे त्यांना वाटत होते. भुवया आकसून ते म्हणाले—तू उदास राहावेस असे काही खास कारण मला तरी दिसत नाही. ओरछ्यात असे कोणते सुख होते, जे इथे नाही? सारंधेचा चेहरा लाल झाला. ती म्हणाली—मी काही बोलले, तर आपण रागावणार नाही ना?
राणी सारंधा
चंपतराय—नाही, खुशाल बोल. सारंधा—ओरछ्यात मी एका राजाची राणी होते. इथे मी एका जहागीरदाराची दासी आहे. अवधात कौसल्या जशा होत्या, तशी मी ओरछ्यात होते; इथे मी बादशहाच्या एका चाकराची बायको आहे. ज्या बादशहापुढे आज आपण आदराने मान झुकवता, तो काल आपल्या नावाने थरथर कापत होता. राणीची दासी होऊनही मन प्रसन्न ठेवणे माझ्या हातात नाही. हे पद आणि ही विलासाची साधने आपण फार महाग मोलाने विकत घेतली आहेत. चंपतरायांच्या डोळ्यांवरचा जणू एक पडदा दूर झाला. सारंधेच्या आत्म्याची ही उंची त्यांना आजवर ठाऊक नव्हती. आईबापावेगळे पोर आईची गोष्ट निघताच रडू लागते, तसे ओरछ्याच्या आठवणीने चंपतरायांचे डोळे पाणावले. आदराने भरलेल्या प्रेमाने त्यांनी सारंधेला हृदयाशी धरले. त्या दिवसापासून त्यांना पुन्हा त्या ओस पडलेल्या वस्तीची काळजी लागली, जिथून धनाची आणि कीर्तीची हाव त्यांना ओढून घेऊन आली होती. ४ हरवलेले बाळ परत मिळाले की आई भरून पावते. चंपतराय आल्याने बुंदेलखंड भरून पावला. ओरछ्याचे भाग्य उजळले. नौबती झडू लागल्या, आणि सारंधेच्या कमलनयनांत पुन्हा जातीच्या अभिमानाची झाक दिसू लागली! इथे राहता राहता महिने लोटले. याच दरम्यान शाहजहान आजारी पडला. मत्सराचा अग्नी आधीपासूनच धुमसत होता. ही बातमी कानी पडताच त्याचा प्रचंड डोंब उसळला. लढाईची तयारी सुरू झाली. शहजादे मुराद आणि मुहीउद्दीन आपापल्या फौजा सजवून दक्षिणेतून निघाले. पावसाळ्याचे दिवस होते. सुपीक धरती रंगीबेरंगी रूपे लेवून आपले सौंदर्य दाखवीत होती. मुराद आणि मुहीउद्दीन जोशाने भरलेले, झपाझप पावले टाकीत चालले होते. थेट धौलपूरजवळ चंबळेच्या काठापर्यंत ते येऊन पोचले; पण तिथे बादशाही फौज आपल्या स्वागताला सज्ज उभी असलेली त्यांना दिसली.
राणी सारंधा
आता शहजादे मोठ्या चिंतेत पडले. समोर, एखाद्या योग्याच्या वैराग्यासारखी, पार न करता येणारी नदी लाटा मारीत होती. नाइलाजाने त्यांनी चंपतरायांकडे निरोप पाठवला, की खुदासाठी येऊन आमची बुडती नाव पार लावा. राजांनी महालात जाऊन सारंधेला विचारले—याला काय उत्तर देऊ? सारंधा—आपल्याला मदत करावीच लागेल. चंपतराय—त्यांना मदत करणे म्हणजे दारा शिकोहशी वैर घेणे. सारंधा—हे खरे; पण कुणी आपल्यापुढे हात पसरला, तर त्या हाताची मर्यादाही राखायला हवी ना? चंपतराय—प्रिये, तू विचार करून उत्तर दिले नाहीस. सारंधा—प्राणनाथ, हा मार्ग कठीण आहे, हे मी चांगले जाणते. आता आपल्याला आपल्या योद्ध्यांचे रक्त पाण्यासारखे वाहवावे लागेल; पण आपण आपले रक्त वाहवू, आणि चंबळेच्या लाटा लाल करून टाकू. विश्वास ठेवा, जोवर नदीची धार वाहत राहील, तोवर ती आपल्या वीरांचे कीर्तिगान करीत राहील. जोवर बुंदेल्यांचे नाव घेणारा एक तरी उरेल, तोवर हे रक्ताचे थेंब त्याच्या कपाळावर केशरी टिळा होऊन चमकतील. आकाशात मेघराजाच्या सेना उसळत होत्या. ओरछ्याच्या किल्ल्यातून बुंदेल्यांची एक काळी घटा उठली आणि वेगाने चंबळेकडे निघाली. प्रत्येक शिपाई वीररसाने झुलत होता. सारंधेने दोन्ही राजकुमारांना कवटाळले आणि राजांना पानाचा विडा देऊन म्हटले—बुंदेल्यांची लाज आता तुमच्या हाती आहे. आज तिचे अंग अंग हसत आहे, हृदय उचंबळून आले आहे. बुंदेल्यांची ही फौज पाहून शहजाद्यांना आनंद गगनात मावेना. राजांना तिथली इंच न् इंच जमीन ठाऊक होती. त्यांनी बुंदेल्यांना एका आडोशाला लपवून ठेवले आणि शहजाद्यांची फौज सजवून ते नदीच्या काठाकाठाने पश्चिमेकडे निघाले. शत्रू दुसऱ्या एखाद्या घाटाने नदी उतरू पाहतो आहे, असा दारा शिकोहला भ्रम झाला. त्यांनी घाटावरचे मोर्चे काढून घेतले.
राणी सारंधा
घाटात दबा धरून बसलेले बुंदेले याच संधीची वाट पाहत होते. ते बाहेर पडले आणि त्यांनी तत्काळ नदीत घोडे घातले. चंपतरायांनी शहजादा दारा शिकोहला हुलकावणी देऊन आपली फौज वळवली, आणि बुंदेल्यांच्या मागोमाग चालत ती पार उतरवून आणली. या अवघड चालीत सात तासांचा उशीर झाला; पण जाऊन पाहतात, तो सातशे बुंदेल्यांचे देह तडफडत पडले होते. राजांना पाहताच बुंदेल्यांना धीर आला. शहजाद्यांच्या फौजेनेही 'अल्लाहो अकबर'चा गजर करीत हल्ला चढवला. बादशाही फौजेत खळबळ उडाली. तिच्या रांगा उधळल्या गेल्या, हातघाईची लढाई सुरू झाली, आणि लढता लढता संध्याकाळ झाली. रणभूमी रक्ताने लाल झाली आणि आकाश काळोखले. घनघोर मारामारी चालली होती. बादशाही फौज शहजाद्यांना दाबीत पुढे सरकत होती. तोच अचानक पश्चिमेकडून बुंदेल्यांची आणखी एक लाट उठली आणि अशा वेगाने बादशाही फौजेच्या पिछाडीवर आदळली, की तिचे पाय उखडले. जिंकत आलेले मैदान तिच्या हातून निसटले. ही दैवी मदत कुठून आली, याचे लोकांना कुतूहल वाटत होते. भोळ्या स्वभावाच्या लोकांची समजूत अशी, की हे फत्तेचे फरिश्ते आहेत, शहजाद्यांच्या मदतीला आले आहेत; पण राजे चंपतराय जवळ गेले, तेव्हा सारंधेने घोड्यावरून उतरून त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले. राजांना अपार आनंद झाला. ती सारंधा होती. या वेळी रणभूमीचे दृश्य अतिशय करुण होते. थोड्या वेळापूर्वी जिथे सजलेल्या वीरांच्या टोळ्या होत्या, तिथे आता निर्जीव देह तडफडत होते. माणसाने आपल्या स्वार्थासाठी अनादी काळापासून भावांची हत्या केली आहे. आता विजयी फौज लुटीवर तुटून पडली. आधी पुरुष पुरुषांशी लढत होते. ते शौर्याचे आणि पराक्रमाचे चित्र होते; हे नीचपणाचे आणि दुबळेपणाचे, मनाला खंत लावणारे चित्र होते. तेव्हा माणूस पशू झाला होता; आता तो पशूच्याही पुढे गेला होता.
राणी सारंधा
या लुटालुटीत लोकांना बादशाही फौजेचा सेनापती वली बहादुरखान याचे प्रेत दिसले. त्याच्याजवळ त्याचा घोडा उभा राहून शेपटीने माश्या उडवीत होता. राजांना घोड्यांचा शौक होता. पाहताक्षणीच ते त्याच्यावर भाळले. तो इराकी जातीचा अतिशय देखणा घोडा होता. अंग अंग साच्यात ओतल्यासारखे; सिंहासारखी छाती, चित्त्यासारखी कंबर. त्याचे हे प्रेम आणि स्वामिभक्ती पाहून लोकांना मोठे कुतूहल वाटले. राजांनी हुकूम दिला—खबरदार! या प्रेमळ जिवावर कुणीही शस्त्र चालवू नये; याला जिवंत पकडा, हा माझ्या पागेची शोभा वाढवील. जो याला माझ्याकडे आणील, त्याला मी मालामाल करीन. योद्धे चारी बाजूंनी धावले; पण त्याच्याजवळ जाण्याची कुणाची छाती होत नव्हती. कुणी चुचकारीत होता, कुणी फासात अडकवण्याच्या खटपटीत होता. पण एकही उपाय लागू पडत नव्हता. तिथे शिपायांची जणू जत्राच भरली होती. तेव्हा सारंधा आपल्या डेऱ्यातून बाहेर आली आणि निर्भयपणे घोड्यापाशी गेली. तिच्या डोळ्यांत प्रेमाचा प्रकाश होता, कपटाचा नव्हे. घोड्याने डोके खाली केले. राणीने त्याच्या मानेवर हात ठेवला, आणि ती त्याची पाठ कुरवाळू लागली. घोड्याने तिच्या पदरात तोंड लपवले. राणी त्याचा लगाम धरून डेऱ्याकडे निघाली. घोडा असा मुकाट्याने तिच्या मागोमाग चालला, जणू जन्मापासून तिचाच सेवक होता. पण घोड्याने सारंधेशीही निष्ठुरपणा केला असता, तर फार बरे झाले असते. हा सुंदर घोडा पुढे या राजघराण्यासाठी कांचनमृग ठरला. ५ जग ही एक रणभूमी आहे. या मैदानात विजय त्याच सेनापतीला मिळतो, जो संधी ओळखतो. संधी येताच तो जितक्या उत्साहाने पुढे सरसावतो, तितक्याच उत्साहाने संकटाच्या वेळी मागे हटतो. असा वीर पुरुष राष्ट्राचा निर्माता होतो, आणि इतिहास त्याच्या नावावर यशाच्या फुलांचा वर्षाव करतो.
राणी सारंधा
पण या मैदानात कधी कधी असेही शिपाई उतरतात, ज्यांना संधी येताच पाऊल पुढे टाकणे जमते, पण संकटात माघार घेणे जमत नाही. हे रणवीर तत्त्वासाठी विजयावर पाणी सोडतात. ते आपल्या सेनेचे नामोनिशाण मिटवतील, पण एकदा जिथे पोचले, तिथून पाऊल मागे घेणार नाहीत. त्यांच्यापैकी एखादाच विरळा या जगाच्या रणांगणात विजयी होतो; पण बहुधा त्याची हार विजयाहूनही अधिक गौरवाची ठरते. अनुभवी सेनापती राष्ट्रांचा पाया घालत असेल, तर आनेसाठी, इभ्रतीसाठी जीव देणारा, पाठ न फिरवणारा शिपाई राष्ट्राच्या भावना उंचावतो, आणि त्याच्या हृदयावर नैतिक गौरवाची मुद्रा उमटवतो. या कार्यक्षेत्रात त्याला यश मिळो वा न मिळो, पण कोणत्याही बोलण्यात वा सभेत त्याचे नाव निघाले, की श्रोते एका सुरात त्याच्या कीर्तीचा जयघोष करतात. सारंधा 'आनेसाठी जीव देणाऱ्यां'पैकी होती. शहजादा मुहीउद्दीन चंबळेच्या काठावरून आग्र्याकडे निघाला, तेव्हा सौभाग्य त्याच्या डोक्यावर मोरचेल ढाळीत होते. तो आग्र्याला पोचला, तेव्हा विजयदेवीने त्याच्यासाठी सिंहासन सजवून ठेवले होते! औरंगजेब गुणांची कदर जाणणारा होता. त्याने बादशाही सरदारांचे अपराध माफ केले, त्यांची राज्यपदे परत दिली, आणि राजे चंपतरायांना त्यांच्या मोलाच्या कामगिरीबद्दल बारा हजारी मनसब बहाल केली. ओरछ्यापासून बनारसपर्यंत आणि बनारसपासून जमुनेपर्यंत त्यांची जहागीर ठरवून दिली गेली. बुंदेला राजा पुन्हा राजसेवक झाला, पुन्हा सुखविलासात बुडाला, आणि राणी सारंधा पुन्हा पराधीनतेच्या दुःखाने झुरू लागली. वली बहादुरखान बोलण्यात मोठा चतुर माणूस होता. त्याच्या मिठ्ठास वागण्याने लवकरच तो बादशहा आलमगीराचा विश्वासू झाला. दरबारात त्याच्याकडे मानाने पाहिले जाऊ लागले.
राणी सारंधा
आपला घोडा हातचा गेल्याचे खानसाहेबांच्या मनात फार दुःख होते. एके दिवशी कुंवर छत्रसाल त्याच घोड्यावर बसून रपेटीला गेला होता. तो खानसाहेबांच्या वाड्याच्या बाजूला जाऊन पोचला. वली बहादुर अशाच संधीची वाट पाहत होता. त्याने ताबडतोब आपल्या नोकरांना इशारा केला. राजकुमार एकटा काय करणार! पायी पायी घरी आला आणि त्याने सारंधेला सगळी हकिगत सांगितली. राणीचा चेहरा संतापाने लाल झाला. ती म्हणाली, 'घोडा हातचा गेला याचे मला दुःख नाही; दुःख याचे आहे, की तो गमावून तू जिवंत परत का आलास? तुझ्या अंगात बुंदेल्यांचे रक्त नाही का? घोडा मिळाला नसता तर नसता, पण एका बुंदेला पोराकडून त्याचा घोडा हिसकावून घेणे ही थट्टा नव्हे, हे तू दाखवून द्यायला हवे होतेस.' असे म्हणून तिने आपल्या पंचवीस योद्ध्यांना तयार होण्याची आज्ञा दिली, स्वतः शस्त्रे धारण केली, आणि योद्ध्यांसह ती वली बहादुरखानाच्या निवासस्थानी जाऊन पोचली. खानसाहेब त्याच घोड्यावर बसून दरबारात गेले होते. सारंधा दरबाराकडे निघाली, आणि एका क्षणात एखाद्या वेगवान नदीसारखी बादशाही दरबारासमोर जाऊन ठेपली. हा प्रकार पाहताच दरबारात खळबळ उडाली. अधिकारी इकडून-तिकडून येऊन जमा झाले. आलमगीरही चौकात बाहेर आले. लोक आपापल्या तलवारी सावरू लागले आणि चोहीकडे गलका उडाला. कितीतरी डोळ्यांनी याच दरबारात अमरसिंहाच्या तलवारीची चमक पाहिली होती. त्यांना ती घटना पुन्हा आठवली! सारंधा मोठ्या आवाजात म्हणाली—खानसाहेब, फार लाजिरवाणी गोष्ट आहे, की जे शौर्य आपण चंबळेच्या काठी दाखवायला हवे होते, ते आज एका अजाण पोरापुढे दाखवलेत. त्याच्याकडून घोडा हिसकावून घेणे आपल्याला शोभले का?
राणी सारंधा
वली बहादुरखानाच्या डोळ्यांतून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. ते कठोर आवाजात म्हणाले—माझी चीज वापरायची कुण्या परक्याची काय मजाल? राणी—ती आपली चीज नाही, माझी आहे. मी ती रणभूमीवर मिळवली आहे आणि तिच्यावर माझा हक्क आहे. युद्धनीतीची एवढी ढोबळ गोष्टही आपल्याला ठाऊक नाही? खानसाहेब—तो घोडा मी देऊ शकत नाही; त्याच्या बदल्यात माझी सगळी पागा आपल्याला नजर आहे. राणी—मी माझाच घोडा घेईन. खानसाहेब—त्याच्या तोलाचे जवाहीर मी देऊ शकतो, पण घोडा देऊ शकत नाही! राणी—तर मग याचा फैसला तलवारीने होईल. बुंदेला योद्ध्यांनी तलवारी उपसल्या, आणि दरबाराची भूमी रक्ताने न्हाऊन निघणार इतक्यात बादशहा आलमगीर मध्ये येऊन म्हणाले—राणीसाहेब, आपण शिपायांना आवरा. घोडा आपल्याला मिळेल, पण त्याची किंमत फार मोठी मोजावी लागेल. राणी—त्याच्यासाठी मी माझे सर्वस्व द्यायला तयार आहे. बादशहा—जहागीर आणि मनसबसुद्धा? राणी—जहागीर आणि मनसब म्हणजे काहीच नव्हे. बादशहा—आपले राज्यसुद्धा? राणी—हो, राज्यसुद्धा. बादशहा—एका घोड्यासाठी? राणी—नाही, जगात जी सर्वांत मोलाची वस्तू आहे, तिच्यासाठी. बादशहा—ती कोणती? राणी—स्वतःची आन. अशा रीतीने राणीने घोड्यासाठी आपली विस्तीर्ण जहागीर, उच्च राजपद आणि राजसन्मान सारे गमावले; आणि एवढेच नव्हे, तर भविष्यासाठी काटे पेरून ठेवले. या घटकेपासून अखेरच्या घडीपर्यंत चंपतरायांना शांती लाभली नाही. राजे चंपतरायांनी पुन्हा ओरछ्याच्या किल्ल्यात पाऊल ठेवले. मनसब आणि जहागीर हातची गेल्याचे त्यांना अतिशय दुःख झाले, पण तक्रारीचा एक शब्दही त्यांनी तोंडातून काढला नाही. सारंधेचा स्वभाव ते पुरता ओळखून होते. या वेळी तक्रार तिच्या स्वाभिमानावर कुऱ्हाडीसारखी कोसळली असती.
राणी सारंधा
काही दिवस इथे शांततेत गेले. पण बादशहा सारंधेचे कठोर बोलणे विसरला नव्हता; क्षमा करणे त्याला ठाऊकच नव्हते. भावांकडून निश्चिंत होताच त्याने चंपतरायांचा गर्व धुळीला मिळवण्यासाठी एक मोठी फौज पाठवली, आणि या मोहिमेवर बावीस अनुभवी सरदार नेमले. शुभकरण बुंदेला बादशहाचा सुभेदार होता. तो चंपतरायांचा बालमित्र आणि शाळासोबती होता. चंपतरायांचा पराभव करण्याचा विडा त्याने उचलला. आणखीही कितीतरी बुंदेला सरदार राजांकडे पाठ फिरवून बादशाही सुभेदाराला येऊन मिळाले. घनघोर लढाई झाली. भावाभावांच्या तलवारी रक्ताने लाल झाल्या. या लढाईत राजांचा विजय झाला खरा, पण त्यांची शक्ती कायमची क्षीण झाली. आसपासचे बुंदेला राजे, जे चंपतरायांचे उजवे हात होते, ते बादशहाच्या कृपेचे भुकेले होऊन बसले. साथीदारांपैकी काही कामी आले, काहींनी दगा दिला. इतकेच काय, आपल्याच नातलगांनीही नजर चुकवली. पण या संकटांतही चंपतरायांनी हिंमत हारली नाही, धीर सोडला नाही. त्यांनी ओरछा सोडले, आणि तीन वर्षे ते बुंदेलखंडाच्या दाट डोंगरांत लपत-छपत फिरत राहिले. बादशाही फौजा शिकारी जनावरांसारख्या साऱ्या मुलखात घिरट्या घालत होत्या. रोज राजांची कुणा ना कुणाशी गाठ पडत असे. सारंधा सदैव त्यांच्यासोबत असे आणि त्यांचा धीर वाढवीत असे. मोठमोठ्या संकटांत, जेव्हा धीर हरपे—आणि आशा साथ सोडी—तेव्हा आत्मरक्षेचा धर्म तिला सावरून धरीत असे. तीन वर्षांनंतर अखेर बादशहाच्या सुभेदारांनी आलमगीराला कळवले, की या वाघाची शिकार आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाच्याने होणार नाही. उत्तर आले, फौज मागे घ्या आणि वेढा उठवा. राजांना वाटले, संकट टळले; पण ती समजूत लवकरच भ्रम ठरली.
राणी सारंधा
७ तीन आठवड्यांपासून बादशाही फौजेने ओरछ्याला वेढा घातला आहे. कठोर शब्द जसे काळजाला भोके पाडतात, तशी तोफांच्या गोळ्यांनी भिंतींना भोके पाडली आहेत. किल्ल्यात २० हजार माणसे कोंडली गेली आहेत, पण त्यांच्यात निम्म्याहून अधिक बायका आहेत, आणि त्यांच्याहून थोडीच कमी मुले. पुरुषांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. येण्या-जाण्याच्या वाटा चारी बाजूंनी बंद आहेत. वाऱ्यालाही वाट नाही. रसदीचा साठा फार थोडा उरला आहे. पुरुषांना आणि मुलांना जगवण्यासाठी बायका स्वतः उपाशी राहतात. लोक फार हताश झाले आहेत. बायका सूर्यनारायणाकडे हात उंचावून उंचावून शत्रूला शिव्याशाप देतात. मुलांचे घोळके रागाच्या भरात भिंतींच्या आडून त्यांच्यावर दगड फेकतात; ते जेमतेम भिंतीपलीकडे पोचतात. राजे चंपतराय स्वतः तापाने आजारी आहेत. कित्येक दिवसांत त्यांनी खाट सोडलेली नाही. त्यांना पाहून लोकांना जरा धीर येत असे, पण त्यांच्या आजारपणाने साऱ्या किल्ल्यावर निराशेची छाया पसरली आहे. राजे सारंधेला म्हणाले—आज शत्रू नक्की किल्ल्यात घुसणार. सारंधा—देव करो, आणि तो दिवस या डोळ्यांनी पाहण्याची पाळी न येवो. राजे—मला मोठी काळजी या अनाथ बायकांची आणि मुलांची आहे. गव्हाबरोबर हे किडेही भरडले जातील. सारंधा—आपण इथून निघून गेलो तर? राजे—या अनाथांना सोडून? सारंधा—या वेळी यांना सोडून जाण्यातच भले आहे. आपण नसलो, तर शत्रू यांच्यावर थोडी तरी दया दाखवतील. राजे—नाही, या लोकांना मला सोडवणार नाही. ज्या पुरुषांनी आपले प्राण आमच्या सेवेत अर्पण केले आहेत, त्यांच्या बायकांना आणि मुलांना मी कदापि सोडू शकत नाही. सारंधा—पण इथे राहून आपण त्यांची काही मदतही करू शकत नाही ना?
राणी सारंधा
राजे—त्यांच्याबरोबर प्राण तर देऊ शकतो! त्यांच्या रक्षणासाठी मी जिवाची बाजी लावीन. त्यांच्यासाठी बादशाही फौजेची खुशामत करीन, कैदेचे हाल सोसेन; पण या संकटात त्यांना सोडू शकत नाही. सारंधेने ओशाळून मान खाली घातली आणि ती विचार करू लागली, खरोखरच, आपल्या लाडक्या साथीदारांना आगीच्या झळीत सोडून आपला जीव वाचवणे हा घोर नीचपणा आहे. मी इतकी स्वार्थांध कशी झाले? पण एकाएकी तिला एक विचार सुचला. ती म्हणाली—या माणसांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी आपली खात्री झाली, तर मग आपल्याला निघायला काही हरकत नसेल ना? राजे—(विचार करून) अशी खात्री कोण देणार? सारंधा—बादशहाच्या सेनापतीचे प्रतिज्ञापत्र. राजे—हां, मग मी आनंदाने निघेन. सारंधा विचारांच्या सागरात बुडाली. बादशहाच्या सेनापतीकडून ही प्रतिज्ञा कशी करवून घ्यावी? हा प्रस्ताव घेऊन तिथे कोण जाणार, आणि ते निर्दय लोक अशी प्रतिज्ञा करतीलच कशाला? त्यांना तर आपल्या विजयाची पुरी खात्री आहे. असा मुत्सद्दी, बोलण्यात पटाईत, चतुर कोण आहे माझ्यापाशी, जो हे अवघड काम तडीस नेईल? छत्रसालाने मनावर घेतले तर तो करू शकेल. त्याच्यात हे सगळे गुण आहेत. असा मनाशी निश्चय करून राणीने छत्रसालाला बोलावले. तिच्या चारी मुलांत तो सर्वांत बुद्धिमान आणि धाडसी होता. राणीचा त्याच्यावर सर्वांत जास्त जीव होता. छत्रसालाने येऊन राणीला प्रणाम केला, तेव्हा तिचे कमलनयन भरून आले आणि हृदयातून एक दीर्घ निःश्वास बाहेर पडला. छत्रसाल—आईसाहेब, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? राणी—आज लढाईचा रंग काय आहे? छत्रसाल—आपले पन्नास योद्धे आजवर कामी आले आहेत. राणी—बुंदेल्यांची लाज आता देवाच्या हाती आहे. छत्रसाल—आज रात्री आम्ही छापा घालू.
राणी सारंधा
राणीने थोडक्यात आपला प्रस्ताव छत्रसालापुढे मांडला आणि म्हटले—हे काम कुणावर सोपवावे? छत्रसाल—माझ्यावर. 'तू हे पुरे करून दाखवशील?' 'हो, मला पूर्ण विश्वास आहे.' 'ठीक आहे, जा. परमेश्वर तुझा मनोरथ पूर्ण करो.' छत्रसाल निघाला, तेव्हा राणीने त्याला हृदयाशी धरले, आणि मग आकाशाकडे दोन्ही हात उंचावून म्हटले—हे दयानिधे, मी माझा तरुण, होतकरू मुलगा बुंदेल्यांच्या आनेपुढे अर्पण केला आहे. आता ही आन राखणे तुझे काम. मी फार मोलाची वस्तू अर्पण केली आहे; तिचा स्वीकार कर. ८ दुसऱ्या दिवशी पहाटे सारंधा स्नान करून, ताटात पूजेचे साहित्य घेऊन देवळाकडे निघाली. तिचा चेहरा पिवळा पडला होता आणि डोळ्यांपुढे अंधारी येत होती. ती देवळाच्या दाराशी पोचली, तोच बाहेरून येऊन एक बाण तिच्या ताटात पडला. बाणाच्या टोकाला कागदाचा एक चिटोरा गुंडाळलेला होता. सारंधेने ताट देवळाच्या चौथऱ्यावर ठेवले आणि चिटोरा उलगडून पाहिला, तो आनंदाने तिचा चेहरा फुलला. पण हा आनंद क्षणभराचाच. हाय! या चिटोऱ्यासाठी मी माझा लाडका मुलगा गमावला आहे. कागदाचा तुकडा इतक्या महाग मोलाने कुणी घेतला असेल? देवळातून परतून सारंधा राजे चंपतरायांकडे गेली आणि म्हणाली, 'प्राणनाथ, आपण जे वचन दिले होते, ते पूर्ण करा.' राजांनी दचकून विचारले, 'तू तुझे वचन पूर्ण केलेस?' राणीने ते प्रतिज्ञापत्र राजांच्या हाती दिले. चंपतरायांनी ते अभिमानाने पाहिले, मग म्हणाले—आता मी निघेन, आणि देवाच्या मनात असेल तर पुन्हा एकदा शत्रूंची खबर घेईन. पण सारन, खरे सांग, या पत्रासाठी काय द्यावे लागले? राणी अडखळत्या स्वरात म्हणाली—बरेच काही. राजे—ऐकू तरी? राणी—एक तरुण मुलगा. राजांना जणू बाण लागला. त्यांनी विचारले—कोण? अंगदराय?
राणी सारंधा
राणी—नाही. राजे—रतनशाह? राणी—नाही. राजे—छत्रसाल? राणी—हो. गोळी लागलेला पक्षी जसा पंख फडफडवतो आणि मग निपचित होऊन खाली पडतो, तसे चंपतराय पलंगावरून उसळले आणि मग बेशुद्ध होऊन पडले. छत्रसाल त्यांचा अतिशय लाडका मुलगा होता. त्यांच्या भविष्याच्या साऱ्या आशा त्याच्यावरच टेकलेल्या होत्या. शुद्धीवर आल्यावर ते म्हणाले, 'सारन, तू वाईट केलेस. छत्रसाल मारला गेला, तर बुंदेला वंशाचा नाश होईल.' काळोखी रात्र होती. राणी सारंधा घोड्यावर स्वार होऊन, चंपतरायांना पालखीत बसवून किल्ल्याच्या गुप्त वाटेने बाहेर पडत होती. फार फार वर्षांपूर्वी एके दिवशी अशीच काळोखी, दुःखाची रात्र होती. तेव्हा सारंधेने शीतलादेवीला काही कठोर शब्द ऐकवले होते. शीतलादेवीने त्या वेळी जे भाकीत केले होते, ते आज खरे ठरले. सारंधेने त्याला जे उत्तर दिले होते, तेही खरे ठरल्याशिवाय राहील का? ९ भर दुपार होती. सूर्यनारायण डोक्यावर येऊन आगीचा वर्षाव करीत होते. अंग भाजून काढणारा प्रचंड, प्रखर वारा रानात आणि डोंगरांत आग लावीत फिरत होता. जणू अग्निदेवाची सारी सेना गर्जत चालून येत आहे, असे वाटत होते. या भीतीने आकाश थरथरत होते. राणी सारंधा घोड्यावर स्वार होऊन, चंपतरायांना बरोबर घेऊन पश्चिमेकडे चालली होती. ओरछा दहा कोस मागे पडले होते, आणि आता आपण भीतीच्या टप्प्याबाहेर आलो, हा अंदाज क्षणाक्षणाला पक्का होत चालला होता. राजे पालखीत बेशुद्ध पडले होते आणि भोई घामाने निथळत होते. पालखीच्या मागे पाच स्वार घोडे दामटीत येत होते. तहानेने सगळ्यांचे हाल झाले होते. टाळू कोरडी पडत होती. कुठे झाडाची सावली आणि विहीर दिसते का, म्हणून डोळे चारी दिशांना धावत होते.
राणी सारंधा
अचानक सारंधेने मागे वळून पाहिले, तो तिला स्वारांची एक तुकडी येताना दिसली. तिच्या मनात पाल चुकचुकली, की आता काही खरे नाही. हे लोक नक्कीच आपले शत्रू आहेत. मग वाटले, कदाचित माझे राजकुमार आपली माणसे घेऊन आपल्या मदतीला येत असतील. निराशेतही आशा साथ सोडत नाही. कित्येक मिनिटे ती या आशेच्या आणि भीतीच्या कात्रीत राहिली. अखेर ती तुकडी जवळ आली आणि शिपायांचे पोशाख स्पष्ट दिसू लागले. राणीने एक थंड उसासा सोडला; तिचे अंग गवताच्या पात्यासारखे थरथरू लागले. ते बादशाही फौजेचे लोक होते. सारंधा भोयांना म्हणाली—डोली थांबवा. बुंदेला शिपायांनीही तलवारी उपसल्या! राजांची अवस्था फार शोचनीय होती; पण दबलेली आग वारा लागताच भडकून उठते, तसा हे संकट ध्यानात येताच त्यांच्या जर्जर देहात वीरात्मा चमकून उठला. पालखीचा पडदा उचलून ते बाहेर आले. धनुष्यबाण हाती घेतले. पण जे धनुष्य त्यांच्या हातात इंद्राचे वज्र बनत असे, ते या वेळी जरासुद्धा वाकले नाही. डोके गरगरले, पाय लटपटले, आणि ते धरणीवर कोसळले. पुढच्या अमंगळाची सूचना मिळाली. साप आपल्याकडे येताना पाहून पंख नसलेला पक्षी जसा वर उसळतो आणि पुन्हा पडतो, तसे राजे चंपतराय पुन्हा सावरून उठले आणि पुन्हा पडले. सारंधेने त्यांना सावरून बसवले, आणि रडत रडत बोलण्याचा प्रयत्न केला. पण तोंडातून फक्त एवढेच निघाले—प्राणनाथ! याच्यापुढे तिच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. आनेसाठी मरणारी सारंधा या वेळी सामान्य बायकांसारखी दुबळी झाली. पण एका मर्यादेपर्यंत हा दुबळेपणा स्त्रीजातीला शोभाच देतो.
राणी सारंधा
चंपतराय म्हणाले—'सारन, पाहा, आपला आणखी एक वीर धरणीवर पडला. अरेरे! ज्या संकटाला मी जन्मभर भीत आलो, त्याने या अखेरच्या घडीला गाठले. माझ्या डोळ्यांदेखत शत्रू तुझ्या कोमल अंगाला हात लावतील, आणि मी जागचा हलूही शकणार नाही. हाय मृत्यू, तू कधी येशील!' असे बोलता बोलता त्यांना एक विचार सुचला. त्यांनी तलवारीकडे हात नेला, पण हातांत त्राण नव्हते. तेव्हा ते सारंधेला म्हणाले—प्रिये, कितीतरी प्रसंगी तू माझी आन राखली आहेस. एवढे ऐकताच सारंधेच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर लाली पसरली. अश्रू सुकले. मी अजूनही पतीच्या काही कामी येऊ शकते, या आशेने तिच्या हृदयात बळ संचारले. राजांकडे विश्वास देणाऱ्या नजरेने पाहत ती म्हणाली—देवाच्या मनात असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत राखीन. राणीला वाटले, राजे मला प्राण देण्याचा इशारा करीत आहेत. चंपतराय—तू माझा शब्द कधी खाली पडू दिला नाहीस. सारंधा—शेवटच्या श्वासापर्यंत पडू देणार नाही. राजे—ही माझी अखेरची याचना आहे. ती नाकारू नकोस. सारंधेने तलवार उपसून आपल्या छातीवर टेकवली आणि म्हणाली—ही आपली आज्ञा नव्हे, ही तर माझी मनापासूनची इच्छा आहे, की मरावे तर हे मस्तक आपल्या चरणकमलांवर असावे. चंपतराय—तू माझा अर्थ समजली नाहीस. मी बेड्या घालून दिल्लीच्या गल्लीबोळांत निंदेचा विषय व्हावे, म्हणून तू मला शत्रूंच्या हाती सोडून जाणार आहेस का? राणीने प्रश्नार्थक नजरेने राजांकडे पाहिले. त्यांचा अर्थ तिला कळला नाही. राजे—मी तुझ्याकडे एक वर मागतो. राणी—आनंदाने मागा. राजे—ही माझी अखेरची प्रार्थना आहे. मी जे सांगेन, ते करशील? राणी—शिरसावंद्य मानून करीन. राजे—पाहा, तू वचन दिले आहेस. नकार देऊ नकोस. राणी—(थरथरत) आपण फक्त सांगायचा अवकाश.
राणी सारंधा
राजे—तुझी तलवार माझ्या छातीत खुपस. राणीच्या काळजावर जणू वज्राघात झाला. ती म्हणाली—जीवननाथ!—याच्यापुढे ती काहीही बोलू शकली नाही. डोळ्यांत निराशा दाटली. राजे—बेड्या घालण्यासाठी मला जिवंत राहायचे नाही. राणी—हे माझ्या हातून कसे होईल? पाचवा आणि शेवटचा शिपाई धरणीवर पडला. राजे चिडून म्हणाले—याच जिवावर आन राखण्याचा गर्व होता? बादशहाचे शिपाई राजांकडे झेपावले. राजांनी निराश नजरेने राणीकडे पाहिले. राणी क्षणभर अनिश्चित उभी राहिली. पण संकटात आपली निर्णयशक्ती बलवान होते. शिपाई राजांना पकडणार, इतक्यात सारंधेने विजेसारखी झेप घेऊन आपली तलवार राजांच्या हृदयात खुपसली. प्रेमाची नाव प्रेमाच्या सागरात बुडाली. राजांच्या हृदयातून रक्ताची धार वाहत होती, पण चेहऱ्यावर शांती पसरली होती. काय हे हृदय! जी स्त्री आपल्या पतीवर जीव ओवाळत होती, ती आज त्याचा प्राण घेणारी झाली! ज्या हृदयाशी बिलगून तिने तारुण्याचे सुख लुटले, जे हृदय तिच्या आकांक्षांचे केंद्र होते, जे हृदय तिच्या अभिमानाला खतपाणी घालीत असे, तेच हृदय सारंधेची तलवार छेदत आहे! कोणत्या स्त्रीच्या तलवारीने असे काम घडले आहे? आह! स्वाभिमानाचा हा कसा करुण शेवट! उदयपूर आणि मारवाडच्या इतिहासातही आत्मगौरवाच्या अशा घटना आढळत नाहीत. सारंधेचे हे धाडस आणि धैर्य पाहून बादशाही शिपाई थक्क झाले. सरदार पुढे होऊन म्हणाला—राणीसाहिबा, खुदा गवाह आहे; आम्ही सगळे आपले गुलाम आहोत. आपला जो हुकूम असेल, तो आम्ही सिरआँखोंवर घेऊन बजावू. सारंधा म्हणाली—आमच्या मुलांपैकी कुणी जिवंत असेल, तर हे दोन्ही मृतदेह त्याच्या हवाली करा. असे म्हणून तिने तीच तलवार आपल्या हृदयात खुपसली. ती बेशुद्ध होऊन धरणीवर पडली, तेव्हा तिचे मस्तक राजे चंपतरायांच्या छातीवर होते.