रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
गवताचा चुराडा
जमीनदार बाबूंचा नायब गिरीश बसू याच्या अंतःपुरात प्यारी नावाची एक नवी दासी कामाला ठेवली होती. वय लहान; चालचलणूक चांगली. दूर परमुलखातून ती आली होती; काही दिवस काम केल्यावर एके दिवशी म्हाताऱ्या नायबाच्या अनुरागी नजरेपासून आपला बचाव व्हावा म्हणून ती रडत रडत मालकिणीकडे धावली. मालकीणबाई म्हणाल्या, 'बाळ, तू दुसरीकडे कुठे तरी जा; तू भल्या घरची पोर, इथे राहिलीस तर तुझं काही बरं व्हायचं नाही.' असे म्हणून त्यांनी गुपचूप थोडे पैसे देऊन तिची पाठवणी केली. पण पळून जाणे सोपे काम नव्हते, हाती वाटखर्चीही तुटपुंजी; म्हणून प्यारी गावातल्या हरिहर भट्टाचार्यमहाशयांकडे जाऊन त्यांच्या आश्रयाला राहिली. शहाणे मुलगे म्हणाले, 'बाबा, संकट घरात कशाला आणताय?' हरिहर म्हणाले, 'संकट स्वतःहून येऊन आश्रय मागू लागलं, तर त्याला मी परत लावू शकत नाही.' गिरीश बसूने साष्टांग नमस्कार घालून म्हटले, 'भट्टाचार्यमहाशय, आपण माझी मोलकरीण फितवून का आणलीत? घरी कामाची भारी अडचण होतेय.' याच्या उत्तरादाखल हरिहरांनी दोन-चार खऱ्या गोष्टी चांगल्याच कडक शब्दांत ऐकवल्या. ते मानी गृहस्थ होते; कुणाच्या मुलाहिजाखातर कोणतीही गोष्ट फिरवून सांगणे त्यांना जमत नसे. नायबाने मनातल्या मनात त्यांना पंख फुटलेल्या मुंगीची उपमा दिली आणि तो निघून गेला. जाताना त्याने मोठ्या थाटात त्यांची चरणधूळ घेतली. दोन-चार दिवसांतच भट्टाचार्यांच्या घरी पोलिसांचे आगमन झाले. भट्टाचार्यांच्या गृहिणींच्या उशीखालून नायबाच्या बायकोची इअरिंगची एक जोडी निघाली. मोलकरीण प्यारी चोर ठरून तुरुंगात गेली. भट्टाचार्यमहाशय पंचक्रोशीत गाजलेल्या आपल्या वजनाच्या जोरावर चोरीचा माल ठेवल्याच्या आरोपातून सुटले. नायब पुन्हा एकदा ब्राह्मणाची चरणधूळ घेऊन गेला.
गवताचा चुराडा
ब्राह्मणाच्या लक्षात आले, त्या अभागिनीला आपण आश्रय दिला म्हणूनच प्यारीचा सर्वनाश झाला. ते शल्य त्यांच्या मनात सलत राहिले. मुलगे म्हणाले, 'जमीनजुमला विकून कलकत्त्याला जाऊ या; इथे मोठं कठीण दिसतंय.' हरिहर म्हणाले, 'वाडवडिलांची वास्तू मला सोडवणार नाही; नशिबात असलं तर संकट कुठे येत नाही?' दरम्यान नायबाने गावात अवाच्या सव्वा सारा वाढवायचा प्रयत्न केला, तेव्हा रयत बंड करून उठली. हरिहरांची सगळी जमीन ब्रह्मोत्तर इनामाची; जमीनदाराशी तिचा काहीही संबंध नाही. नायबाने आपल्या धन्याला कळवले, हरिहरानेच रयतेला फूस लावून बंडाला उठवले आहे. जमीनदार म्हणाले, 'कसंही करून त्या भट्टाचार्याला वठणीवर आण.' नायबाने भट्टाचार्यांची चरणधूळ घेऊन म्हटले, 'समोरची ती जमीन परगण्याच्या वस्तीच्या हद्दीत येते; ती तर आपल्याला सोडावी लागेल.' हरिहर म्हणाले, 'हे काय भलतंच! ती तर माझी कित्येक वर्षांची ब्रह्मोत्तर इनाम जमीन आहे.' हरिहरांच्या घराच्या अंगणाला लागून असलेली वडिलोपार्जित जमीन जमीनदाराच्या परगण्यात मोडते म्हणून फिर्याद दाखल झाली. हरिहर म्हणाले, 'मग ही जमीन सोडूनच द्यायला हवी; या म्हातारपणी मी काही कोर्टात साक्ष देऊ शकणार नाही.' मुलगे म्हणाले, 'घराला लागून असलेली जमीनच जर सोडून द्यायची, तर मग या वास्तूत आपण टिकायचं तरी कसं?' प्राणांहूनही प्रिय असलेल्या वाडवडिलांच्या वास्तूच्या मायेपोटी वृद्ध थरथरत्या पायांनी कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन उभे राहिले. मुन्सफ नवगोपालबाबूंनी त्यांचीच साक्ष प्रमाण मानून खटला डिसमिस करून टाकला. भट्टाचार्यांच्या स्वतःच्या कुळांनी यावरून गावात मोठा जल्लोष, उत्सव मांडला. हरिहरांनी घाईघाईने त्यांना आवरले.
गवताचा चुराडा
नायबाने येऊन मोठ्या थाटामाटात भट्टाचार्यांची चरणधूळ घेतली, ती अंगाला, मस्तकाला फासली आणि अपील दाखल केले. वकील हरिहरांकडून पैसे घेत नसत. त्यांनी ब्राह्मणाला वारंवार धीर दिला, या खटल्यात हरण्याची काहीही शक्यता नाही. दिवसाची कधी रात्र होऊ शकते का? ते ऐकून हरिहर निश्चिंत होऊन घरी बसून राहिले. एके दिवशी जमीनदारीच्या कचेरीत ढोलताशे वाजू लागले; बोकड कापून नायबाच्या बिऱ्हाडी कालीपूजा होणार होती. प्रकार तरी काय? भट्टाचार्यांना खबर लागली, अपिलात त्यांची हार झाली आहे. भट्टाचार्यांनी कपाळ बडवून वकिलांना विचारले, 'वसंतबाबू, हे काय करून बसलात? आता माझं काय होणार?' दिवसाची रात्र कशी झाली, याचे गूढ रहस्य वसंतबाबूंनी उलगडून सांगितले, 'नुकतेच जे नवे ॲडिशनल जज होऊन आले आहेत, ते मुन्सफ असताना मुन्सफ नवगोपालबाबूंशी त्यांचे भारी खटके उडाले होते. तेव्हा त्यांना काही करता आले नाही; आज जजाच्या आसनावर बसल्यावर नवगोपालबाबूंचा निकाल हाती पडताक्षणी ते तो उलटवून टाकतात; तुम्ही हरलात ते त्यामुळे.' व्याकूळ होऊन हरिहरांनी विचारले, 'याच्यावर हायकोर्टात काही अपील नाही?' वसंत म्हणाले, 'जजबाबूंनी अपिलात काही हाती लागण्याची शक्यताच ठेवलेली नाही. त्यांनी तुमच्या साक्षीदारांवर संशय घेऊन विरुद्ध पक्षाच्या साक्षीदारांवरच विश्वास ठेवला आहे; आणि हायकोर्टात साक्षीदारांची छाननी तर होणार नाही.' वृद्ध डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, 'मग आता माझ्यापुढे उपाय काय?' वकील म्हणाले, 'उपाय काहीच दिसत नाही.' दुसऱ्या दिवशी गिरीश बसू लवाजमा सोबत घेऊन आला, थाटामाटात ब्राह्मणाची चरणधूळ घेऊन गेला, आणि निरोप घेताना उमाळ्याने भरलेला दीर्घ सुस्कारा सोडून म्हणाला, 'प्रभो, तुझीच इच्छा!'