मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
ठाकुराची विहीर
जोखूने तांब्या तोंडाला लावला, तो पाण्याला भयंकर घाण येत होती. तो गंगीला म्हणाला—हे कसलं पाणी? नुसत्या वासानं प्यायलं जात नाही. इकडे घसा कोरडा पडलाय आणि तू कुजकं पाणी पाजते आहेस. गंगी रोज संध्याकाळी पाणी भरून ठेवीत असे. विहीर लांब होती; पुन्हा पुन्हा जाणे कठीण होते. काल ती पाणी घेऊन आली, तेव्हा त्याला मुळीच वास नव्हता; मग आज पाण्याला ही घाण कशी? तिने तांब्या नाकाशी नेला, तर खरोखरच घाण येत होती. नक्कीच एखादे जनावर विहिरीत पडून मेले असणार. पण दुसरे पाणी आणायचे तरी कुठून? ठाकुराच्या विहिरीवर कोण चढू देणार? लांबूनच लोक दरडावतील. साहूची विहीर गावाच्या त्या टोकाला आहे; पण तिथे तरी कोण पाणी भरू देणार? आणि गावात दुसरी विहीर नाहीच. जोखू कित्येक दिवसांपासून आजारी आहे. काही वेळ तर तो तहान दाबून गप्प पडून राहिला, मग म्हणाला—आता तहानेनं राहवत नाही. आण, नाक दाबून थोडं पाणी पिऊन घेतो. गंगीने पाणी दिले नाही. खराब पाणी प्यायल्याने आजार वाढेल—एवढे तिला ठाऊक होते. पण पाणी उकळले की त्यातला दोष निघून जातो, हे मात्र तिला ठाऊक नव्हते. ती म्हणाली—हे पाणी कसं पिणार? कोणतं जनावर मेलंय कुणास ठाऊक. मी विहिरीवरून दुसरं पाणी आणून देते. जोखूने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले—दुसरं पाणी आणशील कुठून? 'ठाकुराची आणि साहूची अशा दोन विहिरी आहेत ना. एक तांब्याभर पाणी भरू देणार नाहीत का?' 'हात-पाय मोडून घेऊन येशील, दुसरं काही होणार नाही. गप्प बस. ब्राह्मणदेवता आशीर्वाद देतील, ठाकूर लाठी हाणतील, साहूजी एकाचे पाच वसूल करतील. गरिबाचं दुःख कोण जाणतो! आपण मेलो तरी कुणी दारात डोकावायला येत नाही, खांदा देणं तर दूरच. असले लोक विहिरीवरून पाणी भरू देतील?' या शब्दांत कडू सत्य होते. गंगी काय उत्तर देणार? पण तिने ते घाण वासाचे पाणी त्याला प्यायला दिले नाही.
ठाकुराची विहीर
( २ ) रात्रीचे नऊ वाजले होते. दमलेभागलेले मजूर तर झोपी गेले होते; ठाकुराच्या दारात दहा-पाच रिकामटेकडी, बेफिकीर मंडळी जमली होती. रणांगणात गाजवायच्या शौर्याचा तर आता ना जमाना उरला होता, ना संधी. गप्पा चालल्या होत्या कोर्टकचेरीतल्या शौर्याच्या. ठाकुरांनी एका खास खटल्यात किती हुशारीने ठाणेदाराला लाच चारली आणि ते कसे साफ सुटले. एका गाजलेल्या खटल्याची नक्कल किती अक्कलहुशारीने मिळवून आणली. नाझर काय, मोहतमीम काय, सगळे म्हणत होते, नक्कल मिळणार नाही. कोणी पन्नास मागत होता, कोणी शंभर. इथे पैसा-कवडी न मोजता नक्कल पदरात पाडली. काम करायची हातोटी हवी. त्याच वेळी गंगी विहिरीवर पाणी न्यायला येऊन पोचली. चिमणीचा अंधुक उजेड विहिरीवर पडत होता. गंगी कट्ट्याच्या आडोशाला बसून संधीची वाट पाहू लागली. या विहिरीचे पाणी सारा गाव पितो. कुणालाही मनाई नाही; फक्त हे कमनशिबी तेवढे पाणी भरू शकत नाहीत. गंगीचे बंडखोर मन रूढीच्या बंधनांवर आणि लाचारीवर घाव घालू लागले—आम्ही का नीच आणि हे लोक का उच्च? तर म्हणे हे लोक गळ्यात दोरा घालतात म्हणून! इथे तर जितके आहेत, ते एकाहून एक बिलंदर. चोरी हे करणार, लबाडी-फसवणूक हे करणार, खोटे खटले हे भरणार. आता परवाच याच ठाकुराने त्या बिचाऱ्या धनगराची एक मेंढी चोरली होती आणि मग कापून खाऊन टाकली. याच पंडितजींच्या घरी बाराही महिने जुगार चालतो. हेच साहूजी तुपात तेल मिसळून विकतात. काम करून घेतात, पण मजुरी द्यायची म्हटली की यांच्या जिवावर येते. कोणत्या गोष्टीत आमच्याहून उच्च आहेत? हां, तोंडाने आमच्याहून उच्च आहेत; आम्ही काही गल्लोगल्ली ओरडत फिरत नाही, की आम्ही उच्च, आम्ही उच्च! मी कधी गावात आले, तर हे लालसेने भरल्या डोळ्यांनी पाहू लागतात. जणू एकेकाच्या छातीवर साप लोळू लागतो; पण घमेंड मात्र ही, की आम्ही उच्च!
ठाकुराची विहीर
विहिरीवर कुणीतरी येत असल्याची चाहूल लागली. गंगीची छाती धडधडू लागली. कुणी पाहिले तर अनर्थ ओढवेल! एकही लाथ वाया जायची नाही. तिने घडा आणि दोरी उचलली आणि वाकून चालत एका झाडाच्या काळोख्या सावलीत जाऊन उभी राहिली. या लोकांना कधी कुणाची दया येते का! बिचाऱ्या महंगूला असे मारले, की तो महिनोन्महिने रक्त थुंकत होता. का, तर त्याने वेठबिगारी केली नव्हती म्हणून! आणि वर हे लोक उच्च म्हणवतात. विहिरीवर दोन बायका पाणी भरायला आल्या होत्या. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. 'जेवायला बसणार, तोच हुकूम सुटला, ताजं पाणी भरून आण. घडा घ्यायला पैसे नाहीत.' 'आपण जरा निवांत बसलेलो दिसलो की पुरुषांना जणू पोटशूळच उठतो.' 'हो ना, स्वतः कळशी उचलून भरून आणावी, असं काही नाही. बस्स, हुकूम सोडला की ताजं पाणी आणा, जणू आपण बटकीच आहोत.' 'बटकी नाही तर आणखी काय आहेस तू? भाकरी-कपडा मिळत नाही का? दहा-पाच रुपयेसुद्धा ओरबाडून घेतेसच की. मग बटकी आणखी कशा असतात?' 'नको गं जळवूस, ताई! घटकाभर विसावा घ्यायला जीव नुसता तरसून राहतो. एवढं काम दुसऱ्या कुणाच्या घरी केलं असतं, तर याच्यापेक्षा कितीतरी सुखात राहिले असते. वर तो उपकारही मानता. इथं काम करकरून मरून जा; पण कुणाच्या कपाळावरची आठी काही जात नाही.'
ठाकुराची विहीर
दोघी पाणी भरून निघून गेल्या, तेव्हा गंगी झाडाच्या सावलीतून बाहेर पडली आणि विहिरीच्या कट्ट्याजवळ आली. बेफिकीर मंडळी निघून गेली होती. ठाकूरही दार लावून आत अंगणात झोपायला चालले होते. गंगीने क्षणभर सुटकेचा निःश्वास सोडला. कसेबसे का होईना, मैदान तर मोकळे झाले. एके काळी अमृत चोरून आणायला जो राजकुमार गेला होता, तोही कदाचित इतक्या सावधपणे आणि विचारपूर्वक गेला नसेल. गंगी दबक्या पावलांनी विहिरीच्या कट्ट्यावर चढली. जिंकल्याची अशी भावना तिच्या मनात यापूर्वी कधीच दाटली नव्हती. तिने घड्याच्या गळ्यात दोरीचा फास अडकवला. डावीकडे-उजवीकडे सावध नजरेने पाहिले, जणू एखादा शिपाई रात्रीच्या अंधारात शत्रूच्या किल्ल्याला भगदाड पाडत असावा. या वेळी ती पकडली गेली, तर मग माफीची किंवा दयामायेची तिळमात्र आशा नाही. शेवटी देवांचे स्मरण करून तिने काळीज घट्ट केले आणि घडा विहिरीत सोडला. घड्याने पाण्यात डुबकी घेतली, अगदी हळूच. जरासुद्धा आवाज झाला नाही. गंगीने झपाझप दोन-चार हात दोरी ओढली. घडा विहिरीच्या तोंडापर्यंत येऊन पोचला. एखादा मोठा तगडा पैलवानसुद्धा इतक्या झपाट्याने तो ओढू शकला नसता. घडा धरून कट्ट्यावर ठेवावा म्हणून गंगी वाकली, आणि तोच अचानक ठाकूरसाहेबांचे दार उघडले. वाघाचा जबडासुद्धा यापेक्षा भयानक नसेल. गंगीच्या हातून दोरी सुटली. दोरीसकट घडा धाडकन पाण्यात पडला, आणि कित्येक क्षण पाणी हेलकावल्याचे आवाज ऐकू येत राहिले. ठाकूर 'कोण आहे, कोण आहे?' अशा हाका मारत विहिरीकडे येत होते, आणि गंगी कट्ट्यावरून उडी मारून पळत सुटली होती. घरी पोचून पाहते, तो जोखू तांब्या तोंडाला लावून तेच गढूळ, घाणेरडे पाणी पीत आहे.