रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
दिदी
१ गावात राहणाऱ्या कुणा एका अभागिनीच्या अन्यायी, जुलमी नवऱ्याची सगळी दुष्कृत्ये सविस्तर वर्णन करून झाल्यावर शेजारीण तारा हिने अगदी थोडक्यात आपला निकाल जाहीर केला, 'असल्या नवऱ्याच्या तोंडात आग पडो!' ते ऐकून जयगोपालबाबूंची पत्नी शशी हिला फार क्लेश झाले. नवरा नावाच्या जातीच्या तोंडात चिरुटाची आग सोडून दुसरी कुठलीही आग, कुठल्याही परिस्थितीत चिंतणे स्त्रीजातीला शोभत नाही. म्हणून तिने या बाबतीत जरा कचरल्यासारखे केले, तेव्हा कठोर काळजाची तारा दुप्पट उत्साहाने म्हणाली, 'असला नवरा असण्यापेक्षा सात जन्म विधवा राहिलेलं बरं.' एवढे बोलून ती सभा बरखास्त करून निघून गेली. शशी मनाशीच म्हणाली, 'नवऱ्याचा असा कुठलाही अपराध मला कल्पनेतसुद्धा आणता येत नाही, की ज्यामुळे त्यांच्याविषयी मन इतकं कठोर व्हावं.' हा विचार मनात घोळवता घोळवताच तिच्या कोमल हृदयातला सगळा प्रेमरस परदेशी गेलेल्या नवऱ्याच्या दिशेने उचंबळून आला. अंथरुणावर नवरा ज्या बाजूला झोपत असे त्या बाजूवर हात पसरून ती पडून राहिली, रिकाम्या उशीचे तिने चुंबन घेतले, उशीत तिला नवऱ्याच्या डोक्याचा वास जाणवला; मग दार लावून घेऊन, लाकडी पेटीतून नवऱ्याचा एक फार जुना, जवळजवळ पुसट झालेला फोटोग्राफ आणि त्याच्या हातची पत्रे काढून ती बसली. त्या दिवशीची निःस्तब्ध दुपार अशी एकांत खोलीत, निर्जन चिंतनात, जुन्या आठवणींत आणि विषादाच्या अश्रूंत सरून गेली.
दिदी
शशिकला आणि जयगोपाल यांचा संसार काही नवा नव्हता. लहानपणीच लग्न झाले होते, मधल्या काळात मुलेबाळेही झाली होती. दोघांनी बरीच वर्षे एकत्र राहून अगदी साध्या, सरळ, सर्वसामान्य रीतीने दिवस काढले होते; कोणत्याही बाजूने प्रेमाचा अमर्याद उमाळा कधी दिसला नव्हता. जवळजवळ सोळा वर्षे सलग, एकही दिवस न दुरावता काढल्यानंतर अचानक कामाच्या ओढीने नवरा परदेशी निघून गेला, आणि मग शशीच्या मनात एक प्रबळ प्रेमावेग जागा झाला. विरहाने बंधनाला जसजसा ताण पडू लागला, तसतसा कोमल हृदयात प्रेमाचा फास अधिकच घट्ट आवळला गेला; सैल असताना ज्याचे अस्तित्वही जाणवले नव्हते, त्याची आता ठसठस लागू लागली. म्हणून आज इतक्या दिवसांनी, या वयात, मुलांची आई झाल्यावर, शशी वसंतातल्या दुपारी निर्जन खोलीत विरहशय्येवर पडून, नुकतेच तारुण्य उमललेल्या नववधूची सुखस्वप्ने पाहू लागली. जे प्रेम नकळत आयुष्याच्या समोरून वाहून गेले होते, त्याच्याच खळखळत्या गाण्याने ती आज अचानक जागी झाली, आणि मनातल्या मनात त्याच प्रवाहाच्या उलट दिशेने जाताना तिला दोन्ही तीरांवर दूरदूरवर कितीतरी सोन्याच्या नगरी, कितीतरी कुंजवने दिसू लागली; पण गतकाळातल्या त्या सुखाच्या शक्यतांमध्ये आता पाऊल ठेवायला जागा उरली नव्हती. ती मनाशी म्हणू लागली, 'आता नवरा जवळ आला की आयुष्य नीरस होऊ देणार नाही, वसंत वाया जाऊ देणार नाही.' कितीतरी दिवस, कितीतरी वेळा क्षुल्लक वादात, किरकोळ भांडणात तिने नवऱ्याला सतावले होते; आज पश्चात्तापाने भरलेल्या मनाने तिने एकचित्ताने संकल्प केला: पुन्हा कधीही असहिष्णुता दाखवायची नाही, नवऱ्याच्या इच्छेच्या आड यायचे नाही, नवऱ्याची आज्ञा पाळायची, प्रेमाने भरलेल्या नम्र मनाने नवऱ्याचे बरेवाईट सगळे वागणे मुकाट्याने सोसायचे; कारण, पती हेच सर्वस्व, पती हाच प्रियतम, पती हाच देव.
दिदी
बरीच वर्षे शशिकला आपल्या आईवडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्यामुळे जयगोपालची नोकरी साधारण असली, तरी त्याला भविष्याची काहीच चिंता नव्हती. खेड्यात राजेशाही थाटात राहायला पुरेल एवढी मालमत्ता त्याच्या सासऱ्यांकडे होती. अशातच, अगदी अवेळी, जवळजवळ म्हातारपणी शशिकलेचे वडील कालीप्रसन्न यांना एक मुलगा झाला. खरे सांगायचे तर, आईवडिलांच्या या अनपेक्षित, विसंगत, अन्याय्य वर्तनाने शशी मनातून फार दुखावली होती; जयगोपालही काही विशेष खूश झाला नव्हता. उतारवयात झालेल्या या मुलावर आईवडिलांची माया फारच दाट झाली. हा नवा आलेला, चिमुकला, सदा दुधाला भुकेला, सदा झोपाळलेला मेहुणा आपल्या दोन दुबळ्या हातांच्या इवल्याशा मुठींत नकळत जयगोपालच्या सगळ्या आशाअपेक्षा हिरावून बसला, तेव्हा जयगोपालने आसामच्या चहाच्या मळ्यात एक नोकरी पत्करली. जवळपासच कुठे नोकरी शोधावी म्हणून सगळ्यांनी त्याला आग्रह केला होता. पण सगळ्या जगावरच्या रागाने म्हणा, किंवा चहाच्या मळ्यात झपाट्याने वर चढण्याचा काही मार्ग ठाऊक असल्यामुळे म्हणा, जयगोपालने कुणाचेच ऐकले नाही; शशीला मुलांसह तिच्या माहेरी ठेवून तो आसामला निघून गेला. लग्नानंतरच्या आयुष्यातला नवरा-बायकोचा हा पहिलाच वियोग. या प्रकाराने शशिकलेला आपल्या तान्ह्या भावाचा भारी राग आला. जे दुःख तोंड उघडून सांगायची सोय नसते, त्याचाच जळफळाट सगळ्यात जास्त होतो. तो इवलासा जीव आरामात अंगावर पीत होता आणि डोळे मिटून झोपा काढत होता; आणि त्याची मोठी बहीण दूध गरम आहे, भात गार झाला, मुलाला शाळेला जायला उशीर होतो आहे, अशा नाना निमित्तांनी रात्रंदिवस रुसूनफुगून स्वतःही बेचैन झाली आणि सगळ्यांनाही बेचैन करून सोडले.
दिदी
थोड्याच दिवसांत मुलाची आई वारली; मरण्यापूर्वी आपले तान्हे मूल ती आपल्या मुलीच्या हाती सोपवून गेली. मग फार दिवस न जाता त्या आईवेगळ्या मुलाने अगदी सहज आपल्या दिदीचे हृदय जिंकून घेतले. 'हुहुंऽ' असा हुंकार देत तो तिच्यावर झेप घालून मोठ्या उत्सुकतेने आपल्या बोळक्या चिमुकल्या तोंडात तिचे तोंड, डोळे, नाक सगळेच गिळून टाकायचा प्रयत्न करू लागे, इवल्याशा मुठीत तिच्या केसांचा झुबका धरून काही केल्या तो कबजा सोडत नसे, सूर्य उगवण्याआधीच जागा होऊन लोळत लोळत तिच्या अंगापाशी येई आणि कोमल स्पर्शाने तिला पुलकित करून मोठा गलका सुरू करी; आणि पुढे तो तिला 'जिजी' आणि 'जिजीमा' म्हणून हाक मारू लागला, आणि कामाच्या वेळी, फुरसतीच्या वेळी मनाई असलेली कामे करून, मनाई असलेले पदार्थ खाऊन, मनाई असलेल्या ठिकाणी जाऊन तिला यथासांग सतावू लागला, तेव्हा मात्र शशीला राहवले नाही. या स्वच्छंदी चिमुकल्या जुलमी राजापुढे तिने स्वतःला पूर्णपणे स्वाधीन करून टाकले. मुलाला आई नव्हती, म्हणून त्याच्यावर तिची सत्ताही खूप जास्त चालू लागली. २ मुलाचे नाव ठेवले नीलमणी. तो दोन वर्षांचा असताना त्याचे वडील कठीण आजारी पडले. ताबडतोब निघून यावे म्हणून जयगोपालला पत्र गेले. जयगोपाल मोठ्या प्रयासाने रजा मिळवून येऊन पोहोचला, तेव्हा कालीप्रसन्नांची अखेरची घटका जवळ आली होती. मृत्यूपूर्वी कालीप्रसन्नांनी अल्पवयीन मुलाच्या देखभालीची जबाबदारी जयगोपालवर सोपवली आणि आपल्या मालमत्तेचा एक चतुर्थांश हिस्सा मुलीच्या नावे लिहून दिला. त्यामुळे इस्टेट सांभाळण्यासाठी जयगोपालला नोकरी सोडून परत यावे लागले.
दिदी
बऱ्याच दिवसांनी नवरा-बायकोची पुनर्भेट झाली. एखादी निर्जीव वस्तू तुटली, तर ती पुन्हा अगदी तिच्या खाचाखोचांसह जुळवता येते. पण दोन माणसांना जिथे तोडले जाते, तिथे दीर्घ ताटातुटीनंतर ती पुन्हा रेषेला रेषा जुळत नाहीत; कारण मन ही सजीव वस्तू आहे; क्षणाक्षणाला ती वाढते, बदलते. शशीच्या बाबतीत या नव्या मीलनाने नव्या भावनांचा संचार झाला. जणू तिने आपल्या नवऱ्याशी पुन्हा लग्न केले. जुन्या संसारात वर्षानुवर्षांच्या सवयीने जो एक बधिरपणा साचला होता, तो विरहाच्या ओढीने दूर झाला आणि आपला नवरा तिला जणू पूर्वीपेक्षा अधिक संपूर्णपणे लाभला. तिने मनोमन प्रतिज्ञा केली, कसेही दिवस येवोत, कितीही दिवस जावोत, नवऱ्याविषयीच्या या प्रदीप्त प्रेमाची झळाळी कधीही फिकी पडू देणार नाही. नव्या मीलनात जयगोपालच्या मनाची अवस्था वेगळी होती. पूर्वी दोघे सतत एकत्र होते, बायकोशी त्याचे सगळे स्वार्थ आणि नाना सवयी एकजीव बांधल्या गेल्या होत्या, तेव्हा बायको हे आयुष्यातले एक नित्याचे सत्य झाले होते; तिला वगळू म्हटले तर रोजच्या सवयींच्या जाळ्यात एकदम मोठे भगदाड पडले असते. म्हणूनच परदेशी गेल्यावर सुरुवातीला जयगोपाल अगदी खोल पाण्यात पडल्यासारखा झाला होता. पण हळूहळू त्या तुटलेल्या सवयींना नव्या सवयींची ठिगळे लागून गेली. एवढेच नव्हे. पूर्वी अगदी निरुद्योगी, निश्चिंतपणे त्याचे दिवस जात. मधल्या दोन वर्षांत परिस्थिती सुधारण्याची धडपड त्याच्या मनात इतक्या जोराने जागी झाली होती, की त्याच्या डोळ्यांपुढे दुसरे काहीच उरले नव्हते. या नव्या नशेच्या तीव्रतेपुढे त्याचे पूर्वीचे आयुष्य वस्तुहीन सावलीसारखे दिसू लागले. स्त्रीच्या स्वभावात मोठा बदल घडवते ते प्रेम, आणि पुरुषाच्या स्वभावात दुराकांक्षा.
दिदी
दोन वर्षांनी परत आल्यावर जयगोपालला आपली पूर्वीची बायको जशीच्या तशी परत मिळाली नाही. त्याच्या बायकोच्या आयुष्याला त्या तान्ह्या मेहुण्याने एक नवा विस्तार जोडला होता. हा भाग त्याला पूर्णपणे अपरिचित होता; या भागात बायकोशी त्याचा काहीच संबंध नव्हता. आपल्या या बाळावरच्या मायेत त्यालाही वाटा द्यावा म्हणून बायको खूप प्रयत्न करी; पण ते खरोखर कितपत साधे, ते मी सांगू शकत नाही. शशी नीलमणीला कडेवर घेऊन येई आणि हसऱ्या चेहऱ्याने नवऱ्यापुढे धरी; नीलमणी जिवाच्या आकांताने शशीच्या गळ्याला मिठी मारून तिच्या खांद्यात तोंड लपवी, नात्यागोत्याची कसलीच भीडमुर्वत मानत नसे. आपल्या या धाकट्या भावाला मन रिझवण्याच्या जितक्या कला अवगत आहेत, त्या सगळ्या जयगोपालपुढे प्रकट व्हाव्यात अशी शशीची इच्छा; पण जयगोपालही त्याबद्दल फारसा उत्सुक नसे आणि ते बाळही फारसा उत्साह दाखवत नसे. या किडकिडीत, मोठ्या डोक्याच्या, गंभीर चेहऱ्याच्या, सावळ्या पोरात असे काय आहे, की ज्यासाठी त्याच्यावर एवढी माया उधळली जाते आहे, हे जयगोपालला काही केल्या कळत नसे. प्रेमाचे रंगढंग बायकांना फार चटकन कळतात. जयगोपालला नीलमणीविषयी फारशी ओढ नाही, हे शशीने लगेच ओळखले. मग ती भावाला मोठ्या काळजीने आडोशाला ठेवू लागली; नवऱ्याच्या मायाहीन, नावडीच्या नजरेपासून त्याला दूर ठेवायचा प्रयत्न करू लागली. अशा रीतीने तो मुलगा तिचे लपवून जपलेले धन, केवळ तिच्या एकटीच्या मायेचा ठेवा होऊन बसला. सर्वांना ठाऊकच आहे, माया जितकी गुपित, जितकी एकांतातली, तितकी ती अधिकच प्रबळ होत जाते.
दिदी
नीलमणी रडू लागला की जयगोपाल फार चिडत असे. म्हणून शशी त्याला घाईघाईने छातीशी कवटाळून, सगळ्या जिवाने, सगळ्या उराने त्याचे रडे थांबवण्याचा प्रयत्न करी; विशेषतः नीलमणीच्या रडण्याने रात्री नवऱ्याची झोपमोड झाली आणि त्या रडक्या पोराविषयी अगदी हिंस्र तिरस्कार दाखवत नवरा वैतागून गरजू लागला, तर शशी जणू एखाद्या अपराधिनीसारखी संकोचून, धांदलून जाई, ताबडतोब त्याला कडेवर घेऊन दूर नेई आणि अगदी विनवणीच्या मायाळू सुरात 'माझं सोनं ते, माझं धन ते, माझं माणिक ते' म्हणत त्याला थोपटून झोपवू लागे. मुलामुलांमध्ये नाना कारणांवरून भांडणे, तंटे होतच असतात. पूर्वी अशा वेळी शशी आपल्या मुलांना शिक्षा करून भावाची बाजू घेई, कारण त्याला आई नव्हती. आता न्यायाधीश बदलला, तशी दंडसंहिताही बदलली. आता नेहमीच नीलमणीला निरपराध असताना, अन्यायाने कठोर शिक्षा भोगावी लागे. तो अन्याय शशीच्या काळजात भाल्यासारखा रुते; म्हणून ती शिक्षा झालेल्या भावाला खोलीत नेऊन, खाऊ देऊन, खेळणी देऊन, लाड करून, पापे घेऊन त्या बाळाच्या दुखावलेल्या मनाचे शक्य तितके सांत्वन करण्याचा प्रयत्न करी. परिणाम असा दिसून आला, की शशी नीलमणीवर जितकी माया करी, जयगोपाल नीलमणीवर तितकाच वैतागे; आणि जयगोपाल नीलमणीविषयी जितकी नावड दाखवी, शशी त्याला तितकीच मायेच्या अमृताने न्हाऊ घाली. जयगोपाल हा माणूस आपल्या बायकोशी कधीच कठोरपणे वागत नसे, आणि शशीही मुकाट्याने, नम्रपणे, प्रेमाने नवऱ्याची सेवा करीत असे; फक्त या नीलमणीवरून दोघे आतल्या आत एकमेकांवर सतत घाव घालू लागले. असे मूक, छुपे घाव-प्रतिघाव उघड भांडणापेक्षा कितीतरी अधिक असह्य असतात.
दिदी
३ नीलमणीच्या सबंध शरीरात डोके हाच सर्वात प्रमुख भाग होता. पाहताना वाटे, विधात्याने जणू एका बारीक काडीत फुंकर घालून तिच्या टोकावर एक मोठा बुडबुडा फुगवला आहे. डॉक्टरसुद्धा अधूनमधून भीती व्यक्त करीत, की हे मूल अशा बुडबुड्यासारखेच क्षणभंगुर, क्षणजीवी ठरेल. बराच काळ तो बोलायला आणि चालायला शिकला नव्हता. त्याचा उदास, गंभीर चेहरा पाहून वाटे, त्याच्या आईवडिलांनी आपल्या उतारवयातल्या सगळ्या चिंतांचे ओझे या चिमुकल्या बाळाच्या डोक्यावर लादून ते निघून गेले आहेत. दिदीच्या काळजीने आणि शुश्रूषेने नीलमणीने आपला धोक्याचा काळ पार केला आणि सहाव्या वर्षात पाऊल टाकले. कार्तिक महिन्यात भाऊबिजेच्या दिवशी नवा सदरा, उपरणे आणि लाल काठाचे एक धोतर नेसवून, नीलमणीला छोट्या बाबूसारखे सजवून शशीने त्याला भाऊबिजेचा टिळा लावला होता, इतक्यात पूर्वी सांगितलेली ती स्पष्टवक्ती शेजारीण तारा आली आणि बोलता बोलता तिने शशीशी भांडण उकरून काढले. ती म्हणाली, 'गुपचूप भावाचं वाटोळं करायचं आणि मोठ्या थाटामाटानं भावाच्या कपाळाला टिळा लावायचा, याला काही अर्थ नाही.' ते ऐकून शशी आश्चर्याने, संतापाने, वेदनेने वज्राघात झाल्यासारखी सुन्न झाली. शेवटी तिच्या कानी आले, की ती आणि तिचा नवरा मिळून संगनमताने अल्पवयीन नीलमणीची मालमत्ता थकलेल्या खंडापायी लिलावात काढायला लावत आहेत आणि ती नवऱ्याच्या आतेभावाच्या नावावर बेनामी विकत घेत आहेत. ते ऐकून शशीने शाप दिला, 'जे लोक एवढी मोठी खोटी गोष्ट पसरवू शकतात, त्यांच्या तोंडाला महारोग होवो!' एवढे बोलून ती रडत रडत नवऱ्यापाशी गेली आणि लोकांत चाललेली ही चर्चा तिने त्याला सांगितली.
दिदी
जयगोपाल म्हणाला, 'आजकालच्या दिवसांत कुणावरही विश्वास ठेवायची सोय नाही. उपेन माझा सख्खा आतेभाऊ; त्याच्यावर इस्टेटीचा भार टाकून मी अगदी निश्चिंत होतो. त्यानं केव्हा गुपचूप खंड थकवून हासिलपूर महाल स्वतःच विकत घेतला, ते मला कळलंसुद्धा नाही.' शशीने आश्चर्याने विचारले, 'तुम्ही फिर्याद नाही करणार?' जयगोपाल म्हणाला, 'भावाविरुद्ध फिर्याद करू तरी कशी? आणि फिर्याद करूनसुद्धा काही फायदा नाही, नुसता पैसा फुकट जायचा.' नवऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवणे हे शशीचे परम कर्तव्य, पण तिला काही केल्या विश्वास ठेवता आला नाही. तेव्हा हा सुखाचा संसार, हा प्रेमाचा गृहस्थाश्रम अचानक तिला अतिशय विकट, बीभत्स रूपात दिसू लागला. जो संसार तिला आपला परम आधार वाटत होता, तो एक निष्ठुर स्वार्थाचा फास आहे आणि त्याने त्या दोघा बहीणभावांना चारी बाजूंनी घेरले आहे, असे तिला अचानक दिसले. ती एकटी बाई, असहाय नीलमणीचे रक्षण कसे करणार, याचा विचार करताना तिला काही केल्या थांग लागेना. ती जितका अधिक विचार करू लागली, तितके भीतीने, घृणेने आणि संकटात सापडलेल्या आपल्या धाकट्या भावाविषयीच्या अपार मायेने तिचे हृदय भरून आले. तिला वाटू लागले, उपाय ठाऊक असता तर लाटसाहेबांकडे अर्ज करून, इतकेच काय, महाराणींना पत्र लिहून ती आपल्या भावाची मालमत्ता वाचवू शकली असती. नीलमणीचा वर्षाला सातशे अठ्ठावन्न रुपये नफा देणारा हासिलपूर महाल महाराणींनी कधीही विकला जाऊ दिला नसता. अशा रीतीने शशी थेट महाराणींच्या दरबारात दाद मागून आपल्या आतेदिराची पुरती जिरवण्याचे उपाय शोधत होती, तोच अचानक नीलमणीला ताप भरला आणि झटके येऊन तो बेशुद्ध पडू लागला.
दिदी
जयगोपालने गावातल्या एका नेटिव्ह डॉक्टरला बोलावले. शशीने चांगल्या डॉक्टरसाठी विनंती केली, तेव्हा जयगोपाल म्हणाला, 'का? मतिलाल काय वाईट डॉक्टर आहे!' तेव्हा शशी त्याच्या पाया पडली, त्याला आपल्या गळ्याची शपथ घातली; जयगोपाल म्हणाला, 'बरं, शहरातून डॉक्टरला बोलवायला माणूस पाठवतो.' शशी नीलमणीला मांडीवर घेऊन, छातीशी धरून पडून राहिली. नीलमणीही तिला घटकाभरसुद्धा नजरेआड होऊ देत नसे; ती आपल्याला चुकवून पळून जाईल या भीतीने तिला बिलगून राहत असे. इतकेच काय, झोप लागली तरी तिचा पदर सोडत नसे. सबंध दिवस असा गेल्यावर संध्याकाळनंतर जयगोपाल येऊन म्हणाला, 'शहरात डॉक्टरबाबू भेटले नाहीत, ते दूर कुठेतरी रोगी पाहायला गेले आहेत.' हेही म्हणाला, 'खटल्याच्या कामासाठी मला आजच दुसरीकडे जावं लागतं आहे; मतिलालला सांगून ठेवलं आहे, तो नियमितपणे येऊन रोग्याला पाहून जाईल.' रात्री नीलमणी ग्लानीत बरळू लागला. पहाटेच शशी कसलाही विचार न करता आजारी भावाला घेऊन नावेत बसली आणि थेट शहरात जाऊन डॉक्टरांच्या घरी हजर झाली. डॉक्टर घरीच होते; शहर सोडून कुठेही गेले नव्हते. सभ्य घरची बाई पाहून त्यांनी घाईघाईने एक बिऱ्हाड ठरवले, एका म्हाताऱ्या विधवेच्या देखरेखीखाली शशीची सोय लावून दिली आणि मुलावर उपचार सुरू केले. दुसऱ्याच दिवशी जयगोपाल येऊन हजर. रागाने लालबुंद होऊन त्याने बायकोला तत्काळ आपल्याबरोबर परत चलण्याचा हुकूम सोडला. बायको म्हणाली, 'मला कापून काढलंत तरी मी आता परत येणार नाही. तुम्हा लोकांना माझ्या नीलमणीला मारून टाकायचं आहे. त्याला आई नाही, बाप नाही, माझ्याशिवाय त्याला दुसरं कुणी नाही. मी त्याला वाचवणार.' जयगोपाल संतापून म्हणाला, 'मग इथेच राहा. पुन्हा माझ्या घरी परत येऊ नकोस.'
दिदी
तेव्हा शशी भडकून उठली आणि म्हणाली, 'घर तुमचं कसलं? घर तर माझ्या भावाचंच आहे!' जयगोपाल म्हणाला, 'बरं, ते बघू!' या प्रकरणावरून काही दिवस गावात लोकांनी खूप गहजब केला. शेजारीण तारा म्हणाली, 'नवऱ्याशी भांडायचं तर घरी बसून भांडावं की बाई. घर सोडून जायची काय गरज होती! हजार झालं तरी नवरा तो नवराच.' जवळ होता नव्हता तो सगळा पैसा खर्च करून, दागदागिने विकून शशीने आपल्या भावाला मृत्यूच्या तोंडातून वाचवले. तेव्हा तिला बातमी मिळाली, की द्वारिग्रामला त्यांची जी मोठी जमीन होती, जिच्यावर त्यांचे घर उभे होते, जिचे सगळे मिळून उत्पन्न वर्षाला जवळजवळ दीड हजार रुपये होते, ती जमीन जमीनदाराशी संगनमत करून जयगोपालने आपल्या नावावर चढवून घेतली आहे. आता सगळी इस्टेट त्यांची होती; तिच्या भावाची नव्हे. आजारातून बरा झाल्यावर नीलमणी केविलवाण्या सुरात म्हणू लागला, 'दिदी, घरी चल.' तिथल्या आपल्या सवंगड्या भाच्यांची त्याला आठवण येत होती. म्हणून तो पुन्हा पुन्हा म्हणाला, 'दिदी, आपल्या त्या घरी चल ना गं, दिदी!' ते ऐकून दिदी रडू लागली. आपलं घर आता कुठे उरलं आहे! पण नुसते रडून काही उपयोग नव्हता; त्या वेळी जगात दिदीशिवाय तिच्या भावाला दुसरे कुणी नव्हते. हा विचार करून, डोळे पुसून शशी डेप्युटी मॅजिस्ट्रेट तारिणीबाबूंच्या अंतःपुरात गेली आणि तिने त्यांच्या पत्नीला गळ घातली. डेप्युटीबाबू जयगोपालला ओळखत होते. सभ्य घरची बाई घराबाहेर पडून इस्टेटीवरून नवऱ्याशी वाद घालायला निघते, याचा त्यांना शशीवर फार राग आला. तिला गोड बोलून गुंतवून ठेवून त्यांनी तत्काळ जयगोपालला पत्र लिहिले. जयगोपालने मेहुण्यासह बायकोला बळजबरीने नावेत घातले आणि घरी आणून हजर केले.
दिदी
नवरा-बायकोचे, दुसऱ्या ताटातुटीनंतर, पुन्हा हे दुसऱ्यांदा मीलन झाले! प्रजापतीनेच बांधलेली गाठ! बऱ्याच दिवसांनी घरी परतल्यावर जुने सवंगडी भेटल्यामुळे नीलमणी मोठ्या आनंदाने खेळत बागडू लागला. त्याचा तो निश्चिंत आनंद पाहून शशीचे हृदय आतल्या आत विदीर्ण झाले. ४ हिवाळ्यात मॅजिस्ट्रेटसाहेब मुलखाच्या पाहणीच्या दौऱ्यावर निघाले होते आणि शिकारीच्या शोधात त्यांनी गावात तंबू ठोकला होता. गावातल्या वाटेवर साहेबांची आणि नीलमणीची गाठ पडली. इतर मुलांनी त्यांना पाहताच चाणक्याच्या श्लोकात थोडा फेरफार करून नखी, दंती, शृंगी यांच्या पंक्तीत साहेबालाही बसवले आणि ती पुरेशी दूर सटकली. पण स्वभावाने अतिशय गंभीर असलेला नीलमणी अढळ कुतूहलाने, शांतपणे साहेबाला न्याहाळत राहिला. साहेबांनी गंमत वाटून जवळ येऊन त्याला विचारले, 'तू पाठशाळेत शिकतोस?' मुलाने काही न बोलता मान हलवून 'हो' सांगितले. साहेबांनी विचारले, 'तू कोणते ग्रंथ वाचतोस?' 'ग्रंथ' या शब्दाचा अर्थ न कळल्याने नीलमणी स्तब्धपणे मॅजिस्ट्रेटच्या तोंडाकडे पाहत राहिला. मॅजिस्ट्रेटसाहेबांशी झालेल्या या ओळखीचे वर्णन नीलमणीने मोठ्या उत्साहाने आपल्या दिदीपाशी केले. दुपारी चपकन, पाटलोण, पगडी घालून जयगोपाल मॅजिस्ट्रेटला सलाम करायला गेला होता. फिर्यादी, प्रतिवादी, चपराशी, कॉन्स्टेबल यांची चहूकडे गर्दीच गर्दी. साहेब उन्हाच्या भीतीने तंबूबाहेर उघड्यावर सावलीत कॅम्प-टेबल मांडून बसले होते आणि जयगोपालला खुर्चीवर बसवून त्याच्याकडे स्थानिक परिस्थितीची चौकशी करीत होते. आपल्या गावातल्या सगळ्या लोकांसमक्ष हे मानाचे आसन पटकावून जयगोपाल मनातल्या मनात फुगत होता, आणि मनात म्हणत होता, 'आत्ता चक्रवर्ती आणि नंदी मंडळींपैकी कुणी येऊन हे पाहून गेलं तर काय बहार होईल!'
दिदी
इतक्यात नीलमणीला सोबत घेऊन घुंघटात चेहरा झाकलेली एक बाई थेट मॅजिस्ट्रेटसमोर येऊन उभी राहिली. म्हणाली, 'साहेब, माझा हा अनाथ भाऊ मी तुमच्या हाती सोपवला, तुम्ही याचं रक्षण करा!' साहेबांनी तो आपल्या आधीच्या ओळखीचा, मोठ्या डोक्याचा, गंभीर स्वभावाचा मुलगा पाहिला आणि ती बाई सभ्य घरची आहे असा अंदाज करून ते ताबडतोब उठून उभे राहिले. म्हणाले, 'आपण तंबूत चलावं.' बाई म्हणाली, 'मला जे सांगायचं आहे ते मी इथेच सांगेन.' जयगोपालचा चेहरा पांढराफटक पडला, तो चुळबुळ करू लागला. कुतूहलाने गावातले लोक मोठी मजा वाटून चहूकडून जवळ सरकू लागले. साहेबांनी छडी उगारताच सगळे पळाले. मग शशीने आपल्या भावाचा हात धरून त्या आईबापावेगळ्या मुलाचा सगळा इतिहास आदीपासून अंतापर्यंत सांगून टाकला. मधून मधून जयगोपाल अडवायला जाऊ लागला, तेव्हा मॅजिस्ट्रेट लाल चेहऱ्याने गरजले, 'चुप रहो!' आणि छडीच्या टोकाने त्यांनी त्याला खुर्ची सोडून समोर उभे राहण्याची खूण केली. जयगोपाल मनातल्या मनात शशीवर गरजत, गप्प उभा राहिला. नीलमणी दिदीला अगदी बिलगून, थक्क होऊन उभा राहून ऐकत होता. शशीचे बोलणे संपल्यावर मॅजिस्ट्रेटने जयगोपालला दोनचार प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे ऐकून बराच वेळ गप्प राहिल्यानंतर शशीला उद्देशून ते म्हणाले, 'मुली, हा खटला माझ्यापुढे येऊ शकत नसला, तरी तू निश्चिंत राहा. याबाबतीत जे करायला हवं ते मी करीन. तू आपल्या भावाला घेऊन निर्भयपणे घरी परत जाऊ शकतेस!' शशी म्हणाली, 'साहेब, जोपर्यंत त्याचं स्वतःचं घर त्याला परत मिळत नाही, तोपर्यंत माझ्या भावाला घरी नेण्याचं धाडस मला होत नाही. आता नीलमणीला तुम्ही स्वतःजवळ ठेवलं नाही, तर त्याला कुणीच वाचवू शकणार नाही.'
दिदी
साहेबांनी विचारले, 'तू कुठे जाशील?' शशी म्हणाली, 'मी माझ्या नवऱ्याच्या घरी परत जाईन, मला कसलीच काळजी नाही.' साहेब किंचित हसले आणि नाइलाजाने, गळ्यात ताईत घातलेल्या त्या किडकिडीत, सावळ्या, गंभीर, शांत, मृदू स्वभावाच्या बंगाली मुलाला आपल्याबरोबर न्यायला कबूल झाले. मग शशी निरोप घेऊ लागली, तेव्हा मुलाने तिचा पदर घट्ट धरून ठेवला. साहेब म्हणाले, 'बाळा, तुला कसलीही भीती नाही. ये!' घुंघटाआडून अखंड अश्रू ढाळत शशी म्हणाली, 'शहाणा माझा भाऊ, जा रे भाऊ. तुझ्या दिदीची तुला पुन्हा भेट होईल!' असे म्हणून तिने त्याला मिठी मारली, त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवला, आणि कसाबसा आपला पदर सोडवून घेऊन ती घाईघाईने निघून गेली; त्यासरशी साहेबांनी डाव्या हाताने नीलमणीला वेढून धरले, आणि तो 'दिदी गं, दिदी' म्हणून मोठमोठ्याने रडू लागला; शशीने एकदा मागे वळून पाहिले, दुरूनच उजवा हात पुढे करून त्याला मूकपणे दिलासा पाठवला, आणि फाटत्या काळजाने ती निघून गेली. पुन्हा त्याच फार पूर्वीपासून ओळखीच्या जुन्या घरात नवरा-बायकोचे मीलन झाले. प्रजापतीनेच बांधलेली गाठ! पण हे मीलन फार दिवस टिकले नाही. कारण त्यानंतर थोड्याच दिवसांनी एके दिवशी सकाळी गावकऱ्यांना बातमी मिळाली, की रात्री शशी पटकीने आजारी पडून मेली, आणि रात्रीच तिचा अग्निसंस्कारही उरकला गेला. कुणीच याबद्दल एक शब्दही काढला नाही. फक्त ती शेजारीण तारा अधूनमधून गरजून उठू पाहायची, पण सगळे 'गप्प, गप्प' करून तिचे तोंड बंद करायचे. निरोप घेताना शशी भावाला शब्द देऊन गेली होती, पुन्हा भेट होईल. तो शब्द कुठे पाळला गेला, मला ठाऊक नाही.