रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा
जय-पराजय
राजकन्येचं नाव अपराजिता. उदयनारायणांचे राजकवी शेखर यांनी राजकन्येला कधी डोळ्यांनीसुद्धा पाहिलं नव्हतं. पण ज्या दिवशी एखादं नवं काव्य रचून ते सभेत बसून राजांना ऐकवत, त्या दिवशी आपला आवाज ते नेमका इतका उंच करून वाचत, की तो त्या उत्तुंग प्रासादाच्या वरच्या मजल्यावर गवाक्षांआड बसलेल्या अदृश्य स्त्री-श्रोत्यांच्या कानी पोहोचावा. जणू एखाद्या अगम्य नक्षत्रलोकाच्या दिशेने ते आपल्या गीतांचा उमाळा धाडत असत — जिथे तारकामंडळात त्यांच्या जीवनाचा एक अनोळखी शुभग्रह अदृश्य वैभवात विराजमान होता. कधी सावलीसारखं काहीतरी दिसे, कधी नूपुरांची किणकिण ऐकू येई; बसल्या बसल्या ते मनाशी विचार करीत — कशी असतील ती दोन पावलं, जिथे ते सोन्याचे नूपुर बांधलेले तालात गाणं गात आहेत? ते दोन आरक्त, शुभ्र, कोमल तळवे प्रत्येक पावलागणिक किती सौभाग्यासारखे, किती अनुग्रहासारखे, किती करुणेसारखे पृथ्वीला स्पर्श करत असतील! मनात ती दोन पावलं प्रतिष्ठापून कवी फुरसतीच्या वेळी तिथे येऊन लोटांगण घालत, आणि त्या नूपुरांच्या किणकिणीच्या सुरात आपली गाणी बांधत. पण जी सावली त्यांनी पाहिली होती, जे नूपुर ऐकले होते, ती कुणाची सावली, कुणाचे नूपुर — असा तर्क, असा संशय त्यांच्या भक्त-हृदयात कधी उगवलाच नाही.
जय-पराजय
राजकन्येची दासी मंजरी घाटावर जाई तेव्हा तिची वाट शेखरांच्या घरासमोरूनच जात असे. येता-जाता कवीशी तिच्या दोन गोष्टी झाल्याशिवाय राहत नसत. आसपास कुणी नाही असं पाहून ती सकाळ-संध्याकाळ शेखरांच्या घरात जाऊन बसतही असे. ती जितक्या वेळा घाटावर जाई तितक्या वेळा तिला खरोखर काम असे, असंही वाटत नसे; आणि काम असलंच म्हणावं, तरी घाटावर जाताना त्यातल्या त्यात जरा विशेष काळजी घेऊन रंगीत लुगडं नेसायचं आणि कानांवर आंब्याच्या मोहराचे दोन घोस खोवायचे, याचं काही योग्य कारण सापडत नसे. लोक हसत, कुजबुजत. त्यात लोकांचा काही दोष नव्हता. मंजरीला पाहिलं की शेखरांना विशेष आनंद होई. तो लपवण्याचाही ते फारसा प्रयत्न करत नसत. तिचं नाव होतं मंजरी; विचार करून पाहिलं तर सामान्य माणसाला तेवढं नाव पुरेसं होतं, पण शेखर त्यावर आणखी जरासं कवित्व चढवून तिला वसंतमंजरी म्हणत. ते ऐकून लोक म्हणत, 'बाप रे, आता सर्वनाशच!' शिवाय कवीच्या वसंतवर्णनात 'मंजुलवंजुलमंजरी' असा अनुप्रासही मधूनमधून आढळे. इतकंच काय, ही कुजबुज राजांच्या कानांपर्यंतही जाऊन पोहोचली होती. आपल्या कवीच्या या रसाधिक्याचं दर्शन घडलं की राजांना मोठी मौज वाटे; ते त्यावरून थट्टा करीत, आणि शेखरही त्या थट्टेत सामील होत. राजे हसून विचारत, 'भ्रमर काय फक्त वसंताच्या राजसभेतच गाणं गातो?' कवी उत्तर देत, 'नाही, पुष्पमंजरीचा मधही चाखतो.' अशा रीतीने सगळेच हसत, मौज करत; अंतःपुरात राजकन्या अपराजिताही मंजरीवरून अधूनमधून थट्टा करीत असाव्यात. मंजरीला त्याचं वाईट वाटत नसे. अशा रीतीने खरं आणि खोटं मिसळून माणसाचं आयुष्य कसंबसं सरून जातं — थोडं विधाता घडवतो, थोडं माणूस स्वतः घडवतो, थोडं चार लोक घडवून देतात. आयुष्य म्हणजे एक पंचमेळी जोडाजोड — खरी आणि खोटी, कल्पित आणि वास्तव.
जय-पराजय
फक्त कवी जी गाणी गात, तेवढीच सत्य आणि संपूर्ण. त्या गाण्यांचा विषय तोच — राधा आणि कृष्ण; तोच चिरंतन नर आणि चिरंतन नारी, तेच अनादी दुःख आणि अनंत सुख. त्या गाण्यांतच त्यांचं खरंखुरं स्वतःचं मनोगत होतं, आणि त्या गाण्यांचं खरेपण अमरापूरच्या राजांपासून दीनदुबळ्या प्रजेपर्यंत प्रत्येकाने आपापल्या हृदयात पारखून पाहिलं होतं. त्यांची गाणी सगळ्यांच्या ओठी होती. चांदणं पडलं की, दक्षिणेच्या वाऱ्याची जराशी चाहूल लागली की, लगेच देशाच्या चारी दिशांना किती उपवनांतून, किती वाटांवरून, किती नावांतून, किती गवाक्षांतून, किती अंगणांतून त्यांची गाणी उचंबळून उठत — त्यांच्या कीर्तीला सीमाच उरली नव्हती. असे बरेच दिवस गेले. कवी कविता लिहीत, राजे ऐकत, राजसभेतले लोक वाहवा करत, मंजरी घाटावर येई — आणि अंतःपुराच्या गवाक्षातून कधी कधी एक सावली पडे, कधी कधी नूपुरांचा नाद ऐकू येई. २ इतक्यात दक्षिणेतून एक दिग्विजयी कवी शार्दूलविक्रीडित वृत्तात राजांचं स्तवन गात राजसभेत येऊन उभे ठाकले. स्वदेशातून निघून वाटेतल्या सगळ्या राजकवींना पराभूत करत करत अखेर ते अमरापुरात येऊन पोहोचले होते. राजांनी मोठ्या आदराने म्हटलं, 'एहि एहि.' कवी पुंडरीक घमेंडीत उद्गारले, 'युद्धं देहि.' राजांचा मान राखायला हवा, युद्ध द्यायलाच हवं; पण काव्ययुद्ध म्हणजे नेमकं कसं असतं, याची शेखरांना नीटशी कल्पना नव्हती. ते अतिशय चिंतित, भयभीत झाले. रात्री झोप लागली नाही. कीर्तिमान पुंडरीकांचा उंच, बळकट देह, धारदार बाकदार नाक आणि गर्वाने ताठ उंचावलेलं मस्तक त्यांना दाही दिशांना कोरलेलं दिसू लागलं.
जय-पराजय
सकाळी धडधडत्या छातीने कवी रणांगणात येऊन दाखल झाले. भल्या पहाटेपासूनच सभागृह माणसांनी भरून गेलं होतं, कोलाहलाला अंत नव्हता; नगरातले बाकी सगळे कामधंदे पूर्ण बंद. कवी शेखरांनी मोठ्या कष्टाने चेहऱ्यावर हसरी प्रसन्नता आणली आणि प्रतिस्पर्धी कवी पुंडरीकांना नमस्कार केला; पुंडरीकांनी प्रचंड बेपर्वाईने, जेमतेम खुणेपुरता नमस्कार परत केला आणि आपल्या मागोमाग आलेल्या भक्तमंडळीकडे पाहून ते हसले. शेखरांनी एकदा अंतःपुराच्या जाळीदार गवाक्षाकडे कटाक्ष टाकला — त्यांना जाणवलं, आज तिथून शेकडो कुतूहलभरल्या काळ्याभोर बाहुल्यांची उत्सुक नजर या गर्दीवर अखंड बरसते आहे. एकदा एकाग्र होऊन त्यांनी आपलं चित्त त्या ऊर्ध्वलोकी उधळलं आणि आपल्या जयलक्ष्मीला वंदन करून ते परतले; मनात म्हणाले, 'आज जर माझा जय झाला, तर हे देवी, हे अपराजिते, त्यात तुझ्याच नावाचं सार्थक होईल.' तुताऱ्या, भेरी वाजू लागल्या. जयजयकार करत जमलेले सगळे उठून उभे राहिले. शुभ्र वस्त्रं ल्यालेले राजे उदयनारायण शरदातल्या प्रभातीच्या शुभ्र मेघराशीसारखे संथ पावलांनी सभेत आले आणि सिंहासनावर आरूढ झाले. पुंडरीक उठून सिंहासनासमोर येऊन उभे राहिले. विशाल सभा स्तब्ध झाली. छाती फुगवून, मान किंचित वर कलती करून, विराट देहाचे पुंडरीक धीरगंभीर स्वरात उदयनारायणांचं स्तोत्र म्हणू लागले. तो आवाज घरात मावत नव्हता — विशाल सभागृहाच्या चारी भिंतींवर, खांबांवर, छतावर समुद्राच्या लाटांसारखा खोल घनगंभीर नादात आदळून परत फिरू लागला, आणि केवळ त्या ध्वनीच्या वेगाने साऱ्या जनसमुदायाच्या छातीची कवाडं थरथरू लागली. किती कौशल्य, किती कलाकुसर, उदयनारायण या नावाच्या किती तऱ्हांनी व्युत्पत्ती, राजांच्या नावाच्या अक्षरांची किती बाजूंनी किती प्रकारे मांडणी, किती वृत्तं, किती यमकं!
जय-पराजय
पुंडरीक संपवून खाली बसले, तेव्हा काही वेळ ते निःशब्द सभागृह त्यांच्या आवाजाच्या प्रतिध्वनीने आणि हजारो हृदयांच्या मूक विस्मयाने घुमत राहिलं. दूरदूरच्या देशांतून आलेल्या पंडितांनी उजवा हात उंचावून उचंबळत्या स्वरात 'साधु साधु' असा घोष केला. मग सिंहासनावरून राजांनी एकदा शेखरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. शेखरांनीही भक्ती, प्रीती, रुसवा आणि एक प्रकारचा करुण संकोच भरलेली दृष्टी राजांकडे टाकली आणि हळूहळू ते उठून उभे राहिले. लोकरंजनासाठी रामाने दुसऱ्यांदा अग्निपरीक्षा घ्यायचं मनात आणलं, तेव्हा सीता जणू अशीच पाहत, अशाच रीतीने आपल्या पतीच्या सिंहासनासमोर उभी राहिली होती. कवीच्या दृष्टीने मूकपणे राजांना सांगितलं, 'मी तुमचाच आहे. सगळ्या जगासमोर मला उभं करून माझी परीक्षा घ्यायची असेल तर घ्या. पण—' त्यानंतर त्यांनी डोळे खाली वळवले. पुंडरीक सिंहासारखे उभे होते; शेखर चहूबाजूंनी पारध्यांनी घेरलेल्या हरणासारखे उभे राहिले. कोवळं तारुण्य, स्त्रीसारखा लाजरा आणि स्नेहाने कोमल चेहरा, फिकट गाल, देहयष्टी अगदीच किरकोळ — पाहताच वाटे, भावनेचा नुसता स्पर्श होताच सारा देह वीणेच्या तारेसारखा थरथरून झंकारू लागेल. शेखरांनी मान वर न करता आधी अगदी हळू आवाजात सुरुवात केली. पहिला एक श्लोक बहुधा कुणालाच नीट ऐकू गेला नाही. मग हळूहळू त्यांनी मुख वर केलं — आणि जिकडे त्यांनी नजर टाकली, तिथून जणू सगळी गर्दी आणि राजसभेच्या पाषाणभिंती विरघळून दूरदूरच्या अतीतात लुप्त होऊन गेल्या. मधुर, स्वच्छ स्वर कंप पावत पावत तेजस्वी अग्निशिखेसारखा वर वर चढू लागला. आधी त्यांनी राजांच्या चंद्रवंशातल्या मूळपुरुषाची कथा सुरू केली. मग हळूहळू किती युद्धं, लढाया, शौर्य-पराक्रम, यज्ञ-दानं, किती महान अनुष्ठानं यांच्यामधून ती राजकहाणी वर्तमानकाळापर्यंत आणून ठेवली.
जय-पराजय
अखेरीस दूरच्या स्मृतींत गुंतलेली आपली दृष्टी परत आणून राजांच्या मुखावर स्थिर केली, आणि राज्यातल्या साऱ्या प्रजेच्या हृदयातली एक विशाल, अव्यक्त प्रीती भाषेत आणि छंदात मूर्तिमंत करून सभेच्या मधोमध उभी केली — जणू दूरदूरहून लाखो प्रजाजनांच्या हृदयांचे प्रवाह धावत आले आणि राजांच्या पूर्वजांचा हा अतिप्राचीन प्रासाद त्यांनी एका महासंगीताने भरून टाकला; जणू त्यांनी याच्या प्रत्येक विटेला स्पर्श केला, आलिंगन दिलं, चुंबन घेतलं; वर अंतःपुराच्या गवाक्षांसमोर उसळी घेऊन राजलक्ष्मीस्वरूप प्रासादलक्ष्मींच्या चरणी स्नेहार्द्र भक्तिभावाने लोटांगण घातलं; आणि तिथून परतून राजांना आणि राजसिंहासनाला मोठ्या जल्लोषात शेकडो वेळा प्रदक्षिणा घालू लागले. शेवटी ते म्हणाले, 'महाराज, शब्दांत मी हार पत्करीनही, पण भक्तीत मला कोण हरवणार?' असं म्हणून थरथरत्या देहाने ते खाली बसले. तेव्हा अश्रूंनी न्हालेल्या प्रजाजनांनी 'जय जय'च्या घोषाने आकाश दणाणून सोडलं. सामान्य जनसमुदायाच्या या उन्मादाला तुच्छतेच्या हास्याने धुडकावून पुंडरीक पुन्हा उठून उभे राहिले. उद्दाम गर्जनेने त्यांनी विचारलं, 'शब्दाहून श्रेष्ठ कोण?' क्षणार्धात सगळे स्तब्ध झाले. मग अनेक वृत्तांत अद्भुत पांडित्य दाखवत, वेद-वेदान्त, आगम-निगम यांतून ते सिद्ध करू लागले — विश्वात शब्दच सर्वश्रेष्ठ. शब्द हेच सत्य, शब्द हेच ब्रह्म. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर शब्दाच्या अधीन; म्हणून शब्द त्यांच्याहूनही मोठा. ब्रह्मदेव चार मुखांनी बोलूनही शब्द संपवू शकत नाहीत; पंचाननाला पाच मुखांनीही शब्दाचा अंत लागला नाही, म्हणून ते शेवटी मौन धरून ध्यानमग्न होऊन शब्द शोधत बसले आहेत.
जय-पराजय
अशा रीतीने पांडित्यावर पांडित्य आणि शास्त्रावर शास्त्र रचून त्यांनी शब्दासाठी एक गगनभेदी सिंहासन उभारलं, शब्दाला मर्त्यलोकाच्या आणि सुरलोकाच्या मस्तकावर नेऊन बसवलं, आणि पुन्हा वज्रासारख्या गर्जनेत विचारलं, 'शब्दापेक्षा श्रेष्ठ कोण?' गर्वाने त्यांनी चोहीकडे न्याहाळलं; कुणीच काही उत्तर दिलं नाही, तेव्हा ते सावकाश आसनावर बसले. पंडित 'साधु साधु', 'धन्य धन्य' करू लागले, राजे विस्मित होऊन राहिले, आणि कवी शेखरांना या प्रचंड पांडित्यापुढे आपण अगदी क्षुद्र आहोत असं वाटलं. त्या दिवसापुरती सभा उठली. ३ दुसऱ्या दिवशी शेखरांनी येऊन गाणं सुरू केलं — वृंदावनात पहिल्यांदा बासरी वाजली आहे; गोपींना अजून कळत नाही ती कोणी वाजवली, कळत नाही कुठे वाजते आहे. एकदा वाटलं, दक्षिणेच्या वाऱ्यात वाजते आहे. एकदा वाटलं, उत्तरेला गिरिगोवर्धनाच्या शिखरावरून सूर येतो आहे; वाटलं, उदयाचलावर उभं राहून कुणी मीलनासाठी साद घालतं आहे; वाटलं, अस्ताचलाच्या कडेला बसून कुणी विरहाच्या शोकाने रडतं आहे; वाटलं, यमुनेच्या प्रत्येक लाटेतून बासरी वाजू लागली; वाटलं, आकाशातली प्रत्येक चांदणी जणू त्या बासरीचं एकेक छिद्र आहे — आणि अखेरीस कुंजाकुंजांत, वाटांवर घाटांवर, फुलाफुलांत, जळी-स्थळी, उंच-सखल, आत-बाहेर, सगळीकडून बासरी वाजू लागली — बासरी काय म्हणते आहे ते कुणालाच उमगलं नाही, आणि बासरीला उत्तर म्हणून हृदयाला काय सांगायचं आहे, तेही कुणाला ठरवता आलं नाही; फक्त दोन्ही डोळे अश्रूंनी भरून आले, आणि एका अलौकिक सुंदर, श्यामल-स्निग्ध मरणाच्या ओढीने सारा प्राण जणू कासावीस होऊन उठला.
जय-पराजय
सभा विसरून, राजे विसरून, आपला पक्ष-परपक्ष विसरून, यश-अपयश, जय-पराजय, उत्तर-प्रत्युत्तर सगळं विसरून शेखर जणू आपल्या निर्जन हृदयकुंजात एकटेच उभे राहून ते बासरीचं गाणं गात राहिले. मनात फक्त एक तेजोमय मानसमूर्ती होती; कानांत फक्त दोन कमलचरणांच्या नूपुरांचा नाद वाजत होता. गाणं संपवून कवी शुद्ध हरपल्यासारखे खाली बसले, तेव्हा एका अवर्णनीय माधुर्याने, एका विशाल, व्यापक विरहव्याकुळतेने सभागृह भरून राहिलं — कुणाच्याच तोंडून 'साधु' निघेना. या भावनेचा भर थोडा ओसरल्यावर पुंडरीक सिंहासनासमोर उठून उभे राहिले. त्यांनी प्रश्न केला, 'राधा तरी कोण, आणि कृष्ण तरी कोण?' असं म्हणून त्यांनी चोहीकडे नजर फिरवली, आणि शिष्यांकडे पाहून किंचित हसून पुन्हा विचारलं, 'राधा तरी कोण, आणि कृष्ण तरी कोण?' आणि असामान्य पांडित्याचा पसारा मांडून स्वतःच त्याचं उत्तर देऊ लागले. ते म्हणाले, राधा म्हणजे प्रणव ओंकार, कृष्ण म्हणजे ध्यानयोग, आणि वृंदावन म्हणजे दोन भुवयांच्या मधला बिंदू. इडा, सुषुम्ना, पिंगला, नाभिकमल, हृदयकमल, ब्रह्मरंध्र — सगळं काही आणून ओतलं. 'रा'चा अर्थ काय, 'धा'चा अर्थ काय, कृष्ण शब्दातल्या 'क'पासून मूर्धन्य 'ण'पर्यंत प्रत्येक अक्षराचे किती निरनिराळे अर्थ होऊ शकतात, याची एकेक करून मीमांसा केली. एकदा समजावलं, कृष्ण म्हणजे यज्ञ, राधिका अग्नी; एकदा समजावलं, कृष्ण म्हणजे वेद आणि राधिका षड्दर्शनं; त्यानंतर समजावलं, कृष्ण म्हणजे शिक्षण आणि राधिका दीक्षा. राधिका तर्क, कृष्ण मीमांसा; राधिका उत्तर-प्रत्युत्तर, कृष्ण जयलाभ. असं बोलून राजांकडे, पंडितांकडे आणि शेवटी धारदार हास्याने शेखरांकडे पाहत पुंडरीक खाली बसले.
जय-पराजय
पुंडरीकांच्या अद्भुत सामर्थ्याने राजे मोहून गेले, पंडितांच्या विस्मयाला सीमा उरली नाही, आणि कृष्ण-राधेच्या नवनव्या व्याख्यांनी बासरीचं गाणं, यमुनेची खळखळ, प्रेमाची मोहिनी पार नाहीशी झाली; जणू कुणीतरी पृथ्वीवरून वसंताचा हिरवा रंग पुसून काढला आणि अथपासून इतिपर्यंत पवित्र शेणाने सारवून टाकलं. शेखरांना आपली इतक्या दिवसांची सारी गाणी व्यर्थ वाटू लागली; यानंतर गाणं गाण्याचं बळच त्यांच्यात उरलं नाही. त्या दिवशी सभा उठली. ४ दुसऱ्या दिवशी पुंडरीकांनी व्यस्त आणि समस्त, द्विव्यस्त आणि द्विसमस्तक, वृत्त, तार्क्य, सौत्र, चक्र, पद्म, काकपद, आद्युत्तर, मध्योत्तर, अन्तोत्तर, वाक्योत्तर, श्लोकोत्तर, वचनगुप्त, मात्राच्युतक, च्युतदत्ताक्षर, अर्थगूढ, स्तुतिनिंदा, अपह्नुति, शुद्धापभ्रंश, शाब्दी, कालसार, प्रहेलिका अशी अद्भुत शब्दचातुरी करून दाखवली. ते ऐकून सभेतल्या लोकांचा विस्मय कुठे मावेना. शेखर ज्या रचना करीत त्या अगदी साध्यासुध्या — सुखात, दुःखात, सणावारी, आनंदाच्या प्रसंगी सर्वसामान्य लोक त्या वापरत. आज त्यांना स्पष्ट कळून चुकलं, की त्यांच्यात कसलंच कसब नाही; जणू मनात आणलं असतं तर तेही त्या रचू शकले असते, केवळ सवय नाही, इच्छा नाही, सवड नाही अशा कारणांमुळेच जमत नाही इतकंच — नाहीतर त्या शब्दांत विशेष नवं काही नाही, अवघडही काही नाही, त्यांच्यामुळे जगातल्या लोकांना ना कोणतं नवं शिक्षण मिळतं, ना कसली सोय होते. पण आज जे ऐकलं ते अद्भुतच, आणि काल जे ऐकलं त्यातही विचार करण्यासारखं आणि शिकण्यासारखं भरपूर होतं. पुंडरीकांच्या पांडित्यापुढे आणि नैपुण्यापुढे त्यांना आपला कवी अगदीच पोरसवदा, किरकोळ माणूस वाटू लागला.
जय-पराजय
माशाच्या शेपटीच्या फटकाऱ्याने पाण्यात जी गूढ खळबळ चालू राहते, तिचा प्रत्येक धक्का सरोवरातल्या कमळाला जसा जाणवतो, तसा आपल्या भोवतालच्या सभाजनांच्या मनातला भाव शेखरांना हृदयात उमगला. आज शेवटचा दिवस. आज जय-पराजयाचा निर्णय होणार. राजांनी आपल्या कवीकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकला. त्याचा अर्थ असा: 'आज निरुत्तर राहून चालणार नाही; तुझ्याने होईल तेवढा प्रयत्न तुला करावाच लागेल.' शेखर थकल्यासारखे उठून उभे राहिले; फक्त एवढेच शब्द बोलले, 'हे वीणापाणी, हे श्वेतभुजे, तूच जर आपलं कमळवन ओस टाकून आज या आखाड्यात येऊन उभी राहिलीस, तर तुझ्या चरणी जडलेल्या अमृततृषार्त भक्तांची काय गत होईल?' चेहरा किंचित वर करून करुण स्वरात ते बोलले — जणू श्वेतभुजा वीणापाणी राजांच्या अंतःपुरात जाळीच्या गवाक्षासमोर नजर खाली करून उभ्या होत्या. तेव्हा पुंडरीक मोठ्याने हसले, आणि 'शेखर' शब्दाची शेवटची दोन अक्षरं — 'खर', म्हणजे गाढव — घेऊन त्यांनी अखंड श्लोक रचत नेले. ते म्हणाले, 'कमळवनाचा आणि खराचा काय संबंध? आणि संगीताचा एवढा रियाज करूनही त्या प्राण्याच्या पदरी काय फळ पडलं? आणि सरस्वतीचं अधिष्ठान तर पुंडरीकावरच — शुभ्र कमळावरच — असतं; महाराजांच्या राज्यात त्यांनी असा कोणता अपराध केला होता, की या देशात त्यांना खरावर बसवून त्यांची अशी विटंबना चालली आहे?'
जय-पराजय
पंडित या प्रत्युत्तरावर मोठमोठ्याने हसू लागले. सभासदही त्यात सामील झाले — त्यांचं पाहून सभेतले सगळेच, ज्यांना कळलं ते आणि ज्यांना कळलं नाही तेही, हसू लागले. याला साजेसं प्रत्युत्तर मिळावं या अपेक्षेने राजे आपल्या कविमित्राला अंकुशासारख्या तीक्ष्ण नजरेने पुन्हा पुन्हा टोचत राहिले. पण शेखर त्याकडे जराही लक्ष न देता अढळपणे बसून राहिले. तेव्हा मनातल्या मनात शेखरांवर अतिशय रुष्ट होऊन राजे सिंहासनावरून खाली उतरले आणि आपल्या गळ्यातला मोत्यांचा हार काढून त्यांनी पुंडरीकांच्या गळ्यात घातला. सारी सभा 'धन्य धन्य' करू लागली. अंतःपुरातून एकाच वेळी अनेक कड्यांचा, कंकणांचा, नूपुरांचा आवाज ऐकू आला — तो ऐकून शेखर आसन सोडून उठले आणि सावकाश सभागृहातून बाहेर निघून गेले. ५ कृष्णचतुर्दशीची रात्र. दाट अंधार. फुलांचा गंध वाहत येणारा दक्षिणेचा वारा. उदार विश्वबंधूसारखा तो उघड्या खिडक्यांतून नगरातल्या घराघरांत शिरतो आहे. घरातल्या लाकडी माळ्यावरून शेखरांनी आपल्या पोथ्या उतरवून समोर त्यांचा ढीग रचून ठेवला आहे. त्यांतून निवडून निवडून स्वतः रचलेले ग्रंथ त्यांनी वेगळे काढले. किती दिवसांचं किती लिखाण! त्यांतल्या कितीतरी रचना ते स्वतःच जवळजवळ विसरून गेले होते. त्या उलटसुलट करून इथलं तिथलं वाचून पाहू लागले. आज त्यांना ते सगळंच कवडीमोल वाटलं.
जय-पराजय
सुस्कारा सोडून ते म्हणाले, 'साऱ्या आयुष्याची हीच का कमाई? काही शब्द, आणि वृत्तं, आणि यमकं!' यात कुठलं सौंदर्य, मानवाचा कुठला चिरंतन आनंद, कुठल्या विश्वसंगीताचा प्रतिध्वनी, त्यांच्या हृदयाचं कुठलं खोल आत्मप्रकटन गुंफलेलं आहे — ते आज त्यांना दिसलंच नाही. रोग्याच्या तोंडाला जसं कोणतंच अन्न रुचत नाही, तसं आज हाताशी आलं ते सगळं त्यांनी ढकलून ढकलून दूर लोटलं. राजांची मैत्री, लोकांतली कीर्ती, हृदयातली दुराशा, कल्पनेची मोहिनी — आज या अंधाऱ्या रात्री सगळंच पोकळ फसवणूक वाटू लागली. मग एकेक करून आपल्या पोथ्या फाडून ते समोरच्या धगधगत्या अग्निपात्रात टाकू लागले. अचानक एक थट्टेची कल्पना मनात आली. हसत हसत ते म्हणाले, 'मोठमोठे राजे अश्वमेध यज्ञ करतात; आज माझा हा काव्यमेध यज्ञ!' पण लगेच मनात आलं, तुलना बरोबर जमली नाही. 'अश्वमेधाचा अश्व सगळीकडे विजयी होऊन परत येतो, तेव्हाच अश्वमेध होतो; माझं कवित्व ज्या दिवशी पराभूत झालं, त्या दिवशी मी काव्यमेधाला बसलो आहे — आणखी कितीतरी दिवस आधीच केला असता तर बरं झालं असतं.' एकेक करून आपले सगळे ग्रंथ त्यांनी अग्नीला अर्पण केले. आग धडाडून पेटली, तेव्हा कवी दोन्ही रिकामे हात आवेगाने शून्यात उधळत उधळत म्हणाले, 'तुला दिलं, तुला दिलं, तुला दिलं, हे सुंदर अग्निशिखे, तुलाच दिलं! इतके दिवस साऱ्या आहुती तुलाच देत आलो होतो, आज एकदाचं सगळं संपवून टाकलं. कितीतरी दिवस तू माझ्या हृदयात जळत होतीस, हे मोहिनी, हे वह्निरूपिणी — मी सोनं असतो तर उजळून निघालो असतो; पण मी क्षुद्र तृण, देवी, म्हणून आज भस्म होऊन गेलो.'
जय-पराजय
रात्र बरीच झाली. शेखरांनी आपल्या खोलीच्या सगळ्या खिडक्या उघडून टाकल्या. त्यांना जी जी फुलं आवडत, ती त्यांनी संध्याकाळी बागेतून गोळा करून आणली होती. सगळी पांढरी फुलं — जुई, मोगरा आणि गंधराज. तीच ओंजळी ओंजळी भरून त्यांनी निर्मळ बिछान्यावर पसरली. खोलीच्या चारी बाजूंना दिवे लावले. त्यानंतर मधात एका वनस्पतीचा विषारी रस मिसळून त्यांनी निश्चिंत चेहऱ्याने तो प्राशन केला, आणि हळूहळू जाऊन आपल्या शय्येवर ते पहुडले. देह शिथिल झाला, डोळे मिटत आले. नूपुर वाजले. दक्षिणेच्या वाऱ्याबरोबर केसांच्या बटांचा एक सुगंध खोलीत शिरला. कवी मिटल्या डोळ्यांनी म्हणाले, 'देवी, भक्तावर दया केलीस का? इतक्या दिवसांनी आज दर्शन द्यायला आलीस का?' एका सुमधुर कंठातून उत्तर ऐकू आलं, 'कवी, मी आले आहे.' शेखरांनी दचकून डोळे उघडले; पाहिलं, तो शय्येसमोर एक अपूर्व स्त्रीमूर्ती उभी. मृत्यूने वेढलेल्या, आसवांनी धूसर डोळ्यांना स्पष्ट दिसलं नाही. वाटलं, त्यांच्या हृदयातली ती छायामय प्रतिमाच अंतरातून बाहेर येऊन, या मृत्युसमयी त्यांच्या मुखाकडे एकटक पाहते आहे. त्या रमणी म्हणाल्या, 'मी राजकन्या अपराजिता.' कवी जीव एकवटून उठून बसले. राजकन्या म्हणाल्या, 'राजांनी तुम्हाला योग्य न्याय दिला नाही. जय तुमचाच झाला आहे, कवी; म्हणून मी आज तुम्हाला जयमाला घालायला आले आहे.' असं म्हणून अपराजितांनी स्वतःच्या गळ्यातली, स्वहस्ते गुंफलेली फुलांची माळ काढून कवीच्या गळ्यात घातली. मरणाने घायाळ झालेले कवी शय्येवर कोसळले.