मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
सव्वा शेर गहू
कोणा एका गावात शंकर नावाचा एक कुरमी शेतकरी राहत होता. साधाभोळा, गरीब माणूस; आपण बरे की आपले काम बरे, कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. छक्केपंजे त्याला ठाऊक नव्हते, लबाडी-कपटाचा त्याला वाराही लागला नव्हता. फसवले जाण्याची त्याला फिकीर नव्हती, आणि फसवण्याची विद्या अवगत नव्हती. जेवण मिळाले तर जेवावे; नाही मिळाले तर चणेफुटाण्यांवर वेळ निभवावी; तेही नसले तर पाणी प्यावे आणि रामाचे नाव घेऊन झोपी जावे. पण दाराशी कोणी अतिथी आला की त्याला हा निवृत्तिमार्ग सोडावा लागे. विशेषतः साधुमहात्म्यांचे पाय घराला लागले की त्याला संसारी व्यवहाराचा आश्रय घेतल्यावाचून गत्यंतरच नसे. स्वतः तो उपाशी झोपू शकत होता, पण साधूला उपाशी कसे निजवणार? ते पडले देवाचे भक्त! एके दिवशी संध्याकाळी एक महात्मा येऊन त्याच्या दाराशी मुक्काम ठोकून बसले. तेजस्वी मूर्ती होती; गळ्यात पीतांबर, डोक्यावर जटा, हातात पितळेचा कमंडलू, पायांत खडावा, डोळ्यांवर चष्मा; सारा वेष त्या महात्म्यांसारखा, जे श्रीमंतांच्या प्रासादांत तपश्चर्या करतात, मोटारगाड्यांतून देवस्थानांची प्रदक्षिणा करतात आणि योगसिद्धी प्राप्त व्हावी म्हणून रुचकर भोजन करतात. घरात होते जवाचे पीठ; ते त्यांना कसे वाढायचे? प्राचीन काळी जवाचे महत्त्व काहीही असो, पण सध्याच्या युगात जवाचे अन्न सिद्धपुरुषांना पचायला जड जाते. त्याला मोठी काळजी पडली: महात्माजींना खाऊ काय घालू? शेवटी त्याने ठरवले की कुठून तरी गव्हाचे पीठ उसने आणायचे; पण साऱ्या गावात गव्हाचे पीठ मिळाले नाही.
सव्वा शेर गहू
गावात सगळी माणसेच माणसे होती, देव एकही नव्हता; मग देवांचे खाद्य मिळणार कसे! सुदैवाने गावच्या विप्रमहाराजांकडे थोडेसे गहू मिळाले. त्यांच्याकडून त्याने सव्वा शेर गहू उसने घेतले आणि बायकोला दळून द्यायला सांगितले. महात्माजींनी भोजन केले आणि लांब ताणून दिली. सकाळी आशीर्वाद देऊन ते आपल्या वाटेने निघून गेले. विप्रमहाराज वर्षातून दोनदा खळ्यावर जाऊन धान्याचा आपला वाटा गोळा करीत असत. शंकरने मनाशी म्हटले, सव्वा शेर गहू यांना काय परत करायचे! खळ्यावर एरवी पाच शेरांची पंसेरी देतो, त्याऐवजी थोडे जास्तच देईन; त्यांनाही समजेल, मलाही समजेल. चैत्रात विप्रजी आले तेव्हा त्याने त्यांना जवळजवळ दीड पंसेरी गहू दिले आणि आपण ऋणातून मोकळे झालो असे समजून त्याविषयी अवाक्षर काढले नाही. विप्रजींनीही पुन्हा कधी मागितले नाहीत. भोळ्या शंकरला काय ठाऊक, की हे सव्वा शेर गहू फेडायला आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागणार आहे! सात वर्षे लोटली. विप्रजी विप्राचे सावकार झाले, शंकर शेतकऱ्याचा मजूर झाला. त्याचा धाकटा भाऊ मंगल त्याच्यापासून वेगळा झाला होता. एकत्र होते तोवर दोघे शेतकरी होते; वेगळे झाले आणि दोघेही मजूर बनले. द्वेषाची आग भडकू नये अशी शंकरची इच्छा होती, पण परिस्थितीपुढे त्याचे काही चालले नाही. ज्या दिवशी दोन वेगळ्या चुली पेटल्या, त्या दिवशी तो ढसाढसा रडला. आजपासून भाऊ-भाऊ वैरी होणार; एक रडेल तेव्हा दुसरा हसेल; एकाच्या घरी शोक असेल तेव्हा दुसऱ्याच्या घरी गोड गुलगुले तळले जातील.
सव्वा शेर गहू
प्रेमाचे बंधन, रक्ताचे बंधन, दुधाचे बंधन आज तुटते आहे. भगीरथ प्रयत्नांनी त्याने कुळाच्या मर्यादेचा वृक्ष लावला होता, आपल्या रक्ताचे पाणी घालून तो वाढवला होता; तो मुळासकट उपटला जाताना पाहून त्याच्या काळजाचे तुकडे होत होते. सात दिवस त्याने अन्नाच्या कणाचे तोंडही पाहिले नाही. दिवसभर ज्येष्ठाच्या उन्हात काम करी आणि रात्री तोंडावरून पांघरूण घेऊन पडून राही. या भीषण वेदनेने आणि असह्य क्लेशांनी त्याचे रक्त जाळून टाकले, मांस आणि मज्जा झिजवून टाकली. आजारी पडला तो महिनोन् महिने खाटेवरून उठला नाही. आता गुजराण कशी व्हायची? पाच बिघ्यांपैकी निम्मी जमीन उरली, एक बैल उरला; शेती कसली डोंबलाची होणार! शेवटी अशी पाळी आली की शेती केवळ घराण्याची अब्रू राखण्याचे साधन म्हणून उरली आणि पोटापाण्याचा भार मजुरीवर येऊन पडला. सात वर्षे उलटून गेली. एके दिवशी शंकर मजुरी करून परतत होता, तेव्हा वाटेत विप्रजींनी त्याला हटकले—शंकर, उद्या येऊन तुझ्या बियाण्याच्या उसनवारीचा आणि त्यावरच्या वाढीचा हिशेब करून टाक. तुझ्याकडे साडेपाच मण गहू केव्हापासून बाकी पडले आहेत आणि तू द्यायचे नावच काढत नाहीस. पचवून टाकायचा बेत आहे की काय? शंकर चकित होऊन म्हणाला—मी तुमच्याकडून गहू घेतले तरी केव्हा, की त्यांचे साडेपाच मण झाले? तुमची काहीतरी चूक होते आहे. माझ्याकडे कोणाचे छटाकभर धान्य बाकी नाही, की एक पैसा उधार नाही. विप्र—अशी नियत आहे म्हणूनच तर पोटाला अन्न मिळत नाही; त्याचेच हे फळ भोगतो आहेस.
सव्वा शेर गहू
असे म्हणून विप्रजींनी, आजपासून ७ वर्षांपूर्वी शंकरला दिलेल्या त्या सव्वा शेर गव्हाचा विषय काढला. शंकर ऐकून अवाक झाला. देवा! मी यांना कितीदा खळ्याचा वाटा दिला; यांनी माझे असे कोणते काम केले? पोथी-पंचांग पाहायला, मुहूर्त-शकुन सांगायला दारी येत तेव्हा काही ना काही 'दक्षिणा' घेऊनच जात. एवढा स्वार्थ! सव्वा शेर धान्य अंड्यासारखे उबवून आज हा पिशाच उभा केला आहे, मला गिळून टाकायला. इतक्या दिवसांत एकदा जरी बोलले असते तरी मी गहू मोजून देऊन टाकले असते; याच हेतूने मूग गिळून बसले होते काय! तो म्हणाला—महाराज, नाव घेऊन तर मी तेवढे धान्य दिले नाही, पण खळ्याच्या वाट्यात कित्येकदा शेर-शेर, दोन-दोन शेर दिले आहेत. आता तुम्ही आज साडेपाच मण मागता; मी कुठून देऊ! विप्र—हिशेब जवाजवाचा, बक्षिसी शंभराशंभराची! तू जे काही दिले असशील त्याचा काही हिशेब नाही; मग एकाऐवजी चार पंसेरी का देईनास. तुझ्या नावावर वहीत साडेपाच मण लिहिलेले आहेत; वाटेल त्याच्याकडून हिशेब करवून घे. देऊन टाकलेस तर तुझे नाव खोडून टाकतो; नाहीतर आकडा आणखी वाढतच राहील. शंकर—पांडे, एका गरिबाला का छळता? माझ्या खाण्याचा पत्ता नाही; एवढे गहू कोणाच्या घरून आणू? विप्र—वाटेल त्याच्या घरून आण; मी छटाकभरही सोडणार नाही. इथे दिले नाहीस, तरी देवाच्या घरी तर देशीलच ना? शंकरचा थरकाप उडाला. आपण शिकलेसवरलेले असतो तर म्हणून मोकळे झालो असतो, ठीक आहे, देवाच्या घरीच देऊ; तिथली मापे इथल्यापेक्षा काही मोठी तर नसतील! निदान तसा काही पुरावा तरी आपल्यापाशी नाही; मग त्याची काळजी कशाला? पण शंकर इतका तर्कपटू, इतका व्यवहारचतुर नव्हता.
सव्वा शेर गहू
एक तर ऋण, तेही ब्राह्मणाचे; वहीत नाव राहिले तर सरळ नरकात जाईन, या विचारानेच त्याच्या अंगावर काटा आला. तो म्हणाला—महाराज, तुमचे जेवढे निघत असेल तेवढे इथेच देईन, देवाच्या घरी कशाला देऊ? या जन्मी तर ठोकरा खातोच आहे, त्या जन्मासाठी कशाला काटे पेरू? पण हा काही न्याय नव्हे. तुम्ही राईचा पर्वत केलात; ब्राह्मण असून तुम्ही असे करायला नको होते. त्याच वेळी तगादा लावून घेतले असते, तर आज माझ्या डोक्यावर एवढे मोठे ओझे कशाला पडले असते! मी तर देऊन टाकीन, पण तुम्हांला देवाच्या घरी जाब द्यावा लागेल. विप्र—तिथली भीती तुला असेल, मला कशाला वाटेल? तिथे तर सगळे आपलेच भाऊबंद आहेत. ऋषिमुनी सगळे ब्राह्मणच, देवही ब्राह्मणच; काही बरेवाईट झालेच तर सांभाळून घेतील. तर मग केव्हा देतोस? शंकर—माझ्यापाशी काही ठेवलेले तर नाही; कोणाकडे तरी हात पसरून आणीन तेव्हाच देईन ना! विप्र—हे मला चालणार नाही. सात वर्षे झाली; आता एका दिवसाचीही मुरवत ठेवणार नाही. गहू देता येत नसतील तर दस्तऐवज लिहून दे. शंकर—मला तर द्यायचेच आहेत; गहू घ्या, नाहीतर दस्तऐवज लिहून घ्या. कोणत्या भावाने किंमत धरणार? विप्र—बाजारभाव पाच शेरांचा आहे; तुला सव्वापाच शेरांच्या भावाने लावतो. शंकर—द्यायचेच आहेत तर बाजारभावानेच देईन; पावशेराची सूट घेऊन कशाला दोषी होऊ? हिशेब केला तेव्हा गव्हाची किंमत ६० रुपये झाली. ६० रुपयांचा दस्तऐवज लिहिला गेला; व्याज शेकडा ३ रुपये. वर्षभरात फेड न केल्यास व्याजाचा दर शेकडा साडेतीन रुपये. स्टँपाचे आठ आणे आणि दस्तऐवज लिहिण्याचा १ रुपया शंकरला वर आणखी द्यावा लागला. साऱ्या गावाने विप्रजींची निंदा केली, पण तोंडावर नव्हे. सावकाराशी सगळ्यांनाच काम पडते; त्याच्या तोंडी कोण लागणार!
सव्वा शेर गहू
( २ ) शंकरने वर्षभर खडतर तपश्चर्या केली. मुदतीच्या आत रुपये फेडण्याचे त्याने जणू व्रतच घेतले. दुपारची चूल पूर्वीही पेटत नसे, चणेफुटाण्यांवर भागत असे; आता तेही बंद झाले. फक्त मुलासाठी रात्री रोट्या ठेवल्या जात. रोज पैशाची तंबाखू तो ओढत असे; एवढे एकच व्यसन त्याला कधी सोडता आले नव्हते. आता तेही व्यसन या कठोर व्रताला बळी पडले. त्याने चिलीम आपटून टाकली, हुक्का फोडला आणि तंबाखूच्या मडक्याचा चक्काचूर केला. कपडे पूर्वीच त्यागाच्या परमावधीला पोचले होते; आता ते निसर्गाने आखून दिलेल्या किमान रेषांपुरतेच उरले. शिशिरातली हाडे फोडणारी थंडी त्याने शेकोटीपाशी बसून काढली. या अढळ निश्चयाचे फळ अपेक्षेपेक्षा अधिक मिळाले. वर्षाअखेर त्याच्यापाशी ६० रुपये जमा झाले. त्याला वाटले, पंडितजींना एवढे रुपये देईन आणि म्हणेन, महाराज, बाकीचे रुपयेही लवकरच तुमच्यापुढे हजर करीन. १५ रुपयांचीच तर गोष्ट उरली; पंडितजी एवढेही ऐकणार नाहीत काय? त्याने रुपये घेतले आणि नेऊन पंडितजींच्या चरणकमलांवर अर्पण केले. पंडितजींनी विस्मित होऊन विचारले—कोणाकडून उसने घेतलेस काय? शंकर—नाही महाराज, तुमच्या आशीर्वादाने यंदा मजुरी चांगली मिळाली. विप्र—पण हे तर ६० रुपयेच आहेत. शंकर—होय महाराज, एवढे आता घ्या; बाकीचे मी दोन-तीन महिन्यांत देईन. मला ऋणातून मोकळे करा. विप्र—ऋणातून मोकळा तेव्हाच होशील, जेव्हा माझी कवडीन् कवडी चुकती करशील. जा, माझे आणखी १५ रुपये घेऊन ये. शंकर—महाराज, एवढी दया करा. आता संध्याकाळच्या रोट्यांचाही पत्ता नाही. गावातच आहे, केव्हा ना केव्हा देईनच. विप्र—असले लचांड मी मागे लावून घेत नाही, आणि फार बोलणेही मला येत नाही. माझे पुरे रुपये मिळाले नाहीत तर आजपासून शेकडा साडेतीन रुपये व्याज लागेल. तुझे रुपये हवे तर तुझ्या घरी ठेव, हवे तर माझ्याकडे सोडून जा.
सव्वा शेर गहू
शंकर—बरे, जेवढे आणले आहेत तेवढे ठेवून घ्या. मी जातो, कुठून तरी आणखी १५ रुपये आणायची तजवीज करतो. शंकरने सारा गाव पालथा घातला, पण कोणी रुपये दिले नाहीत; त्याच्यावर विश्वास नव्हता म्हणून नव्हे, किंवा कोणापाशी रुपये नव्हते म्हणूनही नव्हे, तर पंडितजींच्या सावजाला हात लावण्याची कोणाची छाती नव्हती म्हणून. ( ३ ) क्रियेनंतर प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम आहे. वर्षभर तपश्चर्या करूनही शंकरला ऋणमुक्त होता आले नाही, तेव्हा त्याच्या संयमाचे रूपांतर निराशेत झाले. त्याला कळून चुकले की एवढे कष्ट सोसूनही वर्षात ६० रुपयांहून जास्त जमवता आले नाहीत, तर याच्या दुप्पट रुपये जमतील असा आता कोणता उपाय उरला आहे? डोक्यावर ऋणाचे ओझे वाहायचेच आहे, तर ते मणभराचे काय आणि सव्वा मणाचे काय! त्याचा उत्साह मावळला, कष्टांचा त्याला तिटकारा आला. आशा ही उत्साहाची जननी आहे; आशेत तेज आहे, बळ आहे, जीवन आहे. आशा हीच जगाला चालवणारी शक्ती आहे. आशा गमावून शंकर उदासीन झाला. ज्या गरजा त्याने वर्षभर टाळून ठेवल्या होत्या, त्या आता दाराशी उभ्या राहणाऱ्या भिकारणी राहिल्या नव्हत्या; त्या छाताडावर बसणाऱ्या हडळी झाल्या होत्या, आपला नैवेद्य घेतल्याशिवाय पिच्छा न सोडणाऱ्या. कपड्यांना ठिगळे लावण्यालाही एक मर्यादा असते. आता शंकरला मजुरी मिळाली की तो रुपये साठवीत नसे; कधी कपडे आणी, कधी खाण्याचा एखादा जिन्नस. पूर्वी जिथे तो फक्त तंबाखूच ओढत असे, तिथे आता गांजा-चरसाचीही चटक लागली. रुपये फेडण्याची आता त्याला काहीच चिंता नव्हती, जणू त्याच्यावर कोणाचा एक पैसाही निघत नव्हता. पूर्वी हिवताप चढलेला असला तरी तो कामाला जायचाच; आता कामावर न जाण्यासाठी निमित्त शोधत असे.
सव्वा शेर गहू
अशा रीतीने तीन वर्षे निघून गेली. विप्रजी महाराजांनी एकदाही तगादा केला नाही. चतुर शिकाऱ्याप्रमाणे त्यांना अचूक नेम साधायचा होता. आधीच सावजाला बुजवणे त्यांच्या धोरणात बसत नव्हते. एके दिवशी पंडितजींनी शंकरला बोलावून हिशेब दाखवला. जमा असलेले ६० रुपये वजा करूनही शंकरच्या नावावर अजून १२० रुपये निघाले. शंकर—एवढे रुपये तर त्या जन्मीच देईन; या जन्मी व्हायचे नाहीत. विप्र—मी याच जन्मी घेणार. मुद्दल नाही तर नाही, व्याज तर द्यावेच लागेल. शंकर—एक बैल आहे, तो घ्या; एक झोपडी आहे, ती घ्या. आणखी माझ्यापाशी आहे तरी काय? विप्र—बैलबिल घेऊन मला काय करायचे आहे? मला देण्यासारखे तुझ्यापाशी पुष्कळ आहे. शंकर—आणखी काय आहे महाराज? विप्र—काही नसले तरी तू तर आहेस ना. नाहीतरी तू कुठे ना कुठे मजुरीला जातोसच; मलाही शेतीसाठी मजूर ठेवावाच लागतो. व्याजापोटी तू आमच्याकडे काम करीत जा; सवड होईल तेव्हा मुद्दलही देऊन टाक. खरे तर असे आहे की माझे रुपये चुकते करीपर्यंत तुला आता दुसरीकडे कुठे कामाला जाताच येणार नाही. तुझ्यापाशी काही जायदाद नाही; एवढे मोठे गाठोडे मी कशाच्या भरवशावर सोडून देऊ? तू मला महिन्याच्या महिन्याला व्याज देत जाशील, याची हमी कोण घेणार? आणि दुसरीकडे कमावून तू मला व्याजसुद्धा देऊ शकत नाहीस, तर मुद्दलाची गोष्टच सोड! शंकर—महाराज, व्याजापोटी तर काम करीन; मग खाऊ काय? विप्र—तुझी बायको आहे, मुले आहेत; ती काय हातपाय तोडून बसणार आहेत? राहता राहिलो मी; तर तुला न्याहारीसाठी रोज अर्धा शेर जव देत जाईन. पांघरायला वर्षाला एक घोंगडी मिळेल, एक मिरजईही शिवून देत जाईन; आणखी काय पाहिजे? हे खरे की इतर लोक तुला रोज चार आणे देतात; पण मला तशी गरज नाही. मी तर तुला माझे रुपये वसूल करण्यासाठी ठेवतो आहे.
सव्वा शेर गहू
शंकर काही वेळ खोल काळजीत बुडून राहिला आणि मग म्हणाला—महाराज, ही तर जन्मभराची गुलामी झाली! विप्र—गुलामी समज, नाहीतर मजुरी समज. माझे रुपये वसूल केल्याशिवाय मी तुला कधीच सोडणार नाही. तू पळालास तर तुझा मुलगा भरेल. हां, कोणीच उरले नाही तर मग गोष्ट वेगळी. या निर्णयावर कुठेही अपील नव्हते. मजुराला जामीन कोण राहणार! कुठे आसरा नव्हता; पळून तरी जाणार कुठे? दुसऱ्या दिवसापासून त्याने विप्रजींकडे काम करायला सुरुवात केली. सव्वा शेर गव्हापायी जन्मभरासाठी गुलामीची बेडी पायांत घालावी लागली. त्या अभाग्याला आता कोणत्या विचाराने समाधान वाटत असेल तर ते एवढ्याच विचाराने, की हे माझ्या पूर्वजन्मीचे संचित आहे. बायकोला कधी न केलेली कामे करावी लागत, मुले दाण्यादाण्याला मोताद झाली होती; पण शंकरला मुकाट्याने पाहत राहण्यापलीकडे काहीच करता येत नसे. गव्हाचे ते दाणे एखाद्या देवाच्या शापासारखे आमरण त्याच्या डोक्यावरून उतरले नाहीत. ( ४ ) विप्रजींकडे २० वर्षे गुलामी करून शंकरने या असार संसाराचा निरोप घेतला. १२० रुपये अजूनही त्याच्या डोक्यावर स्वार होते. त्या गरिबाला देवाच्या दरबारात त्रास देणे पंडितजींना उचित वाटले नाही; ते एवढे अन्यायी, एवढे निर्दय नव्हते. त्यांनी त्याच्या तरुण मुलाची मानगूट पकडली. आजपर्यंत तो विप्रजींकडे काम करतो आहे. त्याची सुटका केव्हा होईल, होईल तरी की नाही, देवच जाणे. वाचकहो! ही हकीगत कपोलकल्पित समजू नका. ही सत्य घटना आहे. अशा शंकरांची आणि अशा विप्रांची जगात वाण नाही.