मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
सुजान भगत
१ साध्याभोळ्या शेतकऱ्याच्या हाती पैसा आला की तो आधी धर्माकडे आणि कीर्तीकडे वळतो. सुसंस्कृत समाजासारखा तो आधी आपल्या चैनीमागे धावत सुटत नाही. सुजानच्या शेतात कित्येक वर्षे सोन्याचा पाऊस पडत होता. मेहनत तर गावातले सगळेच शेतकरी करीत, पण सुजानचे ग्रह जोरावर होते; पडीक जमिनीत दाणे फेकून आला तरी काही ना काही उगवून येई. सलग तीन वर्षे ऊस लावला. तिकडे गुळाचा भावही तेज होता. सुमारे दोन-अडीच हजार रुपये हाती आले. बस्स, मनाचा कल धर्माकडे झुकला. साधुसंतांचा आदरसत्कार होऊ लागला, दारात धुनी पेटू लागली. कानूनगो भागात आले की सुजान महतोच्याच बैठकीत उतरत; त्या हद्दीतला हेड कॉन्स्टेबल, ठाणेदार, शिक्षण खात्याचे अधिकारी, कोणी ना कोणी त्या बैठकीत पडलेला असेच. महतो आनंदाने फुलून जात. काय भाग्य! आता त्यांच्या दारात इतके मोठमोठे हाकिम येऊन उतरतात! ज्या हाकिमांपुढे त्यांचे तोंड उघडत नसे, त्याच हाकिमांच्या घशाला आता 'महतो, महतो' म्हणता म्हणता कोरड पडे. अधूनमधून भजनही रंगे. एका महात्म्याने संधी चांगली पाहिली आणि गावात आसन ठोकले. गांजा-चरसाला बहर आला. एक ढोलक आला, टाळ मागवले गेले, सत्संग सुरू झाला. ही सारी मिरवणूक सुजानच्या जिवावर चालली होती. घरात शेरांनी दूध निघे, पण त्यातला एक थेंबही सुजानच्या घशाखाली उतरायचा नाही, अशी जणू शपथच होती. कधी हाकिम मंडळी चाखत, कधी महात्मे. शेतकऱ्याला दूध-तुपाशी काय करायचे? त्याला भाकरी आणि भाजी पुरे. सुजानच्या नम्रतेला आता पारावार उरला नव्हता. तो सगळ्यांपुढे मान खाली घालून राही; न जाणो, लोक म्हणू लागायचे की पैसा आला आणि याला गर्व चढला.
सुजान भगत
गावात एकूण तीनच विहिरी होत्या; पुष्कळ शेतांना पाणी पोचत नसे, पीक मारले जाई. सुजानने एक पक्की विहीर बांधून दिली. विहिरीचे लग्न लागले, यज्ञ झाला, ब्राह्मणभोजन झाले. ज्या दिवशी विहिरीवर पहिल्यांदा मोट चालली, त्या दिवशी सुजानला जणू चारी पुरुषार्थ लाभले. गावात कोणी केले नव्हते ते काम बापजाद्यांच्या पुण्याईने सुजानने करून दाखवले. एक दिवस गयेचे यात्रेकरू गावात येऊन उतरले. त्यांचा स्वयंपाक सुजानच्याच दारात झाला. सुजानच्याही मनात पुष्कळ दिवसांपासून गयेची यात्रा करायची इच्छा होती. ही चांगली संधी पाहून तोही निघायला तयार झाला. त्याची बायको बुलाकी म्हणाली—आत्ता राहू द्या, पुढच्या वर्षी जाऊ. सुजान गंभीरपणे म्हणाला—पुढच्या वर्षी काय होईल, कोणाला ठाऊक? धर्माच्या कामात मीनमेख काढणे बरे नव्हे. जिवाचा काय भरवसा! बुलाकी—हात रिकामा होईल. सुजान—देवाची इच्छा असली, तर पुन्हा पैसे होतील. त्याच्या घरी कशाची कमतरता आहे? बुलाकी यावर काय उत्तर देणार? सत्कार्यात आडवे येऊन आपली मुक्ती कशाला बिघडवून घ्यायची? पहाटेच नवरा-बायको गयेला निघाले. तिथून परतल्यावर यज्ञ आणि ब्राह्मणभोजनाचे ठरले. साऱ्या जातभाईंना आमंत्रण गेले, अकरा गावांत सुपारी वाटली गेली. अशा थाटामाटात कार्य झाले की चहूकडे वाहवा झाली. सगळे हेच म्हणत, देवाने पैसा द्यावा तर मनही असेच द्यावे. गर्वाचा वारासुद्धा लागला नाही; स्वतःच्या हाताने पत्रावळी उचलत फिरत होता. कुळाचे नाव उजळले. मुलगा असावा तर असा. बाप मेला तेव्हा घरात फुटकी कवडी नव्हती. आता लक्ष्मी पाय रोवून येऊन बसली आहे.
सुजान भगत
एक मत्सरी माणूस म्हणाला—कुठेतरी पुरलेले धन सापडले असेल. यावर चहूकडून त्याच्यावर सरबत्ती झाली—हो, तुझ्या बापजाद्यांनी खजिना ठेवला होता ना, तोच त्याच्या हाती लागला आहे! अरे बाबा, ही धर्माची कमाई आहे. तूही तर जीव तोडून काम करतोस, मग तुझा ऊस असा का येत नाही, तुझे पीक असे का येत नाही? देव माणसाचे मन पाहतो; जो खर्च करायला जाणतो, त्यालाच देतो. २ सुजान महतो सुजान भगत झाले. भगतांचे आचारविचार काही वेगळेच असतात. तो आंघोळ केल्याशिवाय काही खात नाही. गंगा घरापासून दूर असेल आणि रोज स्नान करून दुपारपर्यंत घरी परतणे त्याला जमत नसेल, तर निदान पर्वणीच्या दिवशी तरी त्याने गंगास्नान केलेच पाहिजे. त्याच्या घरी भजन व्हायलाच हवे. पूजाअर्चा त्याला चुकवून चालत नाही. खाण्यापिण्यातही त्याला पुष्कळ विधिनिषेध पाळावे लागतात. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खोटे बोलणे सोडावे लागते. भगत खोटे बोलू शकत नाही. सामान्य माणसाला खोटेपणाबद्दल एक शिक्षा मिळत असेल, तर भगताला एक लाखाहून कमी मिळायची नाही. अज्ञानाच्या अवस्थेत कितीतरी अपराधांना क्षमा असते. ज्ञान्याला क्षमा नाही, प्रायश्चित्त नाही; असलेच तर अतिशय कठीण. सुजानलाही आता भगतांची मर्यादा पाळणे भाग पडले. आजवर त्याचे जीवन मजुराचे जीवन होते, त्याच्यापुढे कोणताही आदर्श, कोणतीही मर्यादा नव्हती. आता त्याच्या जीवनात विचाराचा उदय झाला, आणि त्या वाटेवर काटेच काटे असतात. पूर्वी स्वार्थ साधणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय होते; याच काट्याने तो परिस्थिती तोलत असे. आता तो तिला औचित्याच्या काट्यावर तोलू लागला. असे म्हणा की जड जगातून बाहेर पडून त्याने चेतन जगात प्रवेश केला. त्याने थोडी सावकारी सुरू केली होती, पण आता व्याज घेताना त्याच्या मनाला कशीशी टोचणी लागे.
सुजान भगत
इतकेच नव्हे, तर गाई दुहवताना त्याला वासरांची काळजी लागून राही—वासरू उपाशी राहू नये, नाहीतर त्याचा जीव दुखावेल. तो गावाचा मुखिया होता; कितीतरी खटल्यांत त्याने खोट्या साक्षी उभ्या केल्या होत्या, कितीतरी जणांकडून दंड घेऊन प्रकरणे मिटवून टाकली होती. आता या उद्योगांचा त्याला तिटकारा वाटे. खोटेपणा आणि लबाडी यांपासून तो कोसो दूर पळे. पूर्वी त्याची धडपड अशी असे की मजुरांकडून जितके काम करून घेता येईल तितके घ्यावे आणि मजुरी जितकी कमी देता येईल तितकी द्यावी; पण आता त्याला कामापेक्षा मजुरीचीच जास्त काळजी असे—बिचाऱ्या मजुराचा जीव दुखावू नये. हे त्याचे पालुपदच होऊन बसले—कोणाचा जीव दुखावू नये. त्याचे दोन्ही तरुण मुलगे शब्दाशब्दाला त्याची टर उडवत; इतकेच काय, बुलाकीसुद्धा आता त्याला निव्वळ भगत समजू लागली, ज्याला घरच्या बऱ्यावाइटाशी काही देणेघेणे नाही. चेतन जगात येऊन सुजान भगत निव्वळ भगतच उरले. सुजानच्या हातातले अधिकार हळूहळू काढून घेतले जाऊ लागले. कोणत्या शेतात काय पेरायचे, कोणाला काय द्यायचे, कोणाकडून काय घ्यायचे, कोणता माल कोणत्या भावाने विकला, अशा महत्त्वाच्या गोष्टींतही भगतजींचा सल्ला घेतला जात नसे. भगतांपर्यंत कोणाला पोचूच दिले जात नसे. दोघे मुलगे किंवा स्वतः बुलाकी दुरूनच व्यवहार उरकून टाकत. गावभर सुजानचा मानमरातब वाढत होता, आपल्या घरात मात्र घटत होता. मुलगे आता त्याचा आदरसत्कार फार करत. त्याला हाताने बाज उचलताना पाहिले की धावत जाऊन स्वतः उचलून आणत, त्याला चिलीम भरू देत नसत; इतकेच काय, त्याचे धोतर धुऊन देण्याचाही आग्रह धरत. पण अधिकार त्याच्या हातात नव्हता. तो आता घराचा धनी नव्हता, देवळातला देव होता.
सुजान भगत
३ एक दिवस बुलाकी उखळात डाळ सडत होती. एक भिकारी दारात येऊन ओरडू लागला. बुलाकीने विचार केला, डाळ सडून झाली की त्याला काहीतरी देऊ. इतक्यात थोरला मुलगा भोला येऊन म्हणाला—अम्मा, एक महात्मा दारात उभे राहून घसा फोडताहेत. काहीतरी देऊन टाक. नाहीतर त्यांचा जीव दुखावेल. बुलाकी बेपर्वाईने म्हणाली—भगतांच्या पायाला काय मेंदी लागली आहे? स्वतःच काही नेऊन का देत नाहीत? मला काय चार हात आहेत? कुणाकुणाचा जीव सुखी करू? दिवसभर रीघ लागलेली असते. भोला—सगळे धुळीला मिळवायला निघाले आहेत, दुसरे काय! आत्ताच महंगू उसने घेतलेले धान्य फेडायला आला होता. हिशेबाने ७ मण झाले. तोलले तर पावणेसात मणच भरले. मी म्हटले—आणखी दहा शेर आण, तर हे बसल्याबसल्या म्हणतात, आता एवढ्या लांब कुठे आणायला जाईल! फिटले म्हणून लिहून टाक, नाहीतर त्याचा जीव दुखावेल. मी फिटले म्हणून लिहिले नाही. दहा शेर बाकी लिहिले. बुलाकी—फार चांगले केलेस. बडबडू देत जा. दहा-पाच वेळा तोंडघशी पडले, की आपोआप बोलायचे सोडून देतील. भोला—दिवसभर काही ना काही खुसपट काढत असतात. शंभरदा सांगितले, तुम्ही घरसंसाराच्या बाबतीत बोलत जाऊ नका; पण यांना बोलल्यावाचून राहवतच नाही. बुलाकी—यांची अशी गत होणार हे ठाऊक असते, तर गुरुमंत्र घेऊच दिला नसता. भोला—भगत काय झाले, धड देवाचे राहिले ना धड जगाचे. सारा दिवस पूजापाठातच उडून जातो. अजून काही इतके म्हातारे झाले नाहीत की काहीच काम करता येऊ नये.
सुजान भगत
बुलाकीने हरकत घेतली—भोला, हा तुझा अन्याय आहे. कुदळ-फावडे आता त्यांच्याने होत नाही, पण काही ना काही करतच असतात. बैलांना आंबोण-पाणी देतात, गाय दुहवून घेतात, आणखीही जे काही जमेल ते करतात. भिक्षेकरी अजून उभा राहून ओरडत होता. घरातून कोणी काही आणताना दिसेना, तेव्हा सुजान उठून आत गेला आणि कठोर आवाजात म्हणाला—तुम्हा लोकांना काही ऐकू येत नाही का, की दारात कोण तासभर उभा राहून भीक मागतो आहे? आपले काम तर दिवसभर करायचेच आहे, क्षणभर देवाचेही काम करत जा जरा. बुलाकी—तुम्ही तर देवाचे काम करायला बसलेलेच आहात; सगळे घरच देवाचे काम करत बसले तर कसे चालेल? सुजान—पीठ कुठे ठेवले आहे? आण, मीच काढून देऊन येतो. तू राणीसारखी बसून राहा. बुलाकी—पीठ मी मरमर करून दळले आहे; धान्य देऊन टाका. असल्या भिकारड्यांसाठी मी काही भल्या पहाटे उठून जाते ओढत नाही. सुजान कोठीच्या खोलीत गेले आणि एक लहानशी टोपली जवाने भरून घेऊन बाहेर आले. जव शेरभरापेक्षा कमी नव्हते. सुजानने मुद्दाम, केवळ बुलाकीला आणि भोलाला चिडवण्यासाठी, भिक्षा देण्याच्या रिवाजाचे उल्लंघन केले होते. तरीही टोपलीत फार जव नाहीत हे दाखवण्यासाठी त्यांनी ती चिमटीत धरली होती. चिमटीला एवढे ओझे पेलवत नव्हते. हात कापत होता. क्षणभराचा उशीर झाला असता, तर टोपली हातातून सुटून पडण्याची भीती होती. म्हणून त्यांना झटकन बाहेर निघून जायचे होते. इतक्यात भोलाने त्यांच्या हातातून टोपली हिसकावून घेतली आणि कपाळाला आठ्या घालून म्हणाला—फुकटचा माल नाही हा, उधळायला निघालात ते! रक्ताचे पाणी करून राबतो, तेव्हा कुठे घरात दाणा येतो.
सुजान भगत
सुजान खजील होऊन म्हणाला—मीही काही बसून नसतो. भोला—भीक भिकेसारखी दिली जाते, उधळली जात नाही. आम्ही एकवेळ खाऊन दिवस काढतो, की घराची अब्रू राहावी, आणि तुम्हाला उधळायचे सुचते आहे. घरात काय चालले आहे, ते तुम्हाला काय ठाऊक! सुजानने यावर काहीच उत्तर दिले नाही. बाहेर येऊन भिकाऱ्याला सांगितले—बाबा, आता जा, कोणालाच सवड नाही; आणि झाडाखाली बसून विचारात बुडून गेला. आपल्याच घरात त्याचा हा अपमान! अजून तो अपंग झालेला नाही, हातपाय थकलेले नाहीत, घरातले काही ना काही काम करतच असतो. त्यावर हा अपमान! त्यानेच हे घर उभे केले, ही सारी समृद्धी त्याच्याच कष्टाचे फळ आहे, पण आता या घरावर त्याचा काही अधिकार उरला नाही. आता तो दारचे कुत्रे आहे; पडून राहावे आणि घरचे लोक जी कोरडी-सुकी भाकर देतील ती खाऊन पोट भरावे! धिक्कार असो अशा जगण्याला. सुजान अशा घरात राहू शकत नाही. संध्याकाळ झाली होती. भोलाचा धाकटा भाऊ शंकर हुक्का भरून घेऊन आला. सुजानने हुक्का भिंतीला टेकवून ठेवून दिला. ठेवल्या ठेवल्या तंबाखू जळून गेली. थोड्या वेळाने भोलाने दारात बाज टाकली. सुजान झाडाखालून उठला नाही. आणखी थोडा वेळ गेला. जेवण तयार झाले. भोला बोलवायला आला. सुजान म्हणाला—भूक नाही. पुष्कळ मनधरणी केली, तरी उठला नाही. तेव्हा बुलाकी येऊन म्हणाली—जेवायला का येत नाही? बरे आहे ना?
सुजान भगत
सुजानचा सर्वात जास्त राग बुलाकीवरच होता. हीसुद्धा मुलांच्याच बाजूची. ही बसून पाहत राहिली आणि भोलाने माझ्या हातातून धान्य हिसकावून घेतले. हिच्या तोंडून एवढेही निघाले नाही की नेताहेत तर नेऊ दे. मुलांना ठाऊक नसेल मी किती कष्टाने हा संसार उभा केला, पण हिला तर ठाऊक आहे. दिवसाला दिवस आणि रात्रीला रात्र मानली नाही. भाद्रपदाच्या अंधाऱ्या रात्रींत खोपटे घालून ज्वारीची राखण करीत असे, ज्येष्ठ-वैशाखाच्या भर दुपारीही दम घेत नसे; आणि आता घरावर माझा एवढाही अधिकार नाही की भीकसुद्धा देऊ शकेन. मान्य, भीक एवढी दिली जात नाही; पण यांनी गप्प बसायला हवे होते, मग मी घराला आग का लावेना. कायद्यानेसुद्धा यात माझा काही वाटा आहेच. मी माझा वाटा खात नाही, दुसऱ्यांना खाऊ घालतो, त्यात कोणाच्या बापाचे काय जाते? आता या वेळी मनधरणी करायला आली आहे! हिला मी कधी फुलाच्या काडीनेही शिवलो नाही; नाहीतर गावात अशी कोणती बाई आहे जिने नवऱ्याच्या लाथा खाल्ल्या नाहीत? कधी हिच्याकडे कडक नजरेने पाहिलेसुद्धा नाही. पैसाअडका, देणेघेणे सगळे हिच्याच हाती सोपवले होते. आता पैसे जमवले आहेत, तर माझ्यापुढेच ताठा दाखवते. आता हिला बेटे प्यारे झाले; मी तर ऐतखाऊ, उधळ्या, घरबुडव्या, बावळट! हिला माझी काय पर्वा? तेव्हा मुलगे नव्हते, जेव्हा ही आजारी पडली होती आणि मी हिला उचलून कवेत घेऊन वैद्याच्या घरी गेलो होतो. आज हिला बेटे आहेत आणि ही त्यांची आई आहे. मी तर बाहेरचा माणूस, मला घराशी काय कर्तव्य? म्हणाला—मी आता खाऊनपिऊन काय करणार? नांगर धरायचे माझे दिवस गेले, फावडे चालवायचे गेले. मला खाऊ घालून दाणा कशाला वाया घालवतेस? ठेवून दे, बेटे दुसऱ्या वेळी खातील. बुलाकी—तुम्ही तर बारीकसारीक गोष्टीवरून भडकता. खरेच म्हणतात, साठी बुद्धी नाठी. भोला एवढेच तर म्हणाला होता की एवढी भीक नेऊ नका; की आणखी काही म्हणाला?
सुजान भगत
सुजान—हो, बिचारा एवढेच म्हणून थांबला. वरून दोन-चार दांडके हाणले असते, तर तुला मजा आली असती. नाही का? हीच हौस असेल, तर पुरी करून घे. भोलाचे जेवण झाले असेल, बोलावून आण. नाहीतर भोलाला कशाला बोलावतेस, तूच दोन-चार ठेवून दे ना. एवढीच कसर राहिली आहे, तीही भरून निघू दे. बुलाकी—हो, मग काय! हाच तर बाईचा धर्म आहे! आपले नशीब समजा की माझ्यासारखी गरीब स्वभावाची बायको मिळाली. हवे तसे वाकवता. एखादी तोंडाळ असती, तर तुमच्या घरात एक दिवसही निभाव लागला नसता. सुजान—हो बाबा, मी तेच तर म्हणतोय, तू देवी होतीस आणि आहेस. मी तेव्हाही राक्षस होतो आणि आता तर दैत्य झालो आहे. बेटे कमावते आहेत; त्यांची री ओढणार नाहीस, तर काय माझी ओढणार? माझ्याशी आता काय देणेघेणे? बुलाकी—तुम्ही भांडायलाच टपून बसला आहात, आणि मी भांडण टाळते आहे की चार लोक हसतील. सरळपणे चला, जेवून घ्या; नाहीतर मीही जाऊन झोपून जाते. सुजान—तू उपाशी का झोपशील? तुझ्या बेट्यांची कमाई आहे ना! हो, मी मात्र बाहेरचा माणूस. बुलाकी—बेटे तुमचेही आहेतच की. सुजान—नाही, असले बेटे नकोत मला. दुसऱ्या कोणाचे असतील. माझे बेटे असते, तर माझी अशी दुर्दशा झाली असती का! बुलाकी—शिव्या द्याल, तर मीही काहीतरी बोलून बसेन. ऐकत होते, पुरुष फार समजूतदार असतात; पण तुम्ही सगळ्यांहून निराळे. माणसाने वेळ पाहून वागावे. आता तुमचा-आमचा निभाव यातच आहे की नावाचे मालक म्हणून राहावे आणि मुलांना बरे वाटेल तेच करावे. मला हे समजले, तुम्हाला का समजत नाही? जो कमावतो, त्याचेच घरात राज्य चालते; हाच जगाचा रिवाज आहे. मी मुलांना विचारल्याशिवाय कोणतेच काम करत नाही; तुम्ही का आपल्या मनाचे करता? इतके दिवस राज्य केलेत ना, आता या मायेत का गुंतता? अर्धी भाकर खाऊन देवाचे भजन करा आणि पडून राहा. चला, जेवून घ्या.
सुजान भगत
सुजान—म्हणजे आता मी दारचे कुत्रे आहे. बुलाकी—जे खरे होते, ते मी सांगितले; आता स्वतःला काय हवे ते समजा. सुजान उठले नाहीत. बुलाकी हरून निघून गेली. ४ सुजानपुढे आता एक नवा प्रश्न उभा राहिला होता. तो कित्येक दिवस घराचा धनी होता आणि अजूनही स्वतःला तसेच समजत होता. परिस्थितीत केवढी उलथापालथ झाली होती, याची त्याला खबरच नव्हती. मुलगे आपली सेवा करतात, मान राखतात, या गोष्टीने त्याला भ्रमात ठेवले होते. मुलगे त्यांच्यासमोर चिलीम ओढत नाहीत, बाजेवर बसत नाहीत, हा सारा तो घराचा धनी असल्याचा पुरावा नव्हता का? पण आज त्याला कळले की ती केवळ श्रद्धा होती, त्याच्या धनीपणाचा पुरावा नव्हे. या श्रद्धेच्या बदल्यात तो आपला अधिकार सोडू शकत होता का? कधीही नाही. आजवर ज्या घरात राज्य केले, त्याच घरात परावलंबी होऊन तो राहू शकत नाही. त्याला श्रद्धेची चाह नाही, सेवेची भूक नाही. त्याला अधिकार हवा. या घरावर दुसऱ्यांचा अधिकार तो पाहू शकत नाही. देवळाचा पुजारी होऊन तो राहू शकत नाही. रात्र किती उरली होती, कोणास ठाऊक. सुजानने उठून कोयत्याने बैलांचा चारा कापायला सुरुवात केली. सारा गाव झोपला होता, पण सुजान कडबा कापत होते. इतके कष्ट त्यांनी आयुष्यात कधी केले नव्हते. त्यांनी काम करणे सोडल्यापासून चाऱ्यासाठी सतत ओरड असायची. शंकरही कापायचा, भोलाही कापायचा, पण चारा पुरा पडत नसे. आज ते या पोरांना दाखवून देणार होते, चारा कसा कापायचा असतो. त्यांच्यासमोर कुट्टीचा डोंगर उभा राहिला. आणि तुकडे किती बारीक आणि सुबक होते, जणू साच्यात ओतलेले! भल्या पहाटे बुलाकी उठली, तो कुट्टीचा ढीग पाहून थक्क झाली. म्हणाली—भोला आज रात्रभर कुट्टीच कापत बसला की काय? किती सांगितले, बाळा, जीव असेल तर जग आहे, पण ऐकतच नाही. रात्री झोपलाच नाही.
सुजान भगत
सुजान भगत टोमणा मारत म्हणाले—तो झोपतो तरी कधी? जेव्हा पाहावे तेव्हा कामच करत असतो. असा कमावता जगात दुसरा कोण असेल! इतक्यात भोला डोळे चोळत बाहेर आला. हा ढीग पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. आईला म्हणाला—शंकर आज भल्या रात्री उठला होता का, अम्मा? बुलाकी—तो तर पडून झोपलाय. मला वाटले, तू कापली असशील. भोला—माझ्याने तर पहाटे उठवतच नाही. दिवसभर हवे तेवढे काम करून घ्या, पण रात्री माझ्याने उठवत नाही. बुलाकी—मग काय तुझ्या दादांनी कापली? भोला—हो, असेच दिसते. रात्रभर झोपले नाहीत. काल माझी मोठी चूक झाली. अरेच्चा! ते तर नांगर घेऊन चाललेत! जीव द्यायलाच उठले आहेत की काय? बुलाकी—तापट तर पहिल्यापासूनचे. आता कोणाचे थोडेच ऐकणार आहेत! भोला—शंकरला उठव, मीही पटकन तोंड-हात धुऊन नांगर घेऊन जातो. इतर शेतकऱ्यांबरोबर भोला नांगर घेऊन शेतात पोचला, तेव्हा सुजानचे अर्धे शेत नांगरून झाले होते. भोलाने मुकाट्याने काम सुरू केले. सुजानशी काही बोलायची त्याची हिंमत झाली नाही. दुपार झाली. सगळ्या शेतकऱ्यांनी नांगर सोडले. पण सुजान भगत आपल्या कामात गढून गेले आहेत. भोला थकला आहे. बैल सोडून द्यावेत, असे त्याला पुन्हा पुन्हा वाटते. पण भीतीपोटी काही बोलू शकत नाही. दादा इतकी मेहनत कशी करत आहेत, याचे त्याला आश्चर्य वाटते आहे. शेवटी घाबरत घाबरत म्हणाला—दादा, आता दुपार झाली. नांगर सोडू ना? सुजान—हो, सोड. तू बैल घेऊन चल, मी वरंबे मोडून येतो. भोला—मी संध्याकाळी वरंबे मोडीन. सुजान—तू काय मोडणार! दिसत नाही का, शेत वाडग्यासारखे खोलगट झाले आहे. म्हणूनच तर मधोमध पाणी साचते. गावालगतच्या या शेतात बिघ्याला वीस मण पीक येत असे. तुम्ही लोकांनी याचे वाटोळे केले.
सुजान भगत
बैल सोडले गेले. भोला बैल घेऊन घरी निघाला, पण सुजान वरंबे मोडत राहिले. अर्ध्या तासाने वरंबे मोडून ते घरी आले. पण थकव्याचे नाव नव्हते. आंघोळ-जेवण करून विश्रांती घेण्याऐवजी त्यांनी बैलांना कुरवाळायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, पाय चोळले, शेपटी कुरवाळली. बैलांच्या शेपट्या ताठ उभ्या होत्या. सुजानच्या मांडीवर डोके ठेवून त्यांना शब्दांत सांगता न येणारे सुख मिळत होते. पुष्कळ दिवसांनी आज त्यांना हा आनंद मिळाला होता. त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञता भरलेली होती. जणू ते म्हणत होते, आम्ही तुमच्याबरोबर रात्रंदिवस राबायला तयार आहोत. इतर शेतकऱ्यांसारखा भोला अजून पाठ टेकतच होता, तोच सुजान पुन्हा नांगर उचलून शेताकडे निघाले. दोन्ही बैल जोशात धावत चालले होते, जणू त्यांनाच शेतात पोचायची घाई झाली होती. भोलाने खोपटीत पडल्या पडल्या वडिलांना नांगर घेऊन जाताना पाहिले, पण त्याच्याने उठवले नाही. त्याचा धीर सुटला. त्याने कधी इतके कष्ट केले नव्हते. त्याला उभा केलेला संसार आयता मिळाला होता. तो कसाबसा चालवत होता. या किमतीवर घराचा धनी व्हायची त्याला इच्छा नव्हती. तरुण माणसाच्या मागे वीस व्याप असतात. हसण्याखेळण्यासाठी, गाण्याबजावण्यासाठी त्याला थोडा वेळ हवा. शेजारच्या गावात कुस्त्यांचा फड भरला आहे. तरुण माणूस तिथे जाण्यापासून स्वतःला कसा रोखणार? कुठल्या गावात वरात आली आहे, नाचगाणे चालले आहे. तरुण माणूस त्या आनंदाला कसा मुकेल? म्हाताऱ्यांना या अडचणी नसतात. त्यांना ना नाचगाण्याशी कर्तव्य, ना खेळतमाशांशी देणेघेणे; फक्त आपल्या कामाशी काम. बुलाकी म्हणाली—भोला, तुझे दादा नांगर घेऊन गेले. भोला—जाऊ दे अम्मा, माझ्याने तर हे होणार नाही. ५ सुजान भगतांच्या या नव्या उत्साहावर गावात टीका झाली—निघून गेली सारी भगती! सोंग होते सगळे. मायेत गुंतलेला आहे. माणूस कसला, भूत आहे!
सुजान भगत
पण भगतजींच्या दारात आता पुन्हा साधुसंत आसन ठोकून बसलेले दिसतात. त्यांचा आदरसन्मान होतो. यंदा त्याच्या शेतात सोने पिकले आहे. कणगीत धान्य ठेवायला जागा पुरत नाही. ज्या शेतात मुश्किलीने पाच मण पिकत असे, त्याच शेतात यंदा दहा मण उत्पन्न आले आहे. चैत्राचा महिना होता. खळ्यांत सत्ययुगाचे राज्य होते. जागोजागी धान्याच्या राशी लागल्या होत्या. हीच ती वेळ, जेव्हा शेतकऱ्यांनाही घटकाभर आपले जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते, जेव्हा अभिमानाने त्यांचे हृदय उचंबळू लागते. सुजान भगत टोपल्यांत धान्य भरभरून देत होते आणि दोघे मुलगे टोपल्या घेऊन घरात धान्य ठेवून येत होते. कितीतरी भाट आणि भिक्षेकरी भगतजींना घेरून उभे होते. त्यांत तो भिक्षेकरीही होता, जो आठ महिन्यांपूर्वी भगतांच्या दारातून निराश होऊन परतला होता. एकाएकी भगतांनी त्या भिक्षेकऱ्याला विचारले—काय बाबा, आज कुठे कुठे फेरी मारून आलात? भिक्षेकरी—अजून कुठेच गेलो नाही, भगतजी; आधी तुमच्याकडेच आलो आहे. भगत—बरे, हा तुमच्यापुढे ढीग आहे. यातून जितके धान्य उचलून नेता येईल, तितके घेऊन जा. भिक्षेकऱ्याने हावऱ्या नजरेने ढिगाकडे पाहून म्हटले—तुम्ही आपल्या हाताने उचलून द्याल, तितकेच घेईन. भगत—नाही, तुम्हाला जितके उचलेल, तितके उचला. भिक्षेकऱ्याकडे एक चादर होती. त्याने तिच्यात दहाएक शेर धान्य भरले आणि उचलू लागला. संकोचापोटी आणखी भरायचे धाडस त्याला झाले नाही. भगत त्याच्या मनातले ओळखून धीर देत म्हणाले—बस्स! एवढे तर एखादे पोरही उचलून नेईल. भिक्षेकऱ्याने भोलाकडे साशंक नजरेने पाहत म्हटले—मला एवढेच पुष्कळ आहे. भगत—नाही, तुम्ही संकोच करता. आणखी भरा. भिक्षेकऱ्याने आणखी पाच शेर धान्य भरले, आणि पुन्हा भोलाकडे शंकित नजरेने पाहू लागला. भगत—त्याच्याकडे काय पाहता, बाबाजी! मी सांगतो ते करा. तुम्हाला जितके उचलता येईल, तितके उचला.
सुजान भगत
भिक्षेकऱ्याला भीती वाटत होती की आपण धान्य भरले आणि भोलाने गाठोडे उचलूच दिले नाही, तर केवढी फजिती होईल! आणि इतर भिक्षेकऱ्यांना हसायला संधी मिळेल. सगळे हेच म्हणतील की हा भिक्षेकरी केवढा हावरट आहे. आणखी धान्य भरायची त्याची हिंमत झाली नाही. तेव्हा सुजान भगतांनी चादर घेऊन तिच्यात धान्य भरले आणि गाठोडे बांधून म्हणाले—हे उचलून न्या. भिक्षेकरी—बाबा, एवढे तर माझ्याने उचलणार नाही. भगत—अरे! एवढेही उचलणार नाही! फार तर मणभर असेल. जरा जोर तर लावा, पाहू उचलता येते की नाही. भिक्षेकऱ्याने गाठोडे उचलून पाहिले. जड होते. जागचे हललेसुद्धा नाही. म्हणाला—भगतजी, हे माझ्याने उचलणार नाही. भगत—बरे, सांगा, कोणत्या गावात राहता? भिक्षेकरी—फार लांब आहे, भगतजी. अमोल्याचे नाव तर ऐकले असेल. भगत—बरे, पुढे पुढे चला, मी पोचवून देतो. असे म्हणून भगतांनी जोर लावून गाठोडे उचलले आणि डोक्यावर घेऊन ते भिक्षेकऱ्याच्या मागोमाग चालू लागले. पाहणारे भगतांचा हा पुरुषार्थ पाहून चकित झाले. त्यांना काय ठाऊक, या वेळी भगतांवर कोणती नशा चढली होती! आठ महिन्यांच्या सतत, अखंड कष्टांचे फळ आज त्यांना मिळाले होते. आज त्यांनी आपला गमावलेला अधिकार पुन्हा मिळवला होता. जी तलवार केळीचे खोडही कापू शकत नाही, तीच सहाणेवर चढली की लोखंड कापते. माणसाच्या जीवनात ईर्षेला फार मोठे महत्त्व आहे. ज्याच्यात ईर्षा आहे, तो म्हातारा असला तरी तरुण; ज्याच्यात ईर्षा नाही, स्वाभिमान नाही, तो तरुण असला तरी मेलेलाच. सुजान भगतांमध्ये ईर्षा होती, आणि तिनेच त्यांना अलौकिक बळ दिले होते. निघताना त्यांनी भोलाकडे अभिमानाने पाहिले आणि म्हणाले—हे भाट आणि भिक्षेकरी उभे आहेत; कोणीही रिकाम्या हाताने परत जाता कामा नये. भोला मान खाली घालून उभा होता. त्याला काही बोलायचा धीर झाला नाही. म्हाताऱ्या बापाने त्याला चीत केले होते.