रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
अपरिचिता
आज माझं वय अवघं सत्तावीस. हे आयुष्य ना लांबीनं मोठं, ना गुणांनी. तरीही त्याला एक वेगळंच मोल आहे. ते त्या फुलासारखं आहे, ज्याच्या उरावर एकदा भ्रमर येऊन बसला होता, आणि त्या एका पावलाचा इतिहास त्याच्या आयुष्याच्या मधोमध फळासारखा धरून वाढला आहे. तो इतिहास आकारानं लहानसा आहे; लहानसाच लिहीन. लहानाला जे क्षुल्लक समजण्याची चूक करत नाहीत, त्यांना त्यातली गोडी कळेल. कॉलेजात जितक्या परीक्षा पास व्हायच्या, त्या सगळ्या मी उरकून टाकल्या आहेत. लहानपणी माझ्या देखण्या रूपावरून आमच्या पंडितजींनी मला काटेसावरीच्या फुलाची आणि इंद्रावणाच्या फळाची उपमा देऊन हिणवायची संधी साधली होती. तेव्हा त्याची फार लाज वाटायची; पण वय झाल्यावर मनात आलं, पुनर्जन्म असलाच तर माझ्या चेहऱ्यावर हेच रूप आणि पंडितजींसारख्यांच्या तोंडी हाच उपहास पुन्हा अगदी असाच उमटो. माझे वडील एके काळी गरीब होते. वकिली करून त्यांनी अमाप पैसा मिळवला, पण तो उपभोगायला त्यांना क्षणभरही उसंत मिळाली नाही. मरणानं त्यांनी जो सुटकेचा निःश्वास टाकला, तीच त्यांची पहिली फुरसत. तेव्हा मी लहान होतो. आईच्याच हाताखाली मी वाढलो. आई गरिबाघरची लेक; म्हणून आपण श्रीमंत आहोत हे ती स्वतःही विसरत नाही आणि मलाही विसरू देत नाही. लहानपणी मी बहुधा कडेवरून कडेवरच वाढलो, म्हणून शेवटपर्यंत माझं पुरं वय काही झालंच नाही. आजही मला पाहिलं तर वाटेल, मी अन्नपूर्णेच्या मांडीवरचा गजाननाचा धाकटा भाऊच आहे.
अपरिचिता
माझे खरे पालक म्हणजे माझे मामा. ते माझ्यापेक्षा फार फार तर सहा वर्षांनी मोठे. पण फल्गू नदीची वाळू जसं सगळं पाणी आपल्या पोटात दडवून ठेवते, तसा त्यांनी आमचा सगळा संसार आपल्या पोटात शोषून घेतला आहे. त्यांना खणल्याशिवाय इथं घोटभरही रस मिळायची सोय नाही. त्यामुळे कशाचीही म्हणून मला कसलीच चिंता करावी लागत नाही. कुठलाही मुलीचा बाप मान्य करेल की मी सत्पात्र आहे. तंबाखूसुद्धा ओढत नाही. सज्जन असण्यात काही कटकट नसते, म्हणून मी अगदी सज्जन आहे. आईची आज्ञा पाळून चालण्याची ताकद माझ्यात आहे — खरं तर, न पाळण्याची ताकदच माझ्यात नाही. अंतःपुराच्या हुकमतीखाली चालता यावं अशीच माझी जडणघडण झाली आहे; एखादी कन्या स्वयंवर मांडणार असेल तर तिनं हे सुलक्षण ध्यानात ठेवावं. मोठमोठ्या घरांतून माझ्यासाठी स्थळं आली होती. पण मामा — जे या पृथ्वीतलावर माझ्या भाग्यदेवतेचे मुख्य एजंट आहेत — त्यांचं लग्नाबद्दल एक खास मत होतं. श्रीमंताची मुलगी त्यांना पसंत नाही. आमच्या घरी जी मुलगी येईल तिनं मान खाली घालून यावं, असं त्यांना हवं. आणि तरीही पैशाचा लोभ त्यांच्याच हाडामांसात भिनलेला. त्यांना असा व्याही हवा, ज्याच्याकडे पैसा नाही, पण जो पैसा द्यायला कसूर करणार नाही; ज्याला पिळून काढता येईल, आणि घरी आला तर गुडगुडीऐवजी साध्या हुक्क्यातून तंबाखू दिली तरी ज्याची तक्रार चालणार नाही. माझा मित्र हरीश कानपूरला नोकरी करतो. तो सुट्टीवर कलकत्त्याला आला आणि माझं मन बेचैन करून गेला. तो म्हणाला, 'अरे, मुलगी म्हणशील तर एक झकास मुलगी आहे.'
अपरिचिता
थोड्याच दिवसांपूर्वी मी एम. ए. पास झालो होतो. समोर नजर पोचेल तिथवर सुट्टीचं ओसाड माळरान पसरलेलं; परीक्षा नाही, नोकरीसाठी उमेदवारी नाही, नोकरी नाही; स्वतःची इस्टेट पाहण्याची चिंता नाही, ते शिक्षण नाही, इच्छाही नाही — असलेच तर आत आई आणि बाहेर मामा. या फुरसतीच्या वाळवंटात माझं हृदय तेव्हा विश्वभर पसरलेल्या स्त्रीरूपाचं मृगजळ पाहत होतं — आकाशात तिची दृष्टी, वाऱ्यात तिचा श्वास, झाडांच्या सळसळीत तिचं गुपित. अशा वेळी हरीश येऊन म्हणाला, 'मुलगी म्हणशील तर—'. माझं तनमन वसंताच्या वाऱ्यात बकुळीच्या वनातल्या कोवळ्या पालवीसारखं थरथरत ऊनसावलीची वीण विणू लागलं. हरीश माणूस रसिक होता, रंगवून वर्णन करायची कला त्याच्याकडे होती, आणि माझं मन तहानलेलं होतं. मी हरीशला म्हणालो, 'एकदा मामांकडे विषय काढून तर बघ.' मैफल रंगवण्यात हरीशचा हात धरणारा कुणी नाही. म्हणून सगळीकडे त्याची खातिरदारी. मामाही तो भेटला की त्याला सोडत नाहीत. त्यांच्या बैठकीत विषय निघाला. मुलीपेक्षा मुलीच्या बापाची माहितीच त्यांना जास्त महत्त्वाची. बापाची परिस्थिती अगदी त्यांना हवी तशी. एके काळी यांच्या घराण्यात लक्ष्मीचा मंगलकलश भरलेला होता. आता तो रिकामाच म्हटला तरी चालेल, पण तळाशी अजून थोडंफार उरलं आहे. गावी घराण्याची प्रतिष्ठा राखून राहणं सोपं नाही, म्हणून हे गृहस्थ पश्चिमेकडे जाऊन राहिले आहेत. तिथं एखाद्या गरीब गृहस्थासारखेच राहतात. एका मुलीशिवाय त्यांना दुसरं कुणी नाही. तेव्हा तिच्यासाठी लक्ष्मीचा कलश पुरता पालथा करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत.
अपरिचिता
हे सगळं छानच. पण मुलीचं वय पंधरा, हे ऐकून मामांचं मन जड झालं. घराण्यात काही दोष तर नाही ना? नाही, दोष नाही — बापाला आपल्या मुलीला शोभेल असा वर कुठेच सापडत नाही. एक तर नवऱ्यांचा बाजार महाग, त्यात हुंडा म्हणजे धनुष्यभंगाचा पण; म्हणून बाप नुसता धीर धरून आहे — पण मुलीचं वय काही धीर धरत नाही. काहीही असो, हरीशच्या रसाळ जिभेत गुण आहे. मामांचं मन मऊ झालं. लग्नाची प्रस्तावना निर्विघ्नपणे पार पडली. कलकत्त्याबाहेर जे उरलेलं जग आहे ते सगळं अंदमान बेटांतच मोडतं, अशी मामांची समजूत. आयुष्यात एकदा, खास कामासाठी, ते कोन्नगरपर्यंत गेले होते. मामा जर मनू असते तर त्यांनी आपल्या स्मृतीत हावड्याचा पूल ओलांडायला सरळ बंदीच घातली असती. माझ्या मनात इच्छा होती, स्वतःच्या डोळ्यांनी मुलगी पाहून यावी. पण धीर करून तसं सुचवू शकलो नाही. मुलीला आशीर्वाद द्यायला ज्यांना पाठवलं ते आमचे विनूदादा, माझे आत्येभाऊ. त्यांच्या आवडीनिवडीवर आणि जाणकारीवर मी सोळा आणे विसंबू शकतो. विनूदा परत आले आणि म्हणाले, 'वाईट नाही हं! अस्सल सोनं आहे!' विनूदादांची भाषा अतिशय काटकसरीची. जिथं आपण 'अप्रतिम' म्हणतो, तिथं ते 'चालण्याजोगी' म्हणतात. तेव्हा मी ओळखलं, माझ्या भाग्यात विवाहदेव प्रजापती आणि पंचशर मदन यांचं काही वाकडं नाही. २ लग्नासाठी मुलीकडच्यांनाच कलकत्त्याला यावं लागलं, हे सांगायला नकोच. मुलीचे वडील शंभुनाथबाबू हरीशवर किती विश्वास ठेवतात याचा पुरावा हा, की लग्नाच्या तीन दिवस आधी त्यांनी मला पहिल्यांदा डोळ्यांनी पाहिलं आणि आशीर्वाद देऊन गेले. त्यांचं वय चाळिशीच्या थोडं अलीकडे किंवा पलीकडे. केस काळे, मिशीत नुकतीच कुठे पांढरी झाक येऊ लागलेली. देखणे होते खरे. गर्दीत पाहिलं तर सगळ्यांच्या आधी त्यांच्यावरच नजर जावी असं रूप.
अपरिचिता
मला पाहून ते खूश झाले असावेत, अशी आशा आहे. सांगणं कठीण, कारण ते फारच मितभाषी. जे एखाद-दुसरे शब्द बोलतात, ते जणू पूर्ण जोर देऊन बोलतात. मामांचं तोंड तेव्हा भरधाव सुटलं होतं — पैशात आणि मानात आमचं स्थान शहरातल्या कुणापेक्षाही कमी नाही, हेच ते निरनिराळ्या निमित्तानं ऐकवत होते. शंभुनाथबाबूंनी या बोलण्यात भागच घेतला नाही — कुठल्याही फटीत एखादा 'हूं' किंवा 'हां'सुद्धा ऐकू आला नाही. मी असतो तर खचून गेलो असतो, पण मामांना खचवणं कठीण. शंभुनाथबाबूंचा गप्प स्वभाव पाहून त्यांना वाटलं, माणूस अगदीच निर्जीव आहे, अंगात तेज म्हणून नाही. व्याही-मंडळींत आणखी काहीही असो, तेज असणं हा दोषच; तेव्हा मामा मनोमन खूश झाले. शंभुनाथबाबू उठले तेव्हा मामांनी वरच्या मजल्यावरूनच त्यांना थोडक्यात निरोप दिला; गाडीत बसवून द्यायला खाली गेले नाहीत. हुंड्याबद्दल दोन्ही पक्षांत पक्की बोलणी ठरली होती. आपण असामान्य चतुर आहोत याचा मामांना मोठा अभिमान. बोलण्यात त्यांनी कुठेच फट ठेवली नव्हती. रकमेचा आकडा तर ठरलाच होता; शिवाय दागिने किती तोळ्यांचे आणि सोनं कोणत्या भावाचं, हेही अगदी पक्कं बांधून झालं होतं. मी स्वतः या कुठल्याच बोलण्यात नव्हतो; देणंघेणं काय ठरलं ते मला ठाऊक नव्हतं. मनात एवढं जाणून होतो, की हा स्थूल भागही लग्नाचा एक मुख्य भाग आहे, आणि त्या भागाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते एका कवडीनंही फसणार नाहीत. खरं तर, विलक्षण मुरब्बी माणूस म्हणून मामा हे आमच्या साऱ्या संसाराच्या अभिमानाचा मुख्य विषय आहेत. जिथं जिथं आमचा काही संबंध येतो, तिथं तिथं बुद्धीच्या लढाईत तेच जिंकणार, हे अगदी ठरलेलं. म्हणून आम्हाला कशाची ददात नसली आणि समोरच्या पक्षाची ददात कितीही बिकट असली, तरी जिंकायचंच, हा आमच्या संसाराचा हट्ट — मग त्यात कुणी जगो की मरो.
अपरिचिता
हळदीचा सोहळा भलताच धुमधडाक्यात झाला. हळदीचं सामान घेऊन जाणारे वाहक इतके गेले, की त्यांची शिरगणती करायची तर कारकून ठेवावा लागला असता. त्यांना बिदागी देऊन परत पाठवताना समोरच्या पक्षाची कशी त्रेधा उडेल, हे आठवून आई मामांच्या सुरात सूर मिसळून भरपूर हसली. बँड, बासरी, हौशी कॉन्सर्ट — जिथं जितक्या प्रकारचे मोठे आवाज होते ते सगळे एकत्र मिसळून, रानटी गोंगाटाच्या मस्तवाल हत्तीकडून संगीतसरस्वतीचं कमळवन तुडवत-चिरडत, मी एकदाचा लग्नघरी जाऊन पोचलो. अंगठ्या, हार, जरी-जवाहिरांनी मढलेलं माझं अंग पाहून वाटत होतं, जणू दागिन्यांचं एखादं दुकानच लिलावाला निघालं आहे. त्यांच्या होणाऱ्या जावयाची किंमत किती, ते जणू थोडंफार सर्वांगावर स्पष्ट लिहून घेऊन मी होणाऱ्या सासऱ्यांशी सामना करायला निघालो होतो. लग्नघरात शिरल्यावर मामा खूश झाले नाहीत. एक तर अंगणात वऱ्हाड्यांना जागाच पुरत नव्हती, त्यात सगळी तयारी अगदी मध्यम प्रकारची. त्यावर शंभुनाथबाबूंचं वागणंही अगदी थंड. त्यांच्या नम्रतेला भरती नव्हती. तोंडात तर शब्दच नाही. कमरेला उपरणं बांधलेले, घसा बसलेला, टक्कल पडलेले, कुळकुळीत काळे आणि धिप्पाड देहाचे त्यांचे एक वकील मित्र जर सतत हात जोडून, मान लववून, नम्र स्मितहास्यानं आणि गद्गद वचनांनी कॉन्सर्ट-पार्टीच्या टाळकऱ्यापासून ते वरपक्षाच्या कर्त्या मंडळींपर्यंत प्रत्येकाला पुन्हा पुन्हा भरभरून न्हाऊ घालत राहिले नसते, तर सुरुवातीलाच काय तो सोक्षमोक्ष लागला असता. मी मांडवात बसल्यावर थोड्याच वेळात मामा शंभुनाथबाबूंना शेजारच्या खोलीत बोलावून घेऊन गेले. काय बोलणं झालं ठाऊक नाही; थोड्या वेळानं शंभुनाथबाबू मला येऊन म्हणाले, 'जावईबापू, जरा इकडे यावं लागेल.'
अपरिचिता
भानगड अशी होती. — सगळ्यांच्या नसलं तरी काही काही माणसांच्या आयुष्याला एखादं ध्येय असतं. मामांचं एकमेव ध्येय होतं — काही झालं तरी कुणाकडूनही फसायचं नाही. त्यांना भीती होती, आपले व्याही आपल्याला दागिन्यांत चकवतील — आणि लग्नविधी एकदा पार पडला की त्या चकव्यावर काही इलाज उरणार नाही. घरभाडं, भेटवस्तू, लोकांची बिदागी यांत जी ओढाताण दिसून आली होती, तिच्यावरून मामांनी ठरवलं होतं — देण्याघेण्याच्या बाबतीत या माणसाच्या नुसत्या तोंडच्या शब्दावर विसंबून चालणार नाही. म्हणून त्यांनी घरच्या सोनारालासुद्धा बरोबर आणलं होतं. शेजारच्या खोलीत जाऊन पाहतो तो मामा एका पलंगावर आणि सोनार आपला तराजू, कसोटीचा दगड वगैरे घेऊन जमिनीवर बसलेला. शंभुनाथबाबू मला म्हणाले, 'तुझे मामा म्हणतात, लग्नविधी सुरू होण्याआधी ते नवरीचे सगळे दागिने पारखून बघणार. यावर तुझं काय म्हणणं?' मी मान खाली घालून गप्प राहिलो. मामा म्हणाले, 'तो काय म्हणणार? मी म्हणेन तेच होईल.' शंभुनाथबाबू माझ्याकडे पाहून म्हणाले, 'म्हणजे हेच ठरलं तर? हे म्हणतील तेच होईल? याबाबत तुला काहीच म्हणायचं नाही?' मी किंचित मान हलवून खुणेनं कळवलं, या असल्या गोष्टींत बोलायचा मला मुळीच अधिकार नाही. 'ठीक आहे, मग बस. मुलीच्या अंगावरचे सगळे दागिने काढून आणतो.' असं म्हणून ते उठले. मामा म्हणाले, 'अनुपम इथं बसून काय करणार? तो मांडवात जाऊन बसू दे.' शंभुनाथ म्हणाले, 'नाही, मांडवात नाही, इथंच बसायचं.' थोड्या वेळानं ते एका पंचात बांधलेले दागिने घेऊन आले आणि पलंगावर पसरून ठेवले. सगळे त्यांच्या आज्या-पणज्यांच्या काळातले — हल्लीच्या फॅशनचं बारीक काम नव्हे — जितके जाड तितकेच जड.
अपरिचिता
सोनारानं दागिने हातात घेतले आणि म्हणाला, 'यात आता बघायचं ते काय? यात हीण नाही — असं सोनं आजकाल वापरतच नाहीत.' असं म्हणून त्यानं एका जाडजूड मकरमुखी कड्यावर जरासा दाब देऊन दाखवलं — ते वाकतं. मामांनी लगेच आपल्या वहीत दागिन्यांची यादी टिपून घेतली, न जाणो दाखवलेल्यांपैकी एखादा कमी भरला तर. हिशोब करून पाहिलं तर ठरल्यापेक्षा हे दागिने संख्येत, दरात आणि वजनात कितीतरी जास्त होते. दागिन्यांमध्ये इअररिंगची एक जोडी होती. शंभुनाथांनी ती सोनाराच्या हातात देऊन म्हटलं, 'ही जरा पारखून बघ.' सोनार म्हणाला, 'हा विलायती माल आहे, यात सोनं नावालाच आहे.' शंभुबाबूंनी ती इअररिंगची जोडी मामांच्या हातात दिली आणि म्हणाले, 'ही आपणच ठेवून घ्या.' मामांनी ती हातात घेऊन पाहिलं — हीच इअररिंगची जोडी देऊन त्यांनी मुलीला आशीर्वाद दिला होता. मामांचा चेहरा लालबुंद झाला. दरिद्री माणूस आपल्याला फसवायला बघेल, पण आपण फसणार नाही — या आनंदाच्या उपभोगाला ते मुकले, आणि वर आणखी थोडी वरकमाईही पदरात पडली. तोंड अगदी फुगवून ते म्हणाले, 'अनुपम, जा, तू मांडवात जाऊन बस.' शंभुनाथबाबू म्हणाले, 'नाही, आता मांडवात बसायचं नाही. चला, आधी आपणा सर्वांना जेवू घालतो.' मामा म्हणाले, 'हे काय भलतंच? मुहूर्त—' शंभुनाथबाबू म्हणाले, 'त्याची काही काळजी करू नका — आता उठा.' माणूस अगदी साध्या भल्या स्वभावाचा, पण आतून चांगलाच कणखर आहे, असं वाटलं. मामांना उठावं लागलं. वऱ्हाड्यांची जेवणंही झाली. थाटमाट नव्हता. पण स्वयंपाक चांगला आणि सगळं अगदी स्वच्छ, नीटनेटकं, म्हणून सगळेच तृप्त झाले. वऱ्हाड्यांची जेवणं आटोपल्यावर शंभुनाथबाबूंनी मला जेवायला सांगितलं. मामा म्हणाले, 'हे काय भलतंच? लग्नाआधी नवरदेव जेवेल कसा?'
अपरिचिता
या बाबतीत मामांनी काय मत मांडलं त्याकडे पुरतं दुर्लक्ष करून ते माझ्याकडे पाहून म्हणाले, 'तुझं काय म्हणणं? जेवायला बसलास तर काही दोष आहे का?' मामा म्हणजे साक्षात मातृआज्ञाच मूर्तिमंत होऊन समोर हजर; त्यांच्याविरुद्ध जाणं मला अशक्य. मी जेवायला बसू शकलो नाही. तेव्हा शंभुनाथबाबू मामांना म्हणाले, 'आपल्याला बराच त्रास दिला. आम्ही श्रीमंत नाही, आपल्याला शोभेल अशी तयारी करू शकलो नाही, क्षमा करा. रात्र झाली आहे, आपला त्रास आणखी वाढवायची इच्छा नाही. तर मग आता—' मामा म्हणाले, 'हो, चला मांडवात, आम्ही तर तयारच आहोत.' शंभुनाथ म्हणाले, 'मग आपल्या गाड्या बोलावून देऊ?' मामा आश्चर्यानं म्हणाले, 'थट्टा करताय की काय?' शंभुनाथ म्हणाले, 'थट्टा तर आपणच करून मोकळे झालात. हे थट्टेचं नातं कायमचं जोडायची माझी इच्छा नाही.' मामा डोळे एवढे मोठे करून थक्क होऊन बघत राहिले. शंभुनाथ म्हणाले, 'माझ्या मुलीचे दागिने मीच चोरीन, असं जे समजतात त्यांच्या हाती मी माझी मुलगी देऊ शकत नाही.' मला एक शब्द सांगण्याचीही त्यांना गरज वाटली नाही. कारण, सिद्धच झालं होतं, की मी कुणीच नाही. त्यानंतर जे झालं ते सांगायची माझी इच्छा नाही. झुंबरं फोडून-तोडून, सामानाची नासधूस करून, वऱ्हाड्यांचा जथा दक्षयज्ञाचा प्रयोग आटोपून बाहेर पडला. घरी परतताना बँड, सनई-चौघडा आणि कॉन्सर्ट एकसाथ वाजले नाहीत, आणि अभ्रकाची झुंबरं आपल्या कर्तव्याची जबाबदारी आकाशातल्या ताऱ्यांवर सोपवून कुठे महानिर्वाणाला पोचली, त्याचा पत्ताच लागला नाही. ३ घरातले सगळे तर संतापून लाल. मुलीच्या बापाला एवढा ताठा! कलियुग अगदी पुरतं भरलं म्हणायचं! सगळे म्हणाले, 'बघूच आता, मुलीचं लग्न कसं करतात ते.' पण मुलीचं लग्न होणार नाही अशी भीतीच ज्याच्या मनात नाही, त्याला शासन तरी कसं करायचं?
अपरिचिता
सगळ्या बंगालमध्ये, ज्याला मुलीच्या बापानं स्वतः लग्नाच्या मांडवातून परत पाठवलं, असा पुरुष मी एकटाच. एवढ्या मोठ्या सत्पात्राच्या कपाळावर एवढा मोठा कलंकाचा डाग कुठल्या दुष्ट ग्रहानं इतके दिवे लावून, वाजंत्री वाजवून, थाटामाटात रेखला? वऱ्हाडी कपाळ बडवून म्हणू लागले, 'लग्न तर झालं नाहीच, वर आम्हाला चकवून जेवूही घातलं — ते पोटच त्या अन्नासकट तिथं ओढून फेकून येता आलं असतं, तरच हळहळ मिटली असती.' 'लग्नाचा करारभंग आणि अब्रुनुकसानीचा दावा ठोकतो,' म्हणत मामा मोठा गवगवा करत फिरू लागले. हितचिंतकांनी समजावलं, तसं केलं तर तमाशाचा जो काही भाग उरलाय, तोही पुरा होईल. मीही खूप चिडलो होतो, हे सांगायला नकोच. कुठल्या तरी पेचात सापडून शंभुनाथ पुरते जेरीला यावेत आणि आमच्या पायांवर येऊन पडावेत — ओठांवरच्या मिसरुडाला पीळ देत देत मी एवढीच कामना करत राहिलो. पण या संतापाच्या काळ्या प्रवाहाशेजारून आणखी एक प्रवाह वाहत होता, ज्याचा रंग मुळीच काळा नव्हता. माझं सगळं मन त्या अपरिचितेकडे धावलं होतं — अजूनही त्याला मी कसंच परत ओढू शकत नाही. ती त्या चिमुकल्या भिंतीआडच राहून गेली हो! तिच्या कपाळावर चंदनाची नक्षी, अंगावर लाल साडी, चेहऱ्यावर लज्जेची लाली, आणि हृदयात काय होतं, ते कसं सांगू? माझ्या कल्पनालोकातली ती कल्पलता वसंताच्या सगळ्या फुलांचा भार मला अर्पण करण्यासाठी वाकली होती. वारा येतो, सुगंध येतो, पानांची सळसळ ऐकू येते — फक्त आणखी एक पाऊल टाकायचं उरलं होतं — आणि तेवढ्यात त्या एका पावलाचं अंतर एका क्षणात अनंत होऊन गेलं!
अपरिचिता
इतके दिवस रोज संध्याकाळी मी विनूदादांच्या घरी जाऊन त्यांना हैराण करून सोडलं होतं! विनूदांची वर्णनाची भाषा अतिशय तोकडी, म्हणूनच त्यांचा प्रत्येक शब्द ठिणगीसारखा माझ्या मनात आग लावून गेला होता. एवढं कळलं होतं, की मुलगी विलक्षण रूपवान आहे; पण ना तिला डोळ्यांनी पाहिलं, ना तिचा फोटो पाहिला; सगळंच अस्पष्ट राहिलं. बाहेर तर ती हाती लागलीच नाही, मनातही तिला आणता आलं नाही — म्हणून माझं मन त्या दिवशीच्या त्या लग्नमांडवाच्या भिंतीबाहेर भुतासारखं उसासे टाकत भटकत राहिलं. हरीशकडून ऐकलं, मुलीला माझा फोटो दाखवला होता. पसंत केला असणारच. न करायला काही कारणच नाही. माझं मन म्हणतं, तो फोटो तिच्या कुठल्यातरी पेटीत लपवून ठेवलेला आहे. एकट्या खोलीत दार लावून, कधी कधी निवांत दुपारी, ती तो उघडून पाहत नसेल का? वाकून पाहताना चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी तिचे मोकळे केस त्या फोटोवर रुळत नसतील का? अचानक बाहेर कुणाची पावलं वाजली, तर ती घाईघाईनं तो फोटो आपल्या सुगंधी पदराआड लपवत नसेल का? दिवस जातात. एक वर्ष गेलं. मामा तर लाजेनं लग्नाचा विषयसुद्धा काढू शकत नाहीत. आईची इच्छा होती, माझ्या अपमानाची गोष्ट समाजातले लोक विसरून जातील तेव्हा लग्नाचा प्रयत्न करून पाहावा. इकडे माझ्या कानावर आलं, त्या मुलीला म्हणे चांगलं स्थळ चालून आलं होतं, पण तिनं पण केला आहे की लग्नच करणार नाही. हे ऐकून माझं मन पुलकित आवेगानं भरून गेलं. मी कल्पनेत पाहू लागलो — ती नीट जेवत नाही; संध्याकाळ होते, तिला केस बांधायचंही भान राहत नाही. तिचे वडील तिच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि विचार करतात, माझी मुलगी दिवसेंदिवस अशी का होत चालली आहे? एके दिवशी अचानक तिच्या खोलीत येऊन पाहतात तो मुलीचे दोन्ही डोळे पाण्यानं भरलेले. विचारतात, 'बाळ, तुला काय झालंय, सांग बघू मला.'
अपरिचिता
मुलगी घाईनं डोळे पुसून म्हणते, 'कुठे, काहीच तर झालं नाही बाबा.' बापाची एकुलती एक मुलगी — फार लाडाची मुलगी. अवर्षणाच्या दिवसांत फुलाची कळी कोमेजावी, तशी मुलगी अगदी उदास होऊन गेली, तेव्हा बापाच्या जिवाला ते सोसवेना. मग मानापमान सगळा बाजूला सारून ते धावत आले आमच्या दारी. मग? मग मनात वाहणारी ती काळ्या रंगाची धार जणू काळ्या सापाचं रूप घेऊन फूत्कार टाकत उठली. ती म्हणाली, ठीक आहे, पुन्हा एकदा लग्नाचा मांडव सजू दे, दिवे लागू दे, देशोदेशीच्या लोकांना आमंत्रणं जाऊ दे, आणि मग तू नवरदेवाचं बाशिंग पायदळी तुडवून सगळ्या लवाजम्यासह मांडव सोडून निघून ये. पण जी धार अश्रूंसारखी शुभ्र होती, ती राजहंसाचं रूप घेऊन म्हणाली, 'एकदा जसा मी दमयंतीच्या पुष्पवनात गेलो होतो, तसं मला एकदा उडून जाऊ दे — त्या विरहिणीच्या कानात एकदा सुखाची बातमी सांगून येतो.' मग? मग दुःखाची रात्र सरली, नव्या पावसाचं पाणी पडलं, कोमेजलेल्या फुलानं मान वर केली — आणि या वेळी त्या भिंतीच्या बाहेर उरलं साऱ्या जगातलं बाकी सगळं, आणि आत शिरला एकटाच एक माणूस. मग? मग माझी कहाणी सुफळ संपूर्ण! ४ पण कहाणी अशी संपली नाही. जिथं येऊन ती कधीही न संपणारी झाली, तिथलं थोडंसं वर्णन करून हे लिहिणं संपवतो. आईला घेऊन तीर्थयात्रेला निघालो होतो. जबाबदारी माझ्यावरच होती, कारण मामांनी या वेळीही हावड्याचा पूल ओलांडला नाही. आगगाडीत झोपलो होतो. धक्के खात खात डोक्यात नाना तऱ्हेच्या अस्ताव्यस्त स्वप्नांचा खुळखुळा वाजत होता. अचानक कुठल्याशा स्टेशनवर जाग आली. उजेड आणि अंधार मिसळलेलं, तेही एक स्वप्नच. फक्त आकाशातले तारे चिरपरिचित — बाकी सगळं अनोळखी, अस्पष्ट; स्टेशनवरचे मोजके दिवे ताठ उभे राहून, उजेड धरून, हे जग किती अनोळखी आहे आणि आजूबाजूचं सगळं किती दूर दूर आहे, तेच दाखवत होते.
अपरिचिता
डब्यात आई झोपली होती; दिव्याखाली हिरवा पडदा ओढलेला; ट्रंका, पेट्या, सामानसुमान सगळं एकमेकांच्या अंगावर अस्ताव्यस्त पडलेलं — जणू स्वप्नलोकातलं उलटंपालटं सामान — हिरव्या संधिप्रकाशाच्या मिणमिणत्या उजेडात असणं आणि नसणं यांच्या मधोमध कसंसंच होऊन पडलेलं. अशा वेळी त्या अद्भुत जगातल्या अद्भुत रात्री कुणीतरी म्हणालं, 'लवकर ये, या डब्यात जागा आहे.' वाटलं, जणू गाणं ऐकलं. बंगाली मुलीच्या गळ्यातले बंगाली शब्द किती गोड असतात, ते असं अवेळी, अनोळख्या ठिकाणी अचानक ऐकलं तरच पुरतं कळतं. पण या आवाजाला केवळ मुलीचा आवाज म्हणून एखाद्या वर्गात टाकून मोकळं होता येत नाही; हा केवळ एका माणसाचा आवाज; ऐकताच मन म्हणतं, 'असा आवाज तर कधी ऐकला नव्हता.' आवाज मला नेहमीच फार खरा वाटत आला आहे. रूप ही काही कमी गोष्ट नाही, पण माणसात जे अंतरतम आणि अनिर्वचनीय असतं, कंठस्वर हा जणू त्याचंच रूप आहे, असं मला वाटतं. मी घाईनं डब्याची खिडकी उघडून बाहेर तोंड काढलं; काहीच दिसलं नाही. फलाटाच्या अंधारात उभ्या गार्डानं आपला एकडोळा कंदील हलवला, गाडी सुटली; मी खिडकीजवळ बसून राहिलो. डोळ्यांसमोर कोणतीही मूर्ती नव्हती, पण हृदयात मी एका हृदयाचं रूप पाहू लागलो. ते जणू या तारकांनी भरलेल्या रात्रीसारखं — आपल्याला वेढून घेतं, पण त्याला धरता येत नाही. हे स्वरा, अनोळखी कंठातल्या स्वरा, एका निमिषात तू माझ्या चिरपरिचयाच्या आसनावर येऊन बसलास. किती विलक्षण परिपूर्ण आहेस तू — चंचल काळाच्या खवळलेल्या हृदयावर फुलासारखा उमललास, आणि तरी त्याच्या लाटांच्या धक्क्यानं तुझी एक पाकळीही ढळली नाही, त्या अपार कोमलतेवर इवलासाही डाग पडला नाही.
अपरिचिता
गाडी लोखंडी मृदंगावर ताल धरत धावत होती; मी मनात गाणं ऐकत ऐकत चाललो होतो. त्या गाण्याचं एकच ध्रुवपद — 'डब्यात जागा आहे.' आहे का, जागा आहे का? जागा तर मिळत नाही, कुणी कुणाला ओळखत नाही. आणि तरीही ती न-ओळख म्हणजे निव्वळ धुकं, ती माया; ती फाटली की ओळखीला अंतच नाही. हे सुधामय स्वरा, ज्या हृदयाचं अपूर्व रूप तू आहेस, ते काय माझ्या चिरकाळच्या ओळखीचं नाही? जागा आहे, आहे — लवकर ये म्हणून तू हाक दिलीस, मी लवकरच आलो, एक निमिषही उशीर केला नाही. रात्री नीट झोप लागली नाही. जवळजवळ प्रत्येक स्टेशनवर एकदा तरी तोंड बाहेर काढून पाहिलं; भीती वाटत होती, जिला पाहायचं राहून गेलं ती रात्रीच उतरून जाईल की काय. दुसऱ्या दिवशी सकाळी एका मोठ्या स्टेशनवर गाडी बदलायची होती. आमची फर्स्ट क्लासची तिकिटं — मनात आशा होती, गर्दी नसेल. उतरून पाहतो तो फलाटावर साहेबांच्या अर्दलींचे जथे सामान घेऊन गाडीची वाट पाहत उभे. कुठल्याशा फौजेचे एक बडे जनरलसाहेब दौऱ्यावर निघाले होते. दोन-तीन मिनिटांतच गाडी आली. कळलं, फर्स्ट क्लासची आशा सोडावी लागणार. आईला घेऊन कोणत्या डब्यात चढावं, या मोठ्या विवंचनेत पडलो. सगळे डबे गच्च भरलेले. दारोदार डोकावत फिरू लागलो. तेवढ्यात सेकंड क्लासच्या डब्यातून एक मुलगी माझ्या आईला उद्देशून म्हणाली, 'आपण आमच्या डब्यात या ना — इथं जागा आहे.' मी तर दचकलोच. तोच विलक्षण मधुर कंठ, आणि त्याच गाण्याचं ध्रुवपद — 'जागा आहे.' क्षणाचाही विलंब न लावता आईला घेऊन डब्यात चढलो. सामान चढवायला जेमतेमही वेळ नव्हता. माझ्यासारखा नाकर्ता या दुनियेत नाही. त्या मुलीनंच हमालांच्या हातून आमचं अंथरूण-पांघरूण घाईघाईनं चालत्या गाडीत ओढून घेतलं. माझा फोटो काढायचा कॅमेरा स्टेशनवरच राहिला — मी पर्वासुद्धा केली नाही.
अपरिचिता
त्यानंतर — काय लिहू ते कळत नाही. माझ्या मनात एका अखंड आनंदाचं चित्र आहे — त्याची सुरुवात कुठून करू, शेवट कुठे करू? बसून बसून वाक्यामागून वाक्य जुळवत बसायची इच्छा होत नाही. या वेळी तो स्वर डोळ्यांनी पाहिला; तेव्हाही तो स्वरच वाटला. आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं; तिची पापणीसुद्धा लवत नव्हती. मुलीचं वय सोळा-सतरा असेल, पण नव्या तारुण्यानं तिच्या देहावर किंवा मनावर कुठेही जराही भार टाकलेला नव्हता. तिची हालचाल सहज, तेज निर्मळ, सौंदर्याची शुचिता अपूर्व; तिच्यात कुठेही कसलाही जडपणा नव्हता. मला दिसतंय, सविस्तर काही सांगणं मला अशक्य आहे. इतकंच काय, तिनं कोणत्या रंगाचं वस्त्र कसं नेसलं होतं, तेही मी नक्की सांगू शकणार नाही. एवढं मात्र अगदी खरं, की तिच्या वेशभूषेत तिला ओलांडून खास नजरेत भरेल असं काहीच नव्हतं. ती आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांहून अधिक होती — निशिगंधाच्या शुभ्र तुऱ्यासारखी, सरळ देठावर उभी राहून, ज्या झाडावर उमलली त्या झाडालाच पुरती ओलांडून वर आलेली. तिच्याबरोबर दोन-तीन लहान लहान मुली होत्या; त्यांच्याशी तिचं हसणं-बोलणं संपतच नव्हतं. मी हातात एक पुस्तक घेऊन तिकडे कान लावून बसलो होतो. जे काही कानावर येत होतं ते सगळं लहानग्यांशी चाललेलं लहानग्यांचंच बोलणं. त्याचं वैशिष्ट्य असं, की त्यात वयाचं अंतर जराही नव्हतं — छोट्यांबरोबर ती सहज आणि आनंदानं छोटी होऊन गेली होती. बरोबर चित्रांची मुलांच्या गोष्टींची काही पुस्तकं होती — त्यांतलीच कुठलीतरी एक खास गोष्ट सांगण्यासाठी मुलींनी तिच्यामागे लकडा लावला. ही गोष्ट त्यांनी नक्कीच वीस-पंचवीस वेळा ऐकलेली असणार. मुलींना एवढी ओढ का, ते मला कळलं. त्या सुधाकंठाच्या सोन्याच्या कांडीचा स्पर्श होताच प्रत्येक शब्द सोनं होऊन उठतो.
अपरिचिता
त्या मुलीचं सगळं शरीर-मन प्राणानं अगदी भरून गेलेलं; तिच्या चालण्या-बोलण्यातून, स्पर्शातून प्राण उसळून येतो. म्हणून मुली तिच्या तोंडून गोष्ट ऐकतात तेव्हा गोष्ट नव्हे, तिलाच ऐकतात; त्यांच्या हृदयावर प्राणाचा झरा झरझरत पडतो. तिच्या त्या उजळलेल्या प्राणानं त्या दिवशीची माझी सगळी सूर्यकिरणं सजीव करून टाकली; मला वाटलं, ज्या निसर्गानं आपल्या आकाशानं मला वेढलं आहे, तो त्या तरुणीच्याच अथक, अम्लान प्राणाचा विश्वव्यापी विस्तार आहे. — पुढच्या स्टेशनवर पोचताच तिनं खाऊवाल्याला बोलावून चांगले भरपूर चणे-फुटाणे विकत घेतले, आणि मुलींबरोबर अगदी लहान मुलासारखी खळखळून हसत हसत बिनदिक्कत खाऊ लागली. माझा स्वभाव जाळीच्या कुंपणानं वेढलेला — मी का बरं अगदी सहज, हसतमुखानं त्या मुलीकडून मूठभर चणे मागून घेऊ शकलो नाही? हात पुढे करून का माझा लोभ कबूल केला नाही? आईचं मन आवडणं आणि खटकणं यांच्यामध्ये द्विधा झालं होतं. डब्यात मी पुरुषमाणूस असूनही हिला कसलाही संकोच नाही, त्यातही अशी हावरटासारखी खाते आहे, हे आईला फारसं पसंत पडत नव्हतं; तरी ही मुलगी निर्लज्ज आहे, असा भ्रमही तिला झाला नाही. आईला वाटलं, या मुलीचं वय झालंय पण वळण लागलेलं नाही. आई कुणाशीही चटकन बोलू शकत नाही. माणसांपासून दूर दूर राहायचीच तिला सवय. या मुलीची ओळख करून घ्यायची तिची फार इच्छा होती, पण स्वभावातला अडसर तिला ओलांडता येत नव्हता. तेवढ्यात गाडी एका मोठ्या स्टेशनवर येऊन थांबली. त्या जनरलसाहेबांच्या लवाजम्यातले काही लोक या स्टेशनवरून चढायच्या तयारीत होते. गाडीत कुठेच जागा नाही. ते पुन्हा पुन्हा आमच्या डब्यासमोरून घिरट्या घालून गेले. आई तर भीतीनं थिजून गेली; माझ्याही मनाला चैन नव्हतं.
अपरिचिता
गाडी सुटायच्या थोडं आधी एका देशी रेल्वे कर्मचाऱ्यानं नावं लिहिलेली दोन तिकिटं डब्यातल्या दोन बाकांच्या उशाशी लटकवली आणि मला म्हणाला, 'या डब्यातले हे दोन बाक दोन साहेबांनी आधीच रिझर्व्ह केले आहेत; तुम्हाला दुसऱ्या डब्यात जावं लागेल.' मी तर गडबडीनं घाईघाईत उठून उभा राहिलो. ती मुलगी हिंदीत म्हणाली, 'नाही, आम्ही डबा सोडणार नाही.' तो माणूस हट्टानं म्हणाला, 'सोडल्याशिवाय इलाज नाही.' पण मुलगी जागची हलण्याचं काहीच लक्षण दिसेना, तेव्हा तो उतरून गेला आणि इंग्रज स्टेशनमास्तरला बोलावून आणलं. तो येऊन मला म्हणाला, 'मला खेद वाटतो, पण—' ते ऐकून मी 'हमाल, हमाल' म्हणून हाका मारू लागलो. ती मुलगी उठली आणि डोळ्यांतून आग ओकत म्हणाली, 'नाही, तुम्हाला जाता येणार नाही; आहात तसे बसून राहा.' असं म्हणून ती दाराशी उभी राहिली आणि स्टेशनमास्तरला इंग्रजीत म्हणाली, 'हा डबा आधीपासून रिझर्व्ह केलेला आहे, ही गोष्ट साफ खोटी आहे.' असं म्हणून तिनं नाव लिहिलेलं ते तिकीट काढलं आणि फलाटावर भिरकावून दिलं. तेवढ्यात अर्दलीसह गणवेशातला साहेब दाराशी येऊन उभा राहिला होता. आपलं सामान डब्यात चढवायला त्यानं आधी अर्दलीला खूण केली होती. मग त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहून, तिचं बोलणं ऐकून, तिचा आविर्भाव पाहून, त्यानं स्टेशनमास्तरला हलकेच स्पर्श केला आणि त्याला बाजूला नेलं; काय बोलणं झालं ते मला ठाऊक नाही. दिसलं एवढंच, की गाडी सुटायची वेळ टळून गेली, आणि आणखी एक डबा जोडूनच मग गाडी सुटली. मुलीनं आपल्या लवाजम्यासह पुन्हा एक फेरी चणे-फुटाणे खायला सुरुवात केली, आणि मी लाजेनं खिडकीबाहेर तोंड काढून निसर्गशोभा पाहू लागलो. गाडी कानपूरला येऊन थांबली. मुलगी सामान बांधून तयार होती — स्टेशनवर एक हिंदुस्थानी नोकर धावत आला आणि त्यांना उतरवायची तयारी करू लागला.
अपरिचिता
आईला मग राहवलं नाही. तिनं विचारलं, 'तुझं नाव काय गं बाळ?' मुलगी म्हणाली, 'माझं नाव कल्याणी.' ऐकून आई आणि मी दोघंही दचकलो. 'तुझे वडील—' 'ते इथले डॉक्टर आहेत; त्यांचं नाव शंभुनाथ सेन.' त्यानंतर लगेच सगळे उतरून गेले. उपसंहार मामांची मनाई झुगारून, मातृआज्ञा डावलून, त्यानंतर मी कानपूरला आलो आहे. कल्याणीच्या वडिलांची आणि कल्याणीची भेट झाली आहे. हात जोडले, मान खाली घातली; शंभुनाथबाबूंचं हृदय द्रवलं आहे. कल्याणी म्हणते, 'मी लग्न करणार नाही.' मी विचारलं, 'का?' ती म्हणाली, 'मातृआज्ञा.' काय सर्वनाश! म्हणजे या पक्षालाही कुणी मातुल आहेत की काय? मग कळलं, मातृभूमी आहे. ते लग्न मोडल्यापासून कल्याणीनं मुलींच्या शिक्षणाचं व्रत घेतलं आहे. पण मला आशा सोडता आली नाही. तो स्वर आजही माझ्या हृदयात वाजतो आहे — जणू कुठल्याशा पैलतीरावरची बासरी — माझ्या संसाराच्या बाहेरून आली — साऱ्या संसाराबाहेर बोलावून गेली. आणि त्या रात्रीच्या अंधारात माझ्या कानावर आलेलं ते 'जागा आहे' — ते माझ्या आयुष्यभराच्या गाण्याचं ध्रुवपद होऊन राहिलं. तेव्हा माझं वय होतं तेवीस, आता झालं सत्तावीस. अजूनही आशा सोडलेली नाही, पण मातुलांना सोडलं आहे. एकुलता एक मुलगा म्हणून आईला मात्र मला सोडता आलं नाही. तुम्हाला वाटतंय, मला लग्नाची आशा आहे? नाही, कधीच नाही. माझ्या मनात आहे ती फक्त त्या एका रात्रीच्या अनोळखी कंठातल्या मधुर स्वराची आशा — जागा आहे. नक्कीच आहे. नाहीतर उभा राहू कुठे? म्हणून वर्षामागून वर्षं जातात — मी इथंच आहे. भेट होते, तो आवाज ऐकतो, जमेल तेव्हा तिचं थोडंफार काम करून देतो — आणि मन म्हणतं, ही पाहा, मला जागा मिळाली आहे. हे अपरिचिते, तुझा परिचय संपला नाही, संपणार नाही; पण माझं नशीब चांगलं, ही पाहा, मला जागा मिळाली आहे.