रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
अशक्य गोष्ट
एक होता राजा. तेव्हा याहून जास्त काही जाणून घेण्याची गरज नसे. कुठला राजा, राजाचे नाव काय, असले प्रश्न विचारून आम्ही गोष्टीचा ओघ अडवीत नसू. राजाचे नाव शिलादित्य की शालिवाहन, काशी-कांची-कनोज-कोसल-अंग-वंग-कलिंग यांपैकी नेमके कुठे त्याचे राज्य, हे सगळे इतिहास-भूगोलाचे वाद आमच्या लेखी अगदीच क्षुल्लक होते; जी खरी गोष्ट ऐकली की अंतःकरण पुलकित होऊन जाई आणि सारे हृदय एका क्षणात विजेच्या वेगाने लोहचुंबकासारखे ओढले जाई, ती म्हणजे — एक होता राजा. आजकालचा वाचक मात्र जणू कंबर कसूनच बसतो. लेखक खोटे बोलतो आहे, हे तो सुरुवातीलाच गृहीत धरतो. म्हणून मोठा शहाणा असल्यासारखा चेहरा करून विचारतो, 'लेखकमहाशय, तुम्ही म्हणता एक होता राजा; बरं, सांगा पाहू, कोण होता तो राजा?' लेखकही शहाणे झाले आहेत; ते एखाद्या प्रचंड पुरातत्त्व-पंडितासारखे आपले मुखमंडल चौपट मंडलाकार करून म्हणतात, 'एक होता राजा, त्याचे नाव होते अजातशत्रू.' वाचक डोळा मिचकावून विचारतो, 'अजातशत्रू! बरं, कोणता अजातशत्रू, सांगा पाहू.' लेखक चेहऱ्यावरची रेषही न हलू देता सांगत सुटतो, 'अजातशत्रू तीन होऊन गेले. पहिले ख्रिस्तजन्माच्या तीन हजार वर्षे आधी जन्मले आणि दोन वर्षे आठ महिन्यांचे असताना मृत्युमुखी पडले. दुर्दैवाने त्यांच्या जीवनाचा सविस्तर वृत्तान्त कोणत्याच ग्रंथात मिळत नाही.' शेवटी दुसऱ्या अजातशत्रूविषयी दहा इतिहासकारांच्या दहा निरनिराळ्या मतांची चिकित्सा आटोपून तो ग्रंथाचा नायक जो तिसरा अजातशत्रू, त्याच्यापर्यंत येऊन पोचतो, तेव्हा वाचक उद्गारतो, 'बाप रे बाप, काय ही विद्वत्ता! एक गोष्ट ऐकायला आलो आणि केवढे शिक्षण झाले! आता या माणसावर अविश्वास दाखवणे शक्यच नाही.
अशक्य गोष्ट
'बरं का लेखकमहाशय, पुढे काय झाले?' हाय रे दैवा! माणसाला फसायचेच असते, फसायलाच आवडते; पण कोणी आपल्याला मूर्ख समजेल ही भीतीही सोळा आणे असते. म्हणून तो जिवाच्या आकांताने शहाणा होण्याची धडपड करतो. त्याचे फळ एवढेच की, शेवटी तो फसतोच, पण मोठ्या थाटामाटात फसतो. इंग्रजीत एक म्हण आहे: प्रश्न विचारू नका, म्हणजे खोटी उत्तरे ऐकावी लागणार नाहीत. लहान मुलाला हे कळते, म्हणून तो कोणताच प्रश्न विचारीत नाही. म्हणूनच राजाराणीच्या गोष्टीतले सुंदर खोटे बाळासारखे उघडेवाघडे, सत्यासारखे सरळ, नुकत्याच फुटलेल्या झऱ्यासारखे नितळ असते; आणि आजकालचे चतुर खोटे म्हणजे मुखवटा घातलेले खोटे. कुठे तीळभर जरी फट राहिली तरी आतली सारी बनवाबनवी उघडी पडते, वाचक तोंड फिरवतो, आणि लेखकाला पळायला वाट सापडत नाही. लहानपणी आम्ही खरे रसिक होतो. म्हणून गोष्ट ऐकायला बसलो की ज्ञान मिळवण्याची तीळभरही उत्कंठा आम्हाला वाटत नसे, आणि खरी गोष्ट नेमकी तेवढी कोणती, हे अडाणी, निरागस मनाला बरोबर कळे. आणि आजकाल किती पाल्हाळ लावावे लागते, किती अनावश्यक बोलणेही आवश्यक होऊन बसते! पण सरतेशेवटी सारे त्याच खऱ्या गोष्टीपाशी येऊन थांबते — एक होता राजा. चांगले आठवते, त्या दिवशी संध्याकाळी वादळी पाऊस कोसळत होता. कलकत्ता शहर अगदी पाण्याखाली गेले होते. गल्लीत गुडघाभर पाणी. आज मास्तर काही येणार नाहीत, अशी मनाला पुरी आशा होती. तरीही त्यांच्या येण्याची ठरलेली वेळ होईपर्यंत मी धास्तावलेल्या मनाने रस्त्याकडे डोळे लावून व्हरांड्यात चौरंग टाकून बसलो होतो. पाऊस जरा कुठे ओसरू लागल्यासारखा दिसला की एकाग्र चित्ताने प्रार्थना करायचो, 'देवा रे, आणखी जरासा!
अशक्य गोष्ट
कसेही करून संध्याकाळचे साडेसात तेवढे उलटू दे.' तेव्हा वाटे, जगात पावसाचे दुसरे काहीच काम नाही; एकाच संध्याकाळी, शहराच्या एका कोपऱ्यातल्या एकाच कावऱ्याबावऱ्या मुलाला मास्तरांच्या विक्राळ हातातून वाचवणे, एवढेच. पूर्वी एका हद्दपार यक्षालाही असेच वाटले होते ना, की आषाढातल्या मेघाला तसे फारसे काम नाही, तेव्हा रामगिरीच्या शिखरावरच्या एका विरहीचे दुःख अवघे विश्व ओलांडून अलकेतल्या प्रासादाच्या गवाक्षातल्या एका विरहिणीपर्यंत पोचवणे त्याला मुळीच जड नाही; त्यातून वाट एवढी रमणीय आणि त्या विरहीची हृदयवेदना एवढी असह्य असताना. बालकाच्या प्रार्थनेमुळे नसेल, पण धूम-ज्योती-सलिल-मरुतांच्या कुठल्यातरी खास नियमाने पावसाने काही पिच्छा सोडला नाही. पण हाय रे, मास्तरांनीही पिच्छा सोडला नाही. गल्लीच्या तोंडाशी ठरल्या वेळी एक ओळखीची छत्री दिसली; आशेची सारी वाफ एका क्षणात फुटून बाहेर पडली आणि माझे काळीज जणू बरगड्यांच्या पिंजऱ्यात विरून गेले. परपीडनाच्या पापाला जर योग्य ती शिक्षा असेल, तर पुढच्या जन्मी मी नक्की मास्तर होऊन जन्मेन आणि माझे मास्तर विद्यार्थी होऊन जन्मतील. त्यात एकच अडचण अशी की, मास्तरांचा मास्तर व्हायचे तर मला अगदीच अकाली हे जग सोडून जावे लागेल; म्हणून मी त्यांना मनापासून क्षमा करून टाकली. छत्री दिसताक्षणी मी धावत आत माजघरात शिरलो. आई तेव्हा आजीसमोर बसून दिव्याच्या उजेडात बिंतीचा डाव खेळत होती. मी धप्पकन एका बाजूला आडवा झालो. आईने विचारले, 'काय झाले?' मी तोंड अगदी गाडग्यासारखे पाडून म्हणालो, 'मला बरं नाही, आज मी मास्तरांकडे शिकायला जाणार नाही.'
अशक्य गोष्ट
अल्पवयीन कोणी माझे हे लिखाण वाचणार नाही आणि शाळेच्या कुठल्याही निवडक पाठांच्या पुस्तकात ते उद्धृत होणार नाही, अशी आशा आहे. कारण मी जे केले ते नीतीला धरून नव्हते, आणि त्याबद्दल मला कसलीही शिक्षा झाली नाही. उलट माझा हेतू साध्य झाला. आईने नोकराला सांगितले, 'आज मग राहू दे, मास्तरांना जायला सांग.' पण ती ज्या निर्धास्तपणे बिंती खेळत राहिली त्यावरून चांगलेच कळले की आपल्या मुलाच्या आजाराची भयंकर लक्षणे ताडून पाहून आई मनातल्या मनात हसली. मीही उशीत तोंड खुपसून मनसोक्त हसून घेतले — आम्हा दोघांची मने एकमेकांपासून लपून राहिली नाहीत. पण सगळ्यांनाच ठाऊक आहे की, या प्रकारचे आजारपण फार वेळ टिकवून धरणे रोग्याला फारच कठीण जाते. मिनिटभरही उलटले नसेल तोच मी आजीच्या मागे लागलो, 'आजी, एक गोष्ट सांग ना.' दोनचारदा काहीच उत्तर आले नाही. आई म्हणाली, 'बस रे बाळा, आधी डाव संपवू दे.' मी म्हणालो, 'नाही, डाव तू उद्या संपव, आज आजीला गोष्ट सांगायला सांग ना.' आई पत्ते खाली टाकून म्हणाली, 'जा काकू, याच्यापुढे आता कोणाचं चालणार!' मनात कदाचित म्हणाली असेल, मला काय, उद्या काही माझे मास्तर येणार नाहीत, मी उद्याही खेळू शकते. मी आजीचा हात धरून ओढतच तिला थेट मच्छरदाणीच्या आत बिछान्यावर घेऊन गेलो. आधी कुशीतली उशी कवटाळून, पाय झाडून, चुळबुळ करून मनातला आनंद आवरण्यात थोडा वेळ गेला — मग म्हणालो, 'गोष्ट सांग.' तेव्हाही बाहेर धो धो पाऊस पडत होता; आजीने हलक्या आवाजात सुरुवात केली — एक होता राजा. त्याला एक राणी. हुश्श, सुटलो! आवडती आणि नावडती राणी ऐकले की छातीत धस्स होते — कळून चुकते, त्या नावडत्या अभागिनीवर संकट यायला आता वेळ नाही. आधीपासूनच मनावर एक भयंकर धाकधूक दाटून राहते.
अशक्य गोष्ट
जेव्हा कळले की काळजीचे दुसरे काही कारण नाही, फक्त राजाला मुलगा झाला नाही म्हणून राजा व्याकूळ झाला आहे आणि देवाची प्रार्थना करीत कठोर तपश्चर्या करायला वनात जायला निघाला आहे, तेव्हा मी सुटकेचा निःश्वास टाकला. मुलगा झाला नाही तर त्यात दुःख करण्यासारखे काय आहे, हे मला कळत नसे. मला एवढे ठाऊक होते की, कशासाठी वनात जायची कधी गरज पडलीच, तर ती फक्त मास्तरांपासून पळून जाण्यासाठी. * * * राणी आणि एक लहानगी मुलगी यांना घरी सोडून राजा तपश्चर्येला निघून गेला. एक वर्ष, दोन वर्षे करता करता बारा वर्षे लोटली, तरी राजाचा पत्ता नाही. इकडे राजकन्या सोळा वर्षांची झाली. लग्नाचे वय उलटून गेले, पण राजा परतला नाही. मुलीच्या तोंडाकडे पाहते आणि राणीला अन्नपाणी गोड लागत नाही. 'अगं बाई, माझी अशी सोन्यासारखी पोर जन्मभर उजवायचीच राहणार की काय? देवा रे, कसले नशीब घेऊन आले मी!' शेवटी राणीने राजाला खूप विनवण्या करून निरोप धाडला, 'मला दुसरं काही नको, तुम्ही फक्त एक दिवस माझ्या महालात येऊन जेवून जा.' राजा म्हणाला, 'बरं.' राणीने त्या दिवशी मोठ्या हौसेने चौसष्ट पदार्थ स्वतःच्या हाताने रांधले, ते सारे सोन्याच्या ताटात आणि रुप्याच्या वाट्यांत मांडले आणि चंदनाचा पाट मांडला. राजकन्या हातात चवरी घेऊन उभी राहिली. राजा आज बारा वर्षांनी अंतःपुरात परत येऊन जेवायला बसला. राजकन्या आपल्या रूपाने सारा महाल उजळत उभी राहून चवरी ढाळू लागली. मुलीच्या तोंडाकडे पाहतो आणि राजाचा घास घशाखाली उतरत नाही. शेवटी राणीकडे पाहून त्याने विचारले, 'काय गं राणी, ही सोन्याच्या मूर्तीसारखी, साक्षात लक्ष्मीसारखी मुलगी कोण गं? ही कुणाची मुलगी?' राणीने कपाळावर हात मारून घेतला, 'हाय माझं जळकं नशीब! तिला ओळखलं नाहीत? ती तुमचीच मुलगी!' राजा अगदी थक्क होऊन म्हणाला, 'माझी ती परवाची एवढीशी पोर आज एवढी मोठी झाली?'
अशक्य गोष्ट
राणी उसासा टाकून म्हणाली, 'मग होणार नाही तर काय? बोलता काय, आज बारा वर्षं होऊन गेली.' राजाने विचारले, 'मुलीचं लग्न नाही करून दिलंस?' राणी म्हणाली, 'तुम्ही घरी नाही, तिचं लग्न कोण करून देणार? मी काय स्वतः नवरा शोधायला बाहेर पडू?' ते ऐकून राजा एकदम भलताच गडबडून गेला आणि म्हणाला, 'थांब, उद्या सकाळी उठल्यावर राजवाड्याच्या दारात मी ज्याचं तोंड पाहीन, त्याच्याशीच हिचं लग्न लावून देतो.' राजकन्या चवरी ढाळीत राहिली. तिच्या हातातल्या कड्यांची, बांगड्यांची किणकिण होत राहिली. राजाचे जेवण झाले. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठून राजा बाहेर आला, तो त्याला दिसले, एक ब्राह्मणाचा मुलगा राजवाड्याबाहेरच्या रानातून वाळकी लाकडे गोळा करतो आहे. त्याचे वय असेल सात-आठ वर्षांचे. राजा म्हणाला, 'याच्याशीच माझ्या मुलीचं लग्न लावीन.' राजाची आज्ञा कोण मोडणार? लगोलग त्या मुलाला धरून आणले आणि त्याच्या व राजकन्येच्या माळा बदलल्या गेल्या. * * * इथे मी आजीला अगदी बिलगून, कमालीच्या उत्कंठेने विचारले, 'मग?' त्या सात-आठ वर्षांच्या भाग्यवान, लाकडे वेचणाऱ्या ब्राह्मणाच्या मुलाच्या जागी स्वतःला बसवावे अशी मला जराशीही इच्छा झाली नव्हती का? त्या रात्री पाऊस धो धो कोसळत होता, दिवा मिणमिणत होता आणि आजी मच्छरदाणीत गुणगुणत्या स्वरात गोष्ट सांगत होती, तेव्हा बालमनाच्या, सारे खरे मानणाऱ्या, गूढ, अजून कोणी न धुंडाळलेल्या एका चिमुकल्या कोपऱ्यात असे एक अगदी शक्य वाटणारे चित्र उमटले नसेल का, की तोही एके दिवशी सकाळी कुठल्याशा राजाच्या देशात राजाच्या दारात लाकडे वेचतो आहे, आणि अचानक सोन्याच्या मूर्तीसारख्या, साक्षात लक्ष्मीसारख्या एका राजकन्येशी त्याच्या माळा बदलल्या गेल्या; तिच्या भांगात बिजवरा, कानांत डूल, गळ्यात कंठी, हातांत कंकणे, कमरेला कमरपट्टा, आणि अळत्याने रंगवलेल्या दोन पावलांत पैंजण छुमछुम वाजताहेत.
अशक्य गोष्ट
पण माझी ती आजी जर लेखकाचा जन्म घेऊन आजकालच्या शहाण्या वाचकांना ही गोष्ट सांगती, तर एवढ्यात तिला केवढे हिशेब द्यावे लागले असते! पहिली गोष्ट, राजा बारा वर्षे वनात बसून राहतो आणि तोवर राजकन्येचे लग्न होत नाही, हे अशक्य आहे, असे सगळ्यांनी एकमुखाने म्हटले असते. तेवढे कसेबसे गडबडीत खपून गेले असते, तरी मुलीच्या लग्नापाशी मात्र भयंकर गदारोळ उठला असता. एक तर असे कधी होतच नाही; दुसरे म्हणजे, ब्राह्मणाच्या मुलाशी क्षत्रिय कन्येचे लग्न लावून लेखक नक्कीच चोरपावलाने समाजविरोधी मताचा प्रचार करतो आहे, अशी सगळ्यांना शंका आली असती. वाचक काही तसली भोळीभाबडी पोरे नाहीत; ते काही तिचे नातू नव्हेत की सगळे मुकाट्याने ऐकून घेतील. ते वर्तमानपत्रांतून टीका करतील. म्हणून मनापासून प्रार्थना करतो, आजी पुन्हा जन्मली तर आजी म्हणूनच जन्मो; या करंट्या नातवासारखे ग्रहांच्या फेऱ्याने तिला लेखक होणे नशिबी न येवो. मी अगदी रोमांचित, थरथरत्या हृदयाने विचारले, 'मग?' आजी सांगू लागली, मग राजकन्या मनाच्या दुःखाने आपल्या त्या छोट्या नवऱ्याला घेऊन निघून गेली. खूप दूर देशी जाऊन तिने एक मोठा प्रासाद बांधला आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाला, आपल्या त्या अगदी चिमुकल्या नवऱ्याला, मोठ्या मायेने वाढवू लागली. मी जरासा चुळबुळ करून उशी आणखी थोडी घट्ट कवटाळली आणि म्हणालो, 'मग?' आजी म्हणाली, मग तो मुलगा रोज पोथी घेऊन पाठशाळेत जाऊ लागला. असे गुरुजींकडून नाना विद्या शिकत तो मुलगा जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याचे वर्गमित्र त्याला विचारू लागले, 'त्या सात चौकी वाड्यात तुला घेऊन राहते, ती मुलगी तुझी कोण लागते?'
अशक्य गोष्ट
ब्राह्मणाचा मुलगा विचार करकरून बेजार; ती मुलगी आपली कोण लागते, हे त्याला काही केल्या नक्की सांगता येत नाही. थोडेथोडे आठवते, एके दिवशी सकाळी राजवाड्याच्या दारासमोर वाळकी लाकडे वेचायला गेला होता, पण त्या दिवशी कसल्याशा मोठ्या गोंधळात लाकडे वेचायची राहूनच गेली. ती फार दिवसांपूर्वीची गोष्ट; ती का कुणाला आठवते? असे करता करता चार-पाच वर्षे जातात. रोज त्याचे सवंगडी त्याला विचारतात, 'काय रे, त्या सात चौकी वाड्यात ती अप्सरेसारखी देखणी मुलगी राहते, ती तुझी कोण लागते?' एके दिवशी ब्राह्मण पाठशाळेतून अगदी तोंड उतरवून आला आणि राजकन्येला म्हणाला, 'माझ्या शाळेतली पोरं मला रोज विचारतात — त्या सात चौकी वाड्यात जी अतिशय सुंदर मुलगी राहते, ती तुझी कोण लागते? मला त्याचं काहीच उत्तर देता येत नाही. तू माझी कोण लागतेस, सांग.' राजकन्या म्हणाली, 'आजचा दिवस राहू दे, ते मी पुन्हा कधीतरी सांगेन.' ब्राह्मणाचा मुलगा रोज पाठशाळेतून येऊन विचारतो, 'तू माझी कोण लागतेस?' राजकन्या रोज उत्तर देते, 'ते आज राहू दे, पुन्हा कधीतरी सांगेन.' असे करता करता आणखी चार-पाच वर्षे उलटतात. शेवटी एके दिवशी ब्राह्मण येऊन फार रागावून म्हणाला, 'तू माझी कोण लागतेस हे आज जर सांगितलं नाहीस, तर मी तुझा हा सात चौकी वाडा सोडून निघून जाईन.' तेव्हा राजकन्या म्हणाली, 'बरं, उद्या नक्की सांगेन.' दुसऱ्या दिवशी ब्राह्मणपुत्र पाठशाळेतून घरी आल्या आल्या राजकन्येला म्हणाला, 'आज सांगेन म्हणाली होतीस, मग आता सांग.' राजकन्या म्हणाली, 'आज रात्री जेवून तू झोपायला जाशील, तेव्हा सांगेन.'
अशक्य गोष्ट
ब्राह्मण म्हणाला, 'बरं.' आणि सूर्य मावळण्याची वाट पाहत प्रहर मोजू लागला. इकडे राजकन्येने सोन्याच्या पलंगावर शुभ्र फुलांची शेज घातली, खोलीत सोन्याच्या दिव्यात सुगंधी तेल घालून वात लावली, आणि केस बांधून, निळीशार साडी नेसून, नटूनथटून बसली — प्रहर मोजीत, रात्र केव्हा येते याची वाट पाहत. रात्री तिच्या नवऱ्याने कसेबसे जेवण उरकले आणि शयनगृहात सोन्याच्या पलंगावर फुलांच्या शेजेवर जाऊन तो पहुडला. तो विचार करू लागला, 'आज ऐकायला मिळेल, या सात चौकी वाड्यात जी सुंदरी राहते, ती माझी कोण लागते.' राजकन्येने आपल्या नवऱ्याच्या ताटातला प्रसाद खाल्ला आणि ती हळूहळू शयनगृहात आली. आज इतक्या दिवसांनी उघड सांगायचे आहे, 'सात चौकी वाड्याची एकुलती एक स्वामिनी — मी तुझी कोण लागते.' सांगायला म्हणून ती शेजेपाशी गेली, तो तिला दिसले, फुलांत साप होता, त्याने केव्हातरी तिच्या नवऱ्याला दंश केला आहे. नवऱ्याचा निस्तेज मृतदेह सोन्याच्या पलंगावर फुलांच्या शेजेत पडला आहे. * * * माझ्या छातीची धडधड जणू एकदम थांबली. चेहरा पांढराफटक पडलेला, मी घुसमटलेल्या आवाजात विचारले, 'मग काय झालं?' आजी सांगू लागली, मग — पण ते सांगून आता काय उपयोग? ते तर आणखीच अशक्य. गोष्टीचा मुख्य नायक सर्पदंशाने मेला, तरीही 'मग'? मुलाला तेव्हा ठाऊक नव्हते की मृत्यूनंतरही एक 'मग' असू शकतो खरा, पण त्या 'मग'चे उत्तर कोणत्याही आजीची आजीसुद्धा देऊ शकत नाही. श्रद्धेच्या बळावर सावित्री मृत्यूच्याही मागोमाग गेली होती. मुलाचीही श्रद्धा प्रबळ असते.
अशक्य गोष्ट
म्हणूनच तो मृत्यूचा पदर धरून त्याला मागे फिरवू पाहतो; मास्तर न आलेल्या एका संध्याकाळची ही एवढ्या हौसेची गोष्ट अचानक एका सर्पदंशानेच मरून गेली, हे त्याला काही केल्या मानवत नाही. म्हणून आजीला त्या महापरिणामाच्या कायमच्या बंद घरातून गोष्टीला पुन्हा परत आणावे लागते. पण ती हे इतक्या सहजपणे साधते — इतक्या अनायासे, फार तर केळीच्या खोडांच्या तराफ्यावर सोडून देऊन आणि दोन मंत्र पुटपुटून — की त्या धो धो पावसाच्या रात्री मंद दिव्याच्या उजेडात मुलाच्या मनात मृत्यूची मूर्ती अगदीच सौम्य होऊन येते; एका रात्रीच्या सुखाच्या झोपेपेक्षा तो काही जास्त वाटत नाही. गोष्ट संपली की सुखाने शिणलेले दोन डोळे आपोआप मिटतात, तेव्हाही मुलाच्या चिमुकल्या जिवाला एका शीतल, निःशब्द, लाटा नसलेल्या प्रवाहात गाढ झोपेच्या तराफ्यावर ठेवून सोडून दिलेच जाते ना; आणि मग पहाटे कोणीतरी दोन मायामंत्र म्हणून त्याला या जगात पुन्हा जागे करते. पण ज्याच्यापाशी श्रद्धा नाही, जो भित्रा या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीसुद्धा इंचभर अशक्य ओलांडायला कचरतो, त्याच्यासाठी कशालाच पुढे 'मग' नाही; सारे काही अचानक, अवेळी, अधुरेपणातच पुरे होऊन गेले आहे. लहानपणी सात समुद्र पार करून, मृत्यूला ओलांडून, गोष्टीला जिथे खरा विराम असे, तिथे मायाळू, गोड आवाजात ऐकायचो — माझी गोष्ट सरली, माठाची भाजी चरली. आता वय झाले; आता गोष्टीच्या अगदी मधोमध एकाएकी थांबून एक निष्ठुर, कठोर आवाज ऐकू येतो — माझी गोष्ट सरली नाही, माठाची भाजी चरली नाही. का रे माठा, उरलास का? तुझ्या ढोरानं — जाऊ दे, त्या गरीब बिचाऱ्या जनावराचे नाव न घेतलेलेच बरे. पुन्हा कोण कुठून ते स्वतःला लावून घेईल!