मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
वाटणी
भोला महतोची पहिली बायको वारल्यावर त्याने दुसरे लग्न केले, आणि त्याचा मुलगा रग्घू याचे वाईट दिवस सुरू झाले. त्या वेळी रग्घू अवघा दहा वर्षांचा होता. गावात मजेत विटी-दांडू खेळत हिंडत असे. नवी आई घरात येताच त्याला जात्याला जुंपून घ्यावे लागले. पन्ना रूपवान बाई होती, आणि रूप आणि गर्व यांचे नाते नख-मांसाचे असते. ती स्वतःच्या हाताने कोणतेही जड-ओबड काम करीत नसे. शेण रग्घू काढी, बैलांना आंबोण रग्घू घाली. उष्टी भांडीही रग्घूच घासे. भोलाची नजर अशी काही फिरली, की त्याला आता रग्घूत दोषच दोष दिसू लागले. जुन्या रीतीप्रमाणे पन्नाचे म्हणणे तो डोळे मिटून मान्य करी. रग्घूच्या तक्रारीची त्याला जरासुद्धा पर्वा नसे. परिणाम असा झाला, की रग्घूने तक्रार करणेच सोडून दिले. रडणार तरी कुणापुढे? बापच काय, सारा गाव त्याचा वैरी झाला होता. पोरगा मोठा हट्टी आहे, पन्नाला तर काडीची किंमत देत नाही; बिचारी त्याचे लाड करते, खाऊ-पिऊ घालते. हे त्याचेच फळ. दुसरी कुणी बाई असती, तर एक दिवस निभले नसते. हे तर म्हणा, की पन्ना इतकी साधी-भोळी आहे, म्हणून निभते आहे. बलवानाच्या तक्रारी सगळे ऐकतात; दुबळ्याची फिर्याद कुणी ऐकतसुद्धा नाही. आईविषयी रग्घूचे मन दिवसेंदिवस फाटत चालले. असे करता करता आठ वर्षे लोटली, आणि एके दिवशी भोलाच्या नावानेही मृत्यूचा निरोप येऊन पोचला. पन्नाला चार मुले होती—तीन मुलगे आणि एक मुलगी. एवढा मोठा खर्च आणि कमावणारे कुणी नाही. रग्घू आता कशाला विचारपूस करील? हे तर ठरलेलेच होते. आपली बायको आणील आणि वेगळा राहील. बायको आल्यावर तर आणखीच आग लावील. पन्नाला चहूकडे अंधारच दिसत होता; पण काहीही झाले तरी ती रग्घूची आश्रित होऊन या घरात राहणार नव्हती.
वाटणी
ज्या घरात तिने राज्य केले, तिथे आता ती बटकी होणार नव्हती. ज्या पोराला तिने आपला गुलाम समजले, त्याच्या तोंडाकडे ती पाहत बसणार नव्हती. ती सुंदर होती; वयही अजून फारसे झाले नव्हते. तारुण्य ऐन बहरात होते. ती दुसरा पाट लावू शकत नाही का? फार तर काय होईल, लोक हसतील. हसेनात का! तिच्या जातबिरादरीत असे होत नाही की काय? ती काही ब्राह्मण-ठाकूर नव्हती, की नाक कापले जाईल. घरात हवे ते करा, पण बाहेर पडदा झाकलेला राहू द्या—हे त्या उच्च जातींतच चालते. ती तर जगाला दाखवून दुसरा पाट लावू शकत होती. मग तिने रग्घूच्या ताटाखालचे मांजर होऊन का राहावे? भोलाला जाऊन एक महिना उलटला होता. संध्याकाळ झाली होती. पन्ना याच विचारात पडली होती, तेवढ्यात तिला एकदम आठवले—मुले घरात नाहीत. ही बैल परतण्याची वेळ; एखादे पोर त्यांच्या पायाखाली यायचे! आता दारात आहे कोण, जो त्यांच्याकडे लक्ष ठेवील? रग्घूच्या डोळ्यांत तर माझी पोरे खुपतात. कधी हसून बोलत नाही. ती घराबाहेर आली, तो पाहते, रग्घू समोरच्या छपरीत बसून उसाच्या गंडेऱ्या करतो आहे, तिघे मुलगे त्याला घेरून उभे आहेत, आणि धाकटी मुलगी त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या पाठीवर चढायची धडपड करते आहे. पन्नाचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आज हे नवेच! बहुधा जगाला दाखवतो आहे, की मी आपल्या भावांवर किती माया करतो; आणि मनात सुरी लपवलेली. संधी मिळाली तर जीवच घेईल. काळा नाग आहे, काळा नाग! ती कठोर आवाजात म्हणाली—तुम्ही सगळेजण तिथं काय करताय? घरात या. तिन्हीसांजेची वेळ आहे, गुरं येतच असतील. रग्घूने नम्र नजरेने पाहून म्हटले—मी आहे ना काकी, भीती कसली?
वाटणी
थोरला मुलगा केदार म्हणाला—काकी, रग्घूदादानं आमच्यासाठी दोन गाड्या केल्यात. हे बघ, एकीत मी आणि खुन्नू बसणार, दुसरीत लछमन आणि झुनिया. दादा दोन्ही गाड्या ओढणार. असे म्हणून त्याने एका कोपऱ्यातून दोन लहान-लहान गाड्या काढून आणल्या. प्रत्येकीला चार-चार चाके होती, बसायला फळ्या होत्या आणि पडू नये म्हणून दोन्ही बाजूंना कठडे होते. पन्नाने आश्चर्याने विचारले—या गाड्या कुणी केल्या? केदार चिडून म्हणाला—रग्घूदादानं केल्यात, आणखी कोण! भगताच्या घरून वाकस आणि पटाशी मागून आणली आणि चटकन करून टाकल्या. खूप पळतात काकी. बस खुन्नू, मी ओढतो. खुन्नू गाडीत बसला. केदार ओढू लागला. करकर आवाज झाला, जणू गाडीसुद्धा या खेळात मुलांबरोबर सामील झाली होती. लछमन दुसऱ्या गाडीत बसून म्हणाला—दादा, ओढ. रग्घूने झुनियालाही गाडीत बसवले आणि गाडी ओढत तो धावत सुटला. तिघे मुलगे टाळ्या पिटू लागले. पन्ना थक्क होऊन हे दृश्य पाहत होती आणि विचार करीत होती, हा तोच रग्घू की दुसरा कुणी? थोड्या वेळाने दोन्ही गाड्या परत आल्या. मुले घरात जाऊन या सफरीचे अनुभव सांगू लागली. सगळी किती खूश होती, जणू विमानात बसून फिरून आली होती! खुन्नू म्हणाला—काकी, सगळी झाडं पळत होती. लछमन—आणि वासरं कशी पळाली! सगळीच्या सगळी धावली. केदार—काकी, रग्घूदादा दोन्ही गाड्या एकदम ओढून नेतो. झुनिया सगळ्यांत धाकटी होती. मनातले व्यक्त करण्याची तिची शक्ती उड्या मारण्यापुरती आणि डोळ्यांपुरती मर्यादित होती—ती टाळ्या वाजवीत नाचत होती. खुन्नू—आता आमच्या घरी गायसुद्धा येणार काकी. रग्घूदादानं गिरधारीला सांगितलंय, आम्हाला एक गाय आणून दे. गिरधारी म्हणाला—उद्या आणतो. केदार—तीन शेर दूध देते काकी. भरपूर दूध पिऊ.
वाटणी
इतक्यात रग्घूही आत आला. पन्नाने तुच्छतेने त्याच्याकडे पाहून विचारले—काय रे रग्घू, तू गिरधारीकडे गाय मागितलीस? रग्घू क्षमा मागितल्यासारख्या स्वरात म्हणाला—हो, मागितली तर आहे. उद्या आणील. पन्ना—पैसे कुणाच्या घरून येणार? याचा तरी विचार केलास? रग्घू—सगळा विचार केलाय काकी. माझी ही मोहर आहे ना? हिचे पंचवीस रुपये मिळताहेत. पाच रुपयांच्या बदल्यात कालवड देऊन टाकीन. बस्स, गाय आपली होईल. पन्ना सुन्न झाली. आता तिच्या अविश्वासी मनालाही रग्घूचे प्रेम आणि सज्जनपणा नाकारता आला नाही. ती म्हणाली—मोहर कशाला विकतोस? गायीची अशी काय घाई आहे? हातात पैसे आले की घे. गळा सुना-सुना बरा दिसणार नाही. इतके दिवस गाय नव्हती, म्हणून पोरं काय जगली नाहीत? रग्घू एखाद्या तत्त्वज्ञान्यासारखा म्हणाला—पोरांचे खाण्यापिण्याचे हेच दिवस आहेत काकी! या वयात खाल्लं नाही, तर मग कधी खाणार? आणि मोहर घालणं मला बरंही वाटत नाही. लोक म्हणत असतील, बाप गेला आणि याला मोहर घालायचं सुचतंय. भोला महतो गायीच्या चिंतेतच गेले. ना पैसे आले, ना गाय मिळाली. लाचार होते. रग्घूने हा प्रश्न किती सहज सोडवला! आज आयुष्यात पहिल्यांदा पन्नाला रग्घूवर विश्वास वाटला. ती म्हणाली—दागिनाच विकायचा तर तुझी मोहर कशाला विकतोस? माझी हसळी घे. रग्घू—नको काकी! ती तुझ्या गळ्यात फार छान दिसते. पुरुषांचं काय, मोहर घातली काय, न घातली काय. पन्ना—चल, मी म्हातारी झाले. आता हसळी घालून काय करायचंय? तू अजून पोर आहेस, तुझा गळा सुना बरा दिसणार नाही. रग्घू हसून म्हणाला—तू आत्ताच कशी म्हातारी झालीस? गावात आहे कोण तुझ्या तोडीची? रग्घूच्या या भोळ्या बोलण्याने पन्ना लाजली. तिच्या रुक्ष, कोमेजलेल्या चेहऱ्यावर आनंदाची लाली पसरली.
वाटणी
२ पाच वर्षे उलटली. रग्घूसारखा मेहनती, प्रामाणिक, शब्दाला जागणारा दुसरा शेतकरी गावात नव्हता. पन्नाच्या मर्जीशिवाय तो कोणतेही काम करीत नसे. तो आता २३ वर्षांचा झाला होता. पन्ना पुन्हा पुन्हा म्हणे, बाळा, सुनेला माहेरून घेऊन ये. किती दिवस माहेरी पडून राहणार? सगळे लोक मलाच बदनाम करतात, की हीच सुनेला येऊ देत नाही. पण रग्घू टाळाटाळ करी. म्हणे, अजून घाई काय आहे? आपल्या बायकोच्या रंगढंगाची त्याला दुसऱ्यांकडून थोडीफार कल्पना आली होती. अशा बाईला घरात आणून आपल्या सुखशांतीत विघ्न आणावे, असे त्याला वाटत नव्हते. शेवटी एके दिवशी पन्नाने हट्टाने विचारले—मग तू आणणार नाहीस? 'सांगितलं ना, अजून काही घाई नाही.' 'तुला घाई नसेल, मला तर आहे. मी आजच माणूस पाठवते.' 'पस्तावशील काकी, तिचा स्वभाव चांगला नाही.' 'तुझं काय जातं? मी तिच्याशी बोलणारच नाही, मग ती काय हवेशी भांडणार? भाकरी तरी करील. आतलं-बाहेरचं सगळं काम माझ्याच्यानं होत नाही. मी आजच तिला बोलावून घेते.' 'बोलवायचं असेल तर बोलव, पण मग असं म्हणू नकोस, की हा बायकोला वठणीवर आणत नाही, तिचा गुलाम झालाय.' 'नाही म्हणणार. जा, दोन लुगडी आणि मिठाई घेऊन ये!' तिसऱ्या दिवशी मुलिया माहेरून आली. दारात नगारे वाजले, सनयांचे मधुर सूर आकाशात घुमू लागले. सुनेचे तोंड पाहण्याचा विधी पार पडला. या वाळवंटात ती जणू निर्मळ पाण्याचा झरा होती. गव्हाळ रंग, मोठ्या मोठ्या टोकदार पापण्या, गालांवर हलकीशी लाली, डोळ्यांत विलक्षण मोहिनी. तिला पाहताच रग्घू मंत्रमुग्ध झाला. सकाळी पाण्याचा घडा घेऊन ती निघे, तेव्हा तिचा गव्हाळ रंग पहाटेच्या सोनेरी किरणांत बावनकशी सोन्यासारखा उजळून निघे; जणू उषा आपला सारा सुगंध, सारे फुलणे आणि सारी धुंदी घेऊन हसत चालली आहे.
वाटणी
३ मुलिया माहेरहूनच जळफळत आली होती. माझा नवरा छाती फुटेस्तो राबणार, आणि पन्ना राणी होऊन बसणार, तिची पोरे अमीरजादे होऊन हिंडणार! मुलियाला हे सहन होणार नव्हते. ती कुणाची गुलामी करणार नव्हती. पोटची पोरे आपली होत नाहीत, तर भाऊ कुणाचे होतात? जोवर पंख फुटले नाहीत, तोवर रग्घूला घेरून आहेत. जरा मोठे झाले, की पंख फडफडवून उडून जातील; साधी विचारपूससुद्धा करणार नाहीत. एके दिवशी ती रग्घूला म्हणाली—तुम्हाला अशी गुलामी करायची असेल तर करा, माझ्याच्यानं नाही होणार. रग्घू—मग काय करू, तूच सांग? पोरं तर अजून घरचं काम करण्याइतकीसुद्धा मोठी नाहीत. मुलिया—पोरं कुण्या रावताची आहेत, तुमची थोडीच आहेत? हीच ती पन्ना, जी तुम्हाला दाण्यादाण्याला महाग करायची. सगळं ऐकलंय मी. मी बटकी होऊन राहणार नाही. पैशाअडक्याचा मला काही हिशोबच मिळत नाही. तुम्ही काय आणता आणि ती काय करते, देव जाणे. तुम्हाला वाटतं, पैसे घरातच तर आहेत; पण बघाल, तुमच्या हाती फुटकी कवडी तरी लागली तर! रग्घू—पैसाअडका तुझ्या हातात द्यायला लागलो, तर जग काय म्हणेल, याचा तरी विचार कर. मुलिया—जगाला काय म्हणायचं ते म्हणू दे! मी काही जगाला विकलेली नाही. बघाल, कोळशाच्या दलालीत हात काळेच राहतील. मग तुम्ही मरा आपल्या भावांसाठी, मी का मरू? रग्घूने काही उत्तर दिले नाही. ज्याची त्याला भीती होती, ते इतक्या लवकर डोक्यावर येऊन कोसळले. आता त्याने फार ठिगळे लावून सावरासावर केली, तर आणखी वर्ष-सहा महिने निभेल. बस्स, पुढे ही नाव तरेल असे दिसत नव्हते. डोक्यावर टांगलेली तलवार कधी ना कधी कोसळायचीच.
वाटणी
एके दिवशी पन्नाने मोहाची फुले वाळत घातली. पावसाळा सुरू झाला होता. कणगीतले धान्य ओले होत होते. ती मुलियाला म्हणाली—सूनबाई, जरा लक्ष ठेव, मी तळ्यावर आंघोळ करून येते. मुलिया बेफिकिरीने म्हणाली—मला झोप येतेय. तुम्हीच बसून लक्ष ठेवा. एक दिवस आंघोळ नाही केली तर काय होणार आहे? पन्नाने लुगडे उचलून ठेवून दिले; ती आंघोळीला गेली नाही. मुलियाचा वार फुकट गेला. काही दिवसांनी एका संध्याकाळी पन्ना भातलावणी करून परतली, तेव्हा अंधार पडला होता. दिवसभर उपाशी होती. आशा होती, सुनेने भाकरी करून ठेवली असेल; पण पाहते तो चूल थंड पडलेली, आणि पोरे भुकेने तळमळत आहेत. तिने मुलियाला हळूच विचारले—आज अजून चूल पेटली नाही? केदार म्हणाला—आज दुपारीसुद्धा चूल पेटली नाही काकी! वहिनीनं काही केलंच नाही. पन्ना—मग तुम्ही खाल्लं काय? केदार—काही नाही. रात्रीच्या भाकरी होत्या, त्या खुन्नू आणि लछमननं खाल्ल्या. मी सातू खाल्ला. पन्ना—आणि सूनबाई? केदार—ती तर पडून झोपलीय. काही खाल्लं नाही. पन्नाने त्याच वेळी चूल पेटवली आणि ती स्वयंपाकाला बसली. पीठ मळत होती आणि रडत होती. काय नशीब! दिवसभर शेतात उन्हात जळले, घरी आले तर चुलीपुढे जळणे नशिबी. केदारला चौदावे वर्ष लागले होते. वहिनीचे रंगढंग पाहून तो सारी परिस्थिती समजून चुकला होता. तो म्हणाला—काकी, वहिनीला आता तुझ्याबरोबर राहायचं नाही. पन्नाने दचकून विचारले—का रे, काही म्हणत होती का? केदार—म्हणत काही नव्हती; पण तिच्या मनात हेच आहे. मग तू तिला का सोडून देत नाहीस? तिला हवं तसं राहू दे; आमचाही देव आहे. पन्नाने दाताखाली जीभ चावून म्हटले—गप्प! माझ्यासमोर असं चुकूनसुद्धा बोलू नकोस. रग्घू तुमचा भाऊ नाही, तुमचा बाप आहे. मुलियाला कधी काही बोललास, तर याद राख, मी विष खाईन.
वाटणी
४ दसऱ्याचा सण आला. या गावापासून कोसभर अंतरावर एका वाडीत जत्रा भरत असे. गावातली सगळी पोरे जत्रा पाहायला निघाली. पन्नाही पोरांबरोबर जायला तयार झाली; पण पैसे कुठून आणायचे? किल्ली तर मुलियाकडे होती. रग्घू येऊन मुलियाला म्हणाला—पोरं जत्रेला चालली आहेत, सगळ्यांना दोन-दोन आणे दे. मुलियाने कपाळाला आठ्या घालून म्हटले—घरात पैसे नाहीत. रग्घू—आत्ताच तर तेलबिया विकल्या. इतक्या लवकर पैसे संपले? मुलिया—हो, संपले. रग्घू—कुठं संपले? जरा ऐकू तरी दे. आज सणाच्या दिवशी पोरं जत्रा पाहायला जाणार नाहीत? मुलिया—आपल्या काकीला सांगा, पैसे काढा म्हणावं. पुरून ठेवून काय करणार आहेत? खुंटीला किल्ली लटकत होती. रग्घूने किल्ली काढली आणि पेटी उघडणार, तोच मुलियाने त्याचा हात धरला आणि म्हणाली—किल्ली मला द्या, नाहीतर बरं होणार नाही. खायला-ल्यायला पाहिजे, कागद-पुस्तकाला पाहिजे, त्यात आणखी जत्रा पाहायलासुद्धा पाहिजे! आमची कमाई काही यासाठी नाही, की दुसऱ्यांनी खावं आणि मिशीवर ताव द्यावा. पन्ना रग्घूला म्हणाली—बाळा, पैसे कशाला? पोरं जत्रेला जाणार नाहीत. रग्घू झिडकारून म्हणाला—जत्रेला का नाही जाणार? सारा गाव चाललाय. आपलीच पोरं नाही जायची? असे म्हणून रग्घूने आपला हात सोडवून घेतला आणि पैसे काढून पोरांना दिले; पण किल्ली तो मुलियाला देऊ लागला, तेव्हा तिने ती अंगणात भिरकावून दिली आणि तोंडावरून पदर ओढून पडून राहिली. पोरे जत्रेला गेली नाहीत. यानंतर दोन दिवस उलटले. मुलियाने काहीच खाल्ले नाही, आणि पन्नाही उपाशी राहिली. रग्घू कधी हिची समजूत काढी, कधी तिची; पण ना ही उठे, ना ती. शेवटी रग्घूने हैराण होऊन मुलियाला विचारले—तोंडानं तरी काही सांग, तुला हवंय तरी काय? मुलिया जमिनीकडे पाहत म्हणाली—मला काही नको. मला माझ्या घरी पोचवा.
वाटणी
रग्घू—बरं, ऊठ, स्वयंपाक कर, खा. पोचवीन. मुलियाने रग्घूकडे डोळे वर करून पाहिले. तिचा चेहरा पाहून रग्घू घाबरला. ते माधुर्य, ती मोहकता, ते लावण्य नाहीसे झाले होते. दात विचकले होते, डोळे विस्फारले होते आणि नाकपुड्या फुरफुरत होत्या. निखाऱ्यासारख्या लाल डोळ्यांनी पाहत ती म्हणाली—अस्सं! म्हणजे काकींनी हा सल्ला दिलाय, हा मंत्र पढवलाय? मीही इतकी कच्ची नाही म्हणावं. तुम्हा दोघांच्या उरावर बसून नाचेन. समजलात काय! रग्घू—बरं, नाच उरावर. पण आधी चार घास खाशील, तरच नाचायला अंगात त्राण राहील ना. मुलिया—आता घर वेगळं झाल्याशिवाय तोंडात पाणीसुद्धा घालणार नाही. खूप सोसलं, आता नाही सोसवत. रग्घू सुन्न झाला. मिनिटभर तर त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. वाटणीची त्याने स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. गावात दोन-चार कुटुंबे वेगळी होताना त्याने पाहिली होती. तो पुरते जाणत होता, की भाकरीबरोबर माणसांची मनेही वेगळी होतात. आपली माणसे कायमची परकी होतात. मग त्यांच्यात तेवढेच नाते उरते, जेवढे गावातल्या इतर माणसांशी. हे संकट घरात येऊ द्यायचे नाही, असा रग्घूने मनाशी निश्चय केला होता; पण होणाऱ्यापुढे त्याचे काही चालले नाही. हाय! माझ्या तोंडाला काळे फासले जाईल. जग हेच म्हणेल, की बाप मेल्यावर दहा वर्षेसुद्धा एकत्र निभले नाही. आणि वेगळे व्हायचे तरी कुणापासून? ज्यांना मांडीवर खेळवले, ज्यांना पोटच्या पोरांसारखे वाढवले, ज्यांच्यासाठी नाना कष्ट सोसले, त्यांच्यापासूनच वेगळे व्हायचे! आपल्या जिवलगांना घराबाहेर हाकलून द्यायचे? त्याचा गळा दाटून आला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला—म्हणजे मी आपल्या भावांपासून वेगळं व्हावं, असं तुला वाटतं? जरा विचार तर कर, मग मी कुणाला तोंड दाखवण्याजोगा राहीन का?
वाटणी
मुलिया—तर मग माझं यांच्याबरोबर निभणार नाही. रग्घू—तर तू वेगळी हो. मला आपल्याबरोबर कशाला फरफटत नेतेस? मुलिया—म्हणजे मला तुमच्या घरात काय पेढे मिळतात? माझ्यासाठी जगात कुठं जागाच नाही का? रग्घू—तुझी जशी मर्जी, हवं तिथं राहा. मी आपल्या घरच्यांपासून वेगळा होऊ शकत नाही. ज्या दिवशी या घरात दोन चुली पेटतील, त्या दिवशी माझ्या काळजाचे दोन तुकडे होतील. हा घाव मला सोसवणार नाही. तुला जो काही त्रास असेल, तो मी दूर करू शकतो. घरच्या चीजवस्तूंची मालकीण तर तूच आहेस; दाणापाणी तुझ्याच हातात आहे. आता उरलंय काय? काही कामधंदा करायचा नसेल, तर नको करू. देवानं मला ऐपत दिली असती, तर मी तुला काडीसुद्धा उचलू दिली नसती. तुझे हे नाजूक हात-पाय कष्ट-मजुरी करण्यासाठी बनलेलेच नाहीत; पण काय करू, आपल्या हातात काहीच नाही. तरीसुद्धा तुला कोणतंही काम करावंसं वाटत नसेल, तर करू नकोस; पण मला वेगळं हो म्हणू नकोस. तुझ्या पाया पडतो.
वाटणी
मुलियाने डोक्यावरचा पदर जरा मागे सारला आणि जवळ सरकून म्हणाली—मी कामाला भीत नाही, की मला बसून खायचंय असंही नाही. पण मला कुणाची दादागिरी सहन होत नाही. तुमच्या काकी घरचं कामकाज करतात, ते स्वतःसाठी करतात, आपल्या पोराबाळांसाठी करतात. माझ्यावर काही उपकार करत नाहीत. मग माझ्यावर त्या रुबाब का गाजवतात? त्यांना आपली पोरं प्यारी असतील; मला तर तुमचाच आधार आहे. सारं घर मजा करतंय, एवढी एवढीशी पोरं दूध पितात, आणि ज्याच्या जिवावर हा संसार उभा आहे, तो ताकाला महाग—हे मला माझ्या डोळ्यांनी पाहवत नाही. त्याची कुणी विचारपूस करणारं नाही. जरा आपलं तोंड तरी पाहा, कसा चेहरा झालाय! दुसऱ्यांचे पठ्ठे तर चार वर्षांत तयार होतील; तुम्ही मात्र दहा वर्षांत खाटेला खिळाल. बसा ना, उभे का? काय, मारून पळून जायचंय? मी काही तुम्हाला बळजबरीनं बांधून ठेवणार नाही. की मालकिणीचा हुकूम नाही? खरं सांगू, तुम्ही मोठे दगडाच्या काळजाचे आहात. एवढ्या निर्मोही माणसाशी गाठ पडणार हे ठाऊक असतं, तर चुकूनसुद्धा या घरात आले नसते. आले असते तरी मन गुंतवलं नसतं. पण आता तर तुमच्यात जीव गुंतलाय. माहेरी गेले, तरी मन इथंच राहील. आणि तुम्ही असे, की माझी साधी विचारपूसही करत नाही. मुलियाच्या या गोड गोड बोलण्याचा रग्घूवर काहीच परिणाम झाला नाही. तो त्याच रुक्षपणे म्हणाला—मुलिया, हे माझ्याच्यानं होणार नाही. वेगळं होण्याचा विचार मनात आला की माझं मन कसंसंच होतं. हा घाव मला सोसवणार नाही. मुलिया थट्टेने म्हणाली—मग बांगड्या भरून घरात बसा की! आणा, मीच मिशा लावते. मला वाटलं होतं, तुमच्यात थोडी तरी धमक असेल. आता बघते तर नुसता मातीचा गोळा!
वाटणी
पन्ना ओसरीवर उभी राहून दोघांचे बोलणे ऐकत होती. आता तिला राहवले नाही. ती पुढे येऊन रग्घूला म्हणाली—ती वेगळं व्हायला हटूनच बसली आहे, तर तू तिला जबरदस्तीनं का बांधून ठेवू पाहतोस? तू तिला घेऊन राहा. आमचा देव वाली आहे. महतो गेले, तेव्हा डोक्यावर पानांची सावलीसुद्धा नव्हती; त्या वेळी देवानं निभावून नेलं, तर आता कसली भीती? आता तर देवाच्या दयेनं तिघं पोरं मोठी झालीत. आता काही काळजी नाही. रग्घूने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पन्नाकडे पाहून म्हटले—काकी, तूसुद्धा वेडी झालीस का? तुला ठाऊक नाही, भाकरी दोन झाल्या की मनंही दोन होतात? पन्ना—ती ऐकतच नाही, तर तू काय करणार? देवाचीच अशी मर्जी असेल, तर कोण काय करणार? नशिबात जितके दिवस एकत्र राहायचं लिहिलं होतं, तितके राहिलो. आता तिची हीच मर्जी आहे, तर हेच खरं. तू माझ्या पोराबाळांसाठी जे काही केलंस, ते मी विसरू शकत नाही. तू यांच्या डोक्यावर हात ठेवला नसतास, तर आज यांची काय गत झाली असती कुणास ठाऊक; कुणाच्या दारात ठोकरा खात असती, कुठं कुठं भीक मागत फिरत असती, देव जाणे. मरेपर्यंत तुझे गुण गाईन. माझ्या कातड्याचे तुझ्या पायात जोडे झाले, तरी आनंदानं देईन. तुझ्यापासून वेगळी झाले, तरी ज्या घडीला हाक मारशील, कुत्र्यासारखी धावत येईन. तुझ्यापासून वेगळी होऊन मी तुझं वाईट चिंतीन, असं चुकूनसुद्धा मनात आणू नकोस. ज्या दिवशी तुझं वाईट माझ्या मनात येईल, त्याच दिवशी विष खाऊन मरेन. देव करो, तुझं घर दूधदुभत्यानं आणि लेकराबाळांनी भरून जावो. मरेपर्यंत हाच आशीर्वाद माझ्या रोमारोमातून निघत राहील. आणि पोरं जर आपल्या बापाची असतील, तर मरेपर्यंत तुझे उपकार मानतील. असे म्हणून पन्ना रडत तिथून निघून गेली. रग्घू तिथेच पुतळ्यासारखा उभा राहिला. त्याची नजर आकाशाकडे खिळली होती आणि डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
वाटणी
५ पन्नाचे बोलणे ऐकून मुलियाने ओळखले, की आता आपलेच फासे पडले. ती झटकन उठली, घर झाडले, चूल पेटवली आणि विहिरीवर पाणी आणायला निघाली. तिचा हट्ट पुरा झाला होता. गावात बायकांचे दोन तट असतात—एक सुनांचा, दुसरा सासवांचा. सुना सल्ल्यासाठी आणि सहानुभूतीसाठी आपल्या तटात जातात, सासवा आपल्या. दोघींच्या पंचायती वेगवेगळ्या भरतात. विहिरीवर मुलियाला दोन-तीन सुना भेटल्या. एकीने विचारले—आज तुमची म्हातारी फार रडारड करत होती गं. मुलिया विजयाच्या गर्वाने म्हणाली—इतके दिवस घराच्या मालकीण होऊन बसल्या आहेत. राजपाट सोडायला कुणाला आवडतं? बाई गं, मी त्यांचं वाईट चिंतत नाही; पण एका माणसाच्या कमाईला कुठवर बरकत येणार? माझेही हेच खाण्यापिण्याचे, नेसण्या-ल्यायचे दिवस आहेत. आत्ता त्यांच्यासाठी मरा, मग पोरंबाळं झाली की त्यांच्यासाठी मरा. सारं आयुष्य रडण्यातच जायचं. एक सून—म्हातारीला हेच हवंय, की सुनांनी जन्मभर बटकी होऊन राहावं. जाडंभरडं खावं आणि पडून राहावं. दुसरी सून—कुणाच्या भरवशावर कुणी मरावं? पोटची पोरं विचारत नाहीत, तर परक्याच्या पोरांचा काय भरवसा? उद्या हे हाताशी आले, की मग कोण विचारतो? आपापल्या बायकांचं तोंड पाहत बसतील. आधीच झटकून टाकलेलं बरं. मग कुठला कलंक तरी लागायचा नाही. मुलिया पाणी घेऊन गेली, स्वयंपाक केला आणि रग्घूला म्हणाली—जा, आंघोळ करून या. भाकरी तयार आहे. रग्घूने जणू ऐकलेच नाही. डोक्याला हात लावून तो दाराकडे पाहत बसून राहिला. मुलिया—काय म्हणते मी, ऐकू येतंय का? भाकरी तयार आहे, जा, आंघोळ करून या. रग्घू—ऐकतोय की, काय बहिरा आहे? भाकरी तयार असेल, तर जा, खाऊन घे. मला भूक नाही. मुलिया पुढे काही बोलली नाही. तिने जाऊन चूल विझवली, भाकरी उचलून शिंक्यावर ठेवल्या आणि तोंड झाकून पडून राहिली.
वाटणी
थोड्या वेळाने पन्ना येऊन म्हणाली—जेवण तयार आहे, आंघोळ करून जेवून घे. सूनबाईसुद्धा उपाशी असेल. रग्घू वैतागून म्हणाला—काकी, मला घरात राहू देशील, की तोंडाला काळं फासून कुठं निघून जाऊ? जेवायचं तर आहेच; आज नाही, उद्या जेवेन. पण आत्ता माझ्याच्यानं जेवलं जाणार नाही. केदार अजून शाळेतून आला नाही का? पन्ना—अजून नाही आला. येईलच इतक्यात. पन्नाने ओळखले, की जोवर ती स्वयंपाक करून पोरांना जेवू घालणार नाही आणि स्वतः जेवणार नाही, तोवर रग्घू जेवणार नाही. एवढेच नाही, तिला रग्घूशी भांडावे लागेल, त्याला टाकून बोलावे लागेल, मीच त्याच्यापासून वेगळी होऊ पाहते असे दाखवावे लागेल; नाहीतर तो याच चिंतेत झुरून झुरून प्राण सोडील. असा विचार करून तिने वेगळी चूल पेटवली आणि स्वयंपाक करू लागली. इतक्यात केदार आणि खुन्नू शाळेतून आले. पन्ना म्हणाली—या रे बाळांनो, जेवून घ्या. भाकरी तयार आहे. केदारने विचारले—दादालाही बोलावून आणू ना? पन्ना—तू येऊन जेव. त्याच्या भाकरी सूनबाईनं वेगळ्या केल्यात. खुन्नू—जाऊन दादाला विचारून येऊ का? पन्ना—त्याला वाटेल तेव्हा जेवेल. तू बसून जेव; तुला या गोष्टींशी काय करायचंय? ज्याला वाटेल तो जेवेल, ज्याला वाटणार नाही तो नाही जेवणार. तो आणि त्याची बायको वेगळं राहायलाच हटून बसलेत, तर कोण त्यांची मनधरणी करणार? केदार—मग अम्माजी, आपण वेगळ्या घरात राहणार? पन्ना—त्यांना वाटलं तर एका घरात राहतील; वाटलं तर अंगणात भिंत घालतील. खुन्नूने दारात येऊन डोकावले. समोर गवताची झोपडी होती; तिथेच खाटेवर पडून रग्घू हुक्का ओढत होता. खुन्नू—दादा तर अजून हुक्का घेऊन बसलाय. पन्ना—जीव होईल तेव्हा जेवेल. केदार—दादा वहिनीला रागावला नाही? मुलिया आपल्या खोलीत पडून ऐकत होती. बाहेर येऊन म्हणाली—दादा नाही रागावले; आता तुम्हीच येऊन रागवा.
वाटणी
केदारच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याने पुन्हा तोंड उघडले नाही. तिघा मुलांनी जेवण केले आणि ते बाहेर पडले. उन्हाच्या झळा सुरू झाल्या होत्या. आमराईत गावातली पोरे-पोरी वाऱ्याने पडलेले आंबे वेचत होती. केदार म्हणाला—चला, आज आपणही आंबे वेचायला जाऊ. खूप आंबे पडताहेत. खुन्नू—दादा बसलाय ना? लछमन—मी नाही येणार, दादा दटावेल. केदार—तो तर आता वेगळा झाला. लछमन—मग आता आम्हाला कुणी मारलं, तरी दादा काही बोलणार नाही? केदार—वा! तेव्हा का नाही बोलणार? रग्घूने तिघा मुलांना दारात उभे असलेले पाहिले; पण तो काही बोलला नाही. पूर्वी ते घराबाहेर पडताच तो त्यांना दटावत असे; पण आज तो पुतळ्यासारखा निश्चल बसून राहिला. आता मुलांना थोडा धीर आला. ती आणखी थोडी पुढे सरकली. रग्घू तरीही बोलला नाही. कसा बोलणार? तो विचार करीत होता, काकीने पोरांना जेवू-खाऊ घातले, मला विचारलेसुद्धा नाही. तिच्याही डोळ्यांवर पडदा पडला का? मी पोरांना हाक मारली आणि ती आली नाहीत तर? मी त्यांना मारू-झोडू तर शकणार नाही. झळांमध्ये सगळी उगाच भटकत फिरतील! आजारी तर नाही ना पडणार? त्याचा जीव कासावीस होई, पण तोंडाने काही बोलता येत नव्हते. हा मुळीच बोलत नाही हे पाहून मुले निर्भय होऊन निघाली. अचानक मुलिया येऊन म्हणाली—आता तरी उठणार का, की अजूनही नाही? ज्यांच्या नावानं उपास काढताय, त्यांनी मजेत पोरांना जेवू घातलं आणि स्वतः जेवल्या; आता आरामात झोपल्यात. 'मोर पिया बात न पूछे, मोर सुहागिन नाँव।' एकदासुद्धा तोंडातून फुटलं नाही, की चल बाळा, जेवून घे. रग्घूला या वेळी जिव्हारी वेदना होत होत्या. मुलियाच्या या कठोर शब्दांनी जखमेवर मीठ चोळले. दुःखी नजरेने पाहत तो म्हणाला—तुझी जी मर्जी होती, तेच तर झालं. आता जा, ढोल वाजव!
वाटणी
मुलिया—नाहीतर काय, तुमच्यासाठी ताट वाढून बसल्यात त्या! रग्घू—मला चिडवू नकोस. तुझ्यापायी मीसुद्धा बदनाम होतोय. तुलाच कुणाचं होऊन राहायचं नाही, तर दुसऱ्याला काय गरज, की माझी मनधरणी करावी? जा, काकीला विचार, पोरं आंबे वेचायला गेलीत, त्यांना धरून आणू का? मुलिया अंगठा दाखवून म्हणाली—हा घ्या ठेंगा! तुम्हाला शंभरदा गरज असेल, तर जाऊन विचारा. इतक्यात पन्नाही आतून बाहेर आली. रग्घूने विचारले—पोरं आमराईत गेलीत काकी; झळा लागताहेत. पन्ना—आता त्यांना कोण विचारणारा आहे? आमराईत जावोत, झाडावर चढोत, पाण्यात बुडोत. मी एकटी काय काय करू? रग्घू—जाऊन धरून आणतो. पन्ना—तुला स्वतःच्या मनानं जायचं नाही, तर मी तरी जा म्हणून का सांगू? तुला अडवायचं असतं, तर अडवलं नसतंस? तुझ्यासमोरूनच तर गेली असतील? पन्नाचे बोलणे पुरे होते न होते तोच रग्घूने हुक्का कोपऱ्यात ठेवला आणि तो आमराईकडे निघाला. ६ रग्घू मुलांना घेऊन आमराईतून परतला, तो पाहतो, मुलिया अजून झोपडीत उभी आहे. तो म्हणाला—तू जाऊन जेवून का घेत नाहीस? मला तर या वेळी भूक नाही. मुलिया ताठ्याने म्हणाली—हो, भूक कशाला लागेल! भावांनी खाल्लं, ते तुमच्या पोटात पोचलंच असेल. रग्घू दात ओठ खाऊन म्हणाला—माझा जीव जाळू नकोस मुलिया, नाहीतर बरं होणार नाही. जेवण काही पळून जात नाही. एक वेळ नाही जेवलो, तर मरणार नाही. आज घरात काही लहानशी गोष्ट घडली, असं तुला वाटतं? तू घरात चूल नाही पेटवलीस, माझ्या काळजात आग लावलीस. मला गर्व होता, की दुसरं काही का होईना, माझ्या घरात फुटीचा रोग शिरणार नाही; पण तू माझा गर्व धुळीला मिळवलास. नशिबाचा खेळ! मुलिया फणकाऱ्याने म्हणाली—सगळी माया-ममता तुम्हालाच आहे, की आणखी कुणाला? मला तर दुसरं कुणी तुमच्यासारखं उसासे टाकताना दिसत नाही.
वाटणी
रग्घूने दीर्घ निःश्वास सोडून म्हटले—मुलिया, जखमेवर मीठ चोळू नकोस. तुझ्याचमुळं माझी पाठ मातीला लागतेय. मला या संसाराची माया नसेल, तर कुणाला असणार? मीच तर तो मर मर मरून जोडलाय. ज्यांना मांडीवर खेळवलं, तेच आता माझे हिस्सेदार होणार. ज्या पोरांना मी दटावत असे, त्यांच्याकडे आज वटारलेल्या डोळ्यांनीसुद्धा बघू शकत नाही. त्यांच्या भल्यासाठी जरी काही बोललो, तरी जग हेच म्हणेल, की हा आपल्या भावांना लुबाडतोय. जा, मला सोड. आत्ता माझ्याच्यानं काही खाल्लं जाणार नाही. मुलिया—मी शपथ घालीन हं; नाहीतर गुपचूप चला. रग्घू—हे बघ, अजूनही काही बिघडलं नाही. आपला हट्ट सोड. मुलिया—उठून जेवला नाहीत, तर माझं मेलेलं तोंड पाहाल! रग्घूने कानांवर हात ठेवून म्हटले—हे काय केलंस मुलिया? मी उठतच तर होतो. चल, जेवतो. आंघोळीला कोण जातो! पण एवढं सांगून ठेवतो, चारांच्या जागी सहा भाकरी खाल्ल्या, किंवा तू मला तुपाच्या माठात बुडवलंस, तरी हा डाग माझ्या मनावरून पुसला जाणार नाही. मुलिया—डाग-बीग सगळा पुसला जाईल. सुरुवातीला सगळ्यांनाच असं वाटतं. बघत नाही का, तिकडे कसा आनंदीआनंद चाललाय? त्या तर देव पाण्यात घालून बसल्या होत्या, की कसंही करून हे वेगळे होवोत. आता पूर्वीसारखी चांदी राहिली नाही ना, की घरात जे येईल ते सगळं गायब! आता त्या कशाला राहतील आमच्याबरोबर? रग्घू दुखावलेल्या स्वरात म्हणाला—याचंच तर मला दुःख आहे. काकीकडून मला अशी अपेक्षा नव्हती. रग्घू जेवायला बसला, तेव्हा घास विषाच्या घोटासारखा लागत होता. भाकरी कोंड्याच्या वाटत होत्या. वरण पाण्यासारखे लागत होते. पाणीसुद्धा घशाखाली उतरत नव्हते. दुधाकडे त्याने पाहिलेसुद्धा नाही. दोन-चार घास खाऊन तो उठला, जणू एखाद्या प्रियजनाच्या श्राद्धाचे जेवण असावे.
वाटणी
रात्रीचे जेवणही त्याने असेच केले. जेवण कसले, शपथ पुरी केली. रात्रभर त्याचे मन अस्वस्थ होते. एक अनामिक शंका त्याच्या मनावर दाटून राहिली होती, जणू भोला महतो दारात बसून रडत आहे. तो कित्येकदा दचकून उठला. असे वाटले, भोला त्याच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहतो आहे. तो दोन्ही वेळा जेवत असे; पण जणू शत्रूच्या घरी. भोलाची शोकमग्न मूर्ती डोळ्यांसमोरून हलत नव्हती. रात्री त्याला झोप येत नसे. गावात बाहेर पडे, तेव्हा असा तोंड चुकवत, मान खाली घालून चाले, जणू त्याने गोहत्या केली आहे. ७ पाच वर्षे उलटली. रग्घू आता दोन मुलांचा बाप होता. अंगणात भिंत उभी राहिली होती, शेतांत बांध घातले गेले होते, आणि बैल-गोऱ्हे वाटून घेतले गेले होते. केदार आता सोळा वर्षांचा झाला होता. त्याने शाळा सोडली होती आणि तो शेतीचे काम करीत असे. खुन्नू गाय चारत असे. फक्त लछमन अजून शाळेत जात होता. पन्ना आणि मुलिया एकमेकींचे तोंड पाहून जळत. मुलियाची दोन्ही मुले बहुधा पन्नाजवळच असत. तीच त्यांना उटणे लावी, तीच काजळ घाली, तीच कडेवर घेऊन फिरे; पण मुलियाच्या तोंडून कधी उपकाराचा एक शब्दही निघत नसे. आणि पन्नालाही त्याची अपेक्षा नव्हती. ती जे काही करी, ते निरपेक्ष भावाने करी. तिची दोन-दोन मुले आता कमावती झाली होती. मुलगी स्वयंपाक करीत असे. ती स्वतः वरकाम बघे. याउलट रग्घू आपल्या घरात एकटा होता; तोही दुबळा, अशक्त, आणि ऐन तारुण्यात म्हातारा. वय अजून तिशीच्या पुढे गेले नव्हते; पण केस पिकू लागले होते, कंबरही वाकू लागली होती. खोकल्याने त्याला पोखरून टाकले होते. पाहून दया येई. आणि शेती म्हणजे घामाचा मामला. शेतांची जशी सेवा व्हायला हवी, तशी त्याच्याकडून होत नसे. मग चांगले पीक कुठून येणार! थोडे कर्जही झाले होते.
वाटणी
ती चिंता तर त्याला आणखीच खात होती. खरे म्हणजे आता त्याला थोडा आराम मिळायला हवा होता. इतक्या दिवसांच्या अखंड कष्टानंतर डोक्यावरचे ओझे थोडे हलके व्हायला हवे होते; पण मुलियाच्या स्वार्थीपणाने आणि दूरदृष्टीच्या अभावाने बहरलेल्या शेतीची राखरांगोळी केली. सगळे एकत्र राहिले असते, तर त्याला आतापर्यंत पेन्शन मिळाली असती; मजेत दारात बसून हुक्का ओढत राहिला असता. भाऊ राबले असते, तो सल्ला देत बसला असता. महतो म्हणून मिरवला असता. कुठे कुणाचे तंटे मिटवले असते, कुठे साधुसंतांची सेवा केली असती; पण ती संधी हातातून निसटून गेली. आता तर चिंतेचे ओझे दिवसेंदिवस वाढतच चालले होते. शेवटी त्याला बारीक बारीक ताप राहू लागला. काळजातली कळ, चिंता, कठोर कष्ट आणि अभाव यांचे हेच बक्षीस असते. आधी त्याने काही पर्वा केली नाही. वाटले, आपोआप बरे होईल; पण अशक्तपणा वाढू लागला, तेव्हा औषधाची काळजी वाटू लागली. ज्याने जे सांगितले, ते खाल्ले. डॉक्टर-वैद्यांकडे जाण्याची ऐपत कुठे होती? आणि ऐपत असती, तरी पैसे खर्च करण्यापलीकडे आणखी काय निष्पन्न होणार होते? जुन्या तापावर औषध म्हणजे आराम आणि पौष्टिक अन्न. ना तो वसंतमालतीचे सेवन करू शकत होता, ना आरामात बसून बलवर्धक अन्न खाऊ शकत होता. अशक्तपणा वाढतच गेला. पन्नाला सवड मिळे, तेव्हा ती येऊन त्याला धीर देई; पण तिची मुले आता रग्घूशी बोलतसुद्धा नसत. औषधपाणी करणे तर दूरच, उलट त्याची थट्टा उडवत. दादाला वाटलं होतं, आमच्यापासून वेगळं होऊन सोन्याच्या विटा रचू. वहिनीलाही वाटलं होतं, सोन्यानं मढून जाईन. आता बघू, कोण विचारतं! कुढून कुढून मेले नाहीत, तर सांगा. फार 'हाय हाय'सुद्धा बरी नसते. माणसानं झेपेल तेवढं काम करावं; पैशासाठी जीवच द्यावा, असं नाही.
वाटणी
पन्ना म्हणे—बिचाऱ्या रग्घूचा काय दोष? केदार म्हणे—जाऊ दे, मी पुरतं ओळखून आहे. दादाच्या जागी मी असतो, तर दांडक्यानं बोललो असतो. काय बिशाद होती बायकोची, असा हट्ट धरायची! ती सगळी दादाचीच चाल होती. सगळं ठरवून केलेलं होतं. शेवटी एके दिवशी रग्घूचा मिणमिणता जीवनदीप विझला. मृत्यूने साऱ्या चिंतांचा अंत केला. अखेरच्या वेळी त्याने केदारला बोलावले होते; पण केदारला उसाला पाणी द्यायचे होते. घाबरला, औषध आणायला पाठवतील की काय! त्याने काहीतरी निमित्त सांगितले. ८ मुलियाचे जीवन अंधारून गेले. ज्या जमिनीवर तिने मनसुब्यांची भिंत उभी केली होती, ती खालूनच सरकली होती. ज्या खुंट्याच्या बळावर ती उड्या मारीत होती, तो उपटला गेला होता. गाववाले म्हणू लागले, देवाने कशी तत्काळ शिक्षा दिली! बिचारी लाजेने आपल्या दोन्ही पोरांना घेऊन रडत बसे. गावात कुणाला तोंड दाखवायचा धीर होत नसे. प्रत्येक जण जणू तिला म्हणत होता—'गर्वाने जमिनीवर पाय ठेवत नव्हती; शेवटी शिक्षा मिळाली की नाही?' आता या घरात कसे निभणार? ती कुणाच्या आधाराने राहणार? कुणाच्या बळावर शेती होणार? बिचारा रग्घू आजारी होता, दुबळा होता; पण जिवंत होता तोवर आपले काम करीत राहिला. अशक्तपणामुळे कधी कधी डोके धरून बसे, आणि जरा दम खाऊन पुन्हा हात चालवू लागे. सारी शेती उद्ध्वस्त होत चालली होती; ती कोण सावरणार? धान्याच्या पेंढ्या खळ्यात पडल्या होत्या, ऊस तिकडे वाळत होता. ती एकटी काय काय करणार? आणि पाणी देणे हे काही एकट्या माणसाचे काम नव्हे. तीन-तीन मजूर कुठून आणायचे! गावात मजूर होतेच किती? माणसांसाठी ओढाताण चालली होती! काय करावे, काय करू नये!
वाटणी
असे तेरा दिवस गेले. क्रियाकर्मातून मोकळीक मिळाली. दुसऱ्याच दिवशी सकाळी मुलियाने दोन्ही पोरांना कडेवर घेतले आणि मळणी करायला निघाली. खळ्यात पोचल्यावर तिने एकाला झाडाखाली गवताच्या मऊ बिछान्यावर झोपवले आणि दुसऱ्याला तिथेच बसवून मळणी करू लागली. बैल हाकत होती आणि रडत होती. देवाने तिला याचसाठी जन्माला घातले होते का? बघता बघता काय होऊन बसले! मागच्या वर्षीही याच दिवसांत मळणी झाली होती. ती रग्घूसाठी तांब्यात सरबत आणि वाटाण्याच्या घुगऱ्या घेऊन आली होती. आज तिला ना पुढे कोणी, ना मागे! पण कुणाची बटकी तर नाही ना मी! वेगळे झाल्याचा तिला अजूनही पश्चात्ताप नव्हता. एकाएकी धाकट्या पोराचे रडणे ऐकून तिने तिकडे पाहिले, तो थोरला मुलगा त्याला चुचकारत म्हणत होता—बाळा, गप्प, गप्प हो. हळूहळू त्याच्या तोंडावरून हात फिरवीत होता आणि त्याला गप्प करण्यासाठी कासावीस झाला होता. कसाही गप्प होईना, तेव्हा तो स्वतः त्याच्याजवळ आडवा झाला आणि त्याला छातीशी धरून माया करू लागला; पण हा प्रयत्नही फसला, तेव्हा तोही रडू लागला. त्याच वेळी पन्ना धावत आली आणि धाकट्याला कडेवर उचलून कुरवाळत म्हणाली—पोरांना माझ्याकडे का नाही देऊन आलीस सूनबाई? हाय हाय! बिचारा जमिनीवर पडून लोळतोय. मी मेल्यावर हवं ते कर; अजून तरी जिवंत आहे. वेगळं झाल्यानं काही पोरं वेगळी झाली नाहीत. मुलिया म्हणाली—तुम्हालाही सवड नव्हती अम्मा, काय करणार?
वाटणी
पन्ना—मग तुला इथं यायची एवढी काय घाई होती? पेंढ्या काही मळल्यावाचून राहिल्या नसत्या. तीन-तीन पोरं आहेत ना; आणखी कुठल्या दिवशी कामाला येणार? केदार तर कालच मळणी करायचं म्हणत होता; पण मी म्हटलं, आधी उसाला पाणी देऊन घे, मग मळणी. मळणी दहा दिवसांनीसुद्धा होईल; उसाला पाणी नाही मिळालं, तर तो वाळून जाईल. कालपासून पाणी चालू आहे, परवापर्यंत शेत भिजून जाईल. मग मळणी होईल. तुझा विश्वास नाही बसायचा, दादा गेल्यापासून केदारला फार काळजी लागलीय. दिवसातून शंभरदा विचारतो, वहिनी फार रडत तर नाही ना? बघ, पोरं उपाशी तर नाहीत ना? एखादं पोर रडलं, की धावत येतो—बघ अम्मा, काय झालं, बाळ का रडतंय? काल रडत रडत म्हणाला—अम्मा, दादा इतक्या लवकर जाणार हे कळलं असतं, तर त्याची थोडीतरी सेवा केली असती. कुठं उठवून उठवून उठायचा, आणि आता बघतेस ना, प्रहरभर रात्र असतानाच उठून कामाला लागतो. काल खुन्नू जरासा म्हणाला, आधी आपण आपल्या उसाला पाणी देऊ, मग दादाच्या उसाला देऊ. यावर केदारनं त्याला असं फटकारलं, की खुन्नूच्या तोंडून पुढं शब्द फुटला नाही. म्हणाला, कसला तुमचा ऊस आणि कसला आमचा? दादानं जगवलं नसतं, तर आज एकतर मेलो असतो, नाहीतर कुठं भीक मागत असतो. आज मोठे ऊसवाले झालात! त्याचीच पुण्याई, म्हणून आज भले माणूस होऊन बसलात. परवा भाकरी खायला बोलवायला गेले, तर खोपटात बसून रडत होता. विचारलं, का रडतोस? तर म्हणाला, अम्मा, दादा याच 'वाटणी'च्या दुःखानं गेला; नाहीतर अजून त्याचं वय ते काय होतं! हे तेव्हा सुचलं नाही; नाहीतर त्याच्याशी का वाकडं घेतलं असतं? असे म्हणून पन्नाने मुलियाकडे सूचक नजरेने पाहिले आणि म्हटले—तो तुला वेगळी राहू देणार नाही सूनबाई. म्हणतो, दादा आमच्यासाठी मेला, तर आम्हीसुद्धा त्याच्या पोराबाळांसाठी मरू.
वाटणी
मुलियाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पन्नाच्या बोलण्यात आज खरी वेदना, खरे सांत्वन, खरी काळजी भरलेली होती. मुलियाचे मन तिच्याकडे इतके कधीच ओढले गेले नव्हते. ज्यांच्याकडून तिला टोमण्यांची आणि सूडाची भीती होती, ते इतके दयाळू, इतके हितचिंतक झाले होते. आज पहिल्यांदा तिला आपल्या स्वार्थीपणाची लाज वाटली. पहिल्यांदाच तिच्या अंतरात्म्याने वाटणीबद्दल तिला धिक्कारले. ९ या घटनेला पाच वर्षे उलटली. पन्ना आता म्हातारी झाली आहे. केदार घरचा मालक आहे. मुलिया घरची मालकीण आहे. खुन्नू आणि लछमन यांची लग्ने झाली आहेत; पण केदार अजून बिनलग्नाचाच आहे. म्हणतो—मी लग्न करणार नाही. कित्येक ठिकाणांहून बोलणी झाली, कित्येक स्थळे आली, पण त्याने होकार दिला नाही. पन्नाने किती गळ टाकले, किती जाळी पसरली, पण तो काही गळाला लागला नाही. म्हणे—बायकांपासून कसलं सुख? बायको घरात आली, की माणसाचा स्वभाव बदलला. मग जे काही आहे, ती बायकोच. आई-बाप, भाऊबंद सगळे परके. दादासारख्या माणसाचा स्वभाव बदलला, तर दुसऱ्यांची काय कथा? देवानं दिलेली दोन पोरं आहेत; आणखी काय पाहिजे? लग्न न करता दोन मुलगे मिळाले, यापेक्षा आणखी काय हवं? ज्याला आपलं समजा, तो आपला; ज्याला परका समजा, तो परका. एके दिवशी पन्ना म्हणाली—तुझा वंश कसा चालणार? केदार—माझा वंश तर चाललाय. दोन्ही पोरांना मी आपलीच समजतो. पन्ना—समजण्यावरच आहे, तर तू मुलियालाही आपली बायको समजत असशील? केदार ओशाळून म्हणाला—तू तर शिवीच देतेस अम्मा! पन्ना—शिवी कसली? तुझी वहिनीच तर आहे. केदार—माझ्यासारख्या दांडगट अडाण्याला ती कशाला विचारील! पन्ना—तू हो म्हण, तर मी तिला विचारू? केदार—नको गं अम्मा, ती रडायला-ओरडायला लागली तर! पन्ना—तुझी इच्छा असेल, तर बोलता बोलता तिच्या मनाचा ठाव घेऊ?
वाटणी
केदार—मला काही ठाऊक नाही; तुला हवं ते कर. पन्नाने केदारच्या मनातले ओळखले. पोराचा जीव मुलियावर जडला आहे; पण संकोचामुळे आणि भीतीमुळे तो काही बोलत नाही. त्याच दिवशी ती मुलियाला म्हणाली—काय करू सूनबाई, मनातली हौस मनातच राहून जाते. केदारचाही संसार उभा राहिला असता, तर मी निश्चिंत झाले असते. मुलिया—भाऊजी तर करायलाच तयार नाहीत. पन्ना—म्हणतो, घरात मिळूनमिसळून राहील अशी बाई मिळाली, तर करीन. मुलिया—अशी बाई कुठं मिळणार? कुठंतरी शोधा. पन्ना—मी तर शोधलीय. मुलिया—खरंच! कुठल्या गावची आहे? पन्ना—आत्ता नाही सांगणार. पण एवढं जाणते, की तिच्याशी केदारचं लग्न झालं, तर घर सावरेल आणि केदारच्या आयुष्याचंही सोनं होईल. पोरगी तयार होईल की नाही, कुणास ठाऊक. मुलिया—का नाही तयार होणार अम्मा? असा सुंदर, कमावता, सुस्वभावी नवरा आणखी कुठं मिळतो? मागच्या जन्मीचा कुणी साधू-महात्मा आहे; नाहीतर भांडणतंट्याच्या भीतीनं कोण बिनलग्नाचा राहतो? कुठं राहते, मी जाऊन तिची मनधरणी करून आणते. पन्ना—तू मनावर घेतलंस, तर तिला राजी करशील. तुझ्यावरच आहे. मुलिया—मी आजच जाईन अम्मा! तिच्या पाया पडून तिला राजी करून आणीन. पन्ना—सांगू? ती तूच आहेस. मुलिया लाजून म्हणाली—तुम्ही तर अम्माजी, शिवीच देता! पन्ना—शिवी कसली? दीरच तर आहे! मुलिया—माझ्यासारख्या म्हातारीला ते कशाला विचारतील! पन्ना—त्याचा तुझ्यावरच डोळा आहे. तुझ्याशिवाय दुसरी कुणी त्याला आवडतच नाही. भीतीपोटी बोलत नाही; पण त्याच्या मनातलं मी जाणते. वैधव्याच्या दुःखाने कोमेजलेला, पिवळा पडलेला मुलियाचा चेहरा कमळासारखा आरक्त झाला. दहा वर्षांत जे काही गमावले होते, ते जणू या एकाच क्षणात व्याजासकट परत मिळाले. तेच लावण्य, तेच फुलणे, तीच मोहिनी, तीच लचक!