रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
दृष्टिदान
ऐकते की हल्ली पुष्कळ बंगाली मुलींना आपला नवरा आपल्याच प्रयत्नाने मिळवावा लागतो. मीही तेच केले, पण देवाच्या साहाय्याने. लहानपणापासून मी पुष्कळ व्रते केली होती, पुष्कळ शिवपूजा केली होती. माझे आठवे वर्ष सरायच्या आतच माझे लग्न होऊन गेले होते. पण पूर्वजन्मीच्या पापामुळे असा नवरा मिळूनही तो मला पुरता मिळाला नाही. त्रिनयनी मातेने माझे दोन्ही डोळे नेले! आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याला डोळे भरून पाहण्याचे सुख तिने मला दिले नाही. बालपणापासूनच माझी अग्निपरीक्षा सुरू झाली. चौदावे वर्ष ओलांडायच्या आतच मी एका मृत बाळाला जन्म दिला, स्वतःही मरणाच्या दारापर्यंत जाऊन आले; पण जिच्या नशिबी दुःख भोगणे लिहिलेले, ती मरून कसे चालेल? जो दिवा जळण्यासाठीच घडलेला असतो, त्याचे तेल कमी पडत नाही; रात्रभर जळून मगच तो विझतो. वाचले खरी, पण शरीराच्या अशक्तपणामुळे म्हणा, मनाच्या खंतीमुळे म्हणा, की आणखी कशाने म्हणा, माझे डोळे दुखू लागले. माझे यजमान तेव्हा डॉक्टरीचे शिक्षण घेत होते. नव्या विद्येच्या उत्साहात उपचार करायची संधी मिळाली की त्यांना फार आनंद होई. त्यांनी स्वतःच माझे उपचार सुरू केले. दादा त्या वर्षी बी. एल.ची परीक्षा द्यायची म्हणून कॉलेजात शिकत होते. एके दिवशी ते येऊन माझ्या यजमानांना म्हणाले, 'हे काय चालवले आहे तुम्ही? कुमूचे दोन्ही डोळे घालवायला बसला आहात! कुणा चांगल्या डॉक्टरला दाखवा.' माझे यजमान म्हणाले, 'चांगला डॉक्टर येऊन आणखी नवीन काय उपचार करणार आहे? औषधपाणी सगळे ठाऊकच आहे.' दादा जरा रागावून म्हणाले, 'मग तर तुमच्यात आणि तुमच्या कॉलेजच्या मोठ्या साहेबात काहीच फरक नाही.'
दृष्टिदान
यजमान म्हणाले, 'कायदा शिकताय तुम्ही, डॉक्टरीतले तुम्हाला काय कळते? उद्या तुमचे लग्न झाले आणि बायकोच्या मालमत्तेवरून कधी खटला उभा राहिला, तर तुम्ही माझ्या सल्ल्याने चालाल का?' मी मनात म्हणत होते, राजे राजे लढले की चिरडली जातात ती गवताची पाती. भांडण जुंपले नवऱ्याचे आणि दादांचे, — पण दोन्ही बाजूंनी मार बसतो आहे मलाच. मग वाटले, दादांनी मला दानच करून टाकले आहे, तर आता माझ्याविषयीच्या कर्तव्याची ही वाटणी कशासाठी? माझे सुख-दुःख, माझे आजारपण आणि बरे होणे, हे सगळे माझ्या नवऱ्याचेच तर आहे. त्या दिवशी माझ्या डोळ्यांच्या या एवढ्याशा उपचारावरून दादांचा आणि माझ्या यजमानांचा जणू थोडा मतभेदच झाला. माझ्या डोळ्यांतून पाणी तसेही वाहतच होते, आता ती धार आणखी वाढली; त्याचे खरे कारण तेव्हा माझ्या यजमानांना कळले नाही, दादांनाही नाही. यजमान कॉलेजात गेल्यावर दुपारी अचानक दादा एका डॉक्टरला घेऊन येऊन उभे राहिले. डॉक्टरने तपासून सांगितले, 'काळजी घेतली नाही तर आजार बळावण्याची शक्यता आहे.' असे म्हणून त्याने काय काय औषधे लिहून दिली, आणि दादांनी लगेच ती आणायला माणूस पाठवला. डॉक्टर गेल्यावर मी दादांना म्हणाले, 'दादा, तुमच्या पाया पडते, माझे जे उपचार चालू आहेत त्यांत कसलाही व्यत्यय आणू नका.' लहानपणापासून मी दादांना फार भीत असे; त्यांच्यापुढे तोंड उघडून असे काही बोलू शकेन, ही माझ्या दृष्टीने एक नवलाचीच गोष्ट होती. पण माझी पक्की खात्री होती की, माझ्या नवऱ्याच्या नकळत दादा माझ्या उपचाराची जी व्यवस्था करत आहेत, त्यातून माझे भलेच नव्हे, अकल्याणच होणार.
दृष्टिदान
माझ्या या धिटाईने दादांनाही बहुधा जरा नवल वाटले. थोडा वेळ गप्प राहून विचार करून शेवटी ते म्हणाले, 'बरं, मी आणखी डॉक्टर आणणार नाही, पण जे औषध येईल ते नीट सांगितल्याप्रमाणे घेऊन तर बघ.' — औषध आल्यावर ते कसे वापरायचे ते मला समजावून सांगून दादा निघून गेले. यजमान कॉलेजातून परत यायच्या आधीच ती डबी, ती बाटली, तो ब्रश आणि सगळे विधिनियम मी मोठ्या काळजीने आमच्या अंगणातल्या विहिरीत टाकून दिले. दादांशी जणू थोडी खुन्नस धरूनच माझे यजमान दुप्पट जोमाने माझ्या डोळ्यांच्या उपचाराला लागले. सकाळी एक औषध, संध्याकाळी दुसरे, असे बदल होऊ लागले. डोळ्यांवर झापड बांधली, चष्मा लावला, डोळ्यांत थेंब थेंब औषध घातले, भुकटी लावली, घाणेरड्या वासाचे माशाचे तेल प्यायल्यावर आतली पचनेंद्रियेसुद्धा बाहेर पडायला उठत, तेही दाबून धरून राहिले. यजमान विचारत, 'कसे वाटते आहे?' मी म्हणे, 'पुष्कळ बरे.' बरे होते आहे असे मनाला पटवायचाही मी प्रयत्न करी. डोळ्यांतून जास्त पाणी वाहू लागले की वाटे, पाणी वाहून जाणे हेच चांगले लक्षण; पाणी थांबले की वाटे, हं, आता बरे होण्याच्या वाटेवर उभी आहे. पण काही काळाने वेदना असह्य झाल्या. डोळ्यांपुढे धूसर दिसू लागले आणि डोकेदुखीने मला स्वस्थ बसू दिले नाही. पाहिले तर माझे यजमानही जरा ओशाळल्यासारखे झाले होते. इतक्या दिवसांनंतर कोणत्या निमित्ताने डॉक्टरला बोलवावे, हे त्यांना सुचत नव्हते. मी त्यांना म्हणाले, 'दादांचे मन राखण्यासाठी एकदा एखाद्या डॉक्टरला बोलावले तर काय बिघडले? यावरून ते उगाच रागावले आहेत, त्याने माझ्या मनाला त्रास होतो. उपचार तर तुम्हीच करणार, डॉक्टर आपला नुसता जोडीला असलेला बरा.'
दृष्टिदान
यजमान म्हणाले, 'बरोबर बोललीस.' असे म्हणून त्याच दिवशी एका इंग्रज डॉक्टरला घेऊन हजर झाले. काय बोलणे झाले ते मला माहीत नाही, पण असे वाटले की साहेबाने माझ्या यजमानांची जणू काही कानउघाडणी केली, आणि ते मान खाली घालून निरुत्तर उभे राहिले. डॉक्टर गेल्यावर मी यजमानांचा हात धरून म्हणाले, 'कुठून एक अडेलतट्टू गोरा गाढव धरून आणलात, — एखादा देशी डॉक्टर आणला असता तरी चालले असते. माझ्या डोळ्यांचा आजार तो तुमच्यापेक्षा जास्त जाणणार आहे का?' यजमान जरा संकोचून म्हणाले, 'डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.' मी जरा रागावल्याचा आव आणून म्हणाले, 'शस्त्रक्रिया करावी लागणार हे तुम्हाला ठाऊक होते, पण अगदी पहिल्यापासून ते माझ्यापासून लपवून ठेवलेत! तुम्हाला काय वाटते, मी घाबरते?' यजमानांची शरम दूर झाली — ते म्हणाले, 'डोळ्याची शस्त्रक्रिया करायची म्हटल्यावर घाबरणार नाही असे वीर पुरुषांत तरी किती आहेत?' मी थट्टेने म्हणाले, 'पुरुषांचे शौर्य फक्त बायकोपुढे!' यजमान तत्क्षणी उदास, गंभीर होऊन म्हणाले, 'ते खरे आहे. पुरुषाजवळ अहंकार सोडून दुसरे काही नसते.' त्यांचे गांभीर्य उडवून लावत मी म्हणाले, 'अहंकारात तरी तुम्ही बायकांची बरोबरी करू शकता असे वाटते? त्यातही जीत आमचीच!' मधल्या काळात दादा आले, तेव्हा त्यांना एकीकडे बोलावून मी म्हणाले, 'दादा, तुमच्या त्या डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे वागून इतके दिवस माझे डोळे छान बरे होत होते, — एके दिवशी चुकून पोटात घ्यायचे औषध डोळ्यांना लावले, तेव्हापासून डोळे जाण्याच्या बेतात आले आहेत. यजमान म्हणतात, डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागेल.'
दृष्टिदान
दादा म्हणाले, 'मला वाटले, तुझ्या नवऱ्याचेच उपचार चालू आहेत, म्हणून तर आणखी रागावून मी इतके दिवस आलो नाही.' मी म्हणाले, 'नाही, मी चोरून त्या डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणेच चालत होते, — यजमानांना सांगितले नाही, ते रागावतील म्हणून.' बाईचा जन्म घेतला की इतकेही खोटे बोलावे लागते! दादांच्या मनाला दुखवू शकत नाही, नवऱ्याच्या कीर्तीलाही बट्टा लागू देता येत नाही. आई होऊन मांडीवरच्या बाळाला भुलवावे लागते, बायको होऊन त्या बाळाच्या बापालाही भुलवावे लागते; बायकांना केवढे हे छळकपट करावे लागते! या कपटाचे फळ असे मिळाले की, आंधळी होण्यापूर्वी दादांचे आणि माझ्या यजमानांचे मनोमीलन माझ्या डोळ्यांना पाहायला मिळाले. दादांना वाटले, चोरून उपचार करायला गेल्यामुळे हा अनर्थ घडला; यजमानांना वाटले, आधीपासूनच माझ्या दादांचा सल्ला ऐकला असता तर बरे झाले असते. असे वाटून ती दोन पश्चात्तप्त हृदये मनातल्या मनात क्षमा मागत एकमेकांच्या अगदी जवळ आली. यजमान दादांचा सल्ला घेऊ लागले, आणि दादाही नम्रपणे प्रत्येक गोष्टीत माझ्या यजमानांच्या मतावरच भिस्त असल्याचे दाखवू लागले. शेवटी दोघांच्या विचाराने एके दिवशी एक इंग्रज डॉक्टर आला आणि त्याने माझ्या डाव्या डोळ्यावर शस्त्र चालवले. तो अशक्त डोळा तो आघात सहन करू शकला नाही; त्याची क्षीण ज्योत अचानक विझून गेली. त्यानंतर उरलेला डोळाही दिवसेंदिवस थोडा थोडा करत अंधाराने झाकला गेला. लहानपणी शुभदृष्टीच्या दिवशी चंदनाची उटी लावलेली जी तरुण मूर्ती पहिल्यांदा माझ्यासमोर प्रकट झाली होती, तिच्यावर कायमचा पडदा पडला.
दृष्टिदान
एके दिवशी यजमान माझ्या उशाशी येऊन म्हणाले, 'तुझ्यापुढे आता खोटी फुशारकी मारणार नाही; तुझे दोन्ही डोळे मीच घालवले.' मला जाणवले, त्यांच्या आवाजात अश्रू दाटून आले आहेत. त्यांचा उजवा हात दोन्ही हातांनी दाबून धरून मी म्हणाले, 'बरे केलेत, तुमची वस्तू तुम्ही घेतलीत. विचार करून पाहा बरे, एखाद्या डॉक्टरच्या उपचाराने माझे डोळे गेले असते तर मला कसले समाधान उरले असते! होणारे जर टळत नाही, तर माझे डोळे कुणीच वाचवू शकले नसते, — ते डोळे तुमच्या हातून गेले, हेच माझ्या आंधळेपणातले एकमेव सुख! पूजेला फुले कमी पडली तेव्हा रामचंद्र आपले दोन्ही डोळे काढून देवाला वाहायला निघाले होते. मी माझ्या देवाला माझी दृष्टी दिली, — तुमच्या डोळ्यांना जे जे चांगले दिसेल ते ते मला तोंडाने सांगत जा; तुमच्या डोळ्यांनी पाहिलेल्याचा प्रसाद म्हणून मी ते ग्रहण करीन.' एवढे सगळे मी बोलू शकले नाही; तोंडाने असे बोलता येतही नाही; या सगळ्या गोष्टी मी कितीतरी दिवस मनाशी घोळवल्या होत्या. मधूनमधून जेव्हा मन खचे, निष्ठेचे तेज मंदावे, आपण फसलो, दुःखी आहोत, दुर्भाग्याने होरपळलो आहोत असे वाटे, — तेव्हा मी माझ्या मनाकडूनच या गोष्टी वदवून घेत असे, — ही शांती, ही भक्ती धरून आपल्या दुःखाहूनही स्वतःला उंच उचलण्याचा प्रयत्न करीत असे. त्या दिवशी थोडे शब्दांत, थोडे मौनात, बहुधा माझ्या मनातला भाव त्यांना कसाबसा समजावू शकले. ते म्हणाले, 'कुमू, मूर्खपणाने तुझे जे घालवले ते मी परत देऊ शकणार नाही; पण माझ्याच्याने होईल तितकी तुझ्या डोळ्यांची उणीव भरून काढत मी तुझ्या सोबत राहीन.'
दृष्टिदान
मी म्हणाले, 'छे, ते काही चालायचे नाही. तुम्ही तुमचा संसार म्हणजे एक आंधळ्यांचे इस्पितळ करून ठेवाल, ते मी कधीही होऊ देणार नाही. तुम्हाला आणखी एक लग्न करावेच लागेल.' लग्न करणे का अगदी आवश्यक आहे हे सविस्तर सांगण्यापूर्वीच माझा गळा जरासा दाटून येऊ लागला. जरा खोकून, जरा सावरून मी बोलणार तेवढ्यात माझे यजमान उचंबळून आलेल्या आवेगाने बोलून गेले, 'मी मूर्ख आहे, अहंकारी आहे, पण म्हणून काही पाषाणहृदयी नाही. माझ्या हाताने मी तुला आंधळी केली; शेवटी त्याच दोषापायी तुला टाकून जर दुसरी बायको केली, तर आमचे इष्टदैवत गोपीनाथ याची शपथ घेऊन सांगतो, मला ब्रह्महत्येचे, पितृहत्येचे पातक लागो.' एवढी मोठी शपथ मी त्यांना घेऊच दिली नसती, अडवले असते, — पण अश्रू तेव्हा छातीतून उसळून, गळा दाबून, दोन्ही डोळ्यांतून ओसंडून पडायच्या बेतात होते; त्यांना आवरून मला बोलताच येत नव्हते. ते जे बोलले ते ऐकून प्रचंड आनंदाच्या उमाळ्याने मी उशीत तोंड खुपसून रडू लागले. मी आंधळी, तरी ते मला सोडणार नाहीत. दुःखी माणूस आपले दुःख जसे उराशी बाळगतो, तसे ते मला हृदयाशी बाळगतील. एवढे भाग्य मला नको होते, पण मन स्वार्थीच असते. अखेर अश्रूंची पहिली सर जोरात कोसळून गेल्यावर त्यांचा चेहरा छातीशी ओढून घेऊन मी म्हणाले, 'अशी भयंकर शपथ का घेतलीत? मी काय तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सुखासाठी लग्न करायला सांगितले होते? सवतीकडून मी माझा स्वार्थ साधून घेणार होते. डोळे नसल्यामुळे तुमचे जे काम मला स्वतः करता येत नाही, ते मी तिच्याकडून करवून घेणार होते!'
दृष्टिदान
यजमान म्हणाले, 'काम तर मोलकरीणसुद्धा करते. कामाची सोय व्हावी म्हणून एका मोलकरणीशी लग्न करून तिला माझ्या या देवीच्या बरोबरीने एका आसनावर बसवू का मी?' — असे म्हणून त्यांनी माझा चेहरा वर उचलून धरला आणि माझ्या कपाळाचे एक चुंबन घेतले, — त्या चुंबनाने जणू माझा तिसरा डोळा उघडला; त्याच क्षणी देवीपदावर माझा अभिषेक झाला. मी मनात म्हणाले, तेच बरे. आता आंधळी झाले आहे, तेव्हा या बाहेरच्या संसाराची गृहिणी मी आता होऊ शकत नाही; आता संसाराच्या वर उठून, देवी होऊन मी नवऱ्याचे कल्याण करीन. आता खोटे नाही, कपट नाही; गृहिणी असलेल्या स्त्रीच्या अंगी जेवढा काही क्षुद्रपणा आणि लबाडी असते, ती सगळी मी दूर सारली. त्या दिवशी दिवसभर माझे स्वतःशीच एक भांडण चालू राहिले. एवढ्या गंभीर शपथेने बांधले गेल्यामुळे यजमान आता कोणत्याही परिस्थितीत दुसरे लग्न करू शकणार नाहीत, हा आनंद मनात जणू डंख मारून बसला; काही केल्या तो सुटेना. आज माझ्यात जी नवी देवी अवतरली होती, ती म्हणाली, कदाचित असाही दिवस येईल की ही शपथ पाळण्यापेक्षा लग्न करण्यातच तुझ्या नवऱ्याचे कल्याण असेल. पण माझ्यात जी जुनी बाई होती ती म्हणाली, असेना का, पण त्यांनी शपथ घेतली आहे, तेव्हा आता ते लग्न करूच शकणार नाहीत, — देवी म्हणाली, असेना का, पण तू खूश व्हावेस असे त्यात काहीही नाही. मानवी म्हणाली, सगळे कळते, पण त्यांनी एकदा शपथ घेतली आहे म्हटल्यावर, वगैरे वगैरे. — पुन्हा पुन्हा तेच तेच! तेव्हा देवीने काहीही उत्तर न देता फक्त भुवई चढवली, आणि एका भयंकर शंकेच्या अंधाराने माझे सारे अंतःकरण व्यापून टाकले.
दृष्टिदान
माझ्या पश्चात्तप्त यजमानांनी नोकरचाकरांना मनाई केली आणि माझी सगळी कामे स्वतःच करायला पुढे सरसावले. अगदी क्षुल्लक गोष्टींतही नवऱ्यावर असे हतबल अवलंबून राहणे सुरुवातीला मला बरेच वाटले. कारण, अशा रीतीने ते सतत माझ्याजवळ असत. डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नव्हते, म्हणून त्यांना सतत जवळ बाळगण्याची ओढ फारच वाढली. नवऱ्याच्या चेहऱ्याचा जो वाटा माझ्या डोळ्यांच्या हिश्शाला आला होता, तो आता इतर इंद्रिये आपसांत वाटून घेऊन आपापला हिस्सा वाढवू पाहू लागली. आता यजमान जरा जास्त वेळ बाहेरच्या कामात राहिले की वाटे, जणू मी अधांतरी आहे, कुठेच काही धरता येत नाही, माझे सर्वस्वच हरवले. पूर्वी यजमान कॉलेजात जात, तेव्हा परतायला उशीर झाला की रस्त्याकडची खिडकी जराशी किलकिली करून मी वाट पाहत बसे. ज्या जगात ते वावरत, ते जग मी डोळ्यांनी माझ्याशी बांधून ठेवले होते. आज माझे दृष्टिहीन सारे शरीर त्यांचा शोध घेण्याची धडपड करते. त्यांच्या जगाला माझ्या जगाशी जोडणारा जो मुख्य साकव होता, तो आज मोडून पडला आहे. आता त्यांच्या आणि माझ्या मध्ये एक दुस्तर आंधळेपण; — आता मला फक्त हतबलपणे, उतावीळ होऊन बसून राहावे लागते, — ते कधी त्यांच्या तीरावरून माझ्या तीरावर येऊन पोचतील याची वाट पाहत. म्हणून आता क्षणभरासाठी जरी ते मला सोडून गेले तरी माझे सारे आंधळे शरीर त्यांना धरायला झेपावते, आक्रोश करून त्यांना हाका मारते. पण इतकी ओढ, इतके अवलंबून राहणे बरे नव्हे. एक तर नवऱ्यावर बायकोचाच भार पुरेसा असतो; त्यावर आणखी आंधळेपणाचे हे प्रचंड ओझे मी लादू शकत नाही. विश्व व्यापून उरलेला हा माझा अंधार मीच वाहीन. मी एकाग्र मनाने प्रतिज्ञा केली, या माझ्या अनंत आंधळेपणाने मी नवऱ्याला माझ्याशी बांधून ठेवणार नाही.
दृष्टिदान
थोड्याच काळात फक्त आवाज, वास आणि स्पर्श यांच्या आधाराने मी माझी सवयीची सगळी कामे करायला शिकले. इतकेच नव्हे, तर घरातली पुष्कळ कामे पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक कौशल्याने पार पाडू लागले. आता वाटू लागले, दृष्टी आपल्या कामाला जेवढी मदत करते त्याहून कितीतरी अधिक ती मन विचलित करते; काम नीट व्हायला जेवढे पाहायला हवे, त्याहून कितीतरी अधिक डोळे पाहतात. आणि डोळे पहाऱ्याचे काम करू लागले की कान आळशी होतात, — जितके ऐकायला हवे त्याहून कमी ऐकतात. आता चंचल डोळ्यांच्या गैरहजेरीत माझी इतर सारी इंद्रिये आपापली कर्तव्ये शांतपणे आणि पुरेपूर पार पाडू लागली. आता मी यजमानांना माझे कोणतेही काम करू दिले नाही, — आणि त्यांची सगळी कामे पुन्हा पूर्वीसारखी मीच करू लागले. यजमान मला म्हणाले, 'माझ्या प्रायश्चित्तापासून तू मला वंचित करते आहेस.' मी म्हणाले, 'तुमचे प्रायश्चित्त कसले ते मला ठाऊक नाही, पण माझ्या पापाचे ओझे मी कशाला वाढवू?' ते काहीही म्हणोत, मी त्यांना मोकळे केले तेव्हा त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आंधळ्या बायकोची सेवा हे जन्मभराचे व्रत करणे पुरुषाचे काम नव्हे. माझे यजमान डॉक्टरीची परीक्षा पास होऊन मला बरोबर घेऊन मुफसलात गेले. खेड्यात आल्यावर जणू आईच्या मांडीवर आल्यासारखे वाटले. आठ वर्षांची असताना मी गाव सोडून शहरात आले होते. मधल्या दहा वर्षांत जन्मभूमी माझ्या मनात सावलीसारखी अस्पष्ट होत गेली होती. जोवर डोळे होते तोवर कलकत्ता शहर माझ्या भोवती उभे राहून माझ्या साऱ्या आठवणींना आड करून होते. डोळे जाताच कळले, कलकत्ता हे फक्त डोळ्यांना भुलवून ठेवणारे शहर, — त्याने मन भरत नाही. दृष्टी हरवताच माझे ते बालपणीचे खेडे, दिवस मावळल्यावर उजळणाऱ्या नक्षत्रलोकासारखे, माझ्या मनात लखलखू लागले.
दृष्टिदान
अग्रहायण संपता संपता आम्ही हासिमपूरला गेलो. नवा मुलूख, आजूबाजूला दिसायला कसे आहे ते काही कळले नाही, — पण बालपणीच्या त्याच गंधाने, त्याच अनुभवाने मला सर्वांगाने वेढून टाकले. दवात भिजलेल्या, नव्याने नांगरलेल्या शेतांवरून येणारा तो पहाटेचा वारा, सोने ओतल्यासारख्या तूर आणि मोहरीच्या शेतांचा तो आभाळभर पसरलेला कोवळा, गोड वास, गुराख्याचे ते गाणे, इतकेच काय, मोडक्या रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीचा आवाजसुद्धा मला पुलकित करून गेला. आयुष्याच्या आरंभीच्या माझ्या त्या भूतकाळाच्या आठवणी आपले अवर्णनीय नाद आणि गंध घेऊन, समोरच्या वर्तमानासारख्या मला घेरून बसल्या; आंधळे डोळे त्याला कसलीही हरकत घेऊ शकले नाहीत. मी त्या बालपणात परत गेले, — फक्त आई तेवढी भेटली नाही. मनातल्या मनात दिसले, आजी आपल्या विरळ केसांचा बुचडा सोडून, उन्हाला पाठ देऊन अंगणात सांडगे घालते आहे; पण तिच्या कोमल कापऱ्या, जुन्या, क्षीण आवाजात आमच्या गावचे साधू भजनदास यांचे देहतत्त्वाचे गाणे गुणगुणलेले ऐकू आले नाही. नव्या धान्याचा तो नवान्नाचा उत्सव थंडीतल्या दवाने न्हालेल्या आकाशात जिवंत होऊन जागा झाला; पण ढेंकीच्या खोलीत नवे भात कांडायला जमलेल्या गर्दीत माझ्या छोट्या छोट्या गावातल्या मैत्रिणींचा मेळा कुठे गेला! संध्याकाळी जवळपास कुठूनतरी गायीचे हंबरणे ऐकू येते, — तेव्हा आठवते, आई सांजवात हातात घेऊन गोठ्यात दिवा दाखवायला चालली आहे; त्याबरोबर भिजलेल्या आंबोणाचा आणि पेटवलेल्या पेंढ्याच्या धुराचा वास जणू हृदयात शिरतो, आणि ऐकू येते, तळ्याच्या काठावरच्या विद्यालंकारांच्या देवघरातून झांजा-घंटांचा नाद येतो आहे. जणू कुणीतरी माझ्या बालपणीच्या त्या आठ वर्षांतून त्यांचा सगळा स्थूल अंश गाळून काढून फक्त त्यांचा रस, त्यांचा गंध तेवढा माझ्या भोवती राशीराशीने पसरून ठेवला आहे.
दृष्टिदान
त्याबरोबरच मला माझी बालपणीची व्रते आणि पहाटे फुले वेचून केलेली शिवपूजा आठवली. ही गोष्ट कबूल करायलाच हवी, कलकत्त्यातल्या गप्पा, चर्चा, येणे-जाणे यांच्या गोंधळात बुद्धी थोडी बिघडतेच. धर्मकर्म, भक्ती-श्रद्धा यांत तो निर्मळ साधेपणा उरत नाही. मला तो दिवस आठवतो, आंधळी झाल्यावर कलकत्त्यात माझी एक गावाकडची मैत्रीण येऊन मला म्हणाली होती, 'तुला राग नाही येत, कुमू? मी असते तर अशा नवऱ्याचे तोंडसुद्धा पाहिले नसते.' मी म्हणाले, 'बाई गं, तोंड पाहणे तर बंदच झाले आहे, त्यासाठी या मेल्या डोळ्यांचा राग येतो खरा, पण नवऱ्यावर कशाला रागवायचे?' वेळेवर डॉक्टरला बोलावले नाही म्हणून लावण्य माझ्या यजमानांवर फार रागावली होती, आणि मलाही रागवायला लावायचा तिने प्रयत्न केला होता. मी तिला समजावले, संसारात राहिले की इच्छेने-अनिच्छेने, कळत-नकळत, चुकीने-भ्रमाने नाना प्रकारचे सुख-दुःख घडतच असते; पण मनात भक्ती स्थिर ठेवता आली तर दुःखातही एक शांती असते, — नाहीतर नुसत्या रागारागीत, चढाओढीत, भांडणतंट्यातच आयुष्य निघून जाते. आंधळी झाले हे दुःख काय कमी आहे, त्यावर नवऱ्याचा द्वेष करून दुःखाचे ओझे कशाला वाढवू? माझ्यासारख्या पोरीच्या तोंडून असल्या जुनाट गोष्टी ऐकून लावण्य रागाने, तुच्छतेने मान हलवत निघून गेली. पण काहीही म्हणा, शब्दांत विष असते, शब्द अगदीच वाया जात नाहीत. लावण्यच्या तोंडून आलेल्या रागाच्या शब्दांनी माझ्या मनात एखाद-दुसरी ठिणगी टाकली होती; मी ती पायाने चिरडून विझवून टाकली होती, तरी एखाद-दुसरा डाग राहिलाच. म्हणून म्हणत होते, कलकत्त्यात फार वादविवाद, फार बोलणी; तिथे पाहता पाहता बुद्धी अकाली पिकून कठीण होते.
दृष्टिदान
खेड्यात आल्यावर माझ्या त्या शिवपूजेतल्या शीतल पारिजातकाच्या गंधाने हृदयातल्या साऱ्या आशा आणि सारा विश्वास माझ्या बालपणासारखेच नवेकोरे आणि उजळ झाले. देवाने माझे हृदय आणि माझा संसार भरून गेले. मी मस्तक नमवून लोटांगण घातले. म्हणाले, 'हे देवा, माझे डोळे गेले ते बरेच झाले, तू तर माझा आहेस.' हाय, चुकीचे बोलले! तू माझा आहेस, हे म्हणणेसुद्धा उद्धटपणाचेच. मी तुझी आहे, एवढेच म्हणण्याचा मला अधिकार आहे. अरे, एके दिवशी माझा देव गळा दाबून माझ्याकडून हेच वदवून घेईल. बाकी काहीच न उरो, पण मी मात्र उरलेच पाहिजे. कुणावरही आपला जोर चालत नाही, चालतो तो फक्त स्वतःवर! काही काळ मोठ्या सुखात गेला. डॉक्टरीत माझ्या यजमानांचाही दबदबा वाढू लागला. हाताशी थोडा पैसाही साठला. पण पैसा ही चीज काही चांगली नव्हे. तिच्याखाली मन दबून जाते. मन राज्य करते तेव्हा ते स्वतःचे सुख स्वतः निर्माण करू शकते; पण सुख साठवण्याचा भार पैसा घेतो तेव्हा मनाला काही कामच उरत नाही. मग पूर्वी जिथे मनाचे सुख होते, ती जागा वस्तू, सामानसुमान, थाटमाट व्यापून बसतात. मग सुखाऐवजी हाती लागतात त्या फक्त वस्तू.
दृष्टिदान
कोणतीही विशिष्ट गोष्ट किंवा विशिष्ट प्रसंग मला सांगता येत नाही; पण आंधळ्याची जाणण्याची शक्ती अधिक असते म्हणून म्हणा, की आणखी कोणत्या कारणाने ते मला ठाऊक नाही, सुबत्ता वाढत गेली तसतसा माझ्या यजमानांमध्ये होणारा बदल मला स्पष्ट जाणवत होता. तारुण्याच्या आरंभी न्याय-अन्याय, धर्म-अधर्म यांविषयी माझ्या यजमानांच्या मनात जी एक कळकळ होती, ती जणू दिवसेंदिवस बधिर होत चालली होती. आठवते, ते एके काळी म्हणत, — डॉक्टरी मी फक्त पोटापाण्यासाठी शिकत नाही; तिच्या जोरावर मला पुष्कळ गरिबांचे भले करता येईल. मरणाच्या दारी पडलेल्या गरिबांच्या दाराशी येऊनही आधी फी घेतल्याशिवाय नाडी पाहायला तयार नसणाऱ्या डॉक्टरांविषयी बोलताना तिरस्काराने त्यांच्या तोंडून शब्द फुटत नसे. मला कळते, आता ते दिवस राहिले नाहीत. एकुलत्या एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी एका गरीब बाईने त्यांचे पाय धरले, त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले; शेवटी मी माझ्या गळ्याची शपथ घालून त्यांना उपचाराला पाठवले, पण त्यांनी ते काम मनापासून केले नाही. आमच्याजवळ पैसा थोडा होता तेव्हा माझे यजमान अन्यायाच्या कमाईकडे कोणत्या नजरेने पाहत, ते मला ठाऊक आहे. पण आता बँकेत पुष्कळ पैसा साठला आहे; आता एका धनिकाचा कारभारी येऊन दोन दिवस त्यांच्याशी गुपचूप पुष्कळ बोलून गेला; काय बोलला ते मला काहीच माहीत नाही, — पण त्यानंतर ते माझ्याकडे आले आणि मोठ्या उत्साहाने इतर नाना विषयांवर नाना गोष्टी बोलले, तेव्हा माझ्या अंतःकरणाच्या स्पर्शशक्तीने मी ओळखले की आज ते काळिमा फासून आले आहेत.
दृष्टिदान
आंधळी होण्यापूर्वी ज्यांना मी शेवटचे पाहिले होते, ते माझे यजमान कुठे आहेत? ज्यांनी माझ्या दृष्टिहीन दोन डोळ्यांच्या मधोमध एक चुंबन घेऊन एके दिवशी मला देवीपदावर अभिषिक्त केले होते, त्यांच्यासाठी मी काय करू शकले? एखाद्या दिवशी विकारांचे वादळ येऊन ज्यांचे अकस्मात पतन होते, ते आणखी एखाद्या हृदयाच्या उमाळ्याने पुन्हा वर उठू शकतात; पण हे जे दिवसेंदिवस, क्षणाक्षणाने अगदी मज्जेच्या आतून कठोर होत जाणे, बाहेरून वाढता वाढता आतल्या माणसाला तिळातिळाने दाबून टाकणे, — यावर उपाय शोधायला गेले तर मला कोणताच मार्ग सापडत नाही. नवऱ्यापासून माझा जो डोळ्यांनी पाहण्याचा विरह झाला, तो काहीच नव्हे; — पण जीव घुसमटून जातो तो हा विचार मनात आला की, मी जिथे आहे तिथे ते नाहीत; — मी आंधळी, जगाचा प्रकाश न पोचणाऱ्या अंतरीच्या प्रदेशात माझ्या त्या पहिल्या वयातले नवे प्रेम, अभंग भक्ती, अखंड विश्वास घेऊन बसले आहे; माझ्या देवघरात आयुष्याच्या आरंभी पोरीच्या ओंजळीतून मी पारिजातकाचे जे अर्घ्य वाहिले होते, त्याचे दव अजून सुकलेले नाही, — आणि माझे यजमान हा सावलीने शीतल, चिरनवा प्रदेश सोडून पैसा कमावण्याच्या मागे लागून संसाराच्या वाळवंटात कुठे दिसेनासे होऊन चालले आहेत! ज्यावर माझा विश्वास आहे, ज्याला मी धर्म म्हणते, ज्याला मी सगळ्या सुखसंपत्तीहून अधिक मानते, त्याच्याकडे ते फार दुरून हसून तिरका कटाक्ष टाकतात. पण एके काळी हा दुरावा नव्हता; पहिल्या वयात आम्ही एकाच वाटेने प्रवास सुरू केला होता, — त्यानंतर कधी आमच्या वाटा वेगळ्या होऊ लागल्या, ते त्यांनाही कळले नाही, मलाही कळले नाही; आणि शेवटी आज मी त्यांना हाक मारते, पण ओ येत नाही.
दृष्टिदान
कधी कधी वाटते, मी आंधळी आहे म्हणून कदाचित साध्याशा गोष्टीला मी फार मोठे करून पाहते. डोळे असते तर कदाचित जगाला जगासारखेच मी नीट ओळखू शकले असते. माझ्या यजमानांनीही एके दिवशी मला तेच समजावून सांगितले. त्या दिवशी सकाळी एक म्हातारा मुसलमान आपल्या नातीला पटकी झाली म्हणून उपचारासाठी त्यांना बोलवायला आला होता. मला ऐकू आले, तो म्हणाला, 'बाबा, मी गरीब आहे, पण अल्ला तुमचं भलं करील!' — माझे यजमान म्हणाले, 'अल्ला काय करायचं ते करील, तेवढ्यावर माझं भागणार नाही; तू काय करशील ते आधी सांग!' ते ऐकताक्षणी मला वाटले, देवाने मला आंधळी केली, पण बहिरी का नाही केली? म्हातारा एक खोल निःश्वास टाकून, 'हे अल्ला' म्हणत निघून गेला. मी लगेच मोलकरणीकरवी त्याला आतल्या परसदाराशी बोलावून घेतले, — म्हणाले, 'बाबा, तुमच्या नातीसाठी डॉक्टरच्या खर्चाला हे थोडे देते आहे; माझ्या यजमानांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा आणि आळीतल्या हरीश डॉक्टरांना घेऊन जा.' पण दिवसभर माझ्या तोंडी घास गेला नाही. दुपारी झोपेतून उठल्यावर यजमानांनी विचारले, 'तू अशी उदास का दिसते आहेस?' पूर्वीच्या सवयीचे उत्तर एक तोंडावर आले होते, — नाही, काही नाही, — पण कपटाचे दिवस संपले होते, — मी स्पष्ट सांगितले, 'कितीतरी दिवस तुम्हाला सांगायचे म्हणते, पण सांगायला गेले की नेमके काय सांगायचे आहे ते सुचत नाही. माझ्या मनातली गोष्ट मला समजावून सांगता येईल की नाही ते ठाऊक नाही, पण तुम्हालाही मनातून नक्कीच कळत असेल, आपण दोघांनी जसे एकरूप होऊन आयुष्य सुरू केले होते, ते आज वेगळे झाले आहे.' — यजमान हसून म्हणाले, 'बदल हाच तर जगाचा धर्म.'
दृष्टिदान
मी म्हणाले, 'पैसाअडका, रूप, तारुण्य, सगळ्यांचाच बदल होतो; पण नित्य असे काहीच नाही का?' — तेव्हा ते जरा गंभीर होऊन म्हणाले, 'हे बघ, इतर बायका खऱ्याखुऱ्या उणिवांसाठी दुःख करतात, — कुणाचा नवरा कमावत नाही, कुणाचा नवरा प्रेम करत नाही, — तू आभाळातून दुःख ओढून आणतेस!' मला तेव्हाच कळून चुकले, आंधळेपणाने माझ्या डोळ्यांत एक अंजन घालून मला या बदलत्या जगाच्या बाहेर नेऊन ठेवले आहे; मी इतर बायकांसारखी नाही; माझे यजमान मला समजू शकणार नाहीत. याच दरम्यान माझ्या यजमानांच्या एक आत्या गावाहून आपल्या भाच्याची खबरबात घ्यायला आल्या. आम्ही दोघे त्यांना नमस्कार करून उठतो न उठतो तोच त्या पहिल्याच वाक्यात म्हणाल्या, 'काय गं सूनबाई, तू तर नशिबाने दोन्ही डोळे गमावून बसलीस; आता आमचा अविनाश आंधळ्या बायकोला घेऊन संसार कसा चालवणार? त्याचे आणखी एक लगीनबिगीन लावून दे!' यजमान जर थट्टेने म्हणाले असते, बरं तर आत्याबाई, तुम्हीच पाहून-सवरून एखादे स्थळ जुळवून द्या ना, — तर सगळे मोकळे झाले असते. पण ते संकोचून म्हणाले, 'अहो आत्याबाई, काय बोलता हे!' — आत्याबाईंनी उत्तर दिले, 'का, मी काय वावगं बोलले? बरं सूनबाई, तूच सांग बाळ.' मी हसून म्हणाले, 'आत्याबाई, सल्ला विचारायला चांगले माणूस शोधलेत! ज्याचा खिसा कापायचा, त्याची कुणी संमती घेते का?' आत्याबाईंनी उत्तर दिले, 'हो, ते मात्र खरं! मग तुझ्यामाझ्यात गुपचूप ठरवू, — काय रे अविनाश? आणखी सांगते सूनबाई, कुलीनाच्या पोरीला जितक्या जास्त सवती, तितका तिला नवऱ्याचा अभिमान. आमच्या मुलाने डॉक्टरी करण्याऐवजी लग्नेच करायचा धंदा केला असता, तर त्याला कमाईची काय फिकीर होती! डॉक्टरच्या हाती पडला की रोगी मरतो, — आणि मेल्यावर काही फी देत नाही, — पण विधात्याच्या शापाने कुलीनाच्या बायकोला मरण नाही, आणि ती जितके दिवस जगते, तितके दिवस नवऱ्याचा फायदाच.'
दृष्टिदान
दोन दिवसांनी माझ्या यजमानांनी माझ्या देखत आत्याबाईंना विचारले, 'आत्याबाई, घरच्या माणसासारखी सुनेला मदत करील, अशी एखादी चांगल्या घरची बाई पाहून द्याल का? हिला डोळ्यांनी दिसत नाही; हिच्या सोबतीला सतत कुणी एखादी असली तर मी निश्चिंत राहीन!' मी नवी नवी आंधळी झाले होते तेव्हा हे म्हटले असते तर शोभले असते; पण आता डोळे नसल्यामुळे मला किंवा घरसंसाराला विशेष काय अडचण येते, ते मला ठाऊक नाही; तरीही जराही विरोध न करता मी गप्प राहिले. आत्याबाई म्हणाल्या, 'उणीव कसली? माझ्याच थोरल्या दिराची एक मुलगी आहे, जशी सुंदर तशीच लक्ष्मी! पोरीचे वय झाले, फक्त योग्य वराची वाट पाहत थांबली आहे; तुझ्यासारखा कुलीन मिळाला तर आत्ता लग्न लावून देतील.' — यजमान चमकून म्हणाले, 'लग्नाचे कोण बोलते आहे?' आत्याबाई म्हणाल्या, 'अगं बाई, लग्न केल्याशिवाय चांगल्या घरची मुलगी काय अशीच तुझ्या घरात येऊन पडून राहणार आहे?' बोलणे रास्तच होते, आणि यजमानांना त्यावर काही चांगले उत्तर देता आले नाही. माझ्या बंद डोळ्यांच्या अनंत अंधारात मी एकटी उभी राहून वर तोंड करून हाका मारू लागले, देवा, माझ्या नवऱ्याला वाचव. त्यानंतर काही दिवसांनी एके दिवशी सकाळी माझी पूजाअर्चा आटोपून बाहेर येताच आत्याबाई म्हणाल्या, 'सूनबाई, ज्या दिराच्या मुलीबद्दल सांगितलं होतं, ती आमची हेमांगिनी आज गावाहून आली आहे. हिमू, या तुझ्या दिदी, यांना नमस्कार कर.'
दृष्टिदान
इतक्यात माझे यजमान अचानक आले आणि जणू एका अनोळखी बाईला पाहून परत फिरू लागले. आत्याबाई म्हणाल्या, 'कुठे चाललास अविनाश?' यजमानांनी विचारले, 'या कोण?' आत्याबाई म्हणाल्या, 'हीच ती माझ्या दिराची मुलगी हेमांगिनी.' हिला कधी आणले, कुणी आणले, काय हकीगत, यावरून माझे यजमान पुन्हा पुन्हा कितीतरी अनावश्यक आश्चर्य व्यक्त करू लागले. मी मनात म्हणाले, जे घडते आहे ते सगळे मला कळते आहेच, — पण त्यावर आता पुन्हा कपट सुरू झाले? लपवाछपवी, झाकपाक, खोटे बोलणे! अधर्म करायचाच असेल तर करा, तो स्वतःच्या अशांत वासनेसाठी, — पण माझ्यासाठी हा हीनपणा कशाला? मला भुलवण्यासाठी हे खोटे वागणे कशाला? हेमांगिनीचा हात धरून मी तिला माझ्या शयनघरात नेले. तिच्या चेहऱ्यावरून, अंगावरून हात फिरवून मी तिला पाहिले, — चेहरा सुंदर असावा; वयही चौदा-पंधराहून कमी नसावे. पोर अचानक मोठ्याने हसली आणि म्हणाली, 'हे काय करते आहेस? माझे भूत उतरवणार आहेस की काय?' त्या मोकळ्या, निर्मळ हसण्याने आमच्या मधला एक काळा ढग जणू क्षणात फाटून गेला. उजव्या हाताने तिच्या गळ्याला विळखा घालून मी म्हणाले, 'मी तुला पाहते आहे, बाई गं!' असे म्हणून तिच्या कोमल चेहऱ्यावरून आणखी एकदा हात फिरवला. 'पाहते आहेस?' म्हणून ती पुन्हा हसू लागली. म्हणाली, 'मी काय तुझ्या परसातली घेवड्याची शेंग आहे की वांगे, की हात फिरवून बघते आहेस मी केवढी झाले ते?' तेव्हा मला अचानक जाणवले, मी आंधळी आहे हे हेमांगिनीला ठाऊक नाही. म्हणाले, 'बहिणी, मी आंधळी आहे!' ते ऐकून ती थोडा वेळ चकित होऊन गंभीर झाली. मला चांगले जाणवले, आपल्या कुतूहलाने भरलेल्या, तरुण, विशाल डोळ्यांनी तिने माझे दृष्टिहीन डोळे आणि चेहऱ्यावरचे भाव लक्षपूर्वक पाहिले, — मग म्हणाली, 'अच्छा, म्हणून का काकूला इथे बोलावून घेतलेस?'
दृष्टिदान
मी म्हणाले, 'नाही, मी बोलावले नाही. तुझी काकू आपण होऊन आल्या आहेत, —' पोर पुन्हा हसून म्हणाली, 'दया करून? मग तर या दयावंतीबाई इतक्यात इथून हलत नाहीत! पण बाबांनी मला इथे का पाठवले?' इतक्यात आत्याबाई खोलीत आल्या. इतका वेळ त्यांचे माझ्या यजमानांशी बोलणे चालले होते. त्या खोलीत येताच हेमांगिनी म्हणाली, 'काकू, आपण घरी कधी परत जायचे ते सांग.' आत्याबाई म्हणाल्या, 'अगं बाई! आत्ता कुठे आलीस, आणि लगेच जाऊ-जाऊ! एवढी चंचल पोर तर पाहिलीच नाही कधी.' हेमांगिनी म्हणाली, 'काकू, तुझे तर इथून लवकर हलण्याचे लक्षण दिसत नाही. ठीक आहे, हे तुझ्या नात्यातले घर, तू हवे तितके दिवस राहा; मी मात्र निघून जाणार, हे तुला आत्ताच सांगून ठेवते.' — असे म्हणून माझा हात धरून म्हणाली, 'काय गं, बरोबर ना? तुम्ही काही माझे सख्खे नाही!' — तिच्या या भोळ्या प्रश्नाला काहीच उत्तर न देता मी तिला छातीशी ओढून घेतले. मला दिसले, आत्याबाई कितीही जबरदस्त असल्या तरी या पोरीला आवरणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. उघडपणे राग न दाखवता आत्याबाईंनी हेमांगिनीचे जरा लाड करायचा प्रयत्न केला; तिने ते जणू अंगावरून झटकून टाकले. आत्याबाईंनी सगळा प्रकार लाडावलेल्या पोरीची थट्टा समजून उडवून लावला आणि हसत निघून जायला निघाल्या. पुन्हा काय वाटले कोण जाणे, परत येऊन हेमांगिनीला म्हणाल्या, 'हिमू, चल, तुझी आंघोळीची वेळ झाली.' ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, 'आपण दोघी घाटावर जाऊ, काय गं?' आत्याबाईंनी मनात नसतानाही माघार घेतली; त्यांना ठाऊक होते, ओढाताण करायला गेले तर जीत हेमांगिनीचीच होईल, आणि त्यांच्यातला बेबनाव माझ्यासमोर उघडा पडून शोभा जाईल.
दृष्टिदान
परसदाराच्या घाटाकडे जाता जाता हेमांगिनीने मला विचारले, 'तुला मुलेबाळे का नाहीत?' — मी जरासे हसून म्हणाले, 'का ते मला कसे कळणार, — देवाने दिली नाहीत!' हेमांगिनी म्हणाली, 'तुझ्यात नक्कीच काहीतरी पाप होते.' मी म्हणाले, 'तेही अंतर्यामीलाच ठाऊक.' पुरावा म्हणून पोर म्हणाली, 'बघ ना, काकूच्या मनात एवढा कुटिलपणा आहे की तिच्या पोटी मूलच जन्माला येत नाही.' — पाप-पुण्य, सुख-दुःख, शिक्षा-बक्षीस यांचे तत्त्व मलाच कळत नाही, पोरीलाही समजावले नाही, — फक्त एक निःश्वास टाकून मनातल्या मनात त्याला म्हणाले, — तूच जाणतोस! हेमांगिनीने लगेच मला मिठी मारली आणि हसून म्हणाली, — 'अगं बाई, माझे बोलणे ऐकूनसुद्धा तुला सुस्कारा येतो! माझे बोलणे कुणी मनावर घेते का!' मला जाणवले, यजमानांच्या डॉक्टरीच्या धंद्यात खंड पडू लागला. लांबचे बोलावणे आले तर जातच नाहीत, — जवळपास कुठे गेले तरी झटपट आटोपून परत येतात. पूर्वी कामातून फुरसत मिळून घरी असले तरी दुपारी जेवायला आणि झोपायलाच फक्त आत येत. आता आत्याबाईही केव्हाही बोलावून घेतात, आणि तेही उगाचच आत्याबाईंची चौकशी करायला येतात. आत्याबाई मोठ्याने हाक मारून म्हणतात, 'हिमू, माझा पानाचा डबा घेऊन ये गं,' — तेव्हा मी समजून जाते की आत्याबाईंच्या खोलीत माझे यजमान आले आहेत. सुरुवातीचे दोन-तीन दिवस हेमांगिनी पानाचा डबा, तेलाची वाटी, कुंकवाचा करंडा वगैरे सांगितल्याप्रमाणे घेऊन जाई. पण त्यानंतर हाक आली तरी ती काही केल्या जागची हलत नसे; मोलकरणीच्या हाती सांगितलेली वस्तू पाठवून देई. आत्याबाई हाका मारत, हेमांगिनी, हिमू, हिमी, — आणि पोर जणू माझ्याविषयीच्या करुणेच्या उमाळ्याने मला बिलगून राहत असे, — एका भीतीने आणि विषादाने तिला ग्रासून टाकलेले असे! यानंतर माझ्या यजमानांचा उल्लेख ती माझ्याजवळ चुकूनही करत नसे.
दृष्टिदान
याच दरम्यान माझे दादा मला भेटायला आले. मला ठाऊक होते, दादांची नजर तीक्ष्ण आहे. प्रकरण कसे चालले आहे ते त्यांच्यापासून लपवणे जवळजवळ अशक्य होईल. माझे दादा फार कडक न्यायाधीश आहेत. लवलेशही अन्याय त्यांना क्षमा करता येत नाही. माझे यजमान त्यांच्याच डोळ्यांसमोर अपराधी म्हणून उभे राहतील, याचीच मला सर्वांत जास्त भीती वाटे. अतिरिक्त उत्साहाने मी सारे झाकून ठेवले. जास्त बोलून, जास्त धावपळ करून, मोठा गाजावाजा करून मी चारी बाजूंना जणू धूळ उडवत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ते माझ्या स्वभावाला इतके अनैसर्गिक होते की त्यामुळेच तर माझे बिंग अधिकच फुटायची वेळ आली. पण दादांना फार दिवस राहता आले नाही, — माझ्या यजमानांनी अशी अस्वस्थता दाखवायला सुरुवात केली की तिचे रूपांतर उघड उद्धटपणात झाले. दादा निघून गेले. निरोप घेण्यापूर्वी अपार मायेने त्यांनी आपला कापरा हात कितीतरी वेळ माझ्या डोक्यावर ठेवला, — मनातल्या मनात एकाग्र चित्ताने कोणता आशीर्वाद दिला ते मला कळले; त्यांचे अश्रू माझ्या अश्रूंनी भिजलेल्या गालावर येऊन पडले.
दृष्टिदान
आठवते, ती चैत्र महिन्यातली संध्याकाळ होती; बाजाराचा वार होता, लोक घरी परतत होते. दुरून पाऊस घेऊन एक वादळ येत होते; त्याचा ओल्या मातीचा वास आणि वाऱ्यातला ओलसरपणा आकाशभर पसरला होता, — सोबत चुकलेले वाटसरू अंधारलेल्या माळावर एकमेकांना व्याकूळ होऊन वरच्या सुरात हाका मारत होते. आंधळीच्या शयनघरात मी एकटी असते तोवर दिवा लावत नाहीत, — ज्योत लागून कापड पेट घेईल किंवा आणखी काही अपघात होईल म्हणून. त्या निर्जन अंधाऱ्या खोलीत मी जमिनीवर बसून, दोन्ही हात जोडून माझ्या अनंत आंधळ्या जगाच्या जगदीश्वराला आळवत होते, — म्हणत होते, 'प्रभू, तुझी दया जाणवत नाही, तुझा हेतू कळत नाही, तेव्हा या अनाथ, भग्न हृदयाचे सुकाणू जिवाच्या आकांताने दोन्ही हातांनी छातीशी घट्ट धरून ठेवते; छातीतून रक्त फुटते, तरी वादळ आवरता येत नाही; आणखी किती परीक्षा पाहशील माझी, माझे बळ ते किती!' — असे म्हणता म्हणता अश्रूंचा उमाळा फुटला, — पलंगावर डोके ठेवून मी रडू लागले. दिवसभर घरातली कामे करावी लागतात, हेमांगिनी सावलीसारखी जवळपास असते, — छातीत भरून येणारे अश्रू ढाळायलाही सवड मिळत नाही; कितीतरी दिवसांनी आज डोळ्यांतून पाणी बाहेर पडले, — इतक्यात मला जाणवले, पलंग जरासा हलला, कुणी चालल्याची चाहूल लागली, — आणि क्षणभरात हेमांगिनी येऊन माझ्या गळ्याला मिठी मारून, काही न बोलता पदराने माझे डोळे पुसू लागली. संध्याकाळ सुरू होताना काय मनात आणून, केव्हा येऊन ती पलंगावरच पडून राहिली होती, ते मला कळलेच नव्हते. तिने एकही प्रश्न विचारला नाही; मीही तिला काहीच सांगितले नाही. ती हळूहळू आपला थंड हात माझ्या कपाळावरून फिरवू लागली. मधल्या काळात केव्हा ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाबरोबर एक वादळ येऊन गेले, ते मला कळलेही नाही, — कितीतरी काळानंतर एका स्निग्ध, शीतल शांतीने येऊन तापाच्या दाहाने होरपळलेले माझे हृदय निववले.
दृष्टिदान
दुसऱ्या दिवशी हेमांगिनी म्हणाली, 'काकू, तू घरी गेली नाहीस, तर मी आमच्या कोळीदादाबरोबर निघाले, हे सांगून ठेवते.' — आत्याबाई म्हणाल्या, 'त्याची काय गरज, मीही उद्या जाते आहे, एकत्रच जाऊ. हे बघ हिमू, माझ्या अविनाशने तुझ्यासाठी केवढी छान मोती जडवलेली अंगठी घेऊन दिली आहे!' — असे म्हणून आत्याबाईंनी मोठ्या ऐटीत ती अंगठी हेमांगिनीच्या हातात ठेवली. हेमांगिनी म्हणाली, 'हे बघ काकू, मी किती छान नेम धरू शकते.' — आणि खिडकीतून नेम धरून तिने ती अंगठी परसातल्या तळ्याच्या मधोमध भिरकावून दिली. आत्याबाई रागाने, दुःखाने, आश्चर्याने अंगावर काटा येऊन थरारल्या. त्यांनी पुन्हा पुन्हा माझा हात धरून मला बजावले, 'सूनबाई, हिच्या या पोरकटपणाबद्दल अविनाशला खबरदार काही सांगितलेस तर, — माझ्या लेकराच्या मनाला मग फार लागेल. माझ्या गळ्याची शपथ आहे, सूनबाई! —' मी म्हणाले, 'आणखी सांगायला नको आत्याबाई, मी एक शब्दही बोलणार नाही.'
दृष्टिदान
दुसऱ्या दिवशी निघण्यापूर्वी हेमांगिनी मला बिलगून म्हणाली, 'दिदी, माझी आठवण ठेव हं!' मी दोन्ही हात पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावरून फिरवत म्हणाले, 'आंधळी माणसे काही विसरत नाहीत, बहिणी, — मला जगच उरले नाही, मी फक्त मन घेऊनच जगते आहे!' — असे म्हणून तिचे मस्तक जवळ घेऊन एकदा हुंगले आणि त्याचे चुंबन घेतले. घळघळा माझे अश्रू तिच्या केसांत ओघळले. हेमांगिनी गेल्यावर माझे जग सुकून गेले, — तिने माझ्या जीवनात जो सुगंध, जे सौंदर्य, जे संगीत, जो उज्ज्वल प्रकाश आणि जो कोमल कोवळेपणा आणला होता, तो निघून गेल्यावर मी एकदा माझ्या साऱ्या संसारात, माझ्या चारी बाजूंना दोन्ही हात पसरून चाचपून पाहिले, माझे कुठे काय उरले आहे! — माझे यजमान आले आणि मुद्दाम उत्साह दाखवत म्हणाले, 'या गेल्या, आता सुटलो; आता जरा कामधंदा करायला सवड मिळेल.' — धिक्कार असो, धिक्कार असो मला! माझ्यासाठी एवढी चलाखी कशाला? मी काय सत्याला डरते? मी कधी आघाताला भ्याले आहे का? माझ्या यजमानांना ठाऊक नाही का, की मी माझे दोन्ही डोळे दिले, तेव्हाच शांत मनाने माझा हा कायमचा अंधार स्वीकारला आहे?
दृष्टिदान
इतके दिवस माझ्या आणि माझ्या यजमानांच्या मध्ये फक्त आंधळेपणाचा आडपडदा होता; आजपासून आणखी एक दुरावा निर्माण झाला. माझे यजमान चुकूनसुद्धा कधी माझ्याजवळ हेमांगिनीचे नाव उच्चारत नसत, — जणू त्यांच्याशी संबंध असलेल्या जगातून हेमांगिनी पार पुसली गेली आहे, जणू तिथे तिने कधी लवलेशही रेघ उमटवलेली नाही. तरीही पत्रांतून त्यांना तिची खबर सतत मिळत असते, हे मला सहज जाणवत असे; तळ्यात पुराचे पाणी ज्या दिवशी थोडेसे शिरते, त्याच दिवशी कमळाच्या देठाला ओढ बसते, — तसेच त्यांच्या अंतरात ज्या दिवशी जरासुद्धा भरती येई, त्या दिवशी माझ्या हृदयाच्या मुळाशीच मला ते आपोआप जाणवे. त्यांना कधी खबर मिळे आणि कधी मिळत नसे, हे मला मुळीच अगोचर नव्हते. पण मीही त्यांना तिच्याविषयी विचारू शकत नव्हते. माझ्या अंधाऱ्या हृदयात क्षणभर उगवलेल्या त्या उन्मत्त, उद्दाम, तेजस्वी, सुंदर ताऱ्याची थोडीशी खबर मिळावी, तिच्याविषयी बोलावे, म्हणून माझा जीव तहानलेला असे; पण माझ्या यजमानांपुढे क्षणभरही तिचे नाव घेण्याचा मला अधिकार नव्हता. आम्हा दोघांच्या मध्ये शब्दांनी आणि वेदनेने भरलेले हे एक मौन अढळपणे नांदत असे. वैशाखाच्या मध्यावर एके दिवशी मोलकरीण येऊन मला विचारू लागली, 'आईसाहेब, घाटावर मोठ्या तयारीनिशी नाव सजते आहे; मालक कुठे निघाले आहेत?' — मला ठाऊक होते, काहीतरी तयारी चालली आहे; नशिबाच्या आकाशात आधी काही दिवस वादळापूर्वीची ती निःस्तब्धता, आणि मग प्रलयाचे फाटके-तुटके ढग येऊन जमत होते; संहार करणारा शंकर मूकपणे बोटाच्या इशाऱ्याने आपली सारी प्रलयशक्ती माझ्या मस्तकावर गोळा करतो आहे, — हे मला उमजत होते. मोलकरणीला म्हणाले, 'कुठे काय, मला तर अजून काही कळलेले नाही.' मोलकरीण आणखी काही विचारायचे धाडस न करता सुस्कारा टाकून निघून गेली.
दृष्टिदान
खूप रात्री माझे यजमान येऊन म्हणाले, 'दूर एका ठिकाणाहून मला बोलावणे आले आहे; उद्या पहाटेच मला निघावे लागेल. परत यायला बहुधा दोन-तीन दिवस लागतील.' मी अंथरुणातून उठून उभी राहिले आणि म्हणाले, 'माझ्याशी खोटे का बोलताय?' माझे यजमान कापऱ्या आवाजात म्हणाले, 'खोटे काय बोललो!' मी म्हणाले, 'तुम्ही लग्न करायला चालला आहात!' ते गप्प राहिले. मीही स्तब्ध उभी राहिले. बराच वेळ खोलीत काहीच आवाज नव्हता. शेवटी मी म्हणाले, 'काहीतरी उत्तर द्या! — म्हणा, हो, मी लग्न करायला चाललो आहे.' त्यांनी प्रतिध्वनीसारखे उत्तर दिले, 'हो, मी लग्न करायला चाललो आहे.' मी म्हणाले, 'नाही, तुम्हाला जाता येणार नाही; या महासंकटातून, या महापापातून मी तुम्हाला वाचवीन! हे जर मला जमले नाही, तर मी तुमची कसली बायको; मी शिवपूजा केली ती कशासाठी!' पुन्हा बराच वेळ खोली निःशब्द राहिली. मी जमिनीवर पडून नवऱ्याचे पाय धरले आणि म्हणाले, 'मी तुमचा काय अपराध केला, माझे काय चुकले, — दुसऱ्या बायकोची तुम्हाला काय गरज? माझ्या गळ्याची शपथ आहे, खरे सांगा.' तेव्हा माझे यजमान हळूहळू म्हणाले, 'खरेच सांगतो, मला तुझी भीती वाटते. तुझ्या आंधळेपणाने तुला एका अनंत आवरणात झाकून ठेवले आहे; तिथे मला शिरकाव नाही. तू माझ्या लेखी देवासारखी भयंकर आहेस; तुला घेऊन रोजचा संसार करणे मला जमत नाही. जिच्यावर ओरडेन, जिच्यावर खेकसेन, जिला रागावेन, जिचे लाड करेन, जिला दागिने घडवून देईन, अशी एक साधी सामान्य बाई मला हवी.'
दृष्टिदान
'माझे काळीज फाडून पाहा! मी साधी सामान्य बाई आहे, — मनातून मी त्या नव्या लग्नातल्या पोरीखेरीज दुसरे काहीच नाही, — मला विश्वास ठेवायचा आहे, भिस्त ठेवायची आहे, पूजा करायची आहे, — तुम्ही स्वतःचा अपमान करून, मला असह्य दुःख देऊन तुमच्याहून मला मोठे करू नका; मला सगळ्याच बाबतींत तुमच्या पायाशी राहू द्या.' मी काय काय बोलले, ते का मला आठवते? खवळलेल्या समुद्राला आपली गर्जना आपल्यालाच ऐकू येते का? फक्त एवढे आठवते, मी म्हणाले होते, 'मी जर सती असेन, तर देव साक्षी आहे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमची धर्मशपथ मोडू शकणार नाही. त्या महापापाच्या आधी एकतर मी विधवा होईन, नाहीतर हेमांगिनी जगणार नाही.' असे म्हणून मी मूर्च्छित होऊन खाली कोसळले. माझी मूर्च्छा उतरली, तेव्हा रात्र सरतानाचे पक्षीसुद्धा अजून बोलू लागले नव्हते, आणि माझे यजमान निघून गेले होते. मी देवघराचे दार लावून पूजेला बसले. दिवसभर मी खोलीबाहेर पडले नाही. संध्याकाळी वैशाखातल्या वावटळीने घर हादरू लागले. हे देवा, माझे यजमान आता नदीवर आहेत, त्यांचे रक्षण कर, — असे मी म्हटले नाही. मी फक्त एकाग्र मनाने म्हणत राहिले, 'देवा, माझ्या नशिबी जे व्हायचे ते होवो, पण माझ्या नवऱ्याला महापातकापासून परावृत्त कर.' — सारी रात्र सरली. दुसऱ्या दिवशीही मी आसन सोडले नाही. या जागरणात, उपासात मला कुणी बळ दिले ते मला ठाऊक नाही, — दगडाच्या मूर्तीसमोर मी दगडाच्या मूर्तीसारखीच बसून राहिले होते. संध्याकाळी बाहेरून दार ढकलाढकली सुरू झाली. दार मोडून लोक खोलीत शिरले, तेव्हा मी बेशुद्ध पडलेली होते. शुद्धीवर आले तेव्हा ऐकले, — 'दिदी.' जाणवले, मी हेमांगिनीच्या मांडीवर निजले आहे. मान हलवताच तिचा नवा रेशमी शालू सळसळला. — हाय देवा, माझी प्रार्थना ऐकली नाहीस. माझ्या नवऱ्याचे पतन झाले.
दृष्टिदान
हेमांगिनी मान खाली घालून हळूच म्हणाली, 'दिदी, तुझा आशीर्वाद घ्यायला आले आहे.' पहिला एक क्षण लाकडासारखी ताठ होऊन दुसऱ्याच क्षणी उठून बसले, — म्हणाले, 'आशीर्वाद का देणार नाही, बहिणी? तुझा काय अपराध?' हेमांगिनी आपल्या मधुर, मोकळ्या आवाजात खळखळून हसली, म्हणाली, 'अपराध! तू लग्न केलेस तर अपराध नाही, आणि मी केले की लगेच अपराध?' हेमांगिनीला मिठी मारून मीही हसले. मनात म्हणाले, जगात माझी प्रार्थनाच अखेरची आहे का? त्याची इच्छाच अंतिम नव्हे का? जो आघात व्हायचा तो माझ्या मस्तकावरच होवो, — पण हृदयात जिथे माझा धर्म, माझा विश्वास आहे, तिथे मी त्याला पोचू देणार नाही. मी जशी होते तशीच राहीन. — हेमांगिनीने माझ्या पायाशी वाकून माझ्या पायांची धूळ मस्तकी लावली. मी म्हणाले, 'तू चिरसौभाग्यवती हो, सदा सुखी हो.' हेमांगिनी म्हणाली, 'फक्त आशीर्वाद नाही; तुझ्यासारख्या सतीच्या हातांनी मला आणि तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला ओवाळून घ्यावे लागेल. त्यांची लाज बाळगून चालणार नाही. परवानगी दिलीस तर त्यांना आत घेऊन येते!' मी म्हणाले, 'घेऊन ये.' थोड्या वेळाने माझ्या खोलीत नव्या पावलांची चाहूल शिरली. मायेचा प्रश्न ऐकू आला, 'बरी आहेस ना कुमू?' मी गडबडीने अंथरूण सोडून उठले, पायाशी नमस्कार करून म्हणाले, 'दादा!' हेमांगिनी म्हणाली, 'दादा कसले? कान पिळ त्याचे, हा तुझ्या धाकट्या बहिणीचा नवरा!' तेव्हा सगळे उमगले. मला ठाऊक होते, दादांचा पण होता, लग्न करायचे नाही, — आई नव्हती; त्यांची विनवणी करून त्यांचे लग्न लावून देणारे कुणीच नव्हते. या खेपेला त्यांचे लग्न मीच लावून दिले. दोन्ही डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले, — काही केल्या थांबवता येईना. दादा हळूहळू माझ्या केसांतून हात फिरवू लागले; हेमांगिनी मला बिलगून नुसती हसत राहिली.
दृष्टिदान
रात्री झोप येत नव्हती; मी उत्कंठित मनाने यजमानांच्या परत येण्याची वाट पाहत होते. लाज आणि निराशा ते कशी आवरतील, याचा मला अंदाज बांधता येत नव्हता. खूप रात्री अगदी हळूच दार उघडले. मी दचकून उठून बसले. माझ्या यजमानांच्या पावलांचा आवाज. छातीत हृदय आपटू लागले. ते अंथरुणाजवळ येऊन माझा हात धरून म्हणाले, 'तुझ्या दादांनी मला वाचवले. क्षणभराच्या मोहात पडून मी मरायला निघालो होतो. त्या दिवशी नावेत बसलो तेव्हा माझ्या छातीवर कसला दगड ठेवला होता, ते अंतर्यामीच जाणे; — नदीत वादळात सापडलो तेव्हा जिवाची भीतीही वाटत होती, आणि त्याचबरोबर वाटत होते, बुडालो तर माझी सुटका होईल. मथुरगंजला पोचल्यावर ऐकले, — आदल्याच दिवशी तुझ्या दादांशी हेमांगिनीचे लग्न झाले. किती लाजेने आणि किती आनंदाने मी नावेत परत बसलो, ते सांगता येत नाही. या काही दिवसांत मला पक्के कळून चुकले आहे, तुला सोडून मला कोणतेच सुख नाही. तू माझी देवी आहेस.' मी हसून म्हणाले, 'नाही, मला काही देवीबिवी व्हायचे नाही, — मी तुमच्या घरची गृहिणी, — मी फक्त एक साधी सामान्य स्त्री.' यजमान म्हणाले, 'माझीही एक विनंती तुला मान्य करावी लागेल. मला पुन्हा कधी "देव" म्हणून ओशाळवू नकोस.' दुसऱ्या दिवशी बायकांच्या उलूलू-ध्वनीने आणि शंखनादाने आळी दुमदुमून गेली. जेवताना, बसताना, सकाळी, रात्री हेमांगिनी माझ्या यजमानांची नाना प्रकारे थट्टा करू लागली, — त्या छळाला काही सीमाच उरली नाही, — पण ते कुठे गेले होते, — काय घडले होते, याचा कुणीच लवलेशही उल्लेख केला नाही.