रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
घाटाची कहाणी
पाषाणावर घटना कोरल्या जात असत्या, तर किती दिवसांपूर्वीच्या किती गोष्टी तुम्हाला माझ्या पायरीपायरीवर वाचता आल्या असत्या! जुन्या गोष्टी ऐकायच्या असतील तर या माझ्या पायरीवर बसा; मन लावून पाण्याच्या खळखळाटाला कान देऊन राहा, फार फार दिवसांच्या कितीतरी विसरलेल्या गोष्टी ऐकू येतील. मला अशाच आणखी एका दिवसाची आठवण होते आहे. तोही अगदी असाच दिवस. आश्विन लागायला अजून दोन-चार दिवसच बाकी आहेत. पहाटेच्या वेळी नव्या थंडीचा अगदी हलकासा, गोड वारा झोपेतून उठलेल्यांच्या अंगात नवा जीव आणतो आहे. झाडांची पालवी त्याबरोबर थोडी थोडी शहारते आहे. दुथडी भरलेली गंगा. माझ्या फक्त चार पायऱ्या पाण्यावर डोके काढून जाग्या आहेत. पाणी आणि जमीन जणू एकमेकांच्या गळ्यात गळा घालून आहेत. काठावरच्या आमराईखाली जिथे अळूचे रान माजले आहे, तिथपर्यंत गंगेचे पाणी पोचले आहे. नदीच्या त्या वळणाजवळ विटांच्या तीन जुन्या भट्ट्या चहूबाजूंनी पाण्याने वेढलेल्या, डोके वर काढून उभ्या आहेत. काठावरच्या बाभळीच्या बुंध्यांना बांधलेल्या कोळ्यांच्या होड्या सकाळच्या भरतीच्या पाण्यावर उचलल्या जाऊन डुचमळत आहेत — उधाणलेल्या तारुण्याचे भरतीचे पाणी त्यांची थट्टा करत त्यांच्या दोन्ही अंगांवर छलछल धडका देते आहे, गोड चेष्टेने त्यांचे कान धरून त्यांना हलवून जाते आहे. भरल्या गंगेवर शरदातल्या सकाळचे जे ऊन पडले आहे, त्याचा रंग कच्च्या सोन्यासारखा, चाफ्याच्या फुलासारखा. उन्हाचा असा रंग इतर कोणत्याही वेळी दिसत नाही. वाळूच्या बेटावर, कासाच्या रानावर ऊन पडले आहे. कासाची फुले अजून सगळी फुललेली नाहीत; फुलायला नुकतीच सुरुवात झाली आहे.
घाटाची कहाणी
'राम राम' म्हणून नावाड्यांनी होड्या सोडल्या. पक्षी जसे उजेडात पंख पसरून आनंदाने निळ्या आभाळात उडाले आहेत, तशा छोट्या छोट्या होड्या आपली छोटी छोटी शिडे फुगवून सूर्यकिरणांत बाहेर पडल्या आहेत. त्या पक्ष्यांसारख्याच वाटतात; राजहंसांसारख्या पाण्यावर तरंगत आहेत, पण आनंदाने आपले दोन्ही पंख आकाशात पसरून दिले आहेत. भट्टाचार्यमहाशय अगदी ठरल्या वेळी पळीपंचपात्र घेऊन स्नानाला आले आहेत. बायका एकेकट्या, दोघी-दोघी करून पाणी भरायला आल्या आहेत. ती काही फार दिवसांपूर्वीची गोष्ट नाही. तुम्हाला कदाचित फार दिवस झाले असे वाटेल; पण मला मात्र ती अगदी कालपरवाची वाटते. माझे दिवस म्हणजे गंगेच्या प्रवाहावर खेळत खेळत वाहून जातात, आणि कितीतरी काळ मी स्थिर राहून तेच पाहत आलो आहे — म्हणून काळ मला फारसा लांब वाटत नाही. माझ्या दिवसाचा प्रकाश आणि रात्रीची छाया रोज गंगेवर पडते आणि रोज गंगेवरून पुसून जाते — कुठेही आपले चित्र ठेवून जात नाही. म्हणूनच, मी म्हाताऱ्यासारखा दिसू लागलो असलो तरी माझे हृदय सदैव नवे आहे. पुष्कळ वर्षांच्या आठवणींच्या शेवाळाच्या ओझ्याखाली झाकले जाऊन माझे सूर्यकिरण मेलेले नाहीत. कधीतरी एखादे तुटलेले शेवाळ वाहत येऊन अंगाला चिकटून राहते, आणि पुन्हा प्रवाहाबरोबर वाहून जाते. पण म्हणून माझ्याजवळ काहीच उरले नाही, असे मी म्हणू शकत नाही. जिथे गंगेचा प्रवाह पोचत नाही, तिथे माझ्या फटीफटींत ज्या वेली, जी झुडपे, जे शेवाळ उगवले आहे, तेच माझ्या जुन्या दिवसांचे साक्षी; त्यांनीच जुन्या काळाला मायेच्या पाशात बांधून सदा हिरवागार, सदा गोड, सदा नवा ठेवला आहे. गंगामाई रोज माझ्यापासून एकेक पायरी दूर सरत आहेत, आणि मीही एकेक पायरीने जुना होत आहे.
घाटाची कहाणी
चक्रवर्त्यांच्या घरच्या त्या म्हाताऱ्या आजीबाई स्नान करून, अंगावर नामावळी पांघरून थरथरत, माळ जपत घरी परत चालल्या आहेत ना, त्यांची आजी तेव्हा एवढीशी होती. मला आठवते, तिचा एक खेळ होता: ती रोज कोरफडीचे एक पान गंगेच्या पाण्यात सोडून देत असे; माझ्या उजव्या बाहूजवळ एक भोवऱ्यासारखा होता, तिथे ते पान सारखे गरगर फिरत राही, आणि ती घागर खाली ठेवून उभी राहून तेच पाहत असे. काही दिवसांनी जेव्हा पाहिले की तीच मुलगी मोठी होऊन आपल्या एका मुलीला बरोबर घेऊन पाणी भरायला येऊ लागली, ती मुलगीही पुन्हा मोठी झाली, आणि लहान पोरी पाणी उडवून दंगामस्ती करू लागल्या की त्याही पुन्हा त्यांना दटावत आणि सभ्य माणसासारखे कसे वागावे ते शिकवत, तेव्हा मला ते कोरफडीच्या होड्या सोडणे आठवे आणि मोठी गंमत वाटे. जी गोष्ट सांगायची म्हणतो, ती काही येतच नाही. एक गोष्ट सांगता सांगता प्रवाहाबरोबर दुसरीच गोष्ट वाहत येते. गोष्टी येतात, गोष्टी जातात, धरून ठेवता येत नाहीत. फक्त एखादी एखादी कहाणी त्या कोरफडीच्या होड्यांसारखी भोवऱ्यात सापडून अविश्रांत फिरून फिरून परत येते. अशीच एक कहाणी आपले चिमुकले ओझे घेऊन आज माझ्याभोवती फिरून फिरून घुटमळते आहे — आता बुडते की मग बुडते. त्या पानासारखीच ती अगदी लहान आहे; तिच्यात फारसे काही नाही, खेळातली दोन फुले आहेत, इतकेच. ती बुडताना पाहिली तर एखादी कोवळ्या मनाची मुलगी फक्त एक दीर्घ सुस्कारा सोडून घरी परत जाईल. देवळाशेजारी गोसाव्यांच्या गोठ्याचे ते कुंपण दिसते आहे ना, तिथे एक बाभळीचे झाड होते. त्याच्याच खाली आठवड्यातून एक दिवस बाजार भरत असे. तेव्हा गोसावी अजून इथे वस्तीला आले नव्हते. जिथे आता त्यांचा चंडीमंडप उभा आहे, तिथे तेव्हा फक्त झावळ्यांचे एक छप्पर होते.
घाटाची कहाणी
आज हा जो पिंपळ माझ्या बरगड्याबरगड्यांतून आपले बाहू पसरून, अक्राळविक्राळ, लांबलचक, कठोर बोटांच्या जाळ्यासारख्या आपल्या मुळांनी माझा भेगाळलेला पाषाण-प्राण मुठीत आवळून बसला आहे, ते तेव्हा अगदी इवलेसे रोपटे होते. कोवळी कोवळी पाने घेऊन ते मान वर काढत होते. ऊन पडले की त्याच्या पानांच्या सावल्या दिवसभर माझ्यावर खेळत, त्याची नवी मुळे बाळाच्या बोटांसारखी माझ्या छातीजवळ वळवळत. कुणी त्याचे एक पान जरी तोडले तरी माझ्या जिवाला कळ लागे. वय पुष्कळ झाले होते, तरी तेव्हा मी सरळ होतो. आज जसा कणा मोडून अष्टावक्रासारखा वाकडातिकडा झालो आहे, खोल वळ्यांसारख्या हजारो ठिकाणी मला भेगा पडल्या आहेत, माझ्या पोटात जगभरचे बेडूक हिवाळ्यातल्या आपल्या दीर्घ झोपेची तयारी करत आहेत, तशी दशा तेव्हा माझी नव्हती. फक्त माझ्या डाव्या बाहूच्या बाहेरच्या अंगाला दोन विटा नव्हत्या; त्या खळग्यात एका कोतवाल पक्ष्याने घरटे केले होते. पहाटे तो चुळबुळत जागा होई, माशाच्या शेपटीसारखी आपली दुभंगलेली शेपटी दोन-चारदा भराभर नाचवून, शीळ घालून आकाशात उडून जाई, तेव्हा मी ओळखत असे की कुसुमची घाटावर यायची वेळ झाली. मी ज्या मुलीची गोष्ट सांगतो आहे, तिला घाटावरच्या इतर मुली 'कुसुम' म्हणून हाक मारत. बहुधा कुसुम हेच तिचे नाव असावे. पाण्यावर कुसुमची छोटीशी सावली पडली की मला वाटे, ती सावली धरून ठेवता आली तर! ती सावली माझ्या पाषाणात बांधून ठेवता आली तर! अशी एक माधुरी तिच्यात होती. ती माझ्या पाषाणावर पाऊल टाकी आणि तिच्या पायांतले चार पैंजण वाजू लागत, तेव्हा माझी शेवाळे, माझी झुडपे जणू रोमांचित होऊन जात.
घाटाची कहाणी
कुसुम खूप खेळे, गप्पा मारी किंवा हसणे-खिदळणे करी असे काही नाही; तरी आश्चर्य हे की, तिच्याइतक्या मैत्रिणी दुसऱ्या कुणाच्याही नव्हत्या. जितक्या म्हणून द्वाड पोरी होत्या, त्यांचे तिच्यावाचून चालत नसे. कुणी तिला 'कुसी' म्हणे, कुणी 'खुशी' म्हणे, कुणी 'राक्कुसी' म्हणे. तिची आई तिला 'कुस्मी' म्हणे. केव्हाही पाहावे, कुसुम पाण्याच्या काठावर बसलेली. पाण्याचे आणि तिच्या हृदयाचे जणू काहीतरी खास नाते होते. तिला पाणी फार फार आवडे. काही दिवसांनी कुसुम दिसेनाशी झाली. भुवन आणि स्वर्ण घाटावर येऊन रडत. ऐकले, त्यांच्या कुसी-खुशी-राक्कुसीला सासरी नेले. ऐकले, तिला जिथे नेले तिथे म्हणे गंगा नाही. तिथे म्हणे सगळी कोण कोण नवी माणसे, नवी घरेदारे, नव्या वाटा, नवे घाट. पाण्यातल्या कमळाला जणू कुणी कोरड्या जमिनीत लावायला घेऊन गेले. हळूहळू कुसुमला मी एक प्रकारे विसरूनच गेलो आहे. एक वर्ष उलटून गेले आहे. घाटावरच्या बायकाही कुसुमचा विषय फारसा काढत नाहीत. एके दिवशी संध्याकाळी फार जुन्या ओळखीच्या पावलांच्या स्पर्शाने एकाएकी मी जणू दचकलो. वाटले, कुसुमचीच पावले. होय, तीच; पण त्या पायांत आता पैंजण वाजत नव्हते. त्या पावलांचे ते संगीत नव्हते. कुसुमच्या पावलांचा स्पर्श आणि पैंजणांचा आवाज मी नेहमी एकत्रच अनुभवत आलो होतो — आज एकाएकी तो पैंजणांचा आवाज ऐकू आला नाही, तेव्हा संध्याकाळच्या पाण्याचा खळखळाट कसा उदास वाटू लागला, आमराईत पाने सळसळवीत वारा कसा हाय-हाय करून उठला.
घाटाची कहाणी
कुसुम विधवा झाली आहे. ऐकले, तिचा नवरा परगावी नोकरी करत असे; एखाद-दोन दिवसांखेरीज नवऱ्याशी तिची भेटच झाली नव्हती. पत्राने वैधव्याची बातमी आली, आणि आठ वर्षांच्या वयात भांगातला शेंदूर पुसून, अंगावरचे दागिने उतरवून ती पुन्हा आपल्या गावी, त्याच गंगेकाठी परत आली आहे. पण तिच्या मैत्रिणींपैकीही आता फारसे कुणी उरले नाही. भुवन, स्वर्ण, अमला सासरी नांदायला गेल्या आहेत. फक्त शरत् आहे, पण ऐकतो की मार्गशीर्षात तिचेही लग्न होणार आहे. कुसुम अगदी एकटी पडली आहे. पण ती जेव्हा दोन्ही गुडघ्यांवर डोके टेकून माझ्या पायरीवर गप्प बसून राही, तेव्हा मला वाटे, नदीच्या लाटा सगळ्या मिळून हात उंचावून तिला 'कुसी-खुशी-राक्कुसी' म्हणून हाका मारत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला गंगा जशी पाहता पाहता रोज भरून येते, तशी कुसुम पाहता पाहता रोज सौंदर्याने, तारुण्याने भरून येऊ लागली. पण तिच्या मळकट वस्त्राने, करुण मुखाने, शांत स्वभावाने तिच्या तारुण्यावर असे एक सावळे आवरण घातले होते की ते तारुण्य, ते उमललेले रूप लोकांच्या नजरेत भरतच नसे. कुसुम मोठी झाली आहे, हे जणू कुणाला दिसतच नव्हते. मला तर नाहीच दिसले. मी कुसुमला त्या लहानग्या मुलीपेक्षा मोठी कधी पाहिलीच नाही. तिच्या पायांत पैंजण नव्हते हे खरे, पण ती चालू लागली की मला त्या पैंजणांचा आवाज ऐकू येई. असे करता करता दहा वर्षे केव्हा निघून गेली, गावातल्या कुणाला जणू कळलेही नाही. आज तुम्ही पाहता आहात ना, त्या वर्षीही भाद्रपदाच्या अखेरीस असाच एक दिवस आला होता. तुमच्या पणज्यांनी त्या दिवशी सकाळी उठून असाच मधुर सूर्यप्रकाश पाहिला होता. एवढाले घुंगट ओढून, घागरी उचलून, माझ्यावरचा सकाळचा प्रकाश आणखी उजळून टाकण्यासाठी त्या झाडाझुडपांतून, गावाच्या उंचसखल वाटांवरून गप्पा मारत येत, तेव्हा तुमची शक्यतासुद्धा त्यांच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात उगवत नसे.
घाटाची कहाणी
तुमच्या आज्याही खरोखरच एके काळी खेळत-बागडत होत्या, आजचा दिवस जसा खरा, जसा जिवंत, तसाच तो दिवसही अगदी खरा होता, तुमच्यासारखेच कोवळे हृदय घेऊन सुखदुःखांत त्याही तुमच्यासारख्याच हेलकावे खात डुलल्या होत्या — याची जशी तुम्हाला नीट कल्पनाच करता येत नाही, तसाच आजचा हा शरदाचा दिवस — त्यांच्याविना, त्यांच्या सुखदुःखांच्या आठवणीचा लवलेशही नसलेले, शरदाच्या सूर्यकिरणांनी उजळलेले आजचे हे आनंदचित्र — त्यांच्या कल्पनेला तर त्याहूनही अगोचर होते. त्या दिवशी पहाटेपासून उत्तरेकडचा पहिला वारा हलका हलका वाहू लागला होता आणि फुललेली बाभळीची फुले एखाद-दुसरे माझ्यावर उडवून टाकत होता. माझ्या पाषाणावर दवाच्या बारीक बारीक रेषा उमटल्या होत्या. त्याच दिवशी सकाळी कोठूनसे एक गौरवर्णी, सौम्य तेजस्वी मुखाचे, उंचेपुरे तरुण संन्यासी आले आणि माझ्या समोरच्या त्या शिवमंदिरात त्यांनी आश्रय घेतला. संन्याशांच्या आगमनाची बातमी गावभर पसरली. बायका घागरी ठेवून महाराजांना नमस्कार करायला मंदिरात जाऊन गर्दी करू लागल्या. गर्दी रोज वाढू लागली. एक तर संन्यासी, त्यात अनुपम रूप, त्यात ते कुणाचीही उपेक्षा करत नसत — मुलांना उचलून मांडीवर बसवत, आयांना घरसंसाराची विचारपूस करत. थोड्याच काळात बायकांमध्ये त्यांचा फार दबदबा झाला. त्यांच्याकडे पुरुषही पुष्कळ येत. कधी ते भागवत वाचत, कधी भगवद्गीतेवर निरूपण करत, कधी मंदिरात बसून नाना शास्त्रांची चर्चा करत. कुणी त्यांच्याकडे उपदेश घ्यायला येई, कुणी मंत्र घ्यायला येई, कुणी रोगावर औषध विचारायला येई. बायका घाटावर येऊन आपसात बोलत — अगं बाई, काय ते रूप! जणू साक्षात महादेवच सदेह आपल्या मंदिरात येऊन विराजमान झाले आहेत!
घाटाची कहाणी
संन्यासी रोज उषःकाली, सूर्योदयापूर्वी, शुक्राच्या चांदणीला समोर ठेवून गंगेच्या पाण्यात देह बुडवून धीरगंभीर स्वरात संध्या करत, तेव्हा मला पाण्याचा खळखळाट ऐकूच येत नसे. त्यांचा तो कंठस्वर ऐकता ऐकता रोज गंगेच्या पूर्व किनाऱ्यावरचे आकाश लालबुंद होई, ढगांच्या कडाकडांनी अरुण रंगाच्या रेषा उमटत, उमलू पाहणाऱ्या कळीच्या पाकळ्यांच्या आवरणासारखा अंधार फुटून चहूकडे गळून पडे, आणि आकाशाच्या सरोवरात उषाकुसुमाची लाल आभा थोडी थोडी बाहेर डोकावू लागे. मला वाटे, हा महापुरुष गंगेच्या पाण्यात उभा राहून पूर्वेकडे पाहत जो एक महामंत्र म्हणतो, त्याचा एकेक शब्द उच्चारला जाताच रात्रीची मोहिनी भंग पावते, चंद्र-तारे पश्चिमेला उतरतात, सूर्य पूर्वाकाशात वर चढू लागतो, जगाचा देखावाच पालटून जातो. हा कोण मायावी! स्नान करून संन्यासी होमाच्या ज्वाळेसारखी आपली उंच, शुभ्र, पुण्यवान तनू घेऊन पाण्यातून वर येत, त्यांच्या जटाभारातून पाणी निथळत असे, तेव्हा कोवळी सूर्यकिरणे त्यांच्या सर्वांगावर पडून परावर्तित होऊन झळाळू लागत. असे आणखी काही महिने गेले. चैत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी पुष्कळ लोक गंगास्नानाला आले. बाभळीखाली मोठा बाजार भरला. या निमित्ताने संन्याशांना पाहण्यासाठीही लोकांची रीघ लागली. ज्या गावी कुसुमचे सासर होते, तिथूनही पुष्कळ बायका आल्या होत्या. सकाळी माझ्या पायरीवर बसून संन्यासी जप करत होते; त्यांना पाहताच एकाएकी एका बाईने दुसरीला हळूच ढोसून म्हटले, 'अगं, हा तर आपल्या कुसुमचा नवरा!' दुसरीने दोन बोटांनी घुंगट जरासा फाकवून धरत म्हटले, 'अय्या, खरंच की गं! हे तर आपल्या चाटुज्ज्यांच्या घरचे धाकटे दादाबाबू!'
घाटाची कहाणी
आणखी एक जी घुंगटाचा फारसा बडेजाव करत नसे, ती म्हणाली, 'अगं बाई, तसंच कपाळ, तसंच नाक, तसेच डोळे!' आणखी एकीने संन्याशांकडे लक्षही न देता सुस्कारा सोडला आणि घागरीने पाणी बाजूला ढकलत म्हणाली, 'अगं, तो आता कुठला असायला! तो काय आता परत येणार! कुसुमचं कुठलं तसं कपाळ!' तेव्हा कुणी म्हणाली, 'त्याला एवढी दाढी नव्हती.' कुणी म्हणाली, 'तो असा शिडशिडीत नव्हता.' कुणी म्हणाली, 'तो एवढा उंचही नसावा बहुतेक.' अशा रीतीने या गोष्टीचा एक प्रकारे निकाल लागला, आणि ती पुन्हा निघाली नाही. गावातल्या बाकी सगळ्यांनी संन्याशांना पाहिले होते, फक्त कुसुमने पाहिले नव्हते. फार गर्दी होऊ लागल्यामुळे कुसुमने माझ्याकडे येणे पूर्णच सोडून दिले होते. एके दिवशी संध्याकाळी, पौर्णिमेच्या तिथीला, चंद्र उगवताना पाहून कदाचित आमचे जुने नाते तिला आठवले. तेव्हा घाटावर आणखी कुणीही नव्हते. रातकिडे किर्र-किर्र करत होते. मंदिरातल्या झांजा-घंटांचा नाद नुकताच थोड्या वेळापूर्वी थांबला होता; त्याची शेवटची ध्वनिलहर क्षीण क्षीण होत पैलतीरावरच्या सावळ्या वनराईत सावलीसारखी विरून गेली होती. पूर्ण चांदणे. भरतीचे पाणी छलछल करते आहे. माझ्यावर आपली सावली टाकून कुसुम बसली आहे. वारा फारसा नव्हता, झाडेझुडपे निःस्तब्ध. कुसुमच्या समोर गंगेच्या वक्षावर अफाट, मोकळे पसरलेले चांदणे — आणि कुसुमच्या मागे, आजूबाजूला, झाडाझुडपांत, वेलीपानांत, मंदिराच्या सावलीत, पडक्या घराच्या भिंतीशी, तळ्याच्या काठी, ताडाच्या बनात अंधार अंग चोरून, तोंडावरून पांघरूण ओढून बसला आहे. सातवीणाच्या फांदीवर वटवाघळे लोंबकळत आहेत. मंदिराच्या कळसावर बसलेले घुबड मधूनच रडल्यासारखे ओरडते आहे. वस्तीजवळ कोल्ह्यांची कोल्हेकुई उठली आणि थांबली.
घाटाची कहाणी
संन्यासी हळूहळू मंदिरातून बाहेर आले. घाटावर येऊन एक-दोन पायऱ्या उतरले, आणि एकट्या स्त्रीला पाहून माघारी फिरावे असे मनात आणत होते, तोच एकाएकी कुसुमने मान वर करून मागे वळून पाहिले. तिच्या डोक्यावरचा पदर ढळला. वर तोंड करून उमललेल्या फुलावर जसे चांदणे पडते, तसे मान वर करताच कुसुमच्या मुखावर चांदणे पडले. त्याच क्षणी दोघांची नजरानजर झाली. जणू ओळख पटली. वाटले, जणू पूर्वजन्मीची ओळख होती. डोक्यावरून घुबड ओरडत निघून गेले. त्या आवाजाने दचकून, स्वतःला सावरून कुसुमने डोक्यावर पदर घेतला. उठून संन्याशांच्या पायांशी लोटांगण घालून नमस्कार केला. संन्याशांनी आशीर्वाद देऊन तिला विचारले, 'तुझं नाव काय?' कुसुम म्हणाली, 'माझं नाव कुसुम.' त्या रात्री आणखी काही बोलणे झाले नाही. कुसुमचे घर अगदी जवळच होते; कुसुम हळूहळू निघून गेली. त्या रात्री संन्यासी बराच वेळ माझ्या पायरीवर बसून होते. शेवटी पूर्वेचा चंद्र पश्चिमेला आला, संन्याशांच्या मागची सावली समोर येऊन पडली, तेव्हा ते उठून मंदिरात निघून गेले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी पाहत असे, कुसुम रोज येऊन संन्याशांच्या पायांची धूळ मस्तकी लावून जात असे. संन्यासी शास्त्रांचे निरूपण करत तेव्हा ती एका बाजूला उभी राहून ऐकत असे. संन्यासी सकाळची संध्या आटोपून कुसुमला बोलावून घेत आणि तिला धर्माच्या गोष्टी सांगत. ती सगळे समजू शकत असे का? पण अगदी लक्ष देऊन ती गप्प बसून ऐकत असे; संन्यासी तिला जसा उपदेश करत, ती तंतोतंत तसेच पाळत असे. रोज ती मंदिराचे काम करी, देवसेवेत आळस करत नसे, पूजेची फुले वेची, गंगेतून पाणी आणून मंदिर धुऊन काढी.
घाटाची कहाणी
संन्यासी तिला ज्या ज्या गोष्टी सांगत, माझ्या पायरीवर बसून ती त्यांचाच विचार करत असे. हळूहळू तिची दृष्टी जणू विस्तारली, हृदय उघडले. जे तिने कधी पाहिले नव्हते ते तिला दिसू लागले, जे कधी ऐकले नव्हते ते ऐकू येऊ लागले. तिच्या शांत मुखावर जी एक म्लान छाया होती, ती दूर झाली. सकाळी ती भक्तिभावाने संन्याशांच्या पायांशी लोटांगण घाली, तेव्हा ती देवाला वाहिलेल्या, दवाने धुतलेल्या पूजेच्या फुलासारखी दिसे. एका निर्मळ प्रसन्नतेने तिचे सारे अंग उजळून निघाले. हिवाळा सरत आलेल्या या दिवसांत थंड वारा वाहतो, आणि मग एखाद्या दिवशी संध्याकाळी एकाएकी दक्षिणेकडून वसंताचा वारा सुटतो, आकाशातला गारठा पार नाहीसा होतो — पुष्कळ दिवसांनी गावात बासरी वाजू लागते, गाण्याचे सूर ऐकू येतात. नावाडी होड्या प्रवाहावर सोडून देतात, वल्ही थांबवतात आणि श्यामाची गाणी गाऊ लागतात. फांदीफांदीवरून पक्षी एकाएकी परम उल्हासाने एकमेकांना साद-प्रतिसाद देऊ लागतात. असे दिवस आता आले आहेत. वसंताचा वारा लागून माझ्या पाषाण-हृदयात हळूहळू जणू तारुण्याचा संचार होतो आहे; माझ्या प्राणांतली ती नव्या तारुण्याची उसळी ओढून घेऊनच जणू माझ्या वेली-झुडपे पाहता पाहता फुलांनी अगदी बहरून येत आहेत. अशा वेळी कुसुम मात्र दिसत नाही. काही दिवसांपासून ती ना मंदिरात येते, ना घाटावर येते; संन्याशांजवळ ती आता दिसत नाही. दरम्यान काय घडले, ते मला काहीच कळले नाही. काही काळाने एके दिवशी संध्याकाळी माझ्याच पायरीवर संन्याशांची आणि कुसुमची भेट झाली. कुसुमने मान खाली घालून म्हटले, 'प्रभू, आपण मला बोलावणं धाडलं होतं?' 'हो. तू दिसत का नाहीस? हल्ली देवसेवेत तुझी एवढी हयगय का?' कुसुम गप्प राहिली. 'तुझ्या मनात काय आहे, ते मला मोकळेपणानं सांग.'
घाटाची कहाणी
कुसुमने किंचित तोंड फिरवून म्हटले, 'प्रभू, मी पापिणी आहे, म्हणूनच ही हयगय.' संन्याशांनी अत्यंत मायेच्या स्वरात म्हटले, 'कुसुम, तुझ्या मनाची शांती ढळली आहे, हे मी ओळखलं आहे.' कुसुम जणू दचकली — तिला कदाचित वाटले, संन्याशांनी न जाणो किती ओळखले आहे. तिचे डोळे हळूहळू पाण्याने भरून आले; ती तिथेच खाली बसली; तोंडावर पदर घेऊन पायरीवर संन्याशांच्या पायांशी बसून रडू लागली. संन्यासी थोडे दूर सरकून म्हणाले, 'तुझ्या मनाची अशांती मला सगळी उघड करून सांग, मी तुला शांतीचा मार्ग दाखवीन.' कुसुम अढळ भक्तीच्या स्वरात बोलली, पण मधूनमधून थांबली, मधूनमधून शब्द अडखळले — 'आपण आज्ञा करता तर अवश्य सांगेन. मला नीट सांगता यायचं नाही, पण आपल्याला बहुधा मनोमन सगळं ठाऊकच आहे. प्रभू, मी एकाची देवासारखी भक्ती करत होते, त्यांची पूजा करत होते; त्या आनंदानं माझं हृदय भरून गेलं होतं. पण एका रात्री स्वप्नात पाहिलं — जणू ते माझ्या हृदयाचे स्वामी आहेत; कुठेशा एका बकुळीच्या बनात बसून, आपल्या डाव्या हातात माझा उजवा हात घेऊन ते माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी बोलत आहेत. हे मला मुळीच अशक्य वाटलं नाही, मुळीच नवलाचं वाटलं नाही. स्वप्न तुटलं, तरी स्वप्नाची गुंगी उतरली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना पाहिलं, तेव्हा पूर्वीसारखं पाहता आलं नाही. मनात तेच स्वप्नातलं चित्र उमटत राहिलं. भिऊन दूर पळाले, पण ते चित्र माझ्याबरोबरच राहिलं. तेव्हापासून माझ्या मनाची अशांती काही केल्या जात नाही; माझं सगळं काही अंधारून गेलं आहे.' कुसुम डोळे पुसत पुसत हे बोलत होती, तेव्हा मला जाणवत होते की संन्याशांनी आपल्या उजव्या पायाच्या तळव्याने माझा पाषाण जोराने दाबून धरला आहे. कुसुमचे बोलणे संपल्यावर संन्यासी म्हणाले, 'ज्याला स्वप्नात पाहिलंस, तो कोण ते सांगावं लागेल.'
घाटाची कहाणी
कुसुम हात जोडून म्हणाली, 'ते नाही सांगता येणार.' संन्यासी म्हणाले, 'तुझ्या कल्याणासाठी विचारतो आहे — तो कोण, ते स्पष्ट सांग.' कुसुमने आपले कोमल हात जोराने पिळवटले, पुन्हा हात जोडले आणि म्हटले, 'अगदी सांगायलाच हवं का?' संन्यासी म्हणाले, 'हो, सांगायलाच हवं.' कुसुम तत्क्षणी बोलून गेली, 'प्रभू, ते तुम्ही.' आपलेच शब्द आपल्याच कानी पडताच ती मूर्च्छित होऊन माझ्या कठोर कुशीत कोसळली. संन्यासी दगडाच्या मूर्तीसारखे उभेच राहिले. मूर्च्छा ओसरून कुसुम उठून बसली, तेव्हा संन्यासी हळूहळू म्हणाले, 'तू माझं सगळं सांगणं पाळलं आहेस; आणखी एक गोष्ट सांगतो, तीही पाळावी लागेल. मी आजच इथून निघालो; माझी-तुझी भेट होता कामा नये. तुला मला विसरावं लागेल. म्हण, ही साधना करीन.' कुसुम उठून उभी राहिली, संन्याशांच्या मुखाकडे पाहत शांत स्वरात म्हणाली, 'प्रभू, तसंच होईल.' संन्यासी म्हणाले, 'तर मग मी निघालो.' कुसुमने आणखी काही न बोलता त्यांना नमस्कार केला, त्यांच्या पायांची धूळ मस्तकी लावली. संन्यासी निघून गेले. कुसुम म्हणाली, 'जाताना ते आज्ञा देऊन गेले आहेत — त्यांना विसरायला हवं.' असे म्हणून ती हळूहळू गंगेच्या पाण्यात उतरली. एवढीशी असल्यापासून तिने याच पाण्याच्या काठी दिवस घालवले होते; ती थकली असताना हे पाणी जर हात पुढे करून तिला कुशीत घेणार नाही, तर दुसरे कोण घेणार? चंद्र मावळला, रात्र गडद अंधारी झाली. पाण्याचा आवाज ऐकू आला; आणखी काहीच मला कळले नाही. अंधारात वारा घोंघावू लागला; तीळभरही काही दिसू नये म्हणून जणू तो फुंकर घालून आकाशातल्या चांदण्या विझवून टाकू पाहत होता. माझ्या कुशीत जी खेळत असे, ती आज आपला खेळ संपवून माझ्या कुशीतून कुठे निघून गेली, ते मला कळले नाही.