रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
बलाई
माणसाचं जीवन म्हणजे पृथ्वीवरच्या नाना जीवांच्या इतिहासातल्या नाना प्रकरणांचा उपसंहार, असं म्हणतात. माणसांच्या वस्तीत माणसांमध्येच नाना पशूंची दडलेली ओळख आपल्याला पटत असते, हे तर सगळ्यांना ठाऊक आहे. खरं पाहिलं तर, आपल्या आतल्या सगळ्या जनावरांना एकत्र मिसळून ज्या वस्तूनं एक करून घेतलं आहे, तिलाच आपण माणूस म्हणतो — तिनं आपल्यातल्या वाघाला आणि गाईला एकाच कोंडवाड्यात डांबलं आहे, साप-मुंगसाला एकाच पिंजऱ्यात धरून ठेवलं आहे. रागाचंही तसंच: स्वतःमधल्या सगळ्या सा-रे-ग-मांचं जो संगीत घडवतो, त्यालाच आपण राग म्हणतो — एकदा ते संगीत झालं की मग त्यांना गोंधळ घालायची प्राज्ञा उरत नाही — पण तरीही, त्या संगीतात एखादा स्वर बाकी सगळ्या स्वरांना मागे टाकून विशेष होऊन उठतो; एखाद्या रागात मध्यम, एखाद्यात कोमल गांधार, तर एखाद्यात पंचम. माझा पुतण्या बलाई — त्याच्या स्वभावात कसे कोण जाणे, झाडाझुडपांचेच मूळ स्वर प्रबळ झाले होते. लहानपणापासूनच गप्प बसून टक लावून पाहत राहणं ही त्याची सवय; इकडेतिकडे हुंदडणं नव्हे. पूर्वेच्या आकाशात काळे ढग थरावर थर रचून स्तब्ध उभे राहायचे, तेव्हा त्याच्या अवघ्या मनात श्रावणातल्या रानाचा गंध घेऊन ओलसर वारा जणू दाटून यायचा; झम् झम् करत पाऊस कोसळायचा, तेव्हा त्याचं सारं अंगच जणू तो पावसाचा आवाज ऐकायचं. गच्चीवर तिसऱ्या प्रहरचं ऊन उतरणीला लागलं की तो उघड्या अंगानं फिरायचा; जणू साऱ्या आकाशातून काहीतरी वेचून घ्यायचा. माघ संपता संपता आंब्याला मोहोर यायचा, तेव्हा त्याच्या रक्तात एक गाढ आनंद जागा व्हायचा, कसल्याशा अव्यक्त आठवणीसारखा; फाल्गुनात फुललेल्या सालवनासारखं त्याचं अंतर्मन चहूकडे पसरायचं, भरून यायचं, त्यावर एक गडद रंग चढायचा.
बलाई
मग त्याला एकट्यानंच बसून आपल्याशीच बोलावंसं वाटायचं — ऐकलेल्या सगळ्या गोष्टींची जोडाजोड करून; खूप जुन्या वडाच्या ढोलीत घरटं करून राहणाऱ्या खूप जुन्या पक्ष्यांच्या जोडीच्या, बेंगमा-बेंगमीच्या गोष्टी. सदा टपोरे डोळे उघडून टकमक बघत राहणाऱ्या त्या पोराला फारसं बोलता यायचं नाही. म्हणून त्याला मनातल्या मनात कितीतरी जास्त विचार करावा लागायचा. एकदा मी त्याला डोंगरावर घेऊन गेलो होतो. आमच्या घरासमोर गर्द हिरवं गवत डोंगराच्या उतारावरून थेट खालपर्यंत उतरत गेलं होतं; ते पाहून त्याचं मन फार खूश होऊन जायचं. गवताचं ते आच्छादन काही स्थिर वस्तू आहे असं त्याला वाटायचंच नाही; त्याला वाटायचं, गवताचा तो गठ्ठा म्हणजे घरंगळत चाललेला एक खेळ आहे, सारखा घरंगळतोच आहे. बऱ्याचदा त्याच उतारावरून तोही घरंगळत जायचा — सगळ्या देहानं गवतच होऊन जायचा — घरंगळता घरंगळता गवताची टोकं मानेपाशी गुदगुल्या करायची आणि तो खुदूखुदू हसत सुटायचा. रात्री पाऊस पडून गेल्यावरच्या पहिल्या सकाळी समोरच्या डोंगराच्या शिखरावरून कोवळं सोनेरी ऊन देवदारांच्या रानावर येऊन पडायचं — तेव्हा तो कुणाला न सांगता हळूच जाऊन त्या देवदारवनाच्या निःस्तब्ध सावलीत एकटाच थक्क होऊन उभा राहायचा; अंगावर शिरशिरी उठायची — या सगळ्या अजस्र झाडांच्या आतली माणसं त्याला जणू दिसायची; ती बोलत नाहीत, पण त्यांना सगळं काही ठाऊक आहे असं वाटायचं. ती सगळी जणू फार फार जुन्या काळचे आजोबा, 'एक होता राजा'वाल्या जमान्यातले. त्याचे ते भान हरपलेले डोळे केवळ वरच्या दिशेलाच लागलेले असत असं नाही; पुष्कळदा मी पाहिलंय, तो माझ्या बागेत जमिनीकडे काहीतरी शोधत शोधत फिरतोय. नवे अंकुर आपली इवलीशी कुरळी डोकी घेऊन उजेडात उमलत असायचे, ते पाहायला त्याची उत्सुकता अमर्याद असे. रोज वाकून वाकून तो त्यांना जणू विचारायचा, 'मग?
बलाई
मग? मग?' ते म्हणजे त्याची कधीच न संपणारी गोष्ट. नुकतीच फुटलेली कोवळी कोवळी पानं — त्यांच्याशी त्याची कसली सवंगड्यांसारखी गट्टी होती, हे तो कसं सांगणार! तीही त्याला कसलातरी प्रश्न विचारायला उतावीळ होऊन चुळबुळायची. कदाचित म्हणत असतील, 'तुझं नाव काय?' कदाचित म्हणत असतील, 'तुझी आई कुठे गेली?' बलाई मनातल्या मनात उत्तर द्यायचा, 'मला आई नाहीच.' कुणी झाडाची फुलं तोडली की त्याला फार लागायचं. आणि आपल्या या संकोचाला दुसऱ्या कुणाच्या लेखी काहीच अर्थ नाही, हेही त्याला कळून चुकलं होतं. म्हणून ती वेदना तो लपवायचा प्रयत्न करायचा. त्याच्या वयाची पोरं झाडावर दगड मारमारून आवळे पाडायची; त्याला काही बोलता यायचं नाही, तो तिथून तोंड फिरवून निघून जायचा. त्याला चिडवण्यासाठी त्याचे सोबती बागेतून जाता जाता छडीनं दोन्ही बाजूंच्या झाडांवर फटके मारत जायचे, खटकन बकुळीची एखादी फांदी मोडून घ्यायचे — त्याला रडायची लाज वाटायची, कुणी त्याला वेडेपणा समजेल म्हणून. त्याच्यावर सगळ्यात मोठं संकट यायचं ते गवतवाला गवत कापायला यायचा त्या दिवशी. कारण, गवताच्या आत आत तो रोज पाहत पाहत फिरलेला असायचा — इवल्या इवल्या वेली, जांभळी-पिवळी नाव हरवलेली अगदी चिमुकली फुलं; मधूनमधून भुईरिंगणीचं रोप, त्याच्या निळ्या निळ्या फुलाच्या हृदयाशी अगदी मधोमध एवढासा सोनेरी ठिपका; कुंपणापाशी कुठे कालमेघाची वेल, तर कुठे अनंतमूळ; पक्ष्यांनी खाल्लेल्या लिंबोळ्यांच्या बिया पडून कडुनिंबाची छोटी छोटी रोपं उगवलेली, किती सुंदर त्यांची पानं — हे सगळं निर्दय खुरप्यानं खुरपून खुरपून काढून टाकलं जायचं. ती काही बागेतली हौसेची झाडं नव्हेत; त्यांचं गाऱ्हाणं ऐकायला कोणी नाही.
बलाई
कधी कधी तो आपल्या काकूच्या मांडीवर येऊन बसायचा आणि तिच्या गळ्याला मिठी मारून म्हणायचा, 'त्या गवतवाल्याला सांग ना, माझी ती झाडं कापू नको म्हणावं.' काकू म्हणायची, 'बलाई, काय वेड्यासारखं बडबडतोस रे! ते सगळं तण आहे, साफ नाही केलं तर कसं चालेल?' बलाईला फार पूर्वीच कळून चुकलं होतं की काही काही दुःखं अशी असतात, जी सर्वस्वी त्याची एकट्याचीच असतात — त्याच्या भोवतालच्या माणसांमध्ये त्यांचा काहीच पडसाद उमटत नाही. या पोराचं खरं वय त्या कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या दिवसाइतकं, ज्या दिवशी समुद्राच्या गर्भातून नव्यानं वर आलेल्या चिखलाच्या थरांतून पृथ्वीच्या भावी अरण्यानं आपल्या जन्माचा पहिला टाहो फोडला — त्या दिवशी पशू नव्हते, पक्षी नव्हते, जीवनाचा कोलाहल नव्हता, चहूकडे फक्त दगड आणि चिखल आणि पाणी. काळाच्या वाटेवर सगळ्या जीवांच्या पुढे चालणाऱ्या झाडानं सूर्याकडे हात जोडून म्हटलं, 'मी राहीन, मी जगेन, मी चिरप्रवासी आहे; मृत्यूमागून मृत्यू पार करत मी अंतहीन प्राणाच्या विकासतीर्थाकडे यात्रा करीन, उन्हातून, पावसातून — दिवसा, रात्री.' झाडाचा तो पुकारा आजही रानोरानी, डोंगरांत, माळरानांवर उठतो आहे; त्यांच्याच फांद्यांतून, पानांतून धरणीचा प्राण पुन्हा पुन्हा म्हणतो आहे, 'मी राहीन, मी राहीन.' विश्वप्राणाची ही मूक दाई — हे झाड — अखंड काळ द्युलोकाला दोहून पृथ्वीच्या अमृतकुंभासाठी प्राणाचं तेज, प्राणाचा रस, प्राणाचं लावण्य साठवतं आहे; आणि व्याकुळ प्राणाची वाणी अहोरात्र आकाशात उचंबळवून सोडतं आहे, 'मी राहीन.' विश्वप्राणाची ती वाणी कशी कोण जाणे, आपल्या रक्तात ऐकू आली होती त्या बलाईला. आम्ही त्यावरून खूप हसलो होतो.
बलाई
एके दिवशी सकाळी मी तल्लीन होऊन वर्तमानपत्र वाचत होतो, तेवढ्यात बलाई घाईघाईनं मला धरून बागेत घेऊन गेला. एका ठिकाणी एक रोप दाखवून त्यानं मला विचारलं, 'काका, हे कसलं झाड?' पाहिलं तर, बागेच्या खडी टाकलेल्या वाटेच्या अगदी मधोमध काटेसावरीचं एक रोप उगवलं होतं. अरेरे, मला बोलावून आणून बलाईनं चूकच केली. एवढासा अंकुर फुटला होता, बाळाच्या पहिल्या बोबड्या बोलासारखा, तेव्हाच तो बलाईच्या नजरेत भरला होता. तेव्हापासून बलाई रोज स्वतःच्या हातानं त्याला थोडं थोडं पाणी घालत होता, सकाळ-संध्याकाळ उतावीळपणे सारखा पाहत होता, किती वाढलं ते. काटेसावर वाढतेही झपाट्यानं, पण बलाईच्या ओढीशी तिला काही बरोबरी करता येत नव्हती. दोनेक हात उंच झाल्यावर त्याची पानांची श्रीमंती पाहून बलाईला वाटलं, हे काहीतरी अद्भुत झाड आहे — बाळाच्या बुद्धीची पहिली चुणूक दिसताच आईला जसं वाटतं — अद्भुत बाळ! बलाईला वाटलं, आपण मलाही थक्क करून सोडू. मी म्हटलं, 'माळ्याला सांगायला हवं, हे उपटून टाकायला.' बलाई दचकला. हे काय भयंकर बोलणं! म्हणाला, 'नको, काका, तुझ्या पाया पडतो, उपटू नकोस.' मी म्हटलं, 'काय बोलतोस त्याला काही ताळमेळ नाही. अगदी वाटेच्या मधोमध उगवलंय. मोठं झालं की चहूकडे कापूस उडवून नुसतं हैराण करून सोडेल.' माझ्यापुढे डाळ शिजली नाही, तेव्हा हे आईवेगळं पोर आपल्या काकूकडे गेलं. तिच्या मांडीवर बसून, तिच्या गळ्याला मिठी मारून, मुसमुसत रडत रडत म्हणालं, 'काकू, तू काकांना सांग ना, ते झाड तोडू नका म्हणावं.'
बलाई
उपाय त्यानं अचूक हेरला होता. त्याच्या काकूनं मला हाक मारून म्हटलं, 'अहो, ऐकलंत का? राहू द्या हो त्याचं झाड, बिचाऱ्याचं.' राहू दिलं. सुरुवातीला बलाईनं दाखवलं नसतं तर कदाचित ते माझ्या लक्षातही आलं नसतं. पण आता रोजच नजरेला पडायचं. वर्षभरातच ते झाड निर्लज्जासारखं भरमसाट वाढलं. बलाईचं असं झालं की, याच झाडावर त्याचा सगळ्यात जास्त जीव. ते झाड दिवसेंदिवस अगदी बावळटासारखं दिसत होतं. एका भलत्याच जागी येऊन उभं ठाकलंय, कुणाला भीक घालत नाही, ताडमाड उंच वाढत चाललंय. जो पाहील त्याला वाटायचं, हे इथे काय करतंय? त्याच्या मृत्युदंडाचा प्रस्ताव आणखी दोन-चारदा मांडला गेला. बलाईला लालूच दाखवली की याच्या बदल्यात खूप छान छान गुलाबाची रोपं आणून देईन. म्हटलं, 'काटेसावरच हवी असेल अगदी, तर आणखी एक रोप आणवून कुंपणाच्या कडेला लावून देईन, छान दिसेल.' पण तोडायचं नाव काढलं की तो दचकायचा, आणि त्याची काकू म्हणायची, 'अहो, आहे तसं काय वाईट दिसतंय!' * * * माझ्या वहिनी गेल्या — हा मुलगा त्यांच्या कुशीत असतानाच. बहुधा त्या दुःखामुळेच दादांना लहर आली; ते इंजिनिअरिंग शिकायला विलायतेला निघून गेले. हा मुलगा माझ्या निपुत्रिक घरात काकूच्याच मांडीवर वाढला. दहाएक वर्षांनी दादा परत आले, आणि बलाईला विलायती पद्धतीचं शिक्षण द्यायचं म्हणून आधी त्याला सिमल्याला घेऊन गेले — त्यानंतर विलायतेला न्यायचं ठरलं होतं. रडत रडत काकूची कूस सोडून बलाई गेला, आमचं घर ओस पडलं.
बलाई
पुढे दोन वर्षं गेली. दरम्यान बलाईच्या काकू चोरून डोळे पुसायच्या, आणि बलाईच्या रिकाम्या निजायच्या खोलीत जाऊन त्याचा एक फाटका बूट, रबराचा फुटका चेंडू आणि प्राण्यांच्या गोष्टींचं चित्रांचं पुस्तक हाताळत बसायच्या; एवढ्या दिवसांत या सगळ्या खुणांना मागे टाकून बलाई केवढा मोठा झाला असेल, हाच विचार बसल्या बसल्या करत राहायच्या. कधीतरी माझ्या लक्षात आलं की ती अवलक्षणी काटेसावर फारच माजली आहे — इतकी बेताल वाढली आहे की आणखी लाड चालवून घेणं शक्य नाही. एके दिवशी टाकली तिला तोडून. अशातच सिमल्याहून बलाईनं आपल्या काकूला एक पत्र पाठवलं, 'काकू, माझ्या त्या काटेसावरीचा एक फोटो पाठवून दे.' विलायतेला जाण्यापूर्वी एकदा तो आमच्याकडे येणार होता, ते काही जमलं नाही. म्हणून बलाईला आपल्या मित्राची छबी बरोबर न्यायची होती. त्याच्या काकूंनी मला हाक मारून म्हटलं, 'अहो, ऐकलंत का, एखाद्या फोटोवाल्याला बोलावून आणा.' मी विचारलं, 'कशाला!' बलाईच्या कच्च्या अक्षरातलं पत्र त्यांनी मला पाहायला दिलं. मी म्हटलं, 'ते झाड तर तोडलं गेलंय.' बलाईच्या काकूंनी दोन दिवस अन्नाला स्पर्श केला नाही, आणि पुष्कळ दिवस माझ्याशी एक शब्दही बोलल्या नाहीत. बलाईच्या बापानं त्याला त्यांच्या कुशीतून नेलं, ते जणू त्यांचं आतडं तोडूनच; आणि आता त्याच्या काकानं त्यांच्या बलाईचं लाडकं झाड कायमचं दूर केलं, त्याचाही घाव जणू त्यांच्या अवघ्या संसारावर बसला, त्यांच्या काळजात जखम करून गेला. ते झाड म्हणजे त्यांच्या बलाईचंच दुसरं रूप होतं, त्याचा जिवाभावाचा सोबती.