रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
गिरिबाला
१ रमानाथ शील यांच्या तिमजली हवेलीत सर्वांत वरच्या मजल्यावरच्या खोल्यांत गोपीनाथ शील यांच्या पत्नी गिरिबाला राहतात. शयनगृहाच्या दक्षिणेकडच्या दारासमोर कुंड्यांत मोगऱ्याची आणि गुलाबाची थोडीशी रोपं; — गच्चीला उंच भिंतीचा कठडा — बाहेरचं दृश्य दिसावं म्हणून त्या भिंतीत मधूनमधून एकेक वीट काढून फट ठेवलेली आहे. शयनगृहात नाना वेषांतल्या आणि वेषहीन विलायती स्त्रियांची चौकटीत बसवलेली एनग्रेव्हिंग्ज टांगलेली आहेत; पण प्रवेशद्वारासमोरच्या मोठ्या आरशावर त्या षोडशी गृहस्वामिनीचं जे प्रतिबिंब पडतं, ते भिंतीवरच्या कोणत्याही चित्रापेक्षा सौंदर्यात उणं नाही. गिरिबालेचं सौंदर्य अचानक पडलेल्या प्रकाशाच्या किरणासारखं, विस्मयासारखं, झोपेतून जागं होताना येणाऱ्या भानासारखं एकदम, क्षणार्धात येऊन आघात करतं, आणि त्या एका आघातानेच माणसाला भारावून टाकू शकतं. तिला पाहिलं की वाटतं, हिला पाहायला आपण तयारच नव्हतो. चहूकडे आणि नेहमीच जे पाहत आलो, त्याहून हे एकाएकी कितीतरी निराळं आहे. गिरिबालाही आपल्याच लावण्याच्या उधाणाने आपणच नखशिखांत लहरत उठली आहे. मद्याचा फेस जसा प्याल्यावरून ओसंडून वाहतो, तसं नवं तारुण्य आणि नवं सौंदर्य तिच्या सर्वांगावरून ओसंडून वाहतं आहे — तिच्या वस्त्रांत, अलंकारांत, चालण्यात, तिच्या बाहूंच्या हालचालीत, तिच्या मानेच्या डौलात, तिच्या चंचल पावलांच्या उन्मुक्त तालात, नूपुरांच्या झंकारात, कंकणांच्या किणकिणीत, खळखळत्या हास्यात, चटपटीत बोलण्यात, तेजस्वी कटाक्षांत ते अगदी बेबंदपणे उचंबळून येतं आहे. आपल्या सर्वांगात उसळणाऱ्या या मादक रसाची गिरिबालेला एक नशा चढली आहे. अनेकदा दिसत असे, की एखादं मऊ रंगीत वस्त्र आपल्या भरल्या देहाभोवती लपेटून ती गच्चीवर विनाकारण अस्वस्थपणे फिरते आहे. जणू मनातल्या कुठल्याशा न ऐकलेल्या, न उमटलेल्या संगीताच्या तालावर तिचं अंगप्रत्यंग नाचू पाहत आहे.
गिरिबाला
आपलं अंग नाना प्रकारे उडवण्यात, झटकण्यात, भिरकावण्यात तिला जणू कसलासा खास आनंद आहे; — जणू आपल्या सौंदर्याच्या निरनिराळ्या बाजूंनी निरनिराळ्या लाटा उठवून, सर्वांगातल्या तप्त रक्तप्रवाहात अपूर्व रोमांचाने ती नाना तऱ्हेचे आघात-प्रत्याघात अनुभवत राहते. एकाएकी ती झाडाचं एखादं पान खुडते, उजवा हात आकाशात उंचावून ते वाऱ्यावर सोडून देते — त्यासरशी तिच्या हातातली कडी किणकिणतात, पदर ढळतो, आणि तिच्या सुडौल हाताची ती लय पिंजऱ्यातून सुटलेल्या एखाद्या अदृश्य पाखरासारखी अनंत आकाशात मेघांच्या राज्याकडे उडून जाते. एकाएकी ती कुंडीतलं मातीचं ढेकूळ उचलून विनाकारण भिरकावून देते; पायांच्या बोटांवर उंच उभी राहून भिंतीच्या फटीतून त्या मोठ्या बाहेरच्या जगावर पटकन एक नजर टाकते, आणि पुन्हा पदर गरगरवत वळून परत येते — पदराला बांधलेला चाव्यांचा जुडगा छनछन वाजू लागतो. कधी आरशासमोर जाऊन अंबाडा सोडते आणि अवेळीच केस बांधायला बसते; वेणीच्या दोरीने केसांच्या मुळाशी वेढा घालून ती दोरी कुंदकळ्यांसारख्या दातांत धरते, दोन्ही हात वर उंचावून डोक्यामागे वेण्या घट्ट ओढून त्यांचं वेटोळं घालते — केस बांधून झाले की हातातली सगळी कामं संपतात — मग ती आळसावून त्या मऊ बिछान्यावर, पानांच्या आडून निसटलेल्या चांदण्याच्या एखाद्या रेषेसारखी, आपली काया पसरून देते. तिला मूलबाळ नाही; श्रीमंताच्या घरात तिला कसलं कामधामही नाही — ती फक्त रोज एकांतात आपल्यातच आपण साचत राहिली आहे, आणि आता शेवटी स्वतःला आवरून धरणं तिला जमेनासं झालं आहे. नवरा आहे, पण तिच्या ताब्यात नाही. बालपणापासून तारुण्यापर्यंत इतकी पूर्ण उमलूनही गिरिबाला कशी कोण जाणे नवऱ्याच्या नजरेतून निसटून गेली आहे.
गिरिबाला
उलट बालपणी तिला नवऱ्याचे लाड मिळाले होते. तेव्हा नवरा शाळा बुडवून, झोपलेल्या वडीलधाऱ्यांना चकवून, सुनसान दुपारी आपल्या बालवधूशी प्रेमाच्या गुजगोष्टी करायला येत असे. एकाच घरात राहूनही शौकीन नक्षीदार कागदांवर बायकोशी पत्रव्यवहार करीत असे. शाळेतल्या खास मित्रांना ती सारी पत्रं दाखवून ऐटीत मिरवत असे. क्षुल्लक आणि काल्पनिक कारणांवरून बायकोशी रुसवेफुगवे होणंही अशक्य नव्हतं. अशातच वडील वारले आणि गोपीनाथ स्वतःच घरचा कर्ता झाला. कच्च्या लाकडाच्या फळीला लवकर कीड लागते — कोवळ्या वयात गोपीनाथ स्वतंत्र झाला, तेव्हा पुष्कळ जीवजंतूंनी त्याच्या खांद्यावर बिऱ्हाड थाटलं. मग हळूहळू अंतःपुरातलं त्याचं येणंजाणं घटत गेलं आणि ते इतरत्र पसरू लागलं. टोळीचं म्होरकेपण अंगात एक प्रकारची उत्तेजना भरतं; माणसाला सगळ्यात जास्त नशा चढते ती माणसांचीच. असंख्य मानवी जीवनांवर आणि विस्तीर्ण इतिहासावर आपला प्रभाव पसरवण्याचं नेपोलियनला जे प्रबळ आकर्षण होतं — एका छोट्याशा दिवाणखान्याच्या छोट्याशा कर्त्यालाही आपल्या लहानशा टोळीची जी नशा चढते, ती प्रमाणाने कमी असली तरी त्याच जातीची असते. किरकोळ टवाळकीच्या बंधाने आपल्याभोवती एखादी वाया गेलेली यारमंडळी जमवली, की त्यांच्यावर हुकमत गाजवणं आणि त्यांच्याकडून 'वाहवा' मिळवणं हे एका प्रचंड उत्तेजनेचं कारण होऊन बसतं; त्यासाठी पुष्कळ लोक जमीनजुमल्याचा नाश, कर्ज, बदनामी — सारं काही पत्करायला तयार होतात. गोपीनाथ आपल्या यारमंडळींचा म्होरक्या होऊन भलताच चेकाळला. रोज तो टवाळकीत नवनवे पराक्रम, नवनवा लौकिक मिळवू लागला. त्याच्या टोळीतले लोक म्हणू लागले — सगळ्या 'साल्यां'मध्ये टवाळकीत गोपीनाथएवढं नाव दुसऱ्या कुणी कमावलं नाही; त्या गर्वात, त्या उत्तेजनेत बाकीच्या सगळ्या सुखदुःखांकडे, कर्तव्यांकडे आंधळा होऊन तो अभागी जीव रात्रंदिवस भोवऱ्यासारखा गरगरत फिरू लागला.
गिरिबाला
इकडे जग जिंकणारं रूप घेऊन, आपल्या अंतःपुराच्या प्रजाहीन राज्यात, शयनगृहाच्या रिकाम्या सिंहासनावर गिरिबाला विराजमान झाली. तिला स्वतःला ठाऊक होतं, की विधात्याने तिच्या हाती राजदंड दिला आहे — तिला ठाऊक होतं, भिंतीच्या फटीतून जे विशाल जग दिसतं, ते सारं जग ती एका कटाक्षासरशी जिंकून येऊ शकते — आणि तरीही या अवघ्या विश्वात एकाही माणसाला ती बंदी करू शकली नव्हती. गिरिबालेची एक रसिक दासी आहे, तिचं नाव सुधो, म्हणजे सुधामुखी. ती गाणी गायची, नाचायची, यमकं जुळवून कवनं रचायची, धनिणीच्या रूपाचं वर्णन करायची, आणि अरसिकाच्या हाती एवढं रूप फुकट गेलं म्हणून हळहळायची. या सुधोवाचून गिरिबालेचं घडीभरही चालत नसे. आपल्या चेहऱ्याची शोभा, अंगाची ठेवण, कांतीचा उजळपणा यांची सविस्तर चिकित्सा ती उलटसुलट, पुन्हा पुन्हा ऐकत असे; मधूनमधून त्याचा प्रतिवाद करी, आणि मनातून अगदी सुखावून सुधोला 'खोटारडी, तोंडपुजी' म्हणून दटावायला सोडत नसे; मग सुधो शेकडो शपथा घेऊन आपलं मत किती अस्सल आहे हे सिद्ध करायला बसे, आणि ते खरं मानणं गिरिबालेला फारसं कठीण जात नसे. सुधो गिरिबालेला गाणं ऐकवायची — 'दासखत लिहून दिले श्रीचरणी'; — या गाण्यात गिरिबालेला आपल्या अळित्याने रंगवलेल्या, निर्दोष सुंदर पदपल्लवांची स्तुती ऐकू यायची, आणि पायांशी लोळणाऱ्या एका दासाचं चित्र तिच्या कल्पनेत उमटायचं — पण हाय, ते दोन श्रीचरण पैंजणांच्या नादात रिकाम्या गच्चीवर आपलंच जयगीत झंकारत फिरतात, तरी कुणी स्वखुशीने विकला गेलेला भक्त येऊन दासखत लिहून देत नाही.
गिरिबाला
गोपीनाथने ज्या स्त्रीला दासखत लिहून दिलं आहे, तिचं नाव लवंग, — ती थिएटरमध्ये काम करते — रंगमंचावर मूर्च्छा येऊन पडण्यात ती अगदी वाकबगार आहे — नाकातल्या कृत्रिम रडक्या सुरात, धापा टाकत, ओढून ताणून, बोबड्या उच्चारात ती जेव्हा 'प्राणनाथ, प्राणेश्वर' अशी हाक मारू लागते, तेव्हा पातळ धोतरावर वेस्टकोट घातलेले, पायांत लांब मोजे चढवलेले प्रेक्षक 'एक्सेलंट! एक्सेलंट!' करत उचंबळून येतात. या अभिनेत्री लवंगेच्या अचाट कौशल्याचं वर्णन गिरिबालेने याआधी अनेकदा नवऱ्याच्याच तोंडून ऐकलं होतं. तेव्हा तिचा नवरा अजून पुरता परागंदा झाला नव्हता. तेव्हा नवरा कसा भुलला आहे हे ठाऊक नसतानाही तिला मनातून असूया वाटायची. दुसऱ्या कुणा स्त्रीकडे मन रिझवण्याची अशी एखादी कला असावी, जी आपल्याकडे नाही, हे तिला सहन होत नसे. असूयेने भरलेल्या कुतूहलाने तिने अनेकदा थिएटर पाहायला जायची इच्छा बोलून दाखवली, पण नवऱ्याची संमती तिला काही केल्या मिळवता आली नाही. शेवटी एके दिवशी तिने पैसे देऊन सुधोला थिएटर पाहायला पाठवलं; — सुधो परत आली ती नाक-भुवया मुरडत, 'राम राम' म्हणत, आणि अभिनेत्रींच्या कपाळी झाडूचा प्रसाद ठरवून मोकळी झाली — आणि त्यांच्या कुरूप ध्यानावर आणि कृत्रिम नखऱ्यांवर ज्या पुरुषांची रुची जडते, त्यांच्यासाठीही तिने तोच न्याय निश्चित केला. ते ऐकून गिरिबालेला चांगलाच दिलासा मिळाला. पण जेव्हा तिचा नवरा बंधन तोडून निघून गेला, तेव्हा तिच्या मनात संशय उभा राहिला. सुधोच्या बोलण्यावर तिने अविश्वास दाखवला, तेव्हा सुधोने गिरीच्या अंगाला हात लावून पुन्हा पुन्हा सांगितलं, की चिंधीत गुंडाळलेल्या जळक्या लाकडासारखं त्या बाईचं रूक्ष आणि कुरूप ध्यान आहे. त्या बाईच्या आकर्षणशक्तीचं काहीच कारण गिरीला उमगेना, आणि तिच्या मानिनी मनावर जीवघेणा घाव बसून ती आतल्या आत जळू लागली.
गिरिबाला
शेवटी एके दिवशी संध्याकाळी सुधोला घेऊन ती गुपचूप थिएटर पाहायला गेली. निषिद्ध गोष्टीत उत्तेजना जास्त असते. तिच्या काळजात जो एक मंद कंप उठला होता, त्या कंपाच्या आवेगात हे दिव्यांनी उजळलेलं, माणसांनी गजबजलेलं, वाद्य-संगीताने निनादणारं, रंगवलेल्या पडद्यांनी सजलेलं रंगमंदिर तिच्या डोळ्यांना दुपटीने अपूर्व भासलं. आपल्या त्या भिंतींनी वेढलेल्या, निर्जन, निरानंद अंतःपुरातून ती कुठल्या एका नटलेल्या सुंदर उत्सवलोकाच्या उंबरठ्याशी येऊन पोहोचली होती! सारं स्वप्नासारखं वाटू लागलं. त्या दिवशी 'मानभंजन' — रुसलेल्या राधेची समजूत घालण्याचं — गीतनाट्य चाललं होतं. घंटा वाजली, वाद्यं थांबली, चुळबुळणारे प्रेक्षक क्षणार्धात स्थिर, निःस्तब्ध होऊन बसले, रंगमंचासमोरची दिव्यांची रांग अधिक उजळली, पडदा वर गेला, नटलेल्या नटींचा एक घोळका ब्रजांगना होऊन गाण्याच्या साथीने नाचू लागला, प्रेक्षकांच्या टाळ्यांनी आणि वाहवांनी नाट्यगृह राहून राहून दुमदुमू, थरथरू लागलं — तेव्हा गिरिबालेच्या तरुण देहातलं रक्त उन्मादाने उसळू लागलं. त्या संगीताच्या तानांत, दिव्यांच्या आणि दागिन्यांच्या झगमगाटात, आणि एकमुखाने उठणाऱ्या वाहवांच्या गजरात क्षणभर ती समाज, संसार — सगळंच विसरून गेली — तिला वाटलं, आपण अशा एका ठिकाणी आलो आहोत, जिथे बंधमुक्त, सौंदर्याने भरलेल्या स्वातंत्र्याला कसलाही अडसर नाही. सुधो मधूनमधून येऊन घाबऱ्या आवाजात कानात कुजबुजते, 'वहिनीसाहेब, आत्ताच घरी परत चला; दादाबाबूंना कळलं तर धडगत नाही.' गिरिबाला त्या बोलण्याकडे लक्षही देत नाही. तिच्या मनात आता जराही भीती उरलेली नाही.
गिरिबाला
नाटक बरंच पुढे सरकलं. राधेचा रुसवा काही केल्या सुटत नाहीये; — त्या रुसव्याच्या सागरात कृष्णाला तळच लागत नाहीये; — किती अनुनय, विनवण्या, आर्जवं, रडारड — कशाचाच काही उपयोग होत नाही! तेव्हा गिरिबालेची छाती गर्वाने फुलू लागली. कृष्णाची ही फजिती पाहताना ती जणू मनोमन राधा होऊन आपला अमर्याद प्रताप आपणच अनुभवू लागली. कुणीही कधी तिची अशी मनधरणी केली नव्हती; ती उपेक्षित, अपमानित, टाकलेली बायको — तरीही एका अपूर्व मोहात तिने ठरवलं, की असं निष्ठुरपणे रडवण्याचं सामर्थ्य तिच्याकडेही आहे. सौंदर्याचा प्रताप किती प्रचंड असतो, हे तिने आजवर फक्त कानांनी ऐकलं होतं, अंदाज बांधला होता इतकंच — आज दिव्यांच्या प्रकाशात, गाण्याच्या सुरांत, देखण्या रंगमंचावर तिने ते स्पष्ट, प्रत्यक्ष पाहिलं. नशेने तिचं सारं डोकं भरून गेलं. शेवटी पडदा पडला, गॅसचे दिवे मंदावले, प्रेक्षक जायच्या तयारीला लागले. गिरिबाला मंत्रमुग्धासारखी बसून राहिली. इथून उठून घरी जायचं आहे, ही गोष्ट तिच्या ध्यानीमनीच नव्हती. तिला वाटत होतं, नाटक संपणारच नाही, पडदा पुन्हा वर जाईल; राधिकेपुढे कृष्णाची हार — याशिवाय जगात दुसरा कुठला विषयच उरलेला नाही. सुधो म्हणाली, 'वहिनीसाहेब, हे काय करताय, उठा, आता सगळे दिवे विझवतील.' गिरिबाला मध्यरात्री आपल्या शयनगृहात परतली. कोपऱ्यात एक दिवा मिणमिणतो आहे — खोलीत एकही माणूस नाही, आवाज नाही — खोलीच्या एका टोकाला निर्जन बिछान्यावर एक जुनी मच्छरदाणी वाऱ्याने हलकेच डुलते आहे; तिचं रोजचं जग तिला अतिशय ओंगळ, नीरस आणि क्षुद्र वाटू लागलं. कुठे ते सौंदर्याने, प्रकाशाने, संगीताने भरलेलं राज्य, जिथे ती आपली सारी महती उधळून जगाच्या केंद्रस्थानी विराजमान होऊ शकते — जिथे ती कुणाला ठाऊक नसलेली, कुणी दखलही न घेणारी, क्षुद्र, सामान्य स्त्रीमात्र नाही!
गिरिबाला
आता ती दर आठवड्याला थिएटरला जाऊ लागली! कालांतराने तिचा तो पहिला मोह बराचसा ओसरला — आता तिला नटनटींच्या चेहऱ्यांवरची रंगरंगोटी, सौंदर्याचा अभाव, अभिनयातला कृत्रिमपणा — सगळं दिसू लागलं, पण तरीही तिची नशा उतरली नाही. रणवाद्यं ऐकली की योद्ध्याचं हृदय जसं नाचू लागतं, तसं रंगमंचाचा पडदा वर गेला की तिच्या छातीत खळबळ माजत असे. ती पाहा — साऱ्या संसारापासून वेगळी, देखणी, उंच, सुंदर वेदी, सोनेरी रेषांनी चितारलेली, रंगवलेल्या पडद्यांनी सजलेली, काव्य आणि संगीताच्या इंद्रजालाने मायावी झालेली, असंख्य मुग्ध नजरांनी वेढलेली, पडद्यामागच्या गुप्ततेने अपूर्व गूढ लाभलेली, दिव्यांच्या उजळ रांगांत सर्वांसमक्ष झळाळणारी — विश्वविजयिनी सौंदर्यसम्राज्ञीसाठी असं मायासिंहासन आणखी कुठे आहे? ज्या दिवशी तिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला रंगमंदिरात हजर पाहिलं, आणि जेव्हा गोपीनाथ कुणा नटीच्या अभिनयावर बेभान होऊन उचंबळू लागला, तेव्हा नवऱ्याबद्दल तिच्या मनात तीव्र तिरस्कार दाटून आला. घायाळ मनाने तिने विचार केला — जर कधी असा दिवस आला, की तिचा नवरा तिच्या रूपाला भुलून, पंख जळालेल्या पतंगासारखा तिच्या पायांशी येऊन पडेल, आणि ती आपल्या पायाच्या नखाच्या टोकावरून उपेक्षा उधळत रुसव्याच्या तोऱ्यात निघून जाऊ शकेल — तरच तिचं हे वाया गेलेलं रूप, वाया गेलेलं तारुण्य सार्थकी लागेल. पण तो शुभदिन आला कुठे? हल्ली गोपीनाथचं दर्शनच दुर्लभ झालं आहे. आपल्या बेहोषीच्या वादळाच्या तोंडी धुळीच्या लोटासारखा एक घोळका जमवून, गरगरत तो कुठे निघून गेला आहे, त्याचा पत्ताच नाही.
गिरिबाला
एके दिवशी चैत्रातल्या वसंत-पौर्णिमेला गिरिबाला बसंती रंगाचं वस्त्र नेसून, दक्षिणेच्या वाऱ्यावर पदर उडवत गच्चीवर बसली होती. घरी नवरा येत नसला तरी गिरी उलटसुलट, रोज बदलून नवनव्या दागिन्यांनी स्वतःला सजवत असे. हिऱ्यामोत्यांचे अलंकार तिच्या अंगप्रत्यंगात एक उन्माद जागवत, झगमगत, रुणझुणत तिच्याभोवती एक लहर उठवत राहत. आज तिने दंडावर बाजूबंद, गळ्यात माणकांची आणि मोत्यांची कंठी घातली आहे, आणि डाव्या हाताच्या करंगळीत नीलमण्याची अंगठी घातली आहे. सुधो पायांशी बसून मधूनमधून तिच्या गोटीव, कोमल, रक्तकमळासारख्या पावलांवरून हात फिरवत होती — आणि मनापासूनच्या उमाळ्याने म्हणत होती, 'अहाहा, वहिनीसाहेब, मी पुरुष असते ना, तर ही दोन पावलं छातीशी धरून मरून गेले असते.' गिरिबाला गर्वाने हसून उत्तर देत होती, 'बहुतेक छातीशी न धरताच मरावं लागलं असतं — तेव्हा काय मी अशी पाय पसरून बसले असते? पुरे आता बडबड; ते गाणं म्हण बघू!' त्या चांदण्याने न्हालेल्या निर्जन गच्चीवर सुधो गाऊ लागली — दासखत लिहून दिले श्रीचरणी, साक्षी असोत सारे वृंदावनी. तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. घरातली बाकीची सगळी मंडळी जेवणखाण आटोपून झोपायला गेली होती. एवढ्यात अत्तर लावलेला, उपरणं उडवत गोपीनाथ एकाएकी येऊन उभा राहिला, — सुधोने भली मोठी जीभ चावली, सात हात लांब घुंगट ओढला आणि श्वास घशात धरून धूम ठोकली. गिरिबालेला वाटलं, आज तिचा दिवस आला आहे. तिने तोंड वर करून पाहिलंसुद्धा नाही. राधिकेसारखी जबर रुसव्याच्या तोऱ्यात ती अढळ बसून राहिली. पण देखाव्याचा पडदा वर गेला नाही — मोरपिसांचा मुकुट पायांशी लोळला नाही — कुणी काफी रागात गाऊ लागलं नाही — 'का गं, पुनवेला अंधार करिशी, लपवुनी वदनशशी!'
गिरिबाला
सुराचा मागमूसही नसलेल्या कोरड्या आवाजात गोपीनाथ म्हणाला, 'जरा चावी दे बघू!' अशा चांदण्यात, अशा वसंतात, इतक्या दिवसांच्या विरहानंतर हेच का पहिलं संबोधन! काव्यांत, नाटकांत, कादंबऱ्यांत जे लिहिलेलं असतं, ते सगळं आदिपासून अंतापर्यंत खोटं आहे! रंगमंचावरच प्रियकर गाणं गात येऊन पायांवर लोळण घेतो — आणि तेच पाहून ज्या प्रेक्षकाचं मन पाघळून जातं, तोच माणूस वसंतातल्या रात्री घराच्या गच्चीवर येऊन आपल्या अनुपम तरुण पत्नीला म्हणतो, 'अगं, जरा चावी दे बघू!' त्यात ना सूर, ना प्रीती; त्यात कसली मोहिनी नाही, माधुर्य नाही; ते अगदीच फुसकं, कवडीमोल! तेवढ्यात दक्षिणेचा वारा, जगातल्या साऱ्या अपमानित कवित्वाच्या काळीज चिरणाऱ्या दीर्घ उसाशासारखा, हू हू करत वाहून गेला — कुंड्याकुंड्यांतून फुललेल्या मोगऱ्याचा सुगंध गच्चीभर पसरवून गेला — गिरिबालेच्या भुरभुरत्या बटा डोळ्यांवर, तोंडावर येऊन पडल्या, आणि तिचा बसंती रंगाचा सुगंधी पदर अधीरपणे इकडेतिकडे उडू लागला. गिरिबालेने आपला सारा रुसवा सोडून दिला आणि ती उठून उभी राहिली. नवऱ्याचा हात धरून ती म्हणाली, 'चावी देईन, आधी तुम्ही खोलीत चला.' — आज ती रडेल, रडवेल, आपली सारी एकांतातली स्वप्नं खरी करेल, आपली सारी ब्रह्मास्त्रं बाहेर काढून विजयी होईल, असा तिने पक्का निर्धार केला आहे. गोपीनाथ म्हणाला, 'मला फार वेळ थांबता येणार नाही — तू चावी दे.' गिरिबाला म्हणाली, 'मी चावी देईन, आणि त्या चावीच्या आत जे जे काही आहे, ते सगळं देईन — पण आज रात्री तुम्हाला कुठेही जाता येणार नाही.' गोपीनाथ म्हणाला, 'ते होणार नाही. मला फार जरुरीचं काम आहे.' गिरिबाला म्हणाली, 'मग मी चावी देणार नाही!'
गिरिबाला
गोपी म्हणाला, 'देणार नाहीस म्हणजे? कशी देत नाहीस ते बघतोच!' असं म्हणून त्याने गिरिबालेच्या पदरात पाहिलं — चावी नाही. खोलीत शिरून तिच्या आरशाच्या पेटीचे खण उघडून पाहिले — त्यांतही चावी नाही. तिची केस बांधायची पेटी त्याने जोर लावून फोडून उघडली — तिच्यात काजळाची कुपी, कुंकवाचा करंडा, वेणीच्या दोऱ्या असं नाना प्रकारचं साहित्य — चावी नाही. मग त्याने बिछाना उसकटून, गादी उचलून, कपाट फोडून सगळ्याची नासधूस करून टाकली. गिरिबाला दगडी मूर्तीसारखी ताठ होऊन, दार धरून, गच्चीकडे पाहत उभी राहिली. डाव फसलेला गोपीनाथ रागाने धुसफुसत येऊन म्हणाला, 'चावी दे म्हणतोय, नाहीतर बरं होणार नाही.' गिरिबालेने उत्तरसुद्धा दिलं नाही. तेव्हा गोपीने तिला दाबून धरलं, आणि तिच्या दंडावरून बाजूबंद, गळ्यातून कंठी, बोटातून अंगठी हिसकावून घेऊन, तिला लाथ मारून तो निघून गेला. घरातल्या कुणाचीही झोपमोड झाली नाही, आळीतल्या कुणाला काहीच कळलं नाही, चांदणी रात्र तशीच निःस्तब्ध राहिली — सगळीकडे जणू अखंड शांती नांदत होती. पण अंतरीचा आक्रोश जर बाहेर ऐकू आला असता, तर चैत्रातली ती सुखाने निजलेली चांदणी रात्र एकाएकी तीव्रतम आर्त किंकाळीने चिरफाळून गेली असती. इतक्या संपूर्ण निःशब्दपणे असे काळीज फाडणारे प्रसंग घडत असतात! तरीही ती रात्रही सरली. एवढी हार, एवढा अपमान गिरिबालेला सुधोजवळसुद्धा बोलून दाखवता आला नाही. तिने मनात योजलं, आत्महत्या करून, हे अतुल रूप-यौवन आपल्या हाताने तुकडे तुकडे करून मोडून टाकून ती आपल्या उपेक्षेचा सूड घेईल. पण लगेच तिच्या लक्षात आलं, की त्याने कुणाचं काहीच अडणार नाही — जगाचं किती नुकसान होईल, हे कुणाला जाणवणारसुद्धा नाही. जगण्यातही काही सुख नाही, मरण्यातही काही सांत्वन नाही.
गिरिबाला
गिरिबाला म्हणाली, 'मी माहेरी चालले.' — तिचं माहेर कलकत्त्यापासून दूर आहे. सगळ्यांनी तिला अडवलं — पण घरच्या मालकिणीने कुणाचं अडवणंही ऐकलं नाही, की कुणाला सोबतही घेतलं नाही. इकडे गोपीनाथही आपल्या लवाजम्यासह नौकाविहाराला, किती दिवसांसाठी, कुठे निघून गेला आहे, कुणालाच ठाऊक नाही. २ गांधर्व थिएटरात गोपीनाथ जवळजवळ प्रत्येक प्रयोगाला हजर असे. तिथे 'मनोरमा' नाटकात लवंग मनोरमेचं काम करत असे, आणि गोपीनाथ आपल्या टोळीसह पुढच्या रांगेत बसून मोठमोठ्याने तिला वाहवा देत असे आणि रंगमंचावर फुलांचे गुच्छ फेकत असे. मधूनमधून एखाद्या दिवशी गोंधळ घालून तो प्रेक्षकांचा भयंकर रोष ओढवून घेई. तरीही नाट्यगृहाच्या चालकांनी त्याला कधी अडवण्याचं धाडस केलं नव्हतं. शेवटी एके दिवशी गोपीनाथ थोडासा झिंगलेल्या अवस्थेत ग्रीनरूममध्ये घुसला आणि त्याने भलताच गोंधळ माजवला. कुठल्याशा क्षुल्लक, काल्पनिक कारणावरून आपला अपमान झाला असं समजून त्याने एका नटीला बेदम मारलं — तिच्या किंकाळ्यांनी आणि गोपीनाथच्या शिव्यांच्या वर्षावाने सारं नाट्यगृह दचकून उठलं. त्या दिवशी चालकांना आणखी सहन झालं नाही, आणि त्यांनी गोपीनाथला पोलिसांच्या मदतीने बाहेर काढलं. या अपमानाचा सूड घ्यायचा गोपीनाथने निश्चय केला. थिएटरवाल्यांनी पूजेच्या एक महिना आधीपासून 'मनोरमा' या नव्या नाटकाच्या प्रयोगाची मोठ्या थाटामाटात घोषणा केली होती. जाहिरातींनी त्यांनी कलकत्ता शहर कागदांत गुंडाळून टाकलं होतं; — जणू राजधानीच्या अंगावर त्या प्रसिद्ध ग्रंथकाराच्या नावाची रामनामी पांघरली होती.
गिरिबाला
अशातच गोपीनाथ त्यांची प्रमुख अभिनेत्री लवंग हिला घेऊन बोटीत बसून कुठे अंतर्धान पावला, त्याचा पुढे काही पत्ताच लागला नाही. थिएटरवाल्यांना एकाएकी अथांग समुद्रात लोटल्यासारखं झालं. काही दिवस लवंगेची वाट पाहून शेवटी त्यांनी एका नव्या अभिनेत्रीला मनोरमेची भूमिका शिकवून तयार केलं — त्यामुळे त्यांचा प्रयोग लांबणीवर पडला. पण फारसं नुकसान झालं नाही. नाट्यगृहात प्रेक्षक मावत नाहीत. शेकडो लोक दारावरून परत जातात. वर्तमानपत्रांतही स्तुतीला सीमा नाही. ती स्तुती दूरदेशी गोपीनाथच्या कानावर गेली. त्याला राहवलं नाही. द्वेषाने आणि कुतूहलाने भरून तो प्रयोग पाहायला आला. पहिला पडदा वर जातो तेव्हा, नाटकाच्या सुरुवातीला, मनोरमा दीनवाण्या वेषात दासीसारखी सासरी राहते — लपूनछपून, नम्रपणे, संकोचाने ती आपलं कामकाज करते — तिच्या तोंडी शब्द नाही, आणि तिचा चेहराही नीटसा दिसत नाही. नाटकाच्या शेवटच्या भागात मनोरमेला माहेरी पाठवून तिचा नवरा पैशाच्या लोभाने कुणा लक्षाधीशाच्या एकुलत्या एका मुलीशी लग्न करायला निघाला आहे. लग्नानंतर लग्नरात्रीच्या दालनात नवऱ्याने निरखून पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं — हीसुद्धा तीच मनोरमा, — फक्त तो दासीचा वेष नाही — आज ती राजकन्येसारखी नटली आहे — तिचं अनुपम सौंदर्य अलंकारांनी, वैभवाने मंडित होऊन दाही दिशांना उधळतं आहे. लहानपणी मनोरमेला तिच्या श्रीमंत वडिलांच्या घरातून पळवून नेलं होतं, आणि ती एका गरिबाच्या घरी वाढली होती. पुष्कळ काळाने अलीकडेच तिच्या वडिलांना तिचा शोध लागला, आणि त्यांनी मुलीला घरी आणवून नव्या थाटामाटात तिच्या नवऱ्याशीच तिचं पुन्हा लग्न लावून दिलं.
गिरिबाला
मग लग्नरात्रीच्या दालनात मानभंजनाचा प्रवेश सुरू झाला. पण दरम्यान प्रेक्षकांमध्ये एक मोठाच गोंधळ उडाला. मनोरमा मळकट दासीवेषात घुंगट ओढून होती, तोपर्यंत गोपीनाथ स्तब्ध होऊन पाहत होता. पण जेव्हा ती अलंकारांनी झगमगत, लाल वस्त्र नेसून, डोक्यावरचा घुंगट दूर सारून, रूपाची लाट उठवत लग्नरात्रीच्या दालनात उभी राहिली, आणि एका अवर्णनीय गर्वाने, ऐटीने मान वेळावून साऱ्या प्रेक्षकांकडे आणि विशेषतः समोरच बसलेल्या गोपीनाथकडे, क्षणात चमकणाऱ्या विजेसारखा, तिरस्काराच्या वज्राने भरलेला तीक्ष्ण कटाक्ष फेकला — जेव्हा साऱ्या प्रेक्षकांची मनं उचंबळून येऊन वाहवांनी, टाळ्यांनी नाट्यगृह दीर्घ काळ थरारू लागलं — तेव्हा गोपीनाथ एकाएकी उठून उभा राहिला आणि 'गिरिबाला! गिरिबाला!' असा आरडाओरडा करू लागला. धावत जाऊन उडी मारून रंगमंचावर चढायचा त्याने प्रयत्न केला — वादकांनी त्याला धरून ठेवलं. रसभंगाच्या या अचानक प्रकाराने जिवापाड संतापून प्रेक्षक इंग्रजीत, बंगालीत 'हाकला त्याला, काढा बाहेर!' म्हणून ओरडू लागले. गोपीनाथ वेड्यासारखा, फुटक्या आवाजात ओरडू लागला, 'मी तिचा खून करीन, तिचा खून करीन!' पोलिसांनी येऊन गोपीनाथला धरलं आणि ओढत बाहेर नेलं. अवघ्या कलकत्ता शहराचे प्रेक्षक डोळे भरून गिरिबालेचा अभिनय पाहू लागले — फक्त गोपीनाथलाच तिथे जागा मिळाली नाही.