मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
शतरंजचे खेळाडू
वाजिदअली शाहांचा जमाना होता. लखनौ विलासाच्या रंगात बुडून गेले होते. लहानथोर, गरीब-श्रीमंत, सारेच विलासात बुडालेले होते. कोणी नाचगाण्याची मैफल सजवी, तर कोणी नुसती अफूच्या गुंगीचीच लज्जत चाखीत पडे. जीवनाच्या प्रत्येक अंगात चैनीला आणि मौजमजेलाच अग्रस्थान होते. राज्यकारभारात, साहित्याच्या क्षेत्रात, समाजव्यवस्थेत, कलाकुसरीत, उद्योगधंद्यांत, खाण्यापिण्यात आणि वागण्याबोलण्यात, सर्वत्र विलासच भरून राहिला होता. सरकारी अंमलदार विषयभोगात, कवी प्रेमाच्या आणि विरहाच्या वर्णनात, कारागीर कलाबतू आणि चिकनकाम करण्यात, तर व्यापारी सुरमा, अत्तर, मिस्सी आणि उटणी विकण्यात गढून गेले होते. सर्वांच्याच डोळ्यांवर विलासाची धुंदी चढली होती. जगात काय चालले आहे याची कोणालाच खबर नव्हती. कुठे लाव्यांच्या झुंजी लागल्या आहेत. कुठे तितरांच्या लढतीसाठी पैजा लागत आहेत. कुठे सोंगट्यांचा पट मांडला आहे; 'पौ-बारा'चा गलका उडाला आहे. कुठे शतरंजचे घनघोर युद्ध जुंपले आहे. राजापासून रंकापर्यंत सारे याच नादात मस्त होते. एवढेच काय, फकिरांना पैसे मिळाले तर तेही रोट्या न घेता अफू खात किंवा मदक ओढीत. शतरंज, पत्ते, गंजिफा खेळल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, विचारशक्तीचा विकास होतो, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्याची सवय लागते, असे युक्तिवाद मोठ्या जोराने मांडले जात (या पंथाच्या लोकांची जगात अजूनही वाण नाही). तेव्हा मिर्झा सज्जादअली आणि मीर रौशनअली आपला बहुतेक वेळ बुद्धी तीक्ष्ण करण्यात घालवीत, तर कोणा विचारी माणसाला त्यात हरकत घेण्यासारखे काय होते? दोघांकडेही वडिलोपार्जित जहागिरी होत्या, पोटापाण्याची काही चिंता नव्हती; घरी बसल्या चैन करीत असत. शेवटी दुसरे करणार तरी काय!
शतरंजचे खेळाडू
सकाळ झाली की दोघे मित्र न्याहारी उरकून पट अंथरून बसत, मोहरे मांडले जात आणि लढाईचे डावपेच सुरू होत. मग दुपार केव्हा झाली, तिसरा प्रहर केव्हा उलटला, संध्याकाळ केव्हा झाली, याचे भानच राहत नसे. घरातून वारंवार बोलावणे येई—जेवण तयार आहे. इकडून उत्तर जाई—चला, आलोच; दस्तरखान अंथरा. शेवटी बावर्ची नाइलाजाने जेवण दिवाणखान्यातच ठेवून जाई, आणि दोघे मित्र दोन्ही कामे एकाच वेळी करीत. मिर्झा सज्जादअलींच्या घरात कोणी वडीलधारे माणूस नव्हते, म्हणून त्यांच्याच दिवाणखान्यात डाव रंगत; पण याचा अर्थ मिर्झांच्या घरातली इतर माणसे त्यांच्या या वागण्यावर खूश होती असा मात्र नव्हे. घरच्यांचे तर सोडाच, मोहल्ल्यातले लोक, घरचे नोकरचाकरसुद्धा रोज कुत्सित शेरे मारीत—मोठा अपशकुनी खेळ आहे. घराचा सत्यानाश करतो. खुदा करो आणि कोणाला याची चटक न लागो. माणूस दीनाच्याही कामाचा राहत नाही आणि दुनियेच्याही; धड ना घरचा, धड ना घाटचा. वाईट रोग आहे. इतकेच काय, मिर्झांच्या बेगमसाहेबांना या खेळाचा एवढा तिटकारा होता, की संधी शोधून शोधून त्या नवऱ्याला फैलावर घेत. पण अशी संधी त्यांना क्वचितच मिळे. त्या झोपलेल्याच असत, तोवर तिकडे पट मांडला जाई. आणि रात्री त्या झोपी गेल्यावर कुठे मिर्झाजी आत येत. हां, नोकरांवर मात्र त्या आपला राग काढीत राहत—काय, पान मागितले आहे? सांग, स्वतः येऊन घेऊन जा म्हणावे. जेवायलाही फुरसत नाही! ने ते जेवण आणि आपट त्यांच्या डोक्यावर; खावोत, नाहीतर कुत्र्याला घालोत. पण तोंडावर त्यांनाही काही बोलवत नसे. त्यांना स्वतःच्या पतीचा तेवढा राग नव्हता, जेवढा मीरसाहेबांचा. त्यांनी त्यांचे नाव 'मीर बिघाडू' ठेवले होते. बहुधा मिर्झाजी स्वतःची बाजू सावरण्यासाठी सारा दोष मीरसाहेबांच्याच माथी मारीत असावेत.
शतरंजचे खेळाडू
एके दिवशी बेगमसाहेबांचे डोके दुखू लागले. त्यांनी बांदीला सांगितले—जा, मिर्झासाहेबांना बोलावून आण. कोणा हकिमाकडून औषध आणू देत. पळ, लवकर जा. बांदी गेली, तेव्हा मिर्झाजी म्हणाले—चल, आलोच. बेगमसाहेबांचा स्वभाव तापट होता. आपले डोके दुखत असावे आणि नवऱ्याने शतरंज खेळत बसावे, हे सहन करण्याइतकी ताकद त्यांच्यात कुठली! चेहरा लालबुंद झाला. बांदीला म्हणाल्या—जा, सांग, आत्ताच्या आत्ता चला, नाहीतर त्या स्वतःच हकिमाकडे निघून जातील. मिर्झाजींचा डाव मोठा रंगात आला होता; दोनच शहांत मीरसाहेबांवर मात होणार होती. चिडून म्हणाले—एवढा काय जीव कंठाशी आला आहे? जरा दम धरवत नाही? मीर—अहो, मग जाऊन ऐकून तरी या ना. बायकांचा स्वभाव नाजूकच असतो. मिर्झा—जी हां, जाणार तर! दोन शहांत आपल्यावर मात होते आहे ना! मीर—जनाब, या भरवशावर राहू नका. अशी चाल योजली आहे, की आपले मोहरे जागच्या जागी राहतील आणि मात होऊन जाईल. पण जा, ऐकून या; उगाच कशाला त्यांचे मन दुखवता? मिर्झा—या बोलण्यावर तर आता मात करूनच जाईन. मीर—मी खेळणारच नाही. आपण जाऊन ऐकून या. मिर्झा—अरे यार, हकिमाकडे जावे लागेल. डोकेबिके काही दुखत नाही; मला छळायचा बहाणा आहे. मीर—काहीही असो, त्यांचे मन तर राखावेच लागेल. मिर्झा—बरे, आणखी एक चाल खेळून घेतो. मीर—मुळीच नाही. आपण ऐकून येत नाही तोवर मी मोहऱ्याला हातच लावणार नाही. मिर्झासाहेब नाइलाजाने आत गेले, तेव्हा बेगमसाहेबा कपाळाला आठ्या घालून, पण कण्हत कण्हत म्हणाल्या—तुम्हाला ही मेली शतरंज एवढी प्यारी आहे! कोणी मरून का जाईना, पण उठायचे नाव घेत नाही! तुमच्यासारखा माणूस खुदा कोणाच्याही नशिबी न देवो! मिर्झा—काय सांगू, मीरसाहेब ऐकेचनात. मोठ्या मुश्किलीने सुटका करून घेऊन आलो आहे.
शतरंजचे खेळाडू
बेगम—ते स्वतः जसे रिकामटेकडे आहेत, तसेच सगळ्यांना समजतात की काय? त्यांनाही बायकापोरे आहेत ना; की सगळ्यांचा निकाल लावून टाकला? मिर्झा—मोठा नादिष्ट माणूस आहे. तो आला की नाइलाजाने मलाही खेळावेच लागते. बेगम—हाकलून का नाही देत? मिर्झा—बरोबरीचे आहेत; वयाने, दर्जाने माझ्यापेक्षा दोन बोटे वरच. मुलाहिजा राखावाच लागतो. बेगम—तर मग मीच हाकलून देते. रागावतील तर रागावू देत. कोण कोणाची चूल पेटवतो! राणी रुसली तर आपले सौभाग्य घेऊन बसेल. हिरिया, जा, बाहेरून शतरंज उचलून आण. मीरसाहेबांना सांग, मियाँ आता खेळणार नाहीत, आपण तशरीफ न्यावी. मिर्झा—अगं अगं, असला कहर करू नकोस हो! माझी बेअब्रू करायची आहे की काय! थांब हिरिया, कुठे चाललीस? बेगम—जाऊ का देत नाही? तिला अडवाल तर माझ्या रक्ताची शपथ आहे. बरे, तिला अडवलेत; आता मला अडवून दाखवा, मग मानीन. एवढे बोलून बेगमसाहेबा तणतणत दिवाणखान्याकडे निघाल्या. बिचाऱ्या मिर्झांचा चेहरा उतरला. बायकोच्या विनवण्या करू लागले—'खुदासाठी, तुला हजरत हुसेनांची शपथ. तिकडे जाशील तर माझे मेलेले तोंड पाहशील!' पण बेगमसाहेबांनी एक ऐकले नाही. दिवाणखान्याच्या दारापर्यंत गेल्या, पण परपुरुषासमोर एकदम जायचे म्हटल्यावर पाय जणू जखडल्यासारखे झाले. आत डोकावल्या. योगायोगाने खोली रिकामी होती. मीरसाहेबांनी एक-दोन मोहरे इकडचे तिकडे केले होते, आणि आपण त्या गावचेच नाही असे दाखवण्यासाठी बाहेर येरझाऱ्या घालीत होते. मग काय, बेगमसाहेबांनी आत जाऊन पट उलथून टाकला; काही मोहरे तख्ताखाली फेकले, काही बाहेर; आणि दार आतून लावून कडी घातली. मीरसाहेब दाराशीच होते; मोहरे बाहेर फेकले जाताना त्यांनी पाहिले, बांगड्यांची किणकिणही कानी पडली. मग दार बंद झाले, तेव्हा ओळखले, की बेगमसाहेबा बिघडल्या. गुपचूप घरचा रस्ता धरला.
शतरंजचे खेळाडू
मिर्झा म्हणाले—तू कहर केलास! बेगम—आता मीरसाहेब इकडे आले, तर उभ्याउभ्या बाहेर काढायला लावीन. एवढी लगन खुदाकडे लावली असती, तर काय भिकेला लागले असते! स्वतः मात्र शतरंज खेळावी, आणि मी इथे चूल-जात्याच्या काळजीत डोके शिणवावे! आता हकीमसाहेबांकडे नेता, की अजूनही विचारच चालला आहे? मिर्झा घराबाहेर पडले, ते हकिमाच्या घरी जाण्याऐवजी मीरसाहेबांच्या घरी पोचले, आणि सारी हकीकत सांगितली. मीरसाहेब म्हणाले—मी तर मोहरे बाहेर येताना पाहिले, तेव्हाच ताडले. ताबडतोब पळ काढला. भलत्याच रागीट दिसतात. पण आपण त्यांना असे डोक्यावर चढवून ठेवले आहे, हे बरे नाही. आपण बाहेर काय करता याच्याशी त्यांना काय करायचे आहे? घराची व्यवस्था पाहणे हे त्यांचे काम; बाकीच्या गोष्टींशी त्यांचा काय संबंध? मिर्झा—ते असो, आता बैठक कुठे जमायची ते सांगा. मीर—त्याची काय फिकीर! एवढे मोठे घर पडले आहे. बस, इथेच जमू दे. मिर्झा—पण बेगमसाहेबांची समजूत कशी काढू? घरी बसून राहत होतो तेव्हा तर त्या एवढ्या बिघडत; इथे बैठक बसली, तर बहुधा जिवंत सोडणार नाहीत. मीर—अहो, बडबडू द्या ना; दोन-चार दिवसांत आपोआप ताळ्यावर येतील. हां, आपण एवढे करा, की आजपासून जरा ताठ राहा. २ कोणत्या तरी अज्ञात कारणाने मीरसाहेबांच्या बेगमना त्यांनी घरापासून दूर राहणेच इष्ट वाटे. म्हणूनच त्या त्यांच्या शतरंजप्रेमावर कधी टीका करीत नसत; उलट कधीकधी मीरसाहेबांना उशीर झाला, तर आठवण करून देत. या कारणांमुळे मीरसाहेबांचा असा भ्रम झाला होता, की आपली बायको अत्यंत विनयशील आणि गंभीर स्वभावाची आहे. पण दिवाणखान्यात पट मांडला जाऊ लागला आणि मीरसाहेब दिवसभर घरीच राहू लागले, तेव्हा बेगमना फार त्रास होऊ लागला. त्यांच्या स्वातंत्र्याला अडथळा आला. दाराशी जरा डोकावून पाहायलाही त्या दिवसभर आसुसून जात.
शतरंजचे खेळाडू
तिकडे नोकरांमध्येही कुजबुज सुरू झाली. आजवर ते दिवसभर पडल्यापडल्या माश्या मारीत असत. घरात कोणी येवो, कोणी जावो, त्यांना काही देणेघेणे नव्हते. आता आठही प्रहर हुकमांचा धोशा सुरू झाला. कधी पान आणायचा हुकूम होई, कधी मिठाईचा. आणि हुक्का तर एखाद्या प्रेमिकाच्या हृदयासारखा सदा पेटलेलाच असे. ते बेगमसाहेबांकडे जाऊन जाऊन म्हणत—हुजूर, मियाँची शतरंज तर आमच्या जिवाला घोर होऊन बसली! दिवसभर धावून धावून पायांना फोड आले. हा काय खेळ म्हणायचा, की सकाळी बसले ते थेट संध्याकाळच करायची! घटका-अर्धी घटका मन रिझवण्यासाठी खेळले म्हणजे पुष्कळ झाले. असो, आमची काही तक्रार नाही; आम्ही हुजुरांचे गुलाम, जो हुकूम होईल तो बजावणारच; पण हा खेळ अपशकुनी आहे. तो खेळणाऱ्याची कधी भरभराट होत नाही; घरावर कोणती ना कोणती आफत नक्की येते. एवढेच नव्हे, तर एकाच्या पायी मोहल्लेच्या मोहल्ले उद्ध्वस्त होताना पाहिले आहेत. साऱ्या मोहल्ल्यात हीच चर्चा चालते. हुजुरांचे मीठ खातो, आपल्या धन्याची निंदा ऐकून ऐकून वाईट वाटते. पण करणार काय! यावर बेगमसाहेबा म्हणत—मला स्वतःलाच हे पसंत नाही. पण ते कोणाचे ऐकतच नाहीत, त्याला काय करायचे! मोहल्ल्यातही जी दोन-चार जुन्या जमान्यातली माणसे होती, ती आपसात नाना तऱ्हेच्या अमंगळ कल्पना करू लागली—आता काही खैर नाही. आपल्या रईसांची जर ही दशा, तर मुलखाचा खुदाच वाली. ही बादशाही शतरंजपायी धुळीला मिळणार. लक्षणे वाईट आहेत.
शतरंजचे खेळाडू
राज्यात हाहाकार माजला होता. प्रजा दिवसाढवळ्या लुटली जात होती. फिर्याद ऐकणारा कोणी नव्हता. खेड्यापाड्यांतली सारी दौलत लखनौकडे ओढली जात होती, आणि तिथे ती वेश्यांवर, भांडांवर आणि विलासाची इतर अंगे पुरी करण्यात उधळली जात होती. इंग्रज कंपनीचे कर्ज दिवसेंदिवस वाढत होते. घोंगडी दिवसेंदिवस भिजून जड होत चालली होती. देशात सुव्यवस्था नसल्यामुळे वार्षिक करही वसूल होत नव्हता. रेसिडेंट वारंवार ताकीद देत होता; पण इथे तर लोक विलासाच्या नशेत चूर होते; कोणालाच त्याचे सोयरसुतक नव्हते. असो, मीरसाहेबांच्या दिवाणखान्यात शतरंज चालून कित्येक महिने लोटले. नवनवे पेच सोडवले जात; नवनवे किल्ले रचले जात; नित्य नवी व्यूहरचना होई; कधीकधी खेळता खेळता बाचाबाची होई; अरेतुरेपर्यंत पाळी येई. पण लवकरच दोघा मित्रांत समेट होई. कधीकधी असेही होई, की डाव उधळला जाई; मिर्झाजी रुसून आपल्या घरी निघून येत; मीरसाहेब आपल्या घरात जाऊन बसत. पण रात्रभराच्या झोपेबरोबर मनातली सारी अढी विरून जाई. सकाळी दोघे मित्र दिवाणखान्यात हजर होत. एके दिवशी दोघे मित्र शतरंजच्या दलदलीत गटांगळ्या खात बसले होते, तेवढ्यात बादशाही फौजेचा एक अंमलदार घोड्यावर स्वार होऊन मीरसाहेबांचे नाव विचारीत येऊन थडकला. मीरसाहेबांचे धाबे दणाणले. ही काय बला डोक्यावर आली! हे बोलावणे कशासाठी आले? आता काही खैर दिसत नाही! घराचे दरवाजे बंद करून घेतले. नोकरांना म्हणाले—सांगा, घरात नाहीत. स्वार—घरात नाहीत, तर कुठे आहेत? नोकर—ते मला ठाऊक नाही. काय काम आहे? स्वार—काम तुला काय सांगू? हुजुरांच्या दरबारी बोलावणे आहे—बहुधा फौजेसाठी काही शिपाई मागितले आहेत. जहागीरदार आहेत, थट्टा नव्हे! आघाडीवर जावे लागले, म्हणजे कळेल कशाशी खातात ते!
शतरंजचे खेळाडू
नोकर—बरे, तर जा आपण; सांगितले जाईल. स्वार—नुसते सांगून भागायचे नाही. मी उद्या स्वतः येईन. बरोबर घेऊन जायचा हुकूम झाला आहे. स्वार निघून गेला. मीरसाहेबांचा जीव थरकापला. मिर्झाजींना म्हणाले—बोला जनाब, आता काय होणार? मिर्झा—मोठी मुसीबत आहे. कुठे मलाही बोलावणे यायचे! मीर—कंबख्त उद्या पुन्हा येतो म्हणून सांगून गेला आहे! मिर्झा—आफत आहे, दुसरे काय! कुठे आघाडीवर जावे लागले, तर फुकट मेलो. मीर—बस, एकच उपाय आहे, की घरी सापडायचेच नाही. उद्यापासून गोमतीकाठी कुठेतरी निर्जन जागी डाव मांडू. तिथे कोणाला पत्ता लागणार? हजरत येतील आणि आपले आपणच परत जातील. मिर्झा—वल्ला, आपल्याला काय नामी युक्ती सुचली! याखेरीज दुसरा उपायच नाही. इकडे मीरसाहेबांच्या बेगम त्या स्वाराला सांगत होत्या—तुम्ही चांगलीच हूल दिलीत. त्याने उत्तर दिले—असल्या बावळटांना तर मी चुटकीवर नाचवतो. यांची सारी अक्कल आणि हिंमत शतरंजने चरून टाकली आहे. आता चुकूनसुद्धा घरी राहणार नाहीत. ३ दुसऱ्या दिवसापासून दोघे मित्र पहाटेच्या अंधारातच घरातून निघत. काखेत एक लहानशी सतरंजी मारून, डबीत विडे भरून घेऊन ते गोमती ओलांडून एका जुन्या ओसाड मशिदीत जात; ती बहुधा नवाब आसफउद्दौलाने बांधली होती. वाटेत तंबाखू, चिलीम आणि मातीचा लहानसा हुक्का घेत, आणि मशिदीत पोचून, सतरंजी अंथरून, हुक्का भरून शतरंज खेळायला बसत. मग त्यांना दीनदुनियेची फिकीर उरत नसे. 'किश्त', 'शह' असे एक-दोन शब्द सोडले तर त्यांच्या तोंडून दुसरे वाक्य निघत नसे. एखादा योगीसुद्धा समाधीत एवढा एकाग्र होत नसेल. दुपारी भूक लागली की दोघे मित्र कोणा नानबाईच्या दुकानी जाऊन जेवून येत, आणि एक चिलीम हुक्का ओढून पुन्हा रणांगणात ठाण मांडीत. कधीकधी तर त्यांना जेवणाचीही आठवण राहत नसे.
शतरंजचे खेळाडू
इकडे देशाची राजकीय स्थिती भयंकर होत चालली होती. कंपनीच्या फौजा लखनौच्या दिशेने पुढे सरकत येत होत्या. शहरात खळबळ उडाली होती. लोक बायकापोरांना घेऊन खेड्यापाड्यांकडे पळत होते. पण आमच्या दोघा खेळाडूंना त्याची जराही फिकीर नव्हती. घरून येत ते गल्लीबोळांतूनच. भीती ही, की कुठे एखाद्या बादशाही नोकराची नजर पडायची आणि वेठीला धरले जायचे. हजारो रुपये सालिना उत्पन्नाची जहागीर त्यांना फुकटातच पचवायची होती. एके दिवशी दोघे मित्र मशिदीच्या भग्न अवशेषांत बसून शतरंज खेळत होते. मीरसाहेबांचा डाव जरा कमजोर होता. मिर्झा त्यांना शहावर शह देत होते. तेवढ्यात कंपनीचे सैनिक येताना दिसले. ही गोऱ्यांची फौज होती; लखनौचा ताबा घेण्यासाठी ती येत होती. मीरसाहेब म्हणाले—इंग्रजी फौज येते आहे. खुदा खैर करो. मिर्झा—येऊ द्या; शह वाचवा. हा घ्या शह. मीर—जरा पाहिले पाहिजे—इथेच आडोशाला उभे राहू. मिर्झा—पाहाल हो, घाई काय आहे; पुन्हा शह. मीर—तोफखानाही आहे. पाचेक हजार माणसे असतील. काय जवान आहेत! लाल माकडांसारखी तोंडे आहेत. चेहरा पाहूनच धडकी भरते. मिर्झा—जनाब, बहाणे करू नका. या थापा दुसऱ्या कोणाला द्या—हा शह! मीर—आपणही अजब माणूस आहात. इथे शहरावर आफत कोसळली आहे, आणि आपल्याला शहाचे सुचते आहे! शहराला वेढा पडला तर घरी कसे जाणार, याचीही काही खबर आहे? मिर्झा—घरी जायची वेळ येईल तेव्हा पाहता येईल—हा शह! बस, आता या शहात मात आहे. फौज निघून गेली. दहा वाजण्याची वेळ होती. पुन्हा पट मांडला गेला. मिर्झा म्हणाले—आज जेवणाचे कसे काय करायचे? मीर—अहो, आज तर रोजा आहे. आपल्याला भूक जास्त लागली आहे की काय?
शतरंजचे खेळाडू
मिर्झा—जी नाही. शहरात कोण जाणे काय चालले आहे. मीर—शहरात काहीही चालले नसेल. लोक जेवूनखाऊन आरामात झोपले असतील. हुजूर नवाबसाहेबही ऐषमहालात असतील. दोघे सद्गृहस्थ पुन्हा खेळायला बसले, ते थेट तीन वाजेपर्यंत. या खेपेला मिर्झाजींचा डाव कमजोर होता. चाराचे टोले पडतच होते, तोच फौज परतत असल्याची चाहूल लागली. नवाब वाजिदअली शाह पकडले गेले होते, आणि सैन्य त्यांना कोणा अज्ञात ठिकाणी घेऊन चालले होते. शहरात ना काही खळबळ होती, ना कापाकापी. रक्ताचा एक थेंबही सांडला नव्हता. आजवर कोणत्याही स्वतंत्र देशाच्या राजाचा पराभव इतक्या शांतपणे, असा रक्तपाताविना झाला नसेल. देव जिच्यावर प्रसन्न होतात, ती ही अहिंसा नव्हती. मोठ्यातले मोठे भेकडही ज्याच्यावर अश्रू ढाळतात, तो हा भ्याडपणा होता. अवधसारख्या विशाल देशाचा नवाब कैदी होऊन चालला होता, आणि लखनौ ऐषारामाच्या झोपेत मस्त होते. राजकीय अधःपाताची ही परमावधी होती. मिर्झा म्हणाले—हुजूर नवाबसाहेबांना जालिमांनी कैद केले आहे. मीर—असेल; हा घ्या शह! मिर्झा—जनाब, जरा थांबा. या वेळी इकडे मन लागत नाही. बिचारे नवाबसाहेब आत्ता रक्ताचे अश्रू ढाळीत असतील. मीर—ढाळणारच; तिथे ही चैन कुठली नशिबी यायला—हा शह! मिर्झा—कोणाचेच दिवस सारखे जात नाहीत. किती हृदयद्रावक अवस्था आहे. मीर—हो, ते तर आहेच—हा घ्या, पुन्हा शह! बस, आता या शहात मात आहे. सुटका नाही. मिर्झा—खुदाकसम, आपण मोठे निर्दय आहात. एवढा मोठा अनर्थ पाहूनही आपल्याला दुःख होत नाही. हाय, बिचारे वाजिदअली शाह! मीर—आधी स्वतःच्या बादशहाला तर वाचवा, मग नवाबसाहेबांचा मातम करा. हा शह आणि ही मात. द्या टाळी!
शतरंजचे खेळाडू
बादशहाला घेऊन सैन्य समोरून निघून गेले. ते जाताच मिर्झांनी पुन्हा पट मांडला. हारीचा घाव जिव्हारी लागतो. मीर म्हणाले—या, नवाबसाहेबांच्या मातमात एक मर्सिया म्हणून टाकू. पण मिर्झाजींची राजभक्ती स्वतःच्या हारीबरोबरच लोप पावली होती; हारीचा वचपा काढायला ते अधीर झाले होते. ४ संध्याकाळ झाली. त्या भग्न अवशेषांत वटवाघळांनी चीत्कार सुरू केला. पाकोळ्या येऊन आपापल्या घरट्यांना बिलगल्या. पण दोघे खेळाडू ठाण मांडून बसले होते, जणू रक्ताला तहानलेले दोन शूर वीर एकमेकांशी झुंजत असावेत. मिर्झाजी लागोपाठ तीन डाव हरले होते; या चौथ्या डावाचाही रंग काही बरा नव्हता. जिंकायचेच असा दर वेळी पक्का निश्चय करून ते सावधपणे खेळत; पण एखादी तरी चाल अशी वेडीवाकडी पडे, की डाव बिघडून जाई. प्रत्येक हारीबरोबर सूड घेण्याची भावना अधिकच उग्र होत होती. तिकडे मीरसाहेब जोशाच्या भरात गझला गात होते, चिमटे काढीत होते, जणू त्यांना एखादे गुप्तधन सापडले असावे. मिर्झाजी ते ऐकून ऐकून चिडत, आणि हरल्याचा ओशाळेपणा झाकण्यासाठी त्यांना दाद देत. पण डाव जसजसा कमजोर पडत गेला, तसतसा धीर हातचा सुटत चालला. शेवटी ते बारीकसारीक गोष्टीवरूनही चिडू लागले—जनाब, आपण चाल बदलत जाऊ नका. हे काय, की एक चाल खेळायची आणि मग ती बदलायची! जे काही खेळायचे ते एकदाच खेळा. आपण मोहऱ्यावरच हात का ठेवून बसता? मोहरा सोडा. चाल सुचेपर्यंत मोहऱ्याला शिवूच नका. आपण एकेका चालीला अर्धा-अर्धा तास लावता. हे चालायचे नाही. ज्याला एक चाल खेळायला पाच मिनिटांहून जास्त लागतील, त्याची मात झाली असे समजावे. पुन्हा आपण चाल बदललीत! गुपचूप मोहरा तिथेच ठेवा.
शतरंजचे खेळाडू
मीरसाहेबांचा वजीर मारला जात होता. म्हणाले—मी चाल खेळलोच कधी होतो? मिर्झा—आपण चाल खेळून चुकला आहात. मोहरा तिथेच ठेवा—त्याच घरात. मीर—त्या घरात का ठेवू? हातातून मोहरा सोडला कधी होता? मिर्झा—आपण कयामतपर्यंत मोहरा सोडला नाही, तर काय चाल होणारच नाही? वजीर मारला जातो आहे असे दिसले, तशी रडी खायला लागलात! मीर—रडी आपण खाता. हारजीत तकदीराने होते. रडी खाऊन कोणी जिंकत नाही. मिर्झा—तर मग या डावात आपली मात झाली? मीर—माझी का मात होईल? मिर्झा—तर मग आपण मोहरा त्याच घरात ठेवा, जिथे आधी ठेवला होता. मीर—तिथे का ठेवू? नाही ठेवत. मिर्झा—का नाही ठेवणार? आपल्याला ठेवावाच लागेल. वाद वाढू लागला. दोघेही आपापल्या हट्टाला पेटले होते. ना हा नमत होता, ना तो. विषय सोडून भलत्याच गोष्टी निघू लागल्या. मिर्झा म्हणाले—खानदानात कोणी शतरंज खेळले असते, तर त्याचे कायदे ठाऊक असते. ते तर जन्मभर गवत कापीत आले, आपण शतरंज काय खेळणार! रईसी ही चीजच वेगळी. नुसती जहागीर मिळाली म्हणून कोणी रईस होत नाही. मीर—काय! गवत आपले अब्बाजान कापीत असतील! आमच्याकडे तर पिढ्यानपिढ्या शतरंज खेळत आले आहेत. मिर्झा—अहो जा जा, गाझीउद्दीन हैदरांकडे बावर्चीचे काम करता करता उमर गेली, आणि आज रईस व्हायला निघाले आहेत. रईस होणे म्हणजे काही थट्टा नाही.
शतरंजचे खेळाडू
मीर—कशाला तुम्ही आपल्याच वाडवडिलांच्या तोंडाला काळे फासता—बावर्चीचे काम तेच करीत असतील. आम्ही तर सदैव बादशहाच्या दस्तरखानावर जेवत आलो आहोत. मिर्झा—अरे चल रे गवतकाप्या, फार बढाया मारू नकोस! मीर—जीभ सांभाळा, नाहीतर वाईट होईल. असले बोलणे ऐकून घ्यायची मला सवय नाही; इथे तर कोणी डोळे वटारले की त्याचे डोळेच काढतो. आहे हिंमत? मिर्झा—आपल्याला माझी हिंमत पाहायची आहे ना, तर मग या; आज दोन हात होऊनच जाऊ देत, आर या पार. मीर—मग इथे तरी तुमच्यापुढे नमणारा कोण आहे? दोघा दोस्तांनी कमरेच्या तलवारी उपसल्या. नवाबी जमाना होता; सारेच तलवार, पेशकब्ज, कट्यार वगैरे बाळगीत. दोघे विलासी होते, पण भेकड नव्हते. त्यांच्यातल्या राजकीय भावनांचा अधःपात झाला होता. बादशाहीसाठी का मरायचे? पण वैयक्तिक शौर्याची उणीव नव्हती. दोघांनी पवित्रे बदलले, तलवारी चमकल्या, खणाखण आवाज झाले. दोघेही जखमी होऊन पडले आणि दोघांनीही तिथेच तडफडून तडफडून प्राण सोडले. आपल्या बादशहासाठी ज्यांच्या डोळ्यांतून अश्रूचा एक थेंब निघाला नाही, त्यांनीच शतरंजच्या वजिराच्या रक्षणासाठी प्राण दिले. अंधार पडू लागला होता. पट मांडलेला होता. दोन्ही बादशहा आपापल्या सिंहासनांवर बसून जणू या दोन वीरांच्या मृत्यूवर अश्रू ढाळीत होते. चहूकडे सन्नाटा पसरला होता. त्या भग्न वास्तूच्या मोडक्या कमानी, ढासळलेल्या भिंती आणि धुळीने माखलेले मिनार ही प्रेते पाहत होते आणि कपाळ बडवून घेत होते.