मुंशी प्रेमचंद यांच्या निवडक कथा
विटी-दांडू
आमच्या इंग्रजी शिकलेल्या मित्रांना पटो वा न पटो, मी तर हेच म्हणेन, की विटी-दांडू हा सगळ्या खेळांचा राजा आहे. आजही कधी पोरांना विटी-दांडू खेळताना पाहतो, तेव्हा जीव असा उचंबळून येतो की त्यांच्यात जाऊन खेळायला लागावे. ना लॉनची गरज, ना कोर्टची, ना नेटची, ना बॅटची. खुशाल कुठल्याही झाडाची एक फांदी तोडली, विटी घडवली, आणि दोन गडी जरी जमले तरी खेळ सुरू! विलायती खेळांतला सर्वांत मोठा दोष हा, की त्यांचे सामान महाग असते. निदान शंभर रुपये तरी खर्च केल्याशिवाय खेळाडूंत गणतीच होत नाही. आणि इथे हा विटी-दांडू — दमडीचा खर्च नाही, तरी रंग असा पक्का चढतो! पण इंग्रजी वस्तूंच्या मागे आपण इतके वेडे झालो आहोत, की आपल्या स्वतःच्या साऱ्याच गोष्टी आपल्याला नकोशा वाटू लागल्या आहेत. आपल्या शाळांमध्ये प्रत्येक मुलाकडून वर्षाला तीन-चार रुपये नुसती खेळाची फी घेतात. दमडीही न लागता खेळता येणारे हिंदुस्थानी खेळ मुलांना खेळवावेत, हे कुणालाच सुचत नाही. इंग्रजी खेळ ज्यांच्यापाशी पैसा आहे त्यांच्यासाठी. गरीब पोरांच्या माथी हे व्यसन का मारता? मान्य, विटीने डोळा फुटण्याचे भय असते; पण मग क्रिकेटने डोके फुटण्याचे, प्लीहा फाटण्याचे, पाय मोडण्याचे भय नसते काय? माझ्या कपाळावर विटीचा व्रण आजतागायत आहे, हे खरे; पण माझे कित्येक मित्र असेही आहेत, की ज्यांच्या हातातली बॅट जाऊन तिथे कुबडी आली. असो, ज्याची त्याची आवड. मला मात्र सगळ्या खेळांत विटीच आवडते, आणि बालपणीच्या गोड आठवणींत विटीची आठवण सर्वांत गोड आहे.
विटी-दांडू
ते भल्या सकाळी घरातून सटकणे, ते झाडावर चढून फांद्या तोडणे आणि विटी-दांडू घडवणे, तो उत्साह, ती तल्लीनता, ते खेळगड्यांचे घोळके, ते दुसऱ्याला विटी आणायला पदवणे आणि स्वतः पदवून घेणे, ती भांडणे-तंटे, तो साधाभोळा स्वभाव — ज्यात स्पृश्य-अस्पृश्य, श्रीमंत-गरीब असा भेद मुळीच नसे, ज्यात श्रीमंती नखऱ्यांना, दिखाव्याला, गर्वाला वावच नव्हता — हे सारे विसरायचे ते तेव्हाच, जेव्हा... जेव्हा... घरची मंडळी संतापली आहेत, वडील स्वयंपाकघरात जेवायला बसून पोळ्यांवर तडातड आपला राग काढताहेत, अम्मांची धाव फक्त दारापर्यंतच, पण त्यांच्या विचारांत माझे अंधारलेले भविष्य फुटक्या नावेसारखे हेलकावे खाते आहे; आणि मी? मी पदवण्यात दंग आहे, ना आंघोळीचे भान, ना जेवणाचे. विटी असते तर इवलीशी; पण तिच्यात जगभरच्या मिठायांची गोडी आणि जगभरच्या खेळ-तमाशांची मौज ठासून भरलेली असते. माझ्या सवंगड्यांमध्ये गया नावाचा एक मुलगा होता. माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठा असेल. किडकिडीत, उंच, माकडासारखी लांब लांब, बारीक बारीक बोटे, माकडासारखाच चपळपणा, तसाच चिडखोरपणा. विटी कशीही येवो, तो तिच्यावर अशी झेप घ्यायचा, जशी पाल किड्यांवर घेते. त्याला आईबाप होते की नव्हते, तो कुठे राहायचा, काय खायचा, कुणास ठाऊक; पण आमच्या विटी-क्लबचा चॅम्पियन तोच होता. तो ज्या बाजूला जाईल, त्या बाजूचा विजय ठरलेला. तो दुरून येताना दिसला की आम्ही सगळे धावत जाऊन त्याचे स्वागत करीत असू आणि त्याला आपला जोडीदार करून घेत असू.
विटी-दांडू
एके दिवशी मी आणि गया दोघेच खेळत होतो. तो मला पदवत होता, मी धावत होतो. पण गंमत अशी, की दुसऱ्याला पदवण्यात आपण दिवसभर दंग राहू शकतो, आणि स्वतः धावावे लागले की एक मिनिटसुद्धा जिवावर येते. सुटका करून घेण्यासाठी मी त्या सगळ्या युक्त्या लढवल्या, ज्या शास्त्रसंमत नसल्या तरी अशा प्रसंगी क्षम्य असतात; पण गया आपला डाव घेतल्याशिवाय माझी पाठ सोडायला तयार नव्हता. मी घराकडे पळालो. विनवण्या-आर्जवांचा काहीही परिणाम झाला नाही. गयाने धावत येऊन मला पकडले आणि दांडू उगारून म्हणाला—माझा डाव देऊन जा. पदवताना तर मोठा शूर बनला व्हतास, आता धावायची पाळी आली तर पळ काढतोस व्हय? 'म्हणजे तू दिवसभर पदवत राहणार, आणि मी दिवसभर धावतच राहायचं!' 'हो, तुला दिसभर धावावं लागंल.' 'ना जेवायला जायचं, ना पाणी प्यायला?' 'हो! माझा डाव दिल्याबिगर तुला कुठंच जाता येणार न्हाई.' 'मी काय तुझा गुलाम आहे?' 'हो, माझा गुलामच हाईस.' 'मी चाललो घरी, बघू तू माझं काय करतोस ते!' 'घरी कसा जातोस? थट्टा वाटली व्हय? मी डाव दिलाय, आता डाव घेणारच.' 'बरं, काल मी तुला पेरू खाऊ घातला होता. तो परत दे.' 'तो तर पोटात गेला.' 'काढ पोटातून! माझा पेरू खाल्लासच का?' 'पेरू तू दिलास, म्हणून मी खाल्ला. मी काय तुझ्याकडं मागायला आलो नव्हतो.' 'जोपर्यंत माझा पेरू परत देत नाहीस, तोपर्यंत मी डाव देणार नाही.' मला वाटत होते, न्याय माझ्या बाजूने आहे. शेवटी मी काहीतरी स्वार्थ धरूनच त्याला पेरू खाऊ घातला असणार. निःस्वार्थपणे कोण कुणाशी चांगले वागतो? भिक्षासुद्धा स्वार्थासाठीच घालतात. गयाने पेरू खाल्ला, मग त्याला माझ्याकडून डाव घेण्याचा काय अधिकार? लाच दिली की लोक खूनसुद्धा पचवून टाकतात; आणि हा माझा पेरू असाच फुकट पचवणार! पेरू पैशाला पाच या भावाचे होते — गयाच्या बापाच्याही नशिबी कधी आले नसतील असे. हा सरळसरळ अन्याय होता.
विटी-दांडू
गयाने मला आपल्याकडे ओढत म्हटले—माझा डाव देऊन जा, पेरू-बिरू मला काय ठाऊक न्हाई. माझ्या पाठीशी न्यायाचे बळ होते. तो अन्यायावर अडून बसला होता. मला हात सोडवून पळायचे होते. तो मला जाऊ देत नव्हता. मी शिवी दिली, त्याने त्याहून जहरी शिवी दिली, आणि नुसती शिवीच नाही, तर दोन-एक थपडाही लगावल्या. मी त्याला चावा घेतला. त्याने माझ्या पाठीत दांडू हाणला. मी रडू लागलो. माझ्या या अस्त्रापुढे गयाचे काही चालले नाही. तो पळाला. मी लगेच डोळे पुसले, दांडूचा मार विसरलो आणि हसत हसत घरी जाऊन पोहोचलो. मी ठाणेदाराचा मुलगा, एका हलक्या जातीच्या पोराकडून मार खाल्ला, हे मला त्या वेळीही अपमानास्पद वाटले; पण घरी कुणाकडे तक्रार केली नाही. ( २ ) त्याच सुमारास वडिलांची तिथून बदली झाली. नवे जग पाहायला मिळणार, या आनंदात मी असा फुलून गेलो, की सवंगड्यांपासून दुरावण्याचे मला मुळीच दुःख झाले नाही. वडील दुःखी होते. ही मोठ्या कमाईची जागा होती. अम्माही दुःखी होत्या; इथे सगळ्या वस्तू स्वस्त होत्या, आणि मोहल्ल्यातल्या बायकांशी घरोबा जमला होता. पण माझा आनंद गगनात मावत नव्हता. पोरांपुढे फुशारक्या मारत होतो — तिकडे अशी घरे थोडीच असतात! तिकडे अशी उंच उंच घरे आहेत, की थेट आभाळाला भिडली आहेत. तिथल्या इंग्रजी शाळेत एखाद्या मास्तराने पोरांना मारले, तर त्याला जेल होते. माझ्या मित्रांचे विस्फारलेले डोळे आणि थक्क चेहरे सांगत होते, की त्यांच्या नजरेत मी केवढा उंच चढलो आहे. खोट्याला खरे करून घेण्याची जी शक्ती मुलांमध्ये असते, ती आपण — खऱ्याला खोटे करून घेणारे — काय समजणार! त्या बिचाऱ्यांना माझा केवढा हेवा वाटत होता! जणू म्हणत होते—तू नशीबवान आहेस गड्या, जा; आम्हाला तर याच ओसाड गावात जगायचे आहे आणि मरायचेही.
विटी-दांडू
वीस वर्षे उलटली. मी इंजिनिअरची परीक्षा उत्तीर्ण झालो, आणि त्याच जिल्ह्याचा दौरा करीत करीत त्याच कसब्यात येऊन पोहोचलो आणि डाकबंगल्यात उतरलो. ती जागा पाहताच बालपणीच्या इतक्या गोड आठवणी मनात जाग्या झाल्या, की मी काठी उचलली आणि कसब्यात फेरफटका मारायला बाहेर पडलो. एखाद्या तहानलेल्या वाटसरूसारखे माझे डोळे बालपणीची ती खेळण्याची ठिकाणे पाहायला आसुसले होते; पण त्या ओळखीच्या नावाखेरीज तिथे दुसरे काहीच ओळखीचे उरले नव्हते. जिथे पडझड होती, तिथे पक्की घरे उभी होती. जिथे जुने वडाचे झाड होते, तिथे आता एक सुंदर बाग होती. त्या जागेचा कायापालट झाला होता. तिचे नाव आणि ठिकाण ठाऊक नसते, तर मी तिला ओळखूही शकलो नसतो. बालपणीच्या साठवलेल्या, अमर आठवणी हात पसरून आपल्या त्या जुन्या मित्रांच्या गळ्यात पडायला अधीर झाल्या होत्या; पण ते जगच बदलून गेले होते. वाटत होते, त्या धरणीला बिलगून रडावे आणि म्हणावे, तू मला विसरलीस! मला तर अजूनही तुझे तेच रूप पाहायचे आहे. अचानक एका मोकळ्या जागेत दोन-तीन पोरे विटी-दांडू खेळताना दिसली. क्षणभर मी स्वतःला पार विसरलो! विसरलो, की मी एक मोठा अधिकारी आहे, साहेबी थाटात, रुबाबाच्या आणि अधिकाराच्या आवरणात लपेटलेला. जवळ जाऊन एका पोराला विचारले—काय रे बाळ, इथे गया नावाचा कोणी माणूस राहतो का? एका पोराने विटी-दांडू गोळा करून बिचकलेल्या आवाजात विचारले—कोण गया! गया चांभार? मी सहज म्हटले—हां हां, तोच. गया नावाचा कोणी आहे ना, मग तोच असेल कदाचित. 'हो, आहे की.' 'जरा त्याला बोलावून आणशील?' पोरगा धावत गेला आणि क्षणार्धात एका पाच हात उंच, काळ्याकुट्ट दैत्याला बरोबर घेऊन येताना दिसला. मी दुरूनच ओळखले. वाटले, त्याच्याकडे धाव घ्यावी आणि त्याच्या गळ्यात पडावे; पण काहीतरी विचार करून थांबलो.
विटी-दांडू
म्हणालो—काय गया, मला ओळखलंस? गयाने वाकून सलाम केला—हो मालक, न ओळखायला काय झालं? आपलं समदं बरं चाललं व्हतं ना? 'अगदी मजेत. तू आपलं सांग.' 'डिप्टीसाहेबांचा मोतद्दार हाय.' 'मतई, मोहन, दुर्गा — हे सगळे कुठे आहेत? काही खबर?' 'मतई तर मेला; दुर्गा आन् मोहन दोघंबी टपालवाले झाले. आपण?' 'मी जिल्ह्याचा इंजिनिअर आहे.' 'सरकार पहिल्यापासनंच लई हुशार व्हते.' 'आता कधी विटी-दांडू खेळतोस?' गयाने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले—आता कुठला विटी-दांडू खेळणार सरकार, आता पोटापाण्याच्या धंद्यातून फुरसतच मिळत न्हाई. 'चल, आज आपण दोघे खेळू. तू पदव, मी धावेन. तुझा एक डाव माझ्यावर राहिला आहे. तो आज घेऊन टाक.' गया मोठ्या मुश्किलीने तयार झाला. तो पडला दोन पैशांचा मजूर, मी एक मोठा अधिकारी. आमचा आणि त्याचा कसला मेळ! बिचारा ओशाळला होता; पण मीही काही कमी ओशाळलो नव्हतो — गयाबरोबर खेळायला चाललो म्हणून नव्हे, तर लोक हा खेळ म्हणजे काहीतरी अजब प्रकार समजून त्याचा तमाशा करतील आणि चांगलीच गर्दी जमेल म्हणून. त्या गर्दीत तो आनंद कुठून उरणार? पण खेळल्याशिवाय तर राहवत नव्हते. शेवटी ठरले, की दोघांनी वस्तीपासून खूप दूर, एकांतात जाऊन खेळायचे. तिथे कोण बघायला बसलेले असणार! मजेत खेळू आणि बालपणीची ती मिठाई मनसोक्त चवीचवीने चाखू. मी गयाला घेऊन डाकबंगल्यावर आलो आणि मोटारीत बसून आम्ही दोघे मैदानाकडे निघालो. बरोबर एक कुऱ्हाड घेतली. मी गंभीर मुद्रा धारण केली होती; पण गयाला अजूनही ही थट्टाच वाटत होती. तरीही त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकतेची किंवा आनंदाची कुठलीच खूण नव्हती. आम्हा दोघांमध्ये जे अंतर पडले होते, त्याच विचारात तो बहुधा गढून गेला होता.
विटी-दांडू
मी विचारले—गया, कधी माझी आठवण यायची का तुला? खरं सांग. गया ओशाळून म्हणाला—मी आपली काय आठवण काढणार हुजूर, माझी काय लायकी! नशिबात आपल्याबरोबर काही दिवस खेळायचं लिहिलं व्हतं, न्हाईतर माझी काय गणती? मी जरा उदास होऊन म्हणालो—पण मला तर तुझी सारखी आठवण यायची. तो दांडू, जो तू उगारून हाणला होतास, आठवतो ना? गया पश्चात्तापाने म्हणाला—ते पोरपण व्हतं सरकार, त्याची आठवण नका करून देऊ. 'वा! ती तर माझ्या बालपणीची सर्वांत रसाळ आठवण आहे. तुझ्या त्या दांडूत जी लज्जत होती, ती आता ना मानसन्मानात सापडते, ना पैशात. त्यात असा काही गोडवा होता, की आजतागायत त्याच्या आठवणीने मन गोड होत असते.' एवढ्यात आम्ही वस्तीपासून सुमारे तीन मैल दूर आलो आहोत. चोहीकडे सामसूम आहे. पश्चिमेला कोसन् कोस भीमतालचे पाणी पसरले आहे — इथे येऊन आम्ही एके काळी कमळे तोडून नेत असू आणि त्यांचे झुमके करून कानांत घालत असू. ज्येष्ठातली संध्याकाळ केशरात न्हाऊन उतरते आहे. मी झटकन एका झाडावर चढलो आणि एक फांदी तोडून आणली. चटकन विटी-दांडू तयार झाला.
विटी-दांडू
खेळ सुरू झाला. मी गलीवर विटी ठेवून उडवली. विटी गयाच्या समोरून निघून गेली. मासा पकडावा तसा त्याने हात झेपावला. विटी त्याच्या मागे जाऊन पडली. हा तोच गया, ज्याच्या हातात विटी जणू आपोआप जाऊन बसायची! तो उजवीकडे असो की डावीकडे, विटी त्याच्या तळहातातच जाऊन पोहोचायची. जणू तो विट्यांवर वशीकरण घालायचा. नवी विटी, जुनी विटी, लहान विटी, मोठी विटी, टोकदार विटी, चपटी विटी — सगळ्या त्याला येऊन मिळायच्या. जणू त्याच्या हातात एखादे लोहचुंबक होते, जे विट्यांना खेचून घ्यायचे. पण आज विटीला त्याच्याविषयी ते प्रेम उरले नव्हते. मग मी नेटाने पदवायला लागलो. मी नाना तऱ्हेचे रडीचे डाव खेळत होतो. सरावाची उणीव बेइमानीने भरून काढत होतो. टोला हुकला तरी दांडू हातचा सोडत नव्हतो, वास्तविक शास्त्राप्रमाणे आता गयाची पाळी यायला हवी होती. विटीवर टोला अपुरा बसून ती जरा जवळच पडली, की मी झडप घालून ती स्वतःच उचलायचो आणि पुन्हा टोला मारायचो. गया हे सगळे नियमबाह्य प्रकार पाहत होता; पण काही बोलत नव्हता, जणू ते सारे नियम-कायदे तो विसरून गेला होता. त्याचा नेम किती अचूक असायचा! त्याच्या हातून सुटलेली विटी टण्कन दांडूवर जाऊन आदळायची. त्याच्या हातून सुटली, की दांडूवर आपटणे हे तिचे कामच होते; पण आज ती विटी दांडूला लागतच नाही. कधी उजवीकडे जाते, कधी डावीकडे, कधी पुढे, कधी मागे. अर्धा तास पदवल्यानंतर एकदा विटी दांडूला येऊन लागली. मी रडीचा डाव खेळलो — म्हणालो, विटी दांडूला लागली नाही, अगदी जवळून गेली; पण लागली नाही. गयाने कसलीही नाराजी दाखवली नाही. 'लागली नसंल.' 'दांडूला लागली असती, तर मी काय बेइमानी केली असती?'
विटी-दांडू
'छे भैया, तुम्ही कशाला बेइमानी कराल!' बालपणी काय बिशाद होती, की मी अशी लबाडी करून जिवंत सुटलो असतो! हाच गया मानगुटीवर बसला असता. पण आज मी त्याला किती सहज फसवत चाललो होतो. गाढव आहे! सगळं विसरून गेला. अचानक विटी पुन्हा दांडूला लागली, आणि इतक्या जोरात लागली, की जणू बंदुकीचा बार उडाला. या पुराव्यापुढे कसलाही रडीचा डाव खेळायचे धाडस मला या वेळीही झाले नाही; पण एकदा खऱ्याला खोटे ठरवायचा प्रयत्न का करू नये? माझे काय जाते? मानले तर वा वा, नाहीतर दोन-चार टोल्यांपुरते धावावे लागेल, इतकेच ना! अंधाराची सबब सांगून चटकन सुटका करून घेईन. मग कोण डाव द्यायला येतो! गया विजयाच्या उल्हासाने म्हणाला—लागली, लागली! टण्कन वाजली! मी काही न कळल्याचा आव आणत म्हणालो—तू लागताना पाहिलीस? मला तर दिसली नाही. 'टण्कन वाजली की सरकार!' 'आणि एखाद्या विटेच्या तुकड्यावर लागली असली तर!' त्या वेळी माझ्या तोंडून हे वाक्य कसे निघाले, याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटते. हे सत्य खोटे ठरवणे म्हणजे दिवसाला रात्र म्हणण्यासारखे होते. विटी दांडूवर जोरात आदळलेली आम्ही दोघांनीही पाहिली होती; पण गयाने माझे म्हणणे मान्य केले. 'हो, एखाद्या विटेवर लागली असंल. दांडूला लागली असती, तर इतका आवाज न्हाई आला असता.' मी पुन्हा पदवायला सुरुवात केली. पण एवढा उघडउघड रडीचा डाव खेळल्यावर मला गयाच्या भोळेपणाची दया येऊ लागली; म्हणून तिसऱ्यांदा विटी दांडूला लागली, तेव्हा मी मोठ्या उदारपणे डाव द्यायचे ठरवले. गया म्हणाला—आता अंधार झालाय भैया, उद्यावर ठेवा. मी विचार केला, उद्या भरपूर वेळ असेल, हा कोण जाणे किती वेळ पदवील; म्हणून आत्ताच हिशेब चुकता केलेला बरा.
विटी-दांडू
'नाही, नाही. अजून भरपूर उजेड आहे. तू आपला डाव घेऊन टाक.' 'विटी दिसायची न्हाई.' 'काही हरकत नाही.' गयाने पदवायला सुरुवात केली; पण आता त्याला मुळीच सराव राहिला नव्हता. त्याने दोनदा टोला मारायचा बेत केला, पण दोन्ही वेळा टोला हुकला. एका मिनिटाच्या आत त्याचा डाव संपला. बिचारा तासभर धावला; पण एका मिनिटातच आपला डाव गमावून बसला. मी आपल्या मनाच्या मोठेपणाचे दर्शन घडवले. 'आणखी एक डाव खेळून घे. तू तर पहिल्याच टोल्याला हुकलास.' 'नको भैया, आता अंधार झाला.' 'तुझा सराव सुटलाय. कधी खेळत नाहीस का?' 'खेळायला वेळ कुठं मिळतो भैया?' आम्ही दोघे मोटारीत जाऊन बसलो आणि दिवेलागणीला मुक्कामावर पोहोचलो. निघता निघता गया म्हणाला—उद्या इथं विटी-दांडू व्हणार हाय. समदे जुने खेळगडी खेळणार. तुम्हीपण याल? तुम्हाला सवड असंल, तवाच गड्यांना बोलवीन. मी संध्याकाळची वेळ दिली आणि दुसऱ्या दिवशी सामना पाहायला गेलो. दोन्ही बाजूंना सुमारे दहा-दहा गडी होते. त्यांपैकी काही जण माझे बालपणीचे सोबती निघाले. बहुतेक तरुण होते, ज्यांना मी ओळखू शकलो नाही. खेळ सुरू झाला. मी मोटारीत बसल्या बसल्या मौज पाहू लागलो. आज गयाचा खेळ, त्याचे ते कसब पाहून मी थक्क झालो. तो टोला मारी, तेव्हा विटी थेट आभाळाला भिडे. कालचा तो संकोच, ती चाचरणूक, तो निरुत्साह आज नव्हता. बालपणी जे होते, ते आज प्रौढ होऊन पक्के झाले होते. काल याने मला असे पदवले असते, तर मी नक्की रडू लागलो असतो. त्याच्या दांडूचा टोला खाऊन विटी पार दोनशे वार लांब जाऊन पडे.
विटी-दांडू
धावणाऱ्या बाजूतल्या एका तरुणाने थोडा रडीचा डाव खेळला. त्याच्या मते त्याने विटी झेलली होती. गयाचे म्हणणे होते—विटी जमिनीवर आपटून उडाली होती. यावरून दोघांत दंड थोपटण्याची वेळ आली. तरुण नमला. गयाचा लालबुंद झालेला चेहरा पाहून तो घाबरला. तो नमला नसता, तर नक्कीच हाणामारी झाली असती. मी खेळात नव्हतो; पण इतरांच्या या खेळात मला बालपणीचा तोच आनंद मिळत होता, जेव्हा आम्ही सारे काही विसरून खेळात दंग होऊन जात असू. आता मला कळले, की काल गया माझ्याबरोबर खेळला नाही, त्याने फक्त खेळण्याचे सोंग केले. त्याने मला दयेचे पात्र मानले. मी रडीचे डाव खेळलो, बेइमान्या केल्या; पण त्याला जराही राग आला नाही, कारण तो खेळत नव्हता, मला खेळवत होता, माझे मन राखत होता. मला पदवून माझा चोथा करायची त्याची इच्छा नव्हती. मी आता अधिकारी आहे. हे अधिकारपद माझ्या आणि त्याच्यामध्ये भिंत बनून उभे राहिले आहे. त्याच्याकडून आता मला भीड मिळू शकते, अदब मिळू शकते; सवंगडीपण मिळू शकत नाही. बालपण होते, तेव्हा मी त्याच्या बरोबरीचा होतो. आमच्यात कसलाही भेद नव्हता. हे पद मिळवून आता मी केवळ त्याच्या दयेला पात्र उरलो आहे. तो मला आपल्या तोडीचा मानत नाही. तो मोठा झाला आहे, मी लहान झालो आहे.