मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
थोरले भाऊसाहेब
माझे भाऊसाहेब माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे होते; पण फक्त तीन वर्ग पुढे. मी ज्या वयात शिकायला सुरुवात केली त्याच वयात त्यांनीही केली होती; पण शिक्षणासारख्या महत्त्वाच्या बाबतीत घाईगर्दी करणे त्यांना पसंत नव्हते. या इमारतीचा पाया चांगला भक्कम घालावा, म्हणजे त्यावर आलिशान महाल उभा राहील, अशी त्यांची इच्छा होती. एका वर्षाचे काम ते दोन वर्षांत करीत. कधी कधी तीन वर्षेही लागत. पायाच पक्का नसेल तर घर टिकाऊ कसे होणार! मी लहान, ते मोठे. मी नऊ वर्षांचा, ते चौदा वर्षांचे. मला तंबी देण्याचा आणि माझ्यावर देखरेख ठेवण्याचा त्यांना पुरा आणि जन्मसिद्ध हक्क होता. आणि त्यांचा हुकूम म्हणजे कायदा असे मानण्यातच माझा विनय होता. ते स्वभावानेच मोठे अभ्यासू होते. जेव्हा पाहावे तेव्हा पुस्तक उघडून बसलेले असत; आणि बहुधा मेंदूला विसावा देण्यासाठी कधी वहीवर, तर कधी पुस्तकांच्या समासांत पाखरांची, कुत्र्यांची, मांजरांची चित्रे काढीत असत. कधी कधी एकच नाव किंवा शब्द किंवा वाक्य दहा-वीस वेळा लिहून काढीत. कधी एखादा शेर पुन्हा पुन्हा सुंदर अक्षरात उतरवून काढीत. कधी अशी शब्दरचना करीत, की तिला ना काही अर्थ असे, ना काही मेळ. उदाहरणार्थ, एकदा त्यांच्या वहीत मी हा मजकूर पाहिला—स्पेशल, अमीना, भावांनो-भावांनो, दरअसल, भाऊ-भाऊ, राधेश्याम, श्रीयुत राधेश्याम, एक तासपर्यंत—आणि त्यानंतर एका माणसाचा चेहरा काढलेला होता. या कोड्याचा काही अर्थ लावावा म्हणून मी पुष्कळ खटपट केली, पण यश आले नाही. आणि त्यांना विचारण्याची छाती झाली नाही. ते नवव्या इयत्तेत होते, मी पाचवीत.
थोरले भाऊसाहेब
त्यांच्या रचना समजून घेणे म्हणजे माझ्यासाठी लहान तोंडी मोठा घास होता. अभ्यासात माझे मन मुळीच लागत नसे. तासभरसुद्धा पुस्तक घेऊन बसणे म्हणजे डोंगर उचलण्यासारखे वाटे. संधी मिळताच मी होस्टेलमधून निसटून मैदानात येई आणि कधी खडे उडवीत बसे, कधी कागदाची फुलपाखरे उडवी; आणि कुठे एखादा सवंगडी भेटला, तर मग विचारायलाच नको. कधी कुंपणाच्या भिंतीवर चढून खाली उड्या मारतो आहोत, कधी फाटकावर स्वार होऊन ते पुढेमागे हलवीत मोटारगाडीची मजा लुटतो आहोत. पण खोलीत पाऊल टाकताच भाऊसाहेबांचा तो रौद्र अवतार पाहून माझी पाचावर धारण बसे. त्यांचा पहिला प्रश्न असे—'कुठे होतास?' नेहमी हाच प्रश्न, याच सुरात विचारला जाई; आणि त्याला माझ्यापाशी उत्तर एकच, मौन. जरा बाहेर खेळत होतो, एवढे शब्द माझ्या तोंडून का निघत नसत कोण जाणे. माझे मौनच सांगून टाकी, की मला माझा अपराध कबूल आहे; आणि मग माया आणि राग मिसळलेल्या शब्दांत माझा सत्कार करण्यावाचून भाऊसाहेबांपुढे दुसरा इलाजच उरत नसे. 'अशा रीतीने इंग्रजी शिकशील, तर जन्मभर शिकत राहशील आणि एक अक्षरही येणार नाही. इंग्रजी शिकणे म्हणजे काही पोरखेळ नव्हे, की ज्याच्या मनात आले त्याने शिकून घ्यावे; नाहीतर कोणीही सोम्यागोम्या, आलतूफालतू इंग्रजीचा पंडित होऊन बसला असता. इथे रात्रंदिवस डोळे फोडावे लागतात आणि रक्त आटवावे लागते, तेव्हा कुठे ही विद्या येते. आणि येते म्हणजे तरी काय, आपली म्हणायला येते इतकेच. मोठमोठ्या विद्वानांनाही शुद्ध इंग्रजी लिहिता येत नाही, बोलणे तर दूरच राहिले.
थोरले भाऊसाहेब
आणि मी म्हणतो, तू किती मठ्ठ आहेस, की मला पाहूनसुद्धा धडा घेत नाहीस! मी किती मेहनत करतो ते तू आपल्या डोळ्यांनी पाहतोस; पाहत नसशील, तर तो तुझ्या डोळ्यांचा दोष आहे, तुझ्या बुद्धीचा दोष आहे. इतक्या जत्रा भरतात, खेळ होतात; मला कधी ते पाहायला जाताना पाहिले आहेस? रोजच्या रोज क्रिकेटचे आणि हॉकीचे सामने होतात. मी जवळसुद्धा फिरकत नाही. सदा अभ्यास करीत असतो; त्यावरही एकेका वर्गात दोन-दोन, तीन-तीन वर्षे पडून राहतो. मग असा खेळण्याबागडण्यात वेळ दवडून तू पास होशील, अशी आशा तू करतोस तरी कशी? मला तर दोन-तीनच वर्षे लागतात; तू जन्मभर याच वर्गात कुजत पडशील! असेच आयुष्य वाया घालवायचे असेल, तर त्यापेक्षा घरी निघून जा आणि खुशाल विटी-दांडू खेळ. दादांच्या घामाच्या कमाईचे रुपये कशाला उधळतोस?' ही कानउघाडणी ऐकून मी आसवे ढाळू लागे. उत्तर तरी काय होते? अपराध तर मी केला, मग बोलणी दुसरा कोण खाणार? भाऊसाहेब उपदेशाच्या कलेत निष्णात होते. अशा जिव्हारी लागणाऱ्या गोष्टी बोलत, असे एकेक सुभाषितांचे बाण सोडीत, की माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होत आणि धीर खचून जाई. असे जीव तोडून कष्ट करण्याची ताकद मला माझ्या अंगी आढळत नसे; आणि त्या निराशेत घटकाभर माझ्या मनात येई—घरीच का निघून जाऊ नये? जे काम आपल्या आवाक्याबाहेरचे, त्यात हात घालून आयुष्याची माती का करून घ्यावी? मूर्ख राहणे मला कबूल होते; पण तेवढे कष्ट! मला तर घेरीच येई. पण तास-दोन तासांनी निराशेचे ढग पांगत आणि मी निश्चय करी, की यापुढे अगदी मन लावून अभ्यास करायचा. चटदिशी एक टाइम-टेबल तयार करून टाकी.
थोरले भाऊसाहेब
आधी आराखडा आखल्याशिवाय, काही स्कीम तयार केल्याशिवाय कामाला सुरुवात कशी करायची? टाइम-टेबलातून खेळण्याबागडण्याची बाब साफ उडून जाई. पहाटे उठायचे, सहा वाजता तोंड-हात धुऊन, न्याहारी करून अभ्यासाला बसायचे. सहा ते आठ इंग्रजी, आठ ते नऊ गणित, नऊ ते साडेनऊ इतिहास, मग जेवण आणि शाळा. साडेतीन वाजता शाळेतून परतल्यावर अर्धा तास आराम, चार ते पाच भूगोल, पाच ते सहा ग्रामर, अर्धा तास होस्टेलसमोरच फेऱ्या मारणे, साडेसहा ते सात इंग्रजी कंपोझिशन, मग जेवण करून आठ ते नऊ भाषांतर, नऊ ते दहा हिंदी, दहा ते अकरा विविध विषय, मग विश्रांती. पण टाइम-टेबल तयार करणे ही एक गोष्ट, ते अमलात आणणे ही दुसरी. पहिल्याच दिवसापासून त्याची हेळसांड सुरू होई. मैदानातली ती सुखद हिरवळ, वाऱ्याच्या त्या हलक्या हलक्या झुळका, फुटबॉलमधली ती धावपळ आणि उड्या, कबड्डीतले ते डावपेच, व्हॉलीबॉलमधला तो वेग आणि ती चपळाई मला नकळत आणि अटळपणे ओढून नेत; आणि तिथे पोचताच मी सारे काही विसरून जाई. ते जीवघेणे टाइम-टेबल, ती डोळेफोड पुस्तके, कशाचीच आठवण राहत नसे; आणि मग भाऊसाहेबांना उपदेश करण्याची आणि खरडपट्टी काढण्याची संधी मिळे. मी त्यांच्या सावलीलाही भिऊन पळे, त्यांच्या नजरेआड राहण्याची धडपड करी, खोलीत असा चोरपावलांनी येई की त्यांना चाहूलही लागू नये! त्यांची नजर माझ्याकडे वळली, की माझा जीव गेलाच. डोक्यावर सदैव एक नागवी तलवार टांगलेली आहे असे वाटे. तरीही, मरण आणि संकट यांनी घेरलेले असतानासुद्धा माणूस जसा मोहमायेच्या बंधनात जखडलेला राहतो, तसा मी फटकार आणि दटावण्या खाऊनसुद्धा खेळण्याबागडण्याकडे पाठ फिरवू शकत नसे.
थोरले भाऊसाहेब
( २ ) वार्षिक परीक्षा झाली. भाऊसाहेब नापास झाले, मी पास झालो आणि वर्गात पहिला आलो. माझ्यात आणि त्यांच्यात आता फक्त दोन वर्षांचे अंतर उरले. मनात आले, भाऊसाहेबांना चांगले धारेवर धरावे—तुमची ती घोर तपश्चर्या कुठे गेली? माझ्याकडे पाहा, मजेत खेळतही राहिलो आणि वर्गात पहिलाही आहे. पण ते इतके दुःखी आणि उदास होते, की मला त्यांच्याविषयी मनापासून कळवळा वाटला आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा विचारसुद्धा लाजिरवाणा वाटला. हां, आता मला स्वतःविषयी थोडा गर्व वाटू लागला आणि स्वाभिमानही वाढला. भाऊसाहेबांचा तो दरारा माझ्यावर उरला नाही. मी मोकळेपणाने खेळात सामील होऊ लागलो. मन खंबीर होते. त्यांनी पुन्हा माझी खरडपट्टी काढली, तर स्पष्ट सांगून टाकीन—तुम्ही आपले रक्त आटवून असा कोणता मोठा तीर मारलात? मी तर खेळतबागडत वर्गात पहिला आलो. तोंडाने ही मिजास दाखवण्याची हिंमत नसली, तरी भाऊसाहेबांची ती दहशत आता माझ्यावर नाही हे माझ्या वागण्याबोलण्यावरून स्पष्ट दिसत होते. भाऊसाहेबांनी ते ताडले—त्यांची उपजत बुद्धी फार तीक्ष्ण होती—आणि एके दिवशी मी सकाळचा सारा वेळ विटी-दांडूला अर्पण करून नेमका जेवणाच्या वेळी परतलो, तेव्हा भाऊसाहेबांनी जणू तलवारच उपसली आणि ते माझ्यावर तुटून पडले—पाहतो आहे, यंदा पास झालास आणि वर्गात पहिला आलास, तर तुझ्या डोक्यात हवा शिरली आहे; पण बंधुराज, गर्व तर मोठमोठ्यांचा टिकला नाही, तिथे तुझी काय कथा? इतिहासात रावणाची हकीकत तर वाचलीच असशील. त्याच्या चरित्रावरून तू कोणता बोध घेतलास? की नुसताच वाचून गेलास? नुसती परीक्षा पास होणे म्हणजे काही विशेष नव्हे; खरी गोष्ट म्हणजे बुद्धीचा विकास. जे काही वाचशील, त्याचे मर्म समजून घे. रावण साऱ्या भूमंडळाचा स्वामी होता. अशा राजांना चक्रवर्ती म्हणतात.
थोरले भाऊसाहेब
आजकाल इंग्रजांच्या राज्याचा विस्तार फार वाढलेला आहे; पण त्यांना चक्रवर्ती म्हणता येणार नाही. जगातली कित्येक राष्ट्रे इंग्रजांचे आधिपत्य मानीत नाहीत. अगदी स्वतंत्र आहेत. रावण चक्रवर्ती राजा होता. जगातले सारे राजे त्याला खंडणी देत. मोठमोठे देव त्याची गुलामगिरी करीत. अग्नीचे आणि पाण्याचे देवसुद्धा त्याचे दास होते; पण त्याचा शेवट काय झाला? गर्वाने त्याचे नावनिशाणसुद्धा पुसून टाकले; त्याला चूळभर पाणी देणारासुद्धा कोणी उरला नाही. माणसाने दुसरे हवे ते कुकर्म करावे; पण अभिमान करू नये, शेफारून जाऊ नये. अभिमान केला, की इहलोक आणि परलोक दोन्हींना मुकला. सैतानाची हकीकतही वाचलीच असशील. त्याला असा अभिमान झाला होता, की ईश्वराचा आपल्याहून खरा भक्त दुसरा कोणी नाहीच. शेवटी काय झाले, तर त्याला स्वर्गातून नरकात ढकलून दिले. रूमच्या बादशहानेही एकदा अहंकार केला होता. भीक मागत मागत मेला. तू तर अजून फक्त एक वर्ग पास झाला आहेस, आणि आत्तापासूनच तुझे डोके फिरले; मग झालीच म्हणायची तुझी प्रगती! हे पक्के समज, की तू आपल्या मेहनतीने पास झालेला नाहीस; आंधळ्याच्या हाती लावा लागला, इतकेच. पण लावा एकदाच हाती लागतो, पुन्हा पुन्हा लागत नाही. कधी कधी विटी-दांडूतसुद्धा डोळे मिटून मारलेला टोला बरोबर बसतो. तेवढ्याने कोणी यशस्वी खेळाडू होत नाही. यशस्वी खेळाडू तोच, ज्याचा एकही नेम फुकट जात नाही. माझ्या नापास होण्यावर जाऊ नकोस. माझ्या वर्गात येशील, तेव्हा तोंडाला फेस येईल; अल्जिब्रा आणि जॉमेट्रीचे लोखंडाचे चणे चावावे लागतील, इंग्लंडचा इतिहास वाचावा लागेल तेव्हा. बादशहांची नावे लक्षात ठेवणे सोपे नाही. आठ-आठ हेन्री होऊन गेले आहेत. कोणती भानगड कोणत्या हेन्रीच्या काळात झाली, हे पाठ करणे सोपे वाटते की काय तुला?
थोरले भाऊसाहेब
सातव्या हेन्रीच्या जागी आठवा हेन्री लिहिलास, की सगळे गुण गायब! साफ सफाचट! शून्यसुद्धा मिळायचे नाही, शून्यसुद्धा! आहेस कुठल्या भ्रमात? डझनांनी तर जेम्स होऊन गेले, डझनांनी विल्यम, कोडीच्या कोडी चार्ल्स! डोके गरगरू लागते. भोवळीचा रोगच जडतो. या कपाळकरंट्यांना नावेसुद्धा सुचत नव्हती. एकाच नावापुढे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे लावीत सुटले. मला विचारले असते, तर दहा लाख नावे सांगितली असती. आणि जॉमेट्री म्हणजे तर बस, देवा, तूच वाचव! अ ब क च्या जागी अ क ब लिहिले, की सारे गुण कापले. या निर्दय परीक्षकांना कोणी विचारीत नाही, की अखेर अ ब क आणि अ क ब यांत फरक तो काय, आणि असल्या फालतू गोष्टीसाठी विद्यार्थ्यांचा खून कशाला पाडता? डाळ-भात-पोळी खाल्ली काय किंवा भात-डाळ-पोळी खाल्ली काय, त्यात काय ठेवले आहे? पण या परीक्षकांना त्याची काय पर्वा! पुस्तकात जे लिहिले आहे तेवढेच ते पाहतात. मुलांनी अक्षरन् अक्षर घोकून काढावे, अशी यांची इच्छा. आणि याच घोकंपट्टीला शिक्षण असे नाव देऊन ठेवले आहे. आणि शेवटी या ना शेंडा ना बुडखा असलेल्या गोष्टी शिकून फायदा काय? या रेषेवर तो लंब टाका, म्हणजे पाया लंबाच्या दुप्पट होईल. विचारा, याचा उपयोग काय? दुप्पट काय, चौपट होऊ दे, नाहीतर निम्माच राहू दे, माझ्या बापाचे काय जाते! पण परीक्षेत पास व्हायचे असेल, तर हा सगळा फापटपसारा पाठ करावाच लागणार. सांगून टाकले—'वक्तशीरपणा' या विषयावर एक निबंध लिहा, तो चार पानांपेक्षा कमी नसावा. आता बसा वही पुढ्यात उघडून, लेखणी हातात धरून, त्याच्या नावाने रडत! वक्तशीरपणा ही फार चांगली गोष्ट आहे, तिच्यामुळे माणसाच्या जीवनात संयम येतो, इतरांना त्याच्याविषयी जिव्हाळा वाटू लागतो आणि त्याच्या कामधंद्याची भरभराट होते, हे कोणाला ठाऊक नाही?
थोरले भाऊसाहेब
पण एवढ्याशा गोष्टीवर चार पाने लिहायची कशी? जी गोष्ट एका वाक्यात सांगता येते, ती चार पानांत लिहिण्याची गरज काय? मी तर याला मूर्खपणा म्हणतो. एखादी गोष्ट उगाचच ठासून भरत बसणे ही काही वेळेची बचत नव्हे, उलट तिचा दुरुपयोग आहे. आम्हांला वाटते, माणसाला जे काही सांगायचे असेल ते त्याने चटकन सांगून टाकावे आणि आपल्या वाटेला लागावे. पण नाही, तुम्हांला चार पाने खरडावीच लागणार, मग कशीही लिहा. आणि पानेसुद्धा पुरी फुल्सकॅप आकाराची. हा विद्यार्थ्यांवर जुलूम नाही तर दुसरे काय? कहर तर हा, की सांगितले जाते, थोडक्यात लिहा. वक्तशीरपणावर थोडक्यात एक निबंध लिहा, तो चार पानांपेक्षा कमी नसावा. ठीक! थोडक्यात म्हणून चार पाने झाली, नाहीतर बहुधा शंभर-दोनशे पाने लिहायला लावली असती. जोरात धावाही आणि सावकाशही. आहे की नाही उफराटी गोष्ट? लहान पोरालासुद्धा एवढीशी गोष्ट कळते. पण या शिक्षकांना तेवढीही अक्कल नाही. वर आणखी तोरा, की आम्ही शिक्षक आहोत. माझ्या वर्गात येशील, बच्चमजी, तेव्हा ही सारी दिव्ये करावी लागतील, आणि मग कळेल किती वीसांचे शंभर होतात ते. या वर्गात पहिला आला आहेस, तर पाय जमिनीवर ठरत नाहीत. म्हणून माझे म्हणणे ऐका. लाख नापास झालो असेन, पण तुझ्यापेक्षा मोठा आहे, जगाचा अनुभव मला तुझ्यापेक्षा जास्त आहे. जे काही सांगतो, त्याची गाठ बांधून ठेवा, नाहीतर पस्तावाल. शाळेची वेळ जवळ आली होती, नाहीतर ही उपदेशमाला केव्हा संपली असती ते ईश्वरच जाणे. जेवण आज मला बेचव लागत होते. पास झाल्यावर जर अशी निर्भर्त्सना होते आहे, तर नापास झाल्यावर बहुधा जीवच घेतला जाईल. भाऊसाहेबांनी आपल्या वर्गातल्या अभ्यासाचे जे भयंकर चित्र रेखाटले होते, त्याने मी भेदरून गेलो.
थोरले भाऊसाहेब
शाळा सोडून पळून कसा गेलो नाही, याचेच नवल वाटते. पण इतकी निर्भर्त्सना होऊनही पुस्तकांविषयीची माझी नावड जशीच्या तशी राहिली. खेळण्याबागडण्याची एकही संधी मी हातची जाऊ देत नसे. अभ्यासही करीत असे; पण फार थोडा. जेमतेम इतकाच, की रोजचा टास्क पुरा व्हावा आणि वर्गात मानहानी होऊ नये. स्वतःविषयी जो विश्वास निर्माण झाला होता तो पुन्हा लोपला आणि पुन्हा चोरासारखे जिणे सुरू झाले. ( ३ ) पुन्हा वार्षिक परीक्षा झाली, आणि योगायोग असा की मी पुन्हा पास झालो आणि भाऊसाहेब पुन्हा नापास झाले. मी फारशी मेहनत केली नव्हती; पण कसा कोण जाणे, वर्गात पहिला आलो. माझे मलाच आश्चर्य वाटले. भाऊसाहेबांनी जिवापाड कष्ट केले होते. कोर्समधला एकेक शब्द चाटून पुसून काढला होता; रात्री दहा वाजेपर्यंत इकडे, पहाटे चारपासून तिकडे, आणि सहा ते साडेनऊ शाळेला जाण्यापूर्वी. चेहरा निस्तेज झाला होता; पण बिचारे नापास झाले. मला त्यांची दया येत होती. निकाल वाचून दाखवला, तेव्हा त्यांना रडू कोसळले आणि मीही रडू लागलो. स्वतः पास झाल्याचा आनंद निम्मा झाला. मीही नापास झालो असतो, तर भाऊसाहेबांना इतके दुःख झाले नसते; पण विधिलिखित कोण टाळणार! माझ्यात आणि भाऊसाहेबांत आता फक्त एका वर्गाचे अंतर उरले. माझ्या मनात एक कुटिल भावना उगवली, की भाऊसाहेब आणखी एक वर्ष नापास झाले, तर मी त्यांच्या बरोबरीला येईन; मग ते कशाच्या जोरावर माझी खरडपट्टी काढू शकतील? पण हा नीच विचार मी मनातून जोर करून हाकलून दिला. शेवटी ते मला रागावतात ते माझ्या हिताच्या विचारानेच ना! त्या वेळी मला ते अप्रिय वाटते खरे; पण कदाचित त्यांच्या उपदेशांचाच हा परिणाम असेल, की मी धडाधड पास होत जातो आणि तेही इतक्या चांगल्या गुणांनी.
थोरले भाऊसाहेब
या खेपेला भाऊसाहेब बरेच मवाळ झाले होते. अनेकदा मला रागावण्याची संधी मिळूनही त्यांनी संयम राखला. मला रागावण्याचा अधिकार आता आपल्याला उरला नाही, किंवा उरला असला तरी फार थोडा, हे बहुधा त्यांचे त्यांनाच उमगू लागले होते. माझा स्वैरपणाही वाढला. मी त्यांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेऊ लागलो. माझी अशी काहीशी समजूत झाली, की मी तर पास होणारच, अभ्यास करो वा न करो; माझे नशीब बलवत्तर आहे. त्यामुळे भाऊसाहेबांच्या भीतीने जो थोडाफार अभ्यास करीत असे, तोही बंद झाला. मला पतंग उडवण्याचा नवा नाद लागला होता आणि आता सारा वेळ पतंगबाजीलाच अर्पण होत असे; तरीही मी भाऊसाहेबांचा अदब राखीत असे आणि त्यांची नजर चुकवून पतंग उडवीत असे. मांजा सुतवणे, कन्नी बांधणे, पतंगांच्या टूर्नामेंटची तयारी वगैरे सारे प्रश्न गुप्तपणे सोडवले जात. त्यांच्याविषयीचा मान आणि मुलाहिजा माझ्या नजरेत कमी झाला आहे, असा संशय भाऊसाहेबांना येऊ द्यायची माझी इच्छा नव्हती. एके दिवशी संध्याकाळी होस्टेलपासून दूर मी एक पतंग लुटायला बेफाम धावत सुटलो होतो. डोळे आकाशाकडे लागले होते आणि मन त्या आकाशगामी वाटसरूकडे, जो मंद गतीने डुलत डुलत खाली घसरत चालला होता; जणू एखादा आत्मा स्वर्गातून बाहेर पडून विरक्त मनाने नवा जन्म घ्यायला निघाला असावा. मुलांची एक अख्खी फौज लांबलचक काठ्या आणि शेंड्याला काटेरी फांद्या बांधलेले बांबू घेऊन त्याचे स्वागत करायला धावत येत होती. कोणालाही आपल्या मागच्यापुढच्याचे भान नव्हते. सारे जण जणू त्या पतंगाबरोबर आकाशात उडत होते, जिथे सारे काही सपाट आहे; ना मोटारी, ना ट्राम, ना गाड्या.
थोरले भाऊसाहेब
अचानक भाऊसाहेबांशी माझी समोरासमोर गाठ पडली; ते बहुधा बाजारातून परतत होते. त्यांनी तिथेच माझा हात धरला आणि उग्रपणे म्हणाले—या बाजारबुणग्या पोरांबरोबर अधेल्याच्या पतंगासाठी धावताना तुला लाज नाही वाटत? आता तू खालच्या इयत्तेत नाहीस, आठव्या इयत्तेत आला आहेस आणि माझ्यापेक्षा फक्त एक वर्ग खाली आहेस, याचीही तुला काही चाड नाही? शेवटी माणसाने आपल्या पोझिशनचा थोडा तरी विचार करायला हवा. एक काळ असा होता, की लोक आठवी पास होऊन नायब तहसीलदार होत. मला असे कितीतरी मिडल पास झालेले ठाऊक आहेत, जे आज पहिल्या दर्जाचे डिप्टी मॅजिस्ट्रेट किंवा सुपरिंटेंडेंट आहेत. कितीतरी आठवीवाले आपले लीडर आणि वर्तमानपत्रांचे संपादक आहेत. मोठमोठे विद्वान त्यांच्या हाताखाली काम करतात. आणि तू त्याच आठव्या वर्गात येऊन बाजारबुणग्या पोरांबरोबर पतंगासाठी धावतो आहेस! तुझ्या या कमअक्कलपणाचे मला दुःख होते. तू हुशार आहेस, यात शंका नाही; पण जी हुशारी आपल्या आत्मगौरवाचाच खून पाडते, ती काय कामाची? तू मनात म्हणत असशील, मी भाऊसाहेबांपेक्षा फक्त एक वर्ग खाली आहे, आणि आता त्यांना मला काही बोलण्याचा हक्क नाही. पण ही तुझी चूक आहे. मी तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे; आणि आज तू माझ्याच इयत्तेत आलास तरी—आणि परीक्षकांची हीच तऱ्हा राहिली, तर पुढल्या वर्षी तू निःसंशय माझ्या बरोबरीला येशील, आणि कदाचित आणखी एका वर्षाने माझ्या पुढेही निघून जाशील—तरी माझ्यात आणि तुझ्यात जे पाच वर्षांचे अंतर आहे, ते तू काय, खुद्द परमेश्वरही पुसू शकत नाही. मी तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे आणि नेहमीच राहीन. मला जगाचा आणि जीवनाचा जो अनुभव आहे, त्याची बरोबरी तू करू शकणार नाहीस; मग तू एम.
थोरले भाऊसाहेब
ए., डी. लिट. आणि डी. फिल.सुद्धा का होईनास. समज पुस्तके वाचून येत नाही, जग पाहून येते. आपल्या अम्माने एकही इयत्ता पास केलेली नाही, आणि दादाही बहुधा पाचवी-सहावीच्या पुढे गेले नाहीत; पण आपण दोघांनी साऱ्या जगाची विद्या शिकून घेतली, तरी आपल्याला समजावण्याचा आणि सुधारण्याचा अम्मा आणि दादांचा अधिकार कायमच राहील. ते आपले जन्मदाते आहेत एवढ्यासाठीच नव्हे, तर त्यांना जगाचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे आणि राहील म्हणून. अमेरिकेत कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था आहे, आठव्या हेन्रीने किती लग्ने केली आणि आकाशात किती नक्षत्रे आहेत, या गोष्टी त्यांना ठाऊक नसतीलही; पण अशा हजारो गोष्टी आहेत, ज्यांचे ज्ञान त्यांना तुझ्या-माझ्यापेक्षा जास्त आहे. देव न करो, पण आज मी आजारी पडलो, तर तुझे हातपाय गळून जातील. दादांना तार करण्यापलीकडे तुला दुसरे काही सुचणार नाही; पण तुझ्या जागी दादा असले, तर ते कोणाला तार करणार नाहीत, घाबरणार नाहीत, की भांबावून जाणार नाहीत. आधी स्वतः रोग ओळखून उपचार करतील; त्यात यश आले नाही, तर एखाद्या डॉक्टरला बोलावतील. आजार ही तर मोठी गोष्ट झाली. तुला-मला तर एवढेही कळत नाही, की महिन्याचा खर्च महिनाभर कसा पुरवावा. दादा जे काही पाठवतात, ते आपण वीस-बावीस तारखेपर्यंत खर्चून टाकतो, आणि मग पै-पैशाला महाग होतो. न्याहारी बंद होते, धोबी आणि न्हावी यांच्यापासून तोंड लपवू लागतो. पण आज तू आणि मी जेवढा खर्च करतो आहोत, त्याच्या निम्म्यात दादांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग अब्रूने आणि नावलौकिक राखून निभावला आहे, आणि सगळी मिळून नऊ माणसे असलेल्या कुटुंबाचे पालनपोषण केले आहे.
थोरले भाऊसाहेब
आपल्या हेडमास्तरसाहेबांकडेच पाहा. एम. ए. आहेत की नाहीत? आणि इथले एम. ए. नव्हेत, ऑक्सफर्डचे. एक हजार रुपये मिळतात. पण त्यांच्या घराचा कारभार कोण पाहते? त्यांची म्हातारी आई. हेडमास्तरसाहेबांची डिग्री इथे कुचकामी ठरली. आधी स्वतःच घराचा कारभार पाहत होते. खर्च भागत नसे. कर्जबाजारी असत. त्यांच्या मातोश्रींनी कारभार आपल्या हाती घेतल्यापासून जणू घरात लक्ष्मीच आली आहे. तेव्हा बंधुराज, तू माझ्या जवळ येऊन पोचला आहेस आणि आता स्वतंत्र आहेस, हा गर्व मनातून काढून टाक. माझ्या डोळ्यांदेखत तुला वाकड्या वाटेने जाता येणार नाही. तू नुसत्या सांगण्याने ऐकणार नसशील, तर मी (हात उगारून) याचाही प्रयोग करू शकतो. मला ठाऊक आहे, माझे बोलणे तुला विषासारखे लागते आहे. त्यांच्या या नव्या युक्तिवादापुढे मी नतमस्तक झालो. आज मला खरोखरच आपल्या खुजेपणाची जाणीव झाली आणि भाऊसाहेबांविषयी माझ्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली. डोळ्यांत पाणी आणून मी म्हणालो—मुळीच नाही. तुम्ही जे काही सांगता आहात ते अगदी खरे आहे, आणि ते सांगण्याचा तुम्हांला अधिकार आहे. भाऊसाहेबांनी मला उराशी कवटाळले आणि म्हणाले—पतंग उडवायला मी मनाई करीत नाही. माझे मन त्यासाठी आसुसते; पण करू काय? मीच वाकड्या वाटेने गेलो, तर तुझे रक्षण कसे करणार? हे कर्तव्यही माझ्याच शिरावर आहे ना! योगायोगाने त्याच वेळी एक कटलेला पतंग आमच्या डोक्यावरून गेला. त्याचा दोरा लोंबत होता. पोरांचा एक घोळका मागोमाग धावत येत होता. भाऊसाहेब उंच तर आहेतच. त्यांनी उडी मारून त्याचा दोरा पकडला आणि होस्टेलच्या दिशेने बेफाम धावत सुटले. मी मागोमाग धावत होतो.