रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
हैमंती
मुलीच्या बापाला थांबता आलं असतं, पण नवऱ्या मुलाच्या बापाला थांबायचं नव्हतं. त्यांनी पाहिलं, मुलीचं लग्नाचं वय तर उलटून गेलंच आहे, पण आणखी काही दिवस गेले तर ते सभ्य किंवा असभ्य कोणत्याही मार्गानं झाकून ठेवण्याची वेळही उलटून जाईल. मुलीचं वय बेकायदेशीर म्हणावं इतकं वाढलं आहे खरं, पण हुंड्याच्या रकमेचं सापेक्ष वजन अजून त्याच्यापेक्षा किंचित जास्त आहे — म्हणून ही घाई. नवरा मुलगा मी होतो, म्हणून लग्नाबाबत माझं मत आजमावणं अनावश्यक होतं. माझं काम मी केलं होतं — एफ. ए. पास होऊन शिष्यवृत्ती मिळवली होती. तेव्हा विवाहदेव प्रजापतीचे दोन्ही पक्ष, वधूपक्ष आणि वरपक्ष, फुलपाखराच्या पंखांसारखे वारंवार फडफडू लागले. आपल्याकडे ज्या माणसानं एकदा लग्न केलेलं असतं, त्याच्या मनात लग्नाविषयी पुन्हा कसलीही धाकधूक उरत नाही. नरमांसाची चटक लागली की माणसाबद्दल वाघाची जी गत होते, तीच बायकोबद्दल त्याची होते. परिस्थिती कशीही असो, वय कितीही असो, बायकोची उणीव पडल्याबरोबर ती भरून काढायला तो जराही कचरत नाही. सारी द्विधा आणि सारी चिंता दिसते ती आमच्या नवतरुण विद्यार्थ्यांचीच. लग्नाच्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या प्रस्तावांनी त्यांच्या वडीलधाऱ्यांचे पिकलेले केस कलपाच्या कृपेनं पुन्हा पुन्हा कच्चे होतात, आणि पहिल्याच मध्यस्थीच्या धगीनं यांचे कच्चे केस काळजीनं एका रात्रीत पिकू पाहतात.
हैमंती
खरं सांगतो, माझ्या मनात अशी भयंकर धाकधूक काही उपजली नाही. उलट, लग्नाचं बोलणं निघताच माझ्या मनात जणू दक्षिणेचा वारा वाहू लागला. उत्सुक कल्पनेच्या कोवळ्या पालवीत जणू कुजबूज सुरू झाली. ज्याला बर्कच्या 'फ्रेंच रेव्होल्यूशन'च्या नोट्सच्या पाच-सात वह्या तोंडपाठ करायच्या आहेत, त्याला असं वाटणं हा दोषच. माझ्या या लिखाणाला टेक्स्टबुक-कमिटीची मान्यता मिळण्याचा जराही धोका असता, तर मी सावध राहिलो असतो. पण हे मी काय करतो आहे? ही काय कुठली गोष्ट आहे, म्हणून मी कादंबरी लिहायला बसलो? माझं लिखाण अशा सुरात सुरू होईल, हे मला काय ठाऊक होतं! मनात होतं, कित्येक वर्षांच्या वेदनेचा जो ढग काळा होऊन साचला आहे, तो वैशाखातल्या संध्याकाळच्या वादळी पावसासारखा धो-धो कोसळवून रिता करून टाकीन. पण बंगालीत शिशुपाठ्य पुस्तकं काही मला लिहिता आली नाहीत, कारण संस्कृत मुग्धबोध व्याकरण मी वाचलेलं नाही; आणि काव्यही रचता आलं नाही, कारण मातृभाषा माझ्या आयुष्यात अशी फुलून आली नाही, की तिच्या बळावर मी आपलं अंतरंग बाहेर ओढून आणू शकेन. म्हणूनच पाहतो, माझ्या आतला तो स्मशानात फिरणारा संन्यासी गडगडाटी हसत स्वतःचीच थट्टा करायला बसला आहे. न करून करील काय? त्याचे अश्रू आटून गेले आहेत. ज्येष्ठातलं रणरणतं ऊन हेच तर ज्येष्ठाचं अश्रूहीन रडणं. माझं लग्न जिच्याशी झालं होतं, तिचं खरं नाव मी देणार नाही. कारण जगाच्या इतिहासात तिच्या नावावरून पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये वाद होण्याची काही भीती नाही. ज्या ताम्रपटावर तिचं नाव कोरलेलं आहे, तो माझा हृदयपट. कधीकाळी तो पट आणि ते नाव पुसलं जाईल, असं मला वाटूच शकत नाही. पण ज्या अमृतलोकात ते अक्षय होऊन राहिलं आहे, तिथे इतिहासकारांचं येणंजाणं नाही.
हैमंती
माझ्या या लिखाणात तिला कसलं का होईना, एक नाव तर हवं. बरं, तिचं नाव ठेवतो शिशिर, म्हणजे दव. कारण दवात हसू आणि आसू अगदी एकरूप झालेले असतात, आणि दवाची पहाटेची कहाणी सकाळ होताच संपून जाते. शिशिर माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान होती. तरीही माझे वडील गौरीदानाचे, म्हणजे आठ वर्षांच्या मुलीच्या लग्नाचे, पुरस्कर्ते नव्हते असं नाही. त्यांचे वडील कडवे समाजविद्रोही होते; देशातल्या रूढ धर्मकर्मावर त्यांची कशातच श्रद्धा नव्हती; त्यांनी कसून इंग्रजी वाचलं होतं. माझे वडील कडवे समाजानुयायी; आपल्या समाजात — सदरेत की अंतःपुरात, देवडीच्या वाटेनं की परसदाराच्या — त्यांना मानायला जड जाईल अशी एखादी गोष्ट शोधून सापडणं कठीण; कारण यांनीही कसून इंग्रजी वाचलं होतं. आजोबा आणि वडील दोघांचीही मतं म्हणजे बंडाची दोन निरनिराळी रूपं. कोणतंही सरळ, स्वाभाविक नाही. तरीही मोठ्या वयाच्या मुलीशी बाबांनी माझं लग्न लावून दिलं, त्याचं कारण — मुलीचं वय मोठं, म्हणूनच हुंड्याचा आकडाही मोठा. शिशिर माझ्या सासऱ्यांची एकुलती एक मुलगी. बाबांची खात्री होती, की मुलीच्या बापाचा सगळा पैसा होणाऱ्या जावयाच्या भविष्याचं पोट भरण्यासाठीच साठतो आहे. माझ्या सासऱ्यांना कुठल्याही खास मताचं लोढणं नव्हतं. पश्चिमेकडे एका डोंगरी संस्थानात कुणा राजाच्या हाताखाली ते मोठ्या हुद्द्यावर होते. शिशिर तान्ही असतानाच तिची आई वारली. मुलगी वर्षामागून वर्ष एकेका वर्षानं मोठी होते आहे, हे माझ्या सासऱ्यांच्या लक्षातच आलं नाही. तिकडे त्यांच्या समाजातलं असं कुणीच नव्हतं, जो त्यांच्या डोळ्यांत बोट घालून ते दाखवून देईल. शिशिरचं वय यथाकाळ सोळा झालं; पण ते निसर्गाचं सोळा, समाजाचं सोळा नव्हे. आपल्या वयाबद्दल सावध राहायचा सल्ला तिला कुणी दिला नव्हता, आणि तीही आपल्या वयाकडे वळून बघतसुद्धा नसे.
हैमंती
कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात पाऊल टाकलं होतं, माझं वय एकोणीस, अशा वेळी माझं लग्न झालं. हे वय समाजाच्या मतानं किंवा समाजसुधारकांच्या मतानं योग्य की नाही, यावरून त्या दोन पक्षांनी लढून, रक्तबंबाळ होऊन मरावं; पण मी सांगतो, ते वय परीक्षा पास होण्याला कितीही चांगलं असो, लग्नाचं स्थळ येण्यालाही जराही कमी चांगलं नाही. लग्नाचा अरुणोदय झाला एका फोटोग्राफच्या चाहुलीनं. मी धडा घोकत होतो. थट्टेचं नातं असलेल्या एका नातलग बाईंनी माझ्या टेबलावर शिशिरचा फोटो ठेवला आणि म्हणाल्या, 'आता खरा अभ्यास कर — अगदी मान मोडून.' कुणा अनाडी कारागिरानं काढलेला फोटो. आई नव्हती, म्हणून कुणी तिचे केस ओढून घट्ट बांधून, अंबाड्यात जर गुंडाळून, साहा किंवा मल्लिक कंपनीचं भडक जाकीट चढवून वरपक्षाचे डोळे दिपवण्यासाठी बनवाबनवी केली नव्हती. अगदी साधासुधा चेहरा, साधेसुधे दोन डोळे, आणि एक साधीसुधी साडी. पण सगळं मिळून त्यात काय एक महिमा होता, तो मला सांगता येत नाही. कसल्यातरी एका साध्या खुर्चीवर बसलेली, मागे एक पट्टेदार सतरंजी टांगलेली, बाजूला एका तिपाईवर फुलदाणीत फुलांचा गुच्छ. आणि गालिच्यावर, साडीच्या वळलेल्या काठाखाली, दोन अनवाणी पावलं. त्या चित्राला माझ्या मनाच्या सोनेरी जादूच्या कांडीचा स्पर्श होताच ती माझ्या आयुष्यात जागी झाली. ते दोन काळे डोळे माझ्या सगळ्या विचारांच्या मधोमध कसे कोण जाणे पाहत राहिले. आणि त्या वळलेल्या काठाखालच्या दोन अनवाणी पावलांनी माझ्या हृदयाला आपलं पद्मासन करून घेतलं. पंचांगाची पानं उलटत राहिली; दोन-तीन लग्नमुहूर्त मागे पडले, सासऱ्यांना रजा काही मिळेना. तिकडे समोर चार-पाच महिन्यांचा मुहूर्तांचा दुष्काळ माझ्या कुंवारपणाची हद्द एकोणिसावरून विनाकारण विसाव्याकडे ढकलण्याचा कट रचत होता. सासऱ्यांचा आणि त्यांच्या मालकाचा राग येऊ लागला.
हैमंती
कसंही असो, त्या दुष्काळाच्या अगदी आधीच्या मुहूर्तावर लग्नाचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशीच्या सनईची प्रत्येक तान मला आठवते आहे. त्या दिवसाचा प्रत्येक क्षण मी माझ्या सगळ्या चैतन्यानं स्पर्शला आहे. माझं ते एकोणिसावं वय माझ्या आयुष्यात अक्षय होऊन राहो. लग्नमंडपात चहूकडे गोंगाट; त्याच्या मधोमध वधूचा कोमल हात माझ्या हातावर पडला. याहून आश्चर्य ते काय! माझं मन पुन्हा पुन्हा म्हणू लागलं, 'मला मिळाली, ही मला मिळाली.' कोण मिळाली? ही तर दुर्लभ आहे, ही तर मानवी आहे, हिच्या रहस्याला काय अंत आहे? माझ्या सासऱ्यांचं नाव गौरीशंकर. ज्या हिमालयात ते राहत, त्यातल्या गौरीशंकर शिखराचे ते जणू नावाचे सोबती होते. त्यांच्या गांभीर्याच्या शिखरावर एक स्थिर हास्य शुभ्र होऊन राहिलं होतं. आणि त्यांच्या हृदयाच्या आत स्नेहाचा जो एक झरा होता, त्याचा ठावठिकाणा ज्यांना ठाऊक होता, ते त्यांना सोडायला तयार नसत. कामावर परत जाण्यापूर्वी सासऱ्यांनी मला बोलावून सांगितलं, 'बाळ, माझ्या या मुलीला मी सतरा वर्षं ओळखतो, आणि तुला हे इतकेच दिवस ओळखतो; तरी आता ती तुझ्याच हाती आहे. जे धन तुला दिलं, त्याचं मोल तुला कळावं, याहून मोठा आशीर्वाद नाही.' त्यांच्या व्याही-विहिणींनी, सगळ्यांनीच, त्यांना पुन्हा पुन्हा दिलासा देत सांगितलं, 'व्याहीबुवा, मनात कसलीही काळजी ठेवू नका. तुमची मुलगी जशी बापाला सोडून आली, तशी इथे तिला आई-बाप दोघेही मिळाले.' त्यानंतर मुलीचा निरोप घेताना सासरे हसले; म्हणाले, 'आजीबाई, चाललो. तुझा हा एकुलता एक बाप; आजपासून याचं काही हरवलं, चोरीला गेलं किंवा नासलं, तर त्याला मी जबाबदार नाही.' मुलगी म्हणाली, 'हो, तर! उलट कुठे जरा जरी नुकसान झालं, तर त्याची भरपाई तुलाच करावी लागेल.'
हैमंती
शेवटी, रोज ज्या ज्या गोष्टींत त्यांचा घोटाळा होई, त्यांबद्दल तिनं बापाला पुन्हा पुन्हा बजावलं. खाण्यापिण्याबाबत माझ्या सासऱ्यांना पुरेसा संयम नव्हता — काही कुपथ्यं होती, त्यांच्यावर त्यांचा विशेष जीव — त्या सगळ्या मोहांपासून बापाला शक्य तितकं दूर ठेवणं हे मुलीचं एक कामच होतं. म्हणून आज तिनं बापाचा हात धरून काळजीनं म्हटलं, 'बाबा, माझं सांगणं पाळशील — पाळशील ना?' तिचे बाबा हसून म्हणाले, 'माणूस पण करतो तो पण मोडून मोकळा श्वास घेण्यासाठीच; म्हणून शब्दच न देणं सगळ्यात सुरक्षित.' त्यानंतर बाप बाहेर आल्यावर तिच्या खोलीचं दार लागलं. त्यानंतर काय झालं, कुणालाच ठाऊक नाही. बाप-लेकीचा हा अश्रूहीन निरोपसोहळा शेजारच्या खोलीतून अंतःपुरातल्या उत्सुक बायकांच्या घोळक्यानं पाहिला आणि ऐकला. अजब प्रकार! भय्यांच्या मुलखात राहून भय्येच झालेत! माया-ममता म्हणून नाहीच. माझ्या सासऱ्यांचे मित्र वनमालीबाबू यांनीच आमचं लग्न जुळवलं होतं. ते आमच्या घराच्याही ओळखीचे. त्यांनी सासऱ्यांना म्हटलं होतं, 'जगात तुला ही एकच तर मुलगी. आता यांच्याच शेजारी घर घेऊन इथेच उरलेलं आयुष्य काढ.' ते म्हणाले, 'जे दिलं ते पुरतं रितं करून दिलं. आता मागे वळून पाहू गेलो तर दुःखच वाट्याला येईल. हक्क सोडून देऊन पुन्हा हक्क ठेवू पाहण्यासारखी कुचंबणा दुसरी नाही.' सगळ्यात शेवटी मला एकीकडे नेऊन, अपराध्यासारखे संकोचून म्हणाले, 'माझ्या मुलीला पुस्तकं वाचायचा शौक आहे, आणि लोकांना खाऊ घालायला तिला फार आवडतं. त्यासाठी व्याहीबुवांना त्रास द्यायची माझी इच्छा नाही. मी अधूनमधून तुला पैसे पाठवीन. तुझ्या बाबांना कळलं तर ते रागावतील का?'
हैमंती
प्रश्न ऐकून जरा आश्चर्य वाटलं. संसारात कुठल्याही बाजूनं पैसा आला तर बाबा रागावतील, इतका त्यांचा स्वभाव वाईट असलेला तर मी कधी पाहिला नव्हता. जणू लाच देत असावेत अशा तऱ्हेनं माझ्या हातात शंभर रुपयांची एक नोट कोंबून सासरे झटकन निघून गेले; माझा नमस्कार घेण्यासाठीसुद्धा थांबले नाहीत. मागून मला दिसलं, आता खिशातून रुमाल बाहेर निघाला. मी स्तब्ध होऊन बसलो, विचार करू लागलो. मनात उमगलं, ही माणसं वेगळ्याच जातीची आहेत. मित्रांपैकी पुष्कळांना लग्न करताना पाहिलं आहे. मंत्र म्हणताक्षणीच बायकोला एका घासात गिळून टाकलं जातं. पोटात पोचल्यावर थोड्या वेळानं या पदार्थाचे निरनिराळे गुणदोष प्रकट होऊ शकतात, आणि अधूनमधून आतल्या आत बेचैनीही होते; पण घशाखाली उतरताना वाटेत कुठे जराही अडत नाही. मी मात्र लग्नमंडपातच ओळखलं होतं, की दानाच्या मंत्रानं बायकोचा जितका भाग मिळतो, तेवढ्यानं संसार चालतो, पण सोळा आण्यांतले पंधरा आणे बाकीच राहतात. मला शंका येते, बहुतेक लोक बायकोशी केवळ लग्न करतात, तिला मिळवत नाहीत, आणि मिळवलं नाही हे त्यांना कळतही नाही; त्यांच्या बायकोलाही ही गोष्ट मरेपर्यंत उमगत नाही. पण ती तर माझ्या साधनेचं धन होती; ती माझी मालमत्ता नव्हती, ती माझी संपदा होती. शिशिर — नाही, हे नाव आता वापरून चालणार नाही. एक तर ते तिचं नाव नाही, शिवाय ती तिची ओळखही नाही. ती सूर्यासारखी अढळ; क्षणजीवी उषेच्या निरोपाचा अश्रुबिंदू ती नव्हे. लपवून ठेवून काय होणार? तिचं खरं नाव हैमंती. मी पाहिलं, या सतरा वर्षांच्या मुलीवर यौवनाचा सगळा प्रकाश येऊन पडला आहे, पण अजून ती किशोरवयाच्या कुशीतून जागी झालेली नाही. जणू पर्वतशिखरावरच्या बर्फावर सकाळचा प्रकाश चमकून उठला आहे, पण बर्फ अजून वितळलेलं नाही. मला ठाऊक आहे, ती किती निष्कलंक, शुभ्र आहे, किती गाढ पवित्र.
हैमंती
माझ्या मनात एक काळजी होती, की शिकलीसवरलेली मोठी मुलगी, कोण जाणे तिचं मन कसं जिंकावं लागेल. पण अगदी थोड्याच दिवसांत दिसलं, की मनाचा रस्ता आणि पुस्तकांच्या दुकानाचा रस्ता कुठेही एकमेकांना छेदत नाहीत. तिच्या शुभ्र मनावर कधी जरासा रंग चढला, डोळ्यांत कधी जराशी धुंदी आली, कधी तिचं सगळं तन-मन जणू आतुर होऊन उठलं, ते नेमकं सांगता येणार नाही. ही झाली एक बाजू. दुसरी बाजूही आहे; ती सविस्तर सांगायची वेळ आता आली आहे. माझे सासरे राजदरबारी नोकरीला. बँकेत त्यांचे किती पैसे साठले, याबद्दल लोकवार्तेनं नाना प्रकारचे आकडे मांडले होते, पण कुठलाही आकडा लाखाच्या खाली उतरला नव्हता. याचा परिणाम असा झाला, की तिच्या बापाचा भाव जसजसा वाढला, तसतसा हैमचा लाडही वाढत गेला. आमच्या घरची कामं, रीतिभाती शिकून घ्यायला ती उत्सुक होती, पण आईनं अतिशय मायेपोटी तिला कशालाच हात लावू दिला नाही. इतकंच काय, हैमबरोबर डोंगरावरून जी दासी आली होती, तिला जरी आपल्या खोल्यांत येऊ देत नसत, तरी तिच्या जातीबद्दल एक प्रश्नसुद्धा विचारला नाही — न जाणो, एखादं भलतंच उत्तर ऐकावं लागायचं. असेच दिवस चालले असते, पण एक दिवस अचानक बाबांचा चेहरा पार काळवंडलेला दिसला. प्रकार असा — माझ्या लग्नात सासऱ्यांनी पंधरा हजार रुपये रोख आणि पाच हजारांचे दागिने दिले होते. बाबांना त्यांच्या एका दलाल मित्राकडून बातमी मिळाली, की यांपैकी पंधरा हजार कर्ज काढूनच जमवावे लागले होते, आणि त्याचं व्याजही काही अगदीच किरकोळ नव्हतं. लाख रुपयांची अफवा तर निव्वळ थाप. माझ्या सासऱ्यांच्या संपत्तीच्या आकड्याबद्दल बाबांशी त्यांचं कधीच कसलंच बोलणं झालं नव्हतं; तरीही बाबांनी, कोणत्या तर्कानं कोण जाणे, ठरवून टाकलं की व्याह्यांनी आपल्याला मुद्दाम फसवलं आहे.
हैमंती
शिवाय बाबांची एक समजूत होती, की माझे सासरे राजाचे पंतप्रधानच म्हणावे असे कुणीतरी आहेत. चौकशी केल्यावर कळलं, ते तिथल्या शिक्षण खात्याचे प्रमुख आहेत. बाबा म्हणाले, म्हणजे शाळेचे हेडमास्तर — जगातल्या सगळ्या सभ्य हुद्द्यांपैकी सगळ्यात फालतू. बाबांची मोठी आशा होती, की आज ना उद्या सासरे निवृत्त झाले, की मीच राजाचा मंत्री होईन. अशातच रासोत्सवाच्या निमित्तानं गावाकडचे नातलग आमच्या कलकत्त्याच्या घरी येऊन जमले. सुनेला पाहून त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. कुजबूज हळूहळू अस्पष्टातून स्पष्ट होत गेली. दूरच्या नात्यातल्या कुणा एका आजी बोलून गेल्या, 'माझं मेलं कपाळ! नातसुनेनं वयात मलासुद्धा मागे टाकलं की!' आजीवर्गातल्या आणखी एकीनं म्हटलं, 'आम्हालाच मागे टाकणार नसती, तर अपू बाहेरून बायको आणायला जाईलच कशाला?' माझी आई मोठ्या जोरात म्हणाली, 'अगं बाई, हे काय बोलणं! सूनबाईचं वय जेमतेम अकरा, येत्या फाल्गुनात बाराव्यात पाऊल टाकेल. भय्यांच्या मुलखात डाळरोटी खाऊन वाढलीय, म्हणून अशी अंगानं भरलीय.' आज्या म्हणाल्या, 'हे बघ बाळा, आमची नजर अजून इतकी काही अधू झाली नाही. मुलीकडच्यांनी तुमच्यापासून वय नक्कीच लपवलंय.' आई म्हणाली, 'आम्ही कुंडली पाहिली ना.' ते खरं होतं. पण कुंडलीतच पुरावा आहे, मुलीचं वय सतरा. वडीलधाऱ्या म्हणाल्या, 'कुंडलीत काय लबाडी चालत नाही वाटतं?' यावरून घनघोर वाद, इतकंच काय, भांडणच झालं. तेवढ्यात हैम तिथे येऊन उभी राहिली. कुणा एका आजीनं विचारलं, 'नातसूनबाई, तुझं वय किती गं, सांग बघू.' आईनं तिला डोळ्यानं खुणावलं. हैमला तिचा अर्थ कळला नाही; ती म्हणाली, 'सतरा.' आई घाईघाईनं म्हणाली, 'तुला ठाऊक नाही.' हैम म्हणाली, 'मला ठाऊक आहे, माझं वय सतरा.' आज्यांनी एकमेकींना कोपरानं ढोसलं.
हैमंती
सुनेच्या मूर्खपणावर चिडून आई म्हणाली, 'तुलाच सगळं ठाऊक! तुझे बाबा तर म्हणाले, की तुझं वय अकरा.' हैम दचकून म्हणाली, 'बाबा म्हणाले? कधीच नाही.' आई म्हणाली, 'कमाल झाली! व्याह्यांनी माझ्यासमोर स्वतःच्या तोंडानं सांगितलं, आणि मुलगी म्हणते "कधीच नाही"!' असं म्हणून तिनं पुन्हा एकदा डोळ्यानं खुणावलं. या वेळी हैमला खुणेचा अर्थ कळला; आवाज आणखी ठाम करून ती म्हणाली, 'बाबा असं कधीच म्हणू शकत नाहीत.' आई आवाज चढवून म्हणाली, 'म्हणजे मी खोटारडी, असं म्हणायचंय तुला?' हैम म्हणाली, 'माझे बाबा तर कधीच खोटं बोलत नाहीत.' यानंतर आई जितक्या शिव्या देऊ लागली, तितका त्या गोष्टीचा काळिमा ओघळत, पसरत चहूकडे फासला गेला. आईनं रागारागानं बाबांकडे सुनेच्या मूर्खपणाची आणि त्याहूनही तिच्या हेकेखोरपणाची तक्रार केली. बाबांनी हैमला बोलावून सांगितलं, 'कुंवार मुलीचं वय सतरा — ही काय फार अभिमानाची गोष्ट आहे, की त्याचा डंका पिटत फिरायचं? आमच्याकडे असलं काही चालणार नाही, आधीच सांगून ठेवतो.' हाय रे! आपल्या सूनबाईशी बोलताना बाबांचा तो मधात घोळलेला पंचम सूर आज एकदम असा घोगऱ्या खर्जात कसा उतरला! हैमनं दुखावून विचारलं, 'कुणी वय विचारलं तर काय सांगू?' बाबा म्हणाले, 'खोटं बोलायची गरज नाही; तू सांग, "मला ठाऊक नाही — माझ्या सासूबाईंना ठाऊक."' खोटं कसं बोलावं लागू नये, याचा तो उपदेश ऐकून हैम अशी काही गप्प राहिली, की बाबांना कळून चुकलं, आपला सदुपदेश अगदी फुकट गेला. हैमच्या दुर्दशेबद्दल हळहळ तरी काय करू — तिच्यापुढे माझीच मान खाली गेली. त्या दिवशी पाहिलं, शरदातल्या सकाळच्या आकाशासारखी तिच्या डोळ्यांतली ती सरळ, निर्लेप नजर कुठल्यातरी संशयानं मलूल झाली आहे. भेदरलेल्या हरिणीसारखी तिनं माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या मनात आलं, 'मी या लोकांना ओळखत नाही.'
हैमंती
त्या दिवशी तिच्यासाठी मी नक्षीदार बांधणीचं एक इंग्रजी कवितांचं पुस्तक आणलं होतं. तिनं ते हातात घेतलं आणि हळूच मांडीवर ठेवून दिलं; एकदाही उघडून पाहिलं नाही. मी तिचा हात हातात उचलून घेतला आणि म्हणालो, 'हैम, माझ्यावर रागावू नकोस. मी तुझ्या सत्याला कधीही धक्का लावणार नाही. मी तर तुझ्या सत्याच्या बंधनात बांधलेलो आहे.' हैम काही न बोलता जराशी हसली. ते हसू विधात्यानं ज्याला दिलं आहे, त्याला काही बोलायची गरजच नसते. बाबांची आर्थिक भरभराट झाल्यापासून देवाची कृपा कायमची टिकावी म्हणून आमच्या घरी नव्या उत्साहानं पूजाअर्चा चालू आहे. आतापर्यंत त्या सगळ्या धार्मिक कार्यांत घरच्या सुनेला बोलावणं आलं नव्हतं. एक दिवस नव्या सुनेला पूजा मांडायची आज्ञा झाली; ती म्हणाली, 'आई, काय काय करायचं ते सांगा ना.' यात कुणाच्या डोक्यावर आभाळ कोसळण्यासारखं काही नव्हतं, कारण सगळ्यांनाच ठाऊक होतं, की ही मुलगी बिनआईची, परमुलखात वाढलेली. पण केवळ हैमला लाजवणं, हाच त्या आज्ञेचा हेतू होता. सगळ्यांनी गालावर हात ठेवून म्हटलं, 'अगं बाई, हा काय प्रकार! ही कोणत्या नास्तिकाच्या घरची मुलगी! आता या घरातून लक्ष्मी निघाली, फार वेळ नाही.' या निमित्तानं हैमच्या वडिलांना उद्देशून जे बोलू नये ते सगळं बोललं गेलं. कडू बोलण्याचे वारे वाहू लागल्यापासून हैम अगदी गप्प राहून सगळं सोसत आली होती. एक दिवसही कुणासमोर तिनं डोळ्यांतून पाणीसुद्धा काढलं नव्हतं. आज तिच्या मोठ्या मोठ्या दोन डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, 'तुम्हाला ठाऊक आहे, तिकडे माझ्या बाबांना सगळे ऋषी म्हणतात?' ऋषी म्हणतात! एकच हशा पिकला. त्यानंतर तिच्या वडिलांचा उल्लेख करायचा झाला, की बहुधा 'तुझे ऋषीबाबा' असं म्हटलं जाई — या मुलीची सगळ्यात हळवी जागा कुठे आहे, ते आमच्या घरानं बरोबर हेरून ठेवलं होतं.
हैमंती
खरं तर माझे सासरे ना ब्राह्मो होते, ना ख्रिस्ती; कदाचित नास्तिकही नसतील. देवपूजेचा विचार त्यांनी कधी केलाच नव्हता. मुलीला त्यांनी खूप शिकवलं-सवरलं, पण देवाबद्दल एका दिवसासाठीसुद्धा तिला कसला उपदेश केला नाही. वनमालीबाबूंनी याबद्दल त्यांना एकदा विचारलं होतं. ते म्हणाले होते, 'जे मलाच कळत नाही, ते शिकवू गेलो, तर केवळ ढोंग शिकवल्यासारखं होईल.' अंतःपुरात हैमची एक खरी भक्त होती — माझी धाकटी बहीण नारानी. वहिनीवर प्रेम करते म्हणून तिला पुष्कळ बोलणी खावी लागली होती. संसाराच्या या वाटचालीत हैमच्या वाट्याला आलेले सगळे अपमान मी तिच्याकडूनच ऐकत असे. एक दिवसही हैमकडून मी ऐकले नाहीत. या गोष्टी संकोचामुळे ती तोंडावर आणू शकत नसे. तो संकोच स्वतःसाठी नव्हता. हैमला तिच्या बापाकडून येणारी सगळी पत्रं ती मला वाचायला देई. पत्रं लहान, पण रसानं भरलेली. तीही बापाला लिहिलेली सगळी पत्रं मला दाखवी. बापाशी असलेलं तिचं नातं माझ्याशी वाटून घेतल्याशिवाय तिचं दांपत्य पूर्ण होऊच शकलं नसतं. तिच्या पत्रांत सासरबद्दल तक्रारीचा पुसटसा इशाराही नसे. असता तर संकट ओढवलं असतं. नारानीकडून ऐकलं आहे, सासरबद्दल ती काय लिहिते हे जाणून घेण्यासाठी अधूनमधून तिची पत्रं उघडली जात. पत्रांत अपराधाचा कुठलाच पुरावा न मिळाल्यानं वरिष्ठांची मनं शांत झाली असं नाही. उलट, बहुधा आशाभंगाचंच दुःख त्यांना झालं असावं. फार चिडून ते म्हणू लागले, 'इतकी सारखी सारखी पत्रं तरी कशाला? बापच जणू सर्वस्व, आम्ही कुणीच नाही वाटतं!' यावरून बरंच अप्रिय बोलणं चालू राहिलं. मी व्यथित होऊन हैमला म्हणालो, 'तुझ्या बाबांची पत्रं दुसऱ्या कुणाला न देता मलाच देत जा. कॉलेजला जाताना मी पोस्टात टाकीन.'
हैमंती
हैमनं आश्चर्यानं विचारलं, 'का?' मी शरमेनं त्याचं उत्तर दिलं नाही. घरात आता सगळे म्हणू लागले, 'आता अपूचं वाटोळं झालं. बी. ए. डिग्री बासनात गेली. मुलाचा तरी काय दोष?' ते तर खरंच. सगळा दोष हैमचा. तिचा दोष हा, की तिचं वय सतरा; तिचा दोष हा, की मी तिच्यावर प्रेम करतो; तिचा दोष हा, की विधात्याचा हा विधी आहे, म्हणून माझ्या हृदयाच्या रंध्रारंध्रात आज सारं आकाश बासरी वाजवतं आहे. बी. ए. डिग्री मी बिनदिक्कत चुलीत घालू शकलो असतो. पण हैमच्या कल्याणासाठी मी पण केला — पास होणारच, आणि चांगल्या रीतीनं पास होणार. हा पण पाळणं त्या परिस्थितीत मला शक्य वाटलं, त्याची दोन कारणं होती — एक तर, हैमच्या प्रेमात आकाशासारखा असा एक विस्तार होता, की संकुचित आसक्तीत ते मनाला गुरफटून ठेवत नसे; त्या प्रेमाच्या चहूबाजूंनी मोठा आरोग्यदायी वारा वाहत असे. दुसरं, परीक्षेसाठी जी पुस्तकं वाचायची होती, ती हैमबरोबर मिळून वाचणं अशक्य नव्हतं. परीक्षेच्या तयारीला कंबर कसून लागलो. एका रविवारी दुपारी बाहेरच्या खोलीत बसून मार्टिनोच्या चारित्र्यशास्त्राच्या पुस्तकातल्या खास खास ओळींच्या मधोमध निळ्या पेन्सिलीचा नांगर चालवत होतो, तेवढ्यात अचानक बाहेरच्या बाजूला माझी नजर गेली. माझ्या खोलीसमोर, अंगणाच्या उत्तरेला अंतःपुरात चढून जायचा एक जिना. त्याच्या कडेकडेनं मधूनमधून गज बसवलेली एकेक खिडकी. पाहतो तो, त्यांतल्याच एका खिडकीत हैम गप्प बसून पश्चिमेकडे पाहते आहे. त्या बाजूला मल्लिकांच्या बागेत कांचनाचं झाड गुलाबी फुलांनी झाकून गेलं होतं. माझ्या छातीत धस्स झालं; मनावरचं बेसावधपणाचं एक आवरण फाटून गळून पडलं. या निःशब्द, खोल वेदनेचं रूप मी इतके दिवस इतक्या स्पष्टपणे पाहिलं नव्हतं.
हैमंती
विशेष काही नाही, मला फक्त तिची बसण्याची ढब दिसत होती. मांडीवर एका हातावर दुसरा हात निश्चल पडलेला, डोकं भिंतीला टेकलेलं, मोकळे केस डाव्या खांद्यावरून छातीवर रुळलेले. माझ्या उरात एकदम कालवाकालव झाली. माझं स्वतःचं आयुष्य असं काठोकाठ भरलेलं होतं, की कुठेही कसली पोकळी मला दिसलीच नव्हती. आज अचानक अगदी माझ्याजवळ निराशेची एक फार मोठी गर्ता मला दिसली. ती मी कशी, कशानं भरून काढणार? मला तर काहीच सोडावं लागलं नव्हतं — ना नातलग, ना सवयी, ना काही. हैम मात्र सगळं मागे टाकून माझ्याकडे आली होती. ते किती मोठं होतं, याचा मी नीट विचारच केला नव्हता. आमच्या घरात अपमानाच्या काटेरी शय्येवर ती बसली होती; ती शय्या मीही तिच्याबरोबर वाटून घेतली होती. त्या दुःखात हैमशी माझं नातं जुळलं होतं, त्यानं आम्हाला वेगळं केलं नव्हतं. पण ही गिरिनंदिनी सतरा वर्षं अंतर्बाह्य केवढ्या मोठ्या मुक्तीत वाढली होती! किती निर्मळ सत्यात आणि उदार प्रकाशात तिचा स्वभाव असा सरळ, शुभ्र आणि सशक्त झाला होता! त्यापासून हैम किती निरतिशय आणि निष्ठुरपणे तुटली आहे, हे इतके दिवस मला पुरतं जाणवलं नव्हतं, कारण तिथे तिच्याबरोबर माझं समान आसन नव्हतं. हैम आतल्या आत क्षणाक्षणाला मरत होती. तिला मी सगळं देऊ शकतो, पण मुक्ती देऊ शकत नाही — ती माझ्याच आत कुठे आहे? म्हणूनच कलकत्त्याच्या गल्लीत त्या गजांच्या फटीतून मूक आकाशाशी तिच्या मूक मनाचं बोलणं चालतं; आणि एखाद्या रात्री मी अचानक जागा होऊन पाहतो, तर ती अंथरुणात नाही — हातावर डोकं ठेवून, ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे तोंड करून गच्चीवर पडून आहे.
हैमंती
मार्टिनो पडून राहिला. विचार करू लागलो, काय करावं. लहानपणापासून बाबांपुढे माझा संकोच अपार होता; त्यांच्यापुढे समोरासमोर उभं राहून काही मागण्याचं धाडस किंवा सवय मला कधीच नव्हती. त्या दिवशी राहवलं नाही. लाजलज्जा बाजूला ठेवून त्यांना बोलून बसलो, 'सूनबाईची तब्येत बरी नाही; तिला एकदा तिच्या वडिलांकडे पाठवावं म्हणतो.' बाबा तर एकदम चक्रावूनच गेले. हैमनंच असल्या अभूतपूर्व धाष्ट्र्यानं मला हे करायला लावलं आहे, याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही. तत्काळ उठून अंतःपुरात जाऊन त्यांनी हैमला विचारलं, 'काय म्हणतेस सूनबाई, तुला दुखणं कसलं?' हैम म्हणाली, 'दुखणं तर काहीच नाही.' बाबांना वाटलं, हे उत्तर तोरा दाखवण्यासाठीच. पण हैमचं शरीरही दिवसेंदिवस सुकत चाललं होतं, हे रोजच्या सवयीमुळे आम्हाला कळलंच नाही. एक दिवस वनमालीबाबू तिला पाहून दचकलेच, 'अँ, हे काय? हैमी, हा काय अवतार तुझा! आजारीबिजारी नाहीस ना?' हैम म्हणाली, 'नाही.' या प्रसंगानंतर दहाएक दिवसांतच, ना सांगता ना सवरता, अचानक माझे सासरे येऊन दाखल झाले. हैमच्या तब्येतीबद्दल वनमालीबाबूंनी त्यांना नक्कीच लिहिलं असणार. लग्नानंतर बापाचा निरोप घेताना मुलीनं आपले अश्रू आवरून धरले होते. या वेळी भेटीच्या दिवशी बापानं तिची हनुवटी धरून चेहरा वर उचलताक्षणीच हैमचे अश्रू कुठलाच बांध जुमानेनात. बापाला एक शब्दही बोलवला नाही; 'कशी आहेस?' एवढंसुद्धा त्यांनी विचारलं नाही. माझ्या सासऱ्यांनी आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर असं काहीतरी पाहिलं होतं, की त्यांचं काळीज फाटून गेलं. हैम आपल्या बाबांचा हात धरून त्यांना झोपायच्या खोलीत घेऊन गेली. किती गोष्टी विचारायच्या आहेत! तिच्या बाबांचीही तब्येत बरी दिसत नाहीये!
हैमंती
तिच्या बाबांनी विचारलं, 'आजीबाई, येतेस माझ्याबरोबर?' भिकाऱ्यानं हात पसरावा तशी हैम एकदम म्हणाली, 'येते.' तिचे बाबा म्हणाले, 'बरं, सगळी व्यवस्था करतो.' सासरे अतिशय काळजीत नसते, तर या घरात पाऊल टाकताक्षणीच त्यांना कळलं असतं, की इथे आता त्यांचे ते दिवस उरले नाहीत. त्यांचं अचानक येणं म्हणजे उपद्रव समजून बाबा त्यांच्याशी नीट बोललेसुद्धा नाहीत. माझ्या सासऱ्यांना आठवत होतं, की त्यांच्या व्याह्यांनी एकदा त्यांना पुन्हा पुन्हा आश्वासन दिलं होतं, की हवं तेव्हा ते मुलीला घरी घेऊन जाऊ शकतील. हा शब्द मोडला जाऊ शकतो, हे त्यांच्या मनातही येऊ शकलं नव्हतं. बाबा हुक्का ओढत ओढत म्हणाले, 'व्याहीबुवा, मी तर काही सांगू शकत नाही, एकदा मग घरातल्यांना —' 'घरातल्यांवर' सोपवण्याचा अर्थ काय, ते मला ठाऊक होतं. समजलो, काही होणार नाही. काही झालंही नाही. सूनबाईची तब्येत बरी नाही! केवढा हा अन्याय्य आळ! सासऱ्यांनी स्वतः एका चांगल्या डॉक्टरला आणून तपासणी करवली. डॉक्टर म्हणाले, 'हवापालट आवश्यक आहे, नाहीतर अचानक एखादं गंभीर दुखणं उद्भवू शकतं.' बाबा हसून म्हणाले, 'अचानक एखादं गंभीर दुखणं तर कुणालाही उद्भवू शकतं. हे काय बोलणं झालं!' माझे सासरे म्हणाले, 'आपल्याला ठाऊक आहेच, हे एक नामांकित डॉक्टर आहेत, यांचं म्हणणं म्हणजे —' बाबा म्हणाले, 'असे ढीगभर डॉक्टर पाहिलेत. दक्षिणेच्या जोरावर कुठल्याही पंडिताकडून हवा तो शास्त्रार्थ मिळतो, आणि कुठल्याही डॉक्टरकडून हव्या त्या रोगाचं सर्टिफिकेट मिळतं.' हे ऐकून माझे सासरे अगदी स्तब्ध झाले. हैमला कळलं, तिच्या बाबांचा प्रस्ताव अपमान करून धुडकावला गेला आहे. तिचं मन एकदम लाकडासारखं बधिर झालं.
हैमंती
मला आणखी सहन झालं नाही. बाबांकडे जाऊन म्हणालो, 'हैमला मी घेऊन जाणार.' बाबा गरजले, 'अस्सं काय रे —' वगैरे वगैरे. * * * मित्रांपैकी कुणी कुणी मला विचारलं आहे, जे बोललास ते केलं का नाहीस? बायकोला घेऊन जबरदस्तीनं घराबाहेर पडलो असतो, की झालं. का नाही गेलो? का! लोकधर्मापुढे सत्यधर्माला जर मी ढकलून देणार नसेन, घरासाठी घरच्या माणसाचा बळी जर मला देता येणार नसेल, तर माझ्या रक्तात युगानुयुगांचं जे शिक्षण भिनलं आहे, ते कशासाठी? ठाऊक आहे तुम्हाला? ज्या दिवशी अयोध्येच्या लोकांनी सीतेचा त्याग करण्याची मागणी केली, त्या दिवशी त्यांच्यात मीही होतो. आणि त्या त्यागाचा गौरव युगानुयुगं जे गात आले आहेत, त्यांच्यातलाही मी एक. आणि मीच तर अलीकडेच लोकरंजनासाठी पत्नीत्यागाचं गुणगान करणारा लेख मासिकात लिहिला आहे. काळजाच्या रक्तानं मला एक दिवस दुसऱ्या सीतात्यागाची कहाणी लिहावी लागेल, हे कुणाला ठाऊक होतं! * * * बाप-लेकीच्या निरोपाचा क्षण पुन्हा एकदा आला. या वेळीही दोघांच्याही चेहऱ्यावर हसू. मुलगी हसता हसताच दटावून म्हणाली, 'बाबा, पुन्हा कधी मला बघायला अशी धावपळ करत या घरी आलास, तर मी दारच लावून घेईन.' तिचे बाबा हसता हसताच म्हणाले, 'पुन्हा आलो, तर घरफोडीची पहार सोबत घेऊनच येईन.' त्यानंतर हैमच्या चेहऱ्यावर तिचं ते नेहमीचं स्निग्ध हसू मी एक दिवसही पाहिलं नाही. त्याच्याही पुढे काय झालं, ते मात्र आता मला सांगवणार नाही. * * * ऐकतो, आई मुली पाहते आहे. कदाचित एक दिवस आईचा आग्रह मला मोडता येणार नाही, हेही शक्य आहे. कारण — जाऊ दे, आता कशाला.