रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
देणेघेणे
पाच मुलांनंतर जेव्हा एक मुलगी झाली, तेव्हा आईबापांनी मोठ्या लाडाने तिचं नाव ठेवलं निरुपमा. या घराण्यात इतकं हौसेचं नाव याआधी कधी कुणी ऐकलं नव्हतं. बहुधा देवादिकांचीच नावं चालत असत — गणेश, कार्तिक, पार्वती ही त्यांची उदाहरणं. आता निरुपमेच्या लग्नाची बोलणी चालली आहेत. तिचे वडील रामसुंदर मित्र यांनी पुष्कळ शोध घेतला, पण कुठलाच मुलगा मनासारखा मिळेना. शेवटी एका बड्या रायबहादुरांच्या घरचा एकुलता एक मुलगा त्यांनी शोधून काढला आहे. या रायबहादुरांची वडिलोपार्जित मालमत्ता जरी बरीच घटत आली होती, तरी घराणं मात्र खानदानी होतं. वरपक्षाने दहा हजार रुपये हुंडा आणि भरपूर आंदण मागितलं. रामसुंदरांनी कसलाही विचार न करता ते मान्य केलं; असं स्थळ कुठल्याही परिस्थितीत हातचं जाऊ देता येत नव्हतं. पण पैशांची जुळवाजुळव काही केल्या होईना. गहाण टाकून, विकून, पुष्कळ खटपट करूनही सहा-सात हजार बाकी राहिले. इकडे लग्नाचा दिवस जवळ येऊन ठेपला होता. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. अगदी भरमसाट व्याजाने उरलेली रक्कम उसनी द्यायला एकजण कबूल झाला होता, पण ऐन वेळी तो आलाच नाही. लग्नमंडपात एकच हलकल्लोळ माजला. रामसुंदरांनी आपल्या रायबहादुरांचे हातपाय धरून विनवलं, 'शुभकार्य एकदा पार पडू द्या, मी ती रक्कम खात्रीने फेडून टाकीन.' रायबहादूर म्हणाले, 'पैसे हातात पडल्याशिवाय नवरदेव मंडपात येणार नाही.' या दुर्घटनेने अंतःपुरात एकच रडारड सुरू झाली. आणि या भयंकर संकटाचं जे मूळ कारण, ती शालू नेसून, दागिने घालून, कपाळाला चंदन लावून गप्प बसून आहे. होणाऱ्या सासरच्या मंडळींबद्दल तिच्या मनात फारशी भक्ती किंवा माया उपजत होती, असं म्हणता येणार नाही.
देणेघेणे
तेवढ्यात एक सोय झाली. नवरा मुलगा एकाएकी आपल्या पिताश्रींची आज्ञा मोडून उभा राहिला. तो बापाला सरळ म्हणाला, 'खरेदी-विक्रीचं, घासाघिशीचं मला काही कळत नाही; मी लग्न करायला आलो आहे, लग्न करूनच जाईन.' बाप जो दिसेल त्याला म्हणू लागला, 'पाहिलंत ना महाशय, आजकालच्या पोरांचं वागणं?' दोन-चार जाणती माणसं तिथे होती, ती म्हणाली, 'शास्त्राचं शिक्षण नाही, नीतीचं शिक्षण नाही — मग दुसरं काय होणार!' आधुनिक शिक्षणाचं हे विषारी फळ प्रत्यक्ष आपल्याच पोटच्या मुलात पाहून रायबहादूर हताश होऊन बसून राहिले. लग्न कसंबसं, उदास, आनंदहीन वातावरणात पार पडलं. सासरी जाताना निरुपमेला छातीशी धरून बापाला डोळ्यांतलं पाणी आवरता आलं नाही. निरूने विचारलं, 'बाबा, ते लोक मला पुन्हा इकडे येऊच देणार नाहीत का?' रामसुंदर म्हणाले, 'का येऊ देणार नाहीत, बाळ? मी तुला घेऊन येईन.' रामसुंदर वरचेवर मुलीला भेटायला जात, पण व्याह्यांच्या घरी त्यांना काडीचीही किंमत नव्हती. नोकरचाकरसुद्धा त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत. अंतःपुराबाहेरच्या एका वेगळ्या खोलीत पाच मिनिटांसाठी कधी मुलीची भेट होई, कधी तीही होत नसे. सोयऱ्यांच्या घरी असा अपमान आणखी सोसवेना. रामसुंदरांनी ठरवलं, काहीही करून ती रक्कम फेडून टाकायलाच हवी. पण खांद्यावर जे कर्ज आधीच चढलं होतं, त्याचंच ओझं सांभाळणं कठीण होऊन बसलं होतं. खर्चाची भयंकर ओढाताण होत होती, आणि देणेकऱ्यांच्या नजरेतून सुटण्यासाठी सतत नाना तऱ्हेच्या हीन युक्त्या कराव्या लागत होत्या. इकडे सासरी उठता-बसता मुलीला टोमणे ऐकावे लागत होते. माहेरची निंदा ऐकून, खोलीचं दार लावून अश्रू ढाळणं हा तिचा रोजचा नेम होऊन बसला होता.
देणेघेणे
त्यातही सासूचा राग तर काही केल्या शमत नव्हता. कुणी म्हणालं, 'अगं बाई, काय रूपकळा आहे! सुनेचा चेहरा पाहिला की डोळे निवतात,' की सासू फणकाऱ्याने म्हणे, 'मोठी रूपकळा! जशी घरची लेक, तशीच रूपकळा.' इतकंच काय, सुनेच्या खाण्यापिण्याची, नेसण्याची काळजीही कुणी घेत नसे. एखाद्या दयाळू शेजारणीने काही कमतरता बोलून दाखवली, तर सासू म्हणे, 'तेवढं पुष्कळ झालं.' म्हणजे, बापाने पुरी किंमत मोजली असती, तर पोरीचीही पुरी बडदास्त राखली गेली असती. सगळेच असं दाखवत, जणू या घरावर सुनेचा काही हक्कच नाही, ती फसवून आत घुसली आहे. मुलीच्या या हेळसांडीच्या आणि अपमानाच्या बातम्या बहुधा बापाच्या कानावर गेल्या असाव्यात. म्हणूनच रामसुंदर शेवटी राहतं घर विकायच्या खटपटीला लागले. पण आपण मुलांना बेघर करायला निघालो आहोत, ही गोष्ट त्यांनी मुलांपासून लपवून ठेवली. त्यांनी ठरवलं होतं, घर विकून तेच घर भाड्याने घेऊन त्यात राहायचं; आणि अशा युक्तीने वागायचं की आपल्या मरणापूर्वी ही गोष्ट मुलांना कळणारच नाही. पण मुलांना ते कळलं. सगळे येऊन रडू लागले. त्यातही थोरले तिघे मुलगे विवाहित होते, आणि त्यांच्यापैकी कुणाकुणाला मुलंबाळंही होती. त्यांचा विरोध फार तीव्र झाला, आणि घराची विक्री थांबली. तेव्हा रामसुंदर ठिकठिकाणाहून जबर व्याजाने थोडी थोडी रक्कम उसनी घेऊ लागले. अखेर अशी वेळ आली की संसाराचा खर्चही भागेना. निरूने बापाचा चेहरा पाहूनच सगळं ओळखलं. म्हाताऱ्याच्या पिकलेल्या केसांत, सुकलेल्या चेहऱ्यात आणि सतत अवघडलेल्या वागण्यात दैन्य आणि काळजी उघड दिसू लागली होती. मुलीपुढे जेव्हा बाप अपराधी असतो, तेव्हा त्या अपराधाचा पश्चात्ताप लपवून ठेवता येतो का? व्याह्यांच्या परवानगीने रामसुंदरांना जेव्हा घटकाभर मुलीची भेट मिळे, तेव्हा बापाचं काळीज कसं फाटत असे, ते त्यांचं हसू पाहिलं की कळून येई.
देणेघेणे
त्या दुखावलेल्या पितृहृदयाचं सांत्वन करावं म्हणून काही दिवस माहेरी जायला निरू अगदी अधीर झाली होती. बापाचा उतरलेला चेहरा पाहून तिला आता दूर राहवत नव्हतं. एके दिवशी ती रामसुंदरांना म्हणाली, 'बाबा, मला एकदा घरी घेऊन चल.' रामसुंदर म्हणाले, 'बरं.' पण त्यांचा काय जोर चालणार! बापाचा आपल्या पोटच्या मुलीवर जो स्वाभाविक हक्क असतो, तो जणू हुंड्याच्या रकमेच्या बदल्यात गहाण ठेवावा लागला होता. इतकंच काय, मुलीचं दर्शनही अगदी संकोचाने भिकेसारखं मागावं लागे, आणि कधी नकार मिळाला, तर दुसरा शब्द काढायला तोंड उरत नसे. पण मुलगी स्वतःहून घरी यायचं म्हणते आहे, तर बाप तिला न आणता कसा राहील? म्हणून त्याबद्दल व्याह्यांपुढे अर्ज करण्यापूर्वी रामसुंदरांनी किती हीनपणा, किती अपमान, किती नुकसान सोसून ते तीन हजार रुपये गोळा केले, तो इतिहास झाकलेलाच बरा. त्या नोटा रुमालात गुंडाळून, उपरण्याच्या टोकाला बांधून रामसुंदर व्याह्यांजवळ जाऊन बसले. आधी हसतमुखाने गावातल्या गप्पा काढल्या. हरेकृष्णाच्या घरी मोठी चोरी झाली होती, तिचं साद्यंत वर्णन केलं; नवीनमाधव आणि राधामाधव या दोघा भावांची तुलना करून, विद्याबुद्धी आणि स्वभाव यांबाबतीत राधामाधवाची स्तुती आणि नवीनमाधवाची निंदा केली; शहरात एक नवा रोग आला होता, त्याबद्दल पुष्कळ अचाट चर्चा केली; आणि शेवटी हुक्का खाली ठेवून, बोलता बोलता सहज म्हणाले, 'हां हां, व्याही, ती रक्कम बाकी आहे खरी. रोज मनात म्हणतो, जातोच आहे तर जाता जाता हाताशी थोडं काही घेऊन जावं, पण ऐन वेळी लक्षातच राहत नाही. काय करणार भाऊ, म्हातारा झालो आता.' अशी लांबलचक प्रस्तावना करून, बरगड्यांतली तीन हाडं काढून द्यावीत तशा त्या तीन नोटा त्यांनी जणू अगदी सहज, अगदी बेफिकिरीने बाहेर काढल्या. जेमतेम तीन हजार रुपयांच्या नोटा पाहून रायबहादूर गडगडाटी हसले.
देणेघेणे
म्हणाले, 'राहू द्या व्याही, त्याची मला काही गरज नाही.' बंगालीतल्या एका प्रचलित म्हणीचा दाखला देऊन ते म्हणाले, एवढ्याशा कारणासाठी हाताला दुर्गंधी लावून घ्यायची त्यांची इच्छा नाही. या प्रसंगानंतर मुलीला घरी आणण्याचा विषय कुणाच्याही तोंडून निघणं शक्य नव्हतं — फक्त रामसुंदरांना वाटलं, 'असला सोयरेपणाचा संकोच आता मला शोभत नाही.' मनातून घायाळ होऊन बराच वेळ गप्प बसल्यावर शेवटी त्यांनी हळू आवाजात विषय काढला. रायबहादुरांनी कसलंही कारण न सांगता म्हटलं, 'ते आता होणार नाही.' आणि असं म्हणून कामाच्या निमित्ताने ते दुसरीकडे निघून गेले. मुलीला तोंड न दाखवता, थरथरत्या हातांनी त्या थोड्या नोटा उपरण्याच्या टोकाला बांधून रामसुंदर घरी परतले. त्यांनी मनाशी प्रतिज्ञा केली, जोपर्यंत सगळी रक्कम फेडून निःसंकोचपणे मुलीवर हक्क सांगता येणार नाही, तोपर्यंत व्याह्यांच्या घरी पाऊल टाकायचं नाही. बरेच दिवस गेले. निरुपमा माणसामागून माणूस पाठवते, पण बापाची भेट होत नाही. शेवटी रुसून तिने माणसं पाठवणं बंद केलं — तेव्हा रामसुंदरांच्या मनाला मोठा धक्का बसला, पण तरीही ते गेले नाहीत. आश्विन महिना आला. रामसुंदर म्हणाले, 'या खेपेला पूजेच्या दिवसांत लेकीला घरी आणणारच, नाहीतर मी—'. आणि त्यांनी कसलीशी कडक शपथ घेतली.
देणेघेणे
पंचमीला की षष्ठीला, पुन्हा उपरण्याच्या टोकाला काही नोटा बांधून रामसुंदर निघायच्या तयारीला लागले. पाच वर्षांचा एक नातू येऊन म्हणाला, 'आजोबा, माझ्यासाठी गाडी आणायला चाललास?' कितीतरी दिवसांपासून त्याला ढकलगाडीत बसून फिरायला जायची हौस लागली होती, पण ती पुरी होण्याचा काही मार्गच दिसत नव्हता. सहा वर्षांची एक नात येऊन रडत रडत म्हणाली, पूजेच्या आमंत्रणाला जाण्याजोगा तिच्यापाशी एकही चांगला कपडा नाही. रामसुंदरांना ते ठाऊक होतं, आणि तंबाखू ओढता ओढता म्हाताऱ्याने त्याचा पुष्कळ विचार केला होता. रायबहादुरांच्या घरी पूजेचं आमंत्रण येईल, तेव्हा आपल्या सुनांना अगदी जुजबी दागिने घालून, कुणाच्या तरी कृपेवर जगणाऱ्या गरिबांसारखं जावं लागेल, या आठवणीने त्यांनी किती तरी उसासे टाकले होते; पण त्यामुळे कपाळावरच्या वार्धक्याच्या रेषा अधिक खोल उमटण्यापलीकडे दुसरं काहीच निष्पन्न झालं नव्हतं. दैन्याने गांजलेल्या घरातला तो रडण्याचा आवाज कानात घेऊनच म्हातारा व्याह्यांच्या घरात शिरला. आज त्यांच्या वागण्यात तो संकोच नव्हता; द्वारपालांच्या आणि नोकरांच्या चेहऱ्यांकडे टाकलेली ती चोरटी, लाजरी नजर नाहीशी झाली होती — जणू ते स्वतःच्याच घरात शिरले होते. त्यांना कळलं, रायबहादूर घरी नाहीत, थोडा वेळ थांबावं लागेल. मनातला उमाळा आवरता न आल्याने रामसुंदर मुलीला जाऊन भेटले. आनंदाने दोघांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. बापही रडतो, मुलगीही रडते; दोघांपैकी कुणालाच शब्द फुटत नाही. असा काही वेळ गेला. मग रामसुंदर म्हणाले, 'या खेपेला तुला घेऊनच जातोय, बाळ. आता कसलीही अडचण नाही.'
देणेघेणे
इतक्यात रामसुंदरांचा थोरला मुलगा हरमोहन आपल्या दोन लहान मुलांना बरोबर घेऊन एकाएकी खोलीत आला. वडिलांना म्हणाला, 'बाबा, म्हणजे या खेपेला आम्हाला देशोधडीला लावलंत तर?' रामसुंदर एकदम संतापाने लालबुंद होऊन म्हणाले, 'तुमच्यासाठी मी काय नरकात जाऊ? माझं वचन मला पाळू देणार नाही का तुम्ही?' रामसुंदर घर विकून मोकळे झाले होते; मुलांना काही केल्या कळू नये म्हणून त्यांनी पुष्कळ व्यवस्था केली होती, पण तरीही त्यांना कळलं हे पाहून ते त्यांच्यावर एकदम अतिशय रागावले, चिडले. त्यांच्या नातवाने त्यांचे दोन्ही गुडघे घट्ट धरून, वर तोंड करून विचारलं, 'आजोबा, मला गाडी नाही आणून दिलीस?' मान खाली घातलेल्या रामसुंदरांकडून काहीच उत्तर न मिळाल्याने तो मुलगा निरूकडे जाऊन म्हणाला, 'आत्या, मला एक गाडी घेऊन देशील?' निरुपमेने सगळा प्रकार ओळखला आणि ती म्हणाली, 'बाबा, तू आणखी एक पैसाही माझ्या सासऱ्यांना दिलास, तर पुन्हा तुझ्या मुलीचं तोंड पाहणार नाहीस. तुझ्या अंगाला हात लावून सांगते.' रामसुंदर म्हणाले, 'छी बाळ, असं बोलू नये. आणि ही रक्कम मी देऊ शकलो नाही, तर तो तुझ्या बापाचा अपमान, आणि तुझाही अपमान.' निरू म्हणाली, 'पैसे दिलेस तरच अपमान. तुझ्या मुलीला काहीच मान नाही का? मी काय नुसती पैशाची थैली आहे — जोवर पैसा आहे तोवरच माझी किंमत? नाही बाबा, हे पैसे देऊन तू माझा अपमान करू नकोस. शिवाय माझ्या यजमानांना तर हे पैसे नकोच आहेत.' रामसुंदर म्हणाले, 'मग ते तुला येऊ देणार नाहीत, बाळ.' निरुपमा म्हणाली, 'नाही येऊ दिलं तर काय करणार, सांग बरं. तूही आता मला न्यायचं मनात आणू नकोस.'
देणेघेणे
रामसुंदरांनी थरथरत्या हातांनी नोटा बांधलेलं उपरणं खांद्यावर टाकलं, आणि पुन्हा चोरासारखे सगळ्यांची नजर चुकवून ते घरी परतले. पण रामसुंदर हे पैसे घेऊन आले होते आणि मुलीने अडवल्यामुळे ते न देताच निघून गेले, ही गोष्ट लपून राहिली नाही. दाराला कान लावून बसायची सवय असलेल्या कुणा उपजत चौकस दासीने ही बातमी निरूच्या सासूला दिली. ते ऐकून सासूच्या रागाला पारावार उरला नाही. निरुपमेला सासर म्हणजे शरपंजरच झालं. इकडे तिचा नवरा लग्नानंतर थोड्याच दिवसांत डेप्युटी मॅजिस्ट्रेट होऊन परगावी निघून गेला होता; आणि संगतीच्या दोषाने हलकेपणा अंगी येईल, या सबबीवर अलीकडे माहेरच्या माणसांना निरूला भेटायला पूर्ण बंदी घालण्यात आली होती. याच सुमारास निरू गंभीर आजारी पडली. पण त्याबद्दल तिच्या सासूलाच संपूर्ण दोष देता येणार नाही. ती स्वतःच्या शरीराची अतिशय हेळसांड करीत असे. कार्तिकातल्या दवाच्या दिवसांत रात्रभर उशाशी दार उघडं, थंडीच्या दिवसांत अंगावर पांघरूण नाही. खाण्यापिण्याला वेळ ना नेम. दासी जेव्हा मधूनमधून जेवण आणायला विसरत, तेव्हा तोंड उघडून त्यांना एकदा आठवण करून देणं, एवढंही ती करीत नसे. आपण परक्याच्या घरी, तिथल्या दासदासींच्या आणि मालक-मालकिणींच्या कृपेवर जगतो आहोत, ही भावना तिच्या मनात खोल रुजत चालली होती. पण तिचा हा भावही सासूला सहन होत नसे. सुनेचं खाण्याकडे जरा दुर्लक्ष दिसलं, की सासू म्हणे, 'नवाबाच्या घरची लेक ना! गरिबाघरचं अन्न बाईसाहेबांच्या तोंडी कसं रुचेल!' कधी म्हणे, 'बघा तरी एकदा, रूपकळा कशी खुलतेय बघा — दिवसेंदिवस जळक्या लाकडासारखी होत चाललीय.'
देणेघेणे
आजार गंभीर झाला, तेव्हा सासू म्हणाली, 'सगळी बाईसाहेबांची नाटकं.' शेवटी एके दिवशी निरू अगदी नम्रपणे सासूला म्हणाली, 'आई, बाबांना आणि माझ्या भावांना एकदा पाहायचं आहे.' सासू म्हणाली, 'माहेरी जायचं नुसतं निमित्त.' कुणी सांगितलं तर खरं वाटणार नाही — ज्या दिवशी संध्याकाळी निरूला घरघर लागली, त्याच दिवशी पहिल्यांदा डॉक्टरने तिला पाहिलं, आणि त्याच दिवशी डॉक्टरच्या भेटी संपल्याही. * * * घरची थोरली सून मेली; मोठ्या थाटामाटात अंत्यसंस्कार पार पडले. मूर्तिविसर्जनाच्या थाटाबद्दल जिल्ह्यात जशी रायचौधरींची सर्वतोमुखी ख्याती आहे, तशीच थोरल्या सुनेच्या अंत्यसंस्काराबद्दल रायबहादुरांची ख्याती पसरली — अशी चंदनाच्या लाकडाची चिता या मुलखात कुणी कधी पाहिली नव्हती. इतक्या थाटाचं श्राद्धही फक्त रायबहादुरांच्या घरीच होऊ शकतं; आणि ऐकिवात आहे की त्यासाठी त्यांना थोडं कर्जही झालं होतं. रामसुंदरांचं सांत्वन करताना, त्यांच्या मुलीला किती मोठ्या थाटामाटात मरण आलं, याचं सगळ्यांनी भरभरून वर्णन केलं. इकडे डेप्युटी मॅजिस्ट्रेटचं पत्र आलं, 'मी इथे सगळी व्यवस्था करून घेतली आहे, तेव्हा माझ्या पत्नीला ताबडतोब इकडे पाठवून द्यावे.' रायबहादुरांच्या धर्मपत्नींनी लिहिलं, 'बाळा, तुझ्यासाठी आणखी एका मुलीचं स्थळ ठरवलं आहे, तेव्हा ताबडतोब रजा घेऊन इकडे ये.' या खेपेला हुंडा वीस हजार रुपये — आणि तोही हातोहात वसूल.