मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
सद्गती
दुखी चमार दारात झाडू मारत होता आणि त्याची बायको झुरिया घर शेणाने सारवत होती. दोघांची आपापली कामे आटोपली, तेव्हा चमारीण म्हणाली—मग जाऊन पंडितबाबांना सांगून या की. नाहीतर कुठं निघून गेले म्हणजे झालं! दुखी—हां, जातो; पण हे तर ध्यानात घे, ते बसणार कशावर? झुरिया—कुठूनतरी एखादी खाट मिळणार नाही? ठाकुरांच्या आळीतून मागून आणा. दुखी—तू कधी कधी असं काही बोलतेस, की अंगाची लाही होते. ठाकुरआळीवाले मला खाट देतील! घरातून विस्तवसुद्धा बाहेर देत नाहीत, ते खाट देणार! कायस्थांच्या आळीत जाऊन एक लोटा पाणी मागितलं, तरी मिळायचं नाही. मग खाट कोण देणार! आपल्या गोवऱ्या, काड्या, भुसा, लाकडं थोडीच आहेत, की वाटेल त्यानं उचलून न्यावीत! आपलीच खाटली धुऊन ठेव. उन्हाळ्याचे दिवस आहेत. ते येईपर्यंत वाळून जाईल. झुरिया—ते आपल्या खाटलीवर बसायचे नाहीत. दिसत नाही का तुम्हाला, किती नेमधर्मानं राहतात ते! दुखी जरा काळजीत पडून म्हणाला—हां, हेही खरंच. मोहाची पानं तोडून एक पत्रावळ केली, म्हणजे काम भागेल. पत्रावळीवर मोठमोठी माणसं जेवतात. ती पवित्तर असते. आण तो दांडा, पानं तोडून आणतो. झुरिया—पत्रावळ मी करीन. तुम्ही जा; पण हां, त्यांना शिधाही द्यायला लागेल ना. आपल्या थाळीत ठेवू?
सद्गती
दुखी—असला अनर्थ चुकूनसुद्धा करू नकोस, नाहीतर शिधाही जाईल आणि थाळीही फुटेल. बाबा थाळी उचलून आपटतील. त्यांना फार लवकर किरोध चढतो. किरोधात पंडिताइनलासुद्धा सोडत नाहीत; पोराला असं बडवलं, की आजवर मोडका हात घेऊन फिरतोय. शिधाही पत्रावळीतच द्यायचा, समजलीस? पण तू हात लावू नकोस. झूरी गोंडाच्या पोरीला बरोबर घेऊन वाण्याच्या दुकानातून सगळं सामान घेऊन ये. शिधा भरपूर असू दे. शेरभर पीठ, अर्धा शेर तांदूळ, पावशेर डाळ, अर्धा पावशेर तूप, मीठ, हळद, आणि पत्रावळीत एका कडेला चार आणे ठेवून दे. गोंडाची पोरगी मिळाली नाही, तर भडभुंजिणीच्या हातापाया पडून तिला घेऊन जा. तू कशालाच हात लावू नकोस, नाहीतर अनर्थ होईल. या साऱ्या गोष्टी बजावून सांगून दुखीने काठी उचलली, आणि गवताचा एक मोठासा भारा घेऊन तो पंडितजींकडे अर्ज करायला निघाला. रिकाम्या हाती बाबाजींच्या सेवेला कसा जाणार? नजराणा म्हणून द्यायला त्याच्यापाशी गवताशिवाय दुसरे होते तरी काय? त्याला रिकाम्या हाती पाहून तर बाबांनी लांबूनच हाडहाड करून हाकलून लावले असते. २ पंडित घासीराम ईश्वराचे परमभक्त होते. झोप उघडताच ते ईशोपासनेला लागत. तोंड-हात धुता धुता आठ वाजत, मग खरी पूजा सुरू होई, आणि तिचा पहिला भाग म्हणजे भांगेची तयारी. त्यानंतर अर्धा तास ते चंदन उगाळत, मग आरशासमोर एका काडीने कपाळाला गंध लावत. चंदनाच्या दोन रेषांच्या मध्ये लाल कुंकवाचा टिळा असे. मग छातीवर, दंडांवर चंदनाच्या गोल गोल मुद्रा उमटवत. मग ठाकूरजींची मूर्ती काढून तिला स्नान घालत, चंदन लावत, फुले वाहत, आरती करत, घंटा वाजवत. दहा वाजेपर्यंत ते पूजेवरून उठत आणि भांग गाळून बाहेर येत. तोवर दोन-चार यजमान दारात हजर झालेले असत. ईशोपासनेचे फळ ताबडतोब मिळे. हीच त्यांची शेती होती.
सद्गती
आज ते देवघरातून बाहेर आले, तो पाहतात तर दुखी चमार गवताचा एक भारा घेऊन बसलेला. त्यांना पाहताच दुखी उठून उभा राहिला, आणि त्यांना साष्टांग दंडवत घालून हात जोडून उभा राहिला. ही तेजस्वी मूर्ती पाहून त्याचे हृदय श्रद्धेने भरून गेले. केवढी दिव्य मूर्ती होती! लहानखुरा, गोलमटोल माणूस, गुळगुळीत डोके, फुगलेले गाल, ब्रह्मतेजाने तळपणारे डोळे. कुंकू आणि चंदन त्यांना देवांची प्रभा देत होते. दुखीला पाहून श्रीमुखातून शब्द निघाले—आज कसा काय आलास रे दुखिया? दुखी मान खाली घालून म्हणाला—पोरीची सोयरीक करतोय महाराज. जरा मुहूर्त-शकुन पाहायचा आहे. केव्हा मर्जी होईल? घासी—आज मला फुरसत नाही. हां, संध्याकाळपर्यंत येईन. दुखी—नको महाराज, लवकर मर्जी व्हावी. सगळी तयारी करून आलोय. हे गवत कुठं ठेवू? घासी—त्या गाईपुढे टाक, आणि जरा झाडू घेऊन दार तरी झाडून टाक. ही बैठकही कित्येक दिवसांत सारवलेली नाही. तीही शेणानं सारवून टाक. तोवर मी जेवून घेतो. मग जरा विश्रांती घेऊन निघेन. हां, हे लाकूडही फोडून ठेव. खळ्यात चार टोपल्या भुसा पडलाय. तोही उचलून आण आणि भुसकोठीत ठेवून दे. दुखी लगेच हुकमाची तामिली करू लागला. दारात झाडू मारला, बैठक शेणाने सारवली. तोवर बारा वाजले. पंडितजी जेवायला गेले. दुखीने सकाळपासून काही खाल्ले नव्हते. त्यालाही सडकून भूक लागली होती; पण तिथे खायला काय ठेवले होते! घर इथून मैलभर होते. तिथे खायला गेला, तर पंडितजी बिघडतील. बिचाऱ्याने भूक दाबून धरली आणि तो लाकूड फोडू लागला. लाकडाची एक जाडजूड गाठ होती; तिच्यावर याआधी कितीतरी भक्तांनी आपला जोर अजमावून पाहिला होता. ती त्याच दमखमाने लोखंडाशी टक्कर घ्यायला तयार होती. दुखी गवत कापून बाजारात नेत असे. लाकूड फोडण्याची त्याला सवय नव्हती.
सद्गती
गवत त्याच्या खुरप्यापुढे मान तुकवत असे. इथे तो जोर लावून लावून कुऱ्हाडीचा पुरा घाव घाली; पण त्या गाठीवर साधी खूणसुद्धा उमटत नसे. कुऱ्हाड उसळून मागे येई. तो घामाने निथळत होता, धापा टाकत होता, दमून बसत होता, पुन्हा उठत होता; हात उचलता उचलत नव्हते, पाय लटपटत होते, कंबर सरळ होत नव्हती, डोळ्यांपुढे अंधारी येत होती, डोके गरगरत होते, डोळ्यांसमोर काजवे चमकत होते, तरीही आपले काम करीतच होता. एक चिलीमभर तंबाखू ओढायला मिळाली असती, तर कदाचित थोडी ताकद आली असती. त्याने विचार केला, इथे चिलीम आणि तंबाखू कुठं मिळणार? बामणांची वस्ती आहे. बामण लोक आपल्या नीच जातीवाल्यांसारखी तमाखू थोडीच ओढतात! एकाएकी त्याला आठवले, की गावात एक गोंडही राहतो. त्याच्याकडे चिलीम-तमाखू नक्की असेल. तसाच तो त्याच्या घराकडे धावला. असो, मेहनत फळाला आली. त्याने तमाखूही दिली आणि चिलीमही दिली; पण तिथे विस्तव नव्हता. दुखी म्हणाला—विस्तवाची फिकीर करू नकोस भाऊ. मी जातो, पंडितजींच्या घरून विस्तव मागून घेईन. तिथे तर आत्ता स्वयंपाक चालू होता. असे म्हणत तो दोन्ही वस्तू घेऊन परत आला, आणि पंडितजींच्या घरी ओसरीच्या दाराशी उभा राहून म्हणाला—मालक, रत्तीभर विस्तव मिळाला, तर चिलीम ओढतो. पंडितजी जेवत होते. पंडिताइनने विचारले—हा कोण माणूस विस्तव मागतोय? पंडित—अगं, तोच मेला दुखिया चमार आहे. थोडंसं लाकूड फोडायला सांगितलंय. विस्तव आहेच, देऊन टाक. पंडिताइन भुवया चढवून म्हणाल्या—तुम्हाला तर पोथ्या-पानांच्या नादात धर्मकर्म कशाचंच भान उरलेलं नाही. चमार असो, धोबी असो, पासी असो, तोंड वर करून घरात घुसावं. हिंदूचं घर आहे की धर्मशाळा! सांगा त्या दाढीजळ्याला, चालता हो म्हणावं, नाहीतर याच कोलितानं तोंड भाजून टाकीन. विस्तव मागायला निघालेत!
सद्गती
पंडितजी त्यांची समजूत घालत म्हणाले—आत आला, तर काय झालं? तुझ्या कुठल्या वस्तूला तर शिवला नाही. धरती पवित्र आहे. जरासा विस्तव देऊन का टाकत नाहीस? काम तर आपलंच करतोय. एखाद्या लोणाऱ्यानं हेच लाकूड फोडलं असतं, तर निदान चार आणे घेतले असते. पंडिताइन गरजल्या—तो घरात आलाच का? पंडित हार मानून म्हणाले—मेल्याचं कपाळ फुटकं, दुसरं काय? पंडिताइन—बरं, या वेळी विस्तव देते; पण पुन्हा कुणी असा घरात घुसला, तर त्याचं तोंडच भाजून टाकीन. दुखीच्या कानांवर या बोलण्याचे शब्द पडत होते. तो पस्तावत होता—उगाच आलो. खरंच तर म्हणतात त्या. पंडिताच्या घरात चमारानं कसं घुसावं? फार पवित्तर असतात हे लोक, म्हणून तर सारं जग पूजतं, म्हणून तर एवढा मान आहे. काही भर-चमार थोडेच आहेत! याच गावात म्हातारा झालो; पण मला एवढीसुद्धा अक्कल आली नाही. म्हणून पंडिताइन विस्तव घेऊन बाहेर आल्या, तेव्हा त्याला जणू स्वर्गाचा वर लाभला. दोन्ही हात जोडून, जमिनीवर माथा टेकत तो म्हणाला—पडाइनमाता, घरात घुसलो, माझी मोठी चूक झाली. चमाराचीच अक्कल ती! इतके मूरख नसतो, तर लाथा कशाला खाल्ल्या असत्या? पंडिताइन चिमट्याने धरून विस्तव घेऊन आल्या होत्या. पाच हातांच्या अंतरावरून, घुंगटाच्या आडून त्यांनी दुखीच्या दिशेने विस्तव फेकला. विस्तवाची एक मोठीशी ठिणगी दुखीच्या डोक्यावर पडली. तो घाईघाईने मागे सरकून डोके झटकू लागला. त्याचे मन म्हणाले—एका पवित्तर बामणाचं घर अपवित्तर केल्याचं हे फळ. देवानं किती लवकर फळ दिलं! म्हणून तर जग पंडितांना भितं. बाकी सगळ्यांचे पैसे बुडवले जातात; पण बराम्हनाचे पैसे बुडवून तर दाखवा कुणी! साऱ्या घराचा सत्यानाश होईल, पाय सडून सडून गळून पडतील. बाहेर येऊन त्याने चिलीम ओढली आणि पुन्हा कुऱ्हाड घेऊन कामाला भिडला. खट-खट असे आवाज येऊ लागले.
सद्गती
त्याच्यावर विस्तव पडला, तेव्हा पंडिताइनना त्याची थोडी दया आली. पंडितजी जेवून उठले, तेव्हा त्या म्हणाल्या—या चमरड्यालाही काहीतरी खायला द्या, बिचारा केव्हापासून काम करतोय. भुकेला असेल. पंडितजींनी हा प्रस्ताव व्यवहाराच्या क्षेत्रातला समजून विचारले—पोळ्या आहेत? पंडिताइन—दोन-चार उरतील. पंडित—दोन-चार पोळ्यांनी काय होणार? चमार आहे, निदान शेरभर तरी फस्त करील. पंडिताइन कानांवर हात ठेवून म्हणाल्या—बाप रे बाप! शेरभर! मग राहू द्या. पंडितजी आता वाघ बनून म्हणाले—थोडा कोंडा-भुसा असेल, तर पिठात मिसळून दोन रोडगे थापून दे. साल्याचं पोट भरेल. पातळ पोळ्यांनी या नीचांचं पोट भरत नाही. यांना ज्वारीचे रोडगेच पाहिजेत. पंडिताइन म्हणाल्या—आता जाऊ द्या, या उन्हात कोण मरायला जाईल! ३ दुखीने चिलीम ओढून पुन्हा कुऱ्हाड सावरली. दम खाल्ल्यामुळे हातांत जरा ताकद आली होती. जवळजवळ अर्धा तास तो पुन्हा कुऱ्हाड चालवत राहिला. मग बेदम होऊन तिथेच डोके धरून बसला. इतक्यात तोच गोंड आला. म्हणाला—कशाला जीव देताय म्हातारे दादा, तुमच्या फोडण्यानं ही गाठ फुटायची नाही. उगाच हैराण होताय. दुखी कपाळाचा घाम पुसत म्हणाला—अजून गाडीभर भुसा वाहायचा आहे भाऊ. गोंड—काही खायला मिळालं, की फक्त काम करून घेणंच ठाऊक आहे यांना? जाऊन मागत का नाही तुम्ही? दुखी—काय बोलतोस चिखुरी, बामणाची भाकर आपल्याला पचेल? गोंड—पचायला पचेल, आधी मिळू तर दे. मिशांना पीळ देत जेवले आणि आरामात झोपले, तुम्हाला लाकूड फोडायचा हुकूम सोडला. जमीनदारसुद्धा काहीतरी खायला देतो. हाकिमसुद्धा वेठबिगारी करून घेतो, तेव्हा थोडीफार मजुरी देतो. हे त्यांच्याही पुढे गेले, आणि वर धर्मात्मा म्हणून मिरवतात.
सद्गती
दुखी—हळू बोल भाऊ, कुठं ऐकलं, तर आफत ओढवेल. असे म्हणून दुखी पुन्हा सावरला आणि कुऱ्हाडीचे घाव घालू लागला. चिखुरीला त्याची दया आली. त्याने येऊन त्याच्या हातून कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि जवळजवळ अर्धा तास चांगला जोर लावून लावून कुऱ्हाड चालवली; पण गाठीला एक भेगसुद्धा पडली नाही. तेव्हा त्याने कुऱ्हाड फेकून दिली आणि असे म्हणून तो निघून गेला—तुमच्या फोडण्यानं ही फुटायची नाही, भले जीव गेला तरी. दुखी विचार करू लागला, बाबांनी ही गाठ कुठं ठेवून दिली होती कुणास ठाऊक, फोडता फुटत नाही. साधी भेगसुद्धा पडत नाही. मी हिला किती वेळ फोडत बसणार? घरी अजून शंभर कामं पडली आहेत. कार्याचं घर, एक ना एक वस्तू कमी पडतेच; पण यांना त्याची काय फिकीर! तोवर भुसाच उचलून आणतो. सांगेन, बाबा! आज लाकूड काही फुटलं नाही, उद्या येऊन फोडून देईन. त्याने टोपले उचलले आणि भुसा वाहू लागला. खळे इथून दोन फर्लांगांहून कमी नव्हते. टोपले चांगले भरभरून आणले असते, तर काम लवकर संपले असते; पण मग टोपले उचलून देणार कोण? भरलेले टोपले त्याला एकट्याला उचलता येत नव्हते. म्हणून तो थोडा थोडा आणत होता. चार वाजता कुठे भुसा संपला. पंडितजींचीही झोप उघडली. तोंड-हात धुऊन, पान खाऊन ते बाहेर आले. पाहतात तो दुखी टोपल्यावर डोके ठेवून झोपलेला. ते मोठ्याने म्हणाले—अरे दुखिया, तू झोपलायस! लाकूड तर अजून जसंच्या तसं पडलंय. एवढा वेळ तू करत काय होतास? मूठभर भुसा वाहण्यात संध्याकाळ केलीस. वर झोपलायस! उचल ती कुऱ्हाड आणि फोडून टाक लाकूड. तुझ्याच्यानं जरासं लाकूडसुद्धा फुटत नाही. मग मुहूर्तही तसाच निघेल, मला दोष देऊ नकोस. म्हणूनच म्हटलंय, नीचाच्या घरात खायला झालं, की त्याची नजर बदलते.
सद्गती
दुखीने पुन्हा कुऱ्हाड उचलली. आधी मनाशी ठरवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी तो विसरून गेला. पोट पाठीला चिकटले होते; आज सकाळी न्याहारीसुद्धा केली नव्हती. सवडच मिळाली नव्हती. उठणेसुद्धा डोंगर उचलल्यासारखे वाटत होते. जीव बुडत चालला होता; पण मनाची समजूत घालून तो उठला. पंडित आहेत, कुठे मुहूर्त नीट पाहिला नाही, तर मग सत्यानाशच होईल. म्हणून तर जगात एवढा मान आहे. मुहूर्ताचाच तर सगळा खेळ आहे. ज्याचे वाटेल त्याचे वाटोळे करतील. पंडितजी गाठीजवळ येऊन उभे राहिले आणि त्याला चेव आणू लागले—हां, मार जोरानं, आणखी मार—जोरानं मार—अबे, जोर लावून मार—तुझ्या हातात तर जणू दमच नाही—घाल जोरानं, उभा राहून विचार काय करायला लागलास—हां—बस, आता फुटलीच म्हणून समज! घाल त्याच भेगेत! दुखी भानावर नव्हता. कुणास ठाऊक कोणती गुप्त शक्ती त्याचे हात चालवत होती. तो थकवा, भूक, अशक्तपणा सगळे जणू पळून गेले. आपल्या बाहुबलाचे त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होते. एकेक घाव वज्रासारखा पडत होता. अर्धा तास तो असाच उन्मादाच्या अवस्थेत हात चालवत राहिला, आणि शेवटी लाकूड मधोमध दुभंगले—आणि दुखीच्या हातून कुऱ्हाड सुटून खाली पडली. त्याबरोबर तोही भोवळ येऊन कोसळला. भुकेल्या, तहानलेल्या, थकलेल्या शरीराने मान टाकली. पंडितजींनी हाक मारली—ऊठ, आणखी दोन-चार घाव घाल. बारीक बारीक ढलपे होऊ देत. दुखी उठला नाही. आता त्याला त्रास देणे त्यांना उचित वाटले नाही. पंडितजी आत गेले, भांग गाळली, शौचाला गेले, स्नान केले आणि पंडिताईचा पोशाख चढवून बाहेर आले. दुखी अजून तिथेच पडून होता. त्यांनी मोठ्याने हाक मारली—अरे, पडूनच राहणार आहेस का दुखी, चल, तुझ्याच घरी निघालोय. सगळं सामान ठीकठाक आहे ना? दुखी तरीही उठला नाही.
सद्गती
आता पंडितजींना काहीशी शंका आली. जवळ जाऊन पाहिले, तर दुखी ताठून पडला होता. ते भांबावून धावत गेले आणि पंडिताइनला म्हणाले—दुखिया तर मेलेलाच दिसतोय. पंडिताइन गोंधळून म्हणाल्या—आत्ता तर तो लाकूड फोडत होता ना! पंडित—हां, लाकूड फोडता फोडताच मेला. आता काय होणार? पंडिताइन शांतपणे म्हणाल्या—होणार काय, चमारवाड्यात निरोप धाडा, मुडदा उचलून न्या म्हणावं. क्षणभरात गावभर बातमी पसरली. वस्तीत सगळी ब्राह्मणांचीच घरे होती. फक्त एक घर गोंडाचे होते. लोकांनी तिकडचा रस्ता सोडून दिला. विहिरीची वाट त्याच बाजूने जात होती; मग पाणी कसे भरायचे? चमाराच्या प्रेताजवळून पाणी भरायला कोण जाणार? एका म्हातारीने पंडितजींना म्हटले—आता मुडदा फेकून द्यायची व्यवस्था का करत नाही? गावात कुणी पाणी प्यायचं की नाही? इकडे गोंडाने चमारवाड्यात जाऊन सगळ्यांना सांगून टाकले—खबरदार, मुडदा उचलायला जाऊ नका. आता पोलिसांची चौकशी होणार. थट्टा आहे होय, एका गरिबाचा जीव घेतला! पंडित असले, तर आपल्या घरचे. प्रेत उचलाल, तर तुम्हीही पकडले जाल. त्यानंतर लगेच पंडितजी पोचले; पण चमारवाड्यातला एकही माणूस प्रेत उचलून आणायला तयार झाला नाही. हां, दुखीची बायको आणि मुलगी दोघी हाय हाय करत तिकडे निघाल्या आणि पंडितजींच्या दारात येऊन डोके बडवून बडवून रडू लागल्या. त्यांच्याबरोबर आणखी पाच-दहा चमारणी होत्या. कोणी रडत होती, कोणी समजूत घालत होती; पण चमार एकही नव्हता. पंडितजींनी चमारांना खूप धमकावले, समजावले, विनवण्या केल्या; पण चमारांच्या मनावर पोलिसांचा दरारा बसला होता, एकही बधला नाही. शेवटी निराश होऊन ते परत आले.
सद्गती
४ मध्यरात्रीपर्यंत रडारड चालू होती. देवांना झोपणे कठीण झाले; पण प्रेत उचलायला एकही चमार आला नाही, आणि ब्राह्मण चमाराचे प्रेत कसे उचलणार! असे कुठल्या शास्त्रात-पुराणात लिहिले आहे का? कुणी दाखवून द्यावे! पंडिताइन वैतागून म्हणाल्या—या डाकिणींनी तर डोकं खाल्लं. एकीचाही घसा कसा बसत नाही! पंडित म्हणाले—रडू दे चेटकिणींना, किती वेळ रडतील. जिवंत होता, तेव्हा कुणी विचारत नव्हतं. मेला, तर गोंगाट करायला सगळ्याच्या सगळ्या येऊन ठेपल्या. पंडिताइन—चमाराचं रडणं अपशकुनी असतं. पंडित—हो, फार अपशकुनी. पंडिताइन—आतापासूनच दुर्गंधी सुटायला लागली. पंडित—चमार होता की नाही मेला! भक्ष्याभक्ष्य कशाचा विचार असतो का या लोकांना? पंडिताइन—यांना किळससुद्धा वाटत नाही. पंडित—भ्रष्ट आहेत सगळे. रात्र कशीबशी सरली; पण सकाळीही कोणी चमार आला नाही. चमारणीही रडून-ओरडून निघून गेल्या. दुर्गंधी थोडी थोडी पसरू लागली. पंडितजींनी एक दोरी काढली. तिचा फास करून मुडद्याच्या पायात अडकवला आणि फास ओढून घट्ट आवळला. अजून पुरते उजाडले नव्हते. पंडितजींनी दोरी धरून प्रेत फरफटत ओढायला सुरुवात केली आणि ते गावाबाहेर फरफटत नेले. तिथून परत येऊन त्यांनी लगेच स्नान केले, दुर्गापाठ वाचला आणि घरात गंगाजल शिंपडले. तिकडे शेतात कोल्हे आणि गिधाडे, कुत्री आणि कावळे दुखीच्या प्रेताचे लचके तोडत होते. आयुष्यभराच्या भक्तीचे, सेवेचे आणि निष्ठेचे हेच बक्षीस होते.