रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
इच्छापूर्ती
सुबलचंद्रांच्या मुलाचं नाव सुशीलचंद्र. पण माणूस नेहमीच नावासारखा निघतो असं नाही. म्हणूनच सुबलचंद्र जरा दुबळे होते आणि सुशीलचंद्र काही फारसे शांत नव्हते. मुलगा सगळ्या आळीला हैराण करून सोडत असे, म्हणून बाप अधूनमधून त्याला शिक्षा करायला धावत असे; पण बापाच्या पायांत होता वात, आणि मुलगा हरणासारखा पळू शकत असे; त्यामुळे बुक्के, थपडा, धपाटे नेहमीच नेमक्या जागी पडत नसत. पण ज्या दिवशी सुशीलचंद्र दैवयोगानं हाती सापडत, त्या दिवशी मात्र त्यांची काही धडगत नसे. आज शनिवार, शाळा दोन वाजता सुटणार होती; पण आज शाळेत जायला सुशीलचं मन काही केल्या घेत नव्हतं. त्याला अनेक कारणं होती. एक तर आज शाळेत भूगोलाची परीक्षा, त्यात पुन्हा पलीकडच्या आळीत बोसांच्या घरी आज संध्याकाळी दारूकाम उडणार होतं. सकाळपासून तिथे धामधूम चालली होती. सुशीलची इच्छा, आजचा दिवस तिथेच घालवावा. खूप विचार करून शेवटी शाळेची वेळ झाली तेव्हा तो जाऊन अंथरुणावर पडला. त्याचे वडील सुबल येऊन म्हणाले, 'काय रे, अंथरुणात पडून आहेस ते? आज शाळेत नाही जायचं?' सुशील म्हणाला, 'माझ्या पोटात दुखतंय, आज मी शाळेत नाही जाऊ शकणार.'
इच्छापूर्ती
सुबलांना त्याची सगळी थाप कळून चुकली. मनात म्हणाले, थांब, आज याची चांगली जिरवायला हवी. असं म्हणून ते बोलले, 'पोटात दुखतंय? मग तुला कुठेच जायचं काम नाही. बोसांच्या घरी दारूकाम बघायला हरीलाच एकट्याला पाठवून देतो. तुझ्यासाठी आज गोळ्या आणून ठेवल्या होत्या, त्याही आज खायच्या नाहीत. तू इथे गुपचूप पडून राहा, मी जरा काढा करून आणतो.' असं म्हणून त्याच्या खोलीला बाहेरून कडी लावून सुबलचंद्र खूप कडू काढा करून आणायला गेले. सुशील मोठ्या पेचात सापडला. गोळ्या त्याला जितक्या आवडत, तितकाच काढा प्यायचा म्हटलं की त्याच्या पोटात गोळा येई. तिकडे पुन्हा, बोसांच्या घरी जायला कालच्या रात्रीपासून त्याचा जीव तळमळत होता, तेही आता बंद झालं म्हणायचं. सुबलबाबू भलीमोठी वाटी भरून काढा घेऊन खोलीत शिरले, तसा सुशील अंथरुणातून धडपडत उठून म्हणाला, 'माझ्या पोटातलं दुखणं पार गेलं, मी आज शाळेत जाणार.' वडील म्हणाले, 'नको नको, ते काही नको, तू काढा पिऊन इथेच गुपचूप पडून राहा.' असं म्हणून त्याला बळेच काढा पाजून, खोलीला कुलूप लावून ते बाहेर निघून गेले. सुशील अंथरुणात पडून रडत रडत दिवसभर एकच विचार करत राहिला, अहाहा, उद्याच जर माझं वय बाबांएवढं झालं, तर मला हवं ते करता येईल, मला कुणी कोंडून ठेवू शकणार नाही.
इच्छापूर्ती
त्याचे वडील सुबलबाबू बाहेर एकटेच बसून बसून विचार करू लागले, माझ्या आईवडिलांनी माझे फार लाड केले, म्हणूनच तर माझं शिक्षण काही धड झालं नाही. अहाहा, ते बालपण पुन्हा मिळालं तर मग मुळीच वेळ न दवडता नुसता अभ्यास करून घेईन. इच्छादेवी त्याच वेळी घराबाहेरून चालल्या होत्या. बापाच्या आणि मुलाच्या मनातली इच्छा त्यांना कळली, आणि त्यांना वाटलं, बरं, ठीक आहे, थोडे दिवस यांची इच्छा पुरी करूनच पाहू या. असा विचार करून त्यांनी बापाकडे जाऊन सांगितलं, 'तुझी इच्छा पूर्ण होईल. उद्यापासून तुला तुझ्या मुलाचं वय मिळेल.' मुलाकडे जाऊन सांगितलं, 'उद्यापासून तू तुझ्या बापाच्या वयाचा होशील.' ते ऐकून दोघेही भलतेच खूश झाले. म्हातारे सुबलचंद्र रात्री नीट झोपू शकत नसत, पहाटेच्या सुमारास त्यांना झोप लागे. पण आज त्यांना काय झालं कोण जाणे, एकाएकी भल्या पहाटे जाग येऊन ते एकदम टुणकन उडी मारून अंथरुणावरून खाली उतरले. पाहतात तो काय, ते अगदी लहान झाले आहेत; पडलेले सगळे दात पुन्हा आले आहेत; तोंडावरच्या मिशा-दाढी सगळ्या कुठे गेल्या, त्यांचा मागमूसही नाही. रात्री जे धोतर आणि सदरा घालून ते झोपले होते, ते सकाळी इतके ढगळ झाले होते की सदऱ्याच्या दोन्ही बाह्या जवळजवळ जमिनीपर्यंत लोंबत होत्या, सदऱ्याचा गळा छातीपर्यंत उतरला होता, आणि धोतराचा सोगा असा लोळत होता की पाऊल टाकून चालणंसुद्धा मुश्कील.
इच्छापूर्ती
आमचे सुशीलचंद्र एरवी पहाटे उठून चहूकडे धुमाकूळ घालत हिंडत असतात, पण आज त्याची झोप काही उघडेना; त्याचे वडील सुबलचंद्र यांच्या आरड्याओरड्यानं जेव्हा तो जागा झाला, तेव्हा पाहतो तो कपडेलत्ते अंगाला इतके घट्ट बसले आहेत की फाटून-तुटून त्यांच्या चिंध्या व्हायची वेळ आली आहे; सगळं शरीर वाढलं आहे; काळ्या-पांढऱ्या मिशा-दाढीनं अर्धं तोंड दिसतच नाही; डोक्यावर दाट केस होते, हात लावून पाहतो तो पुढे केसच नाहीत, स्वच्छ टक्कल चकचकतंय. आज सकाळी सुशीलचंद्र अंथरुण सोडून उठायलाच तयार नाही. कितीदा तरी चुटक्या वाजवत मोठमोठ्यानं जांभया दिल्या; कितीदा तरी या कुशीवरून त्या कुशीवर वळला; शेवटी वडील सुबलचंद्रांच्या गलक्यानं अगदी वैतागून उठला. दोघांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली खरी, पण मोठीच पंचाईत होऊन बसली. आधीच सांगितलं आहे, सुशीलचंद्राला वाटत असे की आपण बाबा सुबलचंद्रांसारखे मोठे आणि स्वतंत्र झालो, तर मनाला येईल तसं झाडावर चढू, पाण्यात उड्या टाकू, कैऱ्या खाऊ, पक्ष्यांची पिल्लं काढू, गावभर भटकत फिरू; वाटेल तेव्हा घरी येऊन वाटेल ते खाऊ, अडवायला कुणी असणार नाही. पण नवल असं, त्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला झाडावर चढावंसंच वाटलं नाही. शेवाळलेलं तळं पाहून त्याला वाटलं, यात उडी टाकली की लगेच मला हुडहुडी भरून ताप येईल. ओसरीवर एक चटई अंथरून तो गुपचूप बसून बसून विचार करू लागला.
इच्छापूर्ती
एकदा वाटलं, खेळणंबागडणं एकदमच सोडून देणं काही बरं नाही, एकदा प्रयत्न तरी करून पाहू. असा विचार करून, जवळच एक अंबाड्याचं झाड होतं, त्याच्यावर चढायचे त्यानं नाना प्रयत्न केले. काल ज्या झाडावर तो खारीसारखा सरसर चढू शकत होता, त्यावर आज म्हातारं शरीर घेऊन त्याला काही केल्या चढता येईना; खालची एक कोवळी फांदी धरताच ती त्याच्या अंगाच्या भारानं मोडली आणि म्हातारा सुशील धप्पकन जमिनीवर आपटला. जवळच्या रस्त्यानं माणसं चालली होती, म्हाताऱ्याला पोरासारखं झाडावर चढताना आणि पडताना पाहून ती हसून हसून बेजार झाली. सुशीलचंद्र लाजेनं मान खाली घालून पुन्हा त्या ओसरीवर चटईवर येऊन बसला. नोकराला म्हणाला, 'अरे, बाजारातून एक रुपयाच्या गोळ्या घेऊन ये.' गोळ्यांचा सुशीलचंद्राला भारी सोस होता. शाळेजवळच्या दुकानात रंगीबेरंगी गोळ्या मांडून ठेवलेल्या तो रोज पाहत असे; दोन-चार पैसे जे मिळत, त्यांच्या गोळ्याच घेऊन खात असे; त्याला वाटे, बाबांसारखे पैसे आपल्याजवळ येतील तेव्हा नुसते खिसे भरभरून गोळ्या घ्यायच्या आणि खायच्या. आज नोकरानं एका रुपयात गोळ्यांची एक रासच आणून दिली; त्यातली एक घेऊन तो बोळक्या तोंडात टाकून चोखू लागला; पण म्हाताऱ्या तोंडाला पोरांच्या गोळ्या काही केल्या गोड लागेनात. एकदा वाटलं, या माझ्या चिमुरड्या बाबांना खायला द्याव्यात; पण लगेच वाटलं, नको, एवढ्या गोळ्या खाल्ल्या तर त्यांना पुन्हा काहीतरी दुखणं व्हायचं.
इच्छापूर्ती
कालपर्यंत जी पोरं सुशीलचंद्राबरोबर कबड्डी खेळत होती, ती आज सुशीलला शोधत आली आणि म्हाताऱ्या सुशीलला पाहून दूर पळून गेली. सुशीलला वाटलं होतं, बापासारखं स्वतंत्र झालो की आपल्या सगळ्या दोस्तांबरोबर दिवसभर नुसती 'हुतूतू हुतूतू' करत कबड्डी खेळत हिंडायचं; पण आज राखाल, गोपाल, अक्षय, निवारण, हरीश आणि नंद यांना पाहून त्याला मनातून वैताग आला; त्याला वाटलं, गुपचूप बसलोय, आता ही कार्टी येऊन गोंधळ घालणार बहुतेक. आधीच सांगितलं आहे, बाबा सुबलचंद्र रोज ओसरीवर चटई अंथरून बसून बसून विचार करत असत, लहान होतो तेव्हा खोड्या करून वेळ वाया घालवला, बालपण परत मिळालं तर दिवसभर गुणी, शहाण्या मुलासारखा खोलीचं दार लावून बसून नुसता पुस्तक घेऊन धडे पाठ करीन. इतकंच काय, संध्याकाळनंतर आजीकडे गोष्टी ऐकायचंसुद्धा बंद करून, दिवा लावून रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत अभ्यास करीन. पण बालपण परत मिळाल्यावर सुबलचंद्र शाळेच्या वाटेला जायला काही केल्या तयार होत नसत. सुशील वैतागून येऊन म्हणे, 'बाबा, शाळेत नाही जायचं?' सुबल डोकं खाजवत, मान खाली घालून हळूच म्हणत, 'आज माझ्या पोटात दुखतंय, मी शाळेत नाही जाऊ शकणार.' सुशील रागावून म्हणे, 'नाही जाऊ शकणार म्हणे! शाळेच्या वेळी माझ्याही पोटात असं पुष्कळदा दुखलंय, मला सगळं ठाऊक आहे.'
इच्छापूर्ती
खरोखरच, सुशील इतक्या निरनिराळ्या युक्त्यांनी शाळा बुडवत असे, आणि ते इतक्या अलीकडचं होतं, की त्याला गुंगारा देणं त्याच्या बापाच्या बसचं नव्हतं. सुशीलनं आपल्या चिमुकल्या बापाला बळेबळेच शाळेत पाठवायला सुरुवात केली. शाळा सुटल्यावर सुबल घरी येऊन एकदा मनसोक्त धावाधाव करून खेळायला अगदी उतावीळ होत; पण नेमक्या त्याच वेळी म्हातारा सुशीलचंद्र डोळ्यांवर चष्मा चढवून कृत्तिवासाचं रामायण घेऊन सूर लावून लावून वाचत बसे, आणि सुबलच्या धावाधावीनं, गोंधळानं त्याच्या वाचनात व्यत्यय येई. म्हणून तो सुबलला बळेच धरून समोर बसवी, हातात पाटी देऊन गणितं सोडवायला देई. गणितं अशी मोठमोठी निवडून देई की त्यातलं एक सोडवायलाच त्याच्या बापाचा तासभर जाई. संध्याकाळी म्हाताऱ्या सुशीलच्या खोलीत बरेच म्हातारे जमून बुद्धिबळ खेळत. त्या वेळी सुबलला शांत ठेवण्यासाठी सुशीलनं एक मास्तर ठेवला; मास्तर त्याला रात्री दहा वाजेपर्यंत शिकवत असे. खाण्यापिण्याच्या बाबतीत सुशील फार कडक होता. कारण त्याचे वडील सुबल म्हातारे होते तेव्हा त्यांना खाल्लेलं नीट पचत नसे, जरा जास्त खाल्लं की पित्त होई — सुशीलला ते चांगलं आठवत होतं; म्हणून तो आपल्या बापाला काही केल्या जास्त खाऊ देत नसे. पण एकाएकी वय कमी झाल्यामुळे हल्ली त्यांना अशी भूक लागत असे की खडेसुद्धा पचवले असते. सुशील त्यांना जितकं कमी खायला देई, तितके ते भुकेच्या आगीनं कासावीस होऊन फिरत. शेवटी रोडावून, सुकून त्यांच्या अंगाची सगळी हाडं वर आली. सुशीलला वाटलं, काहीतरी मोठं दुखणं जडलं आहे, म्हणून तो त्यांना सारखी औषधं पाजू लागला.
इच्छापूर्ती
म्हाताऱ्या सुशीलचीही मोठीच पंचाईत झाली. पूर्वीच्या सवयीनं तो जे काही करी, ते त्याला सोसत नसे. पूर्वी आळीत कुठे जात्रेचं नाटक आहे अशी खबर लागली की घरातून पळून, थंडी असो की पाऊस, तो तिथे जाऊन हजर होई. आजचा म्हातारा सुशील तसं करायला गेला आणि सर्दी होऊन, खोकला होऊन, अंग-डोकं ठणकून तीन आठवडे अंथरुणाला खिळून पडला. जन्मभर तो तळ्यात आंघोळ करत आला होता, आजही तसं करायला गेला, तो हातांचे सांधे, पायांचे सांधे सुजून भयंकर वात उठला; त्याचे उपचार करण्यात सहा महिने गेले. तेव्हापासून तो दिवसाआड गरम पाण्यानं आंघोळ करू लागला, आणि सुबललाही तळ्यात आंघोळ करायला मुळीच जाऊ देईना. पूर्वीच्या सवयीनं विसरून तो पलंगावरून उडी मारून उतरायला जाई, आणि हाडं ठणठणून, कडकडून उठत. तोंडात आख्खा विडा कोंबल्यावर एकदम लक्षात येई, दात नाहीत, विडा चावणं अशक्य. विसरून कंगवा-ब्रश घेऊन केस विंचरायला जावं तर दिसे, जवळजवळ सगळ्या डोक्यालाच टक्कल. एखाद्या दिवशी अचानक विसरून जाई की आपण बापाच्या वयाचे म्हातारे झालो आहोत, आणि विसरून पूर्वीच्या सवयीनं खोडसाळपणा करून आळीतल्या म्हाताऱ्या आंदीआत्याच्या पाण्याच्या घागरीवर एकदम टण्णकन खडा फेकून मारी — म्हाताऱ्या माणसाचा हा पोरकट खोडसाळपणा पाहून लोक 'मारा, मारा' करत त्याच्या मागे लागत, आणि त्यालाही लाजेनं तोंड लपवायला जागा उरत नसे. सुबलचंद्रही एखाद्या दिवशी चुकून विसरून जाई की तो आता लहान मुलगा झाला आहे. स्वतःला पूर्वीसारखा म्हातारा समजून, जिथे म्हातारी माणसं पत्ते-सोंगट्या खेळत बसलेली असत तिथे जाऊन तो बसे आणि म्हाताऱ्यासारख्या गोष्टी बोलू लागे; ते ऐकून सगळे जण 'जा जा, जा खेळ जा, फार शहाणपणा नको' म्हणून त्याचा कान धरून त्याला वाटेला लावत.
इच्छापूर्ती
अचानक विसरून तो मास्तरांना जाऊन म्हणे, 'जरा द्या हो, ती तंबाखू द्या जरा, एक झुरका घेतो.' ते ऐकून मास्तर त्याला बाकावर एका पायावर उभा करत. न्हाव्याकडे जाऊन म्हणे, 'अरे बेजा, किती दिवसांत हजामतीला आला नाहीस रे?' न्हाव्याला वाटे, पोरगा चांगलीच थट्टा करायला शिकलाय. तो उत्तर देई, 'आणखी दहा-एक वर्षांनी येईन हं.' पुन्हा एखाद्या दिवशी पूर्वीच्या सवयीनं तो आपल्या मुलाला, सुशीलला जाऊन मारी. सुशील भयंकर रागावून म्हणे, 'शिकून-सवरून हीच का अक्कल येतेय तुम्हाला? एवढंसं वीतभर पोर, आणि म्हाताऱ्या माणसावर हात उचलता!' लगेच चहूकडून माणसं धावत येऊन कुणी बुक्का, कुणी थप्पड, कुणी शिव्या द्यायला सुरुवात करत. तेव्हा सुबल मनापासून प्रार्थना करू लागला, 'अहाहा, मी जर माझ्या मुलासारखा, सुशीलसारखा म्हातारा झालो आणि स्वतंत्र झालो, तर सुटलो बाबा!' सुशीलसुद्धा रोज हात जोडून म्हणतो, 'हे देवा, मला बाबांसारखं लहान करून टाक, म्हणजे मनसोक्त खेळत हिंडेन. बाबांनी जो काही धुडगूस मांडलाय, त्यांना आता मला आवरता येत नाही, सतत काळजी करून करून जीव मेटाकुटीला आलाय.' तेव्हा इच्छादेवी येऊन म्हणाल्या, 'काय, फिटली का तुमची हौस?' दोघांनीही साष्टांग नमस्कार घालून म्हटलं, 'दया कर, देवी, फिटली! आता आम्ही जे होतो तेच पुन्हा करून टाक.' इच्छादेवी म्हणाल्या, 'बरं, उद्या सकाळी उठलात की तसंच होईल.' दुसऱ्या दिवशी सकाळी सुबल पूर्वीसारखे म्हातारे होऊन आणि सुशील मुलगा होऊन जागे झाले. दोघांनाही वाटलं, स्वप्नातून जागे झालो. सुबल गंभीर आवाजात म्हणाले, 'सुशील, व्याकरण पाठ करायचं नाही का?' सुशील डोकं खाजवत खाजवत म्हणाला, 'बाबा, माझं पुस्तक हरवलंय.'